काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या!
काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या!
फेसबुकवर पोस्ट वाचली....मुसलमानांनी नेहेमीच हिंदूंना.... वगैरे वगैरे. दिल्लीच्या उन्हाळ्यात टळटळीत दुपारी जामा मस्जिदीत गेलो... अचानक अकल्पित घुमलेल्या अजानच्या आवाजानी अंगावर सरसरून काटा आला. जागीच गुढघ्यांवर बसलो... पुढची काही मिनिटं मंत्रमुग्ध अवस्थेत गेली. मला माझा अल्ला दिसला! बाकी तुमचं चालू द्या!
मध्ये पेपरात एका नेत्याने म्हणल्याचं वाचलं... बाबासाहेबांनी मनुवाद्यांच्या विचारांवर....वगैरे वगैरे. बाबासाहेबांचं Annihilation of Caste वाचलं. त्या महामानवाच्या विचारांचा आवाका आणि अभ्यास वाचून थक्क झालो... त्यांची अजून खूप पुस्तकं वाचायची आहेत.... बाकी तुमचं चालूद्या!
मोदींनी देशाची वाट लावली... ६५ वर्षांत काँग्रेसने जितकं लुटलं नाही त्याहीपेक्षा जास्त....वगैरे वगैरे. २६ जानेवारीला परेडच्या वेळी त्या माणसाची देहबोली बघून खूप छान वाटलं. आपल्या सेनेची ताकद बघून अभिमान वाटला.... आपल्या प्रगतीचं कौतुक वाटलं.... बाकी तुमचं चालूद्या!
श्रीदेवीच्या जाण्यानंतर अपघात की घातपात... प्लास्टिक सर्जरी ... लाईफस्टाईल मेनटेन करण्यासाठीचा ताण ... तिच्या इन्श्युरन्सचे पैसे...वगैरे वगैरे. इंग्लिश विंग्लिश पुन्हा बघितला... इतक्या गुणी कलाकाराचा असा दुर्दैवी आणि अकाली अंत झाल्याचं वाईट वाटलं... डोळ्यांच्या कडा पाणावल्या.... बाकी तुमचं चालूद्या!
सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ह्या जातीयवादी सरकारला... वगैरे वगैरे. गेल्या वीकेंडला आमच्या शाहीनभाभीला मुद्दाम हलीम - खिचडा बनवायची फर्माईश केली. त्या माउलीनेसुद्धा प्रेमाने खाऊ घातलं. वकार बरोबर मस्त गप्पा झाल्या...खाण्याचा चट्टामट्टा झाला... बाकी तुमचं चालूद्या!
ही परप्रांतीय लोकं... बाहेरून येऊन आपल्या मराठी हक्कांची पायमल्ली... वगैरे वगैरे. गाझियाबादमधल्या माझ्या घरी मुखर्जी, सिंग, यादव, मल्लिकार्जुन, अनासपुरे, खान कुटुंबियांची गणपतीच्या आरतीला आवर्जून हजेरी असायची... अजूनही उकडीचे मोदक मिस करतो असं सांगतात... बाकी तुमचं चालूद्या!
ह्य गोर्यांनी नेहेमीच भारतीयांना हीन वागणूक... वगैरे वगैरे. आमच्या काळ्या माइकने होसेरा मॉस्टीरोला वडापावातून कच्ची हिरवी मिरची खायला घातली. होसेराला ब्रह्मांड आठवलं आणि तो माइकला अस्सल स्पॅनिशमधून शेलक्या शिव्या घालायला लागला... किम आणि मी हसून हसून लोळलो.... बाकी तुमचं चालूद्या!
आपल्याला एकमेकांपासून वेगळं करणार्या हजार गोष्टी आहेत. पण माणूस असणं ही एक गोष्ट आपल्याला एकत्र आणायला पुरेशी नाही का? आम्ही कोणी "अल्लाहू" म्हणालं की "अकबर" म्हणणार... कोणी "जो बोले सो निहाल" म्हणालं की "सत श्री अकाल" म्हणणार... कोणी "गणपती बाप्पा" असं ओरडलं की "मोssssssरया" असा प्रतिसाद देणार.. कोणी "भारत माता की" म्हणालं की "जय" म्हणणार आणि "वंदे" ला "मातरम" म्हणणार! बाकी तुमचं चालूद्या!
जे.पी.मॉर्गन
प्रतिक्रिया
19 Mar 2018 - 8:36 am | प्राची अश्विनी
सौ टके की बात ! आवडलीच.
19 Mar 2018 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार
असं कसं? असं कसं? तुम्ही दोन्ही बाजूनी बोलताय कारण तुमच्यावर त्यांनी कब्जा केला आहे. आम्ही तुम्हाला यातुन बाहेर पडायला मदत करु. कारण तुम्ही आमचे आहात पण ते बाकीचे आपले नाहीत. त्यांच्या पासून सावध रहा.
(पण जर का तुम्ही बर्या बोलाने आमच्या बाजूला आला नाही तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करुन सोडू)
पैजारबुवा,
19 Mar 2018 - 9:58 am | पगला गजोधर
आज बगलमें छुरी मूहमें झुटी बंधुभाव राम जपके,
सौ सौ चूहे खाय के बिलारी बैठी तप के ॥
19 Mar 2018 - 9:59 am | पगला गजोधर
आणि हो हे राहिलेच...
.
"बाकी तुमचें चालूं द्या"
19 Mar 2018 - 10:25 am | अभ्या..
सायीची ढेकर.
वामकुक्षीत व्यत्यय आणू नका रे,
बाकी तुमचं चालू द्या.
19 Mar 2018 - 10:47 am | माहितगार
नेमका प्रतिसाद, शहामृगाने धूराकडे किती लक्ष द्यावे किती देऊ नये असा काहीसा प्रश्न पडला .
19 Mar 2018 - 10:28 am | अभ्या..
सायीची ढेकर.
वामकुक्षीत व्यत्यय आणू नका रे,
बाकी तुमचं चालू द्या.
19 Mar 2018 - 10:45 am | श्रीगुरुजी
निधर्मी आणि पुरोगामी विचारवंताचे लेखन वाटते.
बाकी तुमचं चालू द्या!
19 Mar 2018 - 2:27 pm | चांदणे संदीप
मला तर आवडलाच... बाकी तुमचं चालूद्या!
Sandy
19 Mar 2018 - 3:12 pm | सस्नेह
..छान चाललंय की !
....चालू द्या..!
19 Mar 2018 - 8:13 pm | गामा पैलवान
केरळात गेल्या दोन वर्षांत संघाचे १००+ लोकं ठार मारले गेलेत. मग काय झालं, लोकशाहीची इतकी छोटी किंमत मिज्लीच पाहिजे. बाकी तुमचं चालू द्या.
त्रिपुरात भाजपला मतदान केलं म्हणून एका बाईला ठार मारलं? अरे वा! विरोधकाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचं इतकं सुंदर उदाहरण दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार. बाकी तुमचं चालू द्या.
श्रीनगरात तीन मुलांची आई गिरीजा टिक्कू आपला पगार घ्यायला कचेरीत आली होती. तिला छानपैकी उभी कापली. जांघेपासून सुरुवात करून डोक्यापर्यंत करवत फिरवत नेली. हृदयापर्यंत पोहोचेस्तोवर जिवंत होती. हृदय चिरल्यावर मग मेली. अंमली पदार्थांच्या नशेतच असा नितांतसुंदर कलाविष्कार बघायला मिळतो. बाकी तुमचं चालू द्या.
-गा.पै.
20 Mar 2018 - 6:55 am | सुखीमाणूस
हिन्दुत्व वादी ह्या अतिरेकी बातम्या पसरवतात असा म्हणाव तर
जाणते राजे मुम्बैत खुलेआम खोट बोलतात का तर दंगली होऊ नयेत. मुसलमान सुरक्षित रहावेत. (सन्दर्भ मुम्बै बॉम्ब स्फोट)
याच धर्तीवर वरील गोष्टी घडल्या असतील आणि दंगलीला कारण नको म्हणुन बाहेर येऊ दिल्या नसतील.
ज्याने त्याने स्वताचा जीव वाचवावा हेच खरे
चालू द्या सगळ्यांचच चालु द्या....
20 Mar 2018 - 2:08 am | पिवळा डांबिस
आवड्लं.
दोन्ही बाजूच्या कट्टरवादी कलकलाटात अंमळ सुखद गारवा देऊन गेलं.
धन्यवाद.
20 Mar 2018 - 1:05 pm | Ram ram
प्रिय गा,पै,गिरीजा टिक्कू प्रकरणाची लिंक द्याल का?
20 Mar 2018 - 3:56 pm | प्राची अश्विनी
Girija Tickoo हे स्पेलिंग टाकून Google search करा.
20 Mar 2018 - 1:07 pm | Ram ram
जन्त राजा विषयी सविस्तर लिवा
20 Mar 2018 - 5:27 pm | टवाळ कार्टा
"जन्त" राजा =))
20 Mar 2018 - 1:08 pm | Ram ram
जन्त राजा विषयी सविस्तर लिवा