सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ७- स्टोअरची तयारी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ८- महापूरामागच्या कारणांची मालिका
... ४ ऑगस्टच्या सकाळी हेल्पियाच्या परिसरामध्ये ढगच ढग आहेत. समोरचंसुद्धा स्पष्ट दिसत नाहीय. आज अर्पण संस्थेच्या सचिवांसोबत मीटिंगसाठी पिथौरागढ़ला जायचं आहे. सरांना त्यांच्याशी अनेक तांत्रिक गोष्टींवर चर्चा करायची आहे. त्याच्याशिवाय तिथल्या एटीममधून कामासाठी पैसे काढायचे आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भाग असल्यामुळे ओगला, डिडीहाट, जौलजिबी, धारचुला अशा जागीसुद्धा पैसे मिळाले नाहीत व ही एक समस्याच बनली. पिथौरागढ़मध्ये तीन एटीएम आहेत.
हेल्पियापासून पिथौरागढ़ पन्नास किलोमीटर आहे. पण पहाडी रस्ता आणि पावसाळा असल्यामुळे जास्त वेळ लागतो आहे. रस्त्याची स्थिती वाईट आहे. मध्ये मध्ये लँड स्लाईड झाल्यामुळे कच्च्या रस्त्यावरून जावं लागत आहे. ह्या रस्त्यावर कनाली छीना हे तालुक्याचं गाव लागतं व ते ह्या टप्प्यातलं सर्वोच्च स्थान आहे. सोबत अर्पणचे सदस्यसुद्धा आहेत. सतत चर्चा सुरू आहे. सर अनेक गोष्टी सांगत आहेत. १९७८ पासून ते हिमालयात येतात. हिमालयातल्या सगळ्या भागांमध्ये फिरले आहेत. अनेक जागी ट्रेकिंगसाठी तर ते येतातच; त्याशिवायही खूप फिरले आहेत.
त्यांनी सांगितलं की, १६ जून २०१३ चा महापूर येण्याच्या थोडेच दिवस आधी म्हणजे ३० मेला ते हरिद्वारमध्ये होते. तेव्हा तिथलं तपमान अविश्वसनीय प्रकारे ४६ अंश से. होतं. अगदी अनपेक्षित होतं. त्यांनी सांगितलं की, त्यातून स्पष्ट इशारा मिळत होता की, वातावरणामध्ये मोठा उलटफेर सुरू आहे. ह्या मदतकार्यामध्ये मैत्रीसोबत गिरीप्रेमी संस्थासुद्धा आहे. त्यांचे एक मित्र गिरीप्रेमीचे मोठे गिर्यारोहक आहेत. त्यांच्याशी त्यांचं नुकतच बोलणं झालं होतं. सरांच्या मित्रांनी सरांना सांगितलं की, हिमालयातल्या ६००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर ते गेले होते आणि तिथे चक्क बर्फाऐवजी पाऊस पडत होता. इतक्या अत्यधिक उंचीवर बर्फाच्या ऐवजी पाऊस कधीही पडत नाही. पण असं होणं पर्यावरणामध्ये झालेल्या मोठ्या स्थित्यंतराची चुणूक होती.
सर स्वत: हवामान शास्त्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींविषयी खूप माहिती सांगितली. त्यांनी एक संकल्पना सांगितली- वेस्टर्न डिस्टर्बंस किंवा पश्चिमी विक्षोभ. ही हवामानात घडणारी एक घटना आहे आणि दर वर्षी ती होण्याची शक्यता निर्माण होत असते. त्यांनी सांगितलं की, केदारनाथमध्ये जी ढगफुटी झाली, त्यामागे अनेक गोष्टी होत्या. एका प्रचंड मोठ्या परिघाच्या क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र बनलं होतं. जून महिन्यामध्ये असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे. त्यामुळे त्या परिसरात अत्यंत दूरवरच्या प्रदेशातून बाष्प ओढलं गेलं. ज्याप्रमाणे भारताच्या पूर्व किना-यावर येणारं कमी दबावाचं क्षेत्र हजार किलोमीटर व्यापून टाकतं आणि त्यामुळे हजारो किलोमीटर लांब असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र अशा भागांमध्येही पाऊस पडतो; त्याप्रमाणेच ह्या कमी दाबाच्या क्षेत्राने हजारो किलोमीटर बाष्प खेचून आणलं. कॅस्पियन समुद्राइतक्या अतिदूरवरच्या क्षेत्रातून बाष्प खेचलं गेलं आणि मग तो कमी दाबाचं क्षेत्र ढगफुटी बनलं. हवामान शास्त्रानुसार आज ही प्रक्रिया नेहमी शक्य होण्याची स्थिती उत्पन्न होते. १० ऑगस्ट २०१० ला लेहमध्ये ढगफुटी झाली. त्यानंतर दर पावसाळ्यात कुठे ना कुठे ढगफुटी होतच राहते. ह्या बाष्पाच्या विराट वर्तुळाची घनता प्रचंड होती आणि केदारनाथला लागून असलेल्या शेकडो किलोमीटरच्या वर्तुळामध्ये असामान्य आणि अनपेक्षित पाऊस झाला. त्यामुळे महापूराचा कहर सुरू झाला.
हवामानात हे स्थित्यंतर होण्याची कारणं अनेक आहेत. डोंगरामध्ये झाडं नष्ट करणं; तिथे मानवी हस्तक्षेपामुळे ताण निर्माण होणं; जागतिक तपमान वाढ; नैसर्गिक जलमार्गांमध्ये अतिक्रमण इ. इ. त्या अर्थाने ही सर्व आपत्ती अजिबात अनपेक्षित नाही. सरांच्या शब्दांमध्ये दैवी तर अजिबात नाहीय; संपूर्ण मानवी आहे. आणि जितकं मनुष्याने बनवलेलं होतं; तितकंच प्रभावित झालं. नैसर्गिक संरचनेचं फारसं नुकसान झालं नाही. उत्तराखंडचे लोक सांगतात की, अनेक वेळेस नवे धबधबे फुटल्यामुळे गावंच्या गावं वाहून गेली आहेत. पण त्यापासून बोध कोणी घेतला नाही. जशी डोंगरावरची वस्ती वाढली; जलमार्ग अवरुद्ध झाले आणि त्यामुळे पाण्याने दुसरा रस्ता शोधलाच. नदीसुद्धा हेच करत आहे. त्यांच्या नैसर्गिक पातळीपेक्षा खूप जास्त पाणी त्यांच्यात आल्यामुळे त्यांचे प्रवाह बदलत आहेत. पाण्याच्या तीव्र बलामुळे त्यांचे प्रवाह सरळ रेषेत होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ खूप स्पष्ट आहे. खरा प्रश्न हा आहे की काय आपण त्यातून बोध घेऊ आणि आपल्या विकासाच्या संकल्पनेमध्ये परिवर्तन करू... ?
सरांचा फिटनेस आश्चर्यकारक आहे. ५६ व्या वर्षीसुद्धा ते टीममधले सर्वांत फिट व्यक्ती आहेत. आणि त्यांनीच सांगितलं की, त्यांचा सध्याचा फिटनेस काहीच नाही. वस्तुत: काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या पायाला खूप मार बसला. अनेक महिने ते झोपून होते. मग हळु हळु चालायला लागले. गुडघा नाजुक स्थितीत असूनही त्यांनी हळु हळु ट्रेकिंग सुरू केलं आणि आज कुठेही ते फिरू शकतात. किंबहुना सगळ्यांच्या पुढे असतात. प्रश्न पडतो की आत्ताचा त्यांचा फिटनेस इतका जोरदार आहे तर पूर्वीचा कसा असेल! अर्थात् पहाडाची सवय असणं किंवा फिटनेस चांगला असणं ह्या बाबी जीवनशैलीशी निगडीत आहेत. जे कोणी अशी जीवनशैली निवडतील, त्यांना त्याचं फळ मिळेल. इथल्या लोकांमध्येही दिसतं आहेच की, सर्वच फिट नाहीत. ज्यांची जीवनशैली आरामदायी आहे- जसे दुकानदार किंवा ड्रायव्हर- तर तेही इतके फिट नाहीत; त्यांना डोंगरात सहज चढता येत नाही. असो.
पिथौरागढ़च्या पंधरा किलोमीटर अलीकडे पलेटा नावाचं एक खेडं आहे. तिथे एका दुकानामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांविषयी बोलणं झालं. स्टोअरमध्ये रेशन पॅक करण्यासाठी मोठ्या संख्येत पिशव्या पाहिजे होत्या. इथेही परत एकदा दिसलं की, पहाडात सगळे एकमेकांना ओळखतात. कमीत कमी दोन- तीन प्रकारे एकमेकांकडे ओळखतात. ही गोष्टसुद्धा जीवनशैलीशी संबंधित आहे. अजून ते टिव्ही, इंटरनेट, शॉपिंग, क्रिकेट ह्याचे इतके वेडे झालेले नाहीत.
पिथौरागढ़मध्ये आयटीबीपी जवळचं एटीएम बंद आहे. पुढेही एटीएममधून कॅश नाही मिळाली. मोठी अडचण आहे. नंतर कित्येक तास मीटिंग चालली. दोन संस्थांच्या भागीदारीसंदर्भातील मुद्दे समोर आले. आता स्थिती अशी आहे की, आपत्तीनंतर पुनर्वसनाचे मुद्दे घेऊन अनेक मोठ्या संस्था व कंपन्या शिरकाव करत आहेत. आलेल्यासुद्धा आहेत. आणि त्या सर्व स्थानिक भागीदार शोधत आहेत. फंडिंग एजन्सीज येत आहेत. त्यामुळे स्थानिक संस्थांवरही थोडा दबाव पडला आहे. त्यांनाही जर वाहत्या नदीमध्ये हात धुवावसं वाटत असेल तर ते स्वाभाविकच म्हणावं लागेल. त्याच्याशी संबंधित कित्येक गुंतागुंतीचे पैलू आहेत. अशा मोठ्या संस्थांद्वारे धर्म प्रसार करणारे लोकही येतात आणि अनेक वेळेस स्थानिक संस्कृतीमध्ये हस्तक्षेप होताना दिसतो. फंड ड्रिवन एप्रोचने काम होतं. प्रत्यक्ष जमिनीवर काय अपेक्षित आहे हे थोडं लांब ठेवलं जातं. लोकांना परावलंबी करण्याचा प्रयत्न सुरू होतो.
ह्या सगळ्यामध्ये मैत्रीला फोकस टिकवून ठेवायचा आहे. काम सुरू ठेवायचं आहे. मग सोबत कोणी असेल किंवा नसेल. सर ह्याची खात्री करत आहेत. मैत्रीचं काम आत्तापर्यंत सर्वांना समजलं आहे. काही तांत्रिक बदल झाले तरी काम थांबणार नाही. आता उत्तराखंडच्या अन्य क्षेत्रांमध्येही मैत्रीला असेसमेंटसाठी बोलावलं जात आहे. पिथौरागढ़ मीटिंगमध्ये सरांचा प्रयत्न हाच आहे की, कोणी स्थानिक जिऑलॉजिस्ट मैत्रीच्या कामात सहभागी होईल. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा मार्ग, सुरक्षित स्थान ह्याविषयी सविस्तर अभ्यास करता येऊ शकेल. त्यासाठी अनेकांशी संपर्क केला जात आहे. अनेक तासांच्या बैठकीनंतर पिथौरागढ़मधल्य काही जणांशी भेटी झाल्या. हे स्थानिक व्यापार जगतातले लोक आहेत जे मदतकार्यामध्ये सहभागी आहेत. काही जणांनी धारचुलाच्या आपत्तीग्रस्त शिबिरासाठी पलंग दिले. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने कार्यरत आहे. त्या सगळ्यांना भेटून हेल्पियाला परत आलो. पोहचायला फार उशीर झाला. आज आमच्या जीपचे चालक इथेच थांबतील. त्यांच्याशीसुद्धा चांगली मैत्री झाली आहे. आणि तेसुद्धा फक्त ड्रायव्हर नसून टीममधील एक सक्रिय सदस्य झाले आहेत. सगळ्या कामांमध्ये सहभाग घेत आहेत. पुन: पुन: तवाघाटच्या पुढच्या गावांमध्ये कार्यरत असलेल्या मित्रांची आठवण येते आहे. ते आता बहुतेक नारायण आश्रमाजवळ असतील. प्रत्येक शिबिरात त्यांना अनेक रुग्ण मिळत असतील. आणि दुर्गम वाट व चढ... अडचण तर आलीच असणार; पण तरी त्यांनी अंतर पार केलं असणार.
***
...५ ऑगस्ट. आज पुण्याहून पाठवलेला सामानाचा ट्रक पोहचणार आहे. आज त्यातलं सामान काढून स्टोअरमध्ये ठेवायचं काम आहे. त्यासाठी एक मीटिंग झाली. अर्पणच्या सदस्यांसोबत बोलून कोणत्या प्रकारे सामानाचे पॅकेटस बनवायचे, हे ठरलं. त्यासाठी आज काही जणांनाही बोलावलेलं आहे. ते सामान उचलून पॅक करण्याच्या कामात असतील. सकाळीच ब्याडाच्या स्टोअरवर जाऊन तयारी केली. पण ट्रक यायला अजूनही वेळ आहे. आज सर काही सदस्यांना घेऊन छोरीबगड़ गावाला जातील. मी जाण्याविषयी विचारलं तेव्हा इथेच थांब असं म्हणाले. सर नसताना सगळे लोक कसे काम करतात, हे बघणं सरांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हळु हळु आता ही टीम परत जायचा दिवस जवळ येतोय. जाताना एका प्रकारे अर्पणच्या सदस्यांना हे काम हँड ओव्हर करावं लागेल. त्यासाठी त्यांना स्वतंत्र प्रकारे काम करण्याचीही संधीद्यावी लागेल. म्हणून सर ब्याडा स्टोअरमध्ये न थांबता छोरीबगड़ला गेले. ते तिथेही असेसमेंट करतील. छोरीबगड़ लुमतीच्या पुढचं गाव आहे. रस्ता कसाबसा लुमतीपर्यंत आहे. त्यामुळे त्यांना तिथे बरंच चालावंही लागेल. लुमतीजवळ दुसरं स्टोअरसुद्धा सुरू करायचं आहे.
दुपारनंतर ट्रक आला. सामानाची पोती मोजली. सगळं सामान पाठवलं तसच आहे. फक्त प्रवासात काही पोती हलली आहेत. त्यांना आता नीट लावून ठेवायचं आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे सामान उचललं. ज्यांना सराव होता, त्यांनी सहजपणे मोठी पोती उचलली. प्रत्येक जण क्षमतेनुसार करत गेला. मैत्रीच्या टीममध्ये ही गोष्ट महत्त्वाची मानतात. व्यक्तिगत क्षमता आणि टीमची आवश्यकता ह्यांचा मेळ अचूक बसवला गेला आहे. प्रत्येक जण त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने सहभाग घेतोय. आता सामान गावांमध्ये नेण्यासाठी कशा पिशव्यांमध्ये पॅक करायचं; प्रत्येक कुटुंबाला सामानाचं कोणतं पॅकेट द्यायचं ह्या गोष्टी अर्पणच्या दिदी ठरवत आहेत. प्रत्येक गावामध्ये कोणतं व किती रेशन उपलब्ध आहे, हे त्यांना माहिती आहे. तसंच प्रत्येक कुटुंबाकडे देण्यात येणारं पॅकेट किती वजनाचं असेल, हेही नीट ठरवत आहेत. कारण त्या लोकांना नंतर दुर्गम वाटांनी ते घरी न्यायचं आहे. चामी- लुमतीच्या रस्त्यावर अजून मोठे ट्रक जाऊ शकत नाहीत. म्हणून छोटा ट्रक व टेंपोमधूनच सामान न्यावं लागेल. ह्या वाहनांमधूनही इतकं सामान तिथे नेता येईल का, ह्याविषयी स्थानिक ड्रायव्हर्सना शंका आहे. त्यांना आमचे चालक नारायणजी स्वत:हून समजावत आहेत. टीम वर्क अगदी ऑरगॅनिक वाटत आहे. एका फोकसने काम होतं आहे.
ट्रकमधून सामान उतरवून नीट लावेपर्यंत रात्र झाली. स्टोअरमध्ये मैत्री, गिरीप्रेमी आणि एक मदत करणारी कंपनी- मॅग्ना स्टिअरचे बॅनर्ससुद्धा लावले. आता उद्यापर्यंत सर्व सामान गावांमध्ये वितरणासाठी तयार होईल. उद्या तवा घाटच्या पुढे असलेले मित्रही परततील. आता ह्या टीमच्या कामाचा महत्त्वपूर्ण टप्पा जवळ येतोय. तिथे प्रत्येकाला थोडा जास्त जोर लावावा लागेल. आज रात्री उशीरापर्यंत मीटिंग आहे. प्रत्येक गावाच्या आवश्यकतेवर चर्चा होईल. सामान गावांपर्यंत नेण्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये लुमती, चामी, घरूड़ी, हुड़की, मनकोट अशा गावांतल्या आपत्तीग्रस्त कुटुंबांना सामान द्यायचं आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू आहे. कुटुंबांची संख्या आणि प्रभावित कुटुंबांची संख्या बघितली जाते आहे. रात्री उशीरापर्यंत मीटिंग सुरू राहिली. आता उद्या मित्र पुन: भेटतील.
पलेटाच्या दुकानातल्या भाज्या
स्टोअर लावत असतानाचं दृश्य. मैत्री, मॅग्ना स्टिअर व गिरीप्रेमीचं बॅनर
मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net maitri1997@gmail.com.
पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ९- मदतकार्याचे विविध पैलू व जमिनीवरील वास्तव
प्रतिक्रिया
25 Aug 2015 - 4:55 pm | खेडूत
सगळं भयंकर आहे !!
पण हवामान खात्यला हे आधी समाजात असेलच ना?
26 Aug 2015 - 5:25 pm | मार्गी
धन्यवाद खेडूतजी! हवामान खात्याला काही दिवस आधी कळतंच; पण संबंधित यंत्रणांपर्यंत पुरेसा इशारा पोहचायला वेळ लागतो! शिवाय हे काहीसं त्सुनामी आल्यानंतर किना-याकडे निघणंच आहे ना. :) जीवनशैलीमधील शाश्वत बदल; हा बोध ह्या सगळ्यातून घेतला पाहिजे.
25 Aug 2015 - 5:51 pm | एस
यातून निसर्गाच्या समतोलातील मानवी हस्तक्षेपाबद्दलचा मुद्दा ठळकपणे मांडला गेलाय आणि ते दिसतही आहे. आपत्तीतही स्वर्थ साधू पाहणार्यांबद्दल वाचून चीड आली.
पुभाप्र.
25 Aug 2015 - 6:33 pm | प्रीत-मोहर
खूप छान आहे ही लेखमालिका. मार्गी धन्यवाद तुमचे अनुभव आमच्यापर्यंत पोचवत आहात त्याबद्दल
25 Aug 2015 - 9:54 pm | यशोधरा
वाचते आहे आणि थक्कही व्हायला होतं आहे..
1 Oct 2015 - 11:43 am | पैसा
अशी वेळ येऊ नये म्हणून काही करणार का कोणी? निसर्गातला मानवी हस्तक्षेप ही किती ओरडलं तरी दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट झाली आहे. आणि अशा आपतीच्या वेळेला धर्मप्रसाराची संधी समजून काम करणार्या मानवतावाद्यांबद्दल काय बोलावं?