द स्केअरक्रो भाग २१ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
फिनिक्सच्या स्काय हार्बर एअरपोर्टवर जेव्हा रॅशेल बाहेर आली, तेव्हा तिचं माझ्याकडे अजिबात लक्ष गेलं नाही. मीही तिथे आलेल्या आणि हातांत येणाऱ्या लोकांच्या नावाचे फलक घेऊन वाट बघत असणाऱ्या लिमोझिन ड्रायव्हर्सच्या गर्दीत उभा होतो. तिने मला पाहण्याआधी मी तिला पाहिलं. ती डावीकडे आणि उजवीकडे बघत होती आणि मी तिच्यासमोर उभा होतो. ती रेलिंगच्या दुसऱ्या बाजूला आल्यावर मी सरळ जाऊन तिच्या पुढ्यात उभा राहिलो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हातातल्या बॅग्ज खाली टाकल्या. आम्ही दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. जवळजवळ एक मिनिटभर आम्ही काहीही न बोलता तसेच उभे होतो.
“हाय रॅशेल!” मी तिच्या डोळ्यांत पाहात बोललो.
“हाय जॅक!” तीही माझ्याकडे पाहात होती.
“खूप लांबला आजचा दिवस!”
“हो. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस. संपता संपत नाहीये!”
“ठीक आहेस ना तू?”
“पर्याय नाहीये माझ्याकडे दुसरा!”
मी तिच्या दोन्ही बॅग्ज उचलल्या, “मी गाडी आणलेली आहे. आपण सरळ हॉटेलवरच जाऊ या!”
“हो हो.”
आम्ही दोघेही काहीही न बोलता चालायला लागलो. मी माझा हात तिच्या कमरेभोवती ठेवला होता. तिने फोनवर मला नीट काहीच सांगितलं नव्हतं. ती फक्त एवढंच म्हणाली होती की तिचा राजीनामा हा जबरदस्तीने घेण्यात आलेला आहे आणि जर तिने राजीनामा दिला नसता, तर तिच्यावर सरकारी संपत्तीचा गैरवापर केल्याबद्दल खटला भरण्यात आला असता. हा गैरवापर म्हणजे दुसरंतिसरं काहीही नव्हतं, तर तिने मला वाचवण्यासाठी जे एफ.बी.आय.चं जेट नेल्लीसला आणलं होतं आणि ज्याच्यातून आम्ही एल.ए.ला परत आलो होतो तो सगळा प्रकार होता. आत्ता तिची मनःस्थिती ठीक नव्हती, त्यामुळे मी तिला जास्त छेडलं नव्हतं पण काही काळाने मी नक्कीच तिला त्याबद्दल विचारणार होतो. मला यामागे असलेल्या लोकांचीही नावं हवी होती. तिची नोकरी मला वाचवण्यामुळे गेलेली होती. तिला यातून बाहेर काढल्याशिवाय मला रात्रीची झोप लागली नसती. आणि तिला बाहेर काढण्याचा एकच उपाय माझ्याकडे होता, तो म्हणजे या सगळ्या प्रकाराबद्दल लिहिणं.
“हॉटेल छान आहे,” मी म्हणालो, “पण मी एकच रूम घेतलेली आहे. जर तुला....”
“काहीही हरकत नाहीये माझी. आता असल्या गोष्टींबद्दल काळजी करण्याची गरज नाहीये मला.”
मी मान डोलावली. एफ.बी.आय. मध्ये हे नियम अत्यंत कडक होते. पोएट केसच्या वेळी रॅशेलने जरी त्याला शोधून काढलं असलं तरी माझ्याबरोबर असलेल्या तिच्या संबंधांमुळे तिला पाच वर्षे डाकोटामध्ये काढावी लागली होती आणि बिहेवियरल सायन्ससारख्या, तिच्या कौशल्यांसाठी अगदी योग्य असणाऱ्या विभागातूनही तिची उचलबांगडी झाली होती. मला एक गोष्ट जाणवल्याशिवाय राहिली नाही, की तिच्यासाठी तिचं काम हे सर्वस्व असल्यामुळे मी काहीही बोललो तरी तिच्या मनात त्याबद्दलचे विचार येणारच आहेत. मी तरीही जरा वेगळ्या विषयावर बोलायचं ठरवलं.
“तुला भूक लागली असेलच. तुला आधी काही खायचंय की आपण सरळ हॉटेलमध्येच खाऊ या?”
“वेस्टर्न डेटाचं काय?”
“मी त्यांना फोन करून अपॉइंटमेंट ठरवलेली आहे. त्यांनी मला उद्या बोलावलंय कारण आज त्यांचा सी.इ.ओ. तिथे नाहीये.”
मी बोलताबोलता माझ्या घड्याळाकडे पाहिलं. सहा वाजायला आले होते.
“आत्ता त्यांचं ऑफिस तसंही बंद झालेलं असेल. उद्या सकाळी दहा वाजता आपण तिथे जाऊ. आपल्याला सी.इ.ओ.लाच भेटायचंय. त्याचं नाव काय बरं? हां, मॅकगिनिस. डेक्लॅन मॅकगिनिस.”
“आणि तू त्यांच्या डोळ्यांत अगदी यशस्वीपणे धूळ झोक्लेली आहेस असं तुला वाटतंय?”
“मी असं काहीही केलेलं नाहीये. माझ्याकडे स्किफिनोने दिलेलं पत्र आहे.”
“तू एस्किमोला बर्फ विकू शकतोस ना जॅक? तुमच्या क्षेत्रात काही नीतिमत्ता वगैरे असते की नाही?”
“अर्थात असते, पण काहीवेळा ती जरा बाजूला ठेवावी लागते. जर तुम्हाला जी माहिती हवी आहे, ती सरळसोट मार्गांनी मिळणार नसेल, तर असे मार्ग वापरावे लागतात. एफ.बी.आय.मध्ये लोक अंडरकव्हर जात नाहीत की काय?”
मी बोलल्यावर जीभ चावली. मला एफ.बी.आय.चा उल्लेख करायला नको होता. पण तिच्या ते लक्षात आलेलं दिसलं नाही.
“मला आत्ता तिथे जायचंय जॅक.”
आम्ही एव्हाना गाडीत बसलो होतो.
“कुठे?”
“वेस्टर्न डेटा.”
“आपण अपॉइंटमेंटशिवाय जाऊ शकत नाही, आणि आपली अपॉइंटमेंट उद्याची आहे.”
“आपण आत कुठे चाललोय? मी म्हणतेय आपण बाहेरूनच बघू. चोर तेच करतात ना चोरी करायच्या आधी?”
“ ते ठीक आहे, पण का बघायचंय तुला त्यांचं ऑफिस?”
“कारण मला आज घडलेल्या सगळ्या घटनांवरून माझं लक्ष कुठेतरी हटवायचंय.”
“जरूर. चल जाऊ या.”
मी वेस्टर्न डेटाचा पत्ता गाडीच्या जी.पी.एस.मध्ये घातला आणि गाडी चालू केली. रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती आणि आम्ही तसेही उलट दिशेला चाललो होतो. वीस मिनिटांत आम्ही मेसाच्या जवळ पोचलो.
मेसा शहराच्या पूर्वेला असलेल्या मॅककेलिप्स रोडवर वेस्टर्न डेटाचं ऑफिस होतं. आजूबाजूला बरीच गोदामं आणि छोट्या इमारती होत्या. त्यांच्या आजूबाजूला वाळवंट आणि तिथे वाढणारे वेगवेगळ्या प्रकारचे निवडुंग होते. खुद्द ऑफिसच्या इमारतीला आजूबाजूला असलेल्या वाळूसारखाच मातकट पिवळट राखाडी रंग दिलेला होता. दर्शनी दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना एक अशा दोन खिडक्या होत्या. पत्ता इमारतीच्या छताजवळ उजव्या बाजूला रंगवलेला होता. इमारतीभोवती तारेचं कुंपण होतं. पण त्याशिवाय दुसरी कोणतीही खूण तिथे नव्हती.
“हेच आहे त्यांचं ऑफिस?खात्री आहे तुझी?” रॅशेलने विचारलं. मी गाडी ऑफिसवरून पुढे नेली.
“हो. जिने माझी अपॉइंटमेंट नोंदवून घेतली, तिने सांगितलं होतं की इमारतीवर कुठल्याही प्रकारची खूण किंवा त्यांची ओळख सांगणारा लोगो वगैरे नाहीये. ते ज्या प्रकारची सुरक्षितता पुरवतात, त्याच्याशी सुसंगत आहे म्हणे. कोणालाही हे सहजासहजी कळता कामा नये की ते कुठे आहेत आणि काय करताहेत.”
“मला वाटलं होतं त्यापेक्षा हे ऑफिस खूपच छोटं आहे.” ती म्हणाली.
“त्यांच्या ऑफिसचा बराच भाग जमिनीच्या खाली आहे. मी बोललो होतो ना तुला?”
“हो, बरोबर.”
वेस्टर्न डेटाच्या थोडं पुढे हायटॉवर ग्राउंड नावाचं एक कॉफी हाऊस होतं. मी तिथून गाडी परत वळवली आणि परत एकदा वेस्टर्न डेटावरून चक्कर मारली. आता ऑफिस रॅशेल बसली होती त्या बाजूला होतं आणि ती त्याच्याकडे अगदी नीट निरखून पाहात होती, “सगळीकडे कॅमेरे बसवलेत या लोकांनी. एक, दोन, तीन ... सहा कॅमेरे तर मला अगदी उघडपणे दिसले. बाहेरच्या बाजूला बसवलेत. आतमध्ये किती असतील कुणास ठाऊक?”
“त्यांच्या वेबसाईटनुसार सगळीकडे कॅमेरे आहेत. तेच तर ते विकतात ना लोकांना. सुरक्षितता.”
“खरीखुरी किंवा मग तिचा आभास.”
मी तिच्याकडे पाहिलं, “म्हणजे?”
तिने खांदे उडवले, “हे कॅमेरे दिसतात एकदम छान. लोक त्यामुळे प्रभावितपण होत असतील. पण जर दुसऱ्या बाजूला पाहायला कोणी नसेल, तर त्यांचा काय उपयोग आहे?”
“बरोबर. अजून एक चक्कर मारायची आहे का?”
“नाही. मला जे पहायचं होतं, ते मी पाहिलंय. आता परत जाऊ या. मला भूक लागलीय.”
आमच्या हॉटेलचा पत्ता जी.पी.एस.मध्ये होताच. त्यामुळे आम्ही अगदी थोड्या वेळातच हॉटेलमध्ये पोचलो आणि आमच्या खोलीत गेलो, आणि तिथली प्रसिद्ध रम मागवली. रॅशेल अजूनही गप्पच होती.
“मी काय म्हणतो रॅशेल,” मी म्हणालो, “एफ.बी.आय.ला जर तू गेल्यामुळे त्यांचं किती नुकसान होतंय हे समजत नसेल, तर ते गेले खड्ड्यात! जगातल्या प्रत्येक नोकरशाहीचं हेच चुकतं. ते नेहमीच स्वतंत्र विचार करणाऱ्यांना खड्यासारखं वेचून बाहेर काढतात. अशा लोकांची त्यांना सर्वात जास्त गरज असते, तरीही.”
“ मला त्याने काही फरक पडत नाही जॅक, पण मी आता काय करू?एफ.बी.आय.एजंट याशिवाय दुसरं काहीही करायचा मी विचारसुद्धा कधी केला नव्हता. आता मी काय करू? आपण काय करणार आहोत आता?”
‘आपण’ हा शब्द तिने वापरल्यामुळे मला जरा बरं वाटलं.
“आपण विचार करू त्याचा. असं केलं तर?आपण आपली दोघांची प्रायव्हेट डिटेक्टिव्ह फर्म काढू या. वॉलिंग अँड मॅकअॅव्हॉय, प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन्स.”
ती जोरात हसली, “थँक यू. माझं नाव पहिलं दिल्याबद्दल.”
मी तिच्या डोळ्यांत पाहिलं, “माझ्यासाठी तुझं नाव नेहमीच पहिलं असेल रॅशेल!”
आता तिने मला जवळ ओढलं आणि माझे ओठ आपल्या ओठांनी बंद केले.
################################################################
आम्ही दोघंही शांतपणे जेवत होतो, पण माझ्यातला पत्रकार काही गप्प बसायला तयार नव्हता.
“आता तरी वॉशिंग्टनमध्ये काय झालं ते सांगशील का तू?”
“सांगण्यासारखं काहीही नाहीये त्यात. त्यांनी मला बरोबर कचाट्यात पकडलं. त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची दिशाभूल केली. मी त्याला सांगितलं की मी एलीला एका कैद्याची मुलाखत घ्यायला जाते आहे, आणि त्याने मला जेट घेऊन जायची परवानगी दिली. त्यांनी थोडी आकडेमोड केली आणि हा निष्कर्ष काढला की मी जवळजवळ चौदा हजार डॉलर्स एवढ्या किंमतीचं इंधन बरबाद केलं आणि कायद्यानुसार हा एक गंभीर गुन्हा आहे. जर मी हे आरोप नाकारले असते, तर त्यांनी माझ्यावर खटला भरण्याची कारवाई चालू करण्यासाठी तिथे एक प्रॉसिक्युटर पण तयार ठेवला होता. मला तिथल्यातिथे अटक करून त्यांनी तुरुंगात पाठवलं असतं आणि उद्या कोर्टात उभं केलं असतं.”
“काय सांगतेस?”
“मला एलीमध्ये त्या कैद्याला भेटायला जायचं होतं ही खरी गोष्ट आहे आणि मी जर तिथे गेले असते, अगदी तुला घेऊन गेले असते, तरी सगळं व्यवस्थित झालं असतं, पण तू जेव्हा मला अँजेलाचा काहीही पत्ता नाहीये असं सांगितलंस, तेव्हा गोष्टी बदलल्या. मी एलीला गेलेच नाही, तुझ्याबरोबर एल.ए.ला आले.”
“हा शुध्द बिनडोकपणा आहे. मला याबद्दल लिहायलाच हवं.”
“नाही जॅक. असं नाही करता येणार तुला. मी एका गोपनीयतेच्या करारावर सही केलेली आहे, आणि तुला आता काय घडलंय ते सांगून मी तो करार एकदा मोडलेला आहे. जर हे कुठे छापून आलं, तर ते माझ्यावर खटला भरायला मागेपुढे पाहणार नाहीत.”
“ असं काहीही करणार नाहीत ते. जर त्यांना कळलं, की ही स्टोरी त्यांच्याच अंगावर शेकणार आहे, तर ते निमुटपणे तुझ्यावर ठेवलेले हे खुळचट आरोप मागे घेतील, आणि कदाचित तुझा राजीनामासुद्धा.”
“तुझ्यासाठी असं म्हणणं सोपं आहे. तुरुंगात जावंच लागलं तर ते मला जावं लागणार आहे, तुला नाही.”
“ रॅशेल, तुला समजत कसं नाहीये की तू जे काही केलंस ते बेकायदेशीर असो किंवा बाकी काहीही – त्याच्यामुळे माझा आणि इतर कितीतरी जणांचा जीव वाचलाय. तू जे केलंस त्यामुळे हा खुनी पोलिसांना माहित तरी झालाय. नाहीतर निरपराध लोकांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगावी लागली असती.”
“जॅक, तुला हे समजत नाहीये की एफ.बी.आय.मधले लोक माझा तिरस्कार करतात. मी एखाद्या काट्यासारखी सलते त्यांना. त्यांनी पोएट केसनंतर मला डाकोटाला पाठवून दिलं, तेव्हा त्यांना वाटलं होतं, की मी तिथेच खितपत पडेन किंवा मग वैतागून राजीनामा देईन. पण मी दोन्हीही केलं नाही. मी परत आले. पण कोणालाही ते आवडलेलं नाहीये. एका एजंटने माझ्यावर पाळत ठेवायची आणि मला धोकादायक परिस्थितीत एकटं पाठवायची चूक केली. तेव्हा कायदेशीर कारवाईची धमकी देऊन मी परत आले. त्यांना मला परत घ्यायचं नव्हतं पण घ्यावं लागलं. त्यांनी त्यावेळी ते लक्षात ठेवलं आणि ते थांबले. हे पाहण्यासाठी की माझ्या हातून एखादी अक्षम्य चूक केव्हा होतेय आणि तसं झाल्यावर त्यांनी फास आवळला. मी किती जणांचे जीव वाचवले त्याने काहीही फरक पडत नाही. त्याचा पुरावा नाहीये. पण मी ते जेट घेऊन गेले आणि सरकारी मालकीच्या इंधनाचा गैरवापर केला? त्याचा पुरावा आहे.”
ती सांत्वन करण्याच्या पलीकडे गेली होती. मी विषय बदलायचं ठरवलं.
“ठीक आहे रॅशेल. जे झालं ते झालं. आपण आता आपल्यासमोर जे आहे, त्याचा विचार करू या. उद्या सकाळी साडेनऊ वाजता आपल्याला इथून निघायला पाहिजे, कारण दहा वाजता आपली तिथे वेस्टर्न डेटामध्ये अपॉइंटमेंट आहे.”
“त्याच्याबद्दल काय? उद्या आपण नक्की काय करणार आहोत तिथे जाऊन? उद्या मी तिथे जाईन, तेव्हा माझ्याकडे माझा बॅज नसणार. माझी गनसुद्धा नसणार. आणि तुझी इच्छा आहे, की आपण असंच तिथे जावं?”
“मला तिथे जाऊन बघायचंय. आपला अनसब तिथे आहे की नाही हे शोधून काढायचंय. नंतर आपण पोलिसांना किंवा एफ.बी.आय.ला तिथे बोलवू. पण हे मी शोधून काढलेलं आहे, आणि इतर कुणाच्याही आधी माझी तिथे जायची इच्छा आहे.”
“आणि नंतर तुला तुझ्या पेपरमध्ये याबद्दल लिहायचंय, बरोबर?”
“जर त्यांनी मला लिहू दिलं तर. पण काहीही झालं तरी मी याबद्दल लिहिणार आहेच. जर पेपरमध्ये नाही लिहू शकलो, तर पुस्तकात. पण मी याच्यावर लिहीन हे नक्की. म्हणूनच मला तिथे जायचंय.”
“ते ठीक आहे, पण तुझ्या पुस्तकात माझं खरं नाव लिहिता येणार नाही तुला.”
“आपण तुझ्यासाठी नवं नाव शोधू. तूच सांग, कोणतं नाव हवंय तुला?”
तिने थोडा विचार केला, “एजंट मिस्टी मनरो कसं वाटतं?”
“एखाद्या पोर्न स्टारचं नाव वाटतं,” मी खरं ते सांगितलं.
तिचा चेहरा परत गंभीर झाला, “मग काय करणार आहोत आपण? आपण सरळ तिथे जाऊन तर विचारू शकत नाही ना, की तुमच्यापैकी सीरियल किलर कोण आहे?”
“आपण क्लायंट म्हणून जायचंय तिथे. आपण सगळी जागा फिरून पाहू आणि जितक्या लोकांना भेटता येईल, तितक्या लोकांना भेटायचा प्रयत्न करू. तिथे प्रश्न विचारू. आमच्या फर्मच्या अत्यंत गोपनीय माहिती असलेल्या फाईल्स कोण हाताळणार आहे, वगैरे.”
“आणि?”
“आणि अशी आशा करू या की त्यांच्यापैकी कोणीतरी त्याच्या किंवा तिच्या नकळत आपल्याला एखादी माहिती पुरवेल. कदाचित मी एल्विसला तिथे पाहीन आणि ओळखेन.”
“त्याने हॉटेलमध्ये वेषांतर केलं होतं. तो त्याच्या नेहमीच्या रूपात तुझ्यासमोर आला, तर ओळखू शकशील त्याला तू?”
“कदाचित नाही, पण त्याला मी तिथे येईन याची अपेक्षा नसेल ना. मला पाहिल्यावर तो तिथून पळून जाण्याचा किंवा माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न करू शकतो. असं जर त्याने केलं, तर आपल्यासाठी चांगलंच आहे.”
“मला या प्लॅनमध्ये काहीही अर्थ वाटत नाहीये जॅक. खरं सांगायचं तर मला हा प्लॅनही वाटत नाहीये. मला असं वाटतंय की तुझ्याकडे काहीही योजना नसल्यामुळे तू जशी परिस्थिती येईल, तशी कृती करणार आहेस. पण यात प्रचंड धोका आहे.”
“कदाचित. म्हणून तर तुला मी माझ्याबरोबर नेतोय.”
“म्हणजे? तुझी बॉडीगार्ड म्हणून?”
“नाही. मला तुझी गन किंवा तुझा बॅज नकोय. तिथल्या कुणीही काहीही विचित्र किंवा नेहमीपेक्षा वेगळं वागायचा प्रयत्न केला, तर तू ते ताबडतोब पकडशील. माझी खात्री आहे.”
“तू अतिशयोक्ती करतो आहेस. मी काही मनकवडी वगैरे नाहीये.”
“माझा तसं म्हणायचा उद्देशच नव्हता रॅशेल. पण तुझ्यात एक खास गोष्ट आहे. अंतःप्रेरणा. मॅजिक जॉन्सन किंवा मायकेल जॉर्डनला बास्केटबॉल खेळताना पाहिलं आहेस कधी? त्याला बरोबर माहित असतं की कुठून तो बॉल बास्केटमध्ये पाठवू शकतो. तुझं तसंच आहे. माझ्याशी पाच मिनिटं बोलल्यावर तू लगेच जेट घेऊन नेवाडाला आलीस. कारण एकच - अंतःप्रेरणा. त्यानेच माझा जीव वाचवला. त्याच्यासाठी तू मला तिथे माझ्याबरोबर हवी आहेस.”
तिने माझ्याकडे एकटक पाहिलं. बराच वेळ. आणि मग होकारार्थी मान हलवली, “तसं असेल तर मग मी तिथे येईन जॅक!”
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
29 Aug 2015 - 12:30 am | राघवेंद्र
पुढचा भाग लवकरच टाका...
29 Aug 2015 - 12:30 am | राघवेंद्र
पुढचा भाग लवकरच टाका...
29 Aug 2015 - 1:10 am | मास्टरमाईन्ड
वेग थोडासा कमी वाटतोय
पण बहुतेक काहितरी वेगळंच वळण मिळेल असा अंदाज आहे.
29 Aug 2015 - 2:39 am | रातराणी
सही! आता शेवटच करून टाका!
29 Aug 2015 - 10:13 am | एस
पुभालटा!
29 Aug 2015 - 11:32 am | मोहन
आता २२ वा भाग उद्या का ?
29 Aug 2015 - 12:32 pm | santosh mahajan
पुभालटा
29 Aug 2015 - 1:00 pm | सई कोडोलीकर
अनुवादित वाटतच नाही, इतकं सुरेख रपांतरण करताहात.
रोचक होत चाललिये कथा. पुढच्या भागात काय होणार याची जाम उत्कंठा लागते.
29 Aug 2015 - 2:45 pm | पैसा
जबरदस्त उत्कंठा वाढली आहे!
28 Dec 2015 - 6:51 pm | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग २२