महिला कारागृहात काही तास

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
24 May 2010 - 7:13 pm

आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त! आणि त्याच दिवशी एका कैदी स्त्रीने आवारातील दुरुस्ती-कामासाठी आणलेली बांबूची शिडी वापरून जेलच्या भिंतीवरून उडी टाकून पळून जायचा असफल प्रयत्न केला होता - त्यामुळे चालू असणारा गदारोळ होता तिथे! शिवाय त्या बाकी कैद्यांच्या निर्विकार नजरा.

स्थळ होते पुण्याच्या येरवड्याच्या महिला तुरुंगाचे. वेळोवेळी काही प्रसिद्ध तर काही कुख्यात व्यक्तींमुळे येरवडा तुरुंग कायमच चर्चेत राहिला. पुणे शहराकडून येरवड्याला जाताना रस्त्याच्या एका बाजूला दिसणारी त्याची काळीकभिन्न, छाती दडपविणारी उंच तट-भिंतच मी आतापर्यंत पाहत राहिले. पण कधी आतही डोकावेन असे स्वप्नात वाटले नव्हते.

एका आंतरराष्ट्रीय महिला क्लबच्या पुणे शाखेने मला एका समाजसेवी संस्थेमार्फ़त येरवड्याच्या महिला तुरुंगात तेथील कैद्यांसमवेत सत्संग करण्यासाठी खास आमंत्रित केले होते. जवळपास दोन-तीन वर्षांपूर्वीची, म्हणजे महिलांसाठी ''खुल्या कारागृहाची'' सुविधा उपलब्ध होण्याअगोदरची ही घटना. माझ्याबरोबर इतर गायक कलाकार, वाद्यवृंद व संस्थेचे दोन-तीन स्वयंसेवक होते.

त्या दिवशी भर दुपारी गाडीतून तुरुंगाच्या आवारात, रणरणत्या उन्हात पाऊल टाकल्यावर काही क्षण आम्ही अक्षरशः भाजून निघालो. हवेत विलक्षण उकाडा. पण तुरुंगाच्या प्रवेशद्वारापाशी लेडीज क्लबच्या हसऱ्या सदस्या आमच्या स्वागताला सज्ज असलेल्या पाहून छान वाटले. ह्या सदस्या गेले अनेक महिने महिला कैद्यांसाठी तुरुंगात उपक्रम राबवित असल्याने तेथील वातावरणाला सरावल्या होत्या. स्त्री कैद्यांसाठी सतत काही ना काही चांगले करण्याच्या त्यांच्या धडपडीचे खरेच कौतुक करावेसे वाटत होते. सुरुवातीची काही मिनिटे आम्ही तेथील सुरक्षा कर्मचारी, तुरुंगात अभ्यासक्रमाचा भाग म्हणून भेटीदाखल येणाऱ्या समाजसेवा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी व सेवाकार्यासाठी नेहमी येणाऱ्या महिला क्लबच्या सदस्या यांच्याशी बोलून कैद्यांविषयी माहिती घेण्यात घालवला.

येथील बऱ्याचशा महिला ह्या 'अंडरट्रायल' आहेत हे समजले. म्हणजे त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाहीत व त्यांच्यावरचे दावे कोर्टात चालू आहेत. त्यामुळे त्या कैद्यांच्या संख्येत रोजच भर किंवा घट होत असते. काहीजणींना जामीन मिळतो, काहीजणींना जामीन मिळूनही त्याचे पैसे भरता न आल्याने पुन्हा तुरुंगातच राहावे लागते. बऱ्याचजणी विवाहितेचा छळ, मारामारी,चोऱ्या -दरोडे आणि अन्य किरकोळ गुन्ह्यांमध्ये अडकून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. खुनाच्या किंवा गंभीर आरोपांखाली तुरुंगात असलेल्या महिला खूपच कमी आहेत. शिक्षा भोगून बाहेर पडणार्‍या महिलांचे पुनर्वसन हीदेखील मोठी समस्या असल्याचे कळले. घरचे, नातेवाईक, गावातले लोक त्यांना अनेकदा स्वीकारत नाहीत. मादक पदार्थ बाळगणे - सेवन करणे इ. इ. आरोपांवरून काही परदेशी महिलाही आत आहेत. अनेक गरीब, अनाथ महिला केवळ बाळंतपण सरकारी खर्चाने सुखरूप व्हावे व आपला व बाळाचा उदरनिर्वाह काही महिने तरी व्यवस्थित व्हावा ह्यापायी गर्भारपणाचे दिवस भरत आले की किरकोळ गुन्हे करून पकडल्या जातात व नंतर तुरुंगात सरकारी इतमामाने बाळंतपण करून घेतात हेही विदारक वास्तव समजले. तसेच दुसऱ्याच कोणी गुन्हा करून हकनाक गुन्ह्यात गोवलेल्या महिलाही येथे बऱ्याच आहेत. खूपशा महिला ग्रामीण भागातील असून त्यांचे फारसे शिक्षणही झालेले नाही. बाळंत झालेल्या किंवा ज्यांची मुले अगदी लहान आहेत त्या महिलांना येथे आपल्यासोबत आपली मुले ठेवण्याची मुभा असते. त्या मुलांच्या राहण्या-खाण्या-कपड्यालत्त्याचा, औषधाचा व शिक्षणाचा खर्च सरकार करते.

सुरक्षा तपासणी वगैरे उरकून, सोबतच्या चीजवस्तू पहाऱ्याकडे सोपवून, रजिस्टरवर सह्या ठोकून आम्ही त्या अरुंद (बरोबर! अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तशा) छोट्या दरवाज्यातून आपापली डोकी सांभाळत आत शिरलो. सोबत महिला सुरक्षा कर्मचारी होत्याच, त्यांच्या हातात मस्त दंडुकेही होते. आवारात ह्या खेपेस कोणी महिला कैदी दिसत नव्हत्या. बहुतेक सगळ्याजणी सत्संगाच्या ठिकाणी जमल्या असाव्यात किंवा आपापल्या केसेससाठी कोर्टात गेल्या असाव्यात.

जाता जाता आम्हाला एकांत कोठड्यांचेही दर्शन झाले. तिन्ही बाजूंनी भिंती, कोणतीही प्रायव्हसी नसलेल्या, एक बाजू पूर्ण जाळी व गजांनी आच्छादित बंदिस्त अशा स्वरूपाच्या त्या अरुंद, चौकोनी, अंधाऱ्या खोल्या बघताना उगाचच अंगावर शहारा आला. आवारातल्या झाडाझुडुपांच्या मधून काढलेल्या पायवाटेने जात आम्ही सत्संगाच्या ठिकाणी पोचलो. पत्र्याचे छत असलेली ही एक लांबलचक खोली. खिडक्यांना भरभक्कम गज. आत शिरायला एकच दरवाजा आणि तोही छोटासा. गेल्या खेपेस आले होते तेव्हा ही फक्त पत्र्याची शेड होती. आता तिथे पक्के काम करून महिलांना रोजगार प्रशिक्षण देण्याची सोय केलेली दिसत होती. खोलीच्या एका कोपऱ्यात सरकावून ठेवलेली शिवण- विणकाम यंत्रे, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्यांवरचे दीनवाणे कपडे बरेच काही सांगून जात होते. समोर साधारण दीडशे-दोनशे महिला कैदी शिस्तीत सतरंज्यांवर आमची वाट बघत बसलेल्या. ''साऊंड''वाल्याची सर्व सेटिंग्ज पूर्ण होईपर्यंत तेथील स्टेजवर आम्ही वाद्यांची जुळवाजुळव केली. एका स्वयंसेवकाने लिलीच्या फुलांचा भरघोस, टवटवीत हार आणला होता. तो तेथील वेदीवरील सर्वधर्मीय ईश्वर प्रतिमांना एकत्रितपणे घातल्यावर त्या काहीशा कोंदट, घामेजल्या हवेत चैतन्याचा दरवळ पसरला.

ध्वनिक्षेपक सुरू होताच मी सर्वांना सत्संगात सामील होण्याचे आवाहन केले. समोरून ढिम्म प्रतिसाद. अर्थात ते अपेक्षित होतेच! सर्व बायका कोऱ्या, उखडलेल्या चेहऱ्यांनी बसलेल्या. एक डोळा सुरक्षा कर्मचाऱ्यांवर व एक आमच्यावर. साहजिकच होते म्हणा.... त्या सगळ्याजणी दाटीवाटीने भर उकाड्यात आमची वाट पाहत बसलेल्या. त्यातून वॉर्डनचा व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा टरका डोळा आणि दुसरीकडे मनातली धुसफूस... त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणेच चुकीचे होते.

मी काही क्षण डोळे मिटले, मनातले सर्व विचार समर्पित केले आणि शांत मनाने सत्संगाची सुरुवात नेहमीप्रमाणे अतिशय सोप्या गणेशवंदनेने केली. तबला, गिटार, सहगायकाचे व टाळाचे स्वर एकमेकांमध्ये मिसळून वातावरणात उत्साहाची पेरणी करत होते. पण अजून समोरून थंड प्रतिसाद होता. नाही म्हणायला बऱ्याच बायका हात जोडून बसल्या होत्या किंवा तालावर टाळ्या वाजवत होत्या. पण चेहरे व देहबोली अजून तशीच होती... आखडलेली, आक्रसलेली. त्या गणेश भजनाचा समारोप केल्यावर मी पुन्हा एकदा सर्व महिलांना माझ्या बरोबर, चुकत माकत का होईना, गाण्याचे आवाहन केले. संगीताच्या सुरांमधील मन हलके करण्याची जादू त्यांनी अनुभवावी, काही क्षण साऱ्या चिंता बाजूला ठेवून गाण्यात स्वतःला मुक्तपणे झोकून द्यावे असे मला प्रामाणिकपणे वाटत होते.

येथे सर्व धर्मांच्या स्त्रिया होत्या. म्हणूनच नंतरचे भजन सर्व-धर्म-समावेशक घेतले. अल्लाहचे नाव आल्यावर पुढे बसलेल्या तिघी-चौघींच्या कळ्या खुलल्या आणि त्या जरा मोकळेपणाने टाळ्या वाजवू लागल्या. बुद्धाचे नाव येताक्षणी अजून काही चेहरे उजळले. विठ्ठलाचे नाव आल्याबरोबर नऊवारी, पाचवारीतल्या, ग्रामीण भागातून आलेल्या अनेक महिला कैदी जोषाने टाळ्या वाजवू लागल्या. जीझसचा पुकारा करताक्षणी सहाव्या-सातव्या ओळीत बसलेल्या तीन-चार आंग्ल युवती डोलू लागल्या. थोडक्यात काय, समोरच्या श्रोत्यांमध्ये आता थोडा उत्साह दिसू लागला होता. काहीजणींच्या चर्येवर अस्फुटसे स्मितही उमटले होते. त्यांच्या त्या स्मितानेच मला अजून ऊर्जा मिळत होती.

मग पुढेही आम्ही म्हणायला सोपी, वेगवान, नादपूर्ण भजने गाऊ लागलो. सुरुवातीला गाताना संकोच करणाऱ्या बायका हळूहळू भीड चेपली जाऊन खुलेपणाने गाऊ लागल्या होत्या. मध्येच दोन-तीन बायका खोलीच्या मागच्या बाजूला उभ्या राहून भजनाच्या तालावर डोलू-नाचू लागल्या. विठ्ठलाचे भजन सुरू झाल्यावर तर चित्रच पालटले. डोळे मिटून, तालावर पावले टाकणाऱ्या महिलांना अजून काहीजणी सामील झाल्या. त्यांचा नाच फेर धरून जसजसा रंगात येऊ लागला तसतशा त्या आंग्ल युवतीही उठून त्यांच्या परीने ठेका धरत नाचू लागल्या. आता माझ्या समोर बसलेल्या बायकांनाही हुरूप आला. आपापल्या साड्या झटकत, पदर खोचून त्यातील काहीजणी फुगडी, काहीजणी झिम्मा खेळू लागल्या. एका वेळी दोन-दोन, तीन-तीन जोड्या फुगड्या खेळत होत्या. कोणाचा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने वातावरण खेळकर बनले. झिम्मा खेळताना त्यांचे चेहरे फुलून आले होते. चुरशीच्या फुगडीत त्यांना शरीर झोकून मस्त रममाण होताना पाहून त्याच का त्या मगाच्या निर्विकार-कोऱ्या चेहऱ्यांच्या, सुन्न बसलेल्या किंवा खुन्नस देऊन पाहणाऱ्या बायका, असा प्रश्न कोणालाही पडला असता. बघता बघता काही तुरळक कैद्यांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व बायका नाचू, गाऊ लागल्या होत्या. चेहर्‍यावरच्या रागाची, नैराश्याची, असमाधानाची जागा आता प्रफुल्लित खेळकरपणाने घेतली होती. काहीजणी डोळे मिटून तल्लीन होऊन एकट्याच नाचत होत्या. गतिमान गाण्यांसोबत त्यांची पावलेही थिरकत होती.

वेळ संपत आली तशी हळूहळू गाण्यांची गती मंदावत आम्ही भजने थांबविली. सर्वांना डोळे मिटून शांत बसायला सांगितले. धपापत्या उरांनी, घामाने डवरलेल्या चेहऱ्याने स्थानापन्न होत सर्व बायकांनी आज्ञाधारकपणे डोळे मिटले आणि आपला श्वास सावरायची वाट पाहू लागल्या. काही बायका अजूनही टक्क, साशंक डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होत्या. डोळे बंद करायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. मी सर्वांना आपल्या श्वासाकडे लक्ष घेऊन जायला सांगितले. शरीरात निर्माण झालेली ऊर्जा अनुभवायला सांगितली. त्यांचे एक छोटेसे, मन शांत करणारे ध्यान घेतल्यावर त्यांना जेव्हा डोळे उघडायला सांगितले तेव्हा कित्येकींच्या चेहऱ्यांवर हास्यरेषा उमटल्या होत्या. जणू त्या काही मिनिटांमध्ये निर्व्याज समाधानाचा सुगंधी दरवळ त्यांनी अनुभवला होता!

..... पण वास्तवही वेगळे असते! सत्संग संपल्याचे सूचित केल्यावर महिला क्लबच्या सदस्यांनी माईकचा ताबा घेतला. तेथील स्त्री कैद्यांच्या छोट्या मुलांसाठी त्यांनी नव्या कोऱ्या, फुगे - झिरमिळ्या लावलेल्या तीन-चाकी सायकली आणल्या होत्या. सायकली पाहिल्यावर एवढा वेळ बाहेर दंगा करणारी ती छोटुकली मुले हरखून गेली. कोण सायकलवर पुढे बसणार, कोण मागे ह्यावर त्यांच्यात चढाओढच सुरू झाली. एव्हाना सुरक्षा कर्मचारी पुढे सरसावल्या होत्याच... तरीही त्या कैद्यांपैकी आठ-दहाजणी लाजत, एकमेकींना ढकलत पुढे येऊन कार्यक्रम आवडल्याचे सांगून गेल्या. आंग्ल युवतींमधील एकजण धिटाईने पुढे आली आणि ती भायखळा तुरुंगात असताना, मनातली आशा पूर्ण तुटत चालली असताना तिथे झालेल्या अशाच सत्संगाने तिला कसा मानसिक आधार दिला होता ते व आजचा सत्संग आवडल्याचे सांगून गेली. आमच्याकडे येणाऱ्या महिलांची गर्दी वाढल्यावर सुरक्षा कर्मचारी दंडुके परजत पुढे आले. मग लगेच पांगापांग! आमच्यात व महिला कैद्यांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक फळीच उभी राहिली. आता कटायची वेळ आली होती. संयोजक व वॉर्डनसकट इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अनौपचारिक आभार मानून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. बाहेर मुलांचा नव्या सायकली पादडण्याचा व आनंदाने चित्कारण्याचा कार्यक्रम रंगात आला होता. त्यांना ह्या तुरुंगाबाहेरचे जग माहीत होते की नाही, कोणास ठाऊक!

तुरुंगाच्या बाहेर पडलो तसे एवढा वेळ संपर्क तुटलेले बाकीचे सामान्य जग पुन्हा पुकारू लागले. निघण्यासाठी गाडीत मी बसते न बसते तोच मोबाईल खणखणला. ''किती वेळा ट्राय केला तुझा मोबाईल, पण कॉल लागतच नव्हता! '' पलीकडून माझी मैत्रीण ठो ठो करत होती, ''कुठे आहेस? काय करत होतीस? '' गाडीतल्या माझ्या सहकारी मित्रांकडे एक मिष्किल कटाक्ष टाकून मी सहज उत्तरले, ''काही नाही गं, येरवडा जेलमध्ये होते जरा... पण पोचते आहे घरी अर्ध्या-पाऊण तासात, तेव्हा बोलू! '' तिला पुढे काही बोलू न देता मी फोन बंद केला आणि बाकीच्यांच्या हास्यात सामील झाले! मनात समाधानही होते आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याचा आनंदही..... आज काही काळासाठी का होईना, त्या कैद भोगत असलेल्या स्त्रिया आपले सर्व राग, लोभ, मत्सर, चिंता, नैराश्य विसरून संगीत-नृत्यात आनंदाने तल्लीन झाल्या होत्या. त्यांना मोकळेपणाने हसताना, खेळताना आणि आपल्या मुलांच्या आनंदाने हरखून जाताना पाहूनच मन भरून आले होते. ईश्वराकडे त्यांना आयुष्यात योग्य मार्ग सापडून त्यांची घडी पुन्हा एकवार बसावी आणि गुन्हेगारीच्या वाट्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर परत कधी येऊच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी घराच्या वाटेला लागले.

-- अरुंधती कुलकर्णी

http://iravatik.blogspot.com/

संगीतसंस्कृतीवावरसमाजजीवनमानप्रकटनसद्भावनालेखअनुभवमदत

प्रतिक्रिया

आळश्यांचा राजा's picture

24 May 2010 - 7:28 pm | आळश्यांचा राजा

___/\___

सिन्सिअरली.

आळश्यांचा राजा

शुचि's picture

24 May 2010 - 7:34 pm | शुचि

>>गुन्हेगारीच्या वाट्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर परत कधी येऊच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी घराच्या वाटेला लागले.>>खरं गं अरु "सर्वे भवन्तु सुखिनः ....."

किती वेगळा अनुभव आहे तुमचा. भयाण वातावरणात शांतीचे सूर छेडण्याचा. खरच त्या महीलांना २ क्षण नक्की शांतीचे लाभले असतील, कुठेतरी ज्योत दिसली असेल, आशा पल्लवीत झाली असेल. माझी खात्री आहे.
लेखात तुझ्या मनातले तरंग जरा आले असते आधीचे नंतरचे तर आवडले असते. तुला भीती नाही का वाटली? असणारच पहील्या वेळी.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अरुंधती's picture

24 May 2010 - 8:25 pm | अरुंधती

शुचि, आळश्यांचा राजा, धन्यवाद! :-)
शुचि, माझ्या सर्वात पहिल्या तुरुंगभेटीत , मी कॉलेजात असताना, खूप सुन्न झाले होते.... पण त्यानंतर महिला कारागृहाला २-३ भेटी, पुरुष कारागृहाला २ भेटी दिल्याने जरा कशाप्रकारचे वातावरण आत असेल ह्याची पूर्वकल्पना असल्याने खूप वेगळे वाटले नाही. मात्र त्या वातावरणात ईश्वराच्या भजनाने, सामूहिक प्रार्थना-गायनाने व काही काळासाठी का होईना मिळालेल्या खुलेपणामुळे जो काही फरक पडला तो लक्षणीय होता.
माझ्या सहकार्‍यांनासुध्दा आधीच्या भेटींमुळे पूर्वकल्पना होती. मात्र आमच्या हायर केलेल्या साऊंडवाल्याला जरा आतील वातावरण, सुरक्षा इ. इ. मुळे थोडे टेन्शन आले होते. कार्यक्रम संपल्यावर तोही मोकळेपणाने हसत होता हे विशेष! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इन्द्र्राज पवार's picture

24 May 2010 - 9:09 pm | इन्द्र्राज पवार

"...आणि गुन्हेगारीच्या वाट्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर परत कधी येऊच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी घराच्या वाटेला लागले....."

नेमकी हीच भावना माझ्याही मनी आली होती ज्यावेळी आम्ही कोल्हापुरात कॉलेजच्या "रा.से.योजने"तर्फे "कळंबा जेल" येथे पुरुष कैद्यांसमवेत एक कार्यक्रम आयोजित केला होता. राज्याच्या पोलिस महासंचालकांची रितसर परवानगी घेऊन ... कारण विषय होता ~~ "कैद्यांचे कवितावाचन". या विषयासाठी ज्यावेळी आमच्या युनिटच्या प्राध्यापकांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे परवानगी मागितली त्यावेळी (साहजिकच...) त्यांनी नकार दिला होता... कारण स्पष्ट होते... की, "इनमेट्स" (हा त्यांचा शब्द) तुरूंग व्यवस्थापनावर काहीतरी तक्रारवजा कॉमेंट्स कवितेच्या माध्यमातून करतील आणि आमच्या युनिटसोबत येणारी पत्रकार मंडळी त्याचे भांडवल करून खात्याची बदनामी करतील. त्यांची शंका नक्कीच अस्थानी नव्ह्ती. तेव्हा आमच्या सरांनी चर्चेदरम्यान सुवर्णमध्य असा काढला की, प्रत्यक्ष भेटीच्या अगोदर एक आठवडा कैद्यांना कवितेचे विषय द्यायचे आणि तीवरच त्यांनी आपापल्या मगदुराप्रमाणे कविता रचायची, म्हणायची, गायची असेल तर गायची. ही कल्पना दोन्ही पक्षी पचनी पडली आणि त्यानुसार "माझा गाव... आई, जमीन, शेत, नदीकाठ सफर, स्वप्न, अपत्याची आठवण...आणि शेवटी अर्थातच ईश्वर !..." हे विषय कैद्यांना निवेदनाद्वारे देण्यात आले... आणि हा कार्यक्रम अगदी तुम्ही म्हणता तसाच देखणा आणि कायमचा लक्षात राहाण्यासारखा झाला.... अन् आम्हा सर्वांना जेलच्या बाहेर पडताना नेमकी तुमच्यासारखीच भावना झाली त्या कैद्यांच्या प्रती....!

तुम्ही लिहिलेला "येरवडा" अनुभव तर एक काव्यच आहे !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

llपुण्याचे पेशवेll's picture

25 May 2010 - 8:58 am | llपुण्याचे पेशवेll

त्यातल्या काही लक्षात राहील्येल्या चांगल्या कविता असतील तर द्या बरं इथं.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

इन्द्र्राज पवार's picture

25 May 2010 - 7:58 pm | इन्द्र्राज पवार

"...चांगल्या कविता असतील तर द्या बरं इथं....

मी जरूर प्रयत्न करतो. ज्या प्राध्यापकांनी यात पुढाकार घेतला होता त्यांनी आणि कोल्हापुर सकाळचे वार्ताहर या दोघांनी त्यातील काही रेकॉर्डही केल्या होत्या, त्या मिळविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधतो.

(मात्र का कोण जाणे त्या कार्यक्रमानंतर ती समस्त लेखन सामग्री तुरुंग व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक आपल्या ताब्यात घेतली होती. कदाचित त्यांना वरिष्ठांचे तसे आदेशही असावेत. पण कार्यक्रमाचा दर्जा छानच होता... "अपिलिंग" म्हणावा असा.)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अरुंधती's picture

25 May 2010 - 7:19 pm | अरुंधती

इंद्रराजसाहेब, कविता-गाणी-नाट्य-विविधगुणदर्शन अशा कार्यक्रमांतून कैद्यांच्या कल्पनाशक्तीला, अंगभूत गुणांना वाव तर मिळतोच, शिवाय त्यांची ऊर्जा काहीतरी सकारात्मक करण्यात गुंतल्यामुळे हिंसक विचारांचे प्रमाण कमी होते. मी ज्या संस्थेचे काम करते त्यांच्यातर्फे तुरुंगातील कैद्यांसाठी ध्यान, प्राणायाम, योगाचे वर्ग घेतले जातात.... शेवटच्या दिवशी त्या कैद्यांनी केलेल्या कविता ऐकताना डोळे पाणावतात. त्यांच्यातल्या माणसाचं हुबेहूब दर्शन होतं....

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मीनल's picture

24 May 2010 - 9:54 pm | मीनल

छान अनुभव कथन.
मला काही कैद्यांबद्दल सहानुभूती वाटते.
गुन्हा प्रत्येक वेळा जाणून बूजूनच केला जातो असे नाही.
इथे ` जेल` नावाचा कार्यक्रम टीव्ही वर पाहते. तेव्हा कळते की अजाणतपणे ही चूका झालेले गुहेगार म्हणून शिक्षा भोगत असतात. काही वेळा तो गुन्हा सिध्द ही झालेला नसतो.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

अरुंधती's picture

25 May 2010 - 7:22 pm | अरुंधती

मीनल, अनेकदा गुन्हेगाराचा गुन्हा सिध्द होईपर्यंत इतका काळ लोटून जातो.... आणि कितीतरीजण आपला गुन्हा नसताना अडकतात हेही खरे आहे.... आणि जे खरोखरी गुन्हा करणारे असतात ते पश्चात्ताप किंवा वैफल्य, निराशा तर कधी सूडाची भावना यांच्या अग्नीत पोळत असतात.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

24 May 2010 - 10:05 pm | मदनबाण

अनुभव आवडला...

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

अमोल खरे's picture

24 May 2010 - 10:05 pm | अमोल खरे

रामदास काकांनी पण त्यांच्या एका कथेत तुरुंगाच्या आतील वातावरणाचा उल्लेख केला होता. तो भाग वाचला नसल्यास जरुर वाचा.

अर्धवटराव's picture

25 May 2010 - 5:47 am | अर्धवटराव

पूण्यवान, नशीबवान आहेस तू अरू !!
सलाम !!!

(गद्गद्) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

अरुंधती's picture

25 May 2010 - 7:24 pm | अरुंधती

मदनबाण, अमोल, अर्धवटराव ..... प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Manoj Katwe's picture

25 May 2010 - 6:06 am | Manoj Katwe

अनेक गरीब, अनाथ महिला केवळ बाळंतपण सरकारी खर्चाने सुखरूप व्हावे व आपला व बाळाचा उदरनिर्वाह काही महिने तरी व्यवस्थित व्हावा ह्यापायी गर्भारपणाचे दिवस भरत आले की किरकोळ गुन्हे करून पकडल्या जातात व नंतर तुरुंगात सरकारी इतमामाने बाळंतपण करून घेतात हेही विदारक वास्तव समजले.

वाचून डोळे पाणावले. खरच काय एवढी गंभीर परिस्थिती आहे बाहेर ?

अरुंधती's picture

25 May 2010 - 7:29 pm | अरुंधती

मनोज, अनेक भटक्या जमातीतील, रस्त्यावरचे आयुष्य जगणार्‍या बायकांना गाठीला पैसे नसताना, डोक्यावर छत नसताना, दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असताना आणि कोणताही आधार नसताना अशीच काहीतरी धडपड करून, गुन्हे करून आपलं बाळंतपण अशा तर्‍हेने करून घेण्याची वेळ येते.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्पंदना's picture

25 May 2010 - 6:21 am | स्पंदना

होय आहे खरी तशी परिस्थीती गरीब निराधार महिलांची. माटुन्ग्याच्या अनाथ आश्रमात आम्ही एकदा लहानग्यांना काही भेट वस्तु घेउन गेलो होतो , तो प्रसंग आठवला. डोळ्यातल पाणि थांबत नव्हत ते अश्राप जीव पाहुन. किती दिवस मी हट्ट करत होते निदान एखाद बाळ दत्तक घेउ म्हणुन. अगदी ठाम नकार मिळाला मला घरुन.

जरी अनुभव असला; तरी त्या मधील वेदनेन ,मला तर अस वर्णन नाही जमायच अरुंधती. पण तुझ्या लिखाणामुळे निदान थोडी द्रुष्टी मिळेल वाचकांना.

पोट भर जेवुन पेंगत येणार्‍या भक्तांपेक्षा हा सत्संग खरच कारणी लागला ग बयो!!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मस्त कलंदर's picture

27 May 2010 - 12:01 am | मस्त कलंदर

पोट भर जेवुन पेंगत येणार्‍या भक्तांपेक्षा हा सत्संग खरच कारणी लागला ग बयो!!

अगदी खरं!!!
अरूंधती, _/\_

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

डॉ.श्रीराम दिवटे's picture

25 May 2010 - 6:34 am | डॉ.श्रीराम दिवटे

अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही म्हणतात. तुमचे हे शाब्दिक विवेचन कारागृहातील अनुभव प्रत्यक्ष समोर घडतो आहे अशा उत्कृष्ट पद्धतीने आलेले आहे.

संदीप चित्रे's picture

25 May 2010 - 7:33 am | संदीप चित्रे

तुझ्या ह्या अनुभवावर शब्दांचे ओरखडे नकोत म्हणून इथेच थांबतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2010 - 7:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्या अनुभवावर शब्दांचे ओरखडे नकोत म्हणून इथेच थांबतो.

-दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

25 May 2010 - 7:35 am | मुक्तसुनीत

नेटक्या शब्दांत मांडलेला अनुभव.

अरुंधती's picture

25 May 2010 - 7:31 pm | अरुंधती

अपर्णा, संदीप, डॉ.श्रीराम, डॉ दिलीप, मुक्तसुनीत प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

गुंडोपंत's picture

25 May 2010 - 8:22 am | गुंडोपंत

अरुंधतीताई फार सुंदर अनुभव आहे. आणि तुमचे लिखाणही उत्तम आहे.
तुम्ही जे काम करत आहात त्याला तोड नाही. तुमच्या विषयी आदर वाटला. मात्र असा सत्संग अनेकदा करता येणार नाही का तेथे, असेही वाटून गेले!

तुरुंगातील मुलांविषयी वास्तवाची भयाण जाणीव करून देणारे ' तुरुंगातील सावल्या नावाचे एक मराठी पुस्तक आहे. लेखक श्री भरुचा आहेत. (ते किरण बेदींचे जावई होत)
आई सोबत तुरुंगात असलेल्या लहान मुलांचे अतिशय अस्वस्थ करणारे करूण आणि वास्तव जग त्यात आहे. या मुलांना काही कारण नसतांनाच तुरुंगवास होत असतो. मात्र हे फक्त ५ वर्षांपर्यंतच! नंतर जबरदस्तीने ते मूल आईपासून वेगळे केले जाते. त्याला कायद्याने कारागृहात स्थान नसते.
दिवसरात्र तुरुंगात आईसोबत असलेली ही लहानगी पाचव्या वाढदिवसाची भेट म्हणून आईपासून दूर जातात. अनेक आयांना त्यांना झालेल्या शिक्षेपेक्षा, ही शिक्षा सहन होण्यापलिकडे असते.

तुरुंगातल्या आणि रिमांडहोम मधल्या मुलांच्या विचारांनी अस्वस्थ व्हायला होते.

आपला
गुंडोपंत

अरुंधती's picture

25 May 2010 - 7:42 pm | अरुंधती

गुंडोपंत, हो, खरंय.... इकडे आड तिकडे विहीर.... तुरुंगात राहणेही त्या मुलांच्या दृष्टीने योग्य नाही आणि रिमांडहोममध्येही वातावरण गढुळलेलेच असते. रिमांडहोममध्येही मुलांसाठी - त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी खास प्राणायाम, योग, ध्यान, खेळ असणारे कोर्सेस, सत्संग हे मी काम करत असलेल्या संस्थेतर्फे घेतले जाते.... पण आईच्या मायेची ऊब, पालकांची प्रेमाची छत्रछाया ही वेगळीच, नाही का?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती ,
तु जे करत आहेस त्याची तोड नाही ... सलाम !!
मी ही दरवर्षी एकातरी अनाथ आश्रमाला भेट देते (बहुतेक रमजान महिन्यात) पण बहुतेक अनाथ वस्तीगृह ही मुलांचीच पाहीली . मुलींची फारच कमी. मी अनेकदा विचारले अनाथ मुलींचे वसतीगृह का नाही पण मुलींची जबाबदारी एका विषिष्ट वयानंतर संचालक मंडळी टाळताना दिसली .
बहुतेक ठिकाणी करुण अन मन खिन्न - सुन्न करणारे अनुभव मिळाले

पण शेवटी गुजराथ मधील अहेमदाबाद जवळील मुलींची वसतीगृह आम्ही शोधून काढले.
अन एकदा त्या अनाथ वस्तीगृहाला भेटही दिली
सगळ्या मुली अपंग किंवा काहीना काही व्याधीने ग्रासलेल्या होत्या पण त्या सगळ्याच खुपच Full of Enthusiam वाटल्या इतक्या दु:खातही आनंदात होत्या . तेथील मतीमंत अनाथ मुलींची जोपासना तेथील सेविका अतिशय प्रेमाने करीत होत्या. आम्ही त्या मुलींसोबत तिथे १ दिवस अन १ रात्र पण काढली. पण मला कुठेही रिमांड होमचे स्वरुप जे माटुंग्याच्या अनाथ आश्रमात दिसले होते ते सुदैवाने तिथे नाही जाणविले .
मला त्यांनी एक अल्बम ही दाखविला तेथील अनाथ मुलींच्या लग्नाचा अल्बम .. आईच्या मायेची ऊब, पालकांची प्रेमाची छत्रछाया सगळे काही होते तिथे. या अनाथ वस्तीगृहाला गुजराथ मधील एन आर आय मंडळी जात, धर्म, पंथ न बघता नियमित मदत करतात
मी तुला त्याचा पत्ता ही देईन . दुर्दैवाने मी असे चित्र मुंबई पुण्याच्या आसपास नाही पाहीले :-(
~ वाहीदा

अरुंधती's picture

26 May 2010 - 7:22 pm | अरुंधती

वाहिदा..... तुझ्या अनुभवाबद्दल काय बोलू? वाईट स्थिती आहे इतकंच सांगू शकते. आपल्या परीने मदतीचा हात कायम पुढे करत राहणे....
तू नक्की मला त्या अनाथाश्रमाचा फोन, पत्ता कळव! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इन्द्र्राज पवार's picture

27 May 2010 - 12:02 am | इन्द्र्राज पवार

"....पण बहुतेक अनाथ वस्तीगृह ही मुलांचीच पाहीली. मुलींची फारच कमी..."

वाहिदा जी, हा प्रकार तुम्ही पुणे/मुंबई या सारख्या महानगरात पाहिला असाल, पण कमीजास्त प्रमाणात सर्वच जिल्ह्यात हीच स्थिती आहे. कोल्हापुरदेखील त्याला अपवाद नाही. जी काय एकदोन आहेत ती "को-एज्युकेशन" धर्तीवर चालविली जातात. कॉलेजच्या एनएसएस युनिटच्या वतीने काही विधायक कार्य करायला आमचा ग्रुप तिथे गेला होता त्यावेळी तिथल्या सुपरिंटेंडेंट बाईनी निक्षून सर्व मुलींना एका हॉलमध्ये बसविले होते व आम्हाला फक्त मुलांच्या सेक्शनकडेच लक्ष देण्याची सुचना केली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "नको ती जबाबदारी" घ्यायला तेथील अधिकारी वर्ग इच्छुक नसतो हेच खरे !

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

स्वाती२'s picture

26 May 2010 - 3:07 am | स्वाती२

अरुंधती, अनुभव पोहोचला. :(

स्वाती दिनेश's picture

26 May 2010 - 3:02 pm | स्वाती दिनेश

एका वेगळया जगामध्ये नेणारा वेगळाच अनुभव,
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2010 - 4:38 pm | बिपिन कार्यकर्ते

अनुभव वेगळाच आणि मांडलाय पण नीटपणे.

बिपिन कार्यकर्ते

अरुंधती's picture

26 May 2010 - 7:23 pm | अरुंधती

स्वाती, स्वाती दिनेश आणि बिपिन....

प्रतिसादाबद्दल धन्स! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

आनंदयात्री's picture

26 May 2010 - 7:51 pm | आनंदयात्री

छान अनुभवकथन.
पहिला भाग वाचतांना उंबरठा या चित्रपटाची आठवण झाली !

पक्या's picture

26 May 2010 - 9:06 pm | पक्या

अनुभव कथन छान केले आहे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !