बेडर!

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
28 Nov 2008 - 3:41 pm

मध्ये माझ्या बाबांचे, ते शाळेत असतानाचे मराठी पाठ्यक्रमिक पुस्तक मला सापडले. त्यांनी ते जपून ठेवले होते. त्या वेळेस मी बराच निराश मनस्थितीत होतो. शिक्षण पूर्ण झालेले होते, पण पुढे काय करावे ते समजत नव्हते. कुणी मार्गदर्शन करणारा भेटत नव्हता. त्यात लोकांचे टोमणे ऐकून जीव विटून जायचा. अशा मनस्थितीत ते पुस्तक हाती पडले. अन त्यातल्या बेडरच्या व्यक्तिचित्राने माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. त्याचीच ही संक्षिप्त ओळख..!

सुप्रसिद्ध ब्रिटिश वैमानिक, डग्लस बेडर चा जन्म १९१० सालाचा. त्याचे वडील ब्रिटिश सैन्यात होते, ज्यांचा पहिल्या महायुद्धात मृत्यू झाला. त्या वेळेस बेडर फक्त १२ वर्षांचा होता. धाडसी स्वभाव जात्याच नसांनसांत भिनलेला. शिकत असतांनादेखील रग्बी, बॉक्सींग हे त्याचे आवडते खेळ. त्यातही लीड हेच राव करणार. एखाद्या गोष्टीने झपाटून टाकलं की धाडसी माणसाची काय अवस्था होत असेल ते याच्या आयुष्यावरून समजतं. याच झपाटलेपणाच्या जोरावर वयाच्या २१व्या वर्षी "रॉयल एअर फोर्स" [RAF] मध्ये निवडला गेला, घरच्यांचा प्रखर विरोध असतानाही.

पण बेडर खरोखरच अतिधाडसी होता. तो स्वभाव त्याला नडला. एका मित्राशी पैज लावून विमान कसरत करत असतांना, जमीनीलगत अवजड विमान चालवायच्या प्रयत्नात असतांना, त्याने अपघात ओढवून घेतला. गंभीररीत्या जखमी अवस्थेत त्याला दवाखान्यात आणले गेले. पुढे एका आठवड्याच्या आत त्याचे दोन्ही पाय गुढघ्यापासून कापून टाकावे लागले.

कुणासही वाटले नव्हते की तो जगेल. पण, तो जगला!!

अर्थात, नुसते जिवंत राहणे म्हणजे जगणे काय? इकडे जग त्याच्या मृत्यूच्या गोष्टी करत होते अन हा पठ्ठा पुन्हा विमान उडवण्याची स्वप्न रंगवत बसला होता!! पण या स्वप्नपूर्तीसाठी त्याला आधी चालणे तर आवश्यक होते!! लोखंडाचे दोन खोटे पाय त्याला बसवण्यात आले. पुढे काही दिवसातच त्याने आधाराची काठी वापरणे बंद करून टाकले. "माझा मार्ग मी स्वतःच बनवणार आहे" असे तो म्हणे. कसेबसे चालणे जमत होते, तर पुढचे ध्येय त्याने ठरवले की पूर्वी खेळायचो तसा गोल्फ खेळता यायला हवा. आता ज्याला चालणेही शक्य नाही त्याच्याकडून गोल्फ खेळू शकण्याची अपेक्षा कोणी करेल काय? गोल्फ खेळताना पहिला शॉट मारण्याच्या वेळेस त्याला तोल सावरता आला नाही, तो पडला. एक-दोनदा नाही, चांगला ४० वेळा पडला!! पण ४१ व्यांदा त्याला शॉट मारता येऊ लागला, न पडता! लवकरच त्याने कार चालवणेही सुरू केले!! त्याचे लोखंडी पाय सामावून घेण्यासाठी कार मध्ये खास जागा करावी लागली. बेडर जेव्हा सुटाबुटात चालत येई तेव्हा विश्वास बसत नसे की त्याचे दोन्ही पाय खोटे आहेत!

तब्बल ८ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर, १९३९ साली, एकट्याने विमान चालवायला मिळाल्यावर त्याला काय वाटले असेल? शब्दांत ते सांगणे कठीण आहे. त्याला पुन्हा RAF मध्ये प्रवेश मिळाला. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. ब्रिटिश सैन्याला वैमानिकांचा तुटवडा होता. प्रशिक्षित वैमानिक असतील तर त्यांना हवेच होते. पण कुणी पांगळा वैमानिकसुद्धा घ्यायला लागेल अशी कल्पना पण त्यांनी केलेली नसणार!! दुसऱ्या महायुद्धात त्याने असामान्य कामगिरी बजावली. शत्रूची २३ विमाने त्याने एकट्याने पाडली! प्रसिद्ध बिग विंग फॉर्मेशन तयार करण्यात त्याने मुख्य भूमिका बजावली!!

१९४१ च्या उन्हाळ्यात सगळ्यात सफल ब्रिटिश वैमानिकांत बेडर पाचव्या क्रमांकावर होता. ४ स्क्वॉड्रन्सचे नेतृत्व या पांगळ्या वैमानिकाकडे असे. Distinguished Flying Cross (DFC) आणि Distinguished Service Order (DSO) असे दोन पुरस्कार त्याला मिळालेले होते. शेवटी ऑगस्ट १९४१ मध्ये त्याच्या विमानाला अपघात झाला अन तो नाझींच्या तावडीत सापडला. पण त्याची कीर्ती तोवर सर्वदूर पसरली होती. नाझींनी त्याला जीवे मारले नाही, अटकेत ठेवले. त्या अपघाताबद्दल बेडर म्हणतो, "मी किती भाग्यवान, माझा लोखंडी पाय तेवढा मोडला. खरा पाय असता तर मला किती भयंकर जखमा झाल्या असत्या!! ". त्याने पळून जायचे प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. पुढे युद्ध संपल्यावर त्याची सुटका झाली. युद्धानंतरच्या विक्टरी फ्लाय पास्ट चे, ३०० विमानांच्या ताफ्याचे, नेतृत्व त्याच्या कडे होते. निवृत्तीनंतर त्याने अपंगांसाठीचे कार्य सुरू ठेवले. पुढे उत्तरायुष्यात त्याला ब्रिटिश नाईटहूड ने नावाजण्यात आले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

असा हा बेडर. प्रखर ईच्छाशक्तीचे दुसरे नाव म्हणजे बेडर. त्या पुस्तकात माझी बेडरशी जी ओळख झाली ती मी कधीच विसरणार नाही. जगात काही माणसे फार अचाट गोष्टी सहज करून जातात!! बेडर हा त्यापैकीच एक. मला तर त्याचा खूप आधार वाटतो. कितीही उदास मनस्थिती असू देत, त्यातून बाहेर काढण्याचे काम तो अगदी इमाने इतबारे करत असतो!! कितीतरी गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. नाही?

मुमुक्षू

संदर्भः बाबांचे शाळेत असतांनाचे मराठीचे पुस्तक [लेखक आठवत नाहीत त्याबद्दल क्षमस्व] आणि जालावरील काही वेबसाईटस.

[हा लेख जालावर इतरत्र अगोदर प्रकाशीत केलाय. किंचित बदल करून येथे प्रकाशीत करतोय.]

वाङ्मयइतिहाससमाजप्रकटनमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Nov 2008 - 3:53 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरदस्त व्यक्तिमत्व!!! ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

एकलव्य's picture

30 Nov 2008 - 9:51 am | एकलव्य

वाटले...

- अंगठाबहाद्दर

परिकथेतील राजकुमार's picture

28 Nov 2008 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार

डग्लस बेडर ह्या कुठल्याही परिस्थिती मध्ये हार न मानणार्‍या कर्तुत्ववान व्यक्ति ची ओळख करुन दिल्या बद्दल !
ह्या माणसाविषयी एका ब्रिटिश मैत्रिणीकडुन काहि ऐकले होते असे आता वाटतय पण नक्की काय ते लक्षात येत नाहीये. :(

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

ऋषिकेश's picture

28 Nov 2008 - 4:15 pm | ऋषिकेश

शत्रूची २३ विमाने त्याने एकट्याने पाडली!

सह्ही!!!! नावाप्रमाणे बेडर माणसाची ओळख करून दिल्याबद्दल आभार! :)

-(डरपोक) ऋषिकेश

संताजी धनाजी's picture

28 Nov 2008 - 4:32 pm | संताजी धनाजी

बेडर हा शब्द त्याच्यावरुनच आला का हो? :)
- संताजी धनाजी

राघव's picture

1 Dec 2008 - 12:27 pm | राघव

कल्पना नाही बॉ. पण डर हा शब्द हिंदी आहे, त्यामुळे मराठीत हा शब्द कसा आला असेल ते नाही समजत!

मनस्वी's picture

28 Nov 2008 - 4:34 pm | मनस्वी

नावाप्रमाणेच बेडर!

कितीही उदास मनस्थिती असू देत, त्यातून बाहेर काढण्याचे काम तो अगदी इमाने इतबारे करत असतो!! कितीतरी गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. नाही?

आम्हालाही नक्कीच मदत होईल.
या अचाट व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद मुमुक्षु.

स्वाती दिनेश's picture

28 Nov 2008 - 9:24 pm | स्वाती दिनेश

बेडर व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद मुमुक्षु.
अवांतर- आमच्या आजोबांचा एक मित्र डॉ. मानफ्रेड विंकलर, ह्याचाही एक पाय कापावा लागला होता. तो ही गाडी चालवण्यापासून बोलिंग खेळण्यापर्यंत आपल्या खोट्या पायाच्या आधाराने सारे काही करायचा.कित्येक दिवस म्हणजे आजोबांनी सांगेपर्यंत आम्हाला ते माहितच नव्हते.ह्या वर्षीच २० जानेवारीला कार्डिऍक ऍरेस्ट होऊन त्याला अचानक मृत्यू आला.हा लेख वाचताना त्याची एकदम आठवण होऊन उदास व्हायला झाले.
स्वाती

राघव's picture

1 Dec 2008 - 6:25 pm | राघव

खरंय.
असे वाटणारच. असे खूप लोक असतात ज्यांची मनाची इमारत एवढी भक्कम असते की आपण कल्पनाही करू शकत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींनी तुटण्यापर्यंत ताणल्या जाणारे आम्ही या लोकांकडून खरेच खूप काही शिकू शकतो.
अशा लोकांची व्यक्तिचित्रांची मालिका जर मिपावर तयार झाली तर किती चांगले होईल, नाही? :)
मुमुक्षु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Nov 2008 - 11:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खूप आशादायक लेख, धन्यवाद मुमुक्षू.
(ती भारतीय नृत्यांगना कोण जिचे दोन्ही पाय असेच खोटे आहेस, सुधा चंद्रन का?)

भाग्यश्री's picture

29 Nov 2008 - 3:28 am | भाग्यश्री

सुधा चंद्रनच.. मात्र तिचा एक पाय खोटा आहे असे मला वाटते..

लेख खूप छान..नावाप्रमाणे असणारी लोकं कमीच असतात! :)
http://bhagyashreee.blogspot.com/

रामदास's picture

29 Nov 2008 - 4:26 pm | रामदास

मोटर अपघातात एक पाय गेला.जयपूर फूट वापरते. आता बर्‍याच मालीकांमध्ये काम करते.

शितल's picture

29 Nov 2008 - 8:45 am | शितल

बेडर यांची माहिती देणारा लेख आवडला.
>>>कितीही उदास मनस्थिती असू देत, त्यातून बाहेर काढण्याचे काम तो अगदी इमाने इतबारे करत असतो!! कितीतरी गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. नाही?

अगदी खरे. :)

रामदास's picture

29 Nov 2008 - 8:53 am | रामदास

पाठ्यपुस्तकाचे नाव मंगलवाचन. ग.ल.ठोकळ यांनी संपादन केले होते. सातवीचे मराठीसाठी पाठ्यपुस्तक होते.

विसोबा खेचर's picture

29 Nov 2008 - 4:17 pm | विसोबा खेचर

लै भारी व्यक्तिमत्व.. वरील सर्वांशी सहमत...

तात्या.

राघव's picture

1 Dec 2008 - 12:25 pm | राघव

कि तुम्हा सगळ्यांस हे व्यक्तिमत्व आवडेल म्हणून!! :)
इतरांची अशी भयंकर दु:खे बघीतली अन् त्यातून बाहेर पडण्याची त्यांची ताकद बघीतली कि आपली दु:खे आपोआप क्षुद्र वाटायला लागतात! अशा लोकांना हॅट्स ऑफ!!

रामदासजी,
तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शतशः धन्यवाद! म्हणजे तुम्हांस हे व्यक्तिमत्व अगोदरच माहित असणारे, होय ना? या पाठाचे लेखक कोण होते ते आठवतंय काय? बहुदा श्री. शशीकांत कोनकर असावेत. नक्की नाही आठवत. :(

मुमुक्षु

चतुरंग's picture

1 Dec 2008 - 11:47 pm | चतुरंग

माझ्या वडिलांनी मला ही गोष्ट सांगितली होती लहानपणी!
अतिशय स्फूर्तिदायक अशी गोष्ट ऐकून पुष्कळ वर्षे झाली होती त्याला उजाळा देण्याचे काम केल्याबद्दल धन्यवाद.

चतुरंग

प्राजु's picture

1 Dec 2008 - 11:54 pm | प्राजु

जबरदस्त व्यक्तिमत्व.
धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

2 Dec 2008 - 10:22 am | राघव

सगळ्यांचे मनापासून आभार! :)
मुमुक्षु