माती, पाणी आणि आभाळ : ग्रीस - भाग १
माती, पाणी आणि आभाळ : ग्रीस - भाग २
ट्राम एका छोट्या रस्त्याला लागली. अथेन्स मधला हा एक लोकप्रिय भाग. उपहारगृहे, पब आणि तर्हेतर्हेच्या खरेदीसाठी मोहात पाडणारी दुकानांची गर्दी हे या भागाचे वैशिष्ट्य. त्या भागात शिरल्याबरोबर तुळशीबागेत आल्याचा भास झाला. डायवरकाका पण त्या गर्दीतून कौशल्याने वाट काढत फिरवत होते. पोटात कावळे ओरडायला लागले होते. एक खाऊगल्ली दिसली तिथे उतरलो. प्रत्येक उपहारगृहासमोर गर्दी होती. खमंग वास भरून राहिला होता. आमच्या वाढप्याला शाकाहारी पर्याय विचारले तर त्याने धाड्धाड १०-१२ पदार्थांची नावे सांगितली! त्यापैकी ऑलिवच्या तेलात परतलेल्या भाज्या, भात भरून बेक केलेले टोमॅटो, ग्रीक सॅलड आणि ताजा खमंग ब्रेड असे पोटभर जेवलो.
बाकी युरोपात फिरताना तसे शाकाहारी पर्याय फारच कमी असतात. बहुतेक वेळेला पिझ्झा, थंडगार अळणी सँडविच नाहीतर बचकभर सॉस ओतलेली स्पॅघेटी एवढयावर भागवावे लागते. इथे मात्र ग्रीक अन्नपूर्णा आमच्यावर बरीच प्रसन्न दिसत होती.
दुपार टळत चालली होती. अथेन्सदर्शन बस मध्ये बसून तिथल्या राष्ट्रीय पुराणवस्तूसंग्रहालयाला उतरलो.
याची माहिती अॅक्रोपोलीस संग्रहालयासोबत देईन. नंतर शहर बघायचे ठरवले. जी ठिकाणं आत जाऊन बघता येणार नव्हती किंवा वेळेअभावी भेट देणे जमणार नव्हते ती बसमधून बघितली.
ग्रीक संसद
लोकशाहीचे प्रतिक
राष्ट्रीय ग्रंथालय, विद्यापीठ याशिवाय मांसमच्छी बाजार, मुख्य बाजारपेठ, सिंतयाग्मा चौक अशी उघडी ठिकाणे पण बघता आली. शेवटी बसचा आजचा शेवटचा थांबा आला. ओमानिया चौक. इथे उतरलो आणि मधोमध असणार्या छोट्याशा बागेत जाऊन बसलो. संध्याकाळ होऊन गेली होती. दिवसभराचे आपापले उद्योग संपवून लोक चौकाभोवती असणार्या पब्-कॅफे मध्ये खुशालले होते.
दिवसभरात बरीच माहिती मिळाली होती. इथला मुख्य धर्म ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स. ९७% लोकसंख्या ही आहे. बाकी ३% मध्ये ज्यू आणि मुस्लिम धर्माचे लोक येतात. एकूण लोकसंख्येपैकी मूळ ग्रीक असलेले लोक केवळ ३०%च आहेत. बाकी सगळे बाहेरून येऊन इथे वसलेले. कुठेही फिरताना त्या त्या स्थानिक लोकांची काहीतरी वैशिष्ट्ये लक्षात येतात. उदा: फ्रेंच लोकांचे उभट चेहरे, जर्मन लोकांची धिप्पाड शरीरयष्टी, स्विस् लोकांचे गुलाबी लाल गोरेपण एवढेच काय पण चिनी आणि जपानी, थाइ लोकही वर वर सारखे दिसले तरी वेगवेगळे ओळखू येतात. इथे मात्र ग्रीक लोक दिसतात कसे हा प्रश्न पडत होता. शहरातल्या या मध्यवर्ती चौकात जगातल्या सर्व वंशांचे प्रतिनिधी दिसत होते पण ग्रीक वेगळे ओळखू येइनात.
ग्रीस चे भौगोलिक स्थान पूर्व पश्चिमेला जोडणारे आहे. त्यामुळे तिथल्या आजच्या लोकजीवनात ही सरमिसळ सतत जाणवते. चित्र बघताना, संगीत ऐकताना मधुनच काहीतरी ओळखीचे वाटू लागते. खानपान तर खूप ओळखीच्या चवीचे. कपडे, व्यापार इथपासून पुराणांपर्यंत पूर्वपश्चिम एकत्र आलेले दिसतात. हे लोक मूर्तीपूजा करतात. शुभ अशुभाच्या कल्पना थेट भारतीय वाटाव्या अशा. कुस्ती, भालाफेक असे सहसा पश्चिमेकडे न आढळणारे खेळ इथे लोकप्रिय. दारू हे व्यसन समजले जाते. पुरूषप्रधानता लक्षात यावी एवढी स्पष्ट. जुनं ते सोनं मानण्याची प्रवृत्तीही आपल्यासारखीच.
हे विचार एकमेकांना बोलून दाखवत हॉटेलवर परतलो. जेवणासाठी खाली उतरणार तोच अनेक लोकांचा कसलासा आवाज ऐकू आला. बाल्कनीतून ओमानिया चौकात बघितले ते दृश्य चमकवणारे होते. या चौकात १० रस्ते एकत्र येतात. त्या १० रस्त्यांचे उपरस्ते ही इथुन दिसत होते. प्रत्येक गल्लीबोळातून लोकांच्या झुंडी मुख्य चौकाकडे येत होत्या. काही गटांना छोट्या मोर्चाचे रूप आले होते. प्रत्येक गटाचा एक म्होरक्या होता. तो जोरजोरात घोषणा देत होता. हातात काळे झेंडे आणि ग्रीक भाषेत मजकूर लिहिलेले फलक दिसत होते. कोणाच्या तरी नावाने निषेध चालला होता. हाय हाय च्या घोषणांनी वातावरण तापत चालले होते. थोड्या वेळात पोलीस पण आले. लोक थोडे शांत झाले. एक नेता एका स्टुलावर चढला आणि भाषण सुरु झाले. लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि मोर्चा पुढे निघाला. यावेळी मात्र शिस्तीत रांगा करून, घोषणा देत तो प्रचंड समुदाय पुढे गेला.
हे सगळे भाषा येत नसल्याने शब्दशः कळू शकले नाही. उत्सुकता खूप ताणली गेली होती. हॉटेल मॅनेजर आम्ही घाबरुन जाऊ या शंकेने काही पत्ता लागू देत नव्हता. लोकांची भाषा कळली नाही पण आवेश, चीड आणि संताप मात्र भिडला होता.
जेवणासाठी फार लांब न जाण्याचा सल्ला देण्यात आला. कोणीतरी समोर असलेले एक पाकिस्तानी रेस्टॉरंट सुचवले. तिथलेही दारिद्र्य डोळ्यात भरणारे होते. जेवण मात्र उत्तम मिळाले. ४ पराठे, पालक भाजी, रायता, सॅलड्... सगळे मिळून बिल झाले ४ युरो!!ही स्वस्ताई सर्व ठिकाणी दिसली.
दिवस संपला होता. पार्थेनन,संग्रहालय, प्लाका, ओमानिया चौक...प्रत्येक ठिकाणचा नवा अनुभव...डोके शिणले होते. हॉटेलवर जाऊन दिवसभराच्या नोंदी केल्या. गाढ झोप लागली. उद्या सकाळी अथेन्स मधले सर्वात जुने आणि सर्वात मोठे झीयस टेंपल बघायला जायचे आहे.
प्रतिक्रिया
24 Sep 2010 - 11:40 pm | अनामिक
हा भागही झकास झालाय. पुढच्या भागासाठी उत्सुकता आहेच!
24 Sep 2010 - 11:57 pm | पैसा
+१
25 Sep 2010 - 12:01 am | मृत्युन्जय
+२
वेगळे काय लिहु?
25 Sep 2010 - 12:41 am | विलासराव
वाचतोय.
25 Sep 2010 - 12:46 am | प्रभो
हा ही भाग क ड आणी क!!!
25 Sep 2010 - 12:52 am | सुनील
फार छोटे भाग टाकता बॉ!
छान वर्णन आणि फोटो.
25 Sep 2010 - 1:10 am | अर्धवटराव
हा भागही छान उतरलाय...
नेक्स्ट प्लीझ..
(प्रतीक्षेत) अर्धवटराव
25 Sep 2010 - 3:06 am | स्वाती२
येऊ दे पुढचा भाग!
25 Sep 2010 - 4:36 am | शिल्पा ब
छान ...अजुन थोडे फोटो टाकत जा..
आणि कसला मोर्चा होता गं? मलाच उत्सुकता :-)
25 Sep 2010 - 9:18 am | पाषाणभेद
>>> हॉटेलवर परतलो. जेवणासाठी खाली उतरणार तोच अनेक लोकांचा कसलासा आवाज ऐकू आला. बाल्कनीतून ओमानिया चौकात बघितले ते दृश्य चमकवणारे होते. या चौकात १० रस्ते एकत्र येतात. त्या १० रस्त्यांचे उपरस्ते ही इथुन दिसत होते.
एकुणच हॉटेल चांगल्या मोक्याच्या जागी होते की! मग सोईसाठी तडजोड केली तर काही हरकत नाही. नाहितरी 'चलता है' हा आपल्या भारतीयांचा गुण कोठे उपयोगी येणार?
बाकी मस्त लेखन आहे.
25 Sep 2010 - 6:02 pm | sagarparadkar
सध्या ग्रीसमधे प्रचंड आर्थिक पेच प्रसंग झाला आहे. एका अमेरिकन सल्लगार कंपनीने त्यांना सल्ला दिला होता कि त्यांची आर्थिक तूट रस्त्यांवर लावण्यात येणार्या 'टोल'मधून भरून निघेल. पण तसे काही झालं नाही. ग्रीसला मग तूट भरून काढण्यासाठी कामगार कपात, विविध भत्त्यांमधे कपात, आणि इतर काही उपाय योजावे लागले, ज्यामुळे तेथील जनता सरकारवर खूप नाराज झाली आहे.
हा मोर्चा अशाच काही संतप्त लोकांनी काढला असावा ....
25 Sep 2010 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार
हा भाग देखील सुंदरच.
वाचतोय...
आणि हो फोटु मुळे कशी जान आली आहे आता लेखाला.
26 Sep 2010 - 1:45 pm | नगरीनिरंजन
छान लिहीता तुम्ही आणि फोटोही छान काढलेत!
26 Sep 2010 - 2:21 pm | विनायक प्रभू
सॉलिड
27 Sep 2010 - 3:16 pm | गणेशा
वाचत आहे ...