द स्केअरक्रो भाग २९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
अजून पाच मिनिटांनी मी हायटॉवर ग्राऊंडमध्ये बसलो होतो. अजिबात गर्दी नव्हती. तिघे-चौघे कॉलेज विद्यार्थी वाटावेत असे तरुण-तरुणी समोर लॅपटॉप ठेवून बसले होते. मी रॅशेलसाठी आणि माझ्यासाठी कॉफी घेतली आणि इतर लोकांपासून जरा दूरच्या टेबलवर बसलो. इथे वायफाय फुकट होतं. मी माझा लॅपटॉप चालू केला आणि रॅशेलची वाट पाहायला सुरुवात केली.
अशीच पंधरा-वीस मिनिटं निघून गेली. मला आता थोडी काळजी वाटायला लागली. तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नसला तर? किंवा कार्व्हरच्या नकळत तिला बाहेर पडता आलं नाही तर? आणि जर ती आली नाही, तर माझा पुढचा प्लॅन काय असणार आहे?
अर्धा तास झाल्यावर मी वैतागून माझा फोन बाहेर काढला, आणि त्याचवेळी तिला आत येताना पाहिलं. ती सरळ माझ्याच दिशेने चालत आली. तिच्या हातात एक कागद होता. तो तिने माझ्यासमोर टाकला.
“काय आहे हे?” मी विचारलं.
“कॉफी ऑर्डर्स. मी असलं काम चौदा वर्षांपूर्वी केलं होतं. जेव्हा मी एफ.बी.आय.मध्ये नुकतीच कामाला सुरुवात केली होती तेव्हा. मी आता ज्युनियर राहिले नाहीये.”
मी समजल्याप्रमाणे मान हलवली, “ मला आपला वेळ वाया घालवायची अजिबात इच्छा नाहीये रॅशेल.”
“ठीक आहे जॅक. तू सांगितल्याप्रमाणे मी इथे आलेले आहे. आता तू काय म्हणतो आहेस ते लवकर बोल.”
“मला या खुन्याची स्वाक्षरी मिळालेली आहे. माझ्यामते मॅकगिनिस हा फक्त एक बळीचा बकरा होता. दोन खुनी आहेत हे खरं आहे, पण दुसरा खुनी आपला स्केअरक्रो आहे. कार्व्हर.”
तिने माझ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तिच्या डोळ्यांवर काळा चष्मा असल्यामुळे मला त्यांच्यातले भाव दिसत नव्हते.
“अच्छा. म्हणजे तू हे शोधून काढलंस, नंतर लगेच फ्लाईट पकडलीस, इथे आलास, आणि आता मला हे सांगतो आहेस की मी ज्या माणसाच्या बरोबर इथे काम करते आहे, तोच खुनी आहे.”
“हो. बरोबर.”
“आणि काय पुरावा आहे तुझ्याकडे?”
“बंकरमध्ये कार्व्हरबरोबर आता कोण आहे?”
“इइआर टीममधले दोन एजंट्स. सारा माउरी आणि जॉर्ज टॉरेस. पण ते जाऊ दे. तू मला काय चाललंय ते सांग.”
तिला माझ्या लॅपटॉपवरची माहिती दाखवण्याआधी मी थोडी पार्श्वभूमी तयार करायची ठरवलं, “सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला हा प्रश्न सतावत होता, की तुझं अपहरण करण्याचं कारण काय होतं?”
“बंकरमधले काही व्हिडिओज पाहिल्यावर त्याच्याबद्दल विचार करायची इच्छा नाहीये माझी.”
“मला ते म्हणायचं नव्हतं. मला हा प्रश्न पडला होता, की तूच का? तुझं अपहरण करण्यामागचा प्रचंड धोका कुरियरने का पत्करला असावा? त्याचं सोपं उत्तर असं आहे की त्यामुळे एफ.बी.आय.चा जो मुख्य तपास आहे, त्यावरून लक्ष हटवलं गेलं असतं. आता मला हे मान्य आहे की ही खूप तात्पुरती गोष्ट ठरली असती कारण एफ.बी.आय.चे अनेक एजंट्स तिथे आले असते. त्यामुळे हे लक्ष विचलित होणं हे खूप कमी वेळ झालं असतं.”
तिने होकारार्थी मान डोलावली.
“पण समजा, यामागे अजून काही कारण असेल, तर? दोन खुनी आहेत. एक शिक्षक आणि एक विद्यार्थी. विद्यार्थ्याने स्वतःहून तुझं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. का?”
“कारण शिक्षक – मॅकगिनिस - जिवंत नाहीये. फक्त विद्यार्थीच उरलेला आहे.”
“हो. पण मग मुळात ते करण्याचं कारण काय? तुझ्यामागे जाण्याचं कारण काय? कुरियर पळून का नाही गेला? हे विसंगत नाही वाटत तुला?”
“म्हणजे?”
“जरा विचार कर. जर मॅकगिनिस खरोखर शिक्षक नसेल तर? जर तो तसा भासावा अशी परिस्थिती निर्माण केली गेली असेल तर? तो फक्त एक बळीचा बकरा असेल आणि तुझं अपहरण खऱ्या खुन्याला किंवा शिक्षकाला वाचवण्यासाठी केलं गेलं असेल तर?”
“पण मग त्याच्या घरी आम्हाला मिळालेल्या पुराव्याचं काय?”
“तुझं म्हणणं आहे माझं पुस्तक त्याच्या घरात मिळणं आणि लेग ब्रेसेस पण तिथे सापडणं? अगदी सहज सोप्या प्रकारे? तुला हे जरा विचित्र नाही वाटत?”
“या गोष्टी त्याच्या घरात अगदी सहज सापडतील अशा ठेवलेल्या नव्हत्या. त्या एजंट्सना दोन-तीन तास शोधल्यावर मिळाल्या. पण ते ठीक आहे. तुझ्या मुद्द्यात तथ्य आहे. कोणीही त्याला अडकवण्यासाठी हे सगळे पुरावे तिथे ठेवू शकतो. पण मग आम्हाला जो सर्व्हर मिळालाय वेस्टर्न डेटामध्ये, त्याचं काय?”
“तूच म्हणालेलीस मला की खुन्यांचे चेहरे व्हिडिओमध्ये दिसत नाहीयेत. त्यांनी मुखवटे वापरलेले आहेत. शिवाय मॅकगिनिस आणि कुरियर हे दोघेच तो सर्व्हर वापरू शकत होते, याचा काहीच पुरावा तिथे नाहीये. हे व्हिडिओज पण तिथे तसेच मुद्दामहून, काहीतरी पुरावा एफ.बी.आय.ला मिळावा म्हणून ठेवलेले नसतील कशावरून?”
ती जरा विचारात पडली. कदाचित तिच्याही मनात या सगळ्या गोष्टी इतक्या सहज मिळाल्याबद्दल शंका आली असावी. पण मग तिने परत नकारार्थी मान हलवली, “ पण या सगळ्याचा कार्व्हरशी काय संबंध? त्याने पळून जायचा किंवा जबाबदारी टाळायचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. जेव्हा कुरियर माझ्या रूममध्ये माझं अपहरण करायला आला होता, तेव्हा कार्व्हर तर बंकरमध्ये...”
ती बोलता बोलता थांबली. मी तिचं वाक्य पूर्ण केलं, “एफ.बी.आय.एजंट्सबरोबर होता.”
तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
“त्याच्याकडे एकदम जबरदस्त अॅलिबी होती. दोन एफ.बी.आय.एजंट्स. तो बंकरमध्ये असताना मी गायब झाले असते, तर कोणालाही त्याचा संशय आला नसता. एफ.बी.आय.ला वाटलं असतं की माझं अपहरण कुरियर आणि मॅकगिनिस यांनी केलेलं आहे.”
“बरोबर. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या असत्या. कार्व्हरचा कुणालाही संशय आला नसता आणि त्याला तुमचा तपास कसा चालला आहे, ते तुमच्याकडूनच समजलं असतं. सगळेजण खुन्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावले असते आणि खऱ्या खुन्याने तुमच्यामध्ये बसून मजा पाहिली असती.”
ती काहीच बोलली नाही. मी माझा मुद्दा अजून पुढे रेटला, “ आणि तू कुठल्या हॉटेलमध्ये आहेस, हे कुरियरला समजलं कसं? कार्व्हरने आपल्याला विचारलं होतं, आठवतं तुला? त्याने कुरियरला सांगितलं,. त्याने तुझ्यावर पाळत ठेवली आणि तो सरळ तुझ्या रूममध्ये आला.”
तिने एक निःश्वास सोडला, “आणि त्या दिवशी इथून निघताना मी इथून निघताना कार्व्हरला माझा रूम नंबर सांगितला आणि हेही सांगितलं होतं की रूमवर गेल्यावर मी रूम सर्व्हिसमधून खायला मागवणार आहे आणि मग झोपणार आहे.”
पण पुढच्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर संभ्रमित भाव आले, “पण एवढंच पुरेसं नाहीये आपल्याला जॅक.”
“ठीक आहे. मग आता हे बघ.”
मी तिला माझ्या लॅपटॉपवर स्केअरक्रोच्या प्रतिमा दाखवल्या. एकामागोमाग एक. त्या पाहात असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले.
“ही चित्रं सर्वात पहिल्यांदा कोणी काढली आहेत ते पहा जरा,” मी म्हणालो.
“ओ माय गॉड! विल्यम डेन्स्लो! डेन्स्लो डेटा! ”
“आता जरा सर्वात पहिल्यांदा जेव्हा द विझार्ड ऑफ ओझ रंगमंचावर आलं होतं, तेव्हा स्केअरक्रोची भूमिका कोणी केली होती ते पण बघून घे.”
“फ्रेडी स्टोन!”
“कळलं आता तुला रॅशेल? इतक्या गोष्टी योगायोग असू शकत नाहीत. कार्व्हरच या सगळ्याचा सूत्रधार आहे. त्याच्या बंकरमध्ये बसून सगळ्या गोष्टी नियंत्रित करणारा. तो ज्यांना मारतोय त्यांना खून झाल्यावर स्केअरक्रोच्या रूपात पेश करतोय. हीच त्याची स्वाक्षरी आहे.”
“पण आम्ही त्याची सगळी पार्श्वभूमी तपासून पाहिली होती. आम्हाला त्यात काहीही वावगं आढळलं नाही.”
“म्हणजे काय? तुम्हाला एकही पोलिस केस आढळून आली नाही. एकदाही त्याला अटक झालेली नाही. असंच ना? कितीतरी वेळा असं घडलेलं आहे की एखादा सीरियल किलर पोलिसांच्या नजरेआड काम करतो. टेड बंडीचं उदाहरण घे. तो एका आत्महत्याविरोधी संस्थेच्या कॉल सेंटरमध्ये काम करायचा. त्याच्यातूनच त्याला त्याने खून केलेल्या अनेक स्त्रियांचा पत्ता मिळाला होता. आता फोनची जागा कॉम्प्युटर आणि सर्व्हरने घेतलेली आहे.”
“पण मी आज त्याच्याबरोबर जेवायला गेले. तो आपण गेलो होतो, त्या रोझीज बारबेक्यूमध्येच घेऊन गेला होता आम्हा सगळ्यांना. मला तेव्हा काहीही विचित्र असं जाणवलं नाही.”
मी यावर काहीतरी बोलणार, तेव्हढ्यात मला आमच्या मागे बसलेला एक मुलगा दिसला. त्याच्यासमोरही लॅपटॉप होता. तो वरच्या दिशेने बघून हसत होता आणि हसता हसता त्याने आपल्या हाताचं मधलं बोट वर करून दाखवलं. मी त्याच्या नजरेच्या रोखाने बघितलं तर एका तुळईवर एक छोटा कॅमेरा दिसला.
माझ्या मनात एक विचार आला. मी त्याच्या दिशेने गेलो., “ काय आहे हे? काय करतो आहेस तू?”
त्याने माझ्याकडे काय मूर्ख माणूस आहे अशा नजरेने पाहिलं आणि खांदे उडवले, “हा लाइव्ह कॅमेरा आहे. तो सगळीकडे जातो. मला आत्ता माझ्या एका मित्राने अॅमस्टरडॅमहून पिंग केलं. त्याने मला इथे बसलेलं पाहिलं.”
माझ्या डोक्यात प्रकाश पडला. इथे कॉफी घेतल्यावर वायफाय फुकट होतं. मी वळलो आणि रॅशेलकडे पाहिलं. माझा लॅपटॉप चालूच होता. त्याच्या स्क्रीनवर स्केअरक्रोचा एक मोठा फोटो होता आणि कॅमेरा लेन्स त्याच्याच दिशेने वळली होती.
माझ्या अंगावर सरसरून काटा आला. कार्व्हर!
“तू त्याला कुठे जाते आहेस, हे सांगितलंस?”
“हो. मी म्हणाले की मी...”
आता अजून काही बोलायची गरज नव्हती. मी माझा लॅपटॉप बंद केला. आम्ही दोघेही पार्किंगच्या दिशेने धावलो.
रॅशेलने तिचा फोन काढून कोणालातरी फोन करायचा प्रयत्न करत होती, “ सारा आणि जॉर्ज या दोघांपैकी कोणाचाच फोन चालू नाहीये.”
“म्हणजे?”
तिने परत एकदा फोन करायचा प्रयत्न केला, “आधी रिंग वाजत होती. आता फोन बंद आहे असं ऐकू येतंय.”
एक अक्षरही न बोलता आम्ही दोघेही तिच्या गाडीत बसलो आणि तिने गाडी सुरु केली.
########################################
आमची गाडी वेस्टर्न डेटाच्या कम्पाउंडमध्ये शिरली. रॅशेलने आजूबाजूला पाहिलं.
“कार्व्हर अजूनही इथेच आहे,” ती म्हणाली.
“कशावरून?”
तिने मला जरा दूर पार्क केलेली एक लेक्सस गाडी दाखवली, “त्याची गाडी. तो आम्हाला लंचसाठी घेऊन गेला होता.”
आम्ही धावतच रिसेप्शनमध्ये शिरलो. तिच्याकडे स्वतःचं की कार्ड होतं. रिसेप्शनवर कोणीही नव्हतं. आम्ही तिथून बंकरकडे जाणाऱ्या लिफ्टपाशी गेलो.
“थांब. आपण लिफ्टने नको जाऊ या,” ती म्हणाली.
“का?”
“लिफ्ट काँप्युटरने नियंत्रित होते. कार्व्हर जर इथे असेल, तर...”
तिने पुढे काही बोलायची गरज नव्हती. आम्ही जिन्याच्या दिशेने वळलो. जाता जाता रॅशेलने तिची गन होल्स्टरमधून काढून हातात घेतली.
आम्ही त्या अष्टकोनी खोलीत आलो आणि बंकरकडे जाणाऱ्या दरवाज्यापाशी गेलो.
“माझ्यापाठी राहा जॅक,” रॅशेल म्हणाली, “आपण आत येतोय हे त्याला समजणार आहेच.”
आम्ही सावधपणे बंकरमध्ये पोचलो. मला जेमतेम दोन-तीन दिवसांपूर्वी इथे आलेलो असल्यामुळे अजूनही इथली रचना आठवत होती. ज्या दरवाज्याने आम्ही बंकरमध्ये शिरत होतो, तो बहुधा कंट्रोल रूममध्ये उघडत होता.
आम्ही कंट्रोल रूममध्ये पोचलो तेव्हा माझा अंदाज खरा असल्याचं मला समजलं. पण कंट्रोल रूम पूर्णपणे रिकामी होती.
“मला हे काही बरोबर वाटत नाहीये,” रॅशेल म्हणाली, “ सारा आणि जॉर्ज इथेच काम करत होते. ते कुठे गेले? आणि हा दरवाजा उघडा होता. “
तिने दाखवलं त्या दिशेने मी पाहिलं. सर्व्हर रूमला असलेला काचेचा दरवाजा. तो बंद होता. मी इकडेतिकडे पाहिलं तेव्हा सर्व्हर रूमला लागुनच जे कार्व्हरचं छोटं ऑफिस होतं, त्याचा दरवाजा लोटलेला दिसला. मी तिथे गेलो आणि तो उघडला.
ऑफिससुद्धा रिकामं होतं. कार्व्हरच्या टेबलपाशी जाऊन मी तिथल्या कॉम्प्युटरच्या टच पॅडला स्पर्श केला आणि दोन स्क्रीन्स दिसायला लागले. स्क्रीनवर दिसणारी प्रतिमा आम्ही आत्ता जिथे होतो त्या हायटॉवर ग्राऊंड्स कॅफेचं दृश्य दाखवत होती.
“रॅशेल! हे बघ.”
ती आत आली आणि तिने त्या स्क्रीन्सकडे पाहिलं. आता तिच्या नजरेतला अविश्वास पूर्णपणे निघून गेला होता.
आम्ही दोघेही परत कंट्रोल रूममध्ये आलो. ती एका वर्कस्टेशनपाशी गेली आणि तिने तिथल्या टच पॅड आणि की बोर्डवरची बटन्स दाबायला सुरुवात केली. तिथे दोन स्क्रीन्स होते, ज्यांच्यावर इथल्या सर्व कॅमेऱ्यांमधून दिसणाऱ्या प्रतिमा मल्टीप्लेक्स स्वरुपात दिसू शकत होत्या. पण आत्तामात्र सगळीकडे अंधार होता. एकही कॅमेरा चालू नव्हता. तिने बाकी वर्कस्टेशन्सवर जाऊन प्रयत्न केला. सगळीकडे तेच दिसत होतं. शेवटी एका वर्कस्टेशनवर एक कॅमेरा अँगल चालू दिसला. तिने त्यावर क्लिक करून ती प्रतिमा मोठी केली.
स्क्रीनवर सर्व्हर टॉवर्सच्या दोन रांगा आणि त्यांच्यामधली जागा दिसत होती आणि जमिनीवर दोघेजण पडलेले होते. त्यांचे चेहरे जमिनीकडे होते आणि हात पाठीमागे बांधलेले होते. मी लक्षपूर्वक पाहिलं तर त्यांचे पायही बांधलेले दिसले. एक पुरुष आणि एक स्त्री.
इथल्या प्रत्येक वर्कस्टेशनच्या बाजूला माईक होताच. रॅशेलने माईक चालू आहे की नाही ते न बघताच त्यात बोलायला सुरुवात केली, “सारा! जॉर्ज! माझं बोलणं ऐकू येतंय का तुम्हाला?”
तिचा आवाज तिथे ऐकू गेला असावा. जॉर्जने आपली मान वर उचलली. त्याच्या पांढऱ्या शर्टवर रक्त लागलेलं दिसत होतं.
“रॅशेल!” तो क्षीण आवाजात म्हणाला, “मला ऐकू येतोय तुझा आवाज.”
“कार्व्हर कुठे आहे जॉर्ज?”
“मला माहित नाही. इथेच होता. त्यानेच आम्हाला इथे आणलं.”
“काय झालं?”
“तू गेल्यावर कार्व्हर त्याच्या ऑफिसमध्ये गेला. तिथे तो थोडावेळ होता. नंतर तो बाहेर आला. आम्ही काम करत होतो. त्याने आम्हा दोघांनाही डोक्यावर कशाचा तरी आघात करून बेशुद्ध केलं. आम्ही शुद्धीवर येऊन थोडा वेळ झालाय. आम्ही त्याला हाका मारल्या पण त्याचा कुठेही पत्ता नाहीये. आमच्या गन्सपण बहुतेक त्याच्याकडेच आहेत.”
“सॉरी रॅशेल!” सारा म्हणाली, “तो असं काही करेल याची शंकापण आम्हाला आली नाही.”
“तुमची चूक नाहीये सारा. माझी आहे. पण आता तुम्हाला दोघांना इथून बाहेर काढायचा प्रयत्न करतेय मी.”
ती त्या काचेच्या दरवाज्याच्या जवळ असलेल्या बायोमेट्रिक स्कॅनरकडे गेली आणि तिने तिचा हाताचा तळवा त्यावर ठेवला.
“तो आतमध्ये दबा धरून बसलेला असेल तर?” मी म्हणालो.
“हो, ती शक्यता आहे. पण त्यांना असंच तिथे सोडू शकत नाही मी.”
तिच्या तळव्याचा स्कॅन पूर्ण झाल्याचा क्लिक असा आवाज आला. तिने बाजूचं हँडल ढकलायचा प्रयत्न केला पण ते जागचं हललं नाही.
“हा दरवाजा का उघडत नाहीये?” ती वैतागून म्हणाली, “कालच माझी माहिती या स्कॅनरमध्ये फीड केली होती.”
“कोणी केली होती माहिती फीड?” मी विचारलं.
तिने माझ्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी आम्हाला उत्तर मिळालं. कार्व्हर.
“कोण उघडू शकतो हा दरवाजा?” मी विचारलं.
“इथून कोणीच नाही. मी, सारा, जॉर्ज आणि कार्व्हर स्वतः.”
“वरती काम करणाऱ्यांपैकी कोणी?”
“नाही. मी बोलले होते ना तुला. आम्ही जवळपास सगळ्यांना घरी पाठवून दिलंय म्हणून. आणि जे कोणी तिथे आहेत त्यांच्यापैकी कोणालाही हा दरवाजा उघडता येईल असं मला नाही वाटत. आपण अडकलोय...”
“रॅशेल!”
ती धावतच मी उभा होतो तिथे आली. कार्व्हर अचानक या एकमेव कॅमेऱ्याच्या समोर आला होता. तो या एजंट्सच्या समोर उभा होता. त्याचे हात त्याच्या लॅब कोटच्या खिशात होते आणि तो कॅमेऱ्याकडेच बघत होता.
“काय करतोय तो?”
कार्व्हरने त्याच्या कोटाच्या खिशातून एक सिगरेट आणि एक लायटर बाहेर काढले, आणि सिगरेट शांतपणे आपल्या ओठांत ठेवली.
रॅशेलने माईक हातात घेतला, “वेस्ली! काय चाललंय?”
कार्व्हर लायटर सिगरेटच्या जवळ आणत होता, पण हा प्रश्न ऐकून तो थांबला आणि त्याने परत कॅमेऱ्याकडे पाहिलं,
“मला वाटतं, आता हे नाटक पुरे झालं एजंट वॉलिंग! आता शेवट जवळ आला आहे.”
“काय करणार आहेस तू?”
“ तुला माहित आहे, मी काय करणार आहे ते!” तो म्हणाला, “मी या सगळ्याचा शेवट करतोय. शिकारी कुत्रे माझ्या मागे लागतील, मला घेरतील आणि पकडतील. मग एफ.बी.आय. मला पिंजऱ्यात ठेवेल आणि माझं प्रदर्शन मांडेल. माझी तसं व्हावं अशी इच्छा नाहीये. माझ्यासाठी ते मृत्यूपेक्षाही भयानक असेल एजंट वॉलिंग.”
त्याने लायटर परत एकदा सिगरेटजवळ आणला.
“असं नको करूस वेस्ली! त्या दोघांना जाऊ दे. ते फक्त त्यांचं काम करत होते. त्यांनी तुला काहीही केलेलं नाहीये.”
“तो मुद्दाच नाहीये इथे रॅशेल! सगळं जग माझ्या वाईटावर टपून बसलंय. तू तर अशा गोष्टींचा अभ्यास केला असशीलच.”
रॅशेलने माईक बंद केला आणि ती माझ्याकडे वळली, “तो काय करतोय समजलंय ना तुला?”
“हो. त्याने सिगरेट पेटवली की ती VESDA सिस्टिम कार्यरत होईल आणि तिथल्या कॅनिस्टर्समधून कार्बन डायऑक्साईड वायू सर्व्हर रूममध्ये पसरेल.”
“तुला ती बंद करता येईल का इथल्या कॉम्प्युटर्सवरून?”
“मला त्यातलं काहीही कळत नाही रॅशेल! तू बघ तुला जमतंय.....”
“जॅक आहे का तिथे?” कार्व्हरचा आवाज आला. मी तिच्या हातातून माईक घेतला. ती खाली बसली आणि कॉम्प्युटर की बोर्डवर काही करता येतं का ते बघायला लागली. मी माईक चालू केला आणि अँजेला कुकच्या खुन्याशी बोलायला सुरुवात केली.
“मी इथे आहे कार्व्हर. अजून शेवट झालेला आहे, असं वाटत नाहीये मला.”
“नाही जॅक. हाच आणि असाच शेवट होऊ शकतो. तू अजून एका राक्षसाला लोळवलंस. अजून एका सीरियल किलरचा बुरखा फाडलास.”
“नाही वेस्ली. तुझी बाजूसुद्धा लोकांपुढे यायला पाहिजे. तुला नाही वाटत असं? तुम्हा लोकांना स्वतःबद्दल बोलायला प्रचंड आवडतं. माहित आहे मला.”
कार्व्हरने नकारार्थी मान डोलावली, “ काही गोष्टी कधीच सांगता येत नाहीत.”
त्याने लायटर सिगरेटपाशी नेऊन सिगरेट शिलगावली.
“नाही कार्व्हर! ते दोघं निरपराध आहेत. त्यांना जाऊ दे.”
कार्व्हरने उत्तरादाखल तोंडातून धुराचा एक मोठा ढग वरच्या छताच्या दिशेने सोडला. तो नक्कीच कुठल्यातरी स्मोक डिटेक्टरच्या खाली उभा होता.
“ कोणीही पूर्णपणे निरपराध नसतो जॅक!” तो म्हणाला, “तुला हे माहित असायला पाहिजे.”
तो शांतपणे सिगरेट ओढत धुराचे ढग हवेत सोडत होता.
“मला माहित आहे तू आणि एजंट वॉलिंग काय करताय ते. तुम्ही ही सगळी सिस्टिम बंद करायचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला ते जमणार नाहीये. पण मी सगळी सिस्टिम रिसेट केली आहे. आणि या रूममधून कार्बन डायऑक्साईड बाहेर नेणारे जे एक्झॉस्ट पाईप्स आहेत, ते दुरुस्तीसाठी बंद आहेत. मला खात्री करून घ्यायची आहे, करण कुठलीही चूक व्हायला नकोय मला आणि कोणीही मागे राहायलासुद्धा नकोय.”
मी रॅशेलकडे पाहिलं. ती की बोर्डवर काहीतरी टाईप करत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला काय ते कळून चुकलं. तिला काहीही सुधरत नव्हतं.
“मला काहीही करता येत नाहीये,” ती हताश स्वरात म्हणाली, “त्याने सगळी सिस्टिम गोठवली आहे. काहीच काम करत नाहीये...”
तेवढ्यात एकदम जोराने एक अलार्म वाजला. आम्ही दोघेही चमकलो. कंट्रोल रूममधल्या प्रत्येक कॉम्प्युटर स्क्रीनवर एक जवळजवळ दोन इंच जाड लाल पट्टा दिसायला लागला आणि त्याच्यावर शब्द दिसायला लागले.
ATTENTION! THE VESDA FIRE SUPPRESSION SYSTEM HAS BEEN ACTIVATED. ALL PERSONNEL MUST EXIT THE SERVER ROOM. THE VESDA FIRE SUPPRESSION SYSTEM WILL ENGAGE IN ONE MINUTE.
हेच शब्द एका स्त्रीच्या शांत आवाजात ऐकू आले.
रॅशेल तिचं डोकं हातांत गच्च धरून समोरच्या स्क्रीनकडे बघत होती. कार्व्हर शांतपणे सिगरेट ओढत होता. त्याच्या चेहऱ्यावर आता हे सगळं संपणार आहे अशा स्वरूपाचे शांत भाव होते.
“रॅशेल!” एजंट माउरीचा आवाज मला ऐकू आला, “प्लीज आम्हाला इथून बाहेर काढ!”
कार्व्हरने तिच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला आणि मान हलवली, “संपलंय सगळं. हा शेवट आहे सगळ्याचा!”
त्याच क्षणी परत एकदा ती घोषणा झाली - ATTENTION! THE VESDA FIRE SUPPRESSION SYSTEM HAS BEEN ACTIVATED. ALL PERSONNEL MUST EXIT THE SERVER ROOM. THE VESDA FIRE SUPPRESSION SYSTEM WILL ENGAGE IN FORTY-FIVE SECONDS.
काहीतरी ठरवल्याप्रमाणे रॅशेल उठली आणि तिने तिची गन हातात घेतली. मी तिला अडवायचा प्रयत्न केला.
“बाजूला हो जॅक.”
“रॅशेल, ती काच बुलेटप्रूफ आहे.”
“कार्व्हरच्या मते. त्याच्यावर माझा आता विश्वास नाहीये.”
तिने तिच्यासमोरच्या काचेवर तीन गोळ्या झाडल्या. त्यांच्या आवाजाने माझ्या कानात दडे बसले. पण गोळ्या काचेवर आदळून परत फिरल्या. काचेवर साधा ओरखडादेखील उठला नाही.
“रॅशेल, नको!”
तिने अजून दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी माझ्या समोर असलेल्या स्क्रीनला मागच्या बाजूला लागली आणि कार्व्हरची प्रतिमा पडद्यावरून गायब झाली.
तिने हळूहळू आपली गन खाली केली. त्याच क्षणी परत एकदा ती घोषणा झाली - ATTENTION! THE VESDA FIRE SUPPRESSION SYSTEM HAS BEEN ACTIVATED. ALL PERSONNEL MUST EXIT THE SERVER ROOM. THE VESDA FIRE SUPPRESSION SYSTEM WILL ENGAGE IN THIRTY SECONDS.
मी सर्व्हर रूममध्ये पाहिलं. मला ते लाल कॅनिस्टर्स दिसले.
“रॅशेल, आपण काहीतरी करायला पाहिजे.”
“काय करू मी जॅक? मी प्रयत्न केला पण काही करण्यासारखं उरलेलं नाहीये आता.”
“असं म्हणू नकोस रॅशेल. या सिस्टिममध्ये काहीतरी चोरदरवाजा असेल!”
माझ्या तोंडून हे उद्गार बाहेर पडल्यावर एकदम मला काहीतरी आठवलं. त्याच क्षणी परत एकदा घोषणा झाली पण यावेळी माझं लक्ष त्याच्याकडे नव्हतं.
ATTENTION! THE VESDA FIRE SUPPRESSION SYSTEM HAS BEEN ACTIVATED. ALL PERSONNEL MUST EXIT THE SERVER ROOM. THE VESDA FIRE SUPPRESSION SYSTEM WILL ENGAGE IN FIFTEEN SECONDS.
कार्व्हर कुठेही दिसत नव्हता. का? मी रॅशेलच्या समोर असलेल्या स्क्रीनकडे पाहिलं. स्क्रीन पूर्णपणे काळा होता.
कार्व्हरने कुठल्याही कॅमेऱ्याचं फीड आम्हाला बघता येऊ नये याची काळजी घेतली होती. पण का?
आणि त्याक्षणी माझ्या डोळ्यांसमोर सगळं स्पष्ट झालं. आम्ही जेव्हा कार्व्हरला याआधी भेटलो होतो तेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये शिरता शिरता मला मिझ्झू सर्व्हर रूममध्ये आलेला दिसला होता. पण कार्व्हरच्या ऑफिसच्या दरवाज्याला अगदी लागूनच सर्व्हर रूमचा काचेचा दरवाजा आणि बायोमेट्रिक स्कॅनर होते. पण मिझ्झू तिथून सर्व्हर रूममध्ये आत शिरताना मी पाहिलं नव्हतं. मग तो सर्व्हर रूममध्ये गेला कसा?
माझ्या डोक्यात एक कल्पना आली.
“रॅशेल....”
एक मोठा भोंग्यासारखा आवाज आला आणि त्या लाल कॅनिस्टर्समधून पांढरा धूर यायला सुरुवात झाली. काही सेकंदांतच सर्व्हर रूमच्या खिडक्या धुकं साठ्ल्याप्रमाणे दिसायला लागल्या. आता पलीकडच्या बाजूचं काहीच दिसत नव्हतं.
“रॅशेल,” मी जवळजवळ ओरडलोच, “मला तुझं की कार्ड दे. मी कार्व्हरच्या मागावर जातोय.”
तिने माझ्याकडे पाहिलं, “कशाबद्दल बोलतोयस तू?”
“तो आत्महत्या वगैरे काहीही करणार नाहीये. आपल्यासमोर हे धुकं निर्माण करून तो मागच्यामागे सटकायच्या बेतात आहे. याचा अर्थ तिथे मागे कुठलातरी दरवाजा असलाच पाहिजे.”
मी समोर पाहिलं. पांढरा धूर किंवा वायू येणं थांबलं होतं पण खिडक्या अजूनही धुरकटलेल्या होत्या.
“मला तुझं की कार्ड दे रॅशेल!”
ती अजूनही माझ्याकडे संभ्रमित चेहऱ्याने बघत होती.
“तू इथेच थांब. मी जाते.”
“नको. तू इथे थांब. तू एफ.बी.आय. फील्ड ऑफिसमध्ये फोन कर आणि मदत मागव. वैद्यकीय मदतसुद्धा लागेल. कॉम्प्युटरवर काही करता येतंय का ते बघ. मला जाऊ दे.”
तिने तिचं की कार्ड काढून मला दिलं. मी जायला वळलो.
“थांब,” ती म्हणाली, “हे पण घेऊन जा.” तिने एक गन माझ्या हातात दिली.
###############################################
मी धावतच त्या अष्टकोनी खोलीत आलो. मला जे आठवत होतं, त्याप्रमाणे या खोलीला चार दरवाजे होते. एक दरवाजा लिफ्टचा आणि दुसरा दरवाजा कंट्रोल रूमचा, जिथून मी आत्ता आलो होतो. उरलेल्या दोन दरवाज्यांपैकी एक कोअर इक्विपमेंट रूमचा होता. या रूममध्ये या सगळ्या प्लँटचं तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा होती. कार्व्हर आणि त्याचे इंजिनीअर्स इथेच नवीन सर्व्हर टॉवर बनवत असणार आणि इथूनच मिझ्झू सर्व्हर रूममध्ये गेला असणार असा माझा अंदाज होता आणि सर्व्हर रूममधून बाहेर जाण्यासाठी पण एखादा जिना असला पाहिजे. आम्ही आमची भेट संपल्यावर मी वेस्टर्न डेटाच्या मागच्या बाजूला गेलो होतो तेव्हा तिकडे मला तो सिगरेट ओढताना दिसला होता आणि त्याच्या पाठीमागे एक दरवाजा पण होता.
मी कोअर इक्विपमेंट रूमच्या दरवाज्यापाशी आलो आणि की कार्ड वापरलं. माझ्या मनात धाकधूक होत होती. पण सुदैवाने ते चाललं आणि दरवाजा उघडला.
मी आत शिरलो. ही खोली मोठी असली तरी फार रुंद नव्हती. त्याच्या दुसऱ्या टोकाला अजून एक दरवाजा होता. माझ्या अंदाजाप्रमाणे तो सर्व्हर रूममध्ये जाणारा दरवाजा होता. त्याच्याशेजारी एक बायोमेट्रिक स्कॅनर होता आणि माझ्या उजव्या हाताला अजून एक दरवाजा होता पण तिथे स्कॅनर वगैरे काहीही नव्हतं पण की कार्ड स्लॉट होता. मी त्यात की कार्ड टाकल्यावर तो दरवाजा उघडला. मी बाहेरूनच पाहिलं तेव्हा मला आतमध्ये वर्कशॉप दिसलं.
गन हातात घट्ट धरत आणि इकडेतिकडे पाहात मी आत शिरलो. आत शिरल्यावर सर्वप्रथम दिसला तो एक मोठा सर्व्हर टॉवर. त्याचा सांगाडा तयार होता, पण डेटा ब्लेड्स अजून बसवलेली नव्हती.
टॉवरच्या पलीकडे एक जिना होता. आता माझ्या लक्षात आलं. याच जिन्याने ज्याला कोणाला सिगरेट ओढायची असेल तो बाहेर जात असणार. मी टॉवरच्या बाजूने जिन्याकडे गेलो तेवढ्यात माझ्या मानेला कशाचा तरी थंड स्पर्श झाला आणि आवाज आला, “हॅलो जॅक!”
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
26 Sep 2015 - 12:38 am | ट्रेड मार्क
आता वाचतो
26 Sep 2015 - 12:45 am | अद्द्या
शेवटचा खेळ
जबर
26 Sep 2015 - 12:51 am | ट्रेड मार्क
आता हिरो आणि व्हिलन समोरासमोर.… अमिताभ च्या जुन्या पिक्चर मधलं क्लायम्याक्सचं म्युझिक वाजलं.
26 Sep 2015 - 1:04 am | अभ्या..
अगदी अगदी.
मला पण ऐकू येतेय ते..
आर्मरेस्ट घट्ट प़कडून रेडी आता.
26 Sep 2015 - 12:58 am | स्रुजा
थरारक !!
26 Sep 2015 - 3:29 am | शिवोऽहम्
मजा येतेय वाचायला! भाषांतर अजिबात वाटत नाही हे वेगळे सांगणे नको..
26 Sep 2015 - 6:58 am | सामान्य वाचक
..
26 Sep 2015 - 8:12 am | नाखु
जबहर्या.
26 Sep 2015 - 8:17 am | मांत्रिक
जबरा रे बोकेशा!!! थरारक!!!
26 Sep 2015 - 8:35 am | एस
भीतीचा स्पर्श थंडगार असतो...
पुभाप्र.
26 Sep 2015 - 8:53 am | अजया
थरथराट! शेवटच्या भागाच्या प्रतीक्षेत!
26 Sep 2015 - 10:21 am | संजय पाटिल
जबराट!!
26 Sep 2015 - 10:27 am | आनंद
थरारक! जबरद्स्त!!
उद्या कदाचित शेवटचा भाग असेल.
हे संपल्या वर "द पोएट" सुरु करा !
26 Sep 2015 - 10:36 am | प्रचेतस
तुफ्फान एकदम.
26 Sep 2015 - 10:59 am | मोहन
जियो बोकेराव .
आता ३० वा भाग बहुदा शेवटचा असणार ! मालीका आता संपणार ही हुरहुर लागली आहे.
बोकेराव आता थोडा ब्रेक घेवुन अजुन एखाद्या भन्नाट कादंबरीचा अनुवाद वेउ द्या !
26 Sep 2015 - 11:57 am | जगप्रवासी
एकदम झकास!!!! वाचताना नकळत हृदयाचे ठोके वाढायला लागले होते, सगळ कस डोळ्यासमोर घडतंय असच वाटत होत. आणि नेहमीप्रमाणे अनपेक्षित वळणावर उत्सुकता ताणून ठेवणारा क्रमशः आला.
देवा पुढचा शनिवार लवकर येवू दे
26 Sep 2015 - 11:58 am | मास्टरमाईन्ड
एकदम जबराट
26 Sep 2015 - 1:05 pm | पद्मावति
वॉव.....जबरदस्त!
26 Sep 2015 - 4:41 pm | santosh mahajan
जबरा.
26 Sep 2015 - 4:56 pm | राजाभाउ
हो हो. ह्या नंतर 'द पोएट' सुरु करा प्लीज.
28 Dec 2015 - 7:03 pm | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग ३० (अंतीम)