हे हृदय कसे बापाचे......!
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....)
रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत!
अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही.
पण निसर्गाची किमया आणि माया अगाध!
............. ............. ................
एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल? पण जो चोच देतो, तो दानापाणी देतोच देतो. हि कथा आहे वाळवंटात राहणाऱ्या भाट तीतरची! Sandgrouse या पक्ष्यांची!
हे पक्षी वाळवंट, ओसाड जमिनीवर राहतात. ओसाडवाडीत झाडी नसल्याने, साहजिकच हे आपला निवारा खुरट्या झाडाझुडपात करतात.पिले झाल्यावर, घरात राहून आई पिलांची देखभाल करते, तर बाप दानापाण्याच्या शोधार्थ बाहेर पडतो.
............. ............. ................
रणरणत्या उन्हात शेकडो मैल पंखपीट केल्यावर, शेवटी कुठेतरी खळगाभर पाणी दिसते.बाप आनंदाने पाण्यावर झेपावतो. तापलेले पंख निवतात. स्वतः पोटभर पाणी पितो. मनात, घरातल्या नाजूक पिलांची आठवण, काळजी असतेच. त्यांच्यासाठी इतक्या दूर पाणी कसे घेऊन जायचे?
मग बाप जराशा खोल पाण्यात आपली छाती आणि पोट बुडवतो. हळूहळू छाती आणि पोटापासले मवाळ पंख पाणी शोषून घेतात. पुरेसे पाणी शोषून झाले कि हा बाप भरल्या हृदयाने आपल्या घरट्याकडे उडू लागतो.......परत तितकेच मैल, तितकीच रणरण!
घराजवळ येताच, त्याची पिले लुटूलुटू त्याच्या जवळ येतात. पाणी कुठेय?
बापाच्या भरल्या छातीत ते आपल्या इवल्या इवल्या चोची खुपसतात, पाणी पिऊ लागतात....
भरल्या हृदयाच्या बापाच्या चेहऱ्यावरचे भाव, बघणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू उमटवतात.
.......... ...........
भाट तीतरच्या छाती आणि पोटावरचे पंख blotting paper सारखे काम करतात, तर त्याच्या पिलांच्या चोची, शाई ओढून घेणाऱ्या dropper सारख्या काम करतात. याच निसर्गदत्त देणगीमुळे Sandgrouse भर वाळवंटात निर्धास्तपणे राहतो. वाढतो. पुढील पिढीचे संगोपन करतो.
मरुभूमीला जीवनाचा पंखस्पर्श होतो!
( अधिक माहितीसाठी Google, wiki इत्यादी आहेतच! पण bbc nature ने यांच्यावर एक अप्रतिम video clip तयार केली आहे. हा त्याचा धागा http://www.bbc.co.uk/programmes/p00mspbc.
विशेष विनंती : कुणी मिपाकराने भाट तीतरचा फोटो प्रतिक्रियेत डकवला तर, खूप बरे होईल. मला ते इथे डकवणे जमत नाहीये. तसे करणाराचे आगाऊ धन्यवाद.)
हो आणि, सर्व वाचक/लेखक बापांना (आणि बाप वाचक/लेखकांना पण )शुभेच्छा.
या लेखासाठी आमचे पक्षीमित्र आणि अभ्यासक श्री. राजेंद्र प्रधान यांनी शंकानिरसन करून मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार!
.

.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
फादर्स डे
मस्त.........
किती छान! पितृदिनानिमित्ताने
मस्त :) डॉक्यु बघेन.
आवडलं
मलाही आवडलं
छान
समयोचित व छान माहिती :)
वा! खूपच छान माहिती.
छान
वा तर्री ताई.
समयोचित
छान लेख!
अगदी समयोचित माहितीपूर्ण धागा
Chan
तर्रीताईचा लेख आणि स्वॅप्स
खूप सुंदर! थ्री चियर्स टू all
फारच सुंदर माहिती....पहीले तीन परिच्छेद तर अप्रतिम.....टचिंग....
लेख आणि स्वॅप्स यान्चा
आवडलं!
मस्त
खूप छान …