स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?
अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते.
कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे. वगैरे.
यापुढे, 'अमुक केलं पाहिजे, घाव घातले पाहिजेत, पावलं उचलली पाहिजेत' वगैरे बोलायचंच नाही. दिवाणखान्यात बसून लेक्चर देणार्यांना समाज बदलता येत नाही. आपल्याला जे योग्य वाटतं ते आपणच करायचं. आपलं बघून आणखी चौघींना बळ येईल.
साधारण पंधरा वर्षापूर्वी बी.बी.सी. वर तामिळनाडूमधील स्त्रीहत्येवर डॉक्युमेंटरी दाखवली गेली होती. स्त्रीभृणहत्या नव्हे हं! स्त्रीहत्या! एका आजीनी कॅमेर्याला सांगितलं होतं, “हो. मी माझ्या तान्ह्या नातीला मारलं. पाण्यांत बुडवून! ती आम्हाला नकोशी झाली होती म्हणून नाही. पण तिचं आयुष्य माझ्यासारखंच जाणार! असं असह्य जीवन वाट्याला येण्याआधीच मी तिची सुटका करून टाकली. द्या फाशी नाहीतर टाका तुरुंगात. नवरा दारुडा, पोरगा पण तसाच. रोजची उपासमार, वर मारहाण. त्याच्यापासूनही सुटका होईल माझी. तुरुंगात दोन वेळची भाकरी देखील नशिबी येईल.”
माझ्या डोक्यात विचार आला, आजीबाई इतकी जिवावर उदार झाली होती, तुरुंगातही जायला तयार होती तर त्या दारुड्या नवर्याच्या डोक्यात झोपेत का होई ना, दगड घालायची हिम्मत का झाली नाही? त्या भीतीनी एखादेवेळेस मुलाची दारू देखील सुटली असती. नातीचं ही भाग्य उजळलं असतं! मर्दुमकी दाखवायची ती त्या असहाय्य जिवावर? आणखी एक नात झाली तर? आणि आणखी एक?
नवर्याला धडा शिकवण्याची तिची छाती का झाली नाही याच्या कारणातच स्त्रीभृणहत्येच मूळ दडलेलं आहे. दडलेलं नाही म्हणा, उजळ माथ्यानं वावरतंय.
बळी तो कान पिळी हा निसर्गाचा नियमच आहे. जंगलात, समुद्रात, वाळवंटात, डिस्कवरीत आणि नॅशनल जॉग्रफिकमध्ये या वास्तवाचं भयाण दर्शन घडतं. हे खरे रिऍलिटी शोज् . इथे अभिनय नाही, रीटेक नाहीत, मॅच फिक्सिंग नाही, खोटे अश्रू नाहीत की आधी टेप केलेलं हास्य नाही. त्या अवस्थेत मानवजात होती तेव्हांपासून पुरुष जातीचा स्त्रीवर वरचष्मा आहे.
आता शारिरिक शक्तीची जरूर तर राहिली नाहीच, उपयोगही फारसा राहिला नाही. कालबाह्य झाला तरीही हा वरचष्मा काही नाहिसा झाला नाही. का बरं नाहिसा होईल? आजपर्यंत कोणी आपणहून राजसिंहासन सोडलंय्?
पूर्वी मुलींना शिक्षण नव्हतं, कमाई नव्हती, हक्क नव्हते. त्यामुळे लग्नाच्या वेळी मुलीच्या आईबापांची धुलाई करण्याची प्रथा सुरू झाली. आता मुली बरोबरीनी शिकल्या, कमवायला लागल्या. सरकारनी त्यांना बरोबरीने हक्क दिले (निदान हिंदू मुलींच्या बाबतीत तरी. बाकीच्यांना कितपत आहेत याचा माझा अभ्यास नाही. दिले असतील अशी आशा). धुलाई कमी झाली पण थांबली नाही. आज कित्येक लग्नात खर्च अर्धा अर्धा केल्याचं ऐकू येतं पण नेहमीच त्याचं कारण ‘मुलाकडच्यांनीच ती ऑफर दिली’ असं असतं. मुलीकडच्यांनी नेटानी हे करवून घेतलं अशा केसेस् असतील नक्कीच, पण माझ्या बघण्यात तरी नाहीत.
“पोरीचं लग्न एकदाच तर करायचय्. पैसे कमावले आहेत ते तिच्यासाठीच ना”, असं प्रत्येक जण आपल्या निर्णयाचं पुष्टीकरण देतो. पण तेव्हां त्यांच्या हे लक्षांत येत नाही की आपल्या आधी कोट्यवधी वधुपित्यांनी असाच विचार केला. त्याच बीजाचा विषवृक्ष झाला आहे. त्याच्याच फांद्या म्हणजे हुंडा, एकतर्फी मानपान, आणि शेंडेफळ आहे स्त्रीभृणहत्या!
किती तर्कशून्य आहे बघा! आपल्याला माहीतच आहे की ज्या वस्तूचा सुळसुळाट असतो तिची किंमत पडते. जिचा तुटवडा असतो तिची वाढते. आज हजार मुलांमागे साडेआठशे ते साडेनऊशे मुली आहेत. (वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आकडे). आकड्यांचा रेटा फार जबरदस्त असतो. त्यानुसार आपला भाव चांगलाच वधारायला हवा होता. नाही का? तसं का झालं नाही? आपलाच आत्मविश्वास कमी पडला. वरमाई असताना आपल्या आवाजातली फेक आणि वधुमाई असताना यात आपणच फरक पडू दिला. “निष्कारण दुय्यम भूमिका आम्हाला मान्यच नाही” असं आम्ही खडसावून सांगू शकलो नाही.
१९६०च्या दशकात अमेरिकेत ‘विमेन्स लिबरेशन’ या चळवळीनी चांगलंच मूळ धरलं. १९८५ साली त्यांतल्या एका अग्रगण्य महिलेने (तिचं नाव आता मला आठवत नाही) असं विधान केलं की “आमच्या चळवळीची दिशा पुढे पूर्णपणे चुकलीच. आम्ही स्त्रीच्या स्त्रीत्वाचा, अस्मितेचा आदर समाजाकडून व्हावा म्हणून ही चळवळ उभी केली. मात्र पुढे आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलो. आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो. नकळत एका प्रकारे आम्ही अशी पावतीच दिली की पुरुषाचं काम आमच्या कामापेक्षा जास्त challenging and fulfilling आहे. आता मात्र हे बदलायला हवं.”
पण आता हे बदलणं शक्य नव्हतं. त्या कामातलं आव्हान, मिळणारं समाधान, आर्थिक बळ आणि त्यामुळे येणारं स्वातंत्र्य यांचा स्त्रियांना चसका लागला होता. चिमणीची आता घार झाली होती. पंखात शक्ती आली होती, नजर तीक्ष्ण झाली होती, चोच धारदार झाली होती. घरट्यातली जागा आता पुरेशी वाटत नव्हती.
मात्र एक उणीव राहिली. अजूनही आहे. तिचं मन चिमणीचंच राहिलं. आपण घार झालो आहोत हे तिला अजून माहीतच नाही कारण तिला कुणी आरसा दाखवला नाही. तिला अजूनही असंच वाटतं की कावळा आपल्याहून बलवान आहे. ज्या दिवशी तिला तो आरसा सापडेल त्याच दिवशी जोडाक्षरांचा बाप असलेला हा शब्द ‘स्त्रीभृणहत्या’ इतिहासजमा होईल.
प्रतिक्रिया
24 Jun 2016 - 10:04 am | क्रेझी
शब्दरचना आवडली.
पण हा विषय खुपच चोथा झाला आहे त्यामुळे त्यात नविन असं काही वाटलं नाही.
24 Jun 2016 - 10:07 am | टवाळ कार्टा
अप्रतिम
24 Jun 2016 - 10:34 am | बोका-ए-आझम
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.
24 Jun 2016 - 11:07 am | अजया
आपल्याकडच्या स्त्री भृणहत्येचं मूळ स्त्री ने स्वतःला कमी लेखण्याच्या मानसिकतेतून आहेच.तसंच स्वतःच्या ताकदीच्या शक्यता न आजमावता येणे,न अजमावणे,गृहित धरणे यातही आहेच.तसंच आपल्या समाजातली प्रचंड हिपाॅक्रसीदेखील यात कारणीभूत आहे.
अनेक लोकांचे स्वार्थ स्त्रीभृणहत्येत बांधले गेले आहेत.कोणाला वंशाचा दिवा हवाय,कोणाला सोनोग्राफीचे पैसे तर कोणाची अॅबाॅर्शन प्रॅक्टिस :( यात ती शेळी अजूनही जिवानिशी जातेच आहे हे सर्वात वाईट :(
24 Jun 2016 - 11:13 am | अत्रे
लेख आवडला.
इथल्या 'वर-वधूंच्या अपेक्षा वाढल्या आहेत का' या लेखावरची चर्चा वाचावी.
24 Jun 2016 - 12:59 pm | मराठी कथालेखक
लेखात स्त्रीभ्रुणहत्येच्या कारणापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला पण मूळ कारणापर्यंत तुम्हि पोहोचला नाही.
हुंडा हे मूळ कारण आहे ? नक्कीच नाही... हुंडा प्रथेच्या मुळाशी जाण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला दिसत नाहि.
स्त्रियांची काहीशी कमी असणारी शारिरिक ताकद हेही कारण नाही. (काहीशी हा शब्द महत्वाचा. प्रत्येक स्त्रीची प्रत्येक पुरुषापेक्षा ताकद कमी आहे असं नक्कीच नाही.)
मूळ कारण फार साधे आणि सोपे आहे. ते मानववंशाच्या इतिहासात दडलेले आहे.
आपण मानवी इतिहासाच्या त्या पानावर जावू (किती हजार वा लाख वर्ष मागे ते मी सांगू शकत नाही , मानववंशशास्त्रज्ञ सांगू शकतील)
माणूस हा एकमेव प्राणि असा आहे ज्यात नर हा मादीवर बलात्कार करु शकतो.
बलात्कारामुळे नको असलेली संतती निर्माण होवू शकते.
मानवाच्या एकूणच शारिरिक क्षमता काहीशा कमी असल्याने संततीचे संरक्षण व पालणपोषण यासाठी स्त्रीला पुरुषाच्या मदतीची गरज पडते , पुरुषाचीच का ? तर इतर स्त्रीया सुद्दा त्यांच्या संतती सांभाळण्यात व्यस्त आहेत. आता पुरुष स्त्रीला का मदत करेल ? ती संतती त्याची असेल तरच. म्हणजे याकरिता तो स्त्रीकडून योनिशुचितेची हमी मागणार आणि बदल्यात तिला व तिला आपल्यापासूनच झालेल्या संततीला संरक्षण पुरविणार. मग या संरक्षणाकरिता तो स्वतःच्या अटी तिच्यावर लादणार (तैनाती फौजेच्या अटी :) उदा: मी फक्त माझ्याच संततीस संरक्षण पुरवीन पण एकूणातच तू माझ्याशिवाय इतर पुरुषांची संतती जन्माला घालायची नाहीस, नाहीतर मी माझ्याही संततीला वार्यावर सोडून देईन. यातून योनिशुचितेचे महत्व अतोनात वाढले.
याठिकाणी हे लक्षात घ्या की जशी एकटी स्त्री सर्व संततीचे रक्षण वा पालनपोषण करण्यास पुर्णपणे समर्थ नाहीये. पण स्त्रीने अपत्याला जन्म दिला तर ति त्याला वाढवणे ही स्वतःची जबाबदारी समजत आहे, तर पुरुष ते सक्तीचं मानत नाही. झालंच तर पुरुषाची अपत्यनिर्मीतीची क्षमता स्त्रीच्या तुलनेने अफाट आहे (जवळपास रोज एका स्त्रीला तो गर्भधारणा घडवून आणू शकतो , तेही अगदी म्हातारा होईपर्यंत) त्यामूळे त्याला अपत्याची तितकीशी फिकीर नाही.
या सर्वातून काहीच मार्ग नाही का ? स्त्रीला मुक्ती मिळणार नाही का ? प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या वा स्त्रीहत्या का होत नसतील ? असे प्रश्न पडू शकतात त्यांची उत्तरे पण विचारांती मिळू शकतील.
स्त्रीला बलात्कारापासून संरक्षण देणे हे प्रगत कायद्याचे आणि कायद्याच्या रक्षकांचे काम आहे. पण ते १०० % यशस्वी होईल असे नाही. अगदी पाश्चात्य देशांतही बलात्कार होतातच (प्रमाण कमी असेल कदाचित)
बलात्कारापासून नको असलेली संतती ? हो यापासून मुक्ती मिळालीये... गर्भनिरोधाची वा गर्भपाताची साधने यांमुळे नको असलेल्या संततीच्या धोक्यापासून स्त्रियांना मुक्तता मिळालेली आहे.
मग आता नेमकी अडचण काय आहे ? तर योनिशुचितेचे अतोनात महत्व, त्यातून सतत असलेले बलात्काराचे भय आणि या भयापोटी पुरुषाकडे संरक्षण मागण्याची मानसिकता आणि मिळालेल्या संरक्षणाच्या (?) मोबदल्यात वाटेल त्या अटी स्वीकारण्याची तयारी.
योनिशुचितेचे महत्व आणि बलात्काराची धास्ती झुगारली तरच स्त्री खर्या अर्थाने स्वतंत्र होईल. "जर माझ्यावर कधी दुर्देवाने बलात्कार झालाच तर मी पोलीस तक्रार करेन, दवाखान्यात जाईन , आवश्यक ते उपचार घेइन, एक दोन दिवस आराम करेन हवं तर आणि मग कामाला लागेन... गरज पडेल तशी न्यायालयात वगैरे जाईन. किंवा मी अविवाहित असली तर माझ्या मर्जीने मला आवडणार्या पुरुषाशी संबंध ठेवू शकते, ती माझी आणि त्याची खासगी बाब असेल आणि जरी कधी कोणत्याही कारणाने ही बाब जगासमोर उघड झाली तरी त्याने माझी बदनामी झाली अस मानायचं काही एक कारण नाही" एक स्त्री स्वतःची व स्वतःच्या मुलीची अशी मानसिकता घडवू शकते का ? नसेल तर 'स्त्री स्वातंत्र्याबद्दल' बोलणे व्यर्थ आहे.
बाकी हुंडा प्रथा वगैरे वरवरची धूळ आहे फुंकर मारली तरी उडून जाईल.
24 Jun 2016 - 1:54 pm | नेत्रेश
१. प्राण्यांमध्ये ही रेप होतो, विषेशतः एप्/चिंपांझी सारख्या पुढारलेल्या प्राण्यांच्यात. (थोडा गुगल सर्च केलात तरी खुप माहीती मिळेल)
२. प्रगत देशात स्त्रीभ्रुणहत्या होत नाहीत याचे कारण त्या देशांमधे एकतर भ्रुण हत्या संपुर्ण बेकासदेशीर असते,
किंवा ती करणे जवळ जवळ अशक्य केलेले असते. मग गर्भधारणा बलात्कारापासुन झालेली असो, वा ती स्त्री मरणाच्या दारात असो. जो पर्यंत गर्भाच्या हृदयाचे ठोके चालु आहेत तो पर्यंत डॉकटर त्याला टच करत नाहीत. भलेही ती स्त्री मेली तरी चालेल. आणी हे सर्व पुढारलेल्या देशांत होते.
ही पहा अमेरीकेत काय स्थीती आहे:
३.
हे अत्यंत चुकीचे वीधान आहे. पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा जीथे योनिशुचितेचे फारसे महत्व नाही तीथे ही बलात्कार हा स्त्रीला तेवढाच उध्वस्त करणारा असतो. तो आत्मा आणी आत्मसन्मान यांची न भरुन येणारी हानी करणारा पाशवी हल्ला असतो. दोन दीवस आराम करुन भरुन येणारी जखम नसते. त्यामुळे शेवटचा परीच्छेद हा बलात्कार पीडीतांच्या दु:खाविषयी खुपच असंवेदनाशील वाटतो.
24 Jun 2016 - 3:59 pm | रेवती
मिपावर आणि इतर मिडियामध्ये याविषयावर भरपूर चर्चा करून/ऐकून झालिये.
आता बाकी कोणी नाही पण आईवडिलांनी ठरवायचे की मुलगी झाली तरी गर्भपात, जन्म देऊन मारणे, तिला मोठी करताना मुलगी म्हणून (सुरक्षिततेचे सोडता) वेगळे नियम, कमीपणा असले काहीही करायचे नाही. यापुढे तेवढीच आवश्यकता आहे. आता याचे दुसरे टोक गाठणारे असतात याचा अनुभव आहे. मुली झाल्यावर तोरा व मुले झाल्यावर दु:स्वास असेही करतात. मुलगी म्हणजे लक्षुमी आणो मुलगा म्हणाजे कुलदिपक वगैरे कल्पना बोलण्यातूनही काढून टाकल्या पाहिजेत. कित्येक लक्षुम्या गरिबीत तर कुलदिपक दिवे लावत हिंडत असतात.
24 Jun 2016 - 10:50 pm | बोका-ए-आझम
पुरूषप्रधान विचार आणि वृथा अहंकार यापासून. दुर्दैवाने झालंय असं की कधीकधी स्त्रियांकडूनच या अहंकाराला खतपाणी घातलं जातं.पुरुष त्यामुळे स्त्रियांना प्राप्य वस्तू समजतात आणि स्त्रिया पुरूषांच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणं/त्यांचं असं समजलं जाणारं एखादं काम करणं यात आयुष्याची इतिकर्तव्यता समजतात. चित्रपट, मालिका इत्यादींमधून अशाच मनोभूमिकेला खतपाणी मिळतं. ज्यावेळी पुरूष आणि स्त्री एकमेकांचा व्यक्ती म्हणून सन्मान करतील तेव्हा ख-या अर्थाने बदलाला सुरूवात होईल.
25 Jun 2016 - 5:13 am | पिलीयन रायडर
आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो. नकळत एका प्रकारे आम्ही अशी पावतीच दिली की पुरुषाचं काम आमच्या कामापेक्षा जास्त challenging and fulfilling आहे. आता मात्र हे बदलायला हवं.”
+११११
25 Jun 2016 - 7:02 am | कंजूस
खरं कारण १) समाज भोंदू आहे - बोलतात एक करतात दुसरं.,२) वडलोपार्जीत मिळकतीत वाटणी ही मिळकत विकली तरच मिळते नाहीतर फक्त कागदोपत्री वाटा असतो.,मुलीच्या पालकांनी मुलीचे लग्न खर्च करून द्यायचे आणि हुंडाही द्यायचा ही समाजरीत.३) मुलगे लग्न करून बरेचसे आइवडिलांच्या घरात राहातात त्या प्रथेने स्वतंत्र होत नाहीत/होऊ शकत नाहीत.जिथे मुलगेच स्वतंत्र विचार करू शकत नाहीत तिथे त्या 'घरात' पडलेल्या मुलीला कितीशी किंमत राहाणार?- दावणीला बांधलेल्या जनावरासारखी.५)मुलगी झाल्याने आइवडिलांना आर्थिक धरून इतरही त्रास होतो म्हणून त्या समाजात स्त्रीभ्रूणहत्त्या वाढते.वरील कारणे दूर होण्याची शक्यता बय्राच ठिकाणी अजूनही दिसत नाही.
परदेशात जिथे मुलग्यांचेही सज्ञान झाल्यावर लाड करून जवळ बाळगत नाहीत ,हाकलतात तिथे आपोआपच पुरुषी अहंकार राहातच नाही आणि तो इतरांचा विचार करायला शिकतो.
25 Jun 2016 - 1:58 pm | स्वीट टॉकरीणबाई
सर्वांचे मनापासून आणि विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
हा विषय खूपच पूर्वीच चर्चिला गेला आहे त्यामुळे क्रेझींनी म्हटल्याप्रमाणे त्यात आता नव काही राहिलेलं नाही. माझं म्हणणं असं आहे की त्याचं कारण काय आहे त्यापेक्षा आता आपण काय करू शकतो हे महत्वाचं आहे.
आपण जो शब्दप्रयोग वापरतो, उदा. 'स्त्री पुरुषांनी एक्मेकांना आदराची वागणूक दिली पाहिजे' वगैरे, यातल्या 'पाहिजे' या शब्दा ला काही अर्थ नाही. दुसरा काय करतो यावर आपला कधीच कंट्रोल नसतो. आपल्या मुलीला जर सासरी नाहक त्रास होत असेल तर तेव्हां आपण तिला योग्य सल्ला, मदत वगैरे देतो का 'काहीही करून त्यांच्याशी जुळवून घे' असा सल्ला देतो हे महत्वाचं आहे.
'म्हणजे काय? मुलीचं घर तोडायचं आहे का?' असा प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ शकतोच की! निग्रह आणि नाहक हट्ट यामधली रेष प्रत्येकाची वेगवेगळी असते.
25 Jun 2016 - 9:49 pm | नगरीनिरंजन
वा! काय सडेतोड लिहिलंय! पण स्वीट-टॉकरीणबाई, मेली ही लग्नाची, पोराबाळांची व स्वतः कमावती असूनही आपल्यापेक्षा वरचढ जोडीदार मिळवायची हौस आड येती बघा ताकद दाखवण्याच्या.
30 Jun 2016 - 1:14 am | pj
मुलाबाळांची हौस असणे, हे स्त्रीत्वाचे लक्षण आहे आणि ती पुरूषालाही असू शकते. पण आपल्यापेक्ष्या वरचढ जोडीदार असावा ही काही अंशी सुद्र्ढ संतती साठी नैसर्गिक जाणीव (animal instinct) असली तरी बर्याच प्रमाणात सामाजाच्या दंभिकपणाचे लक्षण आहे. जर बायको वरचढ असली तर समाज त्या नवर्याला हसायला कमी करत नाही. किंवा अनेकवेळा नवर्याचा आत्मसंमान दुखावला जाऊन त्याचा परीणाम कुटंबावर (मुलांवर) होतो. म्हणून अनेक वेळा वरचढ स्त्रीने स्वत:चा वरचढपणा उघडपणे न दाखवणे ही एक तडजॊड असते. तिथे काय जळत असते हे तिलाच माहीत असते. हौस म्हणणे सोपे आहे!!
2 Jul 2016 - 12:42 pm | नगरीनिरंजन
अच्छा म्हणजे समाजाने आपोआप बदलावे अशी अपेक्षा दिसतेय अशा स्त्रियांची. चालू द्या मग.
27 Jun 2016 - 10:28 am | नाखु
एकाच भागात संपवण्यासारखा नाही हे लक्ष्यात येतेय्च पण तरीही बर्याच मुद्द्यांना फक्त स्पर्ष करून टाकला आहे.
हे वाक्य खासच.
मुलींना स्वतःच्या पायावर सक्षम आणि निरणय निर्णय सारासारविवेकी करण्याऐवजी उच्चशिक्षीत करून चांगले स्थ्ळ मिळावे असाच आटाटोप (बहुतांश) घरात असतो. काही अपवाद असतीलही,
पण कह्रेच खरेच प्रामाणिकपणाने सांगावे बहुसदस्य कुटुंबात मुलीने शिकलेल्या ज्ञानाचा/पदवीचा/कौशल्याचा पुढे उपयोग करून घेतला जातो ,अगदी शहरातही सनदी लेखापाल्,वैदकीय्,करसल्लागार वगळता इतर मुलींना लग्नाअगोदर घेतलेले शिक्षण पुढे स्वतःच्या आर्थीक/व्यक्तीमत्व उन्नतीसाठी वापरण्याची संधी/अवकाष फार कमी मिळते.
मुलींचे पालकही तसा कधी विचार करीत नाहीत हे कटु असले तरी सत्य आहे आणि त्यामुळेच अकस्मात दुर्दवी परिस्थीतीत मुलीला सग्ळी सुरुवात शुन्यापासून करावी लागते.
30 Jun 2016 - 1:58 am | लोथार मथायस
.
28 Jun 2016 - 3:53 am | रुपी
“निष्कारण दुय्यम भूमिका आम्हाला मान्यच नाही” असं आम्ही खडसावून सांगू शकलो नाही. >>
मला वाटते, मुळात हे अजून स्त्रियाच स्वतःलाच सांगू शकलेल्या नाहीत. कितीतरी बाबतीत त्या अजूनही दुय्यम भूमिका स्वखुषीने घेतात, किंवा त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही. स्वतःचे ताट न उचलणे, टॉवेल न वाळवणे, अंथरुण/ पांघरुण न उचलणे या गोष्टी पुरुषाने नाही केल्या तर बायकांना त्याचे काहीच वाटत नाही! आमच्या घरात पुरुषांना रोज गरम नाष्टा लागतो, रोज पानात वेगळा पदार्थ लागतो, प्रत्येक पुरुषाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या कशा हे घरातल्या बायका कौतुकाने सांगतात!
स्वतःपुरतं बोलायचं तर आमच्याकडे कार घेणे, पैसे गुंतवणे, घरात एखादे मोठे काम करवून घेणे, मोठी खरेदी करणे, एखादी लांबची ट्रीप काढणे या गोष्टी नवरा करतो, किंवा मीच त्याच्यावर सोडलं आहे. तो मला कितीही म्हणाला, की तूही यात थोडं लक्ष घाल तरी मी आपली तिकडे दुर्लक्ष करते. याचा अर्थ मी स्त्रीभ्रूणहत्या करेन किंवा करण्याचा विचार करेन असा नक्कीच नाही. पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो. त्यामुळे ही दुय्यम भूमिका आपणच घेतली जाते. मुळात ही मानसिकता आधी बदलायला हवी.
उगीचच विषयाला फाटे फोडायचे म्हणून नाही, पण एक मनात आलं ते लिहिते. इथे मिपावर कित्येकजण एकमेकांना प्रत्यक्षात ओळखत नाहीत, कुणी कुठला आयडी घ्यावा याचे बंधन नाही. असे असतानाही तुम्ही "स्वीट-टॉकरीणबाई" हाच आयडी का घेतला असावा? खरी सांगायचे तर तुमची स्वतःची एक वेगळी ओळख असताना, तुमचा आयडी पाहिल्याबरोबर "या स्वीट-टॉकर यांच्या पत्नी" अशीच प्रतिमा आधी पुढे येते. तुमच्याच लेखनाला प्रतिसाद देताना तुमच्याकडे बोट दाखवण्याचा हेतू नाही, पण दुय्यम भूमिकेबद्दल विचार करताना हा विरोधाभास नक्कीच जाणवला.
28 Jun 2016 - 2:02 pm | स्वीट टॉकरीणबाई
रुपी - तुम्ही ते वाक्य कॉपी पेस्ट केलंत ते बरं झालं. त्यातला 'निष्कारण' हा शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीत, जी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र करतात, कोणाला ना कोणाला दुय्यम भूमिका घ्यावीच लागते आणि घ्यावीच. दोन मुख्याध्यापक असलेली शाळा नीट चालणार नाही. मात्र कोण लीडर आणि कोण दुय्यम हे ते काम कोण जास्त चांगलं करू शकतो यावर ठरायला हवं. लिंगावर नाही. आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आता नवी मुंबईला महाकट्टा ठरतोय. जे सभासद त्याचं आयोजन करताहेत त्यांना जागा, मेनु, वेळ या सगळ्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य देऊन आपण बाकीच्या सगळ्यांनी दुय्यम भूमिका घ्यायची असते. ज्या काही वैयक्तिक आवडीनिवडी असतील त्या घरी ठेऊन तिथे यायचं आणि धमाल करायची बस्स. ऑर्गनाइझर पुरुष आहेत की बाई, त्यांचा अनुभव किंवा वयं काय आहेत वगैरे प्रश्न निघताच कामा नयेत.
तुम्ही जे लिहिलं आहे "पण आपण एखादे मोठे काम करु शकतो असा विचार करण्यापेक्षा ते करताना काही चुकलं तर काय हाच विचार जास्त असतो." हे अगदी खरं आहे. मात्र यावर एक उत्तम उपाय आहे. असं काम हाती घेण्याआधी नवर्याला आणि मुलांना स्पष्ट सांगितलं की "मी हे पहिल्यांदाच करतिये. चुकण्याची शक्यता खूपच आहे. कोणीही कुरकुर करू नका. कबूल?" ते नुसतंच कबूल करतात येवढंच नाही, पाळतातही! याचे फायदे इथेच संपत नाहीत. आपल्याला आपण मोठी कामं सहज करू शकतो याचा आत्मविश्वास येतो. शिवाय घरातलं कामांचं विभागीकरण (compartmentalization) संपल्यामुळे वातावरण जास्त हेल्दी होतं.
आय डी बद्दल - आमचा आय डी हा अजिबात कल्पनाशक्ती न वापरता सरळ नावाचं भाषांतर केलेलं आहे. दुसर्या एका संकेतस्थळावर मी 'स्वीटर टॉकर' आहे. तो आधी सभासद झाला म्हणून असं झालं. असं ही होऊ शकलं असतं की जर या संकेतस्थळांची सभासद मी आधी झाले असते तर मी 'स्वीट टॉकर' झाले असते. मग त्याला 'स्वीट टॉकरबुवा' असं घ्यायला लागलं असतं.
30 Jun 2016 - 10:26 am | कायरा
बायकांनाच स्वत:ला खरतर मुलगी ऐवजी मुलगा हवा असतो. उगाच नाही लालबाग चा राजा (गणपती)ला लोक 24 तास रांगेत उभे रहात.एकदा का मुलगा झाला की मग पालकांना मुलीच्या लग्नासाठी करावी लागणारी भिकमागी धडपड आपआपोच नाहीशी होते.त्यामुळे बायकांना मुलगा झाला की अगदी सुरक्षित वाटते. त्यानंतर त्यांचा तोरा काय वर्णावा!!
30 Jun 2016 - 7:26 pm | बोका-ए-आझम
आणि असायलाच पाहिजे. आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी.आणि मुलीच्या लग्नासाठी धडपड करायला नको म्हणून लोकांना मुलगा हवा असतो हे म्हणणं चुकीचा आहे. धडपड दोघांच्याही लग्नासाठी करावी लागते आहे. मुलांची लग्नं होणं हे पूर्वीप्रमाणे सोपं राहिलेलं नाही. शिक्षणामुळे मुली आता आईवडिलांनी दाखवलेल्या मुलाशी निमूटपणे लग्न करुन मोकळ्या होत नाहीत आणि मुलगेदेखील आईवडिलांचा मान राखायचा म्हणून कोणत्याही मुलीशी लग्न करत नाहीत. शेवटी हा बाजार आहे. जेव्हा विकणारा आणि विकत घेणारा यांना choice असतो तेव्हा ते बाजार पालथा घालणारच.
1 Jul 2016 - 1:28 pm | स्वीट टॉकरीणबाई
मुली आणि मुलगे, दोघेही अतिशय चोखंदळ झाली आहेत. पूर्वी तीन अटींपैकी दोन पूर्ण झाल्या की ते स्थळ योग्य आहे असं समजलं जायचं. आता अटी दहा आणि दहाच्या दहा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच असल्यामुळे अरेंज्ड मॅरेज अतिशय अवघड झालं आहे असं गेल्या पाच दहा वर्षातलं चित्र आहे. (निदान शहरांच्या बाबतीत तरी.)
1 Jul 2016 - 2:50 pm | नाखु
शिवाय त्या वेळोवेळी बदलत असल्याने आणखी थांबु असा प्रकार वाढला आहे.
छोटेच प्रश्न :
उत्तरे ऊमजतील न उमजतील पण प्रश्न पडायला काय आहे?
समाजातलाच संसारी नाखु
1 Jul 2016 - 10:04 pm | झेन
दांभिकपणा हाआपल्या समाजात इतका खोलवर रूजला आहे की त्यात काही चूूकिचे वाटेनासे झाले आहे. पण या चावून चोथा झालेल्या विषयाला कधीकधी भलतेच फाटे फुटतात. स्त्री स्वातंत्र्य आणि योनिशुचिता ? मला एक सामान्य माणूस म्हणून असे वाटते कि मानवामधे संभोग आणि मन याचा जवळचा संबंध असतो, त्यामुळे साहित्य, मालिका यात असणारा स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा गोंधळ वास्तविकआयुष्यात जास्त भरकटून टाकेल. सिनेमातली आर्ची असो नाहीतर प्रत्यक्षातली गौरी भिडे नाहीतर आजकाल शहरातून अत्यंत कमी कपड्यात रस्त्यावरून सिगरेट फुंकत फिरणार्या तरूणी असोत या चार दीनकी चाँदनी वाटतात. तस्मात मुलगा असो वा मुलगी त्यांना स्वातंत्र्य आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजवूया.
4 Jul 2016 - 3:24 pm | मराठी कथालेखक
प्रश्नच्या मुळाशी जायची इच्छा नाही तर राहिलं...
2 Jul 2016 - 1:50 pm | गामा पैलवान
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जो कायदा केला आहे तो जाचक असून प्रामाणिक कंपनचिकित्सक (सोनोग्राफर्स) भरडले जात आहेत. म्हणून या कायद्याविरोधात ते संपाच्या पावित्र्यात आहेत : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N9VTIr
-गा.पै.