द स्केअरक्रो - भाग ‍९

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
11 Jul 2015 - 6:55 pm

द स्केअरक्रो भाग ८

द स्केअरक्रो भाग ९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली )

कार्व्हर पूर्ण दिवसभर कामात होता. सेंट लुईसमधल्या मर्सर अँड गिसाल लाॅ फर्मचं काँट्रॅक्ट अपेक्षेप्रमाणे मॅकगिनिसला मिळालं होतं. त्यांच्याकडे असलेली पूर्ण माहिती कार्व्हरला त्याच्या सिस्टिमवर आणायची होती. त्याच कामाने त्याचा पूर्ण दिवस व्यापला होता. त्याच्या नेहमीच्या राऊंडस् मारायलाही त्याला वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे एका डिजिटल पिंज-यात काहीतरी अडकलंय हे पाहिल्यावर छातीतून एक चमक गेल्यासारखं त्याला वाटलं. पडद्यावर एक गलेलठ्ठ उंदीर पिंज-यात पळताना दिसत होता. या पिंज-याचं नाव होतं TRUNK MURDER.

कार्व्हरने पिंजरा उघडला आणि उंदराला बाहेर काढलं. उंदराचे डोळे लाल गुंजांसारखे होते आणि त्याच्या धारदार दातांवरची चमकणारी लाळ आकाशी निळ्या रंगाची होती. त्याच्या गळ्यात एक पट्टा होता आणि त्याच्यावर एक चंदेरी रंगाचं लेबल होतं. लेबलवर क्लिक करुन कार्व्हरने उंदराला मिळालेली माहिती बाहेर काढली. त्याने आदल्या रात्रीची राऊंड संपवल्यावर कुणीतरी या www.trunkmurder.com साईटला भेट दिली होती. जेमतेम १०-१२ सेकंदच ही भेट टिकली होती पण तेवढंही पुरे होतं. ज्याने ही भेट दिली होती त्याचा आयपी अॅड्रेस कार्व्हरला मिळाला होता. त्या भेट देणा-याने trunk murder हे शब्द बहुधा एखाद्या सर्च इंजिनमध्ये टाकले होते. आता कुणी आणि का हे शोधून काढायचं होतं.

आयपी अॅड्रेसवरुन कार्व्हरने इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर शोधून काढला आणि परत त्याच्या छातीतून चमक गेली. बातमी चांगली होती आणि वाईटही. चांगली अशासाठी की याहूसारखा जगभर पसरलेला प्रोव्हायडर नव्हता. त्याच्यावरून हे शब्द टाईप करणारा कोण आहे हे शोधायला प्रचंड वेळ लागला असता आणि तो जगात कुठेही असू शकला असता. वाईट अशासाठी की हा प्रोव्हायडर अमेरिकेतच होता आणि जवळच होता. LATimes.com.

लाॅस एंजेलिस टाईम्स! कार्व्हरच्या छातीतली धडधड आता त्याला स्वतःला ऐकू येत होती. लाॅस एंजेलिसमधल्या कुठल्यातरी रिपोर्टरने त्याची साईट शोधून काढली होती.

कार्व्हर खुर्चीत मागे रेलला आणि या ' संकटाला ' कसं तोंड द्यायचं त्याचा विचार करु लागला. आयपी अॅड्रेस तर होता पण नाव नव्हतं. ज्याने हे नाव सर्च इंजिनमध्ये टाईप केलं तो रिपोर्टरच आहे याचीही खात्री नव्हती. एल.ए.टाईम्ससारख्या मोठ्या पेपरमध्ये अनेक रिपोर्टर नसलेले लोकही काम करतातच की!

कार्व्हर बाजूच्या वर्कस्टेशनवर गेला आणि त्याने मॅकगिनिस म्हणून लाॅग इन केलं. मॅकगिनिसचे सगळे पासवर्डस् त्याने खूप आधी शोधून काढले होते पण वापरायची वेळ कधी आली नव्हती. तो एल.ए.टाइम्सच्या वेबसाईटवर गेला आणि अर्काईव्हज् विंडोवर जाऊन त्याने trunk murder टाईप केलं. तीन स्टोरीज त्याच्यासमोर आल्या. सर्वात जुनी तीन आठवड्यांपूर्वीची होती आणि सर्वात नवीन त्याच दिवशी वेब एडिशनमध्ये आली होती. म्हणजेच दुस-या दिवशी सकाळच्या पेपरमध्ये ती प्रकाशित होणार होती. कार्व्हरने ती वाचायला सुरुवात केली -

एल्.ए.पी.डी. ने टाकलेल्या धाडीमुळे समाजात तणाव
- अँजेला कुक आणि जॅक मॅकअॅव्हाॅय (टाईम्स स्टाफ रायटर्स.)

लाॅस एंजेलिसच्या वॅटस् भागात असलेल्या रोडिया गार्डन्स वस्तीमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीवर स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रखर टीका केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अल्पसंख्याक समाज राहात असलेल्या या वस्तीत ड्रग्जचा प्रश्न पूर्वीपासून आहे पण पोलिसांनी मात्र एका गो-या स्त्रीची तिथे हत्या झाल्यावरच धाड टाकण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी मंगळवारी हे जाहीर केलं की त्यांनी या धाडीत ड्रग्जच्या विक्रीत सहभागी असणा-या १६ जणांना रोडिया गार्डन्समधून अटक केलेली आहे आणि ड्रग्जही जप्त केलेली आहेत. ही कारवाई करण्याआधी एक पूर्ण आठवडा पोलिसांनी या वस्तीची टेहळणी केली होती असंही पोलिस सूत्रांनी सांगितलं. हाॅलीवूडमध्ये राहणा-या २३ वर्षीय डेनिस बॅबिटच्या हत्येनंतर ही टेहळणी आणि कारवाई करण्यात आली. १६ वर्षांच्या एका मुलाला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. त्याचे या भागात असलेल्या गँग्जशी संबंध असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. बॅबिटचा मृतदेह दोन आठवड्यांपूर्वी तिच्याच गाडीच्या ट्रंकमध्ये सांता मोनिका येथील समुद्रकिना-याजवळ असलेल्या एका पार्किंग लाॅटमध्ये सापडला होता. पोलिसांना त्यांच्या तपासामध्ये डेनिस बॅबिट रोडिया गार्डन्समध्ये ड्रग्ज खरेदी करण्यासाठी गेली असण्याची शक्यता लक्षात आली आणि तिचं तिथेच अपहरण आणि १२ ते १८ तासांच्या अत्याचारांनंतर खून झाला असल्याचीही शक्यता असल्याचं लक्षात आलं.
कार्यकर्त्यांचा प्रश्न हा आहे की पोलिसांचे ड्रग्जविरोधी प्रयत्न हे तिचा खून व्हायच्या आधी का सुरु झाले नाहीत? डेनिस बॅबिट गोरी असून तिचा खून जिथे झाला असा पोलिसांना संशय आहे ती रोडिया गार्डन्स ही वस्ती जवळजवळ १००% कृष्णवर्णीय लोकांची आहे ह्याकडे या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
रेव्हरंड विल्यम ट्रीचर, जे या भागातील एक प्रभावशाली कार्यकर्ते आहेत, त्यांनी खालील शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली, " ही वस्तुस्थिती आहे की लाॅस एंजेलिस पोलिस डिपार्टमेंटमध्ये वर्णद्वेष अजूनही अस्तित्वात आहे. रोडिया गार्डन्स आणि तिथली गुन्हेगारी आणि ड्रग्ज हे पोलिसांच्या खिजगणतीतही नव्हते पण जेव्हा एक ड्रग्ज घेणारी आणि उपजीविकेसाठी देहप्रदर्शन करणारी गोरी स्त्री इथे आली आणि तिची हत्या झाली तेव्हा मात्र ते खडबडून जागे झाले आणि लगेच एक टास्क फोर्स निर्माण करण्यात आला. याआधी पोलिस कुठे होते? हा टास्क फोर्स कुठे होता? काळ्या लोकांच्या वस्तीमधल्या प्रश्नांची दखल फक्त गो-या लोकांविरूद्ध एखादा गुन्हा घडल्यावरच का घेतली जाते? "
पोलिसांनी मात्र हा वर्णद्वेषाचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या अनेक कारवाया यापूर्वीदेखील झालेल्या आहेत. कॅप्टन आर्ट ग्राॅसमन, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली त्यांनी असा प्रतिप्रश्न विचारला की जर पोलिसांनी ड्रग डीलर्स आणि इतर समाजविघातक गुन्हेगारांना अटक करुन लोकांचं जीवन सुखकर केलं तर त्याबद्दल कोणाची हरकत असणार आहे?

कार्व्हर वाचता वाचता थांबला. त्याला अजूनतरी कुठल्याही प्रकारचा धोका जाणवला नव्हता. पण टाईम्समधल्या कुणीतरी - कुक किंवा मॅकअॅव्हाॅय - ट्रंक मर्डर हे शब्द सर्च इंजिनमध्ये घातले होते. काय कारण असावं? कदाचित ते अंधारात तीर मारत असतील. का अजून काही?

त्याने आधीच्या दोन स्टोरीज वाचल्या. दोन्ही मॅकअॅव्हाॅयनेच लिहिल्या होत्या आणि दोन्हीही डेनिस बॅबिटशीच संबंधित होत्या. पहिली तिचा मृतदेह सापडला त्याबद्दल आणि दुसरी तिच्या खुनाबद्दल एका १६ वर्षांच्या मुलाला अटक झाली, त्याबद्दल. हे वाचताना कार्व्हरच्या चेह-यावर समाधानाचं हसू पसरलं पण त्याला अजूनही खात्री नव्हती. त्याने अर्काईव्ह सर्चमध्ये मॅकअॅव्हाॅयचं नाव टाकलं आणि भरपूर स्टोरीज समोर आल्या. सर्व गुन्हेगारीशी संबंधित होत्या. अच्छा! म्हणजे हा क्राईम रिपोर्टर होता तर! त्याच्या प्रत्येक स्टोरीखाली त्याचा इमेल आयडी होता : JackMcEvoy@LATimes.com.

कार्व्हरने नंतर अँजेला कुकचं नाव सर्च इंजिनमध्ये टाकलं. अगदीच कमी स्टोरीज समोर आल्या. तिची टाईम्ससाठी केलेली पहिली स्टोरी सहा महिन्यांपूर्वीची होती आणि पहिली क्राईम स्टोरी गेल्या आठवड्यातलीच. त्याआधी तिने कचरा गोळा करणा-या कर्मचा-यांच्या संपापासून ते हँबर्गर खाण्याच्या स्पर्धेपर्यंत विविध विषयांवर स्टोरीज लिहिल्या होत्या. तिचा स्वतःचा असा कोणताही बीट दिसत नव्हता. पण या आठवड्यात तिला मॅकअॅव्हाॅयसोबत दोन बायलाईन्स मिळाल्या होत्या.

" तो प्रशिक्षण देतोय तिला, " कार्व्हर मोठ्याने म्हणाला.

याचा अर्थ कुक मॅकअॅव्हाॅयपेक्षा तरूण असणार. म्हणजे तिच्याबद्दल माहिती मिळवणं सोपं आहे. एक क्षणभर विचार करुन कार्व्हरने फेसबुकवर एक वेगळाच आयडी वापरून लाॅग इन केलं आणि अँजेला कुकचं फेसबुक पेज शोधून काढलं. तिच्या पेजवर असलेली माहिती फक्त तिचे फेसबुकवरचे मित्रच बघू शकणार होते पण तिचा फोटो मात्र होता. सुंदरच होती ती दिसायला. खांद्याच्या खाली गेलेले लांब सोनेरी केस, हिरवेकंच डोळे आणि ओठांचा चंबू! हाय हाय! कार्व्हरच्या मनात विचार आला. ह्या ओठांचं काहीतरी करायला पाहिजे. फोटो चेह-याचाच असल्यामुळे तो थोडा वैतागला. तिचा पूर्ण देह त्याला बघायचा होता, विशेषतः तिचे पाय कसे आहेत आणि किती लांब आहेत ते.

त्याने गुणगुणायला सुरूवात केली. उत्तेजित झाल्यावर शांत करणारी ही एक गोष्ट होती त्याच्याकडे. ६०-७० च्या दशकांमधली हार्ड राॅक गाणी - जी क्लबमध्ये वाजायची आणि ज्यांच्यावर बायका आपले कपडे उतरवत नाचायच्या!

त्याने अजून शोधायला सुरूवात केली. अँजेला कुकचं एक मायस्पेस पेजही होतं जे ती आता वापरत नव्हती पण तिने ते मिटवूनही टाकलं नव्हतं. तिचं लिंक्डइन पेज त्याला मिळालं. त्यावर तिची व्यावसायिक माहिती होती. आणि तिथून मग त्याला घबाड मिळालं - तिचं ब्लाॅगपेज - cityofangela.blogspot.com. या पेजवर तिने तिचं लाॅस एंजेलिसमधलं वास्तव्य, आयुष्य आणि काम याबद्दल पोस्टस् टाकल्या होत्या. सर्वात शेवटची एन्ट्री ही तिला शेवटी क्राईम बीट कव्हर करायला मिळाल्याबद्दल आणि जॅक मॅकअॅव्हाॅयसारख्या सेलिब्रिटी रिपोर्टरबरोबर काम करायला मिळणार असल्याबद्दल होती. तिने वापरलेल्या शब्दांवरुनच ती किती उत्तेजित झालेली आहे ते कळत होतं.

किती भोळी आणि दुस-यावर पटकन् विश्वास टाकणारी असतात ही तरुण मुलं! कार्व्हरला नेहमीच त्याबद्दल आश्चर्य वाटत असे. त्यांना हे समजतच नाही की कुणी त्यांच्या मागावर असू शकतो. त्यांना असं वाटतं की ते इंटरनेटवर त्यांना वाटेल तसं, वाटेल तेव्हा आणि वाटेल त्याच्या समोर आपलं मन मोकळं करतील, आपली माहिती आणि फोटो पोस्ट करतील आणि त्याचा काहीच परिणाम होणार नाही!

अँजेलाच्या ब्लाॅगवरुन कार्व्हरला तिच्याविषयी बरीच माहिती कळत गेली. ती मूळची कुठली आहे, तिचं काॅलेज, त्यातले ग्रुप्स, तिच्या कुत्र्याचं नाव. डेथ कॅब फाॅर क्युटी हा तिचा आवडता बँड होता आणि मोझ्झा नावाच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारा पिझा तिला प्रचंड आवडत होता. तिचा वाढदिवसही त्याला समजला आणि हेही समजलं की फक्त तिच्या फ्लॅटपासून फक्त दोन ब्लाॅक्स चालल्यावर तिचं आवडतं रेस्टॉरंट - मोझ्झा - होतं. तो हळूहळू तिच्याभोवती घिरट्या घालत होता पण तिला त्याची खबरही नव्हती!

तिच्या ब्लाॅगवर असलेलं एक पोस्ट पाहून कार्व्हर थबकला. त्यात तिने तिच्या ' आवडत्या ' सीरियल किलर्सविषयी लिहिलं होतं - My top 10 serial killers. त्यातल्या लोकांची नावं त्यांच्या गुन्ह्यांमुळे अगदी घरभर पोचलेली होती. तिच्या या यादीत सर्वात वर, पहिल्या नंबरवर होता टेड बंडी, कारण " तो शेवटी फ्लोरिडामध्ये पकडला गेला आणि मी फ्लोरिडामधलीच आहे. "

कार्व्हरने स्वतःच्या ओठांचा तिच्यासारखाच चंबू केला. त्याला ही पोरगी आवडली होती!

बझर वाजला. कार्व्हरने त्याक्षणी इंटरनेट कनेक्शन बंद केलं आणि कॅमेरा फीड पाहिलं. मॅकगिनिस आत येत होता. त्याच्याकडे स्वतःचं की कार्ड होतं. तो आत आला तेव्हा कार्व्हर उभा राहिला.

" इथे काय करतो आहेस? " मॅकगिनिसने विचारलं.

" माझ्या आॅफिसमध्ये एक प्रोग्रॅम टेस्ट करतोय मी. इथे आत्ता मर्सर अँड गिसालचा डेटा चेक करायला आलो होतो. "

मॅकगिनिसचं समाधान होण्यासाठी एवढं पुरे होतं. त्याने खिडकीतून दिसणा-या सर्व्हर रुमकडे पाहिलं. ही सर्व्हर रुम म्हणजे त्याच्या कंपनीचं हृदय होती.

" कसं चालू आहे मर्सर अँड गिसालचं काम? "

" नेहमीचे जे प्राॅब्लेम्स येतात तेवढेच. नथिंग सीरियस. त्यांनी दिलेल्या डेडलाईनच्या आधीच आपण काम पूर्ण करु शकतो. मला कदाचित तिथे एकदा जाऊन यावं लागेल. एक-दोन दिवसांसाठी. "
" गुड! तू एकटाच आहेस इथे? बाकीचे कुठे आहेत? "
" स्टोन आणि अर्ली एक नवा टाॅवर बनवताहेत. मी माझा नाईट शिफ्ट रिलीव्हर येईपर्यंत इथून सगळं माॅनिटर करतोय. "

मॅकगिनिसचा चेहरा उजळला. नवीन टाॅवर म्हणजे अजून जास्त बिझिनेस!

" अजून काही?"
" टाॅवर थर्टी सेव्हनमध्ये काहीतरी प्राॅब्लेम वाटतोय. मी त्याच्यावर असलेल्या फाईल्स दुसरीकडे घेतल्या आहेत. तात्पुरता प्रश्न आहे. "
" डेटा लाॅस?"
" मला नाही वाटत! "
" कुणाचा आहे डेटा?"
"एक प्रायव्हेट नर्सिंग होम आहे कॅलिफोर्नियामधलं. कोणी मोठा क्लायंट नाहीये. "

मॅकगिनिसने सुटकेचा निःश्वास सोडला. ह्या क्लायंटबद्दल त्याला चिंता नव्हती.

" गेल्या आठवड्यात जो घुसखोरीचा प्रयत्न झाला होता त्याचं काय? " त्याने विचारलं.
" आपण काळजी घेतली ना त्याची. गुथ्री अँड जोन्समधला डेटा या चोराला उचलायचा होता. एक मोठी सिव्हिल ट्रायल आहे एका तंबाखू कंपनीविरुद्ध. गुथ्री अँड जोन्स त्या कंपनीचे वकील आहेत. त्यांच्याविरूद्ध बिग्ज, बार्लो अँड काउड्री नावाची लाॅ फर्म आहे. तिथल्या कोणत्यातरी अतिहुशार माणसाला वाटलं की गुथ्री अँड जोन्सनी डिस्कव्हरी फाईलमध्ये काही गोष्टी मुद्दामहून लिहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्याने स्वतःच त्या गोष्टी पाहायचा प्रयत्न केला."
" आणि?"
" एफ्.बी.आय. ने त्या माणसाविरुद्ध तपास चालू केला आहे. तो चाईल्ड पोर्नोग्राफीमध्ये सक्रीय सहभागी होता असा पुरावाही मिळालेला आहे त्यांना. तो आता आपल्याला त्रास देणार नाही! "

मॅकगिनिसने समाधानाने मान डोलावली, " दॅटस् माय स्केअरक्रो! " तो म्हणाला, " तुझ्यासारखं खरंच कुणी नाही! वेस्ली कार्व्हर द बेस्ट! "

कार्व्हरला हे मॅकगिनिसकडून ऐकायची गरज नव्हती. पण शेवटी तो बाॅस होता. त्याचे पैसे आणि कार्व्हरचं डोकं यांच्या मिलाफातूनच तर हा सगळा डोलारा उभा राहिला होता. आपल्याला लोकांपुढे आणणारा मॅकगिनिसच आहे याची कार्व्हरला जाणीव होती आणि कार्व्हर आपल्यासाठी किती महत्वाचा आहे याची मॅकगिनिसला. एक आठवडा जात नसेल जेव्हा त्याच्या एखाद्या स्पर्धकाने कार्व्हरला एखादी भक्कम आॅफर देऊन आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला नसेल.

"थँक्स! " कार्व्हरला मॅकगिनिसला लवकरात लवकर कटवायचं होतं.

मॅकगिनिस जायला वळला आणि थांबला, " मी नंतर एअरपोर्टला एका पार्टीला घ्यायला चाललोय. उद्या त्यांना आपल्याला सगळं दाखवायला लागेल. "
" कुठे घेऊन जाणार आहेस तू त्यांना?"
" आज रात्री? रोझीज् बार्बेक्यू! "
" अच्छा! नेहमीप्रमाणेच. आणि नंतर कुठे? हायलाईटर?"
" जर त्यांनी तशी फर्माइश केली तर जावं लागेल. या वेळी चेंज म्हणून तू येतोस का? हे लोक तुझं बोलणं ऐकून खूप प्रभावित होतील. "
" समोर कॅबरे चालू असताना आणि मुली त्यांचे कपडे उतरवत असताना ते माझं बोलणं कशासाठी ऐकतील? मला स्वतःला त्यात अजिबात रस नाही! "
" वेल्, तुझ्याएवढं नसलं तरी हेही कठीण काम आहे. कुणाला तरी ते करायलाच पाहिजे. ठीक आहे. मी तुझा जास्त वेळ घेत नाही. "

मॅकगिनिस कंट्रोल रुमच्या बाहेर पडला. त्याने एक खोल नि:श्वास सोडला. कार्व्हर जरी त्याला बाॅस म्हणत असला तरी हा जमिनीच्या जवळजवळ वीस फूट खाली असलेला बंकर म्हणजे कार्व्हरचं साम्राज्य होतं आणि मॅकगिनिसला तिथे नेहमीच अवघडल्यासारखं वाटत असे. त्याचं स्वतःचं आॅफिस जमिनीवरती होतं आणि तो जास्तीत जास्त काळ तिथे घालवत असे. त्यामागचं एक कारण कार्व्हरला टाळणं हेही होतं. कंपनीच्या अनेक व्यवसायांपैकी वेब होस्टिंग आणि डिझायनिंग हे दोन्ही जमिनीवर होते पण मुख्य व्यवसाय - को-लोकेशन मात्र बंकरमध्ये होता. फार थोड्या लोकांना दोन्हीही ठिकाणी जायची मुभा होती. कार्व्हरला तसंच आवडत असे आणि त्याला दुखावण्याची मॅकगिनिसची इच्छाही नव्हती आणि हिंमतही नव्हती.

मॅकगिनिस गेल्यानंतर कार्व्हर परत वर्कस्टेशनपुढे बसला आणि त्याने अँजेला कुकचा फोटो पडद्यावर आणला आणि काही मिनिटं त्याच्याकडे एकटक पाहिलं. नंतर गूगल चालू केलं. आता त्याला जॅक मॅकअॅव्हाॅयबद्दल जाणून घ्यायचं होतं. बघू या जॅक अँजेलाएवढाच स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल बेफिकीर आहे की सावध आहे.

त्याने मॅकअॅव्हाॅयचं नाव सर्च इंजिनमध्ये टाकलं आणि जी माहिती त्याच्या समोर आली ती पाहिल्यावर तो नव्याने उत्तेजित झाला. मॅकअॅव्हाॅयचा ब्लाॅग किंवा फेसबुक पेज किंवा लिंक्डइन पेज वगैरे काहीही नव्हतं पण तरीही गूगलवर त्याच्याबद्दल भरपूर माहिती होती. कार्व्हरला त्याचं नाव थोडं ओळखीचं वाटलं होतं आणि त्याला आता ते का, ते समजलं. बारा वर्षांपूर्वी मॅकअॅव्हाॅयने पोएट नावाच्या सीरियल किलरवर पुस्तक लिहिलं होतं. कार्व्हरने ते वाचलेलंही होतं. आणि विशेष म्हणजे त्याने फक्त हे पुस्तक लिहिलं नव्हतं तर त्याआधी त्याने या सीरियल किलरचा बुरखा फाडला होता आणि त्याला जगापुढे आणलं होतं. पोएटच्या शेवटच्या क्षणांचा तो साक्षीदार होता.

जॅक मॅकअॅव्हाॅय! सीरियल किलर्सचा कर्दनकाळ!

कार्व्हरने अॅमेझाॅनवर जाऊन पोएटवरचं पुस्तक पाहिलं. तिथे मॅकअॅव्हाॅयचा फोटोदेखील होता.
" वेल, जॅक! " कार्व्हर स्वत:शीच म्हणाला, " हा मी माझा सन्मान समजू का? "

अँजेला कुकच्या कुत्र्याचं नाव आर्फी होतं. तिच्या ब्लाॅगमध्ये तशी नोंद होती. पाच महिन्यांपूर्वी तिने ही पोस्ट आणि आर्फीचे फोटोही टाकले होते. त्यावरून कार्व्हरने दोन मिनिटांत तिचा LATimes.com इमेल अकाउंटचा पासवर्ड शोधून काढला.

दुस-यांच्या इमेल अकाउंटमधून त्यांच्या काँप्युटर्समध्ये जाणं कार्व्हरला प्रचंड आवडायचं. एखाद्याच्या नकळत त्याची माहिती चोरण्यातली मजा वेगळीच! परकायाप्रवेश केल्यासारखंच वाटायचं त्याला!

तिचे इमेल्स उघडून त्याने वाचायला सुरूवात केली. तिचा इमेल अकाउंट ती नित्यनियमाने बघत असावी. फक्त दोन मेल्स तिने वाचलेली नव्हती. बाकी सगळे वाचलेले आणि सेव्ह केलेले होते. अॅलन प्रेन्डरगास्ट नावाच्या माणसाशी तिचा बराच संपर्क होता. बहुतेक तो तिचा सुपरवायझर किंवा एडिटर असावा.
एका मेलमध्ये तिने कुठलीतरी स्टोरी तिला लिहायला न मिळाल्याबद्दल वैताग प्रदर्शित केला होता आणि त्यावर प्रेन्डरगास्टने तिला सबुरीचा सल्ला दिला होता. पण कार्व्हरला मूळ पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे त्याला संदर्भ समजला नाही. त्याने त्याचा नाद सोडून अँजेलाच्या जुन्या मेल्सचं फोल्डर उघडलं. इथे जॅक मॅकअॅव्हाॅयने तिला बरीच मेल्स पाठवलेली होती. अँजेला आणि मॅकअॅव्हाॅय आता-आतापर्यंत एकमेकांशी फारसे परिचित नव्हते हे कार्व्हरच्या लक्षात आलं. त्यांची एकमेकांबरोबर वापरायची भाषा बरीच औपचारिक आणि अगदी मोजूनमापून होती. बहुतेक जॅक तिला ट्रेनिंगच्याच निमित्ताने ओळखायला लागला होता.

जॅकने तिला पाठवलेल्या मेल्समधला शेवटचा मेल ते दोघंही एकत्र काम करत असलेल्या एका स्टोरीबद्दल होता. मॅकअॅव्हाॅयने या स्टोरीला ' टक्कर ' असं नाव दिलं होतं. स्टोरी अलोन्झो विन्स्लोला डेनिस बॅबिटच्या खुनाबद्दल झालेली अटक, त्याचं रोडिया गार्डन्ससारख्या गुन्हेगारीने वेढलेल्या वस्तीत गेलेलं बालपण, त्याचं अल्पवयीन गुन्हेगार म्हणून असलेलं रेकाॅर्ड, आणि डेनिस बॅबिट आणि तो यांचे मार्ग कुठे एकमेकांच्या समोर आले - त्याबद्दल होती.

वाचतावाचता कार्व्हरच्या मानेचे ताठरलेले स्नायू हळूहळू शिथिल होत गेले. मॅकअॅव्हाॅय आणि कुक - दोघांनाही काहीही माहित नव्हतं. कर्दनकाळ जॅक कुठल्यातरी भलत्याच भ्रमात होता.

ही स्टोरी प्रकाशित झाल्यावर कार्व्हर आवर्जून वाचणार होता. या जगात फक्त चार लोक होते, ज्यांना ती पूर्णपणे चुकीची आहे हे माहित होतं. वेल्, आता तीन. डेनिस बॅबिट तर या जगात नव्हती. अलोन्झो विन्स्लो होता पण त्याच्यावर कोण विश्वास ठेवेल?

अँजेला कुकने पाठवलेली मेल्स पाहायला कार्व्हरने सुरूवात केली आणि लवकरच तो कंटाळला. आधी पाठवलेल्या मेल्सची उत्तरं आणि प्रेन्डरगास्टचे सल्ले याशिवाय काहीही दिसत नव्हतं.

इमेल बंद करुन तो तिने पाहिलेल्या वेबसाईटस् शोधायला लागला. त्याची स्वतःची trunkmurder.com साईट तर त्यात होतीच आणि शिवाय इतर पेपर्सच्या वेबसाईटसनाही तिने भेट दिली होती. त्यात एक साईट त्याला जरा वेगळी वाटली. Danika'sDungeon.com. ही बाँडेज-डाॅमिनेशन साईट होती. पूर्ण साईटभर पुरुषांना चाबकाचे फटके मारणा-या आणि त्यांचे हाल करणा-या बायकांचे फोटो होते. कार्व्हरच्या चेह-यावर स्मित पसरलं. अँजेलाने ही साईट कामाच्या निमित्ताने नक्कीच उघडलेली नव्हती. त्याला खात्री होती की ती तिची व्यक्तिगत आवडीची साईट होती.

ही माहिती पुढे कधीतरी वापरता येईल. त्यावर वेळ न घालवता त्याने प्रेन्डरगास्टचा इमेल उघडला. त्याचा पासवर्ड एखाद्या लहान मुलालाही सांगता आला असता. लोक एवढे मूर्ख का असतात? तो त्याच्या इनबाॅक्समध्ये गेला आणि सर्वात वरती मॅकअॅव्हाॅयने पाठवलेला एक मेल त्याला दिसला. दोन मिनिटांपूर्वीच आला होता हा मेल.

"काय चाललंय तुझं जॅक? "

कार्व्हरने मेल उघडला. मेलची एक काॅपी जॅकने अँजेलालाही पाठवली होती.

' प्रेन्डो, मी तुला शोधत होतो पण तू जेवायला गेला होतास. मी तुला सांगितलेली स्टोरी बदलतेय. अलोन्झोने खुनाची कबुली दिलेली नाही आणि मला स्वतःलाही त्याने तो खून केलेला आहे असं वाटत नाहीये. या स्टोरीसंदर्भात मला लास वेगासला जावं लागतंय. तिथे उद्या जी माहिती मिळेल ती मी तुला कळवेन. तोपर्यंत अँजेला बीटवरच्या स्टोरीज करेल. मी काही असेल तर तुला फोन किंवा मेल करीन. '

आपल्या घशाशी काहीतरी आल्यासारखं कार्व्हरला वाटलं. त्याच्या मानेचे स्नायू परत ताठरले आणि त्याने खुर्ची टेबलापासून मागे ढकलली. उलटी झाली तर काँप्युटर खराब झाला असता. त्याने पटकन एक छोटा
कच-याचा डबा उचलून तोंडाजवळ धरला. पाच-सहा क्षणांसाठी त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी दाटून आली. त्याने दीर्घ श्वास घ्यायला सुरूवात केली. हळूहळू अंधारी दूर झाली. जवळच असलेल्या एका पाण्याच्या बाटलीतलं पाणी घटाघटा पिऊन कार्व्हरने बाटली कच-याच्या डब्यात टाकली, डबा खाली ठेवला, आणि जॅकचा मेल परत एकदा लक्षपूर्वक वाचायला सुरूवात केली.

मॅकअॅव्हाॅयने लास वेगासमधली केस शोधून काढली होती. याचा दोष कार्व्हरवरच येत होता. त्याने त्याची ' पद्धत ' परत वापरायला नको होती. त्याच्या चुकीमुळे कर्दनकाळ जॅक आता त्याच्या मागावर होता. तो एकदा लास वेगासला पोचला की संपलं. काय घडलंय त्याचा छडा लावल्याशिवाय तो सोडणार नाही.

हे थांबवायला हवं. थांबवायलाच हवं. गंभीर चूक झाली आहे पण ती सुधारता येऊ शकते. कार्व्हर स्वतःलाच हे सांगत होता. डोळे बंद करुन त्याने थोडा विचार केला. त्याचा आत्मविश्वास हळूहळू परत येत असल्याचं त्याला जाणवलं. आपण प्रत्येक प्रसंगासाठी तयार आहोत. त्याने स्वतःलाच समजावलं. त्याच्या डोक्यात एक प्लॅन आकार घेत होता.

सर्वप्रथम त्याने प्रेन्डरगास्ट आणि अँजेला कुक या दोघांच्याही इमेल अकाउंटमधून जॅकने पाठवलेला मेल मिटवला. दोघांनीही तो वाचलेला नव्हता आणि जॅक काय करणार आहे हे त्यांना आता समजणार नव्हतं.

त्याचसोबत त्याने प्रेन्डरगास्टच्या अकाउंटमध्ये एक स्पायवेअर प्रोग्रॅम सोडून दिला. आता प्रेन्डरगास्टने आपल्या काँप्युटरच्या कीबोर्डवर काहीही टाईप केलं तरी त्याला समजलं असतं. अँजेलाच्या अकाउंटमध्येही कार्व्हरने हा प्रोग्रॅम टाकला. जॅकच्या अकाउंटमध्येही तसंच करायचा त्याचा विचार होता पण त्याने थांबायचं ठरवलं. जोपर्यंत जॅक वेगासला पोहोचत नाही, तोपर्यंत. जर तो आता सावध झाला असता, तर मोठाच प्राॅब्लेम आला असता.

तिथून उठून तो सर्व्हर रुममध्ये आला. तिथल्या थंड हवेने त्याला अजून बरं वाटलं. तो सरळ सहाव्या टाॅवरपाशी गेला, खिशातून एक चाव्यांचा जुडगा काढून त्याने रेफ्रिजरेटरप्रमाणे दिसणा-या सर्व्हरचा दरवाजा उघडला, दोन डेटा ब्लेडस् अगदी थोडी बाहेर खेचली. आणि लगेचच सर्व्हर आणि सर्व्हर रुम बंद करुन तो परत आधीच्या वर्कस्टेशनपाशी आला. काही क्षणांतच एक अलार्म सगळ्या वर्कस्टेशन्सच्या पडद्यांवर दिसायला लागला. कार्व्हरने त्याच्या वर्कस्टेशनवरुन एक रिस्पाॅन्स प्रोटोकाॅल कार्यान्वित केला, मनातल्या मनात वीसपर्यंत आकडे मोजले आणि इंटरकाॅम उचलून मॅकगिनिसच्या आॅफिसचं एक्स्टेन्शन बटन दाबलं.

" बाॅस? अजून आहेस तू आॅफिसमध्ये?"
" काय झालं वेस्ली? मी निघतोच आहे. "
" कोड 3 प्राॅब्लेम आहे बाॅस! इथे आलास तर बरं होईल. "

कोड 3 म्हणजे अत्यंत गंभीर परिस्थिती. हातातलं सगळं काम सोडून आधी ती हाताळायला पाहिजे.

" आलो. " मॅकगिनिसने इंटरकाॅम खाली ठेवला.

आपल्या चेह-यावरचं स्मित आवाजात न येऊ देण्याची काळजी कार्व्हरने घेतली होतीच. मोजून ३ मिनिटांत मॅकगिनिस धापा टाकत तिथे आला. बहुधा धावत आला असावा.

" काय प्राॅब्लेम झालाय?"
" ड्यूवी अँड बाख, एल्.ए. मधले टॅक्स लाॅयर्स. "
" त्यांचं काय?"
" डेटा बाँबिंग. सगळा रुट कोलमडलाय. "
" काय सांगतोस? कसं काय पण?"
" हाच प्रश्न मलाही पडलाय. "
" कोणी केलं असेल हे?"
कार्व्हरने खांदे उडवले, " इथून नाही सांगता येणार. त्यांची अंतर्गत सिस्टिम करप्ट झालेली असू शकते. "
" त्यांना सांगितलंस तू? "
" नाही. तुला आधी सांगणं मला योग्य वाटलं. "

मॅकगिनिसकडे अर्थातच याचं उत्तर नव्हतं. तो नुसताच बावचळल्यासारखा सर्व्हर रुमकडे बघत होता. जणू उत्तर तिथे होतं.

" तुला काय वाटतंय? " त्याने कार्व्हरला विचारलं.
" इथे नक्कीच प्राॅब्लेम नाहीये. मी सगळं चेक केलंय. त्यांच्या बाजूनेच असेल काहीतरी. मला वाटतं इथून कोणालातरी पाठवून हा प्राॅब्लेम सोडवला पाहिजे. म्हणजे डेटा ट्रॅफिक परत सुरु होऊ शकेल. स्टोनची ड्यूटी आहे आत्ता. त्याला पाठवू शकतो आणि पुन्हा असा प्रश्न उद्भवणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल आपल्याला. जर कोणी हॅक करायचा प्रयत्न केला असेल तर त्याचाही बंदोबस्त करावा लागेल. "
" किती वेळ लागेल? "
" फिनिक्सवरुन एल्.ए.साठी दर तासाला फ्लाईटस् आहेत. मी स्टोनला बसवून देतो. तो उद्या सकाळी आपलं काम सुरु करेल. उद्या संध्याकाळपर्यंत सगळं नाॅर्मल करुन तो परत पण येईल. "
" मग तू का नाही जात? मला हा प्राॅब्लेम लवकरात लवकर सोडवायचाय. "

कार्व्हर थांबला. मुद्दामच. मॅकगिनिसला वाटलं पाहिजे की ही त्याची स्वतःची कल्पना आहे.

" फ्रेडी ही परिस्थिती हाताळू शकेल. मला खात्री आहे. "
" पण आपल्याकडचा सर्वोत्तम माणूस तू आहेस. ड्यूवी अँड बाखने उद्या असं म्हणायला नको की आपण त्यांना नीट सेवा दिली नाही. तुम्हाला काही प्राॅब्लेम आला तर आम्ही आमचा सर्वोच्च आणि सर्वोत्तम माणूस पाठवतो, कुणा नवशिक्याला नाही हे त्यांना समजलं पाहिजे. तू हवंतर स्टोनला बरोबर घेऊन जा. पण तू जावंस अशीच माझी इच्छा आहे. "
" ठीक आहे. मग कशाला वेळ घालवायचा? आम्ही आत्ताच निघतो. "
" मला काय होतंय ते कळव."
" ठीक आहे. "
" मला आता एअरपोर्टवर जायला पाहिजे, पार्टीला रिसीव्ह करण्यासाठी. "
" हो. तू आणि तुझं कठीण काम! "
" आठवण करुन देऊ नकोस. "

कार्व्हरच्या खांद्यावर एक थाप मारून मॅकगिनिस हसत हसत तिथून निघून गेला.

काही क्षण कार्व्हर सुन्न झाल्यासारखा बसून होता. त्याला कोणीही अंगाला हात लावलेला आवडत नसे. शेवटी तो उठला आणि त्याने स्क्रीन अलार्म निष्क्रिय केला, प्रोटोकाॅल पाहिला आणि मिटवला.

नंतर कार्व्हर स्वतःच्या आॅफिसमध्ये गेला आणि मोबाईल फोन काढून त्याने स्पीड डायलवरच्या एका नंबरला फोन लावला.

" काय झालं? " फ्रेडी स्टोनने दुस-या बाजूने विचारलं.
" तू अजून अर्लीबरोबर आहेस? "
" हो. आम्ही एक टाॅवर बनवतोय. "
" इथे माझ्या आॅफिसमध्ये ये. एक प्राॅब्लेम आलाय. खरं सांगायचं तर दोन प्राॅब्लेम्स. आणि आपल्याला ते आत्ताच सोडवायला हवे आहेत. माझ्याकडे एक प्लॅन आहे. "
" आलोच. "

कार्व्हरने आपला मोबाईल फोन बंद केला.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी.)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

वा. नेहमीप्रमाणेच थरारक!

गामा पैलवान's picture

11 Jul 2015 - 8:46 pm | गामा पैलवान

बोका,

कथा उत्कंठावर्धक आहे. खरंतर मागच्या भागापर्यंत वाचल्यावर राहवलं नाही म्हणून पीडीएफ शोधून उरलेली सगळी इंग्रजीतून वाचली. आता परत मराठी अनुवाद वाचायला मजा येतेय. धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

प्रीत-मोहर's picture

11 Jul 2015 - 11:08 pm | प्रीत-मोहर

मस्त. वाचतेय

आतिवास's picture

11 Jul 2015 - 11:31 pm | आतिवास

तुम्ही अनुवादाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही उत्तम राखले आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

12 Jul 2015 - 8:35 am | वॉल्टर व्हाईट

रोज एक भाग टाकावा असे वाटते :-) (अर्थात ही तक्रार नाही आणि अपेक्षाहॆ नाही)

ती वेबसाईट हिट केली कि मायकेल कोनेली च्या साईट ला रिडायरेक्ट होते. तिथे हा व्हिडेओ सापडला.

अजया's picture

12 Jul 2015 - 9:31 am | अजया

वाचतेय.पुभाप्र.

पैसा's picture

16 Jul 2015 - 2:23 pm | पैसा

इतकं छान झालंय की भाषांतर आहे असं वाटतच नाही!

वेल्लाभट's picture

16 Jul 2015 - 2:58 pm | वेल्लाभट

सहीए हे !

मृत्युन्जय's picture

16 Jul 2015 - 3:41 pm | मृत्युन्जय

ही लयच भन्नाट कादंबरी आहे. च्यायला आता विकत घेउन वाचावे का हा सुंदर अनुवाद वाचावा असा प्रश्न पडलाय

उत्तम अनुवाद. उत्कंठावर्धक. आणि उत्कंठा इतकी वाढली की पूर्ण पुस्तकच वाचुन संपवलं. :)

पद्मावति's picture

18 Jul 2015 - 4:48 pm | पद्मावति

पुढचे भाग तर अजुनच थरारक होणार आहेत हे नक्की.

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 12:34 am | शाम भागवत