द स्केअरक्रो भाग २. मूळ लेखक - मायकेल काॅनोली
क्रेमरच्या केबिनमधून मी बाहेर पडलो तेव्हा पूर्ण न्यूजरुमचे डोळे माझ्यावर खिळलेले होते. शुक्रवारचा दिवस म्हणजे बांबू मिळण्याचा दिवस. प्रत्येकाला केबिनमध्ये मला का बोलावलंय ते माहीत होतं.
प्रत्येकाचा जीव भांड्यात पडला असणार - कारण त्यांच्यावर ही पाळी आली नव्हती. पण ही एक भीती होतीच की पुढच्या शुक्रवारी कदाचित त्यांच्यावरही अशीच वेळ येऊ शकेल.
कुणाकडेही न बघता मी माझ्या जागेवर येऊन बसलो. मला थोड्या वेळासाठी तरी इतरांच्या नजरा चुकवायच्या होत्या. ताबडतोब माझा फोन वाजला. काॅलर आयडीवर मी माझा मित्र आणि सहकारी लॅरी बर्नार्डचं नाव वाचलं. त्याचं क्युबिकल माझ्यापासून फक्त दोन पावलं दूर होतं पण तो जर माझ्याकडे बोलायला आला असता तर सगळ्यांना माझ्यापाशी येऊन खोटी सहानुभूती द्यायला एक निमित्त मिळालं असतं.
मी फोन उचलला.
" हाय जॅक! " तो म्हणाला.
" हाय लॅरी! " मी म्हणालो.
" मग? "
" मग काय? "
" काय म्हणाला क्रॅमर? "
त्याने जाणूनबुजून आमच्या असिस्टंट मॅनेजिंग एडिटरचा उल्लेख ' क्रॅमर ' असा केला. हे टोपणनाव क्रेमरला ब-याच वर्षांपूर्वी तो जेव्हा असाइनमेंट एडिटर होता तेव्हा मिळालं होतं. अगदी तेव्हापासून क्रेमरला त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या पत्रकारांच्या बातम्यांच्या दर्जाऐवजी बातम्यांच्या संख्येत जास्त रस होता.
" तुला तर माहीत आहेच. त्याने मला बातमी दिली आत्ता. मी बाहेर पडतोय इथून! "
" अरे काय बोलतोयस काय तू? *##**@ !
" बरोबर! "
" आजच शेवटचा दिवस आहे तुझा?"
" नाही. दोन आठवडे आहेत माझ्याकडे. २२ मे शेवटचा दिवस! "
" दोन आठवडे? का? "
नोटीस मिळालेल्या लोकांना नियमानुसार ताबडतोब आपलं टेबल आवरुन जावं लागत असे. हा नियम येण्याचं कारण फार विचित्र आणि मजेशीर होतं. सर्वात पहिल्यांदा ज्याला नोटीस मिळाली होती त्याला मॅनेजमेंटने दोन आठवड्यांसाठी थांबायची परवानगी दिली होती. या दोन आठवड्यांमध्ये प्रत्येक दिवस हा माणूस टेनिस बाॅल घेऊन आॅफिसला येत होता. पण कुणाच्याही हे लक्षात आलं नाही की दररोज वेगळा टेनिस बाॅल होता. हा माणूस दर दिवशीचा टेनिस बाॅल टाॅयलेटमध्ये फ्लश करत होता. जेव्हा त्याचे दोन आठवडे संपले त्या दिवशी आॅफिसमध्ये हाहाःकार उडाला होता.
" माझ्या जागी जी मुलगी येणार आहे तिला ट्रेनिंग देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिलेली आहे मला! "
माझी जागा घेणा-या व्यक्तीला मीच ट्रेनिंग देणार हे माझ्यासाठी किती अपमानास्पद आहे याचा विचार लॅरीच्या मनात आला असणार पण दोन आठवड्यांचा पगार सोडायची माझी तयारी नव्हती. शिवाय न्यूजरुम आणि फील्ड इथे जेवढे चांगले लोक उरलेले होते त्यांचा व्यवस्थित निरोप घ्यायला मला वेळ मिळाला असता. याला पर्याय म्हणजे आत्ताच्या आत्ता बाहेर पडा आणि सिक्युरिटीच्या पहा-यात तुमच्या सगळ्या वस्तू कार्डबोर्ड बाॅक्सेसमध्ये घेऊन जा. माझ्यासाठी ते जास्त अपमानास्पद होतं. अर्थात सिक्युरिटीवाले त्या टेनिस बाॅलच्या प्रसंगामुळेच माझं सामान तपासतील हे मला माहीत होतं. मी स्वत: असला प्रकार कधीच केला नसता.
" एवढंच म्हणाला तो? दोन आठवडे आणि नंतर तू बाहेर? "
" तो असंही म्हणाला की मी अजूनही चांगला दिसतो. माझ्यासाठी टीव्हीचा पर्याय अजूनही आहे! "
" ओ मॅन! आज रात्री बसायला पाहिजे म्हणजे आपण!"
" मी तयार आहे! "
" पण हे बरोबर नाहीये! "
" हे जग चुकीच्या गोष्टींनी भरलंय लॅरी! "
" तुझी जागा कोण घेणार आहे? निदान ती तरी काही काळ सुरक्षित आहे! "
" अँजेला कुक! "
" वाटलंच मला! आपले सगळे पोलिसवाले फिदा होतील तिच्यावर! "
लॅरी माझा कितीही जुना मित्र असला तरी त्याच्याशी या गोष्टींवर बोलायची माझी तयारी नव्हती. माझ्यासमोर असलेले पर्याय मला तपासून पाहायचे होते. मी माझ्या खुर्चीत जरा ताठ बसलो आणि मान उंचावून क्युबिकलबाहेर जरा नजर फिरवली. कुणीही माझ्याकडे बघत नव्हतं. सर्व संपादकीय आॅफिसेसना काचेच्या भिंती होत्या. क्रेमरचं आॅफिस एका कडेला होतं. तो उभा राहून सगळ्या न्यूजरुमकडे पाहात होता. माझ्यावर त्याची दृष्टी एक क्षणभर स्थिरावली आणि लगेच त्याने दुसरीकडे बघायला सुरूवात केली.
" मग आता काय ठरवलं आहेस तू? " लॅरीने विचारलं.
" अजूनतरी काही नाही पण आता ठरवायलाच लागेल. बरं ते जाऊ दे. कुठे बसायचं आपण? बिग वँग की द शाॅर्ट स्टाॅप? "
" शाॅर्ट स्टाॅप. मी काल रात्रीच वँगमध्ये गेलो होतो. "
" ठीक आहे. भेटूया मग! " मी फोन ठेवणार तेवढ्यात लॅरीने त्याचा शेवटचा प्रश्न विचारला, " त्याने तुला सांगितलं का की तू कितवा आहेस ते? "
अर्थात. हा प्रश्न कधी ना कधी तर येणारच होता. त्याला त्याचे दिवस राहिलेत की भरलेत ते बघायचं होतं.
" मी आतमध्ये गेल्यावर क्रेमरने सुरूवात अशी केली होती की मॅनेजमेंटची खूपच इच्छा आहे की मला काढावं लागू नये आणि त्यामुळे असा निर्णय घेणं किती कठीण आहे वगैरे वगैरे. तो मला म्हणाला की मी नव्याण्णवावा आहे. "
दोन महिन्यांपूर्वी आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की खर्चाला कात्री लावण्यासाठी आणि आमच्या गुंतवणूकदारांना खूष करण्यासाठी १०० पत्रकारांना काढलं जाईल. लॅरी विचारात पडला. मी परत एकदा क्रेमरच्या केबिनकडे पाहिलं. तो आतच होता पण आमच्याकडे पाहात नव्हता.
" मी तर तुला असाच सल्ला देईन लॅरी की जरा जपून राहा. मॅनेजमेंटच्या नजरेत येशील असं काही करु नकोस. आपला जल्लाद तिथे केबिनमध्ये कुणाच्या डोक्यात कु-हाड घालायची याचा विचार करत उभा आहे! "
लॅरीकडून काही प्रतिसाद येण्याआधीच मी काॅल कट केला, पण इअरफोन्स तसेच ठेवले. मला कोणाशीही बोलण्यात रस नव्हता. लॅरी ही बातमी सगळीकडे पसरवेल आणि लोक मला सहानुभूती द्यायला येतील याची मला खात्री होती पण आत्ता या क्षणी मला कोणताही व्यत्यय नको होता. मी एक छोटी स्टोरी संपवण्याच्या मागे होतो. ती झाली आणि डेस्कच्या ताब्यात दिली की मग मी दैनिक पत्रकारितेतल्या माझ्या करिअरचा अंत साजरा करण्यासाठी बारमध्ये जाणार होतो. कारण वस्तुस्थिती तशीच होती. मार्केटमध्ये माझ्यासारख्या चाळिशीच्या उंबरठ्यावर आलेल्या क्राईम रिपोर्टरला नोकरी देणारा एकही पेपर या घडीला अस्तित्वात नव्हता. आणि का घेईल कोणी मला? युनिव्हर्सिटी आॅफ सदर्न कॅलिफोर्निया, मेडिल, कोलंबिया यासारख्या संस्थांमधून अँजेला कुकसारखे हजारो टेक-सॅव्ही रिपोर्टर्स दर वर्षाला बाहेर पडत होते. शिवाय अनुभव मिळवण्यासाठी अत्यंत कमी पगारावर काम करायलाही ते तयार होते. माझा आणि कागदावर छापल्या जाणा-या पेपरचा - दोघांचाही शेर संपुष्टात आला होता. आता जमाना इंटरनेटचा होता. आॅनलाईन एडिशन्स, तासातासाला अपडेटस्, ब्लाॅग हे आता परवलीचे शब्द होते. ट्विटरवर स्टोरी ब्रेक होणं आता अगदी नित्याची बाब होती. रिपोर्टरला आता आॅफिसमध्ये येऊन स्टोरी फाईल करायची गरज नव्हती. हे काम आता मोबाईल फोनवरून होत होतं. सकाळचा पेपर म्हणजे आदल्या रात्री इंटरनेटवर जे काही आलेलं असेल तेच छापणारा अशी वेळ आली होती.
माझ्या डोक्यात हे सगळे विचार घुमत असतानाच माझा फोन परत वाजला. माझ्या माजी पत्नीचा असावा असा माझा अंदाज होता. ती याच पेपरच्या वाॅशिंग्टन ब्यूरोमध्ये होती, त्यामुळे तिला तर ही बातमी कळणं स्वाभाविक होतं. पण काॅलर आयडीवर ' Velvet Coffin' हे शब्द पाहिल्यावर मला धक्काच बसला. लॅरीने इतक्या लवकर बातमी बाहेर पसरवली असण्याची शक्यताच नव्हती. इच्छा नसूनही मी फोन उचलला. पलीकडे अर्थातच डाॅन गुडविन होता - एल्.ए.टाईम्सचा स्वघोषित टीकाकार आणि निरीक्षक.
" मी ऐकलं आत्ताच, " तो म्हणाला.
" कधी? "
" आत्ता. दोन मिनिटं पण नाही झाली. "
" कसं काय? मला स्वतःलाच पाच मिनिटांपूर्वी समजलं. "
" सोड ना जॅक! तुला माहीत आहेच मी माझ्या सोर्सचं नाव फोडू शकत नाही. पण माझे हेर सगळीकडे आहेत. तू आत्ताच क्रेमरच्या केबिनमधून बाहेर आलास आणि तुझं नाव थर्टी लिस्टमध्ये आहे! बरोबर ना?"
थर्टी लिस्ट म्हणजे गेल्या काही वर्षांत खर्च कमी करण्याच्या धोरणामुळे जे लोक टाईम्समधून निघून गेले अशा लोकांची यादी. जुने रिपोर्टर्स स्टोरी टाईप झाली की शेवटी - 30 असं लिहायचे. एन्ड आॅफ स्टोरी. गुडविन स्वतः या यादीवर होता. त्याने तर करिअरची सुरूवात टाईम्समध्ये केली होती आणि त्याला एडिटर-इन-चीफ बनण्याचीही संधी मिळाली होती पण त्याच सुमारास टाईम्स दुस-या एका कंपनीने विकत घेतला. त्यांचं आर्थिक धोरण वेगळं होतं. जेव्हा डाॅनने त्यांच्या काही गोष्टींना विरोध केला तेव्हा त्यांनी त्याची कोंडी करायचा प्रयत्न केला. शेवटी वैतागून डाॅनने त्यांना आपले शेअर्स विकले आणि पेपर सोडला. कालांतराने या कंपनीलाही दिवाळं जाहीर करावं लागलं आणि टाईम्सची मालकी अजून कोणा तिस-याकडेच गेली. पण मालक बदलले तरी लोकांना कामावरून कमी करण्याचं आणि कमी लोकांना जास्त कामं करायला लावून आपला नफा वाढवण्याचं धोरण काही बदललं नाही. इकडे टाईम्समधून बाहेर पडल्यावर डाॅनने इंटरनेट पत्रकारिता चालू केली. त्याची वेबसाईट आणि ब्लाॅग या दोन्हीही ठिकाणी तो टाईम्समधल्या घडामोडींचा धांडोळा घेत असे. या साईटचं नाव होतं thevelvetcoffin.com. टाईम्स एकेकाळी काय होता याची आठवण करुन देणारा शब्द. मखमलीची शवपेटी. काम करण्यासाठी इतकी अप्रतिम जागा की लोक येतील आणि मरेपर्यंत स्वखुशीने तिथेच राहतील. पण आता सारखे बदलणारे मालक आणि मॅनेजमेंट, खर्चात बचत करण्याच्या नावाखाली लोकांना काढून टाकणं, दर वर्षाला आक्रसणारं बजेट यामुळे मखमलीऐवजी टाईम्स आता पत्र्याची पेटी वाटायला लागला होता. आणि गुडविन या सगळ्या घडामोडींवर घारीसारखी नजर ठेवून होता. त्याचा ब्लाॅग टाईम्समधले सगळेजण वाचत असत. अर्थातच लपूनछपून. उघडपणे वाचण्याची सोय नव्हतीच. पण टाईम्सच्या गेंड्याची कातडी असलेल्या मालकांना आणि मॅनेजमेंटला काही फरक पडत होता असं मला वाटत नव्हतं. इंटरनेटमुळे पत्रकारितेचं क्षेत्रच आमूलाग्र बदललं होतं. अगदी न्यूयॉर्क टाईम्स आणि वाॅशिंग्टन पोस्टसारख्या पत्रकारितेत आदर्श मानल्या जाणा-या पेपर्सनाही याची झळ लागली होती.
पण फक्त दोन आठवडे. त्यानंतर मला काहीही फरक पडणार नव्हता. मी परत येणार नव्हतो. माझ्या डोक्यात माझ्या अर्धवट राहिलेल्या कादंबरीचे विचार घोळत होते. माझ्या काँप्युटरवर गेले कित्येक महिने तिचा पहिला ड्राफ्ट पडून होता. तो आता मला खुणावत होता. माझी जी काही बचत होती तिने कमीतकमी सहा महिने मला काढता आले असते. माझं घर माझ्या स्वतःच्या मालकीचं होतं. त्याच्यावर रिव्हर्स माॅर्टगेज मिळू शकलं असतं. अर्थात आता किती हा प्रश्न होताच. माझी आताची गाडी विकून मी एखादी साधी हायब्रीड गाडी घेतली तर तोही खर्च आटोक्यात राहिला असता.
मला आता यात संधी दिसायला लागली होती. शेवटी प्रत्येक पत्रकार हा मनाने कादंबरीकार, किमान कथाकार तर असतोच. फरक पडतो तो कला आणि कारागिरीचा. प्रत्येक लेखकाला कलाकार म्हणवून घ्यायला आवडतं आणि आता मी त्यात उडी मारायला तयार होतो. माझी अर्धवट कादंबरी - या घडीला मला तिचा प्लाॅटही नीट आठवत नव्हता - ही बेस्टसेलर व्हावी अशी माझी इच्छा होती आणि आता मला त्यावर काम करायला वेळ मिळणार होता.
" आजच शेवटचा दिवस आहे तुझा?" गुडविनच्या प्रश्नाने मी परत भानावर आलो.
" नाही. दोन आठवड्यांनंतर. मला माझ्या जागी येणा-या मुलीला ट्रेनिंग द्यायचंय. "
" वा वा! हे चांगलं आहे! लोकांना किमान एक स्वाभिमान असावा असं पण वाटत नाही की काय टाइम्सच्या मॅनेजमेंटला? "
" अरे पण दोन आठवड्यांचा पगार तर मिळतोय ना! आजच कार्डबोर्ड बाॅक्सेस घेऊन चंबुगबाळं आवरण्यापेक्षा तर हे बरंच आहे. "
" पण तू टाईम्समध्ये किती वर्षे आहेस? सहा? सात? तुझ्यासारख्या अनुभवी रिपोर्टरला अशी वागणूक मिळणं हे बरोबर वाटतं तुला?"
आता माझे पत्रकारितेतच काळ्याचे पांढरे झालेले असल्यामुळे तो माझ्याकडून एखादी प्रतिक्रिया काढून घ्यायचा प्रयत्न करतोय हे माझ्या लक्षात आलं. त्याच्या ब्लाॅगमध्ये टाकण्यासाठी त्याला काहीतरी हवं असणार. पण मी बधलो नाही आणि त्याला स्पष्टपणे सांगितलं की निदान पूर्णपणे बाहेर जाईपर्यंत तरी मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. त्याचं अर्थातच समाधान झालं नाही आणि त्याने इकडचे-तिकडचे प्रश्न विचारून माझ्याकडून प्रतिक्रिया काढून घ्यायचा प्रयत्न करायला सुरूवात केली.
त्याचवेळी होल्डवर असलेल्या काॅलची रिंग माझ्या कानात घुमली. काॅलर आयडीवर xxxx असं आलं होतं. याचा अर्थ हा काॅल स्विचबोर्डवरुन आला होता आणि काॅल करणा-याकडे माझा नंबर नव्हता. लाॅरेन, आमची स्विचबोर्ड आॅपरेटर, अशा वेळी काॅल करणा-याचा नंबर लिहून घेत असे आणि आमचा आधी चालू असलेला काॅल संपला की मग आम्हाला तो नंबर देत असे. पण आत्ता असं न करता तिने काॅल माझ्यापर्यंत पाठवला - मी आधी काॅलवर असतानाही - याचा अर्थ त्या काॅल करणा-याने तिची खात्री पटवलेली होती की हा काॅल महत्वाचा आहे.
मी गुडविनला कटवलं, " डाॅन, मी तुझ्याशी नंतर बोलतो. आत्ता एक दुसरा काॅल येतोय. " आणि ताबडतोब काॅल बदलला.
" जॅक मॅकएव्हाॅय. "
पलीकडे शांतता.
" हॅलो, मी जॅक मॅकएव्हाॅय बोलतोय. काय करु शकतो मी तुमच्यासाठी? "
समोरच्या व्यक्तीचा आवाज आला आणि त्याक्षणी मी ओळखलं की हा एका काळ्या, अशिक्षित बाईचा आवाज आहे.
" मॅकेव्हाय, तू खरं कधी बोलनारेस मॅकेव्हाय?"
" कोण बोलतंय? "
" तू खोटंनाटं लिवलंयस तुझ्या पेप्रात मॅकेव्हाय! "
माझा पेपर!
" हे पहा मॅडम, तुम्ही जर मला तुम्ही कोण आहात आणि तुमची नेमकी काय तक्रार आहे ते सांगितलंत तर मी तुमचं म्हणणं ऐकून घेईन. नाहीतर..."
" ते आता बोलताहेत की झो पोरगा नाहीये. तो बाप्याहे. हा काय फालतूपना लावलाय? त्याने त्या वेसवेला हात पन नाय लावलाय! "
मला ताबडतोब समजलं की हा कुठल्या प्रकारचा काॅल आहे. ' निरपराध ' माणसाच्या वतीने आलेला काॅल. त्याची आई, बहीण किंवा प्रेयसी - जिला मला तो कसा निरपराध आहे आणि माझी स्टोरी कशी चुकीची आहे हे सांगायचंय. असले भरपूर काॅल मी हाताळले होते. एक निःश्वास सोडून मी हा काॅल जितक्या लवकर निपटवता येईल तितक्या लवकर निपटवायचं ठरवलं.
" झो कोण?"
" झो. माझा मुलगा. अलोन्झो. त्यानं काय बी केलेलं नाय अन् तो बाप्याबी नाय. "
आता ती हेच बोलणार हे मला अपेक्षित होतं. या बायकांचे मुलगे, भाऊ, प्रियकर - सगळे निरपराध असतात. चूक पोलिसांची असते. कोणीही तुम्हाला फोन करुन तुम्ही कसं बरोबर लिहिलंय किंवा पोलिसांनी कसं बरोबर गुन्हेगाराला पकडलंय असं सांगणार नाही. मला लोकांनी तुरुंगातूनही फोन केले आहेत. एकानेही ' हो. मी हा गुन्हा केलाय ' असं सांगायला फोन केलेला नाही. सगळेजण एकजात निरपराध!
मला फक्त एका गोष्टीबद्दल शंका होती आणि ती म्हणजे या माणसाचं नाव. अलोन्झो. मी कुठल्याही अलोन्झोबद्दल काही लिहिल्याचं मला आठवत नव्हतं.
" मॅडम, तुमची खात्री आहे की तुमचं माझ्याकडेच काम आहे? मी कुठल्याही अलोन्झोबद्दल काही लिहिल्याचं मला आठवत नाहीये. "
" नाय नाय. तूच हायेस त्यो. तुझं नाव हाय इकडं पेप्रात लिवलेलं. तू लिवलंयस की त्यानं तिला गाडीच्या डिकीत टाकलं. असलं वंगाळ काम नाय केलं माझ्या पोरानं. "
आता माझी ट्यूब पेटली. ही गेल्या आठवड्यातली घटना होती. डेस्कने जेमतेम ६ इंच जागा दिली होती या बातमीला, कारण तिच्यात तसं नवीन काही नव्हतं. एका अल्पवयीन ड्रग डीलरने आपल्या एका गि-हाईकाचा गळा दाबून खून केला आणि तिचं प्रेत तिच्याच गाडीच्या डिकीत टाकलं. गुन्हेगार काळा होता तर खून झालेली स्त्री गोरी होती. पण तरीही डेस्कने यात रस दाखवला नव्हता कारण ती ड्रग्ज घेणारी होती. ती आणि तिला मारणारा हे दोघंही तसे एकाच माळेचे मणी होते. तुम्ही जर हेराॅइन किंवा कोकेन विकत घेण्यासाठी दक्षिण एल्.ए. मध्ये गेलात तर अशा घटना घडू शकतात. त्याबद्दल कुणालाही सहानुभूती नव्हती आणि पेपरमध्ये जागा खर्च करायचा तर प्रश्नच येत नव्हता.
मला अलोन्झो हे नाव आठवत नव्हतं कारण मला कोणीही ते सांगितलंच नव्हतं. तो जर अल्पवयीन असेल तर कायद्यानुसार त्याचं नाव गुप्त ठेवलं जातं. हा पोरगा १६ वर्षांचा होता.
माझ्या टेबलच्या उजव्या बाजूला असलेल्या गठ्ठ्यातून मी दोन आठवड्यांपूर्वीच्या मंगळवारचा पेपर काढला. त्यातल्या मेट्रो पुरवणीच्या चौथ्या पानावर ही बातमी होती. बायलाईन द्यावी एवढी मोठी आणि महत्त्वाची तर ही स्टोरी नक्कीच नव्हती पण डेस्कवरच्या कुणीतरी माझं नाव स्टोरीच्या खाली देण्याचा आगाऊपणा केलेला होता.
" अच्छा, तर अलोन्झो तुमचा मुलगा आहे आणि दोन आठवड्यांपूर्वी रविवारी त्याला डेनिस बॅबिटच्या खुनाबद्दल अटक झालेली आहे, बरोबर?"
" मी सांगत्ये तुला त्यानं असलं काय बी केलेलं नाय. कोनत्यातरी दुस-या बाराच्यानं केलेलं हाय हे! "
" ते बघू आपण पण तुम्ही त्याच्याचबद्दल बोलताय, बरोबर? "
" बरोबर. आणि तू खरं कवा छापनार ते बोल आधी!
" खरं काय आहे? तुमचा मुलगा निर्दोष आहे? त्याने हे केलेलं नाही?"
" बरोबर. तू जे लिवलंस ते समदं चुकीचं हाय. तो फकस्त १६ चा हाय आणि आता हे मरीचे जने पोलिसवाले मला सांगून -हायलेत की त्याच्यावर बाप्या म्हणून केस व्हनार. हे काय चालवलंय?"
" अलोन्झोचं आडनाव काय आहे? "
" विन्स्लो. "
" अच्छा. आणि तुम्ही मिसेस विन्स्लो! "
" नाय! " ती एवढ्या जोराने ओरडली की माझ्या कानठळ्या बसल्या, " तसं काय बी नाय आन् आता काय तू माझं नाव टाकनार तुझ्या पेप्रात? "
" तसं नाही मॅडम. मला फक्त मी कोणाशी बोलतोय ते बघायचं होतं. "
" माझं नाव वँडा सीसम्स. माझं नाव पेप्रात छापून आलेलं चालनार नाय हां मला! तू फक्त खरं काय ते ल्ही. माझ्या पोराचं नाव खराब केलं तुझ्या पेप्राने! "
मी महत्प्रयासाने माझं हसू दाबलं आणि एकवार माझ्या स्टोरीवरुन नजर फिरवली.
" इथे लिहिलंय मिसेस सीसम्स की अलोन्झोला पोलिसांनी खुनाच्या आरोपावरुन अटक केलीय. यात काहीच चूक नाहीये. बरोबर आहे हे. "
" त्याला अडकवलाय. माझा पोरगा माशीला बी मारनार नाय! "
" पोलिसांनी असं पण म्हटलंय की त्याचं वयाच्या १२व्या वर्षापासून रेकाॅर्ड आहे. ड्रग्ज विकण्यावरुन. हे पण खोटं आहे मिसेस सीसम्स? "
" ते असेल. पन त्याने खून केलाय कशावरून? पोलिसांनी त्याला अडकवलाय आन् तू तुझे डोले बंद करुन ते बोलले त्ये छापून मोकला झालास! "
" पण पोलिस म्हणताहेत की त्याने त्या मुलीचा खून केल्याचं आणि तिचं प्रेत गाडीच्या डिकीत ठेवल्याचं कबूल केलंय."
" खोटं हाय त्ये! त्यानं असं काय बी केलेलं नाय! "
ती खुनाबद्दल बोलतेय की कबुलीजबाबाबद्दल ते मला समजलं नाही. पण त्याने काही फरक पडत नव्हता. हा काॅल संपवायची माझी इच्छा होती. मी माझ्या डेस्कटाॅप स्क्रीनवर पाहिलं तर ६ इमेल्स आलेली होती. सगळी मी क्रेमरच्या आॅफिसमधून बाहेर पडल्यावरच आलेली होती. ' गिधाडं घिरट्या घालायला लागली, ' माझ्या मनात विचार येऊन गेला. हा काॅल संपवून हे सगळं प्रकरण अँजेला कुकच्या हवाली करायची इच्छा माझ्या मनात प्रबळ होत होती. तिला शिकायचंय ना, मग हाताळू देत तिला असले यडxx लोक!
" ठीक आहे मिसेस विन्स्लो! मी काय ते - "
" मिसेस सीसम्स! बोल्ले ना मी! तुला साधं माझं नाव पन बरोबर म्हाईत नाय! "
तिचा हा मुद्दा बरोबर होता. मी एक आवंढा गिळला आणि म्हणालो, " साॅरी मिसेस सीसम्स. तुम्ही मला जे काही सांगितलंय ते मी लिहून घेतलंय. मी बघतो काही करता येतंय का ते आणि जर तसं काही असेल तर मी तुम्हाला काॅल करीन. "
" नाय. तू नाय करनार. "
" काय नाही करणार मी? "
" तू मला काॅल नाय करनार! "
" मी म्हणालो की जर ..."
" नाय रे! तू पन साला तसलाच! तू माझा नंबर पन नाय मागितला! तुला काय पन पडलेली नाय. साला पोलिसांसारखाच तू पन माxxxद आईxxx आहेस. माझा पोरगा काय पन न करता जेलमदी सडनार आनी तू फकस्त मजा बगनार! "
तिने फोन आपटला. मी एक क्षणभर स्तब्ध झालो आणि ती मला जे बोलली त्याबद्दल जरा विचार केला. मंगळवारचा जुना पेपर परत होता तिथे ठेवून दिला आणि कीबोर्डजवळ ठेवलेल्या माझ्या वहीकडे पाहिलं. मी जरी तिला म्हणालो तरी प्रत्यक्षात मी वहीत काहीही लिहिलं नव्हतं. या अडाणी वाटणा-या बाईने मला बरोबर पकडलं होतं.
मी माझ्या खुर्चीत मागे रेलून बसलो आणि माझ्या क्युबिकलकडे पाहिलं. एक टेबल, एक डेस्कटाॅप काँप्युटर, एक फोन आणि फायलींनी भरलेले दोन शेल्फ. इकडेतिकडे पडलेल्या वह्या, जुने पेपर्स. एक लाल रंगाचं लेदर बाईंडिंग असलेली वेबस्टर डिक्शनरी. ही तर एवढी जुनी होती आणि मी इतक्या वेळा वापरली होती की तिच्या कव्हरवरची अक्षरं पुसट झाली होती. माझ्या आईने ही डिक्शनरी मला तेव्हा दिली होती जेव्हा मी तिला मला लेखक व्हायचंय असं सांगितलं होतं. वीस वर्षांच्या पत्रकारितेतल्या कारकीर्दीनंतर माझ्याकडे फक्त ही डिक्शनरी उरली होती. दोन आठवड्यांनंतर मी इथून फक्त ही डिक्शनरीच घेऊन जाणार होतो.
" हाय जॅक! "
मी भानावर येऊन आवाजाच्या दिशेने पाहिलं. अँजेला कुकचा सुंदर चेहरा माझ्या क्युबिकलच्या भिंतीवरून माझ्याकडे पाहात होता. माझी जरी तिच्याशी व्यक्तिगत ओळख नसली तरी मी तिला ओळखत होतो. ती नुकतीच आम्हाला जाॅईन झाली होती. नव्या पिढीतली पत्रकार - मोबाईल जर्नालिस्ट किंवा MoJo. असा रिपोर्टर जो फील्डमधून स्टोरी फाईल करु शकेल, पेपरसाठी किंवा वेबसाईटसाठी फोटोही फाईल करेल, रेडिओ आणि टेलिव्हिजन पार्टनर्ससाठी व्हिडिओही फाईल करेल, वगैरे वगैरे. अँजेलाच्या बायोडेटावर हे सगळं ती करु शकते याची नोंद होतीच पण प्रत्यक्षात मात्र तिला एकही स्टोरी - फील्डमधून किंवा बाहेरून - फाईल करायचा अनुभव नव्हता. पण तरीही मी बाहेर जाणार होतो आणि ती माझी जागा घेणार होती कारण कंपनीला तिला माझ्यापेक्षा कमी पगार द्यावा लागत होता. तिच्याकडे स्वतःचे सोर्सेस नसल्यामुळे अनेक बातम्या हुकणार होत्या, अनेक वेळा पोलिस त्यांच्या हेतूसाठी तिचा वापर करणार होते, अनेकवेळा तिच्याकडे आलेली माहिती ही सत्यता पडताळून न पाहताच बातमी म्हणून छापली जाणार होती. पण तरीही कंपनी आठवड्याला जवळजवळ ५०० डाॅलर्स वाचवत होती. त्याला जास्त महत्व होतं.
तसंही ती किती दिवस प्रिंट मीडियामध्ये राहील याबद्दल माझ्या मनात शंकाच होती. ती काही वर्षे काम करेल, ब-यापैकी बायलाईन्स आपल्या नावावर जमा करेल आणि नंतर वकिली, राजकारण किंवा दोन्ही. कदाचित टीव्हीसुद्धा. लॅरी तिच्याबद्दल जे बोलला होता ते अगदी खरं होतं. ती दिसायला सुंदरच होती. सोनेरी केस, हिरवे डोळे आणि बाकी सगळं पण व्यवस्थित. ती पोलिस हेडक्वार्टर्समध्ये आल्यावर लोक नक्कीच तिच्यावर फिदा झाले असते. मी गेल्यावर कदाचित एका आठवड्यात ते मला विसरतील.
" हाय अँजेला! "
" मिस्टर क्रेमरनी मला तुला भेटायला सांगितलंय. "
अरे वा! माझा पत्ता कट् केल्यापासून जेमतेम १५ मिनिटांच्या आत माझ्या जागी काम करणारी मुलगी इथे हजर होती!
" मी काय म्हणतो अँजेला, " मी म्हणालो, " आता शुक्रवारची दुपार आहे आणि मला ही बातमी आत्ताच समजली आहे त्यामुळे आजच सुरूवात करायची माझी इच्छा नाहीये. सोमवारी सकाळी आपण सुरूवात करु. आपण इथे भेटू, काॅफी घेऊ आणि मग मी तुला पार्कर सेंटरमध्ये घेऊन जाईन आणि लोकांशी ओळख करुन देईन. ठीक आहे?"
" हो चालेल आणि... साॅरी.... म्हणजे... "
" तू साॅरी म्हणण्याची गरज नाही अँजेला. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं याच्यावर माझा विश्वास आहे. पण तुला तरीही माझ्याबद्दल वाईट वाटत असेल तर तू आमच्याबरोबर शाॅर्ट स्टाॅपला ये आणि माझं बिल भर! "
ती हसली. तिला आणि मला दोघांनाही माहीत होतं की हे अशक्य आहे. न्यूजरुमच्या बाहेर आणि आत - नवी पिढी कधीच जुन्या पिढीबरोबर मिसळत नसे. शिवाय माझ्यासारख्या इतिहासजमा होऊ घातलेल्या रिपोर्टरबरोबर जिची करिअर आत्ता सुरु होणार आहे अशी मुलगी कशाला वेळ वाया घालवेल?
" ओके. नंतर कधीतरी बघू ," मी सारवासारव केली, " सोमवारी सकाळी भेटू. ठीक आहे?"
" नक्की. आणि मी तुझ्यासाठी काॅफी आणेन. "
ती परत हसली. ' हिने खरंच टेलिव्हिजनमध्ये जायला हवं, ' माझ्या डोक्यात विचार चमकून गेला.
ती जायला वळली.
" आणि अजून एक, अँजेला! "
"काय?"
" त्याला मिस्टर क्रेमर म्हणण्याची गरज नाही. ही न्यूजरुम आहे, लाॅ फर्म नव्हे. जे लोक इथे मॅनेजमेंटमध्ये आहेत त्यांच्यातल्या बहुतेकांची त्यांना कोणी मिस्टर म्हणून हाक मारावी एवढी लायकी नाहीये. एवढं लक्षात ठेव. "
ती परत एकदा हसली आणि निघून गेली. मी माझी खुर्ची माझ्या काँप्युटरजवळ ओढली आणि एक नवीन फाईल उघडली. मला एका मर्डर स्टोरीचा फाॅलो अप लिहायचा होता. मगच मला न्यूजरुममधून निघून माझं दुःख रेड वाईनमध्ये बुडवता आलं असतं.
क्रमश:
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने,अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
14 Jun 2015 - 1:57 am | एक एकटा एकटाच
येउ दे.........
ये
ये
ये
ये.........
14 Jun 2015 - 2:15 am | आतिवास
रोचक.
वाचतेय.
14 Jun 2015 - 10:35 am | अजया
वाचतेय.पुभालटा.
14 Jun 2015 - 12:16 pm | मुक्त विहारि
वाचत आहे....
14 Jun 2015 - 2:43 pm | आनंद
मस्त!
अनुवाद ही छान होत आहे.
14 Jun 2015 - 3:19 pm | सानिकास्वप्निल
वाह! मस्तं लिहिले आहे.
वाचतेय.
14 Jun 2015 - 8:23 pm | एस
वावावा! पुभाप्र!
15 Jun 2015 - 10:14 am | अमृत
वाचायला मजा येतेय. पुढिल भाग लव्कर टाका.
15 Jun 2015 - 12:04 pm | मृत्युन्जय
काय उत्कंठावर्धक अनुवाद आहे. त्या मेहतावाल्यांना जाउन भेटा एकदा. एक से बढकर एक टुकार अनुवाद डोक्यावर मारतात साले. पुभाप्र. आणी पुढचा भाग लवकर आला पाहिजे नाहितर गाठ आमच्याशी आहे हे ध्यानात ठेवा ;)
16 Jun 2015 - 6:50 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत. डोक्यात जातात काहीकाही ओळी.
लिटरल ट्रान्सलेशनच्या नादाद वर्जिनल अर्थ हरवतो.
20 Jun 2015 - 2:19 am | वॉल्टर व्हाईट
खरे आहे, तुमचा अनुवाद छान आहे, कथावस्तु उत्कंठावर्धक आहे. फोन करणार्या स्त्रीच्या तोंडी पुणे सातारा भागातल्या गुंडांच्या तोंडची स्लँग फक्त थोडी विचित्र वाटली.
15 Jun 2015 - 2:23 pm | झकासराव
उत्कन्ठावर्धक :)
16 Jun 2015 - 5:53 am | जुइ
उत्कंठावर्धक लेख मालिका. पुढील भाग लवकर येऊद्या.
16 Jun 2015 - 12:26 pm | महासंग्राम
पुढचा भाग लौकर येवू द्या …।
16 Jun 2015 - 1:31 pm | मोहनराव
मी ही मुळ कादंबरी मागील वर्षी वाचायला घेतली होती. मध्येच वाचन अर्धवट राहिले होतं. चला या तुमच्या धाग्याच्या निमित्ताने पुर्ण वाचुन होईल.
पुभाप्र.
16 Jun 2015 - 1:54 pm | प्रचेतस
भन्नाट चाललीय कथा.
अनुवादाची शैली सुरेखच.
27 Dec 2015 - 10:24 am | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग ३