द स्केअरक्रो भाग २६ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
एफ.बी.आय.च्या इइआर टीममध्ये तिघांचा समावेश होता. त्यांनी वेस्टर्न डेटामध्ये आल्या आल्या तिथल्या कंट्रोल रूममध्ये जाऊन तीन मुख्य वर्कस्टेशन्सचा ताबा घेतला आणि कामाला सुरुवात केली. कार्व्हर त्यांच्या मागे येरझाऱ्या घालत होता आणि अधूनमधून त्यांच्या खांद्यांवरून पडद्यावर काय येतंय ते पाहात होता. त्यांना काय सापडेल याची त्याला काळजी वाटत नव्हती. त्याला जे त्यांना सापडायला हवं होतं, तेच त्यांना सापडणार होतं. त्याला खात्री होती तशी. पण निदान चेहऱ्यावर तरी काळजी दाखवायला हवी होती, कारण या प्रकरणानंतर वेस्टर्न डेटा अस्तित्वात राहणार नाही हे तर निश्चित होतं. तो जर निश्चिंत दिसला असता, तर संशयाची सुई त्याच्याकडे वळायला वेळ लागला नसता.
“मि.कार्व्हर, रिलॅक्स!” त्या तीन एजंट्सपैकी एकजण म्हणाला. त्याचं नाव टॉरेस होतं, “आम्हाला बराच वेळ लागणार आहे. कदाचित पूर्ण रात्रभरही काम करावं लागेल. आणि तुम्ही जर आमच्या पाठीमागे अशा येरझाऱ्या घालत राहिलात, तर अजून वेळ लागू शकतो.”
“सॉरी,” कार्व्हर म्हणाला, “पण या सगळ्याचा अर्थ काय होणार आहे, हे जाणवून मला प्रचंड टेन्शन येतंय. शेवटी हा इथे काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कंपनी बंद झाली तर...”
“आम्ही समजू शकतो मि.कार्व्हर,” टॉरेस म्हणाला, “पण तुम्ही...”
तो पुढे काही बोलणार तेवढ्यात कार्व्हरचा मोबाईल फोन वाजला.
“एक्स्क्यूज मी,” कार्व्हर म्हणाला आणि त्याने खिशातून फोन काढून कॉल उचलला.
“मी बोलतोय,” फ्रेडी स्टोन म्हणाला.
“अरे बोल. काय म्हणतोस?” कार्व्हर एखाद्या जुन्या मित्राशी बोलावं त्या पद्धतीने म्हणाला.
“त्यांना काही सापडलंय का?”
“नाही अजून. मी इथेच आहे, आणि आम्हाला वेळ लागणार आहे.”
“मग मी आपल्या प्लॅनप्रमाणे पुढची कारवाई सुरु करू?”
“हो. माझ्याशिवायच खेळ सुरु करावा लागेल तुला.”
“अच्छा. तू माझी परीक्षा घेतो आहेस, बरोबर? मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय!” स्टोनच्या आवाजात राग होता.
“गेल्या आठवड्यात जे घडलंय, त्यानंतर मला हा खेळ बाहेरूनच बघण्याची इच्छा आहे.”
स्टोन एक क्षणभर थांबला, “त्या एजंट्सना मी कोण आहे, ते तरी समजलं आहे की नाही अजून?”
“मला माहित नाही पण त्याबद्दल मला काही करता येईल असं मला वाटत नाही. काम सर्वात आधी. मी पुढच्या आठवड्यात भेटू शकेन तुला. मग माझ्याकडून जितके पैसे जिंकू शकशील तू, तेवढे तुझे.”
बोलताना कार्व्हर एजंट्सवरही लक्ष ठेवून होता. आपण पोकरबद्दल बोलतोय याच्यावर त्यांचा विश्वास बसलाय की कसला संशय आलाय?
“मग तुला मी कुठे भेटू? तुझ्या घरी?” स्टोनने विचारलं.
“हो. म्हणजे काय? माझ्याच घरी. तू खायलाप्यायला घेऊन ये पण. भेटू. बाय!”
त्याने फोन बंद करून परत आपल्या खिशात ठेवून दिलं. समोर एजंट्स शांतपणे काम करत होते.
स्टोनच्या आवाजातला राग कार्व्हरला जाणवला होता, आणि त्याला काळजी वाटायला लागली होती. काही दिवसांपूर्वीच तो स्वतःच्या आयुष्याची भीक मागत होता, आणि आज एक काम करायला सांगितलं तर त्याला राग आला होता.
त्याला जिवंत ठेवलं ही आपली चूक झाली की काय असा विचार कार्व्हरच्या मनात आला. त्याला त्याच वेळी वाळवंटात खलास करायला हवं होतं आणि मॅकगिनिसच्या शेजारी पुरायला हवं होतं. सगळी कटकट संपून गेली असती. कुणाच्या लक्षातही आलं नसतं.
अजूनही वेळ गेलेली नाहीये पण. हे करता येऊ शकतं. बहुधा आज रात्री. स्टोनचा आणि त्याचबरोबर अजून काही रहस्यांचा अंत. वेस्टर्न डेटा तर आता बंद पडल्यात जमा आहे, पण त्याने काही फरक पडत नाही. पुढे जायलाच हवं. या संपूर्ण प्रकरणात ज्या चुका झाल्या, त्यावरून योग्य ते धडे घेऊन दुसरीकडे नव्याने सुरुवात करायला हवी. बदल. स्वतःमध्ये जो काळानुरूप बदल करतो, तोच टिकून राहतो. I am a changeling, see me change! I am a changeling, see me change!
टॉरेसने वळून कार्व्हरकडे पाहिलं आणि कार्व्हर भानावर आला. तो स्वतःच्या नकळत गुणगुणत होता की काय?
“पोकर?” टॉरेसने विचारलं.
“हो. सॉरी, या फोनमुळे तुमच्या कामात व्यत्यय आला.”
“सॉरी तर आम्ही म्हणायला पाहिजे मि.कार्व्हर. आमच्यामुळे तुम्हाला मित्रांबरोबर पोकर खेळायला जाता येत नाहीये.”
“ ते ठीक आहे. उलटं चांगलंच आहे. तुमच्यामुळे माझे पन्नास-शंभर डॉलर्स वाचताहेत!”
तिघेही एजंट्स हसले. “ आम्ही एफ.बी.आय.मधले लोक इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो!” टॉरेस म्हणाला.
कार्व्हरने हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याला स्वतःलाच ते इतकं खोटं वाटलं की तो थांबला. हसण्यासारखं किंवा बरं वाटावं असं गेल्या आठवड्यापासून घडतच नव्हतं.
#####################################################################
उरलेला दिवस मी माझ्या हॉटेलच्या खोलीतच घालवला. सर्वात प्रथम मी माझ्या स्टोरीची बजेट लाईन लिहून काढली. स्टोरी आता आकार घेऊ लागली होती. मी प्रेन्डरगास्टला बजेट लाईन मेल केली आणि मग ती व्यवस्थित लिहायला सुरुवात केली. जरी ही स्टोरी गुरुवारी येणार होती, तरी मला ती तयार ठेवणं गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी ज्या काही गोष्टी मला समजतील, त्या या स्टोरीमध्ये टाकायला लागल्या असत्या.
आता यात एकच अडचण होती, ती म्हणजे मला काही नवीन समजणार आहे की नाही. रॅशेलने मला दर तासाने फोन करायला सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात तिने माझा एकही कॉल उचलला नाही. मी तिच्या व्हॉईसमेलवर ठेवलेल्या निरोपांनाही काही उत्तर नव्हतं. नंतर तर तिचा फोन बंद असल्याचं ऐकू आलं. माझ्या मनात आता एफ.बी.आय.च्या हेतूबद्दल, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माझ्या आणि रॅशेलच्या नात्याबद्दल, त्याच्या भविष्याबद्दल शंका यायला लागली होती.
शेवटी, रात्री अकरा वाजता मला रॅशेलचा फोन आला.
“काय चाललंय एल.ए.मध्ये?” तिने विचारलं.
“व्यवस्थित आहे सगळं. मी तुला कॉल करायचा प्रयत्न केला पण तू उचलला नाहीस. नंतर फोन बंदच होता तुझा.”
“अरे हो. त्याची बॅटरी कामातून गेली. मी एवढा वेळ वापरला होता तो. मी आत्ताच हॉटेलमध्ये आले आणि चेक इन केलं. माझी बॅग तू रिसेप्शनवर ठेवली होतीस, ते बरं झालं.”
फोन बंद झाला होता हे ऐकल्यावर मी जरा शांत झालो. तिच्या आवाजातूनही मला काही वेगळं जाणवत नव्हतं.
“नो प्रॉब्लेम,” मी म्हणालो, “कुठल्या रूममध्ये आहेस तू आता?”
“७१७. तुझं काय?तू घरी गेलास की नाही?”
“नाही. मी हॉटेलमध्येच आहे अजून.”
“खरंच? मी आत्ता क्योटो ग्रँडमध्ये फोन केला आणि त्यांनी मला तुझ्या रूममध्ये कॉल जोडून दिला पण कोणी उचलला नाही.”
“अच्छा. मी जरा पाय मोकळे करायला बाहेर गेलो होतो.”
मी विषय बदलायचं ठरवलं, “तुझं आजच्या दिवसाचं काम संपलंय की आहे काही अजून?”
“असं वाटतंय. मी आत्ता रूम सर्व्हिसला सांगून खायला मागवलंय. पण मला तयारीत राहायला पाहिजे. इइआरला जर तिथे काही सापडलं तर मला वेस्टर्न डेटामध्ये परत जावं लागेल.”
“काय सांगतेस? म्हणजे अजून एफ.बी.आय.एजंट्स आहेत तिथे?”
“इइआर टीम तिथेच आहे अजून. मी निघून आले. म्हणजे तेच मला म्हणाले. ते पाण्यासारखं रेड बुल पिताहेत आणि रात्रभर जागून काम संपवणार आहेत. निदान निम्मं तरी. कार्व्हर पण त्यांच्याबरोबर आहे.”
“कार्व्हर? तोही जागणार आहे त्यांच्याबरोबर?”
“तो तर म्हणाला की त्याला रात्रीच काम करायला आवडतं. तो दर आठवड्याला रात्रीच्या शिफ्टवर काम करतो, त्यामुळे त्याला सवय आहे.”
“ओके. काय मागवलं आहेस खायला?”
“चीजबर्गर आणि फ्राईज.”
मी हसलो, “मीही तेच मागवलं. रम किंवा वाईन नाही मागवलीस?”
“नाही. आता मी ब्युरोमध्ये परत गेल्यावर ऑन ड्यूटी अल्कोहोल चालणार नाही.”
आता गप्पा पुरे झाल्या. कामाकडे वळू या, मी विचार केला.
“बरं, मग मॅकगिनिस आणि स्टोन यांच्याबद्दल नवीन काही कळलंय का?”
ती थोडा वेळ काहीच बोलली नाही, “जॅक, मी प्रचंड थकलेय आज. गेले चार तास मी त्या बंकरमध्ये होते. आपण उद्या बोललो तर नाही का चालणार?”
“थकलो तर मी पण आहे रॅशेल! पण तू मला शब्द दिला होतास की तू मला सगळी माहिती देशील. याच अटीवर मी या तपासातून बाहेर पडलोय. मी साधारण साडेपाच-पावणेसहा वाजता फिनिक्सहून निघालो, तेव्हापासून तुझ्याकडून मला काहीही कळलेलं नाही, आणि आता तू म्हणते आहेस की तू थकली आहेस?”
“ठीक आहे. सांगते मी तुला. बातमी चांगली आणि वाईट अशी दोन्ही प्रकारची आहे. चांगली बातमी ही की फ्रेडी स्टोन खरा कोण आहे ते आम्हाला समजलं आहे. त्याचं खरं नाव फ्रेडी स्टोन नाहीये. पण त्याचं खरं नाव कळल्यामुळे आम्हाला त्याला शोधणं सोपं जाईल.”
“फ्रेडी स्टोन हे त्याचं खरं नाव नाहीये? पण मग वेस्टर्न डेटामध्ये त्याला नोकरी कशी मिळाली? त्यांनी तर आपली पण किती कसून चौकशी केली होती.”
“कंपनी रेकॉर्ड्सनुसार त्याला नोकरीवर ठेवण्याचा निर्णय हा मॅकगिनिसने घेतला होता. मग सिक्युरिटी चेक वगैरे गोष्टी झाल्या काय आणि नाही झाल्या काय.”
“बरोबर. मॅकगिनिसने त्याला कंपनीमध्ये आणणं हे अगदी सुसंगत आहे. तो खरा कोण आहे पण?”
हे बोलता बोलता मी माझी वही आणि पेन हातात घेतलं आणि माझा फोन स्पीकरवर ठेवला.
“त्याचं खरं नाव मार्क कुरियर आहे. वय सव्वीस. त्याला इंटरनेट फ्रॉडच्या आरोपावरून शिकागोमध्ये दोन वेळा अटक झालेली आहे, पण त्याच्यावरचा खटला सुरु होण्याआधीच तो तिथून पळाला. ही साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्याने केलेल्या गुन्ह्यांमध्ये डिजिटल ओळख चोरणं, क्रेडिट कार्ड फ्रॉड, हॅकिंग या सगळ्याचा समावेश आहे. शिकागो पोलिसांच्या वर्णनानुसार तो एक निष्णात हॅकर आहे. आणि विचार कर, असा माणूस वेस्टर्न डेटामध्ये बसून गोपनीय माहिती हाताळत होता.”
“तो वेस्टर्न डेटासाठी कधीपासून काम करायला लागला?”
“तीन वर्षांपूर्वीच. शिकागोमधून पळाल्यावर तो मेसाला आला, आणि त्याने पूर्णपणे नवीन ओळख निर्माण केली आणि वेस्टर्न डेटासाठी काम करायला सुरुवात केली, असं दिसतंय.”
“म्हणजे मॅकगिनिस त्याला आधीपासून ओळखत होता?”
“त्याला नोकरी मॅकगिनिसमुळेच मिळाली असं रेकॉर्डवरून दिसतंय. मी तुला सांगते, हा या सर्व तपासातला सर्वात इंटरेस्टिंग मुद्दा आहे. दोन खुनी – सारख्या विचारांचे, एकत्र भेटले आणि एकत्र खून करायला लागले. काय शक्यता आहे की ते एकमेकांना भेटतील? पण इंटरनेटसारख्या ठिकाणी ते एकमेकांना भेटू शकतात आणि आपापल्या आवडीनिवडी जाणून घेऊ शकतात. कुठल्याही गोष्टीबद्दल तुला विकृत आकर्षण वाटतंय आणि त्याबद्दल चारचौघांत चर्चा करणं तुला शक्य नाहीये? मग इंटरनेटवर जा. आता अशा गोष्टी जास्त प्रमाणात बघायला मिळतील. लोक सायबर विश्वातल्या गोष्टी सरळ आपल्या खऱ्या जगात आणतील. जेव्हा तुम्ही तुमच्यासारखेच विचार असणाऱ्या लोकांना भेटता, तेव्हा आपले विचार बरोबर आहेत असं प्रत्येकाला वाटतं, आणि कधीकधी नुसतं याच्यावर न थांबता लोक प्रत्यक्ष कृती करतात.”
“फ्रेडी स्टोन हे दुसऱ्या कुणाचं नाव आहे का?”
“नाही. असंच बनवलेलं नाव आहे.”
“स्टोन कुठल्या हिंसक किंवा लैंगिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा काही पुरावा आहे त्याच्या शिकागोमधल्या रेकॉर्डमध्ये?”
“त्याला जेव्हा शिकागोमध्ये अटक झाली होती – तीन वर्षांपूर्वी, तेव्हा त्याचा कॉम्प्युटर पोलिसांनी जप्त केला होता. त्यावर बऱ्याच पोर्नोग्राफिक फिल्म्स मिळाल्या होत्या. मला असं समजलं की त्यामध्ये बँकॉकमध्ये मिळणाऱ्या काही टॉर्चर फिल्म्ससुद्धा होत्या. पण त्याच्यावरच्या आरोपांमध्ये या गोष्टीचा समावेश नाहीये, कारण या बाबतीत आरोप सिद्ध करणं महाकठीण आहे. प्रत्येक फिल्मच्या सुरुवातीला एक डिसक्लेमर असतो, ज्यात असं म्हटलेलं असतं की काम करणारे सगळे अभिनेते आहेत आणि प्रत्यक्षात कुणाचेही कुठल्याही प्रकारचे हाल केले जात नाहीत. तो फक्त अभिनय असतो.”
“लेग ब्रेसेसचं काय?”
“रेकॉर्डमध्ये त्याच्याबद्दल काहीही नाहीये पण आम्ही ते शोधून काढू. जर कुरियर उर्फ स्टोन आणि मॅकगिनिस यांना अबासिओफिलीयाने एकत्र आणलं असेल, तर आम्ही ते शोधून काढू. जर ते एखाद्या आयर्न मेडन चॅटरूममध्ये भेटले असतील, तर आम्ही तेही शोधून काढू.”
“तुम्हाला त्याचं खरं नाव मार्क कुरियर आहे, हे कसं समजलं?”
“तुला आठवतं त्या सर्व्हर फार्मच्या दरवाज्याच्या बाजूला एक बायोमेट्रिक रीडर होता? त्यामध्ये त्याच्या हाताचा ठसा होता.”
मी तिने सांगितलेलं सगळं नोट्सच्या स्वरुपात लिहून काढलं आणि पुढच्या प्रश्नाकडे गेलो.
“त्याचा काही फोटो किंवा मग शॉट वगैरे मिळू शकेल का?”
ती हसली, “मला वाटलेलंच तू विचारशील. म्हणूनच माझा फोन चार्जिंगला लावल्यावर लगेचच मी तुला तो फोटो मेल केला. तुझ्या लॅपटॉपवर चेक कर. बघ तोच एल्विस आहे का.”
माझा लॅपटॉप चालूच होता. मी माझा इमेल अकाउंट चालू करून तिने पाठवलेला मेल उघडला. मार्क कुरियरचा मग शॉट होता. तीन वर्षांपूर्वीचा. खांद्यांपर्यंत आलेले लांब केस आणि अगदी पातळ फ्रेंचकट दाढी. कर्ट आणि मिझ्झू यांच्याबरोबर बसला असता, तर वेगळा अजिबात वाटला नसता.
“तुला हॉटेल नेवाडामध्ये भेटलेला माणूस हाच होता?” तिने विचारलं.
मी फोटोकडे लक्षपूर्वक पाहिलं.
“जॅक?”
“असू शकेल. त्या माणसाने – एल्विसने गॉगल घातला होता आणि केसांची स्टाईलपण वेगळी होती. त्याचे डोळे मला पाहता आले असते, तर कदाचित मी काही सांगू शकलो असतो.”
मी परत एकदा फोटोकडे निरखून पाहिलं आणि पुढच्या प्रश्नाकडे वळलो.
“तू म्हणालीस की चांगली आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या बातम्या आहेत. वाईट बातमी काय आहे?”
“वेस्टर्न डेटामधून गायब होण्याआधी कुरियरने त्याच्या ऑफिसमधल्या कॉम्प्युटरमध्ये आणि अर्काईव्हजमध्ये व्हायरस घुसवले आणि तिथली बरीचशी माहिती त्यामुळे नष्ट झाली. आम्हाला हे आज संध्याकाळी समजलं. जवळपास सगळी व्हिडीओ अर्काइव्हज नष्ट झालेली आहेत आणि कंपनीच्या अंतर्गत माहितीचा बराचसा भागही नष्ट झालाय.”
“म्हणजे?”
“म्हणजे आम्हाला त्याच्या हालचालींबद्दल पुरावा शोधणं अवघड होणार आहे. तो तिथे कधी होता, कधी नव्हता, तो आणि मॅकगिनिस दोघेही एकाच वेळी ऑफिसमध्ये नसलेले दिवस आणि ते दिवस खून झालेल्या दिवसंबरोबर जुळताहेत का – यातलं काहीही आम्ही करू शकू असं वाटत नाहीये. त्याला पकडल्यावर त्याच्याविरुद्ध केस बनवण्यासाठी या सगळ्या माहितीचा उपयोग झाला असता.”
“पण एवढ्या सगळ्या गोष्टी कार्व्हर आणि त्याने उभ्या केलेल्या एवढ्या कडेकोट बंदोबस्तातून निसटल्या कशा?”
“जेव्हा पहारेकरीच चोर असतो, तेव्हा तुम्ही कितीही उत्कृष्ट सापळा बनवलात, तरी तो त्याच्यातून मार्ग काढतोच. कुरियर वेस्टर्न डेटामध्ये तीन वर्षे काम करत होता. कंपनीची सिस्टिम त्याला अगदी अंतर्बाह्य माहित होती. त्याने त्या सगळ्याला चकवून जाणारा व्हायरस बनवला.”
“मॅकगिनिस आणि त्याच्या कॉम्प्युटरचं काय?”
“तिथे आमचं नशीब थोडं जोरावर होतं असं मला समजलंय. पण त्यांनी त्याच्यावर मी निघत होते तेव्हा काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे उद्या सकाळी मी जेव्हा परत जाईन तेव्हा मला कळेल. काही एजंट्स त्याच्या घरीही गेले होते. त्यांना तिथे काही इंटरेस्टिंग गोष्टी मिळाल्या आहेत असं मला समजलंय पण अजूनही तपास चालू आहे.”
“इंटरेस्टिंग गोष्टी?”
“वेल् जॅक, आता हे मी तुला सांगायला हवं की नाही, ते मला कळत नाहीये, पण ऐक. त्यांना तुझ्या पोएटवर लिहिलेल्या पुस्तकाची एक कॉपी त्याच्या घरातल्या पुस्तकांमध्ये मिळाली. मी बोलले होते तुला, आठवतंय?”
माझं तोंड अचानक कोरडं पडल्यासारखं वाटलं मला. मी लिहिलेल्या पुस्तकाचा वापर एखाद्या खुन्याने त्याच्या खुनांसाठी संदर्भ म्हणून केला असेल हा विचारच हादरवणारा होता. मी माझ्या पुस्तकात एफ.बी.आय.मध्ये सीरियल किलर्सचं प्रोफायलिंग कसं करतात आणि एकंदरीत तपास कशा प्रकारे चालतो याबद्दल विस्तृत स्वरूपात लिहिलं होतं. पण त्याचा वापर कोणी अशा प्रकारे करेल, हा विचार माझ्या मनात तेव्हा आला असता, तर मी कदाचित माझं पुस्तक लिहिलं नसतं.
मी घाईघाईने विषय बदलला, “अजून काय मिळालंय त्यांना?
“सगळं सांगितलं नाही त्यांनी पण एक लेग ब्रेसेसचा पूर्ण सेटसुद्धा मिळालाय त्यांना. खास स्त्रियांसाठी असलेला. या विषयावर असलेली काही पोर्नोग्राफिक पुस्तकंपण मिळाली.”
“ओह माय गॉड! एक नंबरचा xxxxx आहे हा!”
मी या गोष्टीही नोट्सच्या स्वरूपात लिहून काढल्या आणि अजून कशावर प्रश्न विचारता येईल ते पाहिलं. बहुतेक सगळे मुद्दे मी कव्हर केले होते. माझ्याकडे आधी असलेली माहिती आणि तिने आत्ता सांगितलेली माहिती हे एकत्र करून जी स्टोरी होणार होती, तिने टाईम्सला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं असतं याबद्दल मला शंका नव्हती.
“अच्छा, मग वेस्टर्न डेटाचा बँड वाजलाय असं म्हणायला हरकत नाहीये, बरोबर?”
“हो. जवळजवळ तसंच. ते ज्या वेबसाईट्स होस्ट करतात, त्या अजूनही चालू आहेत, पण कोलोकेशन सेंटर किंवा फार्म आता बंद आहे. तिथून कुठलीही माहिती बाहेर जात नाहीये, किंवा कुठलीही माहिती आत येत नाहीये.”
“जेव्हा तिथे आपली सगळी माहिती ठेवणाऱ्या लॉ फर्म्सना हे समजेल की त्यांच्या फाईल्स एफ.बी.आय.च्या ताब्यात आहेत, तेव्हा खरी धमाल येणार आहे.”
“पण आम्ही कुठल्याही फाईल्स उघडलेल्या नाहीयेत आणि आमचा पुढेही तसं करण्याचा काही उद्देश नाहीये. आम्ही सगळी सिस्टिम जशी आहे त्या स्वरूपात ठेवलेली आहे. कार्व्हरने आमच्या संमतीने वेस्टर्न डेटाच्या सगळ्या क्लायंट्सना एक संदेश पाठवलाय की ही तात्पुरती परिस्थिती आहे आणि कार्व्हर कंपनीच्या वतीने या सगळ्या तपासामध्ये सहभागी आहे आणि कोणत्याही क्लायंटचं नुकसान होणार नाही वगैरे वगैरे. आता याच्यानंतर जे व्हायचं ते होईल. आमचा नाईलाज आहे.”
“आणि कार्व्हरचं काय?”
“ त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याचीही पार्श्वभूमी तपासली आम्ही. तो एम.आय.टी. मध्ये शिकलेला आहे. या इंडस्ट्रीमध्ये त्याला न ओळखणारा माणूस सापडणार नाही. आम्हालाही वेस्टर्न डेटामध्ये कोणीतरी विश्वासार्ह माणूस हवाच होता. कार्व्हर तो माणूस आहे.”
माझ्याजवळ असलेले प्रश्न संपले होते. मी तिने आता सांगितलेली माहिती नोट्सच्या स्वरुपात लिहिली. आता माझ्याकडे जरुरीपेक्षा जास्त माहिती जमा झाली होती. हे सगळं स्टोरीमध्ये कसं बसवायचं याचा विचार मला करावा लागणार होता. जरी यानंतर रॅशेलकडून मला काहीही माहिती मिळाली नसती तरी चाललं असतं. आता असलेल्या माहितीच्या जोरावर टाईम्सने संपूर्ण देशात खळबळ माजवली असती, यात शंका नव्हती. तुम्ही एका सीरियल किलरच्या मागावर जाता आणि तुम्हाला दोन सीरियल किलर्स सापडतात, असं किती वेळा घडत असेल?
“जॅक?”
तिच्या आवाजाने मी भानावर आलो, “आहे मी इथेच. जरा हे तू सांगितलेलं लिहून ठेवत होतो. आणि काही आहे, जे तू सांगू शकशील?”
“नाही. सध्या एवढंच.”
“काळजी घे.”
“हो. अजून माझी गन आणि बॅज मला मिळालेले नाहीयेत पण ते उद्या सकाळपर्यंत फिनिक्स फील्ड ऑफिसमध्ये आलेले असतील. उद्या सकाळी मी परत एकदा एफ.बी.आय.ची पूर्ण एजंट झालेले असेन.”
“अरे वा! गेल्या काही दिवसांत जे काही घडलंय ते पाहता ही खरंच चांगली बातमी आहे.”
“अर्थात! अच्छा, आता आपण जरा आपल्याबद्दल बोलूया का?”
माझ्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. तिने कामाच्या संदर्भात जे बोलायचं होतं, ते आधी निपटवलं कारण तिला या विषयावरच मुख्यत्वे बोलायचं होतं. नक्कीच ती मला वाईट बातमी देणार. तसेही तिने माझे कॉल्स उचलले कुठे होते?
“मी काय म्हणते जॅक, मला हे फक्त एक बिझिनेस म्हणून ठेवायचं नाहीये.”
कशाबद्दल बोलतेय ही? पण तिने पहिल्या फटक्यात आपलं जमणार नाही असं पण म्हटलं नव्हतं, त्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके थोडे, पण थोडेच, नेहमीच्या वेगाने पडायला लागले होते.
“हो. मला पण नाही.” मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
“ इन फॅक्ट, मी असा विचार करत होते की... हा कदाचित वेडेपणा वाटेल तुला!”
“काय?”
“आज जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ते माझा राजीनामा स्वीकारत नाहीयेत आणि मी एफ.बी.आय.मध्ये परत येऊ शकते, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. मी घेतलेले निर्णय बरोबर होते, याची खात्री पटली. पण मी जेव्हा इथे हॉटेलमध्ये परत आले, तेव्हा तू गमतीगमतीत जे बोलला होतास ते मला आठवलं.”
मी नक्की काय बोललो होतो आणि ती कशाबद्दल बोलते आहे हे मला जाम आठवत नव्हतं, पण मी तिला दुजोरा दिला, “आणि?”
ती उत्तर देण्याआधी हसली, “आणि मला असं वाटतंय, की आपण जर ते करायचं ठरवलं, तर मजा येईल.”
अरे कशाबद्दल बोलतेय ही? मी आदल्या रात्री झालेलं आमचं सगळं बोलणं आठवायचा प्रयत्न करत होतो. तिच्या आवडत्या सिंगल बुलेटबद्दल काही होतं का?
“तुला खरंच असं वाटतंय?”
“हो. आता बिझिनेस म्हणून हे कसं करायचं आणि आपल्याला क्लायंट्स कसे मिळतील ते मला माहित नाही, पण तुझ्याबरोबर काम करण्यात मला खरंच मजा आली.”
हुश्श! आत्ता आठवलं. वॉलिंग अँड मॅकअॅव्हॉय, प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर्स. हृदयाचे ठोके नॉर्मल झाल्याचं मला जाणवलं.
“हो रॅशेल,” मी टाकलेला सुटकेचा निःश्वास तिला ऐकू जाणार नाही याची खबरदारी घेत मी म्हणालो, “पण तुझ्याकडे तुझा बॅज आणि गन नसताना तुझी काय अवस्था झाली होती ते मी पाहिलेलं आहे.”
“हो. कदाचित मी स्वतःची फसवणूक करतेय. आपण आपली फर्म चालू केली आणि आपल्याला लोकांच्या घटस्फोटांसाठी लागणारे पुरावे गोळा करणं वगैरे काम करावं लागलं तर आपल्यालाच त्रास होईल.”
“हो.”
“पण याबद्दल विचार करायला पाहिजे.”
“तुला तर माहिती आहेच. माझी नोकरी संपतेय. मी पुढे काय करणार आहे ते काहीही निश्चित नाहीये. त्यामुळे तू जेव्हा म्हणशील तेव्हा मी तुला मदत करायला तयार आहे. मला फक्त या गोष्टीची खात्री करून घ्यायचीय की तू एखादी चूक तर करत नाहीयेस ना. एफ.बी.आय.ने तुझ्या चुका अशा एका फटक्यात माफ केल्या आणि तुला परत जॉईन व्हायला सांगितलं? मला हे जरा विचित्र वाटतंय.”
“कदाचित मला अजून एक संधी द्यायची असेल त्यांना. पण ते मी कधी परत चूक करते, याची वाट पाहात दबा धरून बसलेले असतील, याबद्दल माझी खात्री आहे.”
तिच्या रूमची बेल वाजलेली मला ऐकू आली आणि पाठोपाठ ‘रूम सर्व्हिस’ असा आवाजपण आला.
“ मी खायला मागवलं होतं, ते आलेलं दिसतंय,” ती म्हणाली, “मी तुझ्याशी नंतर बोलते.”
“ओके रॅशेल. गुड नाईट!”
“हो. तुलासुद्धा! बोलू नंतर!”
तिने फोन ठेवून दिला. मी स्वतःशीच हसलो. तिने क्योटोमध्ये फोन केला असताना तिला मी तिथे भेटलो नाही, कारण मी एल.ए.ला गेलोच नव्हतो. अजूनही मेसा वेर्डे इनमध्येच होतो आणि आता तिला आश्चर्याचा सुखद धक्का देणार होतो.
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
13 Sep 2015 - 12:24 am | पैसा
कार्व्हर!
13 Sep 2015 - 12:24 am | एस
रोचक! पुभाप्र!
13 Sep 2015 - 12:26 am | स्रुजा
व्हेगास ची पुनरावृत्ती होणार तर. कुणीतरी तिच्या रुम वर येऊन दगा फटका करणार आणि आपला हीरो तिला वाचवणार. कुणीतरी म्हणजे स्टोन च येईल डिसगाईस मध्ये.
13 Sep 2015 - 5:19 am | अनन्त अवधुत
कादंबरी एकदम भन्नाट सुरु आहे.
पुढील भागाच्या (शनिवारच्या) प्रतीक्षेत..
13 Sep 2015 - 5:25 am | कैलासवासी सोन्याबापु
बा बोका-ए-आझम साहेबा!!
पाचवा गियर टाका आता! मायला रॅशेल ला आणि कश्यात अड़कणे बाकी ठेवले आहे आपण उभयता ने?
कॉनेली ______/\_______
आभार श्री बोको-(लेखणी चे)-गरम
13 Sep 2015 - 7:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं मस्तं.
पुढचा भाग लौकर इज मस्ट!!
13 Sep 2015 - 8:30 am | अजया
पुभाललटा!
13 Sep 2015 - 11:31 am | रातराणी
नेक्ष्ट वन प्लीज!
13 Sep 2015 - 1:35 pm | राजाभाउ
आयला हा कार्व्हर जर खुनी आणि विकृत नसता तर आपण पंखा झालो आसतो राव त्याचा. जबरी हुशार हाय राव
13 Sep 2015 - 5:29 pm | मास्टरमाईन्ड
२५-२६ दोन्हीही भाग एकदमच वाचून काढले.
तुमची लेखनशैली एकदम जबराट आहे त्यामुळं "पुढे काय?" हा प्रश्न प्रत्येक भागाच्या शेवटी पडतोच.
येऊ द्यात अजून.
पुभाप्र.
13 Sep 2015 - 7:59 pm | अद्द्या
लई भारी
आता पुढचा शनिवार लवकर येउद्या
14 Sep 2015 - 2:28 pm | मोहन
आता २७वा भाग गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर येवू द्या !
मस्त चालले आहे हे.वे.सां.न.
14 Sep 2015 - 2:42 pm | नाखु
समेवर (टायमींग) वर कथा भाग संपणे आणि नवीन गुंता टाकल्याशिवाय संपत नाही हेच मर्मस्थान आहे ह्या मालीकेचे.
पुभाप्र
15 Sep 2015 - 6:42 am | जुइ
सलग नवे ४ भाग वाचले आहेत.
15 Sep 2015 - 2:12 pm | राजाभाउ
अजुन शनीवार का नाही आला ?
15 Sep 2015 - 8:54 pm | पद्मावति
पु.भा.प्र.
वाचतेय. या मालीकेचा प्रत्येक भाग मस्तं झाला आहे. पुढील भागात काय ही उत्सुकता आहेच नेहमीसारखीच.
28 Dec 2015 - 6:58 pm | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग २७