द स्केअरक्रो भाग २० (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
न्यूजरूममधून बाहेर पडून मी माझ्या गाडीत बसलो, तेव्हा मला जरा बरं वाटलं. एकेकाळी हीच न्यूजरूम सोडून घरी जायलाही मी तयार नसायचो. कधी घरी गेलोच, तर दुसरा दिवस कधी उजाडतोय आणि मी कधी ऑफिसला जातोय असं व्हायचं मला. पण ते दिवस आता इतिहासजमा झाले होते. क्रेमर आणि त्याच्यासारख्या कॉर्पोरेट लांडग्यांनी तिथे उच्छाद मांडला होता. मला तिथून बाहेर पडायलाच हवं होतं.
मी सरळ फ्रीवेवर गेलो आणि तिथून समुद्राच्या दिशेने. सगळी वाहतूक यावेळी उलट दिशेला चालली होती. त्यामुळे मला रस्ता जवळजवळ मोकळा मिळाला. माझ्यासमोर कुठे जायचं असं लक्ष्य नव्हतं. निरुद्देश चाललं होतं सगळं. पण बहुतेक माझ्या अंतर्मनाला ही जाणीव असावी, कारण जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण कुठे आहोत, मला स्वतःलाच आश्चर्याचा धक्का बसला. मी ही सगळी स्टोरी जिथे सुरु झाली, तिथे आलो होतो. सांता मोनिकाच्या समुद्रकिनाऱ्यावर. इथल्याच पार्किंग लॉटमध्ये डेनिस बॅबिटची माझदा मिलेनिया पोलिसांना मिळाली होती, आणि नंतर तिचा मृतदेहसुद्धा.
मी त्याच पार्किंग लॉटमध्ये माझी गाडी पार्क केली. आता या वेळी तिथे शुकशुकाट होता. गाडीबाहेर पडून मी समुद्रकिनाऱ्यावर आलो. आता पुढे काय? मी माझ्या फोनकडे पाहिलं. अजूनही रॅशेलकडून काहीही निरोप किंवा कॉल आलेला नव्हता. शेवटी मी माझं न्यूजरूममध्ये अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायचं ठरवलं, आणि माझ्या नोट्स बघायला सुरुवात केली.
या खुन्याला कोणकोणत्या गोष्टी माहित असायला हव्यात?
डेनिस बॅबिट – १. तिला त्याआधी झालेली अटक.
२. तिची गाडी आणि त्या गाडीची ट्रंक
३. ती कुठे काम करते
४. तिची कामाची वेळ – तिचं अपहरण तिची शिफ्ट संपल्यावर झालं.
५. ती कशी दिसते – शरीर – जिराफ, पायातून उंच.
शेरॉन ओग्लेव्ही – १. तिच्या नवऱ्याने तिला दिलेली धमकी
२. त्याची गाडी आणि त्या गाडीची ट्रंक
३. ती कुठे काम करते
४. तिची कामाची वेळ – तिचं अपहरण तिची शिफ्ट संपल्यावर झालं.
५. नवऱ्याचं घर – कुठे आहे, गॅरेज, गॅरेजच्या आणि गाडीच्या चाव्या.
६. ती कशी दिसते – शरीर – जिराफ, पायांतून उंच.
या दोन्हीही याद्या तशा त्रोटक होत्या पण त्यांच्यावरचे मुद्दे खूपच सारखे होते. मला खात्री वाटत होती की या दोघी आणि त्यांचा खुनी यांना जोडणारा दुवा इथेच कुठेतरी लपलेला आहे. खुन्याला या सगळ्या गोष्टी माहित असायलाच हव्यात.
पण त्याला त्यांच्याबद्दल समजलं कसं? एक साधं सरळ उत्तर म्हणजे त्याने या दोघींनाही पाहिलं असणार. शरीरप्रदर्शन हा दोघींच्याही कामाचा एक भाग होता. जर त्याला एक विशिष्ट प्रकारचं शरीर असलेली स्त्री हवी असेल, तर त्याने या दोघींनाही त्यांच्या कार्यक्रमात पाहिलं असणार.
किंवा मग कॉम्प्युटरवर. मी माझा लॅपटॉप उघडला आणि इंटरनेट चालू केलं. डेनिस जिथे काम करायची तो ' क्लब स्नेक पिट ' आणि शेरॉन ओग्लेव्हीचा 'फाम फटाल एक्झॉटिक रेव्ह्यू' या दोघांच्याही वेबसाईट्स होत्या आणि त्यांच्यावर तिथे काम करणाऱ्या सगळ्या डान्सर्सचे फोटो होते. नुसता चेहरा दाखवणारे क्लोजअप होतेच पण पूर्ण शरीर दाखवणारेही फोटो होते. रॅशेलच्या म्हणण्यानुसार या अनसबच्या पॅराफिलियामध्ये लेग ब्रेसेसचा समावेश होता आणि पायांतून उंच असणाऱ्या मुली तो निवडत होता. या वेबसाईट्सवरून तो त्याच्या सावजाबद्दल माहिती गोळा करत असणार. एकदा त्याने तिला निवडलं की मग तो माझ्या यादीवर असलेल्या एकेक मुद्द्याची माहिती काढत असणार.
पण या दोघींनाच त्याने का निवडलं असावं? पायांतून उंच असणाऱ्या आणि निमुळते स्नायुबद्ध पाय असणाऱ्या त्या एकट्याच नव्हत्या. या दोघींमध्ये असं काय विशेष होतं? मी परत एकदा दोन्ही याद्या तपासल्या आणि मला पहिलाच मुद्दा थोडा वेगळा असल्याचं जाणवलं. डेनिसला अटक झालेली होती आणि शेरॉनला तिच्या नवऱ्याने धमकी दिलेली होती आणि तिने कोर्टातून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश मिळवला होता. याचा अर्थ दोघींचंही नाव कोर्टाच्या सिस्टिममध्ये होतं.
डेनिसला एक वर्षापूर्वी रोडिया गार्डन्सच्या बाहेर अटक झालेली होती. तिने ड्रग्ज विकत घेतली होती आणि ज्याच्याकडून घेतली होती तो नार्कोटिक्स डिपार्टमेंटचा अंडरकव्हर एजंट होता. ही माहिती तिच्या खुन्याला माहित असायलाच हवी होती, कारण म्हणूनच त्याने तिचा खून केल्यावर तिची गाडी रोडिया गार्डन्सच्या बाहेर ठेवली. त्याचा असा अंदाज असणार की ही गाडी कदाचित चोरीला जाईल पण पोलिस ती रोडिया गार्डन्सच्या बाहेरून चोरीला गेली हे शोधून काढतील. एकदा डेनिस आणि रोडिया गार्डन्सचा संबंध त्यांना समजला, की ते असाच निष्कर्ष काढणार की ती परत तिथे ड्रग्ज विकत घेण्यासाठी गेली होती. अलोन्झो विन्स्लोच्या काबुलीजबाबावरून हे असंच झालं होतं, हे मला माहित होतंच. अनसबने यशस्वीरीत्या पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकली होती.
शेरॉन ओग्लेव्हीच्या बाबतीत तिच्या घटस्फोटाबद्दल त्याला माहित असायला हवं होतं आणि ब्रायन ओग्लेव्हीने दिलेली धमकीसुद्धा की तो शेरॉनला ठार मारून तिचा मृतदेह वाळवंटात पुरेल. त्याच्यावरूनच तिचा मृतदेह ब्रायनच्या गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवायची कल्पना त्याला सुचली असणार. पोलिसांनीही ब्रायनने शेरॉनचा मृतदेह ट्रंकमध्ये ठेवण्याचं कारण त्याला तिचा मृतदेह वाळवंटात पुरायचा होता असंच कोर्टात सांगितलं होतं.
या दोन्ही केसेसमध्ये हे कायदेशीर मुद्दे खुन्याच्या हाताला लागले कारण ते कोर्टाच्या रेकॉर्ड्समध्ये होते आणि तिथून ते कोणालाही मिळू शकले असते. शेरॉन आणि ब्रायन यांच्या घटस्फोटाचे रेकॉर्ड्स सीलबंद नव्हते. तशी कुठेही नोंद नव्हती. डेनिसच्या बाबतीत तिचा गुन्हा आणि त्याबद्दल तिच्यावर प्रॉसिक्युटरने ठेवलेले आरोप ह्या गोष्टीही रेकॉर्डमध्ये होत्या.
त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर चित्र स्पष्ट झालं. एक गोष्ट मी विसरलो होतो. डेनिसला एक वर्षापूर्वी अटक झालेली होती पण तिचा खून होण्याच्या वेळेस तिच्यावरचा खटला चालू होता. तिची ही पहिलीच अटक असल्यामुळे तिच्या वकिलाने तिला प्रोबेशनवर ठेवण्यासाठी कोर्टाला विनंती केलेली होती आणि त्यासाठी डेनिसने परत कधीही ड्रग्ज घेणार नाही अशी कोर्टाला हमी दिलेली होती. त्यानुसार दर महिन्याला तिची तपासणी – मुख्यत्वे मूत्रतपासणी होत होती. जर एक पूर्ण वर्ष ती ड्रग्जपासून दूर राहिली, तर तिच्यावर ठेवलेला आरोप काढून घेण्यात येणार होता. तिचा वकील जर चांगला असेल, तर त्याने ही केस कोर्टाच्या रेकॉर्डमधूनही काढायला लावली असती.
या सगळ्या कायदेशीर किचकट गोष्टींमधून मला मी आतापर्यंत न पाहिलेला एक मुद्दा सापडला. जर तिची केस अजूनही चालू असेल, तर ती कोर्ट रेकॉर्डमध्ये येणार नाही, आणि जर ती कुठल्याही कोर्ट रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली नसेल, तर मग तिच्या खुन्याला त्याच्याबद्दल समजलं कसं?
ही माहिती तीन सूत्रांकडून मिळू शकली असती त्याला – डेनिस स्वतः, सरकारी वकील आणि डेनिसचा वकील. मी तिच्या फाईलमधून तिच्या वकिलाचं नाव शोधून काढलं आणि मग फोन केला.
“डॅली अँड मिल्समधून न्यूआना बोलतेय. मी तुमची कशाप्रकारे मदत करू शकते?”
“मला मि. टॉम फॉक्स यांच्याशी बोलता येईल का?”
“मि. फॉक्स आज कोर्टात आहेत. काही निरोप असेल तर मला सांगा. मी तो त्यांना देईन.”
“ते लंचसाठी परत येतील का?”
“ते बहुतेक वेळा तोपर्यंत परत येतात पण मी निश्चित असं सांगू शकत नाही.”
अकरा वाजले होते. अजूनही रॅशेलने फोन केलेला नव्हता. आता मला काळजी वाटायला लागली होती. मी न्यूआनाला माझं नाव आणि नंबर दिला आणि हेही सांगितलं की मी टाईम्सचा रिपोर्टर आहे आणि मला त्याच्याशी अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे.
आता काय करावं हे मला सुचत नव्हतं म्हणून मग मी टॉम फॉक्ससाठी एक मेल लिहिला. त्यात आता जे न्यूआनाशी बोललो तेच लिहिलं आणि पाठवून दिला, आणि डेनिसच्या अटकेबद्दल किंवा तिच्यावरच्या आरोपांबद्दल इंटरनेटवर काही मिळतंय का ते बघायला सुरुवात केली. एकीकडे मनात रॅशेलबद्दल विचार येतच होते. तिची सुनावणी तिथे नऊ वाजता चालू होणार होती. आत्ता इथे अकरा वाजले होते म्हणजे तिथे दुपारचे दोन. इतका वेळ ही सुनावणी चालणं शक्यच नव्हतं.
मला एक नवीन मेल आल्याचा संदेश आला आणि त्याच्या आवाजाने मी भानावर आलो. टॉम फॉक्सकडून आला होता. मी मोठ्या अपेक्षेने तो उघडला पण तो ऑटोरिप्लाय इमेल होता. याचा अर्थ फॉक्सने अजून माझा मेल पाहिलेला नव्हता. त्याच्या मेलच्या शेवटी त्याच्या लॉ फर्मचा वेब अॅड्रेस होता – www.dalyandmills.com. मी त्याच्यावर क्लिक केलं आणि फर्मची वेबसाईट उघडली. फर्मने स्वतःची जाहिरात तर मजबूत केलेली होती. सिव्हिल आणि क्रिमिनल अशा दोन्हीही प्रकारच्या केसेससाठी वेगवेगळे वकील होते. Do you have a case? म्हणून एक भाग होता. तुमची जी काही केस असेल ती तिथे थोडक्यात मांडायची होती आणि त्यावरून मग फर्ममधले कायदेतज्ञ ती केस फर्मने घेण्यालायक आहे की नाही ते ठरवणार, आणि तुम्हाला त्यांचं मत सांगणार असा प्रकार होता. त्याच्याच खाली एक ओळ होती – Site Design and Optimization by Western Data Consultants.
वेस्टर्न डेटा! अँजेलाने पाहिलेली trunkmurder आणि रॅशेलने मला सांगितलेली denslow data या दोन्हीही साईट्स वेस्टर्न डेटानेच होस्ट केल्या होत्या. हा योगायोग नव्हता. मला आलेली सगळी मरगळ त्याक्षणी निघून गेली. मी वेस्टर्न डेटाच्या लिंकवर क्लिक केलं आणि त्यांच्या होमपेजवर गेलो. त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या मेसा, अॅरिझोना इथल्या ऑफिसची संपूर्ण माहिती होती. डेटा सिक्युरिटी, डेटा स्टोरेज, होस्टिंग, वेब-बेस्ड ग्रिड सोल्युशन्स – हे शब्द मी फक्त ऐकलेले होते. त्यांचा अर्थ मला माहित नव्हता. हे सगळे या कंपनीचे व्यवसाय होते.
त्यांच्या साईटवर SEE THE BUNKER अशी एक लिंक होती. मी त्यावर क्लिक केलं आणि मला एका भूमिगत सर्व्हर फार्मबद्दल माहिती दिसली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक कोलोकेशन सेंटर होतं आणि इथे त्यांच्या प्रत्येक क्लायंटची माहिती साठवली जात होती आणि दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस ही माहिती त्यांना फक्त एका क्लिकवर मिळू शकत होती. हे हायस्पीड फायबर ऑप्टिक केबल्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांच्यामुळे शक्य होत होतं. ही सुविधाही ही कंपनीच पुरवत होती. सर्व्हर फार्मवर असलेल्या चाळीस टॉवर्सचा फोटोही होता. फार्म उत्तम प्रतीच्या काँक्रीटपासून बनवलेला होता आणि जमिनीखाली वीस फूट एवढ्या खोलीवर होता.
माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयता या मुद्द्यांवर वेबसाईटने प्रचंड भर दिलेला होता. तुम्ही सांगितल्याशिवाय इथे आलेली कुठलीही गोष्ट बाहेर जाऊ शकत नाही – WHAT COMES IN DOESN’T GO OUT UNLESS YOU ASK FOR IT – अशी त्यांची टॅगलाईन होती. तुमची कंपनी देशात कुठेही असो आणि तिचा व्यवसाय कितीही छोट्या किंवा मोठ्या प्रमाणावर असो – तुम्ही तुमच्या कंपनीच्या कॉम्प्युटरवर जे काही टाईप कराल, ते सगळं ताबडतोब रेकॉर्ड होईल आणि वेस्टर्न डेटाच्या सर्व्हर फार्मवर साठवून ठेवलं जाईल.
मी स्किफिनोने मला दिलेल्या फाईलमधून शेरॉन आणि ब्रायन या दोघांच्या घटस्फोटाच्या प्रकरणात ज्या वकिलाने काम पाहिलं होतं, त्याचं नाव आणि नंबर शोधला. हा परस्परसहमतीने झालेला घटस्फोट नव्हता त्यामुळे दोघांचेही वकील वेगवेगळे होते. ब्रायनच्या वकिलाची वेबसाईट नव्हती पण शेरॉनच्या वकिलाचं नाव सर्च इंजिनमध्ये घातल्यावर मला पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट या तीनही गोष्टी मिळाल्या. या लॉ फर्मचं नाव होतं ऑल्मंड, ब्रॅडशॉ अँड वॉर्ड. त्यांच्या वेबसाईटवरही डॅली अँड मिल्सच्या वेबसाईटप्रमाणे वेस्टर्न डेटाचं नाव होतं. या दोन्ही फर्म्सच्या वेबसाईट्स वेस्टर्न डेटाने पुरवलेल्या सर्व्हरवर होस्ट होत होत्या पण अजूनही मला हे माहित नव्हतं की त्यांची गोपनीय माहितीही वेस्टर्न डेटाकडे साठवली जात होती किंवा नाही.
पण अर्थातच ही माहिती त्यांनी मला सहजासहजी पुरवली नसती. मी थोडा वेळ विचार करून एक प्लॅन ठरवला आणि ऑल्मंड, ब्रॅडशॉ अँड वॉर्डच्या ऑफिसला फोन केला.
“ऑल्मंड, ब्रॅडशॉ अँड वॉर्ड. मे आय हेल्प यू?”
“जरूर. मी तुमच्या मॅनेजिंग पार्टनरशी बोलू शकतो का?”
तिने मला त्याच्या ऑफिसचा नंबर जोडून दिला. मी मनातल्या मनात मला जे बोलायचं होतं त्याची उजळणी केली.
“काय हवं आहे तुम्हाला?” समोरून थोड्याशा तुटक स्वरात विचारणा झाली.
“मी जॅक मॅकअॅव्हॉय बोलतोय. मी विल्यम स्किफिनो अँड असोसिएट्ससाठी काम करतो. आम्ही आमच्या फर्मची वेबसाईट आणि डेटा स्टोरेज सिस्टिम बनवण्याच्या विचारात आहोत. मी वेस्टर्न डेटा म्हणून एक अॅरिझोनामधली कंपनी आहे, त्यांच्याशी या संदर्भात बोलणी करतोय आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही, म्हणजे ऑल्मंड, ब्रॅडशॉ अँड वॉर्ड त्यांचे क्लायंट आहात. मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे, ते जरा जाणून घ्यायचं होतं.”
“त्याच्यासाठी तुम्हाला मि.रिचर्ड केनी यांच्याशी बोलायला लागेल. पण ते आत्ता कोर्टात असतील.”
“ओके. त्यांच्याशिवाय कुणा दुसऱ्या पार्टनरशी मी बोलू शकतो का? कारण आज यावर निर्णय घ्यायची इच्छा आहे माझी.”
“आय अॅम सॉरी, पण तुम्हाला त्यांच्याशीच बोलायला लागेल कारण आमची वेबसाईट आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी तेच पाहतात..”
“अच्छा. पण मग तुम्ही वेस्टर्न डेटाच्या कोलोकेशन सेवा पण वापरता, का फक्त तुमची वेबसाईट त्यांच्या सर्व्हरवर होस्ट होते?
“आम्ही त्यांच्या कोलोकेशन सेवा वापरतो, पण त्याबद्दल जास्त माहिती तुम्हाला मि.केनीच देऊ शकतील.”
“हरकत नाही. मी नंतर त्यांना फोन करेन.”
परत फोन करायची गरज नव्हती . मला जे पाहिजे ते त्यांच्याकडून मिळालं होतं. मी लगेचच डॅली अँड मिल्समध्ये फोन लावला आणि हेच प्रश्न परत विचारले. त्यांच्याकडूनही तीच माहिती मिळाली.
आता मी प्रचंड उत्तेजित झालो होतो. डेनिस आणि शेरॉन एकमेकींना कदाचित भेटल्या असतील किंवा नसतील. पण हा खुनी त्यांच्या संपर्कात कुठे आणि कसा आला, ते मला आता समजलं होतं. दोघींनीही लॉ फर्म्सकडून कायदेविषयक सेवा घेतल्या होत्या, आणि या दोन्हीही लॉ फर्म्स त्यांची संपूर्ण माहिती मेसा, अॅरिझोना इथे असलेल्या वेस्टर्न डेटा कन्सल्टंट्सच्या सर्व्हर्सवर ठेवत होत्या. एवढंच नाही, तर अँजेलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली trunkmurder.com ही साईटसुद्धा त्यांच्याच सर्व्हरवर होती. हा नक्कीच योगायोग नव्हता.
माझ्या डोक्यात आता एक वेगळाच प्लॅन आकार घेत होता. मी माझा लॅपटॉप आणि नोट्स परत माझ्या बॅकपॅकमध्ये ठेवल्या आणि गाडी एअरपोर्टच्या दिशेने घेतली. तिथे जात असतानाच मी एल.ए.हून फिनिक्ससाठी एक फ्लाईट बुक केली. ती दुपारी एक वाजता होती, आणि दोन वाजता फिनिक्सला पोचणार होती. नंतर मी फिनिक्सला फोन करून एक गाडी भाड्याने घेतली आणि आता पुढचे दोन तास काय करावं याचा विचार करत असताना माझा फोन वाजला. कॉलर आयडीवर नंबर आलेला नव्हता. मी फोन उचलला. माझ्या अपेक्षेप्रमाणे रॅशेलचाच होता.
“मी बोलतेय जॅक!”
“केवढा वेळ लावलास तू! कुठे आहेस तू आत्ता?”
“एअरपोर्टवर. मी परत येतेय.”
“एक काम कर. तुझी फ्लाईट बदल. एल.ए.ऐवजी फिनिक्सची फ्लाईट घे आणि मला तिथे भेट.”
“काय?”
“तुला आठवतंय, तू मला सांगितलं होतंस की शेरॉन ओग्लेव्ही आणि डेनिस बॅबिट यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे, आणि त्यावरून आपल्याला या खुन्याचा माग काढता येईल?”
“हो, पण त्याचं काय?”
“मला तो संबंध सापडलाय. वेस्टर्न डेटा. म्हणूनच मी फिनिक्सला चाललोय.”
“एक मिनिट जॅक. कशाबद्दल बोलतोयस तू?”
“तू येशील आणि मला भेटशील तेव्हा मी तुला सांगेन. बोल, येणार आहेस की नाहीस?”
समोरून बराच वेळ काहीच प्रतिसाद आला नाही.
“रॅशेल...”
“मी येतेय जॅक!”
“व्हेरी गुड! मी कार घेतलेली आहे. फिनिक्सला आपण उतरलो, की एअरपोर्टवरच मिळेल आपल्याला. तुझी फ्लाईट बदलून झाली की मला तुझ्या येण्याची वेळ कळव. मी तुला घ्यायला येतो.”
“ठीक आहे.”
“अच्छा, ओपीआर सुनावणी कशी झाली?बराच वेळ चालली!”
पुन्हा ती गप्प झाली. मला पार्श्वभूमीवर एअरपोर्टवरचे आवाज ऐकू येत होते.
“रॅशेल, काय झालं?”
“मी राजीनामा दिलाय जॅक. मी आता एफ.बी.आय. एजंट नाहीये!”
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
23 Aug 2015 - 7:12 pm | राघवेंद्र
पुढील विकांताच्या प्रतीक्षेत
23 Aug 2015 - 7:56 pm | पैसा
अजून गुंतागुंत!
23 Aug 2015 - 8:10 pm | अद्द्या
मी आता एफ.बी.आय. एजंट नाहीये!
गुंत्यात गुंते
मस्तच
पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत
23 Aug 2015 - 8:19 pm | अजया
जबरदस्त!
23 Aug 2015 - 8:23 pm | प्रचेतस
निव्वळ भन्नाट....!!!
23 Aug 2015 - 9:09 pm | मोहन
ग्रेट ! आता २१ वा येवू द्या हो लवकर. उगाच झोप उडवताय :-)
23 Aug 2015 - 9:57 pm | एस
एक क्लू मिळाला तर! बघूयात खुनी यांना दाद देतोय का ते. आणि आता रॅशेलही एफबीआयमध्ये नाहीये.
23 Aug 2015 - 10:29 pm | सामान्य वाचक
..
24 Aug 2015 - 8:58 am | फोटोग्राफर243
काय चालली आहे ही कथा, परवा मी पहिला भाग वाचला, नंतर चे सगळे लगोलग वाचले, आता पुढील भागा च्या प्रतीक्षेत!!!
24 Aug 2015 - 3:09 pm | मास्टरमाईन्ड
पुभाप्र.
24 Aug 2015 - 3:47 pm | santosh mahajan
मला वाटतय पुढचाभाग शेवटचा आसावा. पुभालटा
24 Aug 2015 - 4:11 pm | मोहनराव
पुभाप्र.
24 Aug 2015 - 4:33 pm | सुचेता
वेगवान. कथानक
24 Aug 2015 - 5:19 pm | जगप्रवासी
थरारक भाग
24 Aug 2015 - 11:52 pm | इनिगोय
बापरे. जालावर माहिती देताना किती आणि कसली म्हणून काळजी घ्यायची!
25 Aug 2015 - 10:32 am | नाखु
सुट्टीनंतर वाचले सगळे भाग ( १६ ते २०) आणि भुस्काट पडलं डोक्याचं!!!
जबहरावाचक्पंखासंघ
28 Dec 2015 - 6:50 pm | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग २१
28 Dec 2015 - 6:53 pm | अभ्या..
अहो भागवत.
सुपारी किलरसारखे आमच्या बोकेशांच्या काय मागे लागला आहात?
तुमचे तुम्ही वाचून हौस का नाही भागवत?
28 Dec 2015 - 8:06 pm | शाम भागवत
लेखमाला नव्यानेच वाचणार्यासाठी पुढच्या भागाची लिंक शेवटी चिकवटतोय.
15 Feb 2017 - 12:27 pm | हकु
फायदा होतोय