द स्केअरक्रो भाग २७ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
पहाटेचे दीड-दोन वाजले असतील. माझं घड्याळ बंद पडलं होतं बहुतेक. किती वाजले आहेत ते समजत नव्हतं. आजच्या दिवसात एफ.बी.आय.च्या ‘ ग्वान्टानामो एक्सप्रेस ‘ इंटरॉगेशन व्हॅनमध्ये एजंट बँटमसमोर बसायची ही माझी दुसरी वेळ होती.
बँटम पुष्कळच निवळला होता. शांतपणे तो माझ्यासमोरच्या खुर्चीत बसला आणि त्याने माझ्यापुढे कॉफी ठेवली. मी ती संपवेपर्यंत तो काहीही बोलला नाही. नंतर त्याने त्याचं छोटं पॉकेटबुक उघडलं आणि माझ्याकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिलं.
“आर यू ओके?” त्याने विचारलं.
“हो.” मी म्हणालो.
“मग मला रात्री घडलेल्या सगळ्या घटना नीट सविस्तर सांग.”
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
रॅशेलचं आणि माझं फोनवरचं संभाषण संपल्यावर मी अजिबात वेळ वाया घालवायचा नाही असं ठरवलं. माझ्या बोलण्यातून तिला मी इथेच आहे हे समजलेलं नव्हतंच. मी सहाव्या मजल्यावर होतो आणि माझी रूम जिन्याच्या शेजारीच होती. तिची रूम फक्त एक मजला वर होती त्यामुळे मी लिफ्टऐवजी चालतच जायचं ठरवलं. तिच्यासाठी म्हणून मी तिला आवडणाऱ्या ग्रँड एम्ब्रेस वाईनची एक बाटली रूम सर्व्हिसमधून मागवली होती. ती बाटली आणि त्याच्याबरोबर आलेला कॉर्कस्क्रू घेऊन मी निघालो. माझं की कार्डही माझ्या खिशात होतं.
मेसा वेर्डे इनमध्ये वरचा मजला हा लगेचच नव्हता. दोन मजल्यांच्या मध्ये एक मेझॅनीन फ्लोअर होता आणि तिथून अजून एक जिना चढून वर जावं लागत होतं. हा जिना चढून गेलं की एक मोठा हॉल होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना खोल्या होत्या. रॅशेलच्या चेहऱ्यावर मला पाहिल्यावर कोणते भाव उमटतील ते पाहण्याची मला उत्सुकता होती.
मी स्वतःशीच हसत सातव्या मजल्यावर नेणारा जिना चढलो आणि उजवीकडे वळलो आणि कशाला तरी अडखळून पडता पडता वाचलो. मी खाली पाहिलं तर एक माणूस त्याच्या पाठीवर निपचित पडला होता. त्याच्या अंगात पांढरा शर्ट होता, काळी पँट होती आणि शर्टाला बो टाय होता. माझ्या रूममध्ये वाईनची बाटली घेऊन आलेल्या वेटरने असेच कपडे घातलेले होते.
त्याचा चेहरा पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं. बहुतेक हाच वेटर माझ्या रूममध्ये आला होता. त्याला वळसा घालून मी पुढे गेलो तेव्हा मला जमिनीवर रक्त दिसलं. मी वाईनची बाटली खाली ठेवली, त्याच्याशेजारी माझ्या गुढग्यांवर बसलो आणि त्याला हलवलं. पण त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. बहुतेक जिवंत नसावा. तेवढ्यात त्याच्या बेल्टला लावलेला आयडी टॅग मला दिसला. त्यावर लिहिलेलं होतं – EDWARD HOOVER, KITCHEN STAFF.
एका क्षणात मला या सगळ्याची टोटल लागली. रॅशेल!
मी खोल्यांच्या दिशेने धावलो. धावता धावता माझा फोन खिशातून काढला आणि 911 वर फोन केला. हॉटेलच्या इमारतीचा आकार इंग्लिश U अक्षरासारखा होता. मी नक्की कुठे होतो ते मला समजत नव्हतं. पण मला एका रूमच्या दरवाज्यावरचा नंबर दिसला – ७२२ आणि त्याच्या पुढे ७२१ होता. रॅशेलची रूम, ७१७, त्याच्या पुढे असणार. मी ७१७ पाशी पोचलो आणि पाहिलं तर दरवाजा लोटलेला होता. मी त्याच्यावर धक्का मारला तर तो उघडला.
“रॅशेल?”
रूम रिकामी होती पण नक्कीच इथे झटापट झाली असणार. रूम सर्व्हिसची ट्रॉली एका कोपऱ्यात होती आणि त्याच्या आजूबाजूला प्लेट्सचे तुकडे आणि फ्राईज विखुरलेल्या होत्या. पलंगावरची चादर नव्हती, गादी अस्ताव्यस्त होती आणि एक छोटी उशी होती, तिच्यावर रक्ताचे डाग दिसले.
माझा फोन माझ्याच हातात होता आणि पलीकडून कोणीतरी माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होतं. मी रूममधून बाहेर येऊन हॉलमध्ये आलो आणि फोनवर बोलायला सुरुवात केली.
“हॅलो!”
“नाईन वन वन. व्हॉट इज युवर इमर्जन्सी?”
मी काही बोलणार तेवढ्यात मला जेमतेम एक-दोन क्षणभर एका सोनेरी केस असलेल्या माणसाची आकृती दिसली. तो हॉलच्या दुसऱ्या टोकाला होता आणि त्याच्या अंगात वेटर्सचं लाल रंगाचं जॅकेट होतं. तो लिफ्टच्या अगदी जवळ होता आणि त्याच्या हातांनी तो एक मोठी ट्रॉली ढकलत होता. मी आत्ताच रॅशेलच्या खोलीत रूम सर्व्हिसची ट्रॉली पाहिली होती. ही ट्रॉली त्यापेक्षा मोठी होती आणि त्याच्यात भरपूर वजन असावं असं वाटत होतं. काहीतरी विचित्र होतं. वेटर्स जर ट्रॉली घेऊन येत असतील तर त्यांच्यासाठी वेगळी सर्व्हिस लिफ्ट होती.
मी त्या दिशेने धावलो. धावता धावता फोनमध्ये बोललो, “मेसा वेर्डे इन. सातव्या मजल्यावर.”
लिफ्टच्या आधी एक दुहेरी दरवाजा होता. तो माणूस त्या दुहेरी दरवाज्यातून पुढे गेला आणि त्याने पायाने दरवाजा लोटला. मी अगदी ताबडतोब जरी तिथे पोचलो असलो तरी मला चार-पाच सेकंद लागले होते. तेवढ्या वेळात तो माणूस अदृश्य झाला होता. मी तो दुहेरी दरवाजा उघडला आणि पुढे गेलो. मी आता जिथे होतो तो एक छोटा हाऊसकीपिंग क्युबिकल होता आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला तसाच एक दुहेरी दरवाजा होता. मी हा दरवाजा उघडून पुढे गेलो. इथे सर्व्हिस लिफ्ट होत्या. त्यातल्या एका लिफ्टचे दरवाजे बंद होत असताना मला दिसले. मी जीवाच्या आकांताने त्या लिफ्टकडे झेपावलो पण दरवाजे बंद झाले आणि लिफ्ट चालू झाल्याचा आवाज मला ऐकू आला. मी थोडा मागे झालो आणि लिफ्ट इंडिकेटरवर काही दिसतंय का ते पाहायला लागलो. पण इथे इंडिकेटर वगैरे काहीच नव्हतं. मी आलेल्या मार्गाने परत गेलो. मला तो माणूस पहिल्यांदा जिथे दिसला होता, तिथे गेस्ट लिफ्ट होत्या. त्यातल्या एका लिफ्टचं बटन मी दाबलं, खाली जाण्यासाठी. जर एखाद्याला इथून निसटायचं असेल, तर त्याला अर्थातच खाली जायला पाहिजे. लिफ्ट येईपर्यंत मी मला दिसलेल्या दृश्याची परत एकदा मनात उजळणी केली. मला दिसलेला माणूस जी ट्रॉली ढकलत होता, ती हॉटेलमध्ये लाँड्रीचे कपडे न्यायला वापरतात तशी होती आणि त्या माणसाला ती ढकलायला बहुतेक त्रास होत होता. भरपूर वजन असलं तर होतो तसा. पण जर फक्त कपडे असते तर त्यांचं वजन एवढं जाणवलं नसतं. याचा अर्थ तिथे अजून वजनदार असं काहीतरी आहे. कदाचित एखादा माणूस. रॅशेल?
गेस्ट लिफ्ट्स एकूण चार होत्या आणि माझ्या नशिबाने मी बटन दाबल्यावर पाच सेकंदांच्या आत एक लिफ्ट आली. मी आत घुसलो आणि पाहिलं तर लॉबीच्या बटनचा दिवा लुकलुकत होता. मी लिफ्टचे दरवाजे बंद करण्यासाठी जे बटन असतं, ते चार-पाच वेळा दाबलं.
“टेक इट इझी बडी! आपण पोहोचू तिथे.”
मी चमकून वर पाहिलं. दुसरा एक माणूस लिफ्टमध्ये होता. हॉटेलच्या स्टाफपैकीच असावा. त्याला मी आणीबाणीची परिस्थिती आहे असं सांगणार तेवढ्यात मला हातात असलेल्या फोनची आठवण झाली.
“हॅलो, हॅलो...”
मला नीट काही ऐकू येत नव्हतं पण सुदैवाने कॉल बंद झालेला नव्हता.
“हॅलो...”
“सर, मी मेसा वेर्डे इनमध्ये पोलिस व्हॅन पाठवलीय. तुम्ही मला हे सांगू....”
“वेटरचा युनिफॉर्म घातलेला एक माणूस एका एफ.बी.आय.एजंटचं अपहरण करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही एफ.बी.आय.ला फोन करा. हॅलो...”
कनेक्शन तुटलं. कॉल बंद झाला. लिफ्ट लॉबीमध्ये येऊन थांबली. दरवाजे उघडल्या उघडल्या मी बाहेर धावलो. मनातल्या मनात सर्व्हिस लिफ्ट कुठे असेल त्याचा हिशोब केला आणि डाव्या बाजूला गेलो. तिथून अजून एक डावं वळण घेतलं. तिथे एक दरवाजा होता. त्यावर EMPLOYEES ONLY असं लिहिलेलं होतं. मी त्या दरवाज्यातून आत गेलो. एक मोठा हॉल होता आणि गोंगाट आणि अन्नाचा वास यांचं विचित्र मिश्रण होतं. मी हॉटेलच्या किचनमध्ये आलो होतो. सर्व्हिस लिफ्टचा दरवाजा मला एका बाजूला दिसला. पण ती ट्रॉली किंवा ती घेऊन येणारा लाल जॅकेट घातलेला माणूस यापैकी काहीही दिसलं नाही.
मी सर्व्हिस लिफ्टच्या आधी पोचलो की हा माणूस परत उलटा वरती गेला?
मी लिफ्टपाशी जाऊन बटन दाबलं.
“कोण आहात तुम्ही? इथे किचन स्टाफशिवाय दुसऱ्या कुणालाही यायची परवानगी नाहीये.”
मी वळलो. एक माणूस माझ्या दिशेने येत होता. त्याच्या अंगात किचनमधले पांढरेशुभ्र कपडे होते आणि त्यावर एक डाग पडलेला अॅप्रन होता.
“लाँड्री कार्ट ढकलत असलेला आणि लाल जॅकेट घातलेला कुणी माणूस तुम्हाला दिसला का इथे?”
“नाही. हे किचन आहे.”
“याच्या खाली बेसमेंटसारखं काही आहे का?”
त्या माणसाने तोपर्यंत तोंडात सिगरेट ठेवली होती. ती काढून त्याने उत्तर दिलं, “ नाही.”
तो कुठेतरी बाहेर जाऊन सिगरेट ओढणार, माझ्या मनात विचार आला. याचा अर्थ इथून बाहेर जाण्यासाठी अजून एखादा दरवाजा असला पाहिजे.
“इथून पार्किंगमध्ये जाण्यासाठी काही दरवाजा आहे?”
त्याने माझ्या मागच्या बाजूला इशारा केला, “लोडिंग डॉक आहे – ए, हे काय चाललंय?”
मी लिफ्टच्या दिशेने वळतच होतो तेवढ्यात ती लाँड्री कार्ट वेगाने माझ्या अंगावर आली. तिची कड माझ्या मांड्यांवर एवढ्या जोरात आदळली की मी त्या कार्टवर सपशेल तोंडघशी पडलो आणि आपसूक माझे हात पुढे गेले. तिथे चादरी आणि ब्लँकेट्स यांचा ढीग होता पण माझ्या हाताला काहीतरी मऊ लागल्यासारखं वाटलं. मी त्या चादरी खेचल्या आणि मला रॅशेल दिसली.
मी कार्टवरून उडी मारली आणि सर्व्हिस लिफ्टच्या दिशेने धावलो. लिफ्टचे दोन्ही दरवाजे बंद होत असताना मला आतमध्ये तो लाल जॅकेट घातलेला माणूस दिसला. त्याचा चेहरा पाहताक्षणी मी त्याला ओळखलं. आत्ताच काही वेळापूर्वी मी त्याचा मग शॉट पाहिला होता. त्याने आता केस बारीक कापले होते आणि दाढीमिश्या नव्हत्या पण तरीही तो मार्क कुरियर आहे हे माझ्या लक्षात आलं.
इथे लिफ्टच्या वरती इंडिकेटर होता आणि तिथे पाहिल्यावर मला समजलं की तो वर चालला आहे. मी मागे वळलो.
रॅशेलच्या अंगावर आज सकाळी घातलेलेच कपडे होते. तिचे हात पाठीमागे बांधलेले होते. पायसुद्धा बांधलेले होते. हॉटेलच्या बाथरोबचा पट्टा तिच्या तोंडाभोवती बांधलेला होता. तिच्या नाकातोंडातून रक्त वाहात होतं आणि डोळे मिटलेले होते.
“रॅशेल! ठीक आहेस का तू?”
तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. मला हटकणारा तो माणूस आता माझ्या बाजूला आला, “काय चाललंय?”
तिने मिझ्झूचे हात बांधायला जो केबल टाय वापरला होता, तशाच प्रकारच्या केबल टायने तिचे हात आणि पाय बांधले होते. मी माझ्या खिशातला कॉर्कस्क्रू काढला आणि ते टाय कापले.
“जरा मला मदत कर.” मी त्या माणसाला म्हणालो.
आम्ही तिला काळजीपूर्वक उचललं आणि जमिनीवर निजवलं. तिच्या मनगटावर हात ठेवून मी एक-दोन क्षण थांबलो. सुदैवाने ती जिवंत होती. तिचा चेहरा सुजलेला वाटत होता. बहुतेक कुरियरने तिला मारहाण केली असणार. तिच्या नाकपुड्या रक्ताने भरलेल्या वाटत होत्या पण तोंड उघडं होतं.
मी त्या माणसाकडे पाहिलं, “सिक्युरिटीला बोलाव आणि पोलिसांनापण. आत्ता. ताबडतोब!”
तो होकारार्थी मान डोलावून पळत गेला.
मला तिच्या कण्हण्याचा आवाज ऐकू आला, “जॅक!”
“हो रॅशेल. काही काळजी करू नकोस. तू सुरक्षित आहेस.”
तिच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचं मी पाहिलं. शुद्धीवर आल्यावर तिला वेदना होत असणार.
तो किचनमधला माणूस आमच्या दिशेने पळत आला, “पोलिस आणि पॅरामेडिक्स येताहेत.”
मी त्याच्याकडे पाहिलं नाही. मी तिच्याचकडे बघत होतो. त्या माणसाचं बोलणं ऐकल्यावर तिने उठून बसायचा प्रयत्न केला. मी तिला उठून बसवलं आणि जवळ घेतलं. ती कुजबुजत्या आवाजात काहीतरी म्हणाली. पण ते मला समजलं नाही म्हणून मी तिला विचारलं.
“मला वाटलं की तू एल.ए.ला गेलास.”
“नाही. तुझ्यापासून एवढ्यात दूर जायचं नव्हतं मला.”
“चल खोटारडा कुठला! तुझ्या स्टोरीपासून दूर जायचं नव्हतं तुला!”
“ओके,” मी हसलो, “थोडंफार तेही कारण आहे, नाही असं नाही. पण मी तुला सरप्राईझ देणार होतो. तुझ्या आवडीची वाईन घेऊन मी तुझ्या रूममध्ये येत होतो आणि तेव्हा मी त्याला पाहिलं. कुरियरला.”
तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकलं, “तू माझा जीव वाचवलास जॅक. मी इतकी दमले होते की दरवाज्याच्या पीपहोलमधून बघायचंही माझ्या लक्षात आलं नाही. मी दरवाजा उघडल्यावर माझ्या लक्षात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याच्या हातात काठीसारखं काहीतरी होतं. त्याने मला मारलं. त्याच्याकडे चाकूपण होता. मी काही करण्याच्या आत...”
मी तिला गप्प केलं. कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नव्हती.
“अच्छा, तो एकटाच होता की मॅकगिनिसपण होता त्याच्याबरोबर?”
“नाही. मी फक्त कुरियरला पाहिलं.”
मी आजूबाजूला पाहिलं. किचनमधले बाकीचे लोकही जमा झाले होते. मला आधी भेटलेला माणूसही त्यांच्यात होता. मी त्याला बोलावलं. तो आला. त्याच्यापाठी तीन-चारजण अजून आले.
“सिक्युरिटी कुठे आहे?”
“ते येताहेत. कुठच्याही क्षणी इथे पोचतील.”
“ओके. ते येईपर्यंत तुम्ही हिच्याकडे लक्ष द्या. तिला एकटं सोडू नका. सिक्युरिटीवाले आले की त्यांना सांगा की सातव्या मजल्यावर जिन्याच्या बाजूला अजून एक मृतदेह पडलेला आहे. तुमच्याच एका सहकाऱ्याचा आहे. त्यांना हेही सांगा की हिची ही अशी अवस्था करणाऱ्या माणसाला शोधायला मी वर गेलोय.”
“नको जॅक, तू नको जाउस.” रॅशेल पुटपुटली, “नाहीतर मग मला येऊ दे तुझ्याबरोबर.”
“नको. तू जखमी झालेली आहेस. तू इथेच थांब.”
मी तिला सोडून उठलो आणि लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट आल्यावर मी आत शिरत असतानाच सिक्युरिटी येत असल्याचं पाहिलं. मी सर्वात वरच्या मजल्याचा नंबर दाबला – १२.
लिफ्ट हळूहळू वरती जात असताना माझ्या लक्षात आलं की रॅशेलचा जीव मी केवळ नशिबाने वाचवू शकलो. मी मेसामध्येच राहणं, तिची रूम फक्त एक मजला वर असणं, त्यामुळे मी लिफ्टऐवजी जिन्याने जाणं आणि मला तिथे त्या वेटरचा मृतदेह दिसणं. पण यावर मला आता विचार करायचा नव्हता.
जेव्हा लिफ्टचा दरवाजा उघडला तेव्हा मी माझ्या हातात तो कॉर्कस्क्रू घेऊन तयार होतो. त्याच क्षणी त्याच्याकडे चाकू आहे असं रॅशेलने म्हटल्याचं मला आठवलं. पण आता परत खाली जाऊन एखादं मोठं हत्यार घेऊन यायला वेळ नव्हता. त्यामुळे आता जे होईल ते होईल असा विचार करून मी सावधपणे बाहेर आलो.
सातव्या मजल्याप्रमाणे इथेपण सर्व्हिस लिफ्ट हाऊसकीपिंग क्युबिकलमध्ये उघडत होती. मला तिथे जमिनीवर एक लाल जॅकेट दिसलं. मी दुहेरी दरवाजा उघडून हॉलमध्ये आलो. पोलिसांच्या गाड्यांचे सायरन्स अगदी इथपर्यंत ऐकू येत होते. नक्कीच ते जवळपास कुठेतरी असणार.
बारावा मजला, निदान त्याचा हा भाग पूर्ण रिकामा दिसत होता. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एका माणसाला शोधणं म्हणजे तसा मूर्खपणाच होता. कुरियर लिफ्टने किंवा जिन्याने निसटू शकत होता किंवा इथेच एखाद्या ठिकाणी लपूनही राहू शकत होता. शिवाय पोलीसही येत होतेच. शोधू दे त्यांनाच असा विचार करून मी जायला वळलो.
माझ्या उजवीकडे एक जिना होता. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही जर त्या जिन्याने खाली गेलात, तर सरळ पार्किंग लॉटमध्ये जाता येत होतं. निदान या हॉटेलचा नकाशा, जो माझ्या खोलीत होता, त्यात असंच म्हटलं होतं. कदाचित कुरियर इथे लपलेला असू शकतो. हॉटेल नेवाडामध्ये जेव्हा तो माझ्या मागावर आला होता, तेव्हाही तो असाच निसटला होता. एकदा बघायला काय हरकत आहे? असा विचार करून मी त्या जिन्याच्या दिशेने गेलो. तिथे EXIT असं लिहिलेला एक दरवाजा होता, तो उघडून आत गेलो. जिन्याच्या रेलिंगवरून खाली पाहिलं. सायरनचा आवाज आता अजून स्पष्टपणे ऐकू येत होता.
खाली जाणाऱ्या जिन्यावर मी पाय ठेवणार तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की जरी मी हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर होतो, तरी इथे अजून वर जाणारा एक जिना होता. बहुतेक हॉटेलच्या गच्चीवर जात असावा.
गच्ची! मी हा विचारच केला नव्हता. कुरियर तिथे लपलेला असू शकतो. मी त्या जिन्याच्या दिशेने गेलो. इथे हॉलमधल्या दिव्यांचा प्रकाश जेमतेम पोचत होता पण या जिन्याच्या प्रत्येक पायरीवर दोन्ही बाजूंना एक असे मिणमिणते स्कोन्स लँप्स होते, त्यांचा प्रकाश होता. मी या पायऱ्या चढून वर गेलो. खाली असलेल्या मेझॅनीन फ्लोअरप्रमाणे इथेही एक फ्लोअर होता. त्याला लागूनच अजून काही पायऱ्या होत्या. या पायऱ्यांवर आणि फ्लोअरवरही खच्चून सामान ठेवलेलं होतं. एकमेकांवर गाद्या आणि छोटे पलंग रचून ठेवलेले होते. खुर्च्या, छोटे रेफ्रिजरेटर्स, जुन्या पद्धतीचे टी.व्ही. कॅबिनेट्स, जुन्या लँपशेड्स असा सगळा पसारा होता.
त्या पसाऱ्यातून मार्ग काढत मी त्या पायऱ्यांवर गेलो. जिथे या पायऱ्या संपत होत्या, तिथे एक दरवाजा होता आणि त्यावर ROOF असं लिहिलेलं होतं. त्याच्याच बाजूला एक छोटी खिडकी होती. मी दरवाजा ढकलायचा प्रयत्न केला, पण तो बंद होता. मी खिडकीतून काय दिसतंय ते पाहिलं, तेव्हा हॉटेलचं छत दिसलं. जवळजवळ चाळीस फूट लांब असेल.
मी जरा माझ्या डावीकडे वळलो. मला छताकडे नीट बघायचं होतं. कुरियर इथे लपला असण्याची शक्यता होती. तेव्हा मला खिडकीच्या काचेत हालचाल जाणवली. माझ्यापाठी कोणीतरी होतं. प्रतिक्षिप्त क्रियेने मी बाजूला उडी मारली आणि वळलो. कुरियरच्या हातात उगारलेला चाकू होता, पण तो इतक्या वेगाने आला की मी उडी मारल्यावर त्याला स्वतःचा तोल सावरता आला नाही. तो त्या दरवाज्यावर आदळला.
मी त्याक्षणी त्याच्यावर झेपावलो, आणि माझ्या हातातला कॉर्कस्क्रू त्याच्या कुशीत खुपसायचा प्रयत्न केला. मी त्यात यशस्वीपण झालो, पण कॉर्कस्क्रू इतका छोटा होता, की त्याला त्यामुळे फरक पडला नाही. तो एकदा वेदनेने कळवळला आणि त्याने माझ्या मनगटावर आपल्या हाताने जोरात आघात केला. माझ्या हातातला कॉर्कस्क्रू गळून पडला. तो लाथेने दूर सारत तो माझ्यावर चाल करून आला. त्याने चाकू माझ्या छातीत खुपसण्यासाठी म्हणून वेगाने खाली आणला, पण मी सुदैवाने मागे झालो आणि स्वतःला वाचवलं. मागे होता होता मी त्या चाकूकडेही एकदा बघून घेतलं. किमान चार इंच लांबीचं पातं असेल त्याचं.
त्याने चाकू त्याच्या डाव्या हातात धरला होता. पुन्हा एकदा त्याने माझ्यावर तसाच वार करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी मी उजवीकडे झालो आणि त्याचं डावं मनगट घट्ट पकडलं. मला अनुकूल अशी एकच गोष्ट होती. माझं वजन. मी त्याच्यापेक्षा वयाने जास्त होतो आणि माझा हालचालींचा वेगही कमी होता पण माझं वजन त्याच्यापेक्षा किमान चाळीस पौंडांनी जास्त होतं. त्याचाच वापर करत मी त्याला मागे ढकललं. तिथे असलेल्या जुन्या लँपस्टँड्सवर तो आदळला आणि तिथून जमिनीवर.
पण त्याला त्याने फरक पडला नाही. त्याच्या हातातला चाकू खाली पडला नव्हता. तो अजूनही त्याच्याच हातात होता. तो उठतोय हे पाहिल्यावर मी त्या लँपस्टँड्सपैकी एक उचलला आणि त्याच्यावर उगारला. तो त्याला लागण्याआधीच तो चपळाईने बाजूला झाला होता.
आता आम्ही दोघेही एकमेकांसमोर होतो. त्याच्या हातात चाकू. माझ्या हातात लँपस्टँड. आम्ही दोघेही एकमेकांना आजमावत होतो.
“आता काय करणार आहेस तू कुरियर? हे सायरन्स ऐकू येताहेत तुला?एका मिनिटात पोलिस आणि एफ.बी.आय. इथे पोचतील. मग तू काय करशील?”
तो काहीच बोलला नाही. मी त्याच्यावर वार करायचा प्रयत्न केला. त्याने बाजूला होत लँपस्टँड पकडला आणि खेचायचा प्रयत्न केला. पण मला याची अपेक्षा होतीच. त्याचा पाय थोडा पुढे आलेला पाहिल्यावर मी माझ्या पायाने त्याच्या पावलावर जोरदार लाथ मारली. तो वेदनेने कळवळला आणि त्याची स्टँडवरची पकड ढिली झाली. मी त्याला लगेचच जोरात ढकललं. तो त्या छोट्या रेफ्रिजरेटर्सवर जाऊन आदळला.
मी जरी चाकूने होणाऱ्या मारामाऱ्या आणि हत्या यांच्यावर असंख्य स्टोरीज लिहिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात चाकूने मारामारी कशी करतात हे मला माहित नव्हतं. नुसती मारामारी करूनसुद्धा बरीच वर्षे झालेली होती. त्यामुळे मी त्याला बोलता करायचा प्रयत्न करत होतो. मला त्याचं लक्ष विचलित करून त्याच्या हातातला चाकू कुठेतरी सुरक्षित अंतरावर फेकून द्यायचा होता. मग त्याला हाताळणं सोपं गेलं असतं.
“कुठे गेला तुझा पार्टनर? कुठे आहे मॅकगिनिस? परत एकदा घाणेरडी कामं करायला तुला पाठवलं ना त्याने? नेवाडाप्रमाणे? परत एकदा तुझ्या हातनं संधी गेली!”
तो हसला पण काही बोलला नाही.
“तो तुला सांगतो आणि तू करतोस? एखाद्या गुलामासारखं? का तो तुझा शिक्षक आणि तू आज्ञाधारक विद्यार्थी?काहीही असो, आज तो काही तुझ्यावर खुश होणार नाहीये. एवढं एक साधं काम जमत नाही तुला?”
यावेळी मात्र कुरियरने तोंड उघडलं, “मॅकगिनिस मेलाय कुत्र्या! मी त्याला वाळवंटात पुरलाय. तुझ्या त्या कुत्रीलाही मी तिथेच पुरणार होतो. तिची मजा घेतल्यावर!”
माझा संताप हे ऐकल्यावर उफाळून आला, पण मी महत्प्रयासाने शांत राहिलो, “पण मला एक कळत नाहीये कुरियर. तो जर मेलाय, तर तू पळून का नाही गेलास? शिकागोहून पळाला होतास तसा? इतका मोठा धोका पत्करण्याची काय गरज होती?”
तो उत्तर द्यायला तोंड उघडणार तेवढ्यात मी त्याच्या छातीवर लँपस्टँड जोरात मारला, आणि नंतर त्याच्या वर्तुळाकार बेसने कुरियरच्या तोंडावर प्रहार केला. तो त्यामुळे कोलमडला. त्याक्षणी मी त्याच डावं मनगट पकडून हात जोराने पिरगळला. त्याच्या हातातून चाकू खाली पडला. मी चाकूला लाथ मारली. तो कुठेतरी खाली वगैरे फेकून द्यायचा होता मला. प्रत्यक्षात तो जिन्याच्या रेलिंगच्या अगदी जवळ पडला. मी त्या दिशेने जाणार तेवढ्यात त्याने माझे पाय खेचले आणि मला खाली पाडलं आणि तो माझ्यावर आला. मी माझ्या मोकळ्या हाताने त्याला नाकावर ठोसा मारला. त्याची माझ्यावरची पकड थोडी ढिली झाली. त्याक्षणी मी माझं वजन वापरून उठलो आणि त्याला अंगावरून फेकून दिला आणि त्याच्यावर झेपावलो. पण तो तयारीत होता. त्याची एक लाथ माझ्या पोटात वर्मी बसली आणि माझ्या फुप्फुसांतून हवा बाहेर पडल्यासारखं वाटलं मला. तो त्या चाकूच्या दिशेने गेलेला मी पाहिलं. त्याच्या हातात चाकू आला असता तर माझं काही खरं नव्हतं, हे मला माहित होतं, कारण शेवटी माझं वय बोलायला लागलं होतं. तो माझ्यापेक्षा तरुण होता. त्याचा जोर अजूनही टिकून होता. तो चाकूच्या दिशेने गेलेला दिसल्यावर मी पाठूनच झेप घेऊन त्याचे पाय पकडले. तो तरीही चाकूपर्यंत पोचायची धडपड करतच होता. मागचापुढचा काहीही विचार न करता मी त्याचे पाय धरून त्याला रेलिंगवरून खाली फेकून दिलं. त्याने रेलिंग पकडण्याची धडपड केली पण ते त्याला जमलं नाही.
त्याची किंकाळी जेमतेम दोन सेकंद ऐकू आली असेल मला. खाली जाताना त्याचं डोकं कशाला तरी आपटल्याचा आवाज मला ऐकू आला. मग काहीच नाही. मी त्याला अगदी शेवटपर्यंत पाहिलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++
“मला काय बोलावं यावर ते समजत नाहीये जॅक!” बँटम म्हणाला, “तू एजंट वॉलिंगचा जीव वाचवलास हे खरं आहेच पण कुरियरच्या मागे जाणं ही माझ्या मते चूक होती. जर तू तसं केलं नसतंस तर तो कदाचित आत्ता आमच्या ताब्यात असता आणि मग आमच्या काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली असती. तो म्हणाला त्याप्रमाणे मॅकगिनिससुद्धा जिवंत नसेल, तर मग या प्रकरणातली सगळी रहस्यं कायमची पडद्याआड गेलेली आहेत. वाळवंट खूपच मोठं आहे. तुला कळतंय ना मी काय बोलतोय ते?”
“मला असं वाटलं एजंट बँटम की जर मी त्याच्या मागे नाही गेलो, तर उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तो निसटेल. आणि जर तसं झालं असतं, तर तुम्हाला फक्त मृतदेह मिळाले असते. उत्तरं मिळालीच नसती. त्यापेक्षा आत्ताची परिस्थिती पुष्कळ चांगली आहे.”
“कदाचित. काही सांगता येत नाही.”
“मग आता काय?”
“मी म्हणालो तसं – आम्ही ही केस फेडरल ग्रँड ज्युरीपुढे सादर करू. ते ठरवतील की तुझ्यावर खुनाचा किंवा सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवायचा की स्वसंरक्षण या मुद्द्यावरून तुला निर्दोष मानून सोडून द्यायचं. माझं मत विचारशील तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तू निर्दोष सुटशील. मार्क कुरियरच्या मृत्यूमुळे कुणाला दुःख होईल असं मला वाटत नाही.”
“ओके. हे माझ्याबद्दल. पण या तपासाचं काय?”
तो एक क्षणभर थांबला. बहुतेक मला काय आणि किती सांगावं याचा विचार करत असावा.
“आम्ही या तीन खुनांचा – शेरॉन ओग्लेव्ही, डेनिस बॅबिट आणि अँजेला कुक – यांचा पाठपुरावा करणार आहोत. अजून आमचं वेस्टर्न डेटामधलं काम संपलेलं नाही. आणि आम्ही मॅकगिनिसचा तपास चालूच ठेवू, कारण आमच्याकडे फक्त कुरियरने तो मेलाय हे सांगणं हाच पुरावा आहे, आणि तेही त्याने तुला सांगितलंय. आम्हाला नाही.
मी खांदे उडवले. मी मला कुरियरने जे सांगितलं होतं, ते प्रामाणिकपणे एफ.बी.आय.ला सांगितलं होतं. त्यापुढे ते बघून घेतील. त्यांना जर देशातल्या प्रत्येक टी.व्ही. चॅनेलवर मॅकगिनिसचा चेहरा दाखवायचा असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.
“मग मी परत एल.ए.ला जाऊ शकतो का?”
“हो. जर तुला काही सापडलं तर आम्हाला फोन कर.”
“ओके.”
त्याने खोलीचा दरवाजा उघडला आणि तो निघून गेला. मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा रॅशेल तिथे उभी होती. पहाटेचे किती वाजले होते कुणास ठाऊक. पण आम्हाला दोघांनाही झोप येत नव्हती. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज पॅरामेडिक्सना वाटली नव्हती. तिच्या चेहऱ्याची सूज कमी झालेली वाटत होती पण ओठांवर झालेली जखम अजूनही होती आणि तिच्या डाव्या डोळ्याच्या खाली झालेली दुखापतही दिसून येत होती. ती स्वतःहून जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकली असती, पण ही केस आणि याच्यासंदर्भात होणाऱ्या सगळ्या घडामोडी यांना सोडून ती तिथे जाणं अशक्य होतं. मला हे अनुभवाने माहित होतं, त्यामुळे मीही काही बोललो नाही.
“कशी आहेस तू?”
“ठीक. तू?”
“मीपण. बँटम म्हणाला की मी एल.ए.ला परत जाऊ शकतो. मी सकाळची पहिली फ्लाईट घेऊन जाईन.”
“प्रेस कॉन्फरन्ससाठी थांबणार नाहीस?”
“त्यात असं काय सांगणार आहात तुम्ही, जे मला माहित नाहीये?”
“खरं आहे. काहीच नाही.”
“तू इथे किती दिवस आहेस?”
“काहीच सांगता येत नाही. जोपर्यंत इइआर टीम त्यांचं काम संपवत नाही तोपर्यंत. आणि सगळी माहिती खणून काढल्याशिवाय ते काही वेस्टर्न डेटामधून हलणार नाहीत.”
“बरोबर.”
“मला तुला अजून एक गोष्ट सांगायची होती.”
“काय?”
“तू आतमध्ये एजंट बँटमबरोबर होतास तेव्हा मला इइआर ने एक मेल पाठवला.”
“आणि?”
“त्यांना तिथे एका सर्व्हरवर घबाड सापडलंय. हा सर्व्हर वेस्टर्न डेटाच्या अकाउंट बुक्समध्ये नव्हताच. बहुतेक मॅकगिनिस आणि कुरियर या दोघांनाच त्याबद्दल माहित होतं.”
“काय आहे त्यात?”
“व्हिडिओज. त्यांनी त्यांच्या खुनांचं शूटिंग केलंय जॅक.”
“ते दोघेही आहेत त्यात?”
“मी पाहिले नाहीयेत व्हिडिओ अजून, पण मी त्यांच्याशी बोलले. ते म्हणाले, की त्यांनी चेहऱ्यावर मुखवटे घातलेले आहेत आणि जवळपास सगळे व्हिडिओज हे त्यांच्या बळींच्या चेहऱ्यांवरचे भाव दाखवताहेत. मनात भीती उत्पन्न करणं हा यामागचा हेतू आहे.”
“अँजेला पण आहे त्यात?”
“नाही. पण डेनिस आणि शेरॉन आहेत. आणि त्यांच्याशिवाय अजून बऱ्याचजणी आहेत. कुरियर आणि मॅकगिनिस हे बऱ्याच काळापासून करत होते.”
आता मी इथून जावं की नाही या द्विधा मनःस्थितीत अडकलो. जितके जास्त खून तितकी मोठी स्टोरी असा सरळसरळ हिशोब होता.
“आणि लेग ब्रेसेस?”
“हो. माझा अंदाज बरोबर होता. त्यांनी या सगळ्या मुलींना लेग ब्रेसेस घालायला लावल्या होत्या. व्हिडिओमध्ये आहे तसं.”
“तुझ्याकडे पेन आहे? मला हे सगळं लिहून ठेवायला लागेल.”
“नाही. माझ्याकडे पेन नाहीये. तसंही मी तुला आत्ता सांगितलेली माहिती ही अगदीच प्राथमिक स्वरुपाची आहे. मला तिथे जाऊन नीट काय आहे ते बघू दे. तशीही तुझी डेडलाईन अजून बारा-पंधरा तासांनी आहे.”
“ओके. ठीक आहे रॅशेल. मी निघतो मग. माझी बॅग भरून लगेचच एअरपोर्टवर जातो.”
“ठीक आहे. मी करेन फोन तुला.”
मी तिला न विचारताच तिने स्वतःहून असं म्हणणं म्हणजे जाणवण्याएवढा बदल होता.
“आणि अजून एक,” ती म्हणाली.
“काय?”
“तू माझा जीव वाचवलास. तुला असंच जाऊ देईन मी?” ती पुढे आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली.
वाईटातून चांगलं हा शब्दप्रयोग मी लहानपणापासून ऐकत आलो होतो. त्याचा अर्थ स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही हे मी आता सांगू शकतो.
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
19 Sep 2015 - 12:30 am | एस
स्केअरक्रोच्या पुढच्या भागासाठीच जागा होतो. आता लेख वाचतो.
19 Sep 2015 - 12:39 am | एस
चित्तथरारक! कुरिअर म्हणजे फ्रेड स्टोनच होता की आणखी कोणी हे कळायला उद्याची वाट पहायला लागणार!
पुभाप्र.
19 Sep 2015 - 2:33 am | रातराणी
मस्त! तुम्ही चार दिवस सुट्टी घेऊन संपवूनच टाका ना हा गुंता. डोक्याचा भुगा पडतोय इथं ;)
19 Sep 2015 - 5:15 am | कैलासवासी सोन्याबापु
तूफ़ान!!!
19 Sep 2015 - 6:46 am | सामान्य वाचक
परत आठवाडाभर वाट बघायचि हे काही जमत नाही
btw हा भाग पण मस्त झाला आहे
19 Sep 2015 - 8:52 am | प्रचेतस
जबरदस्त......
19 Sep 2015 - 9:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
जबरदस्तं. पुढचा भाग लौकर येउ द्या :)
19 Sep 2015 - 10:20 am | इनिगोय
थरारक आणि वेगवान!
19 Sep 2015 - 11:17 am | मोहन
बोकेराव तुमची अनुवादाची क्वालीटी सुद्धा दर भागा गणिक सुधारते आहे. आता तर एकदम प्रोफेशनल ! किंबहुना कित्येक अनुवादांपेक्षा सरस झाला आहे !
पु भा ल टा
19 Sep 2015 - 4:29 pm | santosh mahajan
बोका भाउ एक नंबर झालाय हा भाग.
बराच वेळ प्रयत्न करोत होतो पण भाग २७ उघडतच नव्हता.
19 Sep 2015 - 6:05 pm | अजया
आता कादंबरी संपेल लवकरच याची हुरहुर सुरु झाली बोकेराव:(
21 Sep 2015 - 10:22 am | नाखु
पण मालीका संपणार याचीही हुरहुर सुरु झाली आणि म्हणून पुढच्या नवीन मालीका तयारीला लागा ही आग्रही+आर्जवी मागणी
नाखु
21 Sep 2015 - 10:30 am | मोहन
+१
28 Dec 2015 - 6:59 pm | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग २८