#कटींग_पाटली_व_हिप्पीकट
लहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची. नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे. एकदा हा वस्तारा हातात आला की परत डोक्याला वाटेल तसे वाकवून होई कधी या वस्तऱ्यातुन एकदाची मुक्ती होते असे वाटायचे. कसे बसे एकदा हे वस्तरा पुराण संपले की मग सर्व शरीर झटकल्या जाई. मग ते केसाने माखलेले शरीर घरी आई च्या तावडीत जायचे. कटिंग करून काय आलो फार गुन्हा करून आल्यासारखे वाटायचे, या सर्व विधिंविषयी मला काही आक्षेप नव्हता, होता तो फक्त त्या खुर्चीवर पाटली टाकन्याचा. कधी एकदाचे आपण मोठे होतो व थेट खुर्चीवर बसून कटिंग करण्यास पात्र होतो असे सतत वाटायचे. त्या खुर्ची वर बसून मागच्या टेक्यावर आपले डोके टेकवायचं व कटिंग वाल्याने आपल्याला विचारत विचारत केस कापावे हे माझे तेव्हाचे स्वप्न होते. त्यावेळी मना सारखी हेयर कट ठेवण्याचे स्वातंत्र नव्हते. मी साधारण तीसरी मधे असेल, आम्ही त्यावेळी परतवाडाला राहत होतो, हिप्पी कट ची फैशन आली होती. देव आनंद च्या हरे कृष्ण हरे राम चा तो काळ होता. अमिताभ सारखे काही स्टार्स हिप्पी कट ठेवायचे. हिप्पी ठेवली तर पाटलीवर बसून कटींग करण्याच्या मानहानीला तेवढ़ीच अनुकम्पा मिळू शकेल असे मला वाटायचे. माझा मोठा भाऊ त्याकाळी महाविद्यालयात होता त्यामुळे दादाला असलेले स्वातंत्र आपल्यालाही मिळावे असे मला वाटायचे. शिवाय हिप्पी कट ठेवली की आपण या तरुण मुलांच्या गँग मधे हक्काने शामील होऊ असा माझा ग्रह होता. बाबा पोलिस विभागात त्यामुळे त्यांचा लांब केस ठेवन्यास भारी विरोध होता. मोठा भाऊ महाविद्यालयात गेल्या मुळे व तो अमरावतीला असल्यामुळे असेल कदाचित परंतु त्याला मात्र बाबांनी विरोध केला नव्हता. एकदा घरी बरेच आंदोलन केले, रडा-रडी फुगणे वैगरे प्रकार केले, तात्पुरता अन्नत्याग केला. परंतू बाबाला काही मागणी पटत नव्हती, शेवटी आई ने मध्यस्थी केली व बाबा हिप्पी कट साठी एकदाचे राजी झाले. त्या दिवशी मी कटिंग साठी पहिल्यांदा एवढा खुश होतो. आईचे तर सर्व लहान सहान कामे मी पटापट केली, जशी शेजारच्या काकूचे उसने आनलेले जिन्नस परत करने इत्यादी. त्या दिवशी कटींग वाल्या काकाच्या पाटलीवर मी खुशीत जाऊन बसलो. त्यांना वाटेल त्या दिशेने वाटेल तसे डोके दाबू दिले एकदम सहकार्य केले. एकदाची हिप्पी कट झाली. कटिंग करून येताना माझी देह बोली पार बदलून गेली होती, आता आपल्याला मोठ्या मुलांच्या गोष्टीत थेट सहभागी होता येइल असे वाटू लागले. मानेवर व कानावर येणाऱ्या त्या गुंडाळा झालेल्या केसांचे मला भारी कौतुक वाटत होते. त्या दिवशी काकाने पहिल्यांदाच डोक्याच्या मागे आरसा धरून माझे गोल गोल केलेले केस दाखवले. (मी पूर्ण सहकार्य केल्यामुळे असेल कदाचित) कान व मानेवर आलेले ते केस मिरवत मी माझ्याच तोर्यात होतो, परंतु माझा मानभंग दुसऱ्याच दिवशी झाला. मोठ्या मुलांनी एका खेळात मला कच्चा नींबू केले. कच्चा नींबू हा प्रकार फार विचित्र, बिन खात्याच्या मंत्री सारखा. खेळात स्थान तर मीळे परंतू आपल्या सहभागाची फारशी दखल घेतल्या जात नाही. लहान मुलांनी घरी जाउन आईचे डोके खाऊ नये व आपल्या खेळात काही विघ्न येवू नये म्हणून मोठ्या मुलांनी केलिली सोय म्हणजे कच्चा नींबू होय. याशिवाय बारीक चिरीक कामे करण्यासाठी ही बारकी पोर कामी येत होती. अलीकडे सरकार स्थापन्यात देखील या तत्वाची मदत होते. हिप्पी कटचा मोठ्या होण्यात फरसा उपयोग दिसत नव्हता. शाळेत मास्तरच्या हातात सहजच केस लागत होते त्यामुळे मिळू नये त्या गुन्ह्याची सुद्धा शिक्षा मिळू लागली होती. लांब केस असणारी मूलं बदमाशी करण्यात आघाडीवर असतात असा बहुतेकांचा समज असतो. जसे चश्मा असणारी मूलं हुशार असतात असे बऱ्याच लोकांना वाटते पुढे दहावीत मलाच चश्मा लागला व हा गोड गैरसमज माझ्यासह इतरांचा देखील दूर झाला. हिप्पीकटचे फायदे तर काही दिसत नव्हते परंतु तोटे जागोजागी जाणवत होते. मित्रांचे आई वडील वेगळ्याच नजरने पाहू लागले, शाळेत गुरूजीला जसे शस्त्र मिळाले होते तसेच घरी बाबालाही त्यांचा राग शांत करण्यास "केस" हाती लागली होती, तसेही त्यांच्या मनाविरुद्धच मी कटिंग केली होती.
या नंतर मात्र मी हिप्पी कट केली नाही एवढेच काय तर बरेच वर्ष म्हणजे (खरच मोठे होई पर्यंत) लांब केस सुध्दा ठेवले नाही. आज मुलाला कटिंग साठी घेवून गेलो कटिंगवाल्याने मुलाला पाटलीवर बसवले, मी मात्र मुलाकडे उगीच सहानभुतीने पाहू लागलो.
सुधीर वि. देशमुख
रविवार
16/7/17
प्रतिक्रिया
8 Aug 2017 - 9:41 pm | ज्योति अळवणी
छान
8 Aug 2017 - 10:06 pm | पैसा
आवडले!
8 Aug 2017 - 10:54 pm | सौन्दर्य
सुंदर व खुसखुशीत लेख. आवडला.
9 Aug 2017 - 3:55 am | कंजूस
पाटली सुटली अन लॅालिपॅाप गेला ( आमचा न्हावी देत असे.)
मजेदार लेख.
9 Aug 2017 - 8:05 am | चामुंडराय
या निमित्ताने एक आठवण झाली. माझ्या लहानपणी तर पाटली देखील नशिबी नव्हती. आमच्या घराजवळ म्हणजे आमच्या आळीत एक न्हावी काका राहायचे. ते कोठेतरी नोकरी करीत मात्र दर रविवारी त्यांच्या अंगणात आजूबाजूच्या पोरासोरांची आणि बाप्या मंडळींची वयपरत्वे दाढी आणि कटिंग करीत. त्यांच्याकडे जाऊन गोणपाटावर मांडी घालून बसावे लागे. ते समोर उकिडवे बसत आणि अस्मादिकांचे डोके भादरत. म्हणजे अक्षरशः भादरत कारण केस किती बारीक कापायचे याबद्दल त्यांना माझ्या आईची सक्त ताकीद असे आणि ते त्या आज्ञेचे अगदी निष्ठेने पालन करीत. तेथे माझी काहीही मात्रा चालत नसे. सलून मधला न्हावी केस कापताना तुमच्या भोवती फिरतो, इथे मात्र न्हावी काका एकाच जागी बसत आणि मलाच वेगवेगळ्या दिशांना फिरवीत. खालच्या गोणपाटावर पडलेले केस खालुन बुडाला टोचत आणि वरती मानेला, गळ्याला कापलेले केस टोचत. त्यांच्या कडे एक छोटा आरसा असे. केस कापल्या नंतर मी कधीच त्यात बघण्याचे धाडस करीत नसे. एकदा मी हट्टाने त्यांना नेहेमी पेक्षा मोठे केस ठेवायला लावले. ते तयारच नव्हते परंतु मी फारच हट्ट केल्यावर मोठ्या नाखुशीने तयार झाले. केस कापून झाल्यावर माझ्या आनंदी चेहऱ्याकडे बघून त्यांनी "तू परत येशील" अशी शापवाणी उच्चारली आणि ती लवकरच खरी झाली. मी घरी गेल्यावर माझे मोठे केस बघून आईचा रागाचा पारा असा काही उसळला कि तिने दुसऱ्यांदा माझी हजामत सुरु केली आणि तात्काळ न्हावी काकांकडे जाऊन केस बारीक कापण्याचे फर्मान सोडले. मी निमूटपणे काकांसमोर जाऊन उभा राहिलो. त्यांनी ओळखले आणि माझ्याकडे बघून छद्मीपणे हसून म्हणाले "बघ, मी सांगितले नव्हते". त्या दिवशी एका दिवसात माझी तिसऱ्यांदा हजामत झाली आणि त्या रागात न्हावी काकांनी नेहमी पेक्षाही बारीक केस कापून माझ्यावर सूड उगवला.
पुढे मोठं झाल्यावर कटिंग सलून मध्ये जायला लागलो तेव्हा त्या गोल फिरणाऱ्या खुर्च्या, सगळ्या भिंतींवर लावलेलं मोठ्ठे आरसे, ते पाणी मारायचे फवारे, वेगवेगळे क्रीम्स, तेलं यांचे सुगंध, विविध प्रकारच्या कात्र्या, कंगवे, केस कापायचे मशिन्स, रेडिओवर चालू असणारी गाणी हे सगळं बघितल्या वर एका मोहमयी दुनियेत आल्या सारखे वाटे.
माझ्या शाळेतील एक शिक्षक "ताजी" देण्या बद्दल प्रसिद्ध होते. सोमवारी कटिंग करून आलेल्या सगळ्या मुलांना ते पुढे, फळ्याजवळ बोलवीत. वर्गासमोर मान खाली घालून ओळीने उभे करीत. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताने वस्तऱ्याला धार काढावी तशी ऍक्शन करीत आणि डोक्याच्या मागच्या बाजूला सटकन चापट मारीत. त्याला ते ताजी म्हणत. अख्या शाळेत ते ताजी मास्तर या नावाने प्रसिद्ध होते.
9 Aug 2017 - 9:16 am | sudhirvdeshmukh
छान अनुभव लिहलाय
9 Aug 2017 - 7:45 pm | गुल्लू दादा
अगदी अगदी असच होत लहानपणी.
9 Aug 2017 - 7:45 pm | गुल्लू दादा
अगदी अगदी असच होत लहानपणी.
10 Aug 2017 - 3:01 pm | एकविरा
लहानपणी गावी भाऊ किंवा चुलत भावांची अशी कटिंग पहिलीय . पूर्वी गावी शेतातला भात देवून केस कापले जात . त्यात लहान मुलांचे केस एका ठराविक पद्धतीचेच असत . म्हणून आजही कुणाचा हेअर कट नीट झाला नाही की आमच्या कड़े चिड़वातात काय रे भातावर केस कापलेस का ?
11 Aug 2017 - 8:11 pm | सूड
सुंदर!! माझ्या केसांचा एकंदर रागरंग बघता 'बारीक करा' येवढंच सांगण्यात येई. त्यात न्हाव्याचा निम्मा वेळ केसांचा गुंता सोडवण्यात जाई. अमुक असे कापल्यावर आपले केस त्यातल्या त्यात बरे दिसतात हे कळायला लागल्यावर बारीक वरुन गाडी मिडीयम वर आली. आता पर्यंत निव्वळ दोन नाभिकांनी केस मनासारखे कापले.. त्यामुळे आता ठरलेला न्हावी नसेल तर केस कितीही वाढले तरी कापत नाही.
12 Aug 2017 - 6:48 am | sudhirvdeshmukh
अभिप्रायासाठी सर्वांचे आभार !