मागील दुवा https://misalpav.com/node/42365
इतक्यात तिसरी घंटा झाली. गजेंद्रगडकर बाई ही वर्गात आल्या. सगळॅ जणगणमन साठी उभे राहिले. संपल्यावर खाली बसले. बाईनी उपस्थिती घेतली.
आमच्या डोक्यातून दप्तराचा विषय काही जात नव्हता. समोरचा रिकामा बेंच दुसरे काही सुचूच देत नव्हता.
सुदैवाने तो इतिहासाचा तास होता. त्यामुळे वही किंवा पुस्तकाची फारशी गरज पडणार नव्हती. खरेतर इतिहास हा विषय का शिकायचा असतो कोण जाणे. कोणत्यातरी राजाने कोणावर तरी आक्रमण केले आणि कोणाला फाशी दिली, कोणी उठाव करुन कोणाचे मुंडके उडवले.... सगळा इतिहास युद्ध आणि मारामार्यानी भरलेला. आणि आम्ही मात्र शाळेत जर्रा मारामारी केली की हेडमास्तरांकडे नाव जाणार. हा इतिहासाने वर्तमानावर केलेला अन्यायच आहे की. हे माझे मत मी एकदा गजेंद्रगडकर बाईना सांगणार आहे. त्यातून ती तहाची कलमे... एकवेळ युद्ध परवडले पण तहाची कलमे नकोत असे त्या पराभूत राजाप्रमाणे आम्हालाही वाटायचे. निदान ती कलमे त्या राजाला पाठ तरी करावी लागत नसायची. युरोपच्या कोणत्या तरी राजाने केलेल्या कसलाश्या सुधारणा ऐकत तो तास संपला.
पुढचा तास गणीताचा. याला पुस्तक नसले तरी पण वही आवश्यकच होती. टंप्याने उद्या परत करायच्या बोलीवर अज्याच्या वहीतून तीन पाने फाडून घेतली. आणि एक्या कडून एक पेन्सील उसनी घेतली.आत्तापर्यंत आमची दप्तरे गायब झाल्याची बातमी सर्वाना माहीत झाली होती. दोन तासांच्या मधल्या वेळेत जो तो आम्हाला दप्तर कसे गायब झाले हे विचारून जात होता. दप्तर कसे गायब झाले हे आम्हाला माहीत असते तर ते गायब व्ह्यायच्या वेळेसच आम्ही शोधले असते की. तुम्हाला हे प्रश्न विचारायची वेळच आली नसती.
दुसरा प्रश्न असायचा दप्तर नाही मिळाले तर काय करणार. या प्रश्नाचे उत्तर माहीत असते तर काय आमचे चेहेरे असे चिअम्तातूर असते का? ही पोरं ना उत्तरं सापडायला मदत करायच्या ऐवजी आम्हाला पडलेलेच प्रश्न परत परत विचारत बसली होती.
गणीताचे घाटे सर वर्गात आले. घाटे सर म्हणजे एकदम टॉप माणूस. नेहमी रुबाबदार, न चुरगाळलेली पँट, कडक इस्त्रीचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट , चपलांना पॉलीश , आख्ख्या वर्गाला ऐकू जाईल असा जोरदार आवाज, आणि स्पष्ट बोलणे. गणीत शिकवताना गमतीदार उदाहरणे सांगत शिकवणार. भरपूर हसायला मिळणार. गणीताचा तास असूनही मजा यायची.
सर वर्गात आले. त्यानी फळ्यावर काळ काम वेगाचे एक गणीत लिहीले. अ मजूर तीन तासात एक भिंत बांधतो ब तीच भिंत चार तासात बांधतो. तर दोघे मिळून किती तासात बांधतील.
तू रे तु उभा रहा. तू सांग.
ते कुणाला सांगताहेत हे बघण्यासाठी मी मागे वळून पाहिले. आमचा बेंच शेवटच्या ओळीत. आमच्या नंतर भिंतच. तरीही मागे वळून पाहिले.
हा तू तूच.
बापरे सर मलाच विचारत होते.
मी उभा राहिलो.
अ आणि ब या जागी तुम्हाला हवी ती नावे घ्या. आपण त्याना अन्याबा आणि भिमप्पा अशी नावे घेवूया.
हे एक बरे झाले. अ आणि ब ही काय माणसांची नावे असतात काय. आणि असल्या नावांची माणसे काम तरी काय करणार.
तर सांग बरं अन्याबा आणि भिमप्पा मिळून किती तासात भिंत बांधतील.
मी मनात म्हंटले. एकदा भिंत बांधून झाल्यावर पुन्हा कशाला बांधायची. पण घाटे सरांसमोर हे बोलायची टाप नव्हती. काय उत्तर शोधायचे ... दोन मजूर.... एक जण तीन तासात दुसरा चार तासात..... एकूण दोन मजूर.... एक अधीक एक दोन . तीन अधिक चार ... सात.
आमच्या पाटणच्या घरासमोर बांधकाम चालायचे तिथले मजूर भिंत बांधायच्या ऐवजी तंबाखू मळतानाच जास्त वेळा दिसायचे.
समजा हे अ आणि ब.. म्हणजे अन्याबा आणि भिमप्पा तसले तंबाखु खाणारे असतील तर ....
काय उत्तर मिळतंय का? घाटे सरानी मला विचार करायला वेळ दिला. " काही शंका असेल तर विचार"
सर एक शंका आहे? ते भिमप्पा आणि अन्याबा मजुर तंबाखु खाणारे नाहीत ना?
का रे?
नाही तंबाखू खाणारे असतील तर ते दोघे मिळुन तंबाखू मळत गप्पा मारत बसतील एक एकटे काम करताना गप्पा मारायला कोणी नसते त्यामुळे काम होते.
या शंकेत हसण्यासारखे काय होते कोण जाणे. घाटे सरांना प्रचंड हसू आले. पोट धरून ते हसत राहिले. सरच हसता आहेत म्हंटल्यावर सगळा वर्ग हसायला लागला. निमीत्तच हवं होतं कायतरी.
हे हसू थांबतय न थांबतय तोच दारात महादू शिपाई येवून उभा राहिला.
क्रमश:
प्रतिक्रिया
10 Apr 2018 - 9:50 pm | सस्नेह
हे काय ? इतक्यात संपला हा भाग ?
...ए नाय चोलबे...
10 Apr 2018 - 11:38 pm | रातराणी
:) मजा येतेय. पुभालटा!
11 Apr 2018 - 12:38 am | स्पार्टाकस
धमाल आहे!
पुढचा भाग टाका लवकर!
11 Apr 2018 - 6:13 am | विजुभाऊ
पुढचा भाग
https://misalpav.com/node/42384
17 Apr 2018 - 4:56 pm | पैसा
=))
1 Jul 2020 - 5:33 pm | चौथा कोनाडा
हा .... हा ... लय खरपुस .... भारी लिहिलंय !