द स्केअरक्रो भाग १३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
अँजेलाला तिथे बघून मला एवढा धक्का बसला की मी प्रतिक्षिप्त क्रियेने मागे झालो आणि माझी पाठ जोराने जवळच्या कपाटाला आदळली. त्याच्यावर एक जुन्या पद्धतीचा, लँपशेड असलेला दिवा ठेवलेला होता. तो खाली पडला आणि फुटला. रॅशेल ओरडली, “ काय झालं जॅक?”
मी कसंबसं पलंगाकडे बोट दाखवलं, “अँजेला...ती...ती पलंगाखाली आहे.”
रॅशेल माझ्या बाजूला आली आणि तिनेही पलंगाखाली वाकून पाहिलं, “ओ माय गॉड! नेमकं इथेच आपण दोघांनीही पाहिलं नाही!”
ती तिथून उठली आणि तिने दुसऱ्या बाजूला जाऊन पलंगाखाली पाहिलं. नंतर ती माझ्या बाजूला आली आणि तिने पलंगाखाली परत एकदा वाकून पाहिलं.
“असं दिसतंय की तिचा मृत्यू होऊन २४ तास उलटून गेलेले आहेत. प्लास्टिक पिशवीने तिला घुसमटवण्यात आलेलं आहे. तिचं शरीर पूर्णपणे विवस्त्र आहे आणि प्लास्टिकच्याच एका मोठ्या पिशवीत ठेवलेलं आहे. कदाचित त्याला तिला कुठेतरी हलवायचं असावं किंवा मग मृत्युनंतर जी शरीर कुजण्याची प्रक्रिया सुरु होते ती उशिरा सुरु व्हावी म्हणूनही हे केलेलं असू शकतं.”
“रॅशेल, प्लीज! मी तिला ओळखत होतो. तू हे विश्लेषण नंतर नाही का करू शकत?”
“सॉरी जॅक! तिच्याबद्दलही आणि तुझ्याबद्दलही.”
“ तुला सांगता येतंय का की त्याने तिच्यावर काही....”
“ नाही. पण आपल्याला पोलिसांना बोलवायला लागेल. आत्ता. या क्षणी.”
“बरोबर!”
“ आणि आपण त्यांना काय सांगणार आहोत तेही मी सांगते तुला. मी तुला नेवाडामधून इथे घेऊन आले, आपण सगळं घर शोधलं आणि तेव्हा ती आपल्याला सापडली. बाकीचे सगळं आपण सोडून देऊ, ओके?”
“ठीक आहे. तू जे म्हणशील ते!”
ती उठून उभी राहिली आणि त्याक्षणी मला जाणवलं की जेमते दहा मिनिटांपूर्वी माझ्या मिठीत असणारी स्त्री अदृश्य झाली होती आणि एक एफ.बी.आय.एजंट तिथे उभी होती. मला तिने कचऱ्याचा डबा आणायला सांगितला आणि पलंगावर आम्ही झोपल्याचा प्रत्येक पुरावा – तिचे आणि माझे केस इत्यादी – उचलायला आणि त्याच्यात टाकायला सुरुवात केली. आम्ही पोलिसांना बोलावल्यावर इथे फोरेन्सिकचे लोक आले असतेच. त्यांच्या हातात त्यातलं काहीही पडावं अशी तिची इच्छा नव्हती. मी मात्र हा सगळा ताण असह्य होऊन खाली, जमिनीवर बसलो. मला तिथून अँजेलाचा चेहरा दिसत होता.
हळूहळू काय घडलंय त्याचं भान मला यायला लागलं. माझी आणि अँजेलाची अगदी जुजबी ओळख होती आणि जी काही होती ती कामाच्या निमित्ताने होती. ती माझी जागा घेणार होती. त्यामुळे तिच्याबद्दल माझ्या मनात अगदीच राग जरी नसला तरी एक अढी होती. पण काहीही असलं तरी तिला एवढ्या तरुण वयात आणि अशा प्रकारे मरण यायला नको होतं. मी क्राईम रिपोर्टर असल्यामुळे मृतदेह पाहणे, अगदी वाईट अवस्थेतले – हा कामाचा भाग होता. मी अगदी माझ्या सख्ख्या भावाच्या मृत्युबद्दलही लिहिलं होतं. पण तिला तशा अवस्थेत पाहून मी संपूर्णपणे ढवळून निघालो. इतके मृतदेह पाहूनही असं कधीच वाटलं नव्हतं.
तिच्या चेहऱ्याभोवती प्लास्टिकची पिशवी होती , आणि डोकं थोडं मागे झुकलं होतं. म्हणजे जर ती उभी असती तर तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं असतं. तिचे डोळे उघडेच होते आणि पलंगाखालच्या अंधारातून ते चमकत असल्यासारखे दिसत होते.. डोळ्यांमध्ये एकच भावना होती – भीती. ती त्या अंधारात हळूहळू अदृश्य होत असल्यासारखी दिसत होती, जणू कोणीतरी जबरदस्त ताकद तिला ओढून नेतेय आणि ती नाहीश्या होत असलेल्या प्रकाशाकडे बघतेय. तिचं तोंड थोडं उघडं होतं. बहुतेक त्या क्षणी तिने आपला जीव वाचवण्याची प्राणांतिक धडपड केली असावी. तिच्याकडे नुसतं बघण्याने मी एखाद्या पवित्र गोष्टीला भ्रष्ट करत असल्याचा विचार माझ्या मनात आला.
“हे नाही चालणार,” रॅशेलच्या आवाजाने मी भानावर आलो, “आपल्याला चादर आणि या उशापण काढाव्या लागतील इथून.”
तिने पलंगावरची चादर खेचून काढली आणि ती आणि उशा यांचा एक मोठा गोळा बनवला.
“आपण त्यांना खरं सांगितलं तर, की आम्हाला अँजेलाचा मृतदेह जेव्हा सापडला त्याच्या आधी आम्ही.....”
“जरा विचार कर जॅक. मी जर असं काही घडलंय हे पोलिसांना सांगितलं तर पुढची दहा वर्षे याच्यावर सगळीकडे गॉसिप होत राहील. तेवढंच नाही, माझी नोकरी जाईल. मला तसं व्हावं अशी अजिबात इच्छा नाहीये. आपण असंच करू या. त्यांना निष्कर्ष काढू दे की खुन्यानेच चादर आणि उशा यांचं काहीतरी केलं.”
“ पण जर या खुन्याचा डी.एन.ए. त्या चादरीवर असला तर?”
“मला नाही वाटत. इतके काळजीपूर्वक खून करणाऱ्या माणसाच्या हातून अशी चूक होण्याची शक्यता फारच कमी आहे. याआधीही त्याने स्वतःविरुद्ध कुठलाही पुरावा सोडलेला नाहीये. आणि जर तू म्हणतो आहेस तसा काही पुरावा या चादरीवर असता तर या खुन्याने तो बरोबर नेला असता. आणि मला असंही वाटत नाहीये की तिचा खून इथे, तुझ्या घरात झालाय. त्याने फक्त तिचा मृतदेह इथे आणून टाकला – तुला तो सापडावा, या हेतूने.”
हे तिने इतकं निर्विकारपणे सांगितलं की मी तिच्या तोंडाकडे बघत राहिलो. बहुतेक तिच्यावर कशाचाच परिणाम होत नव्हता.
“कम ऑन जॅक! मला मदत कर जरा.”
ती तो चादरीचा गोळा घेऊन बेडरूममधून बाहेर गेली. मी हळूहळू उठलो. माझा मोजा एका खुर्चीच्या पाठी पडला होता, तो उचलला आणि हॉलमध्ये आलो. एक-दोन मिनिटांनी मागचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला आणि रॅशेल आत आली. तिने तो गोळा तिच्या गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवला असावा.
तिने तिचा फोन तिच्या जॅकेटच्या खिशातून बाहेर काढला. पण फोन करण्याआधी तिच्या डोक्यात काहीतरी विचार आला असावा. तिचा चेहरा विचारमग्न झाला होता.
“ काय करतेयस तू? फोन कर ना पोलिसांना.”
“हो, ते मी करणारच आहे पण मी हा विचार करतेय की ह्या खुन्याचा प्लॅन काय आहे? काय करतोय तो नक्की?”
“साधासरळ प्लॅन आहे त्याचा. अँजेलाच्या खुनाचा आरोप माझ्यावर आणण्याचा. पण हा त्याचा मूर्खपणा आहे.”
“का?”
“कारण मी वेगासला गेलो होतो आणि मी हे सिद्ध करू शकतो. जेव्हा पोलिसांना तिच्या मृत्यूची नक्की वेळ कळेल तेव्हाच त्यांना हे कळेल की मी तिचा खून करणं शक्यच नाहीये आणि मला अडकवलं जातंय.”
रॅशेलने नकारार्थी मान हलवली.
“ज्या प्रकारे तिचा मृत्यू झालाय, त्याच्यात मृत्यूची नेमकी वेळ ठरवणं अतिशय कठीण आहे. जरी त्यांना वेळ मिळाली तरी त्यात दोन ते अडीच तासांएवढा फरक पडू शकतो, आणि जर का तसं झालं तर मग तू पोलिसांच्या रडारवर येशीलच.”
“म्हणजे? तू असं म्हणते आहेस का की माझ्याकडे मी तिचा मृत्यू झाला त्यावेळी मी वेगासला जाणाऱ्या विमानात होतो, ही अॅलिबी नाहीये?”
“नाही, कारण त्यांना तिच्या मृत्यूची अगदी अचूक वेळ माहित नसेल. आपल्या खुन्याने याचा विचार केलेला असणार. म्हणून तर त्याने तिचा मृतदेह तुझ्या घरात, तुझ्या बेडरूममध्ये ठेवला.”
त्याक्षणी माझ्या लक्षात आलं की माझीही अलोन्झो विन्स्लो किंवा ब्रायन ओग्लेव्ही यांच्याप्रमाणे तुरुंगात रवानगी होऊ शकते.
“काळजी करू नकोस जॅक. मी पोलिसांना तुला अटक करू देणार नाही.:” ती माझ्याकडे पाहात म्हणाली.
तिने सर्वप्रथम तिच्या ऑफिसला फोन केला. त्यात ती माझ्याबद्दल किंवा मला नेवाडामधून इथे घेऊन येण्याबद्दल काहीही बोलली नाही. तिने एवढंच सांगितलं की एक खून झालेला आहे, आणि तिला मृतदेह मिळालेला आहे आणि ती एल.ए.पी.डी.ला कळवते आहे.
त्यानंतर लगेचच तिने एल.ए.पी.डी.ला फोन केला, माझा पत्ता दिला आणि होमिसाईड डिटेक्टिव्हना तिथे यायला सांगितलं. आपला मोबाईल नंबर देऊन तिने कॉल संपवला.
“तुला जर कोणाला कॉल करून ह्याबद्दल सांगायचं असेल तर आत्ताच सांग. एकदा पोलिस आले की ते तुला तुझा फोन वापरू देणार नाहीत.”
“बरोबर.” मी जरी अजूनही बधीर अवस्थेत होतो, तरी मला सावरायला हवं होतं. मी माझा प्रीपेड फोन काढला आणि टाइम्सच्या सिटी डेस्कला फोन केला. फोन करता करता मी माझ्या घड्याळात वेळ पाहिली. रात्रीचा एक वाजून गेला होता. आमच्या पेपरचं प्रिंटींग चालू झालं असणार. पण ही बातमी कोणाला तरी सांगणंसुद्धा जरुरी होतं.
रात्रीच्या वेळी बहुतेक करून एस्टेबान सॅम्युएल नावाचा एडिटर असायचा. तो टाइम्समध्ये गेली चाळीस वर्षे काम करत होता आणि अनेक मालक आणि बदल त्याने बघितलेले होते. त्याला कुणीही हात न लावण्याचं कारण तो सगळे लोक निघून गेल्यावर कामावर यायचा, हेच असणार अशी माझी खात्री होती. तो जर कुणाला दिसलाच नाही तर त्याला काढून टाकण्याबद्दल कोणीही विचार कसा करणार?
“सॅम, मी जॅक बोलतोय. जॅक मॅकअॅव्हॉय.”
“जॅक मॅक! काय चाललंय? एवढ्या रात्री तुझा फोन?”
“तसंच घडलंय सॅम! एक वाईट बातमी आहे. अँजेला कुकचा खून झालाय. मला आणि एका एफ.बी.आय.एजंटला आत्ताच तिचा मृतदेह सापडलाय. सकाळची एडिशन तर आता प्रिंटींगसाठी गेलेली असेल पण तुला जर कोणाला सांगायचं असेल किंवा ओव्हरनोटमध्ये ही बातमी ठेवायची असेल तर....”
ओव्हरनोट म्हणजे एका शिफ्टचा एडिटर त्याची शिफ्ट संपताना पुढच्या शिफ्टच्या एडिटरसाठी जी माहिती ठेवून जातो, ती.
“ ओह माय गॉड! काय झालं?”
“आम्ही एका स्टोरीवर काम करत होतो. हे त्याच्याशीच संबंधित आहे. पण मलाही सगळ्या गोष्टी अजून नीट समजलेल्या नाहीयेत. आम्ही पोलिसांची वाट पाहतोय.”
“तू कुठे आहेस? हे सगळं कुठे घडलंय?”
तो हे प्रश्न विचारणार याचा अंदाज होताच मला.
“माझ्या घरी. तुला काय आणि किती माहित आहे, ते मला माहित नाही, पण मी काल, म्हणजे मंगळवारी रात्री लास वेगासला गेलो आणि आज म्हणजे बुधवारी पूर्ण दिवसभर अँजेलाचा काहीही पत्ता नव्हता. मी आत्ता परत येतोय. एक एफ.बी.आय.एजंट माझ्याबरोबर आहे. आम्ही दोघांनीही माझ्या घरात जरा शोधलं तेव्हा तिचा मृतदेह आम्हाला पलंगाखाली सापडला.”
हे सगळं सांगताना इतकं विचित्र वाटत होतं!
“तुला त्यांनी अटक केलीय का जॅक?” सॅम्युएल अजूनही संभ्रमित होता.
“नाही. या खुन्याचा प्लॅन तोच होता, पण एफ.बी.आय.ला खरं काय आहे, ते माहित आहे. अँजेला आणि मी या खुन्याच्या मागावर होतो आणि त्याला ते समजलं. त्याने तिचा खून केला आणि मलाही नेवाडामध्ये गाठायचा प्रयत्न केला. पण एफ.बी.आय. ने तिथे माझी मदत केली. एकदा इथल्या गोष्टी पोलिसांनी तपासल्या की मग मी ऑफिसला येईन आणि शुक्रवारच्या पेपरसाठी ही स्टोरी लिहीन. ओके? हे तू तुझ्या ओव्हरनोटमध्ये न विसरता लिही.”
“ठीक आहे जॅक! मी आता काही फोनकॉल्स करतो. तू संपर्कात राहा.”
जर पोलिसांनी संपर्कात राहू दिलं तर, माझ्या मनात विचार आला. मी त्याला माझ्या प्रीपेड फोनचा नंबर दिला आणि कॉल संपवला.
रॅशेल येरझाऱ्या घालत होती.
“तुझं डोकं ठिकाणावर नाही, असं तर नाही वाटलं ना तुझ्या एडिटरला?”
“ शक्यता आहे तशी. माझा स्वतःचा मी जे बोललो आत्ता त्याच्यावर विश्वास बसला नसता, जर दुसऱ्या कोणी मला अशी कथा ऐकवली असती तर! तेच तर म्हणतोय मी. माझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. “
“ठेवतील जॅक. त्याची काळजी तू करू नकोस. आणि मला वाटतं आता माझ्या लक्षात त्याचा संपूर्ण प्लॅन आलेला आहे.”
“मग मला सांग ताबडतोब. पोलिस कुठल्याही क्षणी इथे पोचतील, आणि मग आपल्याला बोलता येणार नाही.”
ती सोफ्यावर बसली आणि तिने माझ्याकडे रोखून पाहिलं, “तू सर्वप्रथम या सगळ्या गोष्टीकडे त्याच्या दृष्टीकोनातून पाहा. आणि अजून एक. जरी आपल्याकडे पुरावा नसला तरी आपल्याला त्याच्याबद्दल काही गोष्टी या गृहीत धराव्या लागतील.”
“ओके.”
“सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तो जवळपास आहे. आपल्याला माहित असलेले दोन खून जे त्याने केलेले आहेत, ते वेगास आणि एल.ए.च्या परिसरात केलेले आहेत. अँजेलाचा खूनही एल.ए.मध्येच झाला असणार. तिचा खून कुठेतरी दूर करून मग तिचा मृतदेह तुझ्या घरात टाकला गेलेला नाहीये. तिचा खून जवळपासच कुठेतरी झालेला असणार. त्याने तुला नेवाडामध्ये गाठायचा प्रयत्न केला. याचा अर्थ तो नेवाडामध्ये किंवा एल.ए.मध्ये किंवा या दोन्ही ठिकाणांहून जवळ असलेल्या जागी राहतो. त्याला समजा सोमवारी रात्री किंवा मंगळवारी अँजेलाने त्याची वेबसाईट बघितली हे समजलं आणि मंगळवारी रात्री किंवा बुधवारी पहाटे त्याने अँजेलाचा खून केला आणि तुला एकाकी पाडलं. हे सगळं काही तासांमध्ये घडलेलं आहे आणि ते करण्यासाठी त्याचं जवळपास असणं गरजेचं आहे.”
मी होकारार्थी मान डोलावली. आता या गोष्टींचा परस्परसंबंध लक्षात येत होता.
“दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे असलेलं कौशल्य. त्याने एलीसारख्या अत्यंत कडेकोट सुरक्षेसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या तुरुंगाच्या वॉर्डनच्या सेक्रेटरीचा इमेल हॅक केला आणि त्यावरून ब्रायन ओग्लेव्हीच्या जीवाला धोका असल्याचा इमेल पाठवला. शिवाय तुझी क्रेडिट कार्ड्स, तुझा बँक अकाउंट आणि तुझा फोन या सगळ्या गोष्टी त्याने बंद पाडल्या. यावरून त्याचं तांत्रिक कौशल्य हे फार वरच्या दर्जाचं आहे, हे समजतंय आपल्याला. आणि जर त्याने एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या असतील, तर आपण आत्ता हे समजून चालू या की त्याने एल.ए.टाइम्सची सिस्टिमसुद्धा हॅक केली असणार. आणि त्यावरून तुझा आणि अँजेलाचा पत्ता त्याला समजला असेल.”
“अर्थात. ती माहिती तिथे असणारच.”
“तू मला सांगितलंस की तुझी नोकरी गेली आणि हे गेल्या शुक्रवारी झालं. त्याच्या संदर्भात काही इमेल्स असतीलच ना?”
मी परत होकारार्थी मान डोलावली, “हो. मला भरपूर इमेल्स आली होती त्याच्याबद्दल. माझ्या मित्रांकडून आणि इतर पेपरांमधूनही. मी स्वतः काही लोकांना इमेल करून त्याबद्दल सांगितलं होतं. पण त्याचा या सगळ्याशी काय संबंध?”
तिच्या चेहऱ्यावर आता मी जे सांगतोय ते तिला आधीच माहित आहे आणि त्याच्यामुळे तिने बांधलेले अंदाज खरे ठरत आहेत असं दाखवणारे भाव होते.
“ओके. आता या क्षणी आपल्याला काय माहित आहे? अँजेलाने तिच्या नकळत एका साईटवर स्वतःचा आयपी अॅड्रेस दिला आणि त्यावरून या माणसाला तुमच्याबद्दल समजलं.”
“हो. Trunkmurder.com.”
“मला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा मी या वेबसाईटची पाळंमुळं खोदून काढेन. ठीक आहे, आता आपण असं समजू की त्याला हे कळलं आणि त्याने एल.ए.टाइम्सच्या सिस्टिममधून सगळी माहिती काढली. अँजेलाने एखादं मेल वगैरे लिहिलं होतं का हे आपल्याला माहित नाही पण तू तुझा लास वेगासला जायचा प्लॅन तुझ्या एडिटरला इमेलवरून कळवला होतास. या आपल्या खुन्याने ते वाचलं, तुझे बाकीचे मेल्स पण वाचले आणि तुझा पाठलाग करायला सुरुवात केली. त्याने तुझ्या प्लॅनवरून स्वतःचा प्लॅन बनवला.”
“आपण त्याला आपला खुनी असंच म्हणतोय. त्याच्यासाठी एखादं नाव ठरवायला हवं आपण.”
“एफ.बी.आय.मध्ये आम्ही अशा लोकांना unknown subject किंवा अनसब म्हणतो. जोपर्यंत आम्हाला त्याच्याविषयी माहिती मिळत नाही तोपर्यंत.”
मी माझ्या जागेवरून उठलो आणि खिडकीबाहेर पाहिलं. रस्ता अंधारलेला होता. पोलिस अजूनही आलेले नव्हते. मी बाहेरचे दिवे चालू केले.
“ठीक आहे. अनसब. आणि त्याने माझ्या प्लॅनवरून स्वतःचा प्लॅन बनवला म्हणजे काय?”
“जेव्हा त्याच्या लक्षात आलं की तू लास वेगासला जाणार आहेस, तेव्हा त्याने हा अंदाज केला असणार की तू रिपोर्टर असल्यामुळे ही स्टोरी तू इतर कोणालाही, अगदी पोलिसांनाही सांगणार नाहीस. त्याच्या ते पथ्यावरच पडलं. अँजेला एल.ए.मध्ये आहे आणि तू वेगासला चालला आहेस हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा तो एल.ए.ला आला, त्याने अँजेलाचं अपहरण केलं, नंतर तिचा खून केला आणि तुला त्याच्यात अडकवण्याचा प्लॅन केला.”
मी तिच्यासमोर बसलो, “हो. ते तर सरळसरळ दिसतं आहेच आपल्याला.”
“ मग त्याने आपलं सगळं लक्ष तुझ्यावर केंद्रित केलं. तो वेगासला गेला. आता तो कसा तिथे लगेचच गेला, ते मलाही समजत नाहीये. कदाचित त्याने सकाळची फ्लाईट घेतली असेल किंवा रात्रभर गाडी चालवून तो तिथे पोचला असेल आणि त्याने एलीच्या वाटेवर असलेल्या तुझा पाठलाग करायला सुरुवात केली. मी तुला आधी सांगितलंच ना की हे फार कठीण नव्हतं. आणि आता मला असं वाटतंय की तुला कॅसिनोमध्ये जो माणूस भेटला तो हाच असावा. तो तुझ्या खोलीत घुसून काहीतरी करण्याच्या बेतात होता पण माझा आवाज ऐकून तो थांबला. आणि आत्तापर्यंत मला त्याचं हेच वागणं अनाकलनीय वाटत होतं.”
“ का?”
“वेल्, त्याने त्याचा हा प्लॅन अंमलात का आणला नाही? केवळ तुझ्या खोलीत कोणीतरी होतं म्हणून? मी एफ.बी.आय.एजंट आहे आणि माझ्याकडे माझी गन असू शकते हे त्याला माहित असण्याची किंवा तसा संशय येण्याची काहीच शक्यता नाहीये. शिवाय, हा माणूस एक सराईत खुनी आहे. त्याने याच्याआधी किमान दोनदा खून केलेले आहेत, तेही अत्यंत सफाईदारपणे. पोलिसांना त्याच्या अस्तित्वाबद्दल काहीही माहित नाहीये. त्यावरून तो किती काळजीपूर्वक खून करत असेल आणि पुरावे नष्ट करत असेल, ते लक्षात येतं. अशा माणसासाठी एखाद्याला मारणं हे अजिबात कठीण नाही. त्याने तुझ्याबरोबर मलाही मारलं असतं तर त्याच्याबद्दल कुणालाही समजलं नसतं. तो त्या हॉटेलमध्ये जसा गुपचूप आला तसाच तिथून सटकला असता.”
“मग तुला काय वाटतंय? त्याने त्याचा प्लॅन रद्द का केला असावा?”
“ कारण तुला आणि तुझ्याबरोबर जो कोणी असेल त्याला किंवा तिला सरळसरळ मारणं हा त्याचा उद्देश नव्हताच मुळी. त्याचा प्लॅन तुझ्या मृत्यूला आत्महत्या म्हणून भासवायचा होता.”
“आत्महत्या? आणि मी? काहीतरीच काय?”
“ जरा विचार कर जॅक. त्याच्यासाठी तू आत्महत्या करणं, निदान प्रथमदर्शनी तरी तुझा मृत्यू हा आत्महत्या वाटणं गरजेचं होतं. समजा, त्याने तुझा एलीमधल्या हॉटेलच्या खोलीत खून केला असता, तर तुझा मृतदेह मिळाल्यावर तुझा खून झालाय हे सिध्द झालं असतं. मग ही सगळी प्रकरणं बाहेर आली असतीच. पण जर तू एका अनोळखी शहरातल्या हॉटेलच्या एका खोलीत आत्महत्या केलीस असं जर पोलिसांना वाटलं असतं तर सगळा तपास पूर्णपणे वेगळ्या दिशेने गेला असता.”
मी ती जे सांगत होती त्यावर विचार केला आणि मला तिच्या विचारांची दिशा समजली.
“एक रिपोर्टर, त्याची नोकरीवरून हकालपट्टी होते, त्याच्यावर जी मुलगी त्याची जागा घेणार आहे तिलाच प्रशिक्षण देण्याची अपमानास्पद जबाबदारी टाकण्यात येते, त्याला दुसरी नोकरी मिळण्याची शक्यताही खूपच कमी आहे,” मी खऱ्या असलेल्या गोष्टींची उजळणी केली, “त्यामुळे त्याला नैराश्य आलेलं आहे आणि आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग अवलंबण्याचे विचार त्याच्या मनात घोळत आहेत. तो एक तथाकथित सीरिअल किलरची व्यक्तिरेखा तयार करतो, नंतर त्या मुलीचं अपहरण करतो, तिचा खूनही करतो. नंतर त्याचे सगळे पैसे तो दान करतो, क्रेडिट कार्ड्स रद्द करवतो आणि एका अशा ठिकाणी जातो जिथे त्याला कोणीही ओळखत नाही आणि तिथे जाऊन तिथल्या एका हॉटेलच्या खोलीत तो आत्महत्या करतो.”
मी हे बोलत असताना रॅशेलच्या चेहऱ्यावर सहमतीदर्शक भाव होते.
“पण मला आता हे कळत नाहीये,” मी म्हणालो, “ तो माझा खून करून आत्महत्येचा आभास कसा काय निर्माण करणार होता?”
“तू पीत होतास, बरोबर? तू जेव्हा तुझ्या खोलीत आलास, तेव्हा तुझ्या हातात दोन बीअरच्या बाटल्या होत्या. मला आठवतंय.”
“हो. त्याच्या आधी मी दोन बाटल्या प्यायलो होतो. फक्त दोन.”
“हो, पण वातावरणनिर्मितीसाठी त्याचा उपयोग झाला असताच. रिकाम्या दारूच्या बाटल्या, नैराश्य, आत्महत्या करण्याची हिम्मत येण्यासाठी दारू पितोय – असे अनेक तर्क त्यावरून पोलिसांनी लढवले असते.”
“पण बीअर पिऊन कोणी मरतो का? माझा मृत्यू प्रत्यक्षात कसा काय घडवला असता त्याने?”
“तू स्वतःच त्याला ते साधन दिलं असतंस जॅक. तुझी गन.”
एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहिलं. मी धावतच माझ्या बेडरूममध्ये गेलो. बारा वर्षांपूर्वी मी एक .45 कॅलिबर कोल्ट पूर्णपणे कायदेशीररित्या विकत घेतली होती. माझ्या आणि पोएटमधल्या झुंजीनंतर. तो जिवंत होता असं मी ऐकलं होतं, जरी एफ.बी.आय. ने तो मेलेला आहे हे अधिकृतरित्या जाहीर केलं होतं तरीही. त्याने माझ्या मागावर येऊ नये एवढीच माझी इच्छा होती आणि म्हणूनच स्वसंरक्षणासाठी ही गन मी विकत घेतली होती. मी ती माझ्या पलंगाशेजारी असलेल्या एका ड्रॉवरमध्ये ठेवत असे आणि वर्षातून एकदा शूटिंग रेंजवर तिचा वापर करत असे.
रॅशेल माझ्या पाठोपाठ बेडरूममध्ये आली आणि मी ड्रॉवर उघडून पहिला तेव्हा ती माझ्या मागेच उभी होती. गन गायब झाली होती.
मी वळून तिच्याकडे पाहिलं.
“तू माझा जीव वाचवलास, हे लक्षात आलं का तुझ्या?”
“माय प्लेझर!”
“पण माझ्याकडे गन आहे हे त्याला कसं कळलं?”
“रजिस्टर्ड आहे का गन?”
“हो. पण तू काय सुचवते आहेस? या माणसाने एटीएफचे काँप्युटर्सपण हॅक केलेत? हे जरा अति होतंय, असं नाही वाटत?”
“नाही. अजिबात नाही. जर तो एलीसारख्या तुरुंगाच्या वॉर्डनच्या सेक्रेटरीचा इमेल हॅक करू शकतो तर एटीएफच्या डेटाबेसमधून माहिती काढणं त्याच्यासाठी कठीण नाहीये. आणि त्याला तिथे जाण्याचीही गरज नाहीये. त्यावेळी, जेव्हा तू एकदम प्रसिद्ध, सेलेब्रिटी पत्रकार होतास, तेव्हा अनेकांनी तुझ्या मुलाखती घेतल्या होत्या. लॅरी किंगपासून ते नॅशनल एन्क्वायररपर्यंत अनेकांशी तू बोलला होतास. त्यांच्यापैकी किमान एकातरी मुलाखतीत तू तुझ्या गनबद्दल बोलला होतास का?”
मी उद्वेगाने माझं डोकं हलवलं.
“हो. बोललो होतो. मला तेव्हा असं वाटलं होतं की जर पोएटने त्यापैकी काही मुलाखती वाचल्या आणि जर माझ्या मागावर यायचा विचार त्याच्या मनात असला तर माझ्या गनबद्दल ऐकून तो आपला विचार बदलेल.”
“बरोबर.”
“एनीवे, हा माणूस आपण समजतो तेवढा हुशार नाहीये. या प्लॅनमध्ये एक मोठी चूक आहे.”
“काय?”
“मी वेगासला विमानाने गेलो. एअरपोर्टवर माझ्या सामानाची कसून तपासणी झाली. मी माझी गन घेऊन जाऊ शकलोच नसतो.”
तिने यावर जरा विचार केला, “:कदाचित. पण पोलिसांसाठी हा मुद्दा तेवढा महत्वाचा ठरला असता असं मला वाटत नाही. त्यांनी आत्महत्येचा निष्कर्ष बाकी सगळ्या वस्तुस्थितीवरून काढलाच असता, जरी तुझी गन विमानातून तू कशी घेऊन गेलास हा एक मोठा प्रश्न असला तरीही.”
आम्ही दोघेही परत हॉलमध्ये आलो. मला प्रचंड थकवा आला होता. शारीरिक आणि मानसिकसुद्धा. गेल्या छत्तीस तासांमध्ये फार विचित्र आणि अनाकलनीय गोष्टी घडल्या होत्या आणि त्याही इतक्या वेगाने की माझं डोकं भणाणून गेलं होतं. पण मला विश्रांती मिळणार नव्हती, हेही तितकंच खरं होतं.
“अजून एक पुरावा आहे माझ्या बाजूने.”
“काय?”
“स्किफिनो. वेगासमधला वकील. मी त्याच्याकडे जाऊन सगळ्या गोष्टींची चर्चा केलीय. जर पोलिसांना माझा मृत्यू आत्महत्या वाटला असता तर त्याच्या बोलण्यावरून हे सिद्ध झालं असतं की मी माझ्या आयुष्यातली पोएटनंतरची सर्वात महत्वाची स्टोरी ब्रेक करणार होतो. मी आत्महत्या का करीन?”
“त्याने कदाचित त्याच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता. कदाचित या खुन्याचा पुढचा प्लॅन तो असावा. तुझा एलीमध्ये निकाल लावल्यावर वेगासला जाऊन स्किफिनोचं तोंडही कायमचं गप्प करायचं. पण जेव्हा त्याला तुला हात लावता आला नाही, तेव्हा स्किफिनोच्या मागे जायचं काहीच कारण नव्हतं. मी वेगास फील्ड ऑफिसला त्याच्याशी संपर्क साधून त्याला संरक्षण द्यायला सांगते.”
“आणि त्या कॅसिनोमधला तो व्हिडिओ?”
“हो. तो सुद्धा.”
तिचा फोन वाजला आणि तिने तो लगेचच उचलला.
“ फक्त मी आणि या घराचा मालक,” ती फोनवर बोलताना म्हणाली, “जॅक मॅकअॅव्हॉय. तो एल.ए.टाइम्समध्ये रिपोर्टर आहे. जिचा खून झालाय तीही रिपोर्टर आहे. अँजेला कुक.”
तिने जरावेळ समोरच्या माणसाचं बोलणं ऐकलं.
“ओके. आम्ही आता बाहेर येतोय.”
तिने तिचा फोन बंद केला, “पोलिस. ते तुझ्या घराच्या गेटच्या बाहेर आहेत. आणि आपण जर त्यांना भेटायला बाहेर आलो तर बरं होईल असं ते म्हणताहेत.”
मी काहीच बोललो नाही.
रॅशेलने घराचा पुढचा दरवाजा उघडला, “तुझे हात वर कर आणि तळवे त्यांना दिसतील असे ठेव.”
ती आधी बाहेर आली. तिचा एफ.बी.आय.बॅज तिने हातात उंच धरला होता. घराच्या गेटबाहेर दोन पॅट्रोल कार्स आणि एक डिटेक्टिव्ह क्रूझर उभी होती. चार गणवेशधारी पोलिस ऑफिसर्स आणि दोन डिटेक्टिव्हज् होते. गणवेशधारी ऑफिसर्सच्या हातांत सर्चलाईट्स होते.
मी अजून जवळ गेल्यावर मला दोन डिटेक्टिव्हज् कोण आहेत ते दिसलं. दोघेही हॉलीवूड डिव्हिजनमधले होते आणि दोघांनाही मी ओळखत होतो. त्यांच्या गन्स त्यांनी त्यांच्या हातात पण बाजूला ठेवल्या होत्या, माझ्यावर रोखलेल्या नव्हत्या पण मी जर त्यांना योग्य कारण दिलं असतं तर त्या गन्स वापरायला त्यांनी कुचराई केली नसती.
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यासायिक वापरासाठी )
प्रतिक्रिया
25 Jul 2015 - 12:31 am | एस
फारच विचार करायला लावणारा भाग!
पुभाप्र.
25 Jul 2015 - 12:33 am | आतिवास
+१
25 Jul 2015 - 12:58 am | स्रुजा
वाटच पाहत होते. आला आला.. आणि उत्कंठा वाढवुन गेला :)
25 Jul 2015 - 1:16 am | राघवेंद्र
वीकांत सुरु झाला . खूपच वेगवान भाग. पु. भा. प्र.
25 Jul 2015 - 8:18 am | अजया
मस्त भाग!
"अपहरण की खूण "या आमच्या आवडत्या लेखकांच्या थरारक कथेची पण आठवण आली ;)
25 Jul 2015 - 10:21 am | संजय पाटिल
मला वाटलं होतं कि शेवटचा भाग असेल...
आता तर अजुन उत्कंठा वाढली.
25 Jul 2015 - 10:29 am | सतोंष महाजन
थरारक प्रकार आहे सगळा.
25 Jul 2015 - 12:37 pm | मोहन
लगे रहो बोकेभाय !
वाचत आहे.
25 Jul 2015 - 5:25 pm | पैसा
मस्त वेग घेतलाय!
26 Jul 2015 - 12:42 pm | लालगरूड
pdf लिंक द्या
26 Jul 2015 - 5:12 pm | मास्टरमाईन्ड
छान
पुभाप्र
26 Jul 2015 - 5:24 pm | देश
नेहमीप्रमाणेच थरारक.मोठा भाग टंकण्याच्या तुमच्या मेहनतीला सलाम!
पुभाप्र
देश
26 Jul 2015 - 7:45 pm | अमोल खरे
पुर्ण सस्पेन्स थ्रिलर आहे. अतिशय ओघवती भाषा असल्याने वाचायला मजा येत आहे. फक्त एक विनंती- जर जमेत असेल तर भाग लवकर टाका.
27 Jul 2015 - 9:09 am | नाखु
उत्तम आणि सरस अनुवाद म्हणून्ही आपले लेखन कौशल्य वादातीत श्रेष्ठ आहे !!
सलाम
पंखा नाखु
28 Dec 2015 - 11:44 am | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग १४