माती, पाणी आणि आभाळ : ग्रीस - भाग २

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
24 Sep 2010 - 12:39 am

माती, पाणी आणि आभाळ : ग्रीस - भाग १

सोमवार २४ मे. आज इथे सार्वजनिक सुट्टी. सकाळी नाश्ता करून जवळच असलेल्या मोठ्या चौकात आलो. तुरळक रहदारी. बहुतेक दुकाने बंद दिसत होती. समोरच अथेन्सदर्शन घडवणारी दुमजली बस दिसली. एका प्रसन्नवदनेने स्वागत केले. या बसच्या एक दिवसाच्या तिकिटात दोन दिवस शहरात कुठूनही कुठेही कितीही वेळा फिरता येणार होते. दरही वाजवी होता. याशिवाय शहराचा नकाशा, माहितीपुस्तक, प्रेक्षणीय स्थळांची माहिती अशा सोयी होत्या. बसमधून फिरायचे ठरवेले. वरच्या उघड्या मजल्यावर जाऊन बसलो. हेडफोन कानाला लावले. स्वागत्, सूचना, माहिती अस्खलीत आणि स्पष्ट इंग्रजीत ऐकू येऊ लागले.

पहिला थांबा अ‍ॅक्रोपोलीसचा होता. जुन्या शहराच्या मधोमध असणारी ही टेकडी इतिहासप्रेमी आणि पुरातत्त्व अभ्यासकांचे तीर्थस्थान आहे. टेकडीच्या पायथ्याशी बस थांबली. समोर टेकडीच्या माथ्यावर जगप्रसिद्ध पार्थेनन मंदिराचे अवशेष दिसत होते. त्याभोवती उतारांवर अनेक प्राचीन वास्तूंच्या खुणा अंगाखांद्यावर घेउन टेकडी सजली होती. वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुबक पायवाटा आणि फरसबंद पायर्‍या दिसत होत्या. पायवाटांच्या दोन्ही बाजू गर्द झाडीने वाटसरूना सावली देत उभ्या होत्या. ऑलीव्हच्या झाडांसोबत फळांनी लगडलेली मोसंबीची झाडं, फुललेल्या बोगनवेली आणि चक्क पांढर्‍या गुलाबी कण्हेरी आणि घाणेरी सुद्धा!!!मनाने आनंदाने उडीच मारली. चढायला सुरुवात केली तोच भोवताली फिरत्या विक्रेत्यांनी गर्दी केली. १० फोटो, पाण्याची बाटली, वेताची छत्री. हरमाल एकेक युरो!!! वेरूळ आठवले.

Parthenan

पर्यटकांची बरीच गर्दी होती. फोटोबहाद्दर चिनी जपानी घोळके आपले क्यामेराशस्त्र सरसावत चालले होते. फुलझाडांपासून ते 'स्वच्छतागृहाकडे' असे लिहिलेल्या पाटीपर्यंत एकही गोष्ट त्यांच्या फोटोच्या तावडीतून सुटत नव्हती. हे असे लोक आपल्याकडे पण असतात. हे बहुतेक ते पर्यटन ठिकाण घरी जाऊन फोटोतच नीट बघत असावेत.

इथे येण्यापूर्वी पार्थेनन बद्द्ल खूप ऐकले वाचले होते. शिवाय लेकीच्या पावलांनी चालायचे होते म्हणुन गाईड घेतला नाही. सविस्तर नकाशा आणि माहिती पुस्तिका हातात होतीच. तसेही सनावळ्यांच्या तपशीलापेक्षा जे प्रत्यक्ष समोर आहे ते अनुभवण्यात आम्हा दोघांना जास्त रस आहे.

अ‍ॅक्रोपोलीस हे जगातील प्राचीन आश्चर्यांपैकी एक मानले जाते. ई.स.पूर्व ८व्या शतकापर्यंत प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या खुणा इथे सापडतात. ग्रीक देवता नाइकी हिचे मंदीर म्हणजे पार्थेनन. अथीना नाइकी ही ग्रीसची संरक्षक देवता आहे. मुत्सद्दी,न्यायप्रिय आणि पराक्रमी अशा या देवीच्या नावावरून शहराला अथेन्स हे नाव पडले. हे मंदीर शांती, सौंदर्य, स्वातंत्र्य, ज्ञान आणि लोकशाहीचे आद्य प्रतीक मानले जाते. अनेक परकीय आक्रमकांनी उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीही आल्या. यातून जे काही वाचले ते १८३४ साली स्वतंत्र झालेल्या ग्रीसने जिवापाड जतन केले आहे.

Mandeer

Amphitheatre

Mandeer

प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या खुणा इथे पावलोपावली आहेत. शुभ्र संगमरवरात बांधलेल्या या मंदिराचे काही खांबच आज बघायला मिळतात. तीच स्थिती इथले पहिले चर्च रोमन अ‍ॅगोराची, जगातल्या पहिल्या अ‍ॅम्फी थिएटरची, पहिले ग्रंथालय आणि पहिल्या संसद वास्तूची. सूर्य माथ्यावर आला होता. समोर प्राचीन आश्चर्य तळपत होतं. भोवती पसरलेली टेकडी दगडादगडातून प्राचीन आठवणी सांगत होती. इथे बाजार भरायचा, इथे खेळ खेळले जायचे, या ठिकाणी पाठशाळा आणि इथे ग्रंथालय, हे ठिकाण स्वयंपाकाचे, हे आंघोळीचे, या जागी प्रार्थना व्हायच्या, इथे डावपेच आखले जायचे, ही खजिना ठेवायची जागा आणि शस्त्र साठवायची जागा, या कक्षात केवळ पुरूष राहात आणि इथे बायका, गुलाम, मुले वावरत, या मोठ्या चुली, या पडव्या आणि या ओसर्‍या... सगळे सगळे अक्षरशः दिसत होते. भारवल्यासारखे आम्ही शेकडो वर्षे जुन्या काळाच्या पाऊलखुणांवर आमची पावले टाकत होतो. मनात आले प्रत्यक्ष जगणे तरी हेच तर असते... पावलांवर पाऊल टाकणे !

Ithihasachi Khidki

मनाची विचित्र अवस्था झाली होती. अडीच हजार वर्षांपूर्वीचा काळ असा इथे थांबला होता. काय झाले असेल त्या पराक्रमी पूर्वजांचे? कुठे गेली ती माणसे?? ह्म्म्..वर्तमानात ये बयो...

आपली संस्कृतीही एवढीच प्राचीन, समृद्ध, पण एवढे भौतिक पुरावे आपल्याकडे क्वचित सापडतात. इटली असो की ग्रीस, इतर देशही पहाताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे या लोकांना भव्यतेचे वेड आहे. बारीक कलाकुसर करण्यापेक्षा भव्य वास्तू बांधण्यात ते कौशल्य पणाला लावतात. हे मंदीरही वास्तुकलेचा आणि नगररचनेचा आदर्श नमुना मानला जाते. इथल्या अनेक वास्तुरचना जगात आज उत्त्मोत्तम समजल्या जाणार्‍या वास्तूंचे प्रेरणा स्थान आहेत.

Bhavyata

उन्हाने थकवा जाणवत होता. तहान भूक लागली होती. त्यासाठी खाली उतरावे लागणार होते. समोर झाडाखाली लोक विसावले होते. जगाच्या कानाकोपर्‍यातल्या भाषा कानावर पडत होत्या. अनेकांनी आपापल्या शोदोर्‍या उघडल्या होत्या. तरूण घोळक्यांमध्ये हसणेखिदळणे मुक्तपणे चालू होते. फोटोबहाद्दर आपापल्या पराक्रमात मग्न होते. आम्हीही एका सावलीत विसावलो. थोड्या वेळाने खाली उतरायला सुरुवात केली.

एक जागा सापडली जिथून सगळे अथेन्स शहर दिसत होते. प्रचंड गर्दीचं, दाटीवाटीचं शहर. अवाढव्य पसरलेलं. एका गाइडने सांगितले, पूर्ण ग्रीसची लोकसंख्या ११ कोटी आहे. त्यातले ५ कोटी लोक एकट्या अथेन्स शहरात रहातात !!!!

Athang Athens

पायथ्याशी आलो. या परिसराचा मोह संपत नव्हता. लेकीला काहीतरी ताजे खायला घालणे आवश्यक होते. अगदी समोरच्या रेस्तराँमध्ये शिरलो. समोर फुललेली जाईची वेल! पुन्हा माहेरच्या मातीचा वास मनात दाटून आला. तिथे खायला मात्र शाकाहारी काही नव्हते. बाहेर आलो तर एक छोटी ट्राम उभी होती.
संपूर्ण टेकडीभोवती प्रदक्षिणा घालणारी ३ कि.मी.चा रस्ता आहे. त्यावरून या ट्राममधून फिरता येणार होते. आम्ही आत बसलो. छोटी झुक्गाडी म्हणून लेकीने खुशीत गायला सुरुवात केली. पुन्हा एकदा स्थळमहात्म्य ऐकवत, छोटी ठिकाणं उलगडून दाखवत ट्राम चालू लागली. अधुनमधून आनंदाचे अचानक शिडकावे होतच होते. गाड्यावर सुका मेवा विकणारा इराणी, कुठे बँडच्या तालावर नाचणारे आनंदी घोळके, कुठे संतूरसारखे वाद्य वाजवत गाणारा म्हातारबाबा तर कुठे पार्थेननला कुंचला घेउन कागदावर जिवंत करणारा समाधिस्थ चित्रकार... खरं सांगते, त्या टेकडीवरच्या सुबक मूर्त्यांएवढीच ही माणसंही सुंदर भासत होती.

प्रवासविचारआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

24 Sep 2010 - 12:44 am | मेघवेडा

>> एका गाइडने सांगितले, पूर्ण ग्रीसची लोकसंख्या ११ कोटी आहे. त्यातले ५ कोटी लोक एकट्या अथेन्स शहरात रहातात !!!!

सर्व गाईड्सचं, कदाचित सर्व ग्रीकांचं हे फेव्हरिट वाक्य असावं! आम्ही गेलो तेव्हा हॉटेलचा मॅनेजर, स्पोर्ट्स बारचा बारटेंडर, टॅक्सी ड्रायव्हर आणि आमचा ग्रीक मित्र, सगळ्यांनी ही गोष्ट अगदी आवर्जून सांगितली. त्यात आणखी माहिती अशी मिळाली की ग्रीस म्हणे जवळपास १००० लहानमोठ्या बेटांचा समुदाय आहे! त्यातली निम्म्याहून अधिक निर्जन आहेत म्हणे!!

बाकी छान फोटो आणि लिखाण नेहमीप्रमाणेच सुंदर! ग्रीकांच्या लाईफस्टाईलबद्दल सुद्धा येऊ द्या!

प्रभो's picture

24 Sep 2010 - 12:45 am | प्रभो

मस्तच!!!!

पुष्करिणी's picture

24 Sep 2010 - 12:48 am | पुष्करिणी

छान झालाय भाग. फोटो आवडले.

अवांतर : मला ग्रीक जेवण खूप आवडतं.

सुनील's picture

24 Sep 2010 - 12:53 am | सुनील

अवांतर : मला ग्रीक जेवण खूप आवडतं.

अहाहा!!! गोल फिरणारा तो मांसाचा ढीग आणि ते खरपूस भाजले गेलेले मांस, पिटा ब्रेडमध्ये घालून बनवलेले सॅन्डविच!!!

पण मितानतै पडल्या शाकाहारी!!!!

पुष्करिणी's picture

24 Sep 2010 - 1:01 am | पुष्करिणी

मी पण शाकाहारी आहे हो. ऑलिव्ह, फेटा चीज घातलेले पदार्थ अहाहा...वांगी आणि चीज काय मस्त लागतं

प्रभो's picture

24 Sep 2010 - 1:06 am | प्रभो

ग्रीक सलाड बेस्ट.. :)

शुचि's picture

24 Sep 2010 - 1:03 am | शुचि

फालाफेल??
मस्त!!!!

सुनील's picture

24 Sep 2010 - 1:08 am | सुनील

अगागागागागा!!

कुठे चिकन तंदूरी आणि कुठे मैसूर बोंडा!

शुचि's picture

24 Sep 2010 - 1:22 am | शुचि

अहो सॉरी गायरोम्हणतेय मी.

निस्का's picture

24 Sep 2010 - 1:50 am | निस्का

यास्नी ईरो किंवा यायरो म्हनत्यात :-)
G चा उच्चार य असा होतो

लेखमाला छान...वाचते आहे

मेघवेडा's picture

24 Sep 2010 - 1:15 am | मेघवेडा

फालाफेल वेगळं हो! ते शाकाहार्‍यांसाठी!

सुनील तंदुरी* 'सुव्लाकी'बाबत बोलत असावेत.

* हे पप्पू पेजर, कलूम लंगडा, हनीफ बेअरींग च्या चालीवर वाचावे! ;)

सॉरी मी गायरो खायचे. अत्ता आठवलं.

नंदन's picture

24 Sep 2010 - 1:22 am | नंदन

बहुतेक यिरो/गायरोबद्दल म्हणत असावेत (फोटू)

त्याला आमच्याकडे "डोनर केबॅब" म्हणतात! आणि ग्रीस व कबाबचं कनेक्शन म्हणजे सुव्लाकीच!

सुनील's picture

24 Sep 2010 - 1:43 am | सुनील

छान रसभरीत चर्चा!

जायरो, डोनर केबाब किंवा श्वार्मा हे साधारण एकसारखेच पदार्थ. हळू हळू गोलाकार फिरत, खरपूस भाजले जाणारे मांस, हे महत्त्वाचे!

सुनील's picture

24 Sep 2010 - 12:48 am | सुनील

हाही भाग मस्त!

क्रमशः टाकायला विसरलात वाटते?

नंदन's picture

24 Sep 2010 - 12:53 am | नंदन

हाही भाग आवडला. फोटोज आणि परिचय दोन्ही उत्तम.

बेसनलाडू's picture

24 Sep 2010 - 1:31 am | बेसनलाडू

(प्रवासी)बेसनलाडू

विलासराव's picture

24 Sep 2010 - 12:54 am | विलासराव

ग्रीस आवडतय.

मस्त कलंदर's picture

24 Sep 2010 - 12:55 am | मस्त कलंदर

मस्तच गं हाही लेख.. लवकर लवकर टाक पुढचेही भाग.

निखिल देशपांडे's picture

24 Sep 2010 - 12:57 am | निखिल देशपांडे

बेष्ट फोटोज आणी त्याहुनही सुंदर वर्णन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2010 - 9:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढच्या भागाची वाट पहाते आहे गं मितान!

अवांतरः माझे फोटो शोधून काढते. क्रीट बेटावरच आम्ही क्नॉससच्या राजवाड्याचे अवशेष पहायला गेलो होतो, तिथेही बर्‍यापैकी गोष्टी टिकलेल्या होत्या. दुसर्‍या महायुद्धातही कदाचित त्या राजवाड्याची नासधूस झाली असेल.

>> प्रत्यक्ष जगणे तरी हेच तर असते... पावलांवर पाऊल टाकणे !>>
सुंदर!!!

शिल्पा ब's picture

24 Sep 2010 - 1:13 am | शिल्पा ब

मस्त...मलाही गीरोज (जायरोज) फार आवडतात...इतर परीचयाबरोबर तिथल्या खाण्यापिण्याबद्दलहि लिहित जा..
तुझे "आपली संस्कृतीही एवढीच प्राचीन, समृद्ध, पण एवढे भौतिक पुरावे आपल्याकडे क्वचित सापडतात" हे म्हणणे मान्य नाही...आपल्याकडे सुद्धा हम्पी (जी UNESCO ची site आहे), मध्यप्रदेश, अजंठा वेरूळ इ. खूप ठिकाणी प्रचंड प्रमाणात आपल्या संस्कृतीचा भौतिक पुरावा आहे...आपल्या लोकांना त्याची जाणीव ठेवावी वाटत नाही इतकाच महत्त्वाचा फरक आहे.

अवांतर : मेवेंचे आम्हीसुद्धा ग्रीकला जाऊन आलो हे अधोरेखित करणे जीवाला थंड करून गेले...दखल घेतली आहे.

मितान's picture

24 Sep 2010 - 11:54 am | मितान

>>>तुझे "आपली संस्कृतीही एवढीच प्राचीन, समृद्ध, पण एवढे भौतिक पुरावे आपल्याकडे क्वचित सापडतात" हे म्हणणे मान्य नाही...आपल्याकडे सुद्धा हम्पी (जी UNESCO ची site आहे), मध्यप्रदेश, अजंठा वेरूळ इ. खूप ठिकाणी प्रचंड प्रमाणात आपल्या संस्कृतीचा भौतिक पुरावा आहे..

अगं शिल्पा, हा कालखंड वेगळा आहे.हंपी, अजिंठा लेणी हे इ.स. नंतर घडलेल्या कलाकृती. पार्थेनन इ.स. पूर्व कालखंडातले. म्हणजे मोहेंजोदारो हडप्पा या काळातले. ते ही आज पाकिस्तानात आहेत :( तक्षशीला आणि नालंदा एवढेच प्राचीन पण नालंदाचे अवशेष आणि दुर्दशा बघताना अक्षरशः व्याकुळ होतं मन ! त्यामानाने हे खूप चांगलं ठेवलंय ग्रीकांनी. म्हणून असं लिहिलं मी.

तन्गो's picture

24 Sep 2010 - 4:44 pm | तन्गो

जरा हि लिन्क वाचा म्हन्जे अन्खिन बरच काहि महित होइल ग्रीस बद्द्ल.
http://www.hitxp.com/articles/history/christmas-history-christ-birth-date/

चित्रा's picture

24 Sep 2010 - 1:25 am | चित्रा

सुंदर फोटो आणि वर्णन.

अनामिक's picture

24 Sep 2010 - 1:36 am | अनामिक

हा ही भाग उत्तम. मागे एकदा अथीनाबद्दलची डॉक्युमेंट्री पाहण्यात आली होती ते आठवले. फोटोपण मस्तंच आहेत!

अर्धवटराव's picture

24 Sep 2010 - 1:40 am | अर्धवटराव

तुमचा लेख वाचुन कसं वाटलं ?? फार छान, सुरेख, अप्रतीम... अम्म्म्म्म्म्म्म.. पण त्याहिपेक्षा खूप प्रसन्न वाटतय. जीवंतपणा आहे प्रवास वर्णानात.

"प्रत्यक्ष जगणे तरी हेच तर असते... पावलांवर पाऊल टाकणे !"
"...कुंचला घेउन कागदावर जिवंत करणारा समाधिस्थ चित्रकार... खरं सांगते, त्या टेकडीवरच्या सुबक मूर्त्यांएवढीच ही माणसंही सुंदर भासत होती."

क्या कहेने.. सुभान अल्ला !! (सुभान अल्लाच ना हो ते??)

(प्रसन्न) अर्धवटराव

मस्त प्रवासवर्णन चाललेय. फोटो जास्त टाका.

मितान, सुरेख परिचय आणि फोटो.

मृत्युन्जय's picture

24 Sep 2010 - 1:05 pm | मृत्युन्जय

फोटो छान. वर्णन त्याहुन छान. गाझियाबाद मधुन बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन.

मला का कोण जाणे पण ग्रीस म्हटल्यावर समुद्र जास्त प्रकर्षाने आठवतो इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा. तसे मी ग्रीस बघितलेच नसल्यामुळे काहीच आठवण्याचा प्रश्न नाही. पण डिस्कवरी वर कदाचित कधीतरी ग्रीसच्या समुद्राने भुरळ घातली होती. पु लंच्या प्रवासवर्णनाने अशीच काप्रीची भुरळ घातली आहे. कधी बघणार या सगळ्या गोष्टी कोणास ठाउक

सर्व प्रथम लॉग ईन करुन हा धागा आला का ते पहात होतो. ३० रिप्लाय पडलेले पाहुन आपल्याला खुप उशीर झाला वाचायला म्हणुन जरा वाईट वाटले..

खुप छान लिहित आहेस हे लिहुन लिहुन बोअर होत आहे.
परंतु एक गोष्ट आहे.. नॉर्वे खुप छान होता .. पण तुम्ही पायी फिरलेला असे लिखान आढळले नव्हते जास्त .. त्यावेळेसच मनात आले होते .. की ते डोंगर त्या दरी मसत फिरत बसावे ..
या वेळेस तुम्ही स्वता टेकड्यांवर फिरत आहात .. प्रत्येक इतिहासातील वस्तुंना भेटुन मनाने हजारो वर्षापुर्वीच्या घटना पाहत आहात .. मस्त वाटत असेन ना जास्त ...

आणि इतिहासाची खिडकी असे जे नाव दिले आहे एका चित्राला ते खुप आवडले..

लिहित रहा .. वाचत आहे.

स्वाती२'s picture

24 Sep 2010 - 3:42 pm | स्वाती२

छान फोटो आणि अप्रतिम वर्णन!

परिकथेतील राजकुमार's picture

24 Sep 2010 - 3:46 pm | परिकथेतील राजकुमार

झ का स !!

फोटु आणि वर्णन दोन्ही अप्रतिम.

एका प्रसन्नवदनेने स्वागत केले.

प्रसन्नवदनेचा फोटु ??

मन१'s picture

24 Sep 2010 - 5:52 pm | मन१

पूर्ण ग्रीस ची लोकसंख्या ११ कोटी नाही. असूच शकत नाही.
आख्क्या युरोपची लोकसंख्या ३०-४०- कोटीच्या आसपास आहे.
त्यात बिग थ्री म्हंजे जर्मन(आठेक कोटी),ब्रिटिश (सहाएक कोटी),फ्रेंच (पाचेक कोटी ) आणि त्याखालोखाल इटली चा नंबर लागतो.शिवाय रशिया १२एक कोटींच्या घरात जातो.
हे सगळं जमेस धरलं तर ग्रीस ११ कोटी म्हणण्यास काहिच स्कोप शिल्लक रहात नाही.

ग्रीस हा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असला तरी (आर्थिक दृष्ट्या आणि लोकसंख्येच्या हिशेबाने) चिमुकला किंवा सामान्य देश आहे.

>>पूर्ण ग्रीसची लोकसंख्या ११ कोटी आहे. त्यातले ५ कोटी लोक एकट्या अथेन्स शहरात रहातात !!!!
हे वाक्य खरं तर असं हवः-
>>पूर्ण ग्रीसची लोकसंख्या १.१ कोटी आहे. त्यातले ०.५ कोटी लोक एकट्या अथेन्स शहरात रहातात !!!!

किंवा
>>पूर्ण ग्रीसची लोकसंख्या ११ दशलक्ष( म्हंजे मिलियन) आहे. त्यातले ५ दशलक्ष ( म्हंजे मिलियन) लोक एकट्या अथेन्स शहरात रहातात !!!!
असं हव.

१ दशलक्ष = १० लाख =०.१ कोटी
१कोटी = १०दशलक्ष = १००लाख

युरोपिअन पद्धतीत सहसा लक्ष/लाख किंवा कोटी हे आकडे वापरत नाहित.
सगळी भाशा असते ती मिलियन(दशलक्ष), बिलियन(अब्ज, १अब्ज = १००कोटी = १००० दशलक्ष )

बाकी , लेख आवडला , उत्तम.

मितान's picture

24 Sep 2010 - 6:17 pm | मितान

अरे हो हो हो हो !!!!!

तुमचं म्हणणं खरं मानायला माझी काही हरकत नाही ! मी जे ऐक्लं ते लिहिलं. गल्लत होऊ शकते. :)

( हरकत घेतली तर लै अभ्यास करत बसावा लागेल ;) )

सुनील's picture

24 Sep 2010 - 6:22 pm | सुनील

आताच गुगलून पाहिले. त्याने ११ मिलियन असा शब्द वापरला असला पाहिजे!

लक's picture

24 Sep 2010 - 7:42 pm | लक

very good article with eye catching photographs
Thanks Mitan for sharing
For authenticity on population one can refer Mrs Meena Prabhu 's book " Greekayan "
LUCK

मितान's picture

24 Sep 2010 - 7:46 pm | मितान

ग्रीकांजली ?

पैसा's picture

24 Sep 2010 - 7:50 pm | पैसा

प्रवासवर्णन छान. फोटो अजून छान.

मेघवेडा's picture

24 Sep 2010 - 8:05 pm | मेघवेडा

पुढचा भाग द्या की आता? की सांगणं करावं लागेल?

धमाल मुलगा's picture

24 Sep 2010 - 8:16 pm | धमाल मुलगा

वेऽऽड लिहितेस तू.

मला सगळ्यात जास्त आवडलं ते अ‍ॅम्फी थिएटर. साला, त्या स्टेजवर उभं राहुन एखादा परफॉर्मन्स करायला उभं राहिलं तर काय मजा येईल ना...कल्पना करुनच रोमांच उभे राहिले. :)