मागील दुवा : https://misalpav.com/node/42589
मी आईला हे एकदा सांगितले . ती मला खुळा म्हणाली नाही. माझ्या केसांवरून ,गालावरून हात फिरवला, माझी हनुवटी हातात धरली. आणि तिचे डोळे एकदम रानातल्या तळ्यासारखे पाण्याने भरून आले.काठोकाठ.
ढग गडगडायच्या अगोदर मला त्यांना एकदा सांगायचंय. तुम्ही खुशाल गडगडा...पण विजेची टाळी देवून कुणाची आज्जी घेवून जाऊ नका.
विजेची टाळी देवून ढग गडगडले की मला वाटते कोणाची तरी मऊसूत कापसाची आज्जी गेली.
शाळा सुरू झाल्याझाल्या पहिली गोष्ट काय केली असेल तर ती म्हणजे. नवी पुस्तके आणि दप्तर घेणे.
आनंदच्या दुकानात नवी पुस्तके आली नव्हती अजून. त्यां दुकानाची एक गम्मतच आहे. दुकानाचं नाव " आनंद बुक हौस " मी आईला पण दाखवलं. लोक हौस म्हणून पुस्तकं वाचतात . यानी दुकान काढून पुस्तके वाचायची हौस पूर्ण करून घेतली.
दुकानाची नावं कशी ठेवतात ते एकदा बघायलाच हवं. शेजारच्या कदमकाकूना बाळ झालं होतं तेंव्हा बाळाच्या आत्याने बाळाला पाळण्यात घालून बाळाच्या कानात नाव सांगितले होते. ते बाळ बिचारे पाळण्यात ठेवल्यापासून एकसारखे रडतच होते. त्याचे जरीचे झबले त्याला टोचत असावे. त्याला रडताना त्याचे नावंच ऐकू आले नसेल. रडताना कोण काय बोलतं ते कधी ऐकू येतं का कुणाला? आणि भोकाड पसरून रडत असू तर दिसत पण नाही.
त्याला दुसर्या एखाद्या बाळाने विचारले तर ते काय सांगेल . थांब माई आत्तेला विचारुन सांगतो. अर्थात ते बाळ इतके रडके होते की त्याला नाव विचारायचे धाडसच कोणी केले नसते. जरा काही झाले की भोकाड पसरणाराना कुणी नाव तरी कशाला विचारेल. रडक्या बाळंना " उं..." हे एकच नाव सांगता येते.
त्या उलट त्या देसाई गल्लीतल्या जोशी काकुंचं बाळ. थोडं मोठठं अर्थात ते. भारी बडबडं होतं. " माझं नाव शोन्या आहे पण मी नाही शांगनाल. आइनं शांगीतलं हाये की शोन्या नाव शांगायचं नाई . तुझं नाव बबड्या हाये.... " त्याची बडबड थांबायचीच नाही. समोर कुणी नसलं तरी ते बडबडंत असायचं.
दुकानाचं नाव दुकानाची आत्या ठरवत असेल का? पण तसे असेल तर मग दुकानाची आत्या कुठे रहात असेल. ती पण एक दुकानच असेल ना. पुस्तकांच्या दुकानाची आत्या हे कशाचे दुकान असेल?
शाळेची पुस्तके पुस्तके कधी येणार हे दुकानातल्या " आनंद बुक हौस मधल्या माणसालापण माहीत नव्हते. दुकानाच्या बाहेर ही गर्दी, प्रत्येक जण विचारायचा की पाचवीची पुस्तके कधी येणार. तीसरीची पुस्तके कधी येणार, आठवीची पुस्तके कधी येणार, नववीची पुस्तके कधी येणार. चौथीची पुस्तके कधी येणार, दहावीचे भुगोलाचे पुस्तक आले का हो.प्रत्येक प्रश्नाला उत्तर तेच. " पुढच्या आठवड्यात चौकशी करा " भुगोलाच्या, गणीताच्या , मराठीच्या , भौतीक शास्त्राच्या, रसायनशास्त्राच्या, नागरीक शास्त्राच्या प्रश्नाला एकच उत्तर " पुढच्या आठवड्यात चौकशी करा " या उत्तराला जणू पैकीच्या पैकी मार्क देत असल्या सारखे प्रत्येक पालक ते उत्तर ऐकून परत फिरत होते. आणि त्यांच्याबारोबर त्यांची सोबत आलेली मुलेसुद्धा.
खर्याखुर्या परीक्षेत समजा प्रत्येक विषयाच्या प्रश्नाला एकच उत्तर दिले तर ?
म्हणजे बघा एका हौदाला तीन तोट्या आहेत. एकीतून पाणी बाहेर जाते दोन तासात हौद रीकामा होतो. हौद भरणारी एक तोटी तीन तासात हौद भरते आणि दुसरी चार तासात हौद भरते . जर तीन्ही तोट्या चालु असतील आणि हौद निम्म्या पर्यंत भरलेला आहे तर हौद किती तासानी पूर्ण भरलेला असेल? याचे उत्तर " पुढच्या आठवड्यात चौकशी करा.
उत्तर ध्रुवावर एस्कीमोंच्या हिवाळी घराला काय म्हणतात याचे उत्तर " पुढच्या आठवड्यात चौकशी करा .
शिवाजी महाराजानी पुरंदरच्या लढाईत केलेल्या तहाची कलमे कोणती याचे उत्तर " पुढच्या आठवड्यात चौकशी करा"
राष्ट्रपतींची कामे कोणती चे उत्तर " पुढच्या आठवड्यात चौकशी करा"
आय एट मँगो चे पॅसीव्ह व्हॉईस मधे रुपांतर करा चे उत्तर " पुढच्या आठवड्यात चौकशी करा "
" शिळे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये कारण? चे उत्तर " पुढच्या आठवड्यात चौकशी करा"
लोखंडावर संहत सल्फ्यूरीक आम्ल टाकले तर काय होईल चे उत्तर " पुढच्या आठवड्यात चौकशी करा "
असे प्रत्येक प्रश्नाला तेच उत्तर दिले तर चालेल का. पण हा पठ्ठ्या खुशाल कोणत्याही प्रश्नाला तेच उत्तर देत होता.
मधुनच त्याला कोणीतरी " काय रे तात्या बाहेर गेले आहेत का? कधी येणार आहेत ? असे विचारले त्याचेही उत्तर त्याने "पुढच्या आठवड्यात चौकशी करा" असेच दिले. गम्मत म्हणजे ते उत्तर त्या प्रश्न विचारणाराला पतले होते. तो उत्तर ऐकून मान हलवत निघून गेला. त्या कोणी " काय रे तब्येत बरी आहे का " असे विचारले असते तरी त्याचेही उत्तर त्याने " पुढच्या आठवड्यात चौकशी करा " असेच दिले असते.
अर्थात त्याची तरी काय चूक. गर्दीच इतकी होती की कोण काय विचारतेय तेच कळत नव्हते..
लोक तरी कसले येडे ना. एकाला मिळालेले उत्तरच सर्वाना दिले जातेय हे माहीत असूनही तोच प्रश्न विचारायचे थांबत नव्हते.
उत्तराचीच नाहे तर प्रर्श्नांचीही कॉपी होत होती. दुकानदाराने दिलेले उत्तर एकाने दुसर्याला दुसर्याने तिसर्याला सांगितले असते तर काय बिघडले असते. निदान गर्दी तरी कमी झाली असती. पण नाही. पुढच्या मुलाला परीक्षेत उत्तर संगु नका ही शाळेत दिलेली शिकवण लोक मोठेपणीही विसरत नाहीत.
दुकानात एक माझ्याच वयाचा मुलगा होता. काय भारी ना.. त्याला सर्वात अगोदर पुस्तकं मिळत असणार. त्याचा अभ्यासाही भरपूर होत असणार.
त्याच्याही अगोदर पुस्तक कारखान्यात काम करणाराना सर्वात अगोदर ती वाचायला मिळत असणार. त्यांचा तर कितीतरी अभ्यास होत असणार.
त्यांची जास्त मज्जा. पुस्तकं कारखान्यातल्या मुलाना पुस्तकातली चित्रं पण अगोदर बघायला मिळत असणार. नव्या पुस्तकातली नवी चित्रं . मी तर ठरवून टाकलं की मी मोठा झाल्यावर पुस्तकांच्या दुकानात काम करणार.
नवं दप्तर , नव्या वह्या, नवी पुस्तकं , नवा कंपास , करकरीत छान वासाचं नवं खोडरब्बर, सगळं कसं नवं नवं मिळेल मला मग.
मी त्या मुलाकडे बहुतेक खूप मोठाल्ले डोळे करुन पहात असणार. कारण त्या दुकानातल्या माणसाने त्या मुलाच्या डोक्यावर एक टप्पल मारून सांगीतले " ए धन्या अरे लक्ष्य कुठे आहे. तो गठ्ठा उचल की खाली पसरलेला. नुसती चित्रं बघत बसतो. तरी बरं तुला वाचता येत नाही ते. नाही तर काय केलं असतंस कोण जाणे. आवर पटपट. आणि त्या गिर्हाईकाला बघ काय पायजेल आहे ते.'
त्या मुलाचे नाव धन्या होते तर. तो माझ्याकडे आला आणि मी काही विचारले नसतानाही म्हणाला " पुढच्या आठवड्यात चौकशी करा"
कमाल आहे. मी काय विचारणार ते त्याला आधीच माहीत होतं. मला शंभरपानी वह्या आणि कंपास घ्यायचा होता हे त्याला मी न सांगताच कळले होते.
याला नक्कीच बहुतेक कसलीतरी सिद्धी प्राप्त झाली असणारच . कधीतरी येवून विचारायला हवं. शाली मावशीकडे एकदा एक दाढीवाला माणूस आला होता. केशरी रंगाची लुंगी घालून. वर केशरी बनीयनपण घातला होता. त्या माणसाला म्हणे सिद्धी प्राप्त होती. लोक काय काय विचारत होते त्याला.
मुलीचं लग्न कधी होइल ? घोडा हरवलाय कुठे सापडेल? असे काहिसे. याची उत्तरे कुणीपण दिली असती. त्याला सिद्धीच कशाला असायला हवी. ठरवल की होतेच की लग्नं. आणि घोडा हरवलाय. तो रस्त्यावर सापडेल. कोणत्या ते कधी संगायचंच नाही. पण हरवायला घोडा म्हणजे काय रुमाल आहे का? अर्थात हे मी शाली मावशी समोर बोललो नाही. नाहीतर शाली मावशीने वर्षभर तरी तुझ्या विनु ला लोकांचा मान कसा ठेवता येत नाही हे आईला ऐकवले असते. एकमात्र होतं तो दाढीवाला माणूस बोलताना त्याची दाढी छान हलत होती. मला तर ती जत्रेतल्या " बुढ्ढी के बाल " ची आठवण झाली. तो दाढीवाला बहुतेक रोज सकाळी तासभरतरी घरी बुढ्ढी के बाल बनवायच्या मशीन मधे हनुवटी घालून बसत असावा. माझ्या कडे ते तसले मशीन येवू देत मी पण तसली बुढ्ढी के बालवाली दाढी लावून सिद्धी प्राप्त करुन दाखवली असती.
पण हा दुकानातला मुलगा मात्र खरा सिद्धी वाला असावा. त्याला दाढी नव्हती तरीही.
मला आईने हात धरून दुकाना बाहेर ओढला. नाहीतर त्या सिद्ध मुलाला मी तिथेच विचारणार होतो.
या गडबडीत पुस्तके घ्यायची राहिलीच की.
संध्याकाळचे रस्त्यावरचे लाइट लागले होते. पाऊस थोडा थोडा करून येतच होता. आईला काय वाटले कोणास ठाऊक तीने हातगाडीवर कढई ठेवून झार्याने त्या कढाईवर टण टण वाजवून "शेंग वल्ली भजकी ....शेंग वल्ली भाजकी" ओरडणार्या शेंगवाल्या कडून चांगले दोन दोन रुपयांचे दोन पुडे घेतले. मघाशी पावसात भिजून थंडगार पडलेल्या हाताना त्या शेंगाच्या गरम पुडक्याने ऊब आली. मी तो गरम गरम पुडा गालाला लावला. मस्त चटका नाही पण छान उबदार वाटले.
आईने तीच्या हातातला पुडा पिशवीत ठेवला. या शेंगा बाबाना . तो पुडा तुला. मी पुड्यातल्या चार गरम शेंगा काढून आईला दिल्या. आईने माझ्या हातातला पुढा किती गरम आहे याचा अंदाज घेतला आणि तो माझ्या शर्टच्या खिशात उपडा केला.
अर्धवट भिजलेल्या शर्ट मुळे वाजणारी थंडी त्या खिशातल्या गरम शेंगानी एकदम पार पळवून लावली.
पुढच्या आठवड्यात पुस्तंक आली आहेत का ते पहायला यायचं ते पाऊस येणार आहे हे बघूनच. हे ठरवूनच टाकले.
( क्रमशः )
प्रतिक्रिया
14 May 2018 - 10:15 pm | एस
छान सुरू आहे लेखमाला. त्या वयातलं भावविश्व सुरेख उलगडून दाखवलंय.
14 May 2018 - 11:40 pm | गवि
मस्त चालू आहे. नॉस्टॅल्जीया आणि डाऊन द मेमरीलेन.
16 May 2018 - 1:26 am | वीणा३
+१
15 May 2018 - 9:00 am | प्रचेतस
मस्तच
15 May 2018 - 9:02 am | शाली
झकास लिहिलय. मस्तच!
पुलंची आठवण झाली मधेच.
15 May 2018 - 4:15 pm | सस्नेह
अगदी शाळेतले दिवस आठवले .
15 May 2018 - 5:38 pm | सिरुसेरि
हा लेखही खुप छान लिहिला आहे .
16 May 2018 - 9:43 am | भीमराव
लहान होऊन लिहीलय राव
24 May 2018 - 10:54 pm | पैसा
सुंदर!
25 May 2018 - 9:38 pm | विजुभाऊ
पुढचा भाग http://www.misalpav.com/node/42660
6 Jul 2020 - 1:26 pm | चौथा कोनाडा
कसला खट्याळपणा हा ! :-)
व्वा, मस्त निरागस !
खुप सुंदर लेखमाला ! वाक्यावाक्याला वाचकाला लहान करून टाकते, त्याला बालपणाच्या, शाळा-आठवणींच्या गल्लीबोळातून फिरवून आणते !
7 Jul 2020 - 7:53 am | वामन देशमुख
एक नंबर!