द स्केअरक्रो भाग १२ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
अँजेलाचं घर नक्की कुठे आहे याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. मी रॅशेलला तिच्याबद्दल मला जे काही माहित होतं ते सगळं सांगितलं. अगदी तिला पोएट केसबद्दल असलेल्या आकर्षणाबद्दलसुद्धा. तिचा ब्लॉग आहे हे मला माहित होतं पण मी तो कधीही वाचला नव्हता.
आम्ही हेलिकॉप्टरने नेल्लीसला जायला निघण्याआधी रॅशेलने ही सगळी माहिती एल.ए.मधल्या एका एफ.बी.आय.एजंटला सांगितली. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे संभाषण शक्यच नव्हतं. रॅशेल डेनिस बॅबिट आणि शेरॉन ओग्लेव्ही या दोघींचे फोटो, पोस्ट-मॉर्टेम तपासणीचे रिपोर्ट्स आणि इतर माहिती यांची तुलना करत होती. तिच्या चेहऱ्यावर व्यग्र भाव होते. संपूर्ण एकाग्रतेने ती प्रत्येक रिपोर्ट वाचत होती आणि तिच्या वहीत काही नोंदी करत होती. मी तिच्या कामात अजिबात व्यत्यय न आणता तिच्याकडे बघत होतो. बारा वर्षांपूर्वीचे दिवस मला आठवत होते.
महत्प्रयासाने मी ते विचार बाजूला सारले आणि हे सगळं इतक्या वेगाने कसं काय घडलं याबद्दल विचार करायला सुरुवात केली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला हा खुनी कोण आहे हे माहित होण्यापूर्वीच या माणसाने माझ्याबद्दलची सर्व माहिती गोळा करून माझा पाठलाग करायला सुरुवात कशी केली. गेल्या दोन दिवसांमधल्या प्रत्येक घटनेला मी उजाळा दिला आणि नेल्लीसला उतरताना माझ्या डोक्यात एक विचार आला. पण रॅशेलला तो मी लगेच सांगणार नव्हतो. तिला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते जाणून घ्यायचं होतं मला. बारा वर्षांपूर्वी, जेव्हा रॅशेल बिहेवियरल सायन्स युनिटमध्ये होती तेव्हा तिचं गुन्हेगारांच्या प्रोफायलिंगमधलं कौशल्य मी स्वतः पाहिलं होतं. ती या माणसाबद्दल काय निष्कर्ष काढते ते मला ऐकायचे होते.
नेल्लीसला उतरल्याबरोबर लगेचच आम्ही एफ.बी.आय.च्या जेटमध्ये बसलो. आम्ही दोघेच प्रवासी होतो. आम्ही बसल्यावर पायलटने तिला तिच्यासाठी एक कॉल असल्याचं सांगितलं. आम्ही सीटबेल्ट लावल्यावर तिने तो कॉल घेतला. पायलटने आम्हाला सांगितलं की एका तासात आम्ही एल.ए.ला पोहोचू. जेव्हा सरकारी ताकद तुमच्या पाठीशी असते तेव्हा अशा गोष्टी अगदी सहजपणे होतात, माझ्या डोक्यात विचार आला. इकडे रॅशेलचा कॉल चालू होता आणि आमच्या पायलटने जेट रनवेवर आणलं. रॅशेल ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला टेन्शन येत होतं. शेवटी तिने फोन खाली ठेवला.
“अँजेला कुक तिच्या घरी नाहीये,” ती म्हणाली, “अजून तिचा काहीच ठावठिकाणा नाहीये.”
मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझ्या मनातली भीती आता अजून गडद होत चालली होती. जेटने हवेत उड्डाण केल्यावरही माझी मनःस्थिती बदलली नव्हती. ते हवेत स्थिरस्थावर होऊन एल.ए.च्या दिशेला लागल्यावर मी तोंड उघडलं, “रॅशेल, मला वाटतं की या माणसाने आम्हाला - निदान अँजेलाला तरी - इतक्या पटकन कसं शोधून काढलं ते मला समजलं आहे.”
“कसं काय?”
“नाही. आधी तू. तुला त्या फाईल्समध्ये काय सापडलं ते सांग.”
“जॅक, हा पोरकटपणा सोड. ही गोष्ट आता एका पेपरातल्या स्टोरीपेक्षा खूप मोठी आणि महत्वाची झालेली आहे.”
“याचा अर्थ असा नाही की तू तुला मिळालेली माहिती मला सांगू नयेस. एफ.बी.आय.ला नाहीतरी आवळा देऊन कोहळा काढण्याची सवय आहेच.”
निरुपाय झाल्याप्रमाणे तिने मान डोलावली.
“ठीक आहे जॅक. मी सांगते तुला. पण एक गोष्ट नक्की आहे. मी डेनिस बॅबिट आणि शेरॉन ओग्लेव्ही या दोघींच्याही फाईल्स आणि बाकीची माहिती पाहिली. माझा निष्कर्ष हा आहे की हे दोन्ही खून एकाच माणसाने केलेले आहेत. पण दोन्ही वेळेला त्याच्याकडे पोलिसांचं लक्ष गेलं नाही कारण दोन्ही वेळेला कोणीतरी दुसरा, पर्यायी आरोपी त्यांना लगेचच सापडला आणि त्यांनी त्यानंतर दुसरा कुठलाही विचार न करता त्याला आरोपी म्हणून घोषित केलं आणि पुढची सगळी प्रक्रिया सुरु केली. डेनिस बॅबिटच्या केसमध्ये तर हां आरोपी एक अल्पवयीन मुलगा होता.”
“आणि त्याने पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या खुनाची कबुली वगैरे काहीही दिलेली नव्हती,” मी म्हणालो, “त्याचा हा सगळा तथाकथित कबुलीजबाब माझ्या ऑफिसमध्ये आहे. त्यांनी त्याला ९ तास प्रश्न विचारले पण एकदाही त्याने आपण तिचा खून केला असं कबुल केलेलं नाही. तो म्हणाला की त्याने तिची गाडी आणि तिच्या पर्समधली रोकड चोरली पण तिचा मृतदेह तिच्या गाडीच्या ट्रंकमध्ये त्याच्याआधीच होता.”
“बरोबर. मी आत्ता तू दिलेल्या या दोन्ही फाईल्सची तुलना करून या दोन्ही खुनांचं प्रोफाईलिंग करत होते. या खुन्याची स्वाक्षरी – सिग्नेचर – मला शोधून काढायची होती.”
“त्याची स्वाक्षरी अगदी सरळ सोपी आहे. त्याला बायकांना प्लास्टिक पिशव्या त्यांच्या तोंडावर टाकून त्यांचा गळा घोटायला आवडतं.”
“तांत्रिक दृष्ट्या त्यांचा मृत्यू हा गळा घोटल्यामुळे नाही तर घुसमटवल्यामुळे झालेला आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे.”
“ओके.”
“प्लास्टिकची पिशवी आणि मानेभोवती बांधलेली दोरी या गोष्टीही कुठल्यातरी ओळखीच्या गोष्टीकडे इशारा करताहेत पण मला या खुन्याची इतकी साधी सरळ स्वाक्षरी असावी अशी अपेक्षा नाहीये. मी या दोन स्त्रियांमध्ये काय साधर्म्य आहे त्याचाही विचार करत होते. या दोघी एकमेकींशी कशा प्रकारे जोडल्या गेल्या आहेत हे एकदा आपल्याला समजलं की मग या खुन्याने त्यांना कसं शोधून काढलं ते आपल्याला समजेल आणि ते समजलं की त्याचा माग आपल्याला काढता येईल.”
“दोघीही स्ट्रिपर्स होत्या.”
“हे खूपच ढोबळ वर्णन आहे. आणि पुन्हा एकदा, तांत्रिक दृष्ट्या, एक स्ट्रिपर होती आणि एक एक्झॉटिक डान्सर होती. त्यात पुन्हा फरक आहे.”
“जे काही असेल ते. देहप्रदर्शन हा दोघींच्याही व्यवसायाचा भाग होता. या दोघींना जोडणारी ही एकच गोष्ट आहे का तुझ्या मते?”
“नाही. अजून आहेत. तू जर पाहिलंस, तर शारीरिक दृष्ट्या दोघीही अगदी सारख्या आहेत. दोघींच्या वजनात जेमतेम तीन पौंडांचा आणि उंचीमध्ये फक्त अर्ध्या इंचाचा फरक आहे. चेहऱ्याची ठेवण आणि केसही सारखे आहेत. त्यांची शारीरिक ठेवण हा खुन्याने त्यांना निवडण्यामागे असलेला एक मोठा मुद्दा आहे. एखादा संधिसाधू खुनी निवड करत नाही. तो जशी संधी मिळेल त्याप्रमाणे खून करतो. पण जेव्हा तुला अशा दोन स्त्रिया दिसतात ज्यांच्यात शारीरिक दृष्ट्या इतकं साम्य आहे तेव्हा असा निष्कर्ष निघतो की हा जो शिकारी आहे तो अत्यंत काळजीपूर्वक आणि शांतपणे, अजिबात घाई न करता आपलं सावज निवडतो.”
ती अचानक थांबली. बराच वेळ काहीही बोलली नाही.
“काय झालं?” मी विचारलं, “तुला नक्कीच यापेक्षा जास्त समजलं आहे.”
“हो. मी जेव्हा बिहेवियरलमध्ये होते तेव्हा युनिट सुरु होऊन जेमतेम काही वर्षे झाली होती. तेव्हा प्रोफाईलर्स एकत्र बसायचे आणि सीरियल किलर्स आणि जंगलातल्या शिकार करणाऱ्या प्राण्यांमध्ये साम्य शोधायचे. तुला आश्चर्य वाटेल पण एखादा सीरियल किलर आणि लांडगा किंवा बिबट्या वाघ यांच्यात खूप साम्य असतं. सावजांच्या बाबतीतही असं म्हणता येईल. आम्ही तर त्यांच्या शारीरिक ठेवणीला प्राण्यांवरून नावं ठेवली होती. या दोघींना आम्ही जिराफ म्हटलं असतं. दोघीही उंच होत्या आणि त्याही पायांतून. आपल्या खुन्याला जिराफांची आवड आहे असं दिसतंय.”
हे सगळं मला लिहून ठेवायचं होतं. पण मला अशी सार्थ भीती वाटत होती की ती गप्प बसेल किंवा मग एवढ्या मोकळेपणाने बोलणार नाही. त्यामुळे मी फक्त ऐकायचं ठरवलं.
“अजून एक,” ती म्हणाली, “आत्तातरी हा फक्त माझ्या मनातला एक विचार आहे पण दोघींच्याही पोस्ट-मॉर्टेम तपासणीमध्ये त्यांच्या पायांवर ज्या खुणा आढळल्या आहेत त्याचं कारण त्यांना एखाद्या दोरखंडाने बांधलं असावं असं दिलेलं आहे. मला असं वाटतं की हे चुकीचं आहे.”
“का?”
“हे बघ.”
मी माझ्या जागेवरून उठून तिच्या बाजूला आलो. तिने फाईल्समधून दोघींचे फोटो बाहेर काढले.
“हे बघ. इथे दोघींच्याही गुडघ्यांच्या वर आणि खाली या खुणा दिसताहेत का तुला?”
“हो. दोघींनाही तिथे कशाने तरी बांधलं होतं असं वाटतंय.”
“नाही. जर तू नीट, लक्षपूर्वक पाहिलंस तर तुला कळेल की या खुणा एकदम सारख्या आहेत. जर एखाद्या दोराने त्यांना इथे बांधलं असेल तर खुणा इतक्या सारख्या असणं शक्य नाही. हाताने मारलेल्या गाठींमध्ये पुष्कळ फरक पडतो. शिवाय त्याने त्यांना इथे बांधलं आणि पायांच्या घोट्यांजवळ बांधलं नाही हे मला पटत नाहीये. तुम्हाला जर एखाद्याला तो पळून जाऊ नये किंवा त्याने तुम्हाला लाथ मारू नये म्हणून बांधायचं असेल तर तुम्ही पायांच्या घोट्यांजवळ बांधालच. शिवाय मी म्हणते तशा खुणा त्यांच्या मनगटांवर आहेत पण पायांवर नाहीत.”
तिचं म्हणणं बरोबर होतं. तिने सांगेपर्यंत माझ्या ते लक्षातही आलं नव्हतं. दोघींचेही फोटो मी इतक्या वेळा पाहिले होते तरीही.
“मग ह्या खुणा कशामुळे झालेल्या आहेत?”
“मी खात्रीने सांगू शकत नाही पण जेव्हा मी बिहेवियरलमध्ये होते तेव्हा प्रत्येक केसमध्ये आम्हाला नवीन पॅराफिलियाज मिळत होते.”
“पॅराफिलियाज?”
“हो. अशी गोष्ट किंवा प्रेरणा जिच्यामुळे हे खुनी उत्तेजित होतात. किंवा अशी वर्तणूक जी ते उत्तेजना येण्यासाठी करतात.”
“म्हणजे?” हे माझ्या डोक्यावरून चाललं होतं.
“प्रत्येक सीरियल किलरच्या खून करण्याचं कारण हे एकप्रकारे त्याच्या लैंगिक असमाधानात असतं. सामान्य माणसाला ज्या गोष्टींमुळे लैंगिक उत्तेजना मिळते तशी या लोकांना मिळत नाही किंवा मग अशी उत्तेजना त्यांना अपुरी वाटते आणि मग ते त्यांना उत्तेजना देणारी गोष्ट शोधायच्या मागे लागतात आणि त्यातून खुनांचं सत्र सुरु होतं. जी गोष्ट त्यांना लैंगिक उत्तेजना देते तिला पॅराफिलिया म्हणतात. त्याच्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणार्थ जे सॅडिस्ट असतात ते दुसऱ्या माणसाला जेव्हा शारीरिक वेदना होतात त्याने उत्तेजित होतात. एखाद्या व्यसनात आणि यात खूप साधर्म्य आहे.”
“ओके. आणि तुला असं वाटतंय की ह्या ज्या खुणा आहेत त्यांचा संबंध या खुन्याच्या पॅराफिलियाशी आहे?”
“असू शकतो. ह्या खुणा पट्ट्यांमुळे झालेल्या असू शकतात.”
“पट्टे? काय बांधण्यासाठी?”
“लेग ब्रेसेस. ज्यांना संधिवात असतो ते लोक उभं राहण्यासाठी वापरतात, तशा!”
“काय? लेग ब्रेसेस? लोकांना त्यातून लैंगिक उत्तेजना मिळते?”
“हो. त्याला नावही आहे. अबासिओफिलिया. लेग ब्रेसेसविषयी वाटणारं विकृत लैंगिक आकर्षण. त्याच्याविषयी वेबसाईट्स आहेत. लोक त्याबद्दल तासंतास चॅट रूम्समध्ये गप्पा मारतात. ब्रेसेस वापरणाऱ्या स्त्रियांना आयर्न मेडन हे नाव वापरलं जातं या लोकांमध्ये.”
मला रॅशेलकडून हे सगळं ऐकताना बारा वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा पोएट केसवर एकत्र काम केलं होतं, त्याची आठवण झाली. तिचं प्रोफाईलिंगमधलं कौशल्य निर्विवाद होतं. तिचे अंदाज नुसते अचूक नसायचे तर ती जवळजवळ त्या खुन्याच्या मनात शिरायची. त्या वेळेला ती कशी माहितीचे छोटे छोटे भाग घेऊन त्यावरून अचूक अंदाज बांधायची, ते पाहणं म्हणजे एक अफलातून अनुभव होता. आताही ती त्या मूडमध्ये शिरली होती आणि मी तेवढाच भारावून गेलो होतो.
“आणि तुम्हाला याच्यावर केसेस मिळाल्या होत्या?”
“हो. लुइसियानामध्ये एक केस होती. या माणसाने एका स्त्रीचं ती बसमधून उतरल्यावर अपहरण केलं आणि तिला एका मासे साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झोपडीत एक आठवडाभर डांबून ठेवलं. तिने त्यातून सुटका करून घेतली आणि ती खाडीतून पोहत कशीबशी किनाऱ्यावर आली. ती नशीबवान होती कारण तिच्याआधी त्याने चार स्त्रियांचं अपहरण केलेलं होतं आणि चौघींनाही मारलं होतं. आम्हाला त्याला अटक झाल्यावर त्याने दलदलीत फेकून दिलेले अवशेष मिळाले होते. “
“आणि ही अबासिओफिलियाची केस होती?”
“हो. जी स्त्री त्याच्या तावडीतून सुटली तिने आम्हाला सांगितलं की त्याने तिला लेग ब्रेसेस घालायला लावल्या. त्यांचे पट्टे तिच्या गुडघ्यांपाशी होते आणि या ब्रेसेसमधले लोखंडी दांडे तिच्या पायांच्या घोट्यांपासून तिच्या कमरेपर्यंत आले होते.”
“हे नुसतं ऐकलं तरी ढवळतंय मला,” मी म्हणालो, “सीरिअल किलर हा तसाही नॉर्मल प्रकार नसतोच पण लेग ब्रेसेस? हे व्यसन येतं कुठून?”
“अजून त्याबद्दल पूर्ण संशोधन झालेलं नाहीये. पण जवळजवळ सगळे पॅराफिलियाज हे त्या व्यक्तीच्या बालपणाशी संबंधित असतात. त्यांना लैंगिक उत्तेजना येण्यासाठी त्याची गरज असते. आता नक्की काय घटना घडतात ज्यामुळे एखादा खुनी इतरांना लेग ब्रेसेस घालायला लावतो ते जरी नीट समजलं नसलं तरी त्याची सुरुवात लहानपणी होते. हे सिध्द झालेलं आहे.”
“ म्हणजे हा लुइसियानामधला माणूस हे सगळं करत असण्याची शक्यता आहे?”
“नाही. त्या माणसाला मृत्युदंडाची शिक्षा झाली आणि ती अंमलातही आणण्यात आली. जेव्हा त्यांनी त्याला विजेच्या खुर्चीत बसवलं तेव्हा मी तिथे होते. आणि शेवटपर्यंत त्याने आम्हाला काहीही सांगितलं नाही.”
“या ब्रेसेस मिळवणं सोपं आहे की कठीण आहे?”
“इंटरनेटवर त्या विकत घेणं आणि विकणं हे दोन्हीही चालू असतं. त्यांची किंमतही भरपूर असते. जेव्हा कधी गुगलवर जाशील तेव्हा abasiophilia टाईप कर आणि बघ काय माहिती मिळते ते. आपण इंटरनेटच्या अंधाऱ्या बाजूबद्दल बोलतोय जॅक. पूर्वी छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये असलेले बार आणि चौक ह्या लोकांच्या भेटण्याच्या जागा होत्या. इंटरनेट तसंच आहे. वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेले लोक एकत्र येतात आणि त्यांच्यासारख्याच आवडीनिवडी असलेल्या लोकांना भेटतात. तुला जर असं वाटत असेल की तुझा छंद किंवा आवड जरा वेगळ्या प्रकारची आहे आणि तुला समाजात उघडपणे तुझा छंद जोपासता येणार नाही तर मग इंटरनेटवर तुला तुझ्यासारखे लोक भेटतील.”
तिचं बोलणं ऐकत असताना मला जाणवलं की यात एक जबरदस्त स्टोरी दडलेली आहे. पेपरातल्या स्टोरीपेक्षाही हा विषय एखाद्या पुस्तकाला जास्त साजेसा होता. पण मी हा विचार दूर सारला. या हातातल्या केसवर लक्ष ठेवणं जास्त महत्वाचं होतं.
“तुला असं वाटतंय का मग की हा खुनीही तेच करतोय? तो त्यांना हे लेग ब्रेसेस घालायला लावतो आणि मग त्यांच्यावर बलात्कार करतो? तो त्यांना घुसमटवून मारतो, त्यामागेही काही अर्थ आहे का?”
“प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी अर्थ असतोच. तुला फक्त तो वाचता आला पाहिजे. त्याने रचलेलं हे दृश्य त्याचा पॅराफिलिया दाखवतंय. मला असं वाटतंय की या स्त्रियांना मारणं हा कदाचित या खुन्याचा प्राथमिक उद्देश नसेल. त्याच्या मनात एक लैंगिक फँटसी आहे आणि ती फँटसी या स्त्रिया पूर्ण करत असाव्यात. त्याची ही फँटसी किंवा लैंगिक उत्तेजना शांत झाल्यावर या स्त्रियांना तो मारून टाकतो कारण त्याला आता त्यांचा काहीही उपयोग नाहीये आणि त्याला त्यांना जिवंत ठेवून कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. तो कदाचित त्यांना मारताना त्यांची क्षमाही मागत असेल.”
“या दोघीही डान्सर्स होत्या. तुला असं वाटतंय का की तो त्यांना हे लेग ब्रेसेस घालून नाचायला लावतो?”
“कदाचित. पण तोही त्याच्या फँटसीचाच एक भाग आहे. माझ्या मते त्यांचं शारीरिकदृष्ट्या सारखं असणं हे त्यांच्या खुनाशी सरळसरळ संबंधित आहे. त्याला जिराफांची आवड आहे. डान्सर्स असणाऱ्या स्त्रियांचे पाय स्नायुबद्ध आणि बारीक, निमुळते असे असतात. जर त्याला तशा स्त्रिया सावज म्हणून हव्या असतील तर तो डान्सर्स असणाऱ्या स्त्रिया निवडेल.”
माझ्या मनात या दोघींनीही त्यांच्या खुन्याच्या सहवासात जे त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण घालवले त्याबद्दल विचार आला. पोस्ट-मॉर्टेमनुसार दोघींनाही त्यांचं अपहरण झाल्यानंतर बारा ते अठरा तासांनी मारण्यात आलं होतं. त्यातला प्रत्येक क्षण त्या दोघींसाठी कसा गेला असेल हा विचार मनात नुसता आल्यावर माझ्या अंगावर भीतीने शहारे आले.
“ तू म्हणालीस की ही प्लास्टिक पिशवी बघून तुला काहीतरी आठवलं.”
रॅशेलने उत्तर देण्याआधी जरा विचार केला.
“नाही. मला आता आठवत नाहीये. कदाचित दुसऱ्या एखाद्या केसशी ही केस या बाबतीत सारखी असेल.”
“ ही सगळी माहिती तू VICAP मध्ये घालून पाहणार असशीलच!”
“अर्थात! जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा.”
VICAP (Violent Criminals’ Apprehension Program) हा एफ.बी.आय.ने तयार केलेला एक अवाढव्य डेटाबेस आहे. संपूर्ण देशभरात घडलेले जवळपास सगळे गुन्हे आणि सापडलेले गुन्हेगार यांची त्यात नोंद असते. एखाद्या ठिकाणी घडलेला गुन्हा हा त्याच्याआधी कुठे घडलाय का? कोणी केला होता? त्याच्यातल्या गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत काय होती – या सगळ्यांचं अगदी तपशीलवार आणि विस्तृत वर्णन त्यात असतं. त्यामुळे तुलना करून हा कोणी सराईत आणि आधी असा गुन्हा केलेला गुन्हेगार आहे की नव्यानेच सुरुवात केलेला कोणी आहे हे पाहणं सोपं जातं.
“अजून एक गोष्ट या खुन्याच्या प्रोग्रॅमबद्दल आपल्याला समजून घ्यायला हवी,” रॅशेल म्हणाली,” या दोन्ही
केसेसमध्ये त्याने प्लास्टिकची पिशवी आणि ज्या दोरीने ती पिशवी त्यांच्या गळयाभोवती आवळण्यात आली ती दोरी या गोष्टी मागे ठेवल्या होत्या पण लेग ब्रेसेस मात्र नव्हत्या. त्या काढून घेण्यात आल्या होत्या.”
“बरोबर. याचा काय अर्थ असू शकतो?”
“ ही त्याची स्वाक्षरी असू शकते. किंवा स्वाक्षरीचा एक भाग.”
मी होकारार्थी मान डोलावली. तिच्या विश्लेषणाने मला बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. तिने पाहणं आणि मी पाहणं यामध्ये फरक होताच.
“तू बिहेवियरल सायन्समध्ये काम केल्याला किती वर्षे झाली असतील?”
ती हसली. पण तिच्या डोळ्यात एका क्षणासाठी व्याकूळ भाव तरळून गेले.
“बरीच.” ती म्हणाली.
“एफ.बी.आय. मध्येही राजकारण आणि त्यातून येणारा फालतूपणा भरलेला आहे,” मी म्हणालो, “एखाद्या आपल्या क्षेत्रात अत्यंत निष्णात असलेला कोणीतरी घ्या आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी कुजवा.”
मला तिला या आठवणींमधून बाहेर काढायचं होतं कारण एक प्रकारे मी तिच्या बिहेवियरलमधून जाण्यासाठी जबाबदार होतो.
“तुला काय वाटतं? जर आपण कधी या खुन्याला पकडू शकलो तर त्याच्याबद्दल हे आपले अंदाज आपण पडताळून पाहू शकतो?”
“सीरियल किलर्सच्या बाबतीत तुम्हाला कधीच तुमचे सगळे अंदाज पडताळून पाहता येत नाहीत. तुम्हाला एखादी हिंट मिळते, पण तेवढंच. हा जो लुइसियानामधला खुनी होता त्याचे आईवडील मरण पावले होते त्यामुळे तो एका अनाथाश्रमात लहानाचा मोठा झाला होता. तिथे पोलिओ झालेली अनेक मुलं होती आणि त्यांच्यातल्या काही जणांना लेग ब्रेसेस वापराव्या लागायच्या. आता त्या गोष्टीचं रुपांतर विकृत आकर्षणात कधी झालं आणि तो खुनी कसा बनला, हे फक्त तोच सांगू शकला असता. त्याच्यासारखेच इतर अनेकजण त्याच अनाथाश्रमात वाढले पण सगळेच काही खुनी बनले नाहीत. त्याच्याच बाबतीत असं का झालं हा अंदाज आपण बांधू शकतो, पडताळून नाही पाहू शकत.”
मी खिडकीतून बाहेर पाहिलं. आमचं विमान आता एल.ए. आणि वेगास यांच्या मधल्या वाळवंटावरून चाललं होतं. खाली फक्त अंधार दिसत होता.
“हे जग खूप वाईट गोष्टींनी भरलेलं आहे.”
“कदाचित!”
आम्ही दोघेही काही क्षण गप्प झालो. नंतर मी परत तिच्याकडे वळलो.
“अजून काही सारखेपणा आढळला का तुला या दोघींमध्ये?”
“मी एक यादी बनवलेली आहे. या दोन्ही केसेसमधल्या समान आणि असमान गोष्टींची. मला नंतर त्यावर खूप तपशीलवार काम करायचंय. पण सध्यातरी लेग ब्रेसेस हा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा आहे. त्यानंतर, या स्त्रियांची शारीरिक ठेवण आणि त्यांना ज्या पद्धतीने मारलंय ते. पण या दोघींमध्ये काहीतरी एक सामायिक मुद्दा आहेच.”
“तो सापडला की हा माणूस सापडेल.”
“बरोबर. आता तू सांग जॅक. तुला काय सापडलंय?”
मी एक क्षणभर विचार केला.
“अँजेलाला इंटरनेटवर सापडलेल्या गोष्टींपैकी एक. तिने मला त्याबद्दल फक्त सांगितलं कारण प्रिंट आऊट काढण्यासारखं काही नव्हतं त्यात. ती म्हणाली की ट्रंक मर्डर हे शब्द सर्च इंजिनमध्ये टाईप केल्यावर ही लास वेगासची स्टोरी आणि एल.ए.मधल्या अनेक स्टोरीज तिला मिळाल्या होत्या. त्याचबरोबर तिला trunkmurder.com नावाची एक वेबसाईटसुद्धा मिळाली होती, पण जेव्हा ती त्या साईटवर गेली तेव्हा तिला तिथे काहीही मिळालं नाही. तिथे फक्त साईट अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचं नमूद केलेलं होतं. तू या माणसाच्या इंटरनेट कौशल्याविषयी बोललीस म्हणून मला वाटलं की.....”
“ अर्थात! ती साईट म्हणजे एक आयपी ट्रॅप असू शकतो. हा खुनी कोणी ट्रंक मर्डरबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न करताहेत का यावर लक्ष ठेवून असणारच. या आयपी ट्रॅपमुळे त्याला ज्यांनी कुणी या साईटवर क्लिक केलंय त्यांचा आयपी अॅड्रेस मिळत असेल. त्यावरून त्याला अँजेलाचा सुगावा लागला आणि तिच्यावरून तुझा.”
आमच्या विमानाने आता लँडिंग करायला सुरुवात केली होती.
“आणि जेव्हा त्याने तुझं नाव पाहिलं असेल, तो एकदम उत्तेजित झाला असेल!” रॅशेल म्हणाली.
“का?”
“तुझा नावलौकिक, जॅक! तू पोएटचा पाठलाग करून त्याला जगापुढे आणलंस, तू त्याच्यावर पुस्तक लिहिलंस. ते पुस्तक आता-आतापर्यंत बेस्ट सेलर होतं. तुझी टीव्हीवर मुलाखत झाली होती, तुला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. हे जे सीरियल किलर्स असतात ना, ते असल्या गोष्टींवर अगदी बारीक लक्ष ठेवून असतात. ते असली पुस्तकं वाचतात आणि त्यांचा अभ्यास करतात.”
“काय सांगतेस?”
“मी तुला पैजेवर सांगते जॅक, जेव्हा आपल्याला हा खुनी मिळेल ना, तेव्हा त्याच्या वस्तूंमध्ये तुला तुझं पुस्तक मिळेलच.”
“नाही मिळालं तरी चालेल मला!”
“आणि मी दुसरी पैज लावते तुझ्याबरोबर. आपण या खुन्याला पकडण्याआधी तो तुझ्याशी समोरून, आपण होऊन
संपर्क साधेल. तो तुला फोन करेल नाहीतर इमेल पाठवेल , पण तो तुझ्याशी संपर्क साधेलच.”
“का पण?त्याच्यासाठी हे धोकादायक नाहीये का?”
“त्याला एकदा समजलं की तो कोण आहे हे आपण शोधून काढलेलं आहे आणि त्याला आता कुठेही लपून राहता येणार नाही, तेव्हा तो तुझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. सगळे सीरियल किलर्स अशीच चूक करतात.”
“मला अशी कुठलीही पैज लावायची इच्छा नाहीये रॅशेल!”
मी लिहिलेल्या पुस्तकामुळे एखाद्या विकृत खुन्याला उत्तेजन मिळत असेल हा विचारही नकोसा होता.
“पण मी तुला दोष देणार नाही,” माझी अस्वस्थता ओळखून ती म्हणाली.
“तू ज्या प्रकारे ‘ आपण या खुन्याला पकडण्याआधी ‘ म्हणालीस ते मला आवडलं, “ मी विषय बदलण्यासाठी म्हणालो, “ तू ‘ जर आपण त्याला पकडलं तर ’ असं म्हणाली नाहीस.”
“आपण पकडू त्याला जॅक. त्याबद्दल माझी खात्री आहे. त्याची काळजी करू नकोस. तो आपल्या तावडीतून सुटणार नाही. त्याच्या प्रत्येक कृतीतून तो आपल्याला त्याच्याबद्दल सांगतोय. एकदा आपल्याला ते काय आहे हे समजलं की हा माणूस पकडला जाईलच!”
मी परत एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर एल.ए.चा सगळा झगमगाट दिसत होता. असंख्य दिवे. पण या सगळ्या दिव्यांचा प्रकाश जरी एकत्र केला तरी काही लोकांच्या मनातला अंधार तो कमी करू शकणार नव्हता.
#################################################################
आमच्या पायलटने लॅक्सऐवजी व्हॅन नाईज एअरपोर्टवर विमान उतरवलं. रॅशेलने तिची गाडी तिथे ठेवली होती. उतरल्यावर ताबडतोब तिने एफ.बी.आय.फील्ड ऑफिसला फोन केला. अँजेलाचा अजूनही काही पत्ता नव्हता. तिने फोन बंद केला.
“तुझी गाडी कुठे ठेवली आहेस तू? लॅक्स?”
“नाही. मी टॅक्सीने गेलो होतो. माझी गाडी माझ्या घराच्या गॅरेजमध्येच आहे.”
आता हे बोलल्यावर भीतीची अजून एक शिरशिरी माझ्या मनात उमटून गेली. मी तिला माझा पत्ता सांगितला आणि आम्ही निघालो. जवळजवळ मध्यरात्र व्हायला आली होती त्यामुळे रस्त्यांवर अगदी तुरळक वाहतूक होती.
माझं घर म्हणजे एक छोटेखानी, दोन बेडरूम्सचा बंगला होता. हॉलीवूडमधल्या सुप्रसिद्ध सनसेट बुलेवार्डपासून एक ब्लॉक दूर. आजूबाजूला तशीच छोटी, मध्यमवर्गीय लोक राहात असलेली घरं होती. हे घर मी बारा वर्षांपूर्वी पोएट केसवर मी लिहिलेल्या पुस्तकामुळे मला जे पैसे मिळाले, त्यातून घेतलं होतं. मला मिळालेल्या रॉयल्टीच्या प्रत्येक चेकची अर्धी रक्कम मी माझ्या भावाच्या विधवा पत्नीला दिली होती. त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी. आता रॉयल्टीचे चेक आणि माझी पुतणी या दोघांनाही मी बऱ्याच वर्षांमध्ये पाहिलं नव्हतं पण मला मिळालेले पैसे मी सत्कारणी लावले होते असं मी स्वतः म्हणू शकत होतो.
मी आणि माझी पत्नी कीशा जेव्हा वेगळे झालो तेव्हा तिने या घरावर कोणताही दावा वगैरे केला नव्हता. आता जेमतेम तीन वर्षाचं कर्ज फेडायचं बाकी होतं. मग हे घर पूर्णपणे माझ्या मालकीचं झालं असतं.
रॅशेलने माझ्या घराच्या मागच्या बाजूला गाडी पार्क केली पण गाडीचे लाईट्स तसेच चालू ठेवले. आम्ही गाडीतून उतरलो आणि बॉम्बविरोधी पथकामधल्या लोकांप्रमाणे अगदी सावधपणे गॅरेजच्या दरवाज्यापाशी आलो.
“याला कुलूप नाहीये?” रॅशेलने माझ्याकडे बघत अविश्वासाच्या सुरात विचारलं.
“मी कधीच कुलूप लावत नाही या दरवाज्याला,” मी म्हणालो, “एक गाडी सोडली तर चोरावं असं काहीही नाहीये आतमध्ये.”
“अच्छा! मग निदान तुझ्या गाडीचे दरवाजे तरी बंद केलेले आहेत का नीट?”
“नाही. बरेचवेळा मी विसरून जातो.”
“या वेळेला?”
“मला वाटतं, मी विसरलो होतो बहुतेक.”
गॅरेजचा दरवाजा शटरसारखा होता. मी तो उघडला आणि आम्ही आत शिरलो. मी आतमधला दिवा लावला. माझ्या गाडीची चावी माझ्या खिशातच होती. मी गाडीची ट्रंक उघडली. रॅशेल पुढे झाली. मी माझा श्वास रोखून धरला होता. तिने ट्रंक वरती केली आणि आम्ही दोघांनीही आत पाहिलं.
मी साल्व्हेशन आर्मीला देण्यासाठी म्हणून माझे काही जुने कपडे तिथे ठेवले होते. त्यांच्याशिवाय ट्रंकमध्ये काहीही नव्हतं. रॅशेलनेही माझ्याप्रमाणेच स्वतःचा श्वास रोखून धरला होता.
“मला वाटलं होतं की...” पुढे बोलायचं मला धैर्य झालं नाही. तिनेही ट्रंक बंद केली. जरा वैतागूनच.
“काय झालं? तू वैतागली आहेस ती तिथे नसल्यामुळे?”
“नाही. मी वैतागले कारण या खुन्याने मला एका विशिष्ट प्रकारे विचार करायला भाग पाडलं. पण ती माझी चूक होती. पुन्हा होणार नाही. चल, आपण तुझ्या घरात बघू.”
रॅशेलने तिच्या गाडीचे हेडलाईट्स बंद केले. आम्ही मागच्या दरवाज्याने आत शिरलो. घरात एक प्रकारचा उबट वास येत होता पण तसा वास नेहमीच बंद असलेलं घर उघडल्यावर यायचा. किचनमधल्या ओट्यावर ठेवलेल्या बाऊलमध्ये जास्त पिकलेली केळी होती. त्यांचाही वास येत होता. मी सगळीकडचे दिवे लावले. मी मंगळवारी संध्याकाळी निघताना घर जसं होतं तसंच आत्ताही दिसत होतं. बऱ्यापैकी व्यवस्थित होतं घर पण इकडेतिकडे पसरलेले पेपरांचे आणि पुस्तकांचे गठ्ठे असल्यामुळे ते पसरलेलं वाटत होतं.
“छान आहे घर तुझं!” रॅशेल म्हणाली.
आम्ही गेस्टरूममध्ये पाहिलं. ही खोली मी ऑफिस म्हणूनही वापरत असे. तिथे काहीच मिळालं नाही. रॅशेल मास्टर बेडरूमच्या दिशेने गेली आणि मी ऑफिसमधला माझा डेस्कटॉप पीसी चालू केला. मला इंटरनेट वापरता येत होतं पण अजूनही मी माझा एल.ए.टाइम्सचा इमेल अकाउंट उघडू शकत नव्हतो. माझा पासवर्ड अजूनही स्वीकारला जात नव्हता. वैतागून मी कॉम्प्युटर बंद केला आणि मास्टर बेडरूममध्ये आलो. पलंग अस्ताव्यस्त पडला होता.कारण कोणी येणार अशी मला अपेक्षाच नव्हती. खूप कोंदटल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी एक खिडकी उघडली. रॅशेलने त्यादरम्यान कपाट उघडून पाहिलं.
“हे तू तुझ्या ऑफिसच्या भिंतीवर का नाही लावत जॅक?”
मी वळलो. तिच्या हातात एक मोठा प्रिंट होता. न्यूयॉर्क टाइम्समध्ये माझ्या पुस्तकाची पूर्ण पानभर जाहिरात आली होती. मी हा प्रिंट गेली दोन वर्षे कपाटात ठेवून दिला होता.
“तो ऑफिसमध्येच असायचा पण त्याच्यानंतर दहा वर्षे काहीच केलं नाही मी. मग ही जाहिरात मला वेडावून दाखवायला लागली. म्हणून मग मी तो कपाटात ठेवून दिला.”
तिने समजलं म्हणून मान डोलावली आणि ती बाथरूममध्ये शिरली. मी परत एकदा स्वतःचा श्वास रोखून धरला. तिने शॉवर कर्टन सरकवल्याचा आवाज मला ऐकू आला. त्यानंतर एका मिनिटात तीही परत आली.
“तुझा बाथटब स्वच्छ कर की जरा. बरं, या सगळ्या कोण आहेत?”
“कोण?”
तिने भिंतीवर लावलेल्या फोटोंकडे बोट केलं.
मी जवळ गेलो, “माझी पुतणी, भावाची पत्नी, आई आणि माझी पत्नी. आता माजी पत्नी.”
तिने भुवया उंचावल्या, “पत्नी? म्हणजे निदान काही काळ तू मला विसरला होतास तर!”
हे म्हणाल्यावर तिने स्मित केलं. मीही हसलो.
“पण आमचं लग्न फार टिकलं नाही. ती रिपोर्टरच आहे. जेव्हा मी टाइम्ससाठी काम करायला लागलो तेव्हा ती आणि मी एकाच बीटवर होतो. आमची ओळख आणि घसट वाढत गेली आणि आम्ही लग्न केलं. पण ती चूक होती हे आमच्या लगेचच लक्षात आलं. मग आम्ही सामंजस्याने वेगळे झालो आणि अजूनही आमच्यात चांगली मैत्री आहे. ती आता टाइम्सच्या डीसी ब्युरोमध्ये आहे.”
मला अजून बरंच बोलायचं होतं पण मी थांबलो. रॅशेल हॉलमध्ये गेली. मीही तिच्यापाठोपाठ गेलो.
“आता काय?” मी विचारलं.
“नाही माहित. मला थोडा विचार करायला हवा. तू आता जरा झोप काढ आणि फ्रेश हो. आता कुठे जाणार नाहीयेस ना तू?”
“नाही. कुठे जाणार? शिवाय मला एकट्याला झोपायला भीती नाही वाटत. आणि तसंही, माझ्याकडे गन आहेच.”
“गन? तुला गनची काय गरज आहे जॅक?”
“जे लोक कामाचा भाग म्हणून गन जवळ बाळगतात त्यांनी असं विचारावं? पोएट केसनंतर मी ही गन घेतली.”
तिने समजल्याप्रमाणे मान डोलावली.
“ठीक आहे तर मग. मी आता निघते आणि तुला सकाळी फोन करते. तोपर्यंत आपल्यापैकी निदान एकाला अँजेलाबद्दल काहीतरी नवीन आयडिया सुचेल.”
मीही मान डोलावली आणि त्याक्षणी मला जाणीव झाली की आता तो क्षण आलेला आहे. मी जर तिला आता प्रतिसाद दिला नाही तर कदाचित अशी वेळ परत कधीच येणार नाही.
“पण जर मला तू जावंस असं वाटत नसेल, तर?” मी विचारलं.
तिने माझ्याकडे पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही.
“जर मी तुला कधीही विसरलो नसेन, तर?”
तिची नजर खाली झुकली.
“जॅक.... दहा वर्षे हा खूप मोठा काळ आहे. आपण दोघेही बदललो आहोत.”
“खरंच?”
तिने माझ्याकडे पाहिलं. आमच्या नजरा एकमेकांत गुंतल्या. मी पुढे झालो, तिच्या जवळ गेलो आणि तिला जवळ ओढलं. तिने कुठल्याही प्रकारे मला विरोध केला नाही. जेव्हा मी माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले तेव्हाही नाही. तिनेही मला आवेगाने मिठी मारली. दहा वर्षांच्या विरहाची कसर भरून काढायची असल्याप्रमाणे आम्ही एकमेकांना घट्ट धरलं.
त्यानंतर मी तिला उचलून बेडरूममध्ये कधी नेलं, आमचे कपडे एकमेकांच्या अंगांवरून अलग कधी झाले आणि आम्ही एकत्र कधी आणि कसे आलो हे मला आठवत नाही कारण काही विचार करण्याची संधी ना तिने मला दिली ना मी तिला दिली.
आम्ही त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या बेडवर पडलो होतो आणि तिचं डोकं माझ्या छातीवर होतं.
“आता तुझं काय होणार जॅक? टाइम्समध्ये पण नियम असतील ना शत्रूबरोबर कसं वागावं याचे?” ती चेष्टेच्या सुरात म्हणाली.
“शत्रू कोण? तू? शिवाय माझी गेल्या आठवड्यातच त्यांनी हकालपट्टी केलेली आहे. हा एक आठवडा आणि याच्या पुढचा आठवडा. नंतर मी इतिहासजमा होणार आहे! त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही.”
ती उठून बसली, “काय?”
“हो. इंटरनेटमुळे माझी नोकरी गेलीय. त्यांनी मला अँजेलाला ट्रेनिंग देण्यासाठी हे दोन आठवडे दिलेले आहेत. नंतर मला तिथून जावं लागणार आहे.”
“ओह माय गॉड जॅक! हे तू मला का नाही सांगितलंस?”
“तशी वेळच आली नाही.”
“पण तूच का?”
“कारण त्यांना मला जास्त पगार द्यावा लागतोय आणि अँजेलाला कमी.”
“हा निव्वळ मूर्खपणा आहे.”
“हे तू सांगायची गरज नाहीये, पण आजकाल आमच्या व्यवसायात हेच चाललेलं आहे. सगळीकडे.”
“मग आता तू काय करणार आहेस?”
“मी? तू जे ऑफिस पाहिलंस ना, तिथे बसून माझी कादंबरी पूर्ण करणार आहे. तिच्याबद्दल मी गेली पंधरा वर्षे विचार करतोय. पण त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे रॅशेल, की आपण काय करणार आहोत?”
तिने परत माझ्या छातीवर डोकं ठेवलं.
“मला असं वाटतं की आपण जे आत्ता एकमेकांना भेटलो आणि ... ते फक्त आजपुरतं मर्यादित राहायला नको.”
ती बराच वेळ काहीही बोलली नाही.
“मलाही तसंच वाटतं.” तिच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले पण ती लगेच गप्प झाली.
“काय झालं?कसला विचार करते आहेस? तुझ्या मनात नक्कीच कोणा दुसऱ्या व्यक्तीचा विचार आहे आत्ता.”
ती हसली, “अच्छा, आता तू प्रोफाइलिंग चालू केलं आहेस का?”
“नाही, पण कशाबद्दल विचार करते आहेस तू?”
“प्रामाणिकपणे सांगायचं तर हो. मी दुसऱ्या एका माणसाबद्दल विचार करत होते. मी आणि तो काही वर्षांपूर्वी भेटलो. तेव्हा मी नुकतीच डाकोटावरून परत आले होते. माझे स्वतःचे प्रश्न होतेच आणि मला हेही समजलं होतं की त्याच्या मनात त्याच्या पत्नीची एक खास जागा आहे आणि ती कोणीही घेऊ शकत नाही. त्यांचा घटस्फोट झाला होता आणि ती त्यांच्या मुलीबरोबर हॉंगकॉंगला, दहा हजार मैल दूर राहात होती पण त्याच्या मनात ते कधीतरी एकत्र येतील अशी आशा होती. त्याने मला सिंगल बुलेट थिअरीबद्दल सांगितलं होतं. तुला माहित आहे त्याबद्दल?”
“सिंगल बुलेट? म्हणजे केनेडीला जशी एकच गोळी लागली पण ती वर्मी लागली, तसं?”
तिने माझ्या छातीत एक गुद्दा मारला, “नाही रे. ही तुझ्या आयुष्यातल्या खऱ्या प्रेमाबद्दल आहे. प्रत्येकासाठी एकजण असतो किंवा असते. तू जर नशीबवान असशील तर तुमची भेटही होते आणि एकदा तुमची भेट झाली, एकदा गोळी तुझ्या हृदयातून आरपार गेली, की मग दुसरं कोणीही जवळपाससुद्धा येऊ शकत नाही. काहीही होऊ दे. मृत्यु, घटस्फोट, फसवणूक, काहीही. दुसरं कोणी ती जागा घेऊच शकत नाही. सिंगल बुलेट.”
तिने हे ज्या पद्धतीने सांगितलं ते ऐकल्यावर तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे हे समजायला मी प्रोफाइलर असायची गरज नव्हती.
“अच्छा. म्हणजे तू मला हे सांगते आहेस की तो तुझी सिंगल बुलेट होता?”
“नाही. मी सांगतेय की तो नव्हता. त्याला खूप उशीर झाला होता. माझ्या हृदयातून गोळी त्याआधीच आरपार निघून गेली होती.”
मी अवाक् होऊन तिच्याकडे बघत राहिलो आणि तिला घट्ट मिठीत घेतलं.
थोड्या वेळाने ती माझ्या मिठीतून बाजूला झाली.
“पण मला आता निघायला पाहिजे. आपण या बाबतीत विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे.”
“का जायला पाहिजे तुला? आत्ता इथेच थांब. उद्या सकाळी लवकर उठून आपण दोघेही आपापल्या ऑफिसला जाऊ.”
“नाही, मला आता घरी जायला पाहिजे नाहीतर माझा नवरा काळजी करत बसेल!”
विजेचा झटका बसल्याप्रमाणे मी उठून बसलो. ती खदाखदा हसत पलंगावरून उतरली आणि तिने तिचे कपडे घालायला सुरुवात केली.
“तुझा चेहरा काय झाला होता! बाप रे!” ती अजूनही हसतच होती, “फोटो काढायला हवा होता.”
मीसुद्धा पलंगावरून उतरलो आणि माझे कपडे शोधायला सुरुवात केली. ती अजूनही हसतच होती. शेवटी मीही हसायला लागलो. माझी पँट आणि शर्ट घातले आणि बूट शोधायला सुरुवात केली. ते मिळाल्यावर मोजे दिसेनात. शेवटी एक मोजा दिसला पण दुसरा दिसेना. बहुतेक पलंगाखाली असावं म्हणून मी पलंगाखाली वाकून पाहिलं.
आणि माझं हसणं थांबलं. अँजेला कुक पलंगाखालून तिच्या निष्प्राण डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती.
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
19 Jul 2015 - 7:18 am | खेडूत
वाचतोय !..
19 Jul 2015 - 8:39 am | सामान्य वाचक
मूळ कादम्बरीला छोट्या स्वरुपात आणि ते ही तिच्या गाभ्याला धक्का न लावता
तुस्सी ग्रेट हो
19 Jul 2015 - 8:49 am | अजया
बापरे.बेडखाली प्रेत! आता पुढे काय काय ?पुभाललटा!!
19 Jul 2015 - 9:39 am | देश
अतिशय उत्कण्ठावर्धक.अजुन किती भाग आहेत हो?
देश
19 Jul 2015 - 9:51 am | एस
भयानक! प्रत्येक भागावर काय नवीन प्रतिक्रिया द्यावी हे सुचत नाही. पुभाप्र.
19 Jul 2015 - 10:53 am | आनंद
जबरदस्त!
थरारक!! , कादंबरी खुप मोठी आहे त्या मुळे कदाचित ४० तरी भाग होतिल असे वाटतय.
अनुवाद अत्यंत सुरेख होतोय.
19 Jul 2015 - 11:00 am | सतोंष महाजन
बापरे खतरनाक आहे.
19 Jul 2015 - 11:01 am | अद्द्या
शेवटचा झटका ज ब र द स्त
19 Jul 2015 - 11:12 am | सतोंष महाजन
बापरे खतरनाक आहे.
19 Jul 2015 - 4:57 pm | मास्टरमाईन्ड
फारच भयानक!
19 Jul 2015 - 5:04 pm | आतिवास
नेहमीप्रमाणे ओघवता भाग.
अवांतर: मूळ कादंबरी वाचली नाही. पण अँजेला कुकचा खून होणं आणि तिचं प्रेत जॅकच्या घरात सापडणं हे फारच 'अपेक्षित' निघालं!
19 Jul 2015 - 6:24 pm | पद्मावति
अँजेलाचा मृतदेह गाडीच्या ट्रंक मधे मिळाला नाही तेव्हा जरा हायसं वाटलं होतं पण शेवटी ..जिसका डर था...
19 Jul 2015 - 7:15 pm | स्रुजा
बाप रे ! काय पण विकृत असतात हे सीरीयल किलर्स !! लवकर लिहा १३ वा भाग.
19 Jul 2015 - 11:21 pm | मास्टरमाईन्ड
टाका ना पुढचा भाग लवकर प्लीईईईईईईईईज
20 Jul 2015 - 12:52 am | जुइ
भाग ११ आणि १२ दोन्ही वाचले. नेहमीप्रमानेच थरारक झाले आहेत दोन्ही भाग. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
20 Jul 2015 - 9:05 am | नाखु
उघडा धागा वाचा आणि गुंतून पडा त्या कथानकात आणि वर असे शेवटाचे धक्के !!!
अभा मिपादस्केवाचक्प्रतिक्षाबुद्धीभुगा संघ
20 Jul 2015 - 9:13 am | प्रचेतस
हेच म्ह्णतो.
20 Jul 2015 - 9:08 am | अमृत
आता पुढच्या शनिवारची वाट बघावी लागणार. कठिण काम आहे. जरा लवकर भाग टाकायचा प्रयत्न करा प्लीज.
20 Jul 2015 - 10:53 am | मृत्युन्जय
लय खतरनाक वळणावर संपला आहे हा भाग. पुढचा भाग असाच लवकर येउ द्यात,
21 Jul 2015 - 8:30 am | प्रीत-मोहर
लैच भारी अनुवाद. मी मुळ पुस्तक मिळवुन वाचल. तरी हा अनुवाद वाचायला खूप मज्जा येतेय.
21 Jul 2015 - 3:46 pm | मोहनराव
निव्वळ थ रा र क!! पुभाप्र....
21 Jul 2015 - 11:18 pm | रातराणी
किती भाग आहेत?
22 Jul 2015 - 3:02 pm | आनन्दा
मस्तच.
22 Jul 2015 - 3:06 pm | मृत्युन्जय
हा भाग येउन ३ दिवस झाले अजुन पुढचा भाग आलेला नाही. तुमच्यावर विनाकारण विलंब केल्याबद्दल खटला का भरु नये ते सांगा
22 Jul 2015 - 11:15 pm | वॉल्टर व्हाईट
अगदी असेच. दर सात आठ तासांनी मिपा चेक करणे होतेच. "श्री बोका यांनी प्रत्येक भाग प्रकाशित करतांना पुढील भागाची टेंटेटिव डेट देत जावी असा आदेश जनता कोर्ट देत आहे" .. असा काहीसा तुमच्या खटल्याचा निकाल यावा.
23 Jul 2015 - 7:03 pm | विशाल चंदाले
मस्त लिहिताय अगदी डोळ्यासमोर चित्र दिसतंय आणि उत्कंठावर्धक लेखन.
लवकर येऊ द्या पुढचा भाग, धन्यवाद.
24 Jul 2015 - 5:13 pm | आनन्दा
बाकी मला अजून त्या स्केअरक्रो चा अर्थ कळला नाहिये. बघू कदाचित पुढे येईल.
28 Dec 2015 - 11:24 am | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग १३