भगवंत दयाळू आहे.. न्यु प्रिंट संचित

shaileh vasudeo pathak's picture
shaileh vasudeo... in जनातलं, मनातलं
6 Apr 2010 - 5:09 pm

भगवंत दयाळू आहे...

लहानपणी चांदोबा नावाचे एक मासिक(कदाचित पाक्षिक असेल...) यायचे त्यात एक कथा होती,कोणी एक लहान मुलगा सतत असे म्हणतो, भगवंत दयाळू आहे.एकदा तो आपल्या आई-वडीलां सोबत फ़िरायला गेला असतो.. अचानक बाहेरील काही दृष्य पाहुन तो गाडी थांबावतो आणि पळत सुटतो.. येथे पुढे गेलो तर एक मंदिर आहे.. मंदिरात मी राहत होतो..देवाची पुजा व साधना करत होतो अचानक मृत्यु आला..वै...मग तेथील लोक त्याला तेथेच राहायला सांगतात.तो आपली साधना पुन्हा सुरु करतो....भगवंत दयाळू आहे इ..कथा पुर्वजन्म या गोष्टीशी निगडीत होती.

आता उरलो उपकारा पुरता.. असे म्हणणारे संत तुकाराम ,हे विश्वची माझे घरं म्हणणारे संत ज्ञानेश्वर असतील ,स्वामी विवेकानंद असो वा योगी अरविंद घोष,यांना भगवंत दयाळू का वाटावा ?

भगवंत दयाळू आहे सर्वांना वाटते.ज्ञान,कर्म,भक्ती या तिन्ही मार्गातील साधक वर उल्लेखलेले उच्च कोटीचे साधक असेच म्हणतात.माझ्या सारख्याने म्हटले तर ठीक आहे.मला माझे काम साधायचे असते.

हा प्रश्न अनेकदा मला पडला..

गीतेतील सहाव्या अध्यायात याचे उत्तर सापडते..(असे मला वाटते चु.भू.द्या.घ्या.)

श्लोकः-

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभि जायते ।।

अ.६ श्लोक ४१

फ़ोडः-

योगभ्रष्ट पुण्यकॄतां लोकांन् प्राप्य शाश्वतीः समाः उषित्वा शुचीनां श्रीमतां गेहे अभिजायते.

अर्थः-

योग मार्गा पासून भ्रष्ट झालेला संन्यासी पुण्याचरण करणारया लोकास प्राप्त होऊन हजारो वर्ष त्या लोकीं राहून शास्त्रोक्त आचरण करणारया श्रीमंताच्या घरी उत्पन्न होतो.तसेच पूर्व जन्मातील योगभ्रष्ट असल्यानेच तो पुन्हा त्या मार्गाकडे ओढला जातो.

संत ज्ञानेश्वर या श्लोकावर टीका करतांना म्हणतात..

ऐकें कवतिक हें कैसे । जें शतमखा लोक सायासें ।।ततो पावे अनायासे । कैवल्य कामु ।।४१।।
मग तेथिंच जे अमोघ । लौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मन ।।४२।।
हा अंतरायो अवचितां । का वोढवला भगवंता?। ऐसा दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ।।४३।।
पाठीं जन्मे संसारीं । परिसकळ धर्माचिया माहेरी । लांबा उगवे आगरीं । विभवश्रीयेचा ।।४४।।
जयातें नीतिपंथे चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावें तें देखिजे शास्त्रदृष्टी ।।४५।।
वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु । सारासार विचारु । मंत्री जया ।।४६।।
जयाच्या कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयातें गृहदेवता । आदि ऋध्दि ।।४७।।
ऐसी निज पुन्याची जोडी । वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ।।४८।।

ज्ञानेश्वरी अ.६ ओव्या ४१ ते ४८.

अर्थः-

अरे, हे कौतुक पहा ज्या लोकांची प्राप्ति व्हावयास शंभर यज्ञ करणारया इंद्रालाहि प्रयास पडतात, ते या मोक्षेच्छु पुरुषाला अनायासे प्राप्त होतात.मग तेथील निष्फळ न होणारे व अप्रतीम असे भोग भोगतां भोगतां त्याच्या मनाला कंटाळा येतो.तें दिव्य भोग भोगीत असतां तेथे त्यास सुख होत नाही व हे भगवंता,हे भोगाचे विघ्न माझ्या मागे कां लागले?असा तो निरंतर पश्चात्ताप करीत असतो.नंतर फ़िरुन तो मृत्युलोकी जन्म पावतो,पण सर्व धर्मांचे माहेर अश्या कुलांत जन्म पावतो,आणि शेत कापल्यावर पडलेल्या भात गोट्यांचे शेत जसे जोराने फ़ोफ़ावते-तशी त्याच्या ऐश्वर्याची वृध्दि होते.जे कुल निति मार्गाने चालणारे,सत्य आणि पवित्र भाषण करणारे,शास्त्ररीतीने वागणारे.ज्या कुळात वेद नित्य जागृत असतो व स्वधर्माचे आचरण हा ज्या कुलाचा व्यवसाय आणि सारासार विचार हाच मंत्री. ज्या कुलात चिंतेने ईश्वरांस वारिले(ईश्वरां वाचून दुसरया कशाचेही चिंतन नाही) आणि ज्याला आदिऋध्दि(संपत्ति) हीच गृह देवता आहे , असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखाची समृध्दि आहे अश्या कुलात तो योगभ्रष्ट पुरुष जन्म घेतो.

हा योगी पुढे आपली अपुर्ण साधना पुर्ण करु शकतो.ही भगवंताची कृपा नव्हे काय.

आपल्या साध्या शब्दात ते कसे मांडता येईल...खाली स्वरचित कविता देतोय....

संचित

मी शोधितो आधार माझ्या जन्माचा
कि भोगावया आलो मी भाग संचिताचा

शौर्यास भेटली जेथे लज्जा प्रणयात्
माझ्याच जाणिवेची होती ती सुरवात
देहात नव्या होता संस्कार गतजन्माचा
कि भोगावया आलो मी भाग संचिताचा

लाभली मोहक कांती डोळ्यांमध्ये तेज
वैभवात नटले आहे स्वरांसूराचे साज
सहज का लाभावे ? असेल योगी मी जन्मांचा
कि भोगावया आलो मी भाग संचिताचा

रोज खुणावते एक मृग का गिरीशिखरावरती
का ओळखिची वाटे मज वाट ही वैराग्याची
आता न मन रमावे मोहात संसाराच्या
कि भोगावया आलो मी भाग संचिताचा

(स्वरचीत. हक्क संरक्षीत)

शैलु.

कथाकविताभाषासाहित्यिकसंदर्भमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

शुचि's picture

6 Apr 2010 - 5:57 pm | शुचि

कविता तर आवडली होतीच होती पहील्यांदा. आता विवेचनही आवडलं.
फारच सुरेख. हे सगळं भारतात असताना वाचायचे. आता नाळ तुटली. कितीही इच्छ असून हे वाचन होत नाही. जालावर उपलब्ध नाही.
आपण अशा विषयांवर जरूर लिहावं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!