द स्केअरक्रो भाग १८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
पहाट जवळपास संपत आली होती. आता कधीही उजाडलं असतं. कार्व्हरला दूरवरच्या पर्वतांच्या शिखारांमागचं आभाळ हळूहळू गुलाबी होताना दिसत होतं. तो एका मोठ्या दगडावर बसला होता, आणि समोर काम करणाऱ्या स्टोनकडे पाहात होता. तो खड्डा खोदत होता. भुसभुशीत माती संपून आता कठीण मुरूम लागला होता. त्यामुळे स्टोनला खणणं कठीण जात होतं. त्या दगडावर त्याच्या कुदळीचा आवाज येत होता.
“फ्रेडी,” कार्व्हर शांतपणे म्हणाला, “मला परत एकदा सांग.”
“मी तुला दोनदा सांगितलंय.”
“मग तिसऱ्यांदा सांग. मला ऐकायचंय. तू काय बोललास त्याचा अगदी शब्दन् शब्द मला कळायला हवा, म्हणजे मग तू आपलं किती नुकसान केलं आहेस, ते मला समजू शकेल.”
“काहीही नुकसान झालेलं नाहीये आपलं.”
“मला परत एकदा सांग.”
स्टोनने रागाने कुदळ फेकली. त्याचा त्या मुरुमावर आपटून जोरात आवाज झाला. कार्व्हरला इथे त्यांच्याशिवाय कोणीही नाही याची खात्री होती पण तरीही त्याने आजूबाजूला पाहिलं. पश्चिमेला दूरवर मेसा आणि स्कॉट्सडेलचे दिवे एखाद्या वणव्यासारखे झगमगत होते. कार्व्हरने त्याचा हात कंबरेपाशी नेला. गन अजूनही तिथे होती. त्याचा हात तिच्या मुठीभोवती त्याने एकदा घट्ट आवळला. मग शांतपणे जरा विचार केला, आणि थांबायचं ठरवलं. फ्रेडीचा अजूनही उपयोग होऊ शकला असता. पण त्याला एकदा धडा शिकवणं गरजेचं होतं.
“मला परत एकदा सांग. हे मी शेवटचं विचारतोय तुला.”
“मी त्याला म्हणालो की तो सुदैवी आहे, ओके?” स्टोन निरुपायाने म्हणाला, “ एवढंच बोललो मी त्याला. आणि शिवाय मला त्या त्याच्या हॉटेलच्या खोलीत आलेली ती xx कोण होती तेही जाणून घ्यायचं होतं. तिनेच आपल्या सगळ्या प्लॅनची xx केली.”
“अजून काय?”
“एवढंच. मी त्याला हेही म्हणालो की कधीतरी एका दिवशी मी त्याची गन त्याला परत करेन. त्याच्या समोर जाऊन.”
कार्व्हर जरा विचारात पडला. आत्तापर्यंत तरी स्टोनने तिन्ही वेळा तीच गोष्ट सांगितली होती.
“अच्छा! आणि तो काय म्हणाला मग यावर?”
“तेही मी सांगितलं तुला. तो फार काही बोलला नाही. मला असं वाटतंय की त्याची पाचावर धारण बसलेली आहे.”
“माझा तुझ्यावर विश्वास नाहीये फ्रेडी!”
“पण का – आणि हो. त्याने अजून एक गोष्ट सांगितली.”
कार्व्हर महत्प्रयासाने शांत राहण्याचा प्रयत्न करत होता, “काय?”
“त्याला आपल्याबद्दल माहित आहे.”
“काय माहित आहे त्याला?”
“आयर्न मेडन.”
कार्व्हरने प्रयत्नपूर्वक आवाज निर्विकार ठेवला, “त्याला कसं माहित? तू सांगितलंस त्याला?”
“नाही. मी त्याला अजिबात काहीही सांगितलेलं नाही. त्याला कसं कोण जाणे पण त्याबद्दल माहित होतं.”
“काय माहित होतं त्याला?”
“तो असं म्हणाला की तो आपल्याला....”
“आपल्याला? आपण दोघे आहोत हे त्याला माहित आहे?”
“नाही, नाही. अजिबात नाही. मला...मला तसं म्हणायचं नव्हतं,” स्टोनने कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली, “ तो या शब्दांत काहीच नाही म्हणाला. त्याला त्याबद्दल काहीच माहित नाहीये. तो असं म्हणाला की माझ्यासाठी तो पेपरात हे नाव वापरणार आहे, कारण मी एकटाच हे सगळं करतोय असं त्याला वाटतंय. मला वाटतं हे तो मला मुद्दामहून भडकवण्यासाठी करत असावा.”
कार्व्हर परत एकदा विचारात पडला. मॅकअॅव्हॉयला जेवढं माहित असायला हवं होतं त्यापेक्षा नक्कीच जास्त माहित होतं. याचा अर्थ त्याला कोणीतरी हे सांगितलं होतं. ही अशी माहिती असायला त्या माणसाकडे नुसती माहिती असून चालणार नाही, तर त्याच्याकडे विषयाचं ज्ञान आणि तर्कशक्ती पाहिजे. कार्व्हर त्या खोलीत अचानक आलेल्या त्या स्त्रीविषयी विचार करत होता. ती कोण असावी याबद्दल त्याच्या मनात एक अंदाज होता आणि तो ९९% बरोबर आहे, याबद्दल त्याची खात्री होती.
“हा पुरेसा खोल खड्डा आहे का?” स्टोनने विचारलेल्या प्रश्नामुळे कार्व्हर त्याच्या तंद्रीतून बाहेर आला, त्या खडकावरून उठला आणि त्याने टॉर्चच्या प्रकाशात खड्डा पाहिला.
“ठीक आहे. एवढ पुरेसं आहे. त्या कुत्रीला पहिले आत ठेव.”
फ्रेडी त्या छोट्या कुत्रीचा मृतदेह उचलायला वाकल्यावर कार्व्हरने खड्ड्याकडे पाठ केली.
“तिला खड्ड्यात ठेवताना हळूच ठेव फ्रेडी.”
त्याला तिला मारायचं नव्हतं. तिने काहीही चूक केलेली नव्हती. ती फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या वेळी होती.
“बरं.” फ्रेडी म्हणाला. त्याने तिचा मृतदेह खड्ड्यात ठेवला आणि त्यावर थोडी आसपासची माती लोटली. कार्व्हर वळला.
“आता आपल्या बॉसची पाळी.”
मॅकगिनिसचा मृतदेह खड्ड्याच्या एका टोकाला जमिनीवर ठेवलेला होता. स्टोनने खड्ड्यात उतरून त्याचे पाय धरून त्याला खेचायला सुरुवात केली. दुसऱ्या टोकाला खड्ड्याच्या एका भिंतीला टेकून कुदळ ठेवली होती. कार्व्हरने तिथे जाऊन ती उचलली. दरम्यान स्टोनने मॅकगिनिसचा मृतदेह पूर्णपणे खड्ड्यात आणला होता. मॅकगिनिसचे खांदे आणि डोकं खड्ड्याच्या भिंतींना घसपटत खड्ड्यात आदळले. स्टोनने अजूनही मॅकगिनिसचे पाय हातांत पकडून ठेवले होते. कार्व्हरने कुदळ जोरात फिरवली आणि तिच्या बोथट भागाने फ्रेडी स्टोनच्या दोन खांद्याच्या मध्ये एक जोरदार प्रहार केला.
फ्रेडीच्या नाकातोंडातून जोरात हवा बाहेर पडली, आणि तो खड्ड्यात सपशेल पालथा पडला. त्याचा चेहरा मॅकगिनिसच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला होता. कार्व्हरने खड्ड्यात उडी मारली आणि त्याच्या मानेच्या अगदी जवळ कुदळीचं अणकुचीदार टोक टेकवलं.
“नीट बघ फ्रेडी,” तो थंड आवाजात म्हणाला, “मी तुला हा खड्डा तीन फूट खोल खणायला सांगितला कारण या दोघांच्यावर मला तुला पुरायचं होतं.”
“प..प्लीज!
“तू नियम तोडलेस फ्रेडी. मी तुला सांगितलं नव्हतं की मॅकअॅव्हॉयला फोन कर. पण तू केलास. मी तुला हेही सांगितलं नव्हतं की त्याच्याबरोबर असलेली ती मुलगी कोण होती ते शोधून काढ. मी तुला फक्त माझ्या आज्ञा पाळायला सांगितलं होतं.”
“हो. मला..मला माहित आहे. मला माहित आहे. माझी चूक झाली. परत..परत असं होणार नाही. प्लीज...”
“मी आत्ता या क्षणी तू असं परत करण्याच्या अवस्थेत राहणार नाहीस याची व्यवस्था करू शकतो फ्रेडी.”
“नाही. मी याची भरपाई करीन. मी पुन्हा...”
“गप्प बस.”
“ओके पण मी....”
“तोंड बंद ठेव आणि मी काय बोलतोय ते ऐक.”
“ओके...”
“तू ऐकतोयस का मी काय म्हणतोय ते?”
स्टोनने न बोलता फक्त मान हलवली. त्याचा चेहरा मॅकगिनिसच्या निष्प्राण डोळ्यांच्या अगदी जवळ होता.
“मी जेव्हा तुला शोधून काढलं तेव्हा तू कुठे होतास आणि काय करत होतास ते तुला आठवतंय का?”
स्टोनने मान डोलावली.
“तू नरकात खितपत पडला असतास पण मी तुला त्यापासून वाचवलं. तुला नवीन नाव आणि नवीन आयुष्य दिलं. तू ज्या गटारात होतास तिथून दूर जाण्याची तुला संधी दिली आणि तुला माझ्यासोबत घेतलं कारण आपल्या काही आवडीनिवडी सारख्या आहेत. मी तुला शिकवलं आणि बदल्यात फक्त एक गोष्ट मागितली. तुला आठवतंय काय ते?”
“तू म्हणाला होतास की आपण भागीदार आहोत पण आपली कधीच बरोबरी होऊ शकत नाही. मी विद्यार्थी आहे आणि तू माझा शिक्षक आहेस. तू जे सांगशील ते आणि तेच मी करायला पाहिजे.”
कार्व्हरने कुदळीचं टोक स्टोनच्या मानेत थोडं अजून खोलवर खुपसलं. स्टोनच्या मानेवरून रक्ताचा एक बारीक ओघळ वाहायला लागला.
“आणि तरीही आपण आता या अशा परिस्थितीत आहोत फ्रेडी. माझा अपेक्षाभंग झालाय.”
“मी परत असं होऊ देणार नाही. प्लीज.”
कार्व्हरने आकाशाकडे पाहिलं. क्षितिजावर दिसणारा गुलाबी रंग आता हळूहळू नारिंगी व्हायला सुरुवात झाली होती. काम संपवायला हवं होतं.
“चुकतोयस तू फ्रेडी. मी आता अशी गोष्ट परत होऊ देणार नाही.”
“मला अजून एक, फक्त एकच संधी दे. मी या सगळ्याची भरपाई करेन.”
“बघू. सध्या तरी या दोघांना पुरण्याचं काम कर. आणि जरा घाई कर. सूर्योदयाच्या आधी निघायला पाहिजे आपल्याला इथून.”
कार्व्हर खड्ड्याच्या बाहेर आला. त्याने वळून स्टोनकडे पाहिलं. तो त्याच्याचकडे पाहात होता. त्याच्या नजरेत भीती होती. कार्व्हरला पाहिजे तशी. कार्व्हरने कुदळ पुढे केली. त्याने कसंबसं उठत ती घेतली.
कार्व्हरने पाठीमागे हात नेऊन गन बाहेर काढली. स्टोनचे डोळे विस्फारले. पण कार्व्हरला त्याच्यातल्या गोळ्या काढताना बघून तो शांत झाला. कार्व्हरने खिशातून एक हातरुमाल काढला आणि गनवर असलेले सगळे बोटांचे ठसे मिटवून टाकायला सुरुवात केली, आणि मग गन खड्ड्यात फेकून दिली. ती मॅकगिनिसच्या पायांपाशी पडली.
“तू जॅक मॅकअॅव्हॉयला त्याची गन परत करणार असं म्हणालेलास ना? वेल्, आपण तसं काहीही करणार नाही आहोत.”
“जसं तू म्हणशील तसं.”
“अर्थात!” कार्व्हर म्हणाला, “चल, लवकर त्या दोघांना पुरून टाक.”
#################################################################################
स्टोन त्याला हव्या असलेल्या गोष्टी एका मोठ्या प्लास्टिक पिशवीमध्ये भरत होता आणि कार्व्हर कॉम्प्युटरवर काम करत होता. त्याला हवी असलेली स्टोरी आणि फोटो जेव्हा पडद्यावर आले, तेव्हा तो थांबला आणि त्याने स्टोनकडे पाहिलं. त्याच्या हालचाली अगदी सावकाश होत होत्या. बहुधा अजूनही त्याचे खांदे दुखत होते.
“माझा अंदाज बरोबर होता. ती एल.ए. मध्येच आहे,” कार्व्हर म्हणाला.
स्टोनने त्याच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि तो कॉम्प्युटरपाशी आला. त्याने पडद्याकडे पाहिलं. कार्व्हरने फोटोवर क्लिक करून त्याचा आकार मोठा केला.
“हीच होती का त्या हॉटेलच्या खोलीत?”
“मला तिच्याकडे बघायला वेळच मिळाला नाही. तिचा चेहरा नीट दिसला पण नाही मला. ती एका खुर्चीत बसली होती आणि मी ज्या बाजूने त्या खोलीपाशी आलो, त्या बाजूने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता.”
“पण मला वाटतंय की हीच आहे. तिने आणि जॅकने आधीही एकत्र काम केलेलं आहे. रॅशेल आणि जॅक!”
“एक मिनिट! रॅशेल?”
“हो. एफ.बी.आय.स्पेशल एजंट रॅशेल वॉलिंग.”
“मला वाटतं, त्यानेही हेच नाव घेतलं होतं.”
“कोणी?”
“मॅकअॅव्हॉय. त्याने दरवाजा उघडला आणि तो आत गेला. त्यावेळी मी त्याच्या मागून चाललो होतो. मी तिचा आवाज ऐकला. ती म्हणाली, ‘हॅलो जॅक!’ आणि नंतर तो पण काहीतरी बोलला. त्याने तिचं नाव घेतलं. ‘रॅशेल, तू इथे काय करते आहेस?’ असं काहीतरी तो बोलला.”
“नक्की? याच्याआधी तू तिच्या नावाबद्दल काहीच बोलला नाहीस.”
“हो, पण तू आत्ता तिचं नाव घेतल्यावर मला आठवलं. माझी खात्री आहे तिचं नाव रॅशेल होतं.”
कार्व्हर हे ऐकून प्रचंड उत्तेजित झाला होता. जॅक आणि रॅशेल. याच दोघांनी बारा वर्षांपूर्वी पोएटचा सफाया केला होता. ते आता त्याच्या मागावर होते. आता मजा येईल.
“ही स्टोरी कशाबद्दल आहे?” स्टोनच्या प्रश्नाने कार्व्हर भानावर आला.
“तिच्याबद्दलच आहे. हा एक बॅगमन असं टोपणनाव असलेला सीरियल किलर होता. तो स्त्रियांचे खून करून, त्यांचे तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून वेगवेगळ्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये फेकून द्यायचा. तिने आणि एल.ए.पी.डी.च्या एका डिटेक्टिव्हने त्याला एको पार्कमधल्या एका इमारतीत झालेल्या झुंजीमध्ये ठार केलं. त्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स झाली, तिथे काढलेला हा फोटो आहे.”
स्टोन तिच्या फोटोकडे लक्षपूर्वक बघत होता.
“आवर तुझं सगळं सामान फ्रेडी.”
स्टोन जागचा हलला नाही.
“मग आता काय करणार आहोत आपण? तिच्या मागावर जाणार आहोत?”
“नाही. आपण फक्त शांत बसायचंय आणि वाट पहायचीय.”
“कुणाची?”
“हिची. ती आपल्यामागे येईल आणि जेव्हा ती येईल, तेव्हा ती आपली असेल!”
कार्व्हर मुद्दामहून थांबला. हे पाहायला की स्टोन यावर काही टिप्पणी करतोय किंवा काही सूचना देतोय. पण स्टोन काहीच बोलला नाही. पहाटे शिकलेला धडा त्याच्या व्यवस्थित लक्षात होता बहुतेक.
“तुझी पाठ आणि खांदे अजूनही दुखताहेत का?”
“थोडेफार. पण ठीक आहे आता.”
“नक्की?”
“हो.”
“ओके.”
कार्व्हरने कॉम्प्युटर बंद केला आणि तो उभा राहिला. त्याने कॉम्प्युटरच्या मागे हात घालून कीबोर्डची वायर काढली. लोक जेव्हा कीबोर्ड वापरतात, तेव्हा त्यांच्या बोटांच्या त्वचेचे अतिसूक्ष्म कण कीबोर्डवर राहतात आणि त्यावरून पोलिसांना डी.एन.ए. मिळू शकतो, हे कार्व्हरला माहित होतं. तो धोका त्याला पत्करायचा नव्हता. हा कीबोर्ड मागे ठेवणं म्हणजे मूर्खपणा होता.
“तुझं आवरलं की आपण इथल्या एका स्पामध्ये जाऊ आणि तुझ्यासाठी चांगला मसाज करणारी कोणीतरी बघू.”
“मला मसाजची गरज नाहीये. मी ठीक आहे.”
“तुझ्या हालचाली सावकाश होताहेत. तुला त्रास होतोय हे दिसतंय. जेव्हा एजंट वॉलिंगशी आपला सामना होईल तेव्हा तू एकदम फिट हवा आहेस मला!”
“काळजी करू नकोस. मी तिला भेटायला तयार आहे.”
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
16 Aug 2015 - 12:36 am | मास्टरमाईन्ड
मस्तच.
;) मी पैला.
16 Aug 2015 - 1:36 am | पद्मावति
जबरदस्त, नेहमीप्रमाणेच.
वाचतेय.
16 Aug 2015 - 8:42 am | एस
फारच थंड डोक्याचा, पण आतून भयंकर असुरक्षित.
16 Aug 2015 - 5:28 pm | अजया
वाचतेय!
16 Aug 2015 - 6:20 pm | santosh mahajan
भय ईथले संपत नाही .
17 Aug 2015 - 2:22 am | वॉल्टर व्हाईट
धन्यवाद, हाही भाग उत्तम झालाय.
17 Aug 2015 - 5:19 pm | झकासराव
उच्च !!!!!!!!
17 Aug 2015 - 6:06 pm | कपिलमुनी
कधी मारला ह्याला ?
21 Aug 2015 - 7:42 pm | पीशिम्पी
पुढचा भाग कधी??
21 Aug 2015 - 8:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वाचतोय वाचतोय. बोकोपंत पुढिल भाग लौकर टाका. :)
21 Aug 2015 - 8:58 pm | जुइ
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
22 Aug 2015 - 12:41 am | रातराणी
खूप दिवसांपासून बेकलोगमध्ये होती. काल वाचायला घेतली आणि अधाशासारखे सगळे भाग वाचून काढले. कुठेही आपण अनुवाद वाचतोय असे जाणवत नाही. कादंबरीच वाचत असल्याचा फील येतोय. भयंकर आवडली आहे! पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
:)
28 Dec 2015 - 2:41 pm | शाम भागवत
द स्केअरक्रो भाग १९