मी एकटा आहेच कुठे?, , , , , "खरे सुपरमॅन - आमचे आप्पा" या लेखात नमूद केलेला लेख.

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
3 Jun 2016 - 4:39 pm

'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः

माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच!

अनेक वेळा खूप वैताग येई. ‘देवानं मला आता किती आयुष्य बाकी ठेवलं आहे? ते कमीत कमी असेल तर बरं होईल’ असे विचार प्रकर्षाने मनांत येत. पण ते जे असेल ते असेल. त्यात काही फरक पडणार नाही आणि माझं त्यावर काही नियंत्रणदेखील नाही. मग ते मी चांगलं आणि आनंदात का घालवू नये?

माझा ‘आत्मा’ किंवा ‘पुनर्जन्म’ इत्यादि गोष्टींवर विश्वास नाही. त्यामुळे माझी पत्नी स्वर्गात आहे आणि ती माझ्याकडे पहात आहे किंवा माझी वाट पहात आहे असा विचार मी करीत नाही. तिचं आयुष्य संपलं. तिचा या जगातला मुक्काम संपला. आणि तिचा माझा सहवासही संपला.

माझा आणि तिचा एकसष्ट वर्षांचा सहवास झाला. दृष्ट लागावी इतका तो चांगला झाला. त्याच्या आठवणी अत्यंत हृद्य आहेत. मात्र मी त्या आठवणी कवटाळून बसंत नाही.

त्या हृद्य आठवणींना पुन्हा उजाळा देऊन त्यांतला आनंद पुनह्पुन्हा लुटायचा - का ‘आता तिचा सहवास होणे नाही’ या विचारानी दुःखी व्हायचं हा निर्णय आपल्यालाच करायचा असतो. आणि नुसता निर्णय करून भागत नाही. तो अमलात आणावाही लागतो. खरी परीक्षा इथेच होते.

आता माझं जे उर्वरित जीवन आहे ते स्वतःकरिता आणि इतरांकरिता आनंदी कसं करीन इकडे मला लक्ष द्यायचे आहे. मला तसे खास छंद नाहीत. संगीत वगैरेसारख्या कलाही माझं मन आकर्षित करंत नाहीत. पण मला लेखनाची आणि वाचनाची जी आवड आहे ती मी उर्वरित आयुष्यात जोपासीन. त्यांचा आनंद मला भरपूर घेता येईल.

त्याचबरोबर माझं मित्रमंडळ आहे त्यांचीही या कामात मला भरपूर मदत होणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, त्यांचे उपगट या सर्वांचा मला उपयोग होणार. मुळात आपल्याला स्नेही मिळावेत म्हणूनच ना आम्ही दोघांनी या संघात प्रवेश घेतला? आणि आमचं ते उद्दिष्ट आमच्या कल्पनेपेक्षा उत्तम साध्य झालं. हा स्नेह वास्तविक फक्त गेल्या दहा बारा वर्षांचा. पण तो आयुष्यभराचा आहे असं वाटावं इतका तो दृढ आहे. त्यातून मी भरपूर आनंद घेतो आणि देतोही. माझ्या दुःखाचे मी चुकूनही प्रदर्शन मांडून बसत नाही. कारण तसं करणं हा स्वतःविरुद्ध तर अपराध आहेच, पण तो इतरांच्या विरुद्ध जास्त अपराध आहे. एक दुःखी माणूस इतर चार माणसांना दुःखी करीत रहातो.

स्नेह्यांप्रमाणेच माझे जवळचे नातेवाईकही माझं जीवन आनंदी रहायला मदत करीत असतात. माझी मुलं, माझे भाऊ, बहीण, पुतणे, पुतण्या, भाचे, या सर्वांची मदत असते. आमचं कुटुंब मोठं आणि संबंध खूप जवळचे अशी स्थिती असल्यामुळे माझं जीवन आनंदी रहिलेलं आहे.

मात्र एक गोष्ट लक्षातंच ठेवायला हवी की प्रत्येक मनुष्य एकटाच असतो. तो एकटाच येतो आणि एकटाच जातो. इतकंच नव्हे तर तो एकटाच जीवन जगतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं आरोग्य आणि त्याचं आयुष्य हे त्याचं त्यालाच भोगायचं अथवा उपभोगायचं असतं. इतर त्याला मदत जरूर करतील पण ते त्याचा भाग बनू शकत नाहीत.

या सर्व गोष्टींची पुरेपूर जाणीव ठेवून मी माझं जीवन जगतो. एकटेपणाची एकदा सवय झाली की त्याचा त्रास तर होत नाहीच, पण त्यातली गोडी देखील समजते. एकांतात मनुष्य पुष्कळ विचार करतो. बुद्धासारखा माणूस जेव्हां विचार करतो तेव्हां त्याला मानवाच्या सुखदुःखाचं रहस्य सापडतं आणि जगाला ते सांगतो.

जेव्हां आपल्यासारखा सामान्य माणूस विचार करतो तेव्हां आपल्याला स्वतःच्या सुखदुःखांचं रहस्य सापडतं. इतर आपल्याशी किती प्रेमाने वागतात, आपल्याकरिता किती करतात याची जाणीव या विचारातूनच होते आणि आता रहिलेलं जीवन मी आनंदात घालवीन आणि त्यायोगे इतरांचं जीवनही आनंदी करीन, निदान दुःखी करणार नाही असा विचार करतो आणि स्वतःचं दुःख विसरतो.

आप्पा गोडबोले

कथासमाजजीवनमानविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

चिनार's picture

3 Jun 2016 - 4:53 pm | चिनार

क्या बात हैं !!
सुरेख !

शान्तिप्रिय's picture

3 Jun 2016 - 5:15 pm | शान्तिप्रिय

सुंदर!

ह्या विचाराला + १....

सगळेच जण जर असाच विचार करायला लागले तर, ह्या बकाल पृथ्वीचे सुंदर वसुंधरेत रुपांतर व्हायला, वेळ लागणार नाही.

एकदम सहमत. अप्पांसाठी आदर द्विगुणीत केला या लेखाने.

खूप सुंदर आणि सकारात्मक विचार. आप्पांचा हा लेख इथे आमच्या बरोबर शेयर केल्या बदद्ल तुमचे मन:पूर्वक धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

3 Jun 2016 - 11:20 pm | चित्रगुप्त

दोन्ही लेख अत्यंत प्रेरणादायक आहेत. माझे एक स्नेही चित्रकार ८५ वर्षांचे आहेत. गेली पन्नास वर्षे मी त्यांच्या संपर्कात आहे. या सर्व काळात एकदाही त्यांच्या तोंडून कुणाची निंदा, कश्याही विषयी कुरकूर, पूर्वीचा काळ किती छान होता, हल्ली सर्व कसे वाईट आहे.... अश्या प्रकारचे काहीही ऐकलेले नाही. ते एकटेच रहातात, भरपूर वाचन करतात आणि नेहमी आनंदी रहातात. असे म्हातारपण असावे.

सतिश गावडे's picture

3 Jun 2016 - 11:29 pm | सतिश गावडे

मात्र एक गोष्ट लक्षातंच ठेवायला हवी की प्रत्येक मनुष्य एकटाच असतो. तो एकटाच येतो आणि एकटाच जातो. इतकंच नव्हे तर तो एकटाच जीवन जगतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं आरोग्य आणि त्याचं आयुष्य हे त्याचं त्यालाच भोगायचं अथवा उपभोगायचं असतं. इतर त्याला मदत जरूर करतील पण ते त्याचा भाग बनू शकत नाहीत.

हे तर क्लास आहे.

बोका-ए-आझम's picture

3 Jun 2016 - 11:59 pm | बोका-ए-आझम

हे खरं तत्वज्ञान! Three Cheers for अप्पा!!!

यशोधरा's picture

4 Jun 2016 - 5:26 am | यशोधरा

लेख अतिशय आवडला.

दीपा माने's picture

4 Jun 2016 - 7:18 am | दीपा माने

खरच खुप सुंदर विचार मांडले आहेत. मिपाची सभासद झाल्याचा मनापासुन आनंद वाटला.

मात्र एक गोष्ट लक्षातंच ठेवायला हवी की प्रत्येक मनुष्य एकटाच असतो. तो एकटाच येतो आणि एकटाच जातो. इतकंच नव्हे तर तो एकटाच जीवन जगतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं आरोग्य आणि त्याचं आयुष्य हे त्याचं त्यालाच भोगायचं अथवा उपभोगायचं असतं. इतर त्याला मदत जरूर करतील पण ते त्याचा भाग बनू शकत नाहीत.

गुरुतुल्य सरांनी (ज्यांनी मला जातीने घडवले) त्यांची शिकवण आचरणात आणनयाचा प्रयत्न करतो आहे, कुणाला (तुमच्या मर्यादेने/अडचणीमुळे) मदत करता आली नाही तरी चालेल पण कुणाच्याही प्रगतीत वाटचालीत अडथळा/विग्न आणू नकोस.

स्वीट टॉकर दंपती लिखाण पंखा नाखु

अमितसांगली's picture

4 Jun 2016 - 9:36 am | अमितसांगली

इथे टंकल्याबद्दल धन्यवाद...

चिनार's picture

4 Jun 2016 - 11:16 am | चिनार

परवानगी असल्यास हा लेख अप्पांच्या नावाने whats app वर टाकू इच्छितो.
कळवावे !

सविता००१'s picture

4 Jun 2016 - 12:02 pm | सविता००१

अतिशय आवडला हा लेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2016 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. आपण आनंदी राहण्याचा मार्ग शोधला त्याचा आनंद आहेच. आपल्यामुळे दुसरे दुःखी होऊ नये आणि आपणही त्याच विश्वात राहू नये म्हणून आपण स्वीकारलेला मार्ग योग्यच असला पाहिजे. आणि वाचतांनाही छान वाटलं. आपलं आयुष्य अधिक सुखी व्हावं आपण आपले आवडते छंद मनापासून जोपासावेत यासाठी तहे दिलसे शुभेच्छा.

मला मात्र मित्रपरिवाराबरोबर तिच्या आठवणी, तिच्या सोबतीचे क्षण आठवायला मजा येईल. होईल त्रास पण तिच्या आठवणी मला कधीच विसराव्या अशा वाटणार नाहीत. मी तिला कधीही विसरण्याचा प्रयत्न करणार नाही. आयुष्य पूर्ण जगून झाल्यावर भौतिक गोष्टींपेक्षा भूली बिसरी यादेत रमायला मला जास्त आवडेल.

उसकी दुआ थी की मै उसके जिंदगी से चला जाऊ
मेरी दुआ थी की उसकी हर दुआ कबूल हो.
(प्रशांत सूर्यवंशी)

-दिलीप बिरुटे

नीलमोहर's picture

4 Jun 2016 - 12:56 pm | नीलमोहर

हे खरे पॉसिटीव्ह थिंकींग, प्रभावी आणि प्रेरणादायी.

सखी's picture

4 Jun 2016 - 3:03 pm | सखी

अतिशय सकारात्मक विचारशैली. इथे टंकल्याबद्दल धन्यवाद.

ती. अप्पांच्या अनुभवाचे सार असलेला हा लेख खूपच आवडला. सर्वांना मार्गदर्शक ठरावा.
तुमचेही आभार..

पुढल्या वाक्यात आप्पांनी जगण्याचं सारच मांडलंय...

"मात्र एक गोष्ट लक्षातंच ठेवायला हवी की प्रत्येक मनुष्य एकटाच असतो. तो एकटाच येतो आणि एकटाच जातो. इतकंच नव्हे तर तो एकटाच जीवन जगतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं आरोग्य आणि त्याचं आयुष्य हे त्याचं त्यालाच भोगायचं अथवा उपभोगायचं असतं. इतर त्याला मदत जरूर करतील पण ते त्याचा भाग बनू शकत नाहीत."

हे आचरणात आणणे कौतुकास्पद आहे. त्यांचे विचार आमच्यासमोर मांडल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि आप्पांना उत्तम आयुरारोग्यासाठी शुभेच्छा!

-चतुरंग

जेपी's picture

5 Jun 2016 - 10:31 am | जेपी

लेख आवडला..

स्वीट टॉकर's picture

6 Jun 2016 - 9:55 am | स्वीट टॉकर

सर्वज ण,

आप्पांतर्फे सर्वांना धन्यवाद. तुमचे विचार मी आप्पांपर्यंत पोहोचवीन.

चिनार, लेख जरूर नावासहित व्हॉट्स अ‍ॅपवर टाका.