निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
17 Aug 2015 - 10:43 am

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापुरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

१. ढगफुटी तर केदारनाथला झाली, मग पिथौरागढला जाऊन काय करशील?
२. आता तर सर्व लोकांना वाचवलं‌ गेलं आहे, रिलिफ काम संपलं आहे, आता तिथे जाऊन काय करशील?
३. महापूर तर उत्तरांचलमध्ये आला होता, मग उत्तराखंडला का जातो आहेस?

हे प्रश्न देशाबद्दल व देशातील परिस्थितीबद्दल आपल्या मनामध्ये असलेलं‌ घोर अज्ञान दर्शवतात. आपण किती उथळ विचार करतो हे दर्शवतात. निघताना हे प्रश्न विचारले गेल्यावर जितक्या अज्ञानाची जाणीव झाली; तितकंच अज्ञान मलासुद्धा आहे, ही जाणीव प्रत्यक्ष परिस्थिती बघताना झाली... इतकी परिस्थिती वेगळी होती!

... अनेक संस्था आणि माध्यमांमधून चौकशी केल्यानंतर पुण्यातल्या मैत्री संस्थेकडून उत्तराखंड मदत कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल सर्वप्रथम मैत्री संस्था व सर्व सदस्यांना मन:पूर्वक नमन करतो. मैत्री असं माध्यम बनली ज्याद्वारे आपदाग्रस्त लोकांपर्यंत पोहचता आलं आणि थोडी सोबत देता आली. मैत्री संस्था उत्तराखंडच्या महापूरामध्ये लगेचच सक्रिय झाली आणि आजपर्यंत ती तिथे कार्यरत आहे. भुज भूकंप २००१, त्सुनामी २००४, लेह फ्लॅश फ्लड २००९ आणि नंतर नेपाळमधील भूकंप अशा प्रत्येक वेळेस मैत्री संस्थेने मदत आणि पुनर्निर्मिती कामामध्ये सहभाग घेतला आहे.

.... २६ जुलै २०१३ ला पुण्यातून पाच सदस्यांची टीम निघाली. आणखी एक सदस्य व टीम लीडर दिल्लीमध्ये जॉईन होणार आहेत. अशा प्रसंगी जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा अनोळखी असूनही "मैत्री" होऊन जाते! वेगवेगळे व्यवसाय आणि सामाजिक बॅकग्राउंडमधून एकत्र आलेले ते पाच जण- ज्यांमध्ये दोन डॉक्टरही आहेत- दुस-या दिवशी दिल्लीला पोहचेपर्यंत चांगले मित्र बनले. एकमेकांना अनुभव शेअर केले. सगळं सामान मिळून नेलं. दिल्लीमध्ये अजून दोन जण जॉईन झाले आणि पुढचा प्रवास सुरू झाला काठगोदामच्या दिशेने.

दिल्ली ते काठगोदाम रेल्वे प्रवासातले एक सोबती हल्द्वानीचे होते. ते मर्चंट नेव्हीमध्ये होते आणि चार महिन्यानंतर स्वदेशी आले होते व घरी जात होते. त्यांना आपत्तीबद्दल विशेष माहिती नव्हती, पण तरी ते काळजीत होते. महाराष्ट्रातून मदतीसाठी आलेल्या गटाला बघून त्यांना आश्चर्य वाटलं. मीसुद्धा मदत करतो, असं ते म्हणाले. पुढेही हाच अनुभव वारंवार येणार होता. जेव्हा प्रवासाच्या आधी तयारीसाठी काही सामान विकत घेतलं जात होतं, तेव्हा अनेक वेळेस ते नि:शुल्क मिळालं. जसं दुकानदाराला कळायचं हे सामान उत्तराखंड मदत सामान म्हणून जाणार आहे, तेव्हा ते त्याचे पैसे घ्यायचे नाहीत... प्रवासामध्येच कळालं की, पिथौरागढ़ जिल्ह्यातल्या अस्कोट व धारचुला गावांच्या परिसरात काम करायचं आहे. २७ जुलैला रात्री उशीरा काठगोदामला पोहचलो. तिथून लगेचच पुढे जायचं असं ठरलं. काठगोदाममध्ये आकाश बिलकुल निरभ्र आहे. ढग नसलेलं आकाश ता-यांनी उजळून निघालं‌ आहे.

काठगोदाम रेल्वेचं‌ शेवटचं स्टेशन आहे. इथून पुढे पहाड सुरू होतो. झुलाघाटचे राहणारे ड्रायव्हर आले. जीप तयार आहे. सर्व हॉटेल्स बंद असल्याने जेवणासाठी हल्द्वानीला जावं लागलं. जे मिळेल ते खाऊन घेतलं. निघायला रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. लगेचच पुढे जायला निघालो. पिथौरागढ़ लवकर पोहचावं व काम लगेच सुरू करावं हा प्रयत्न होता. रात्री पहाडातल्या रस्त्यांवर सामान्यत: फार वाहतुक नसते. पण काही लोक गाड्या चालवतात. सात जण आणि भरपूर सामान आहे. डॉक्टरांच्या शिबिरांसाठी बरेच औषधांचे बॉक्स आहेत. आमचे चालक साहसी व सराईत आहेत. त्यांनी जोराने जीप पळवायला सुरुवात केली. काठगोदामनंतर लगेचच पर्वत सुरू आणि मग सतत वळणा- वळणाचा रस्ता व घाट! दोन पावलं म्हणजे दोन चाकं सुद्धा गाडी सरळ जात नाही. हे महाशय वेगामध्ये पळवत आहेत. अंधार आणि थकवा असूनही जीप किती वेगाने जात आहे, हे जाणवत आहे. रस्त्याने दुसरं वाहन खूप वेळाने दिसत आहेत. एक तासानंतर काही ट्रक थांबलेले दिसले. एक गृहस्थ ट्रक रस्त्यामध्ये लावूनच आराम करत आहेत. त्यांना थोडं समजावून बाजूला केलं.

जीप निघाल्यापासूनच पोटामध्ये उलथापालथ सुरू आहे. जर हा प्रवास कमी गतीने असता, तर शरीराला जुळवून घ्यायला वेळ मिळाला असता. पण वळणा वळणांचा रस्ता व वेगाने प्रवास. हळु हळु शरीरात प्रतिक्रिया आली. उलटी येण्याची सुरुवात! थोड वेळ नियंत्रण केलं; पण मग शरीरानेच निर्णय घेतला. एकामागोमाग एक लोकांच्या उलट्या सुरू झाल्या. उलटी अशी गोष्ट आहे; जी दाबून टाकायला नको. कारण ती समस्या नसून समाधान आहे. शरीर त्या स्थितीमध्ये संतुलन करत आहे. त्यामुळे जर शरीराचा इशारा असेल, तर तो टाळायला नको. अनुकूलन होण्याचा हासुद्धा एक टप्पा आहे. शरीर अशा रस्त्यांशी व अशा प्रवासासाठी स्वत:ला जुळवून घेत आहे. असो; सर्व जेवण उलटीमध्ये वाहून गेलं! सातपैकी केवळ तीन जण त्यातून वाचले! शरीरासमोर खडतर परिस्थिती सुरू झाली! आता प्रत्येकाच्या फिटनेस लेव्हलची चाचणी होण्यास सुरुवात झाली. टीम लीडर सरांनी सांगितलंच आहे की, हा जीप प्रवाससुद्धा एक ट्रेकच आहे.

रात्री जीपचा मार्ग- काठगोदाम- भीमताल- शहर फाटक- दन्या- घाट- गुरना- पिथौरागढ़- त्या रस्त्यावर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये दिवसा हिमालयातील अनेक बर्फाच्छादित शिखर स्पष्ट दिसतात. रात्रीसुद्धा अशा जागा ओळखू आल्या जिथून दिवसा बर्फाच्छादित शिखर दिसतात..

प्रवास अधिकाधिक कष्टप्रद होत जातोय. झोप लागण्याची शक्यताही नाही. अजिबात स्थिरताच नाहीय. खूप उशीरा शरीराने थोडं जुळवून घेतलं आणि झोप नाही; पण डुलकी आली. पण जसे ब्रेक्स दाबले जात आहेत, शरीर एका झटक्यात जागं होतं आहे. समोर रस्त्यावर ढग आलेले दिसत आहेत आणि चालक महाशय रेसमध्ये भाग घेतल्यासारखे जात आहेत. वाटेत रस्ता मध्ये मध्ये कच्चा आहे आणि त्याची थोडी मोडतोडसुद्धा झालेली आहे. पावसाळ्यानंतरही ह्या रस्त्यावर वाहतुक फार थोडी असते. कारण ह्या मार्गावर कोणतंही मोठं शहर लागत नाही. अल्मोडा शहरापासून थोड्या अंतरावरून जाणारा हा रस्ता सुनसानच असतो. मग पुढे जाऊन तो घाटमध्ये टनकपूर- पिथौरागढ़ मार्गाला मिळतो.

पहाटे चार वाजता दन्या आलं. इथे काही हॉटेल्स सुरू आहेत आणि चहासुद्धा मिळेल. वाटलं की, आता काही उलटी होणार नाही. तेव्हा चहा पिण्याचं साहस केलं. पण जसं पुढे निघालो; चहानेसुद्धा उडी मारली! थोडाही चहा लाभला नाही! आत्तापर्यंत उलट्यांच्या पिचका-यांनी जीपच्या दारांना रंगीबेरंगी केलं आहे! पण चालक अजिबात नाराज नाही झाले. सहजपणे ते म्हणाले काही हरकत नाही, मला गाडी धुवायचीच आहे. पहाडी मनुष्याच्या सरलतेचा हा आलेला फक्त पहिला अनुभव! जशी पूर्व दिशा उजळू लागली, तसा नजारा दिसू लागला... चारही बाजूंना उंचच उंच पहाड आणि तळातून वाहणारी रामगंगा! इथे आधीसुद्धा आलेलो असल्यामुळे परिसर ओळखीचा आहे. घाट, गूरना आणि मग पिथौरागढ़. इथे थोडा वेळ थांबलो. जीप इथपर्यंतच होती. दुसरी जीप आल्यानंतर अस्कोटसाठी निघालो. इथून हिवाळ्यामध्ये बर्फाच्छादित पर्वत खूप छान दिसतात. पण आत्ता दाट ढगांनी निराश केलं. पिथौरागढ़मध्ये काही खायची तर नाहीच; पण चहा पिण्याचीही इच्छा झाली नाही.

पण पुढे टीम लीडर सरांनी सांगितलं की, उलटी आली तरी चालेल, पण खाऊन घ्या. पुढे अस्कोटच्या बेस कँपमध्ये काही खायला मिळेल किंवा नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे वाटेत एका ठिकाणी पराठे खाल्ले. अस्कोट पिथौरागढ़पासून सुमारे पन्नास किलोमीटर दूर आहे. पण पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था खराब असते, त्यामुळे पोहचायला दोन तास लागले. रस्त्यामध्ये आयटीबीपी अर्थात्‌ इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसचे अनेक केंद्र लागतात. रस्त्याची स्थिती दारुण आहे. पिथौरागढ़पासून बीआरओ अर्थात्‌ बॉर्डर रोडस ऑर्गनायजेशनची हिरक परियोजना सुरू होते! इथून पुढचा प्रवास बीआरओ व सेनेच्या अन्य विभागांसोबतच होतो...


निसर्गाच्या कुशीत...

अस्कोटच्या सुमारे पाच किलोमीटर आधी उजवीकडे एक बोर्ड दिसला- अर्पण संस्था (Association for Rural Planning and Action). ही हेल्पिया गिरीग्रामात असलेली एक ग्रास रूटवर काम करणारी संस्था आहे. इथेच बेस कँप असणार आहे. हेच मुख्य केंद्र असेल. इथूनच पुढचं काम सुरू करायचं आहे. अत्यंत रमणीय अशा परिसरात गेल्या गेल्या थकवा कमी होत गेला. पर्वतांमधली शांती आणि आनंद! इथे काही मित्रांच्या मोबाईल नेटवर्कमध्ये नेपाळ आलं! हो, येणारच कारण, हा भाग नेपाळला लागूनच तर आहे!


हेल्पियाच्या अर्पण संस्थेच्या परिसरातून दिसणारा नजारा

बेस कँपमध्ये थोडा वेळ आराम करून संध्याकाळी वॉर्म अप ट्रेकसाठी एका मंदिरापर्यंत गेलो. पायवाट अगदी सामान्य होती. इथे सरांनी खूप माहिती दिली. पुढची योजना सांगितली. येताना पाऊस सुरू झाला. एका गटात असल्याचा फायदा झाला. छत्री नसलेल्यांना छत्री मिळाली. अंधारात बॅटरी मिळाली. पोंचूमुळे सरांची बॅग भिजण्यापासून वाचली. गटामध्ये काम करताना शक्ती कशी वाढते, ह्याचा अनुभव इथून पुढे सतत येणार आहे. दुस-या दिवशी म्हणजे २९ जुलैला काम सुरू होणार ह्या विचारांमध्ये आणि अर्पणच्या दिदींसोबत ओळख करून घेण्यामध्ये संध्याकाळ गेली.

मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net; maitri1997@gmail.com.

पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरी गंगेच्या काठावरती...

संस्कृतीसमाजजीवनमानविचारअनुभव

प्रतिक्रिया

वा! अजून एका वाचनीय मालिकेची सुरूवात.

या कार्याबद्दल आपले व 'मैत्री' संस्थेचे विलक्षण कौतुक आहे.

हेच म्हणते. नियमित अंतराने भाग टाकावेत ही विनंती.

प्राची अश्विनी's picture

17 Aug 2015 - 6:02 pm | प्राची अश्विनी

+1

तुडतुडी's picture

17 Aug 2015 - 12:26 pm | तुडतुडी

वाचनीय . फोटू दिसत नैत . असंच होणार आता . नैसर्गिक आपत्ती वाढत जाणार :-(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Aug 2015 - 12:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं लेख. पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2015 - 1:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा ! एका रोचक आणि प्रेरणादायी मालिकेची सुरुवात ! लवकर लवकर टाका पुढचे भाग.

सुंदर निसर्गाचे फोटो आवडले !

लेखमालेच्या पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.तुम्ही हेच काम करता का का नोकरी वगैरे पण करता? कसं जमवता हा प्रश्न पडलाय.मागच्या काश्मीरच्या सिरिजपासून.

मार्गी's picture

17 Aug 2015 - 4:47 pm | मार्गी

सर्वांना वाचन व प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

@अजया जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी स्वतंत्र कन्सल्टंट- ट्रान्सलेटर म्हणून काम करतो. आणि आपल्याकडे जर दहा गोष्टी करायची इच्छा असेल तर आपोआप नव्वद गोष्टी दूर राहतात. आपण सर्वच जण जे मनापासून करायला आवडतं ते करतच असतो ना. तेव्हा सहज शक्य आहे. लोक तर अजून किती जास्त गोष्टी करतात!

संदीप डांगे's picture

17 Aug 2015 - 6:10 pm | संदीप डांगे

सलाम मार्गीसाहेब, तुमच्या उदाहरणावर प्रेरणा मिळते आणि जबाबदारीची जाणीवही होते.

अजया's picture

17 Aug 2015 - 5:33 pm | अजया

माझी खूप इच्छा असते अशा कामात सहभागी व्हायची.पण व्यवसाय,संसार सोडून असं झोकून काम करणं शक्य होत नाही.म्हणून मला नेहमी औत्सुक्य वाटतं तुमच्यासारख्या कुठेही जाऊन कामं करणाऱ्या सर्वांचच.

रुस्तम's picture

17 Aug 2015 - 5:56 pm | रुस्तम

+१

प्यारे१'s picture

17 Aug 2015 - 7:09 pm | प्यारे१

खूप चांगलं काम करताय.
___/\___

काही नक्राश्रू हास्यास्पद असतात. असो!
पु भा प्र

राघवेंद्र's picture

17 Aug 2015 - 9:19 pm | राघवेंद्र

खूप चांगलं काम करताय. लेखमालेसाठी शुभेच्छा !!!

कोमल's picture

18 Aug 2015 - 3:55 pm | कोमल

सुरवात मस्तच झालीये.
पुभाप्र

अवांतर : काही महिन्यांपूर्वी एक परदेशी पाहुणा आणि त्याची मैत्रिण भारतभ्रमणासाठी आले असतांना आमच्या ग्रुपशी त्यांची ओळख झाली. दोन वर्षे आपल्या देशांत काम करुन, पैसे कमावून मग ते भारतात आलेले.
नेपाळच्या भुकंपावेळी त्यांना असच तडक उठून नेपाळला निघालेलं पाहिलं आहे. खुप कौतुक वाटतं अशांच.
नाहीतर आम्ही अजून कीबोर्डच बडवत बसलोय :(

पैसा's picture

19 Aug 2015 - 1:13 pm | पैसा

तुमच्या कामापुढे नतमस्तक आहे. अजून काय बोलू?