द स्केअरक्रो भाग १७

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
15 Aug 2015 - 12:18 am

द स्केअरक्रो भाग १६

द स्केअरक्रो भाग १७ (मूळ लेखक मायकेल काॅनेली)

कार्व्हर त्याच्या गाडीत, अंधारात बसला होता आणि समोर असलेल्या घराकडे पाहात होता. तो जे काही करायला इथे आला होता, ते करायला अजून वेळ होता. त्याला थोडं थांबावं लागणार होतं. पण त्याने त्याला काहीही फरक पडत नव्हता. तसंही त्याला अंधारात एकटं राहायला आवडायचं. त्याच्या आयपॉडवर असलेलं त्याचं आवडतं गाणं – लिझार्ड किंगचं I am a changeling, see me change – तो ऐकत होता. या गाण्याने त्याला आयुष्यभर साथ दिलेली होती. हे गाणं म्हणजे आपल्या आयुष्याचा सारांश आहे असं कार्व्हरला नेहमी वाटायचं. ऐकता ऐकता त्याने डोळे मिटले आणि त्याने आपल्या सीटच्या बाजूचं एक बटन दाबून सीट अजून मागे केली.

आणि त्याला त्याच्या नेहमीच्या आठवणीतलं दृश्य दिसलं. जेव्हा जेव्हा हे गाणं तो ऐकत असे, हे दृश्य परत परत त्याच्या डोळ्यांसमोर दिसत असे. तो ड्रेसिंग रूममध्ये होता. अल्माबरोबर. त्याच्यावर लक्ष ठेवणं हे जरी तिचं मुख्य काम असलं, तरी तिच्या हातांना आणि मनाला तिच्या विणकामातून कधीच फुरसत मिळत नसे. चोवीस तास त्याच्याकडे लक्ष ठेवणं तिला शक्यही नव्हतं आणि तशी अपेक्षा करणं म्हणजे वेडेपणा होता. मुलांच्या बाबतीत नियम अत्यंत स्पष्ट आणि कडक होते. मुलाची जबाबदारी ही शेवटी त्याच्या आईवरच असायची, जरी ती स्टेजवर असेल आणि काम करत असेल तरीही.

छोट्या वेस्लीला आज त्याच्या आईला भेटायचं होतं. बरेच दिवस झाले होते तिला पाहून. तो बारीक आणि चपळ होता. एखाद्या उंदरासारखा. निदान बाकीचे तरी असंच म्हणायचे. आताही एखाद्या उंदरासारखाच तो तिथल्या पडद्यांच्या भूलभुलैयामधून पुढे सरकत होता. अगदी दबक्या पावलांनी. एक मोठा हॉल होता आणि एक घाण वास मारणारी मोरी होती. हे दोन्ही पार करून वेस्ली स्टेजच्या जवळ आला.

अचानक आलेल्या प्रकाशाने त्याचे डोळे दिपले. ग्रेबल, त्याच्या आईचा ‘ मॅनेजर ‘ तिथे एका स्टुलावर, हातात माईक घेऊन बसला होता. त्याच्या अंगात तोच जुना सूट होता. गाणं संपायची वाट पाहात होता बहुतेक. वेस्ली अगदी सावधपणे त्याच्या मागे गेला आणि त्याने स्टुलाच्या पायांमधून स्टेजकडे पाहिलं. संगीताचा आवाज खूप मोठ्याने येत होता पण त्यामधूनही लोकांच्या टाळ्या, शिट्ट्या आणि आरडाओरड्याचा आवाज वेस्लीला ऐकू येत होता.

आणि मग त्याला ती दिसली. पूर्णपणे विवस्त्र. अंगावर अगदी बोटभर चिंधीदेखील नव्हती. गाणं वाजत होतं – Girl, you gotta love your man! – आणि ती त्याच्यावर थिरकत होती. जणू हे गाणं तिच्यासाठीच बनवलं गेलं होतं. लोक उभे राहून टाळ्या, शिट्ट्या वाजवत होते. काहीजण तिला स्पर्श करायचा प्रयत्न करत होते. त्याची नजर तिच्यावरून हलत नव्हती. हे गाणं संपावं अशी त्याची इच्छा नव्हती. गायिकेचा आवाज टिपेला भिडला, आणि –
त्याच क्षणी कुणीतरी त्याला त्याच्या टी-शर्टच्या कॉलरला धरून मागे ओढलं. त्याने कसंबसं वर पाहिलं तर अल्मा होती.

“किती वाईट मुलगा आहेस रे तू!” ती खूपच रागावली होती.

“नाही,”तो रडत रडत म्हणाला, “मला माझ्या आईला –“

“नाही, अजिबात नाही!”

तिने तो ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गावरून त्याला फरफटत ड्रेसिंग रूममध्ये नेलं आणि तिथे असलेल्या एका सोफ्यावर ढकललं.

“खूप त्रास देतोस तू बरं का! हे काय आहे?”

ती त्याच्या पायांच्या मध्ये बोटाने दाखवत होती. तिथे हात लावल्यावर त्याला कसंतरीच व्हायचं.

“मी...मी चांगला मुलगा आहे,” तो हुंदके देत म्हणाला.

“मुळीच नाही,” अल्मा म्हणाली, “तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळ्याच प्रकारचं स्मित होतं, “असं जर तुला होत असेल तर तू चांगला मुलगा असणं शक्यच नाही.”

तिने त्याच्या पँटचा पट्टा ढिला केला आणि त्याची पँट खाली खेचली.

“एक नंबरचा लिंगपिसाट पोरगा आहेस तू,” ती म्हणाली, “अशा मुलांचं आम्ही काय करतो, माहिती आहे ना तुला?”

वेस्ली भीतीने गळाठून गेला होता. तो शब्द त्याच्या कानांत विचित्र प्रकारे घुमत होता. त्याचा अर्थ त्याला माहित नव्हता. पण नक्कीच काहीतरी भयंकर असणार. त्याने डोळे मिटून घेतले. गच्च.

काचेवर काहीतरी जोरात आपटण्याच्या आवाजाने कार्व्हर त्याच्या स्वप्नातून दचकून जागा झाला. एक क्षणभर आपण कुठे आहोत आणि काय करतो आहोत हे काहीच त्याला समजलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याने आयपॉड बंद केला आणि कानांतून इअरफोन्स काढले.

मॅकगिनिस बाहेर उभा होता. त्याच्या हातात एक कुत्र्यांच्या गळ्यातल्या पट्ट्याला बांधतात तशी चामडी वादी होती. तिच्या एका टोकाला एक छोटं कुत्रं होतं. त्याच्या हाताच्या मधल्या बोटात असणारी अंगठी कार्व्हरने पाहिली आणि काचेवर काय आपटल्याचा आवाज आला ते त्याच्या लक्षात आलं.

कार्व्हरने खिडकीची काच खाली केली आणि त्याचबरोबर पायाने गन दूर ढकलली.

“वेस्ली? तू इथे काय करतो आहेस?” मॅकगिनिसने विचारलं.
कार्व्हरने काही उत्तर द्यायच्या आत कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. मॅकगिनिसने त्याला थोपटून शांत केलं.

“मला तुझ्याशी जरा एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचंय,”कार्व्हर म्हणाला.

“मग तू घरी का नाही आलास?”

“ कारण मला तुला काहीतरी दाखवायचं पण आहे.”

“कशाबद्दल बोलतो आहेस तू?”

“गाडीत बस. मी सांगतो तुला. मी घेऊन जातो तुला तिथे.”

“कुठे? आत्ता जवळपास मध्यरात्र होत आलेली आहे. मला समजत नाहीये उद्या...”

“एफ.बी.आय.चे एजंट्स आले होते, त्याच्या संदर्भात आहे हे. मला वाटतं, ते कुणाच्या शोधात आहेत ते मला समजलं आहे.”

मॅकगिनिस एक पाऊल पुढे आला आणि त्याने कार्व्हरकडे निरखून पाहिलं, “वेस्ली, काय चाललंय? ‘ते कुणाच्या शोधात आहेत’ याचा अर्थ काय?”

“म्हणून तर सांगतोय तुला.गाडीत बस. मी सगळं सांगतो तुला, आणि हो, तुझ्या कुत्र्याची काळजी करू नकोस. त्याला पण बरोबर घे. हरकत नाही. आपल्याला फार वेळ नाही लागणार.”

मॅकगिनिसने वैतागून मान हलवली. पण कार्व्हर सांगतोय म्हटल्यावर त्याला नाही म्हणवेना. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर? तो गाडीच्या दुसऱ्या बाजूला गेला. त्याने दरवाजा उघडायच्या आत कार्व्हरने त्याचं लक्ष नाही हे पाहून खाली पडलेली गन उचलून आपल्या पँटच्या मागच्या खिशात सारली आणि शर्टने झाकली. त्यामुळे त्याला बसायला थोडं अवघडल्यासारखं होत होतं पण त्याला इलाज नव्हता.

मॅकगिनिसने कुत्र्याला मागच्या सीटवर ठेवलं आणि तो स्वतः कार्व्हरच्या शेजारी बसला.

“कुत्रा नाहीये,” तो म्हणाला, “कुत्री आहे.”

“जे काही असेल ते. ती माझ्या गाडीची सीट तर खराब नाही ना करणार?”

“नाही नाही. मी आत्ताच नेऊन आणलंय तिला.”

“मग ठीक आहे.”

कार्व्हरने गाडी चालू केली.

“तुझं घर कुलूप वगैरे लावून बंद केलं आहेस का तू?” त्याने विचारलं.

“हो. मी अगदी जवळपास चक्कर मारायला जरी गेलो तरी मी घराला कुलूप लावून ठेवतो. आमच्या इथल्या पोरांचं काही सांगता येत नाही. मी एकटाच राहतो हे प्रत्येकाला माहित आहे.”

“चांगलं केलंस.” कार्व्हर म्हणाला.

“कुठे चाललोय आपण?”
“फ्रेडी स्टोनच्या घरी.”

“ओके. आता मला सांग की हा काय प्रकार आहे?आणि त्या आलेल्या एफ.बी.आय एजंट्सशी त्याचा काय संबंध आहे?”

“मी बोललो ना तुला. मला तुला दाखवायला लागेल.”

“मग मला तू जे दाखवणार आहेस ते सांग. तुझं स्टोनशी काही बोलणं वगैरे झालेलं आहे का? आणि त्याने तो इतके दिवस गायब होऊन काय करतोय हे सांगितलं का तुला?”

कार्व्हरने नकारार्थी मान डोलावली, “नाही, माझं त्याच्याशी काहीच बोलणं झालेलं नाही. म्हणून तर मी आज त्याला पहायला म्हणून त्याच्या घरी गेलो. तो तिथे नव्हता पण मला काहीतरी सापडलंय तिथे. एफ.बी.आय.एजंट्स ज्या वेबसाईटबद्दल बोलत होते, त्याच्यामागे त्याचा हात आहे.”

“अच्छा! म्हणजे जेव्हा त्याला एफ.बी.आय.एजंट्स इथे वॉरंट घेऊन आलेले आहेत हे समजलं तेव्हा तो पळाला?”

“असं दिसतंय खरं.”

“आपल्याला एफ.बी.आय.ला पण कळवायला पाहिजे वेस्ली. आपण त्याला पाठीशी घालतोय असं कुठल्याही परिस्थितीत त्यांना वाटता कामा नये.”

“पण त्यामुळे आपल्या एवढ्या उभ्या केलेल्या बिझिनेसचं नुकसान होईल. एकदा का ही बातमी पेपरांमध्ये आली की मग....”

“नाही वेस्ली,“ मॅकगिनिस निर्वाणीच्या सुरात म्हणाला, “आपल्याला ते नुकसान सहन करावं लागलं तरी चालेल. अशा बाबतीत लपवाछपवी करून काहीही साध्य होत नाही.”

“ठीक आहे,”कार्व्हरने निःश्वास सोडला, “आपण आधी त्याच्या घरी जाऊ आणि मग तिथून एफ.बी.आय.ला फोन करू. तुला त्या दोन एजंट्सची नावं आठवताहेत का?”

“माझ्याकडे त्यांनी दिलेली कार्डस् आहेत. एकाचं नाव बँटम होतं. मला ते आठवण्याचं कारण तो खूप अवाढव्य होता पण तरी त्याचं नाव बँटम होतं. बॉक्सिंगमध्ये बँटमवेट हा कमी वजनाच्या लोकांचा गट असतो.”

“बरोबर. मलाही आठवला तो.”

कार्व्हर एव्हाना फिनिक्स शहरापर्यंत आला होता. फ्री वेच्या दोन्ही बाजूंना शहराचे दिवे दिसत होते. दोघेही गप्प झाले. ती कुत्रीही गाडीच्या मागच्या सीटवर झोपून गेली होती.

कार्व्हरच्या मनात परत एकदा ते लहानपणी पाहिलेलं दृश्य आलं. आपण तिला नक्की का बघायला गेलो याचं कारण कार्व्हरला अजूनही सापडलं नव्हतं. ते उत्तर नक्कीच आपल्या मनाच्या कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेलं असणार याची त्याला खात्री होती. पण तिथे जाणार कोण?

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

15 Aug 2015 - 1:10 am | राघवेंद्र

धन्यवाद!!!
विकांत सुरु झाला असे म्हणायला हरकत नाही.

वॉल्टर व्हाईट's picture

15 Aug 2015 - 1:22 am | वॉल्टर व्हाईट

कथेतून अधूनमधून त्याच्या स्वभावाचे कंगोरे दिसत होते पण इथून खरे लेखकाने खुन्याचे पात्र आता रंगवायला घेतले आहे असे दिसतेय. पुढचा भाग येतोय का शनिवारी?

अद्द्या's picture

15 Aug 2015 - 1:35 am | अद्द्या

आता खरा वीकांत सुरु झाला . .

जियो

अजया's picture

15 Aug 2015 - 7:35 am | अजया

पुभालवकरातलवकरटा.

कोनेलीचे कार्व्हर हे पात्र आणि सिडने शेल्डनच्या 'इफ टुमॉरो कम्स' मधील नायिकेला रंगेहाथ पकडण्यासाठी जंगजंग पछाडणार्‍या डिटेक्टिव्हचे पात्र यांच्यात त्यांच्या लहानपणी स्वतःच्या आईबद्दलचा असा प्रसंग असणे ह्यात बरेच साम्य आहे आणि ते त्यांच्या विकृत वागणुकीचे स्पष्टीकरण दिसते.

पुभाप्र.

सामान्य वाचक's picture

15 Aug 2015 - 12:46 pm | सामान्य वाचक

पुढचे भाग जरा लवकर टाका हो pl

पुढचा भाग प्लीज लवकर टाका.. कार्व्हरचे चित्रण पूर्ण झाले नाही तर आठवडाभर डोक्यात गुणगुणत राहील.

आनंद's picture

15 Aug 2015 - 6:08 pm | आनंद

छान चाललय!
आता मॅकगिनिस चा नंबर आला वाटत.

मास्टरमाईन्ड's picture

15 Aug 2015 - 11:51 pm | मास्टरमाईन्ड

एकदम मस्त.
पण आता थेट पुढच्या शनिवारी?

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 1:00 pm | शाम भागवत