खूप खूप दिवसांपूर्वी गौरी देशपांडे वाचताना ग्रीस मनात रुतुन बसला होता. परवा मीना प्रभूंचं ग्रीकांजली वाचताना मनाने अजुन एकदा ग्रीसचा हट्ट धरला. बर्याच दिवसात भटकायला मिळालं नव्हतं. मन ग्रीस ग्रीस करत होतं त्याचवेळी डोकं दिवाळखोरीच्या बातम्या ऐकत होतं. शेवटी मनाचं पारडं जड झालं आणि ग्रीसची तिकिटं निघाली. वेळ मिळणार होता ५ दिवस. त्यामुळे केवळ अथेन्स ला जायचं; पार्थेनन बघायचं; जमलं तर एजियन समुद्रातल्या एखाद्या बेटाला भेट द्यायची आणि परत निघायचं असे नियोजन केले.
जायच्या तारखा २ महिने आधी ठरवल्या होत्या. त्या सुमाराला ग्रीसमधले वातावरण बिघडतच चालले होते. अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी सरकारने भरमसाट करवाढ केली. त्यामुळे जनक्षोभ वाढला. रोज सरकार विरोधी निदर्शने, दगडफेक, पोलीसांचा लाठीमार असे चित्र बातम्यांमध्ये दिसू लागले. आणि आमच्या प्रवासाबद्दल शंका वाटू लागली. मित्रमंडळीत ग्रीस बघून आलेले कोणीच नाही. सगळा अनुभवच नवा असणार होता. २ वर्षाच्या लेकीसोबत असा पहिलाच नवख्या ठिकाणचा प्रवास असणार होता. त्यामुळे थोडी काळजी वाटत होती. एकीकडे सगळे ठीक होइल असा विश्वासही होता. प्रवास ठरल्याप्रमाणेच करायचा असे ठरवले. आम्ही निघायच्या आधी आठवडाभर अथेन्सही थोडे शांत झाले. आणि आम्ही निर्धास्त मनाने विमानात पाऊल टाकले.
कोणत्याही शहराचे आकाशातून होणारे दर्शन मला आवडते. पण हे छोटे विमान खाली उतरताना कानात दडे बसल्याने लेकीने रडून गोंधळ घातला. त्यामुळे अथेन्सचे आकाशातून दिसणारे चित्र पहाता आले नाही. विमानतळ बेताचे वाटले. बाहेर येऊन मेट्रोने मुख्य शहरात आलो. आमच्या हॉटेलच्या जवळच्या स्टॉपवर उतरलो. रात्रीची वेळ असल्याने मुळीच गर्दी नव्हती. बाहेर आलो आणि मस्त धक्का बसला. बाहेरच्या चौकात चक्क बाजार भरला होता! भारतीय, पाकिस्तानी चेहरे दिसत होते. छोटे गाडे लागले होते. काही विक्रेते समोर एक कपडा अंथरून त्यावर माल विकत होते. खेळण्यांपासून चपलांपर्यंत आणि फळांपासून मासळीपर्यंत तर्हेतर्हेच्या गोष्टींची गर्दी दिसत होती. ओरडून भाव सांगणे, घासाघीस, मनधरणी...सगळे यथासांग...कितीतरी ओळखीचे! बेल्जियममध्ये रात्री आठानंतर रस्त्यावर कुत्रे सुद्धा बघण्याची सवय नाही; आणि इथे रात्री १० वाजता एवढी गजबज बघून मन आनंदले, थेट घरी भारतात गेले.
हॉटेलचा पत्ता नकाशानुसार जवळचा होता पण किरकिरणार्या लेकीकडे बघून टॅक्सी करायची ठरवली. एका टॅक्सीवाल्याला पत्ता दाखवला तर त्याने निर्विकारपणे तोंड फिरवले! गेला ढगात म्हणत दुसर्या टॅक्सीकडे निघणार एवढ्यात स्टेशनच्या मागे उंच डोंगरावर अप्रतिम अशा पार्थेननचे दर्शन झाले. २ दिवसांवर पौर्णिमा आली असल्याने भरपूर चंद्रप्रकाश होता. तेवढ्याच शांत कृत्रीम प्रकाशात अॅक्रोपोलीस टेकडी तेजस्वी दिसत होती. ते दृश्य पाहून दिवसभराचा शीण पळाला. उद्या पहिले दर्शन पार्थेननचे असे मनाशी म्हणून टॅक्सीकडे मोर्चा वळवला.
३ मिनिटात हॉटेल आले. मीटर २ युरो बिल दाखवत होते. मालक ५ मागत होता. दिले!
हॉटेलमध्ये शिरताच दुसरा धक्का. इंटरनेटवर फोटो आणि माहिती वाचून हॉटेल ठरवले होते. त्यातली एकही गोष्ट समोर दिसेना. रंग उडालेल्या भिंती, जुनाट फर्निचर, दोन माणसांची लिफ्ट, सुमार सजावट असे दृष्य होते. कुरकुरत्या लिफ्टमधून आम्ही तिघे आणि सामान चकरा मारत वर आलो. वर १०बाय१० ची भलीमोठ्ठी खोली. त्याला ३बाय्१.५ची बाल्कनी. बाथरूममध्ये केविलवणा शॉवर आणि लटकणारा बेसिन. दार फुगले असल्याने, कडीची गरजच नाही. नळाला फक्त गरम पाणी. प्यायलाही तेच. सामान ठेवण्यासाठी कपाट उघडले. आत ५-६ तुटके हँगर, रंग उडालेला, लाकूड पोखरलेले, कडी नाहीच... बाल्कनीचे दार उघडले. खाली मुख्य रस्ता. वाहनांचे आवाज, दिवे. उजवीकडे प्रसिद्ध ओमनिया चौक. डावीकडे छोटे मोठे हॉटेल्स. रस्त्यावर रिकामटेकड्या मवाली दिसणार्या तरुणांचे घोळके. आणि भरमसाठ कचरा...
मन अजून खट्टू झाले. वाचलेली ग्रीसची रम्य चित्र आठवू लागली. युरोपातल्या इतर शहरांशी, पाहिलेल्या राजधान्यांची चित्रं डोळ्यासमोर तरळू लागली. आणि ही पण एक राजधानी आहे या विचाराने हसूच आले.
भूक लागली होती. लेकीला दूध हवं होतं. अपेक्षेप्रमाणे अन्न गरम करण्याची कोणतीच सोय हॉटेलमध्ये नव्हती. नळातून येणार्या गरम पाण्यात दूध बनवलं. सोबत आणलेली भाजी पोळी खाल्ली.
झोप येईपर्यंत आत्तापर्यंत दिसलेल्या अथेंस विषयी डोक्यात विचार येत होते. स्वप्नात मात्र गौरीने सांगितलेली रम्य बेटं आणि ग्रीकांजलीत बघितलेले ग्रीक देवतांचे देखणे पुतळे दिसत होते.
या भागात फोटो दाखवण्यासारखं खरंच काही नव्हतं. म्हणून हा एकच फोटो. पुढच्या भागात अथेन्स चे फोटो येतीलच.
(मी मराठी वर पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
23 Sep 2010 - 3:40 pm | यशोधरा
दुष्ट आहेस...
23 Sep 2010 - 3:40 pm | मेघवेडा
अथेन्स आमचं अंमळ आवडीचं शहर आणि एजियन हा आमचा अंमळ आवडीचा समिंदर! पुभाप्र. लौकर येऊ दे गो मैतुरणी!
23 Sep 2010 - 3:49 pm | नंदन
सुरुवात मस्त, पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.
23 Sep 2010 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार
उत्सुकता वाढली आहे, पुढचा भाग लगेच येउ देत.
23 Sep 2010 - 4:02 pm | गणेशा
मितान ...
खरे तर प्रवासवर्णन हा माझा सगळ्यात आवडीचा विषय..
वाचताना ही त्या त्या परिस्थीची चित्रे डोळ्यासमोरून हालत नाही .
आणि तू इतके सुंदर छान वर्णन करते की खरेच वाचतच रहावे वाटते.
ग्रीस बद्दल्ल मला जास्त काही माहीती नाही.. तु लिहलेला ग्रीस कायम मनात राहिन .. लवकर लीहा..
बस्स ... आपण ही कामाचा व्याप संभाळून बाहेर नाही निदान महाराष्ट्रात तरी फिरावे असे मनापासुन वाटत आहे.
नंतर आपल्या सारख्यांच्या मार्गाने ..लिखानावरुन जग फिरण्याची संधी आली की मस्त फिरुच ..
तोपर्यंत तुमच्या शब्दांचे मोहक पंख घेवुन मस्त परदेश यात्रा करतो आहे.
लिहित रहा .. वाचत आहे..
-
23 Sep 2010 - 4:02 pm | गणेशा
मितान ...
खरे तर प्रवासवर्णन हा माझा सगळ्यात आवडीचा विषय..
वाचताना ही त्या त्या परिस्थीची चित्रे डोळ्यासमोरून हालत नाही .
आणि तू इतके सुंदर छान वर्णन करते की खरेच वाचतच रहावे वाटते.
ग्रीस बद्दल्ल मला जास्त काही माहीती नाही.. तु लिहलेला ग्रीस कायम मनात राहिन .. लवकर लीहा..
बस्स ... आपण ही कामाचा व्याप संभाळून बाहेर नाही निदान महाराष्ट्रात तरी फिरावे असे मनापासुन वाटत आहे.
नंतर आपल्या सारख्यांच्या मार्गाने ..लिखानावरुन जग फिरण्याची संधी आली की मस्त फिरुच ..
तोपर्यंत तुमच्या शब्दांचे मोहक पंख घेवुन मस्त परदेश यात्रा करतो आहे.
लिहित रहा .. वाचत आहे..
-
23 Sep 2010 - 4:21 pm | मृत्युन्जय
लेखन छानच.
फोटो पाहुन मात्र निराशा झाली. हा फोटो मला गाझियाबादचा म्हणुन पण दाखवला असता तरी चालले असते. :)
23 Sep 2010 - 5:07 pm | मितान
तुम्हाला फोटो बघून वाटले. मला पहिल्या दिवशी शहर बघताना यापेक्षा गाझियाबाद फिरलो असतो तरी बरे झाले असते असे वाटले होते :)
23 Sep 2010 - 10:52 pm | मृत्युन्जय
हीहीहीही. पण तुम्ही लेखमालिक लिहायला घेतली त्या अर्थी उरलेले ग्रीस छानच असणार. तुमचे लेख आणि ग्रीस नोर्वे सारखेच (आणि त्यावरच्या लेखांसारखे) सुंदर असतील अशी अपेक्षा करतो.
23 Sep 2010 - 5:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढच्या भागाची वाट पहात आहे.
माझ्या ग्रीसभेटीची आठवण झाली. अथेन्सचा फक्त विमानतळच पाहून तेव्हा आम्ही क्रीट बेटावरच गेलो आणि पर्यटक म्हणून फक्त एक संध्याकाळ आणि दुसरा दिवस एवढाच वेळ मिळाला. तिथली सगळ्यात जी गोष्ट आवडली तर नितळ समुद्र! आत्तापर्यंत फक्त अरबी समुद्र बघून झाल्यावर एकदम भूमध्य समुद्र पाहिला. ते हिरवं-निळं पाणी काय मस्त वाटत होतं. पाण्याखाली प्रवाह नसल्यामुळे समुद्राचा तळही बरंच अंतर आत गेल्यानंतरही दिसत होता.
आम्ही जिथे होतो त्या रिझॉर्टमधे चिक्कार प्रकारच्या भाज्या खायला मिळाल्या, भाज्यांच्या आणि बनवलेल्या पदार्थांच्या चवीही आपल्या पदार्थांशी साधर्म्य दाखवणार्या. आणि सगळ्यात गंमत वाटली म्हणजे बरेच ग्रीक लोकं (माझ्याबरोबरच्या गोर्यांशी तोडक्यामोडक्या इंग्लिशमधे पण) माझ्याशी ग्रीकमधेच बोलायला सुरूवात करायचे आणि माझा फार गोंधळ उडायचा. गर्दीचे रस्ते ओलांडताना सगळ्या गोर्या लोकांना आम्हीच दोन भारतीय मुली हात धरून इकडून तिकडे नेत होतो! आणि रिझॉर्टमधलं ग्रीक संगीत सगळ्यात जास्त आम्हां दोघींनाच आवडलं.
23 Sep 2010 - 5:48 pm | गणेशा
गर्दीचे रस्ते ओलांडताना सगळ्या गोर्या लोकांना आम्हीच दोन भारतीय मुली हात धरून इकडून तिकडे नेत होतो!
मज्जा आली वाचुन .. चांगलेच गोंधळात पडले असतील ते ..
असो तुम्ही पण लिहा ना तुमच्या प्रवास वर्णना बद्दल .
-
23 Sep 2010 - 5:28 pm | सुनील
सुरेख वर्णन!
ग्रीस म्हटले की आठवण होते लॉर्ड बायरनची! आयुष्यभर रंगेल, अय्याशी म्हणून बदनाम झालेला बायरन अगदी आरस्पानी बदलला ग्रीसमध्ये आल्यावर! तिथल्या माती, पाणी आणि आभाळाचाच परिणाम!
बाकी टापटीपीचा आणि हवामानाचा काही संबंध असावा! थंड अश्या उत्तर युरोपातील राजधान्या आणि उबदार दक्षिण युरोपातील राजधान्यांत फरक असणारच! अशिया आणि अफ्रिकेबद्दल तर बोलायलाच नको!
पुढचा भाग लवकर येऊदे.
23 Sep 2010 - 5:29 pm | प्रियाली
येऊद्या पुढचा भाग.
23 Sep 2010 - 6:25 pm | स्वाती२
छान सुरवात.
23 Sep 2010 - 6:29 pm | धमाल मुलगा
सही आहे!
आधी नॉर्वे आता ग्रीस...
मजा आहे बुवा. आता तुही 'माझीही अपुर्वाई' म्हणुन लिहायला घेच. :)
23 Sep 2010 - 7:05 pm | प्रभो
मस्त.....मोठे भाग टाक गं.... उगाच स्वतःचा ट्यार्पी नको वाढवू.. ;)
23 Sep 2010 - 10:26 pm | शिल्पा ब
छान लिहितेस....खरोखरीच ग्रीस कसं आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे...फोटोवरून तर सुमारच दिसतंय...इतरत्र आणि पिक्चरमध्ये तर पांढर्या इमारती...छान छान बागा असं काहीसं पाहिल्याचं आठवतंय...पुढचा भाग टाक लवकर.
23 Sep 2010 - 10:59 pm | निखिल देशपांडे
वाचतोय गं...
पुढचा भाग उद्याच टाक..
23 Sep 2010 - 11:55 pm | अनामिक
वा वा... छान झाली आहे सुरवात. पुढचा भाग लवकर टाक.
( ३ मिनिटात हॉटेल आले. मीटर २ युरो बिल दाखवत होते. मालक ५ मागत होता. दिले!
पोचले का पुणेरी डायवर तिथेही?)
26 Sep 2010 - 7:49 am | गोगोल
बेल्जियम मध्ये असता ऐकून मजा वाटली. ब्रसेल्ज़ आणि गेंट ला मी काही महिन्यांपुर्वी येऊन गेलो होतो. सगळीकडे बटाटे बटाटे खोऊन थोडा वैतगलो होतो. त्यातच परत सतत पाऊस होता. पण शहर एकदम मस्त आहेत. ट्रॅपिस्ट बियर पण मस्तच.