आणि यांनी घडविली अमेरिका! हि लेखमालिका मला मिसळपाववरती सादर करू दिल्याबद्दल मी समस्त मिपाकारांचा आणि संपादक मंडळाचा आभारी आहे. माझी मिसळपाववरील हि पहिलीच मालिका. शेवटचा भाग लिहायला काही कारणांमुळे बराचसा उशीर लागला त्याबद्दल मी आपली नम्रपणे माफी मागतो.
पुन्हा एकदा या मालिकेविषयी - गेल्या वर्षी २०१४ मध्ये हिस्टरीवर 'The Men Who Built America' ही मालिका बघितली आणि त्या मालिकेची ओळख सर्वांना करून देण्याच्या इच्छेने हि मालिका लिहायला घेतली. अगोदर लिखाणाचा काहीच अनुभव नसल्याने व्हिडिओ ते शब्द असे भाषांतर करताना सुरुवातीला बर्याच चुका झाल्या. भाषा तशी यांत्रिक वाटायला लागली. अनेकांनी ते सौम्यपणे दाखवूनही दिले. त्याप्रमाणे सुधारणा करत करत या शेवटच्या भागापर्यंत येउन पोहोचलो आहे.
बर्याच जणांनी सुचवल्याप्रमाणे भारतातीलही उद्योजकांविषयी एक छोटीशी मालिका लिहायचा मानस आहे. छोटीशी यासाठी कारण त्यांच्याविषयी मराठीतून अगोदरच भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे या लेखाच्या निमित्ताने अशी पुस्तके आणि चित्रफिती यांच्या चर्चा त्यात घडतील. असो.
अगोदरच्या सर्व भागांना आपण भरभरून प्रतिसाद दिले. खात्री आहे तुम्हास हा शेवटचा लेखही आवडेल.
====================================================================================
यापूर्वी -
१) भाग १ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट
२) भाग २ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर
३) भाग ३ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी
४) भाग ४ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन
(हेन्री फोर्ड)
"मला सर्वांना वापरता येईल अशी मोटार बनवायची आहे." ३० वर्षांचा फोर्ड सर्वांसमोर आपल्या नवीन तयार केलेल्या मोटारीचे डिझाईन पेश करत होता.
"हि फोर्ड मोटार दणकट, वजनाला हलकी फक्त १००० पौंड वजनाची आहे. ४ सिलिंडर इंजिनाची हि गाडी ताशी ४५ मैल वेगाने धावू शकते. सध्या हिची किंमत फक्त $९०० आहे. हिच्या बरोबरीच्या गाड्या साधारणपणे $१५०० ला विकल्या जातात. आणि यामुळेच हि गाडी सर्वांना परवडणारी जगातील पहिली गाडी असेल."
असे म्हणून त्याने सर्वांच्या पुढे आपल्या गाडीचे एक चित्र सरकवले.
(फोर्ड मॉडेल'टी' चे डिझाईन)
( मॉडेल'टी' - अमेरिकेला बदलून टाकणारी गाडी)
तरुण आन्त्रप्रुनर हेन्री फोर्डने एक नवीन गाडी तयार केली होती. परंतु ती विकण्यासाठी त्याला ALAM (Association of Licensed Automobile Manufacturers) संस्थेकडून परवानगी घेणे आवश्यक होते. ALAM कडे स्वयंचलित वाहनाचे पेटंट होते ज्याद्वारे त्यांना अशा मोटारी कोणी बनवायच्या आणि विकायच्या यावर नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण मुभा होती. थोडक्यात ALAM कडे गाड्या बनवण्याची मक्तेदारीच होती असे म्हणाना. आणि अशा लोकांच्या हातात फोर्डच्या गाडीचे भविष्य अवलंबून होते.
"धन्यवाद श्री. फोर्ड. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू" असे सांगून त्या समितीमधल्या लोकांनी फोर्डची बोळवण केली. फोर्डला प्रामाणिकपणे वाटत होते कि ALAM कडून त्याच्या गाडीचे डिझाईन संमत होईल आणि त्याला मोटार बनवण्याची परवानगी मिळेल. शेवटी त्याने एकट्याने दिवस रात्र मेहनत करून हि नवीन गाडी तयार केली होती. त्या काळात लोकांकडे ज्या गाड्या होत्या त्या मोठमोठ्या आणि फक्त श्रीमंत लोकांनाच परवडतील एवढ्या महाग होत्या. शिवाय ते लोकही आपली गाडी काही स्वतः चालवत नव्हते. प्रत्येक घराने चालक ठेवले होते. त्यामुळे गाडी म्हणजे चैनीची वस्तू असेच तिच्याकडे पाहिले जात. मध्यमवर्गीय माणसांना गाडी घेणे परवडण्यासारखे नव्हतेच. कोणी त्याचा विचारही करत नव्हते. आणि फोर्डचे स्वप्न होते कि मोटार गाडी हि सर्वांना परवडणारी स्वस्त अशी रोजच्या वापरातली वस्तू असावी. (जशी बिल गेट्सची पर्सनल कम्प्युटरची होती.) फोर्डने वर्षानु वर्षे मेहनत करून ह्या नवीन गाडीचे डिझाईन तयार केले होते. त्याने त्याच्या आयुष्यातले सर्वात पहिले मॉडेल वयाच्या ३३ व्या वर्षी तयार केले आणि त्याला म्हटले क़्वाड्रा-सायकल.
(क़्वाड्रा-सायकल)
परंतु हि गाडी बनवण्यास महाग होती आणि तीचे रस्त्यामध्येच बंद पडण्याचे प्रमाणही जास्त होते. फोर्डचे दुसरे मॉडेल - मॉडेल -ए हे काहीसे नवीन अमेरिकेच्या गाडीच्या गरजा भागवणारे म्हणता येईल. परंतु हि गाडी त्याला ALAM च्या परवानगीशिवाय विकता येणे अशक्य होते.
(फोर्ड मॉडेल'ए')
ALAM काहीसे बाकी गाड्या बनवणार्या कंपन्यांना धमकीत ठेवून होते - गाडी बनवण्यासाठी आमच्याकडून पूर्वपरवानगी घ्या नाही तर आम्ही तुमच्यावर खटला दाखल करू. आपल्या त्या स्वभावाला जागत त्यांनी आपला निर्णय महिनोन महिने ताटकळत ठेवलेल्या हेन्री फोर्डला कळवून टाकला.
नामंजूर!
फोर्डला फार वाईट वाटले परंतु त्याने हार नाही मानली.
मुळात मोटार गाडी बनवण्याचे पेटंट कुणी स्वतःकडे ठेवावे हेच त्याला मान्य नव्हते परंतु ALAM सारख्या मोठ्या कंपनी बरोबर कोण लढणार? जर एकट्याने लढायचे असेल तर त्या आधी त्याला जनमानसात स्वतःचे नाव तयार करणे जरुरी होते. त्याने मग अलेक्झांडर विन्टन या जगातील सगळ्यात मोठ्या मोटार कार बनवणार्या कंपनीच्या मालकाला शर्यतीस ललकारले. हा अलेक्झांडर स्वतः एक अमेरिकेतील सर्वात जोरात गाडी चालवणारा म्हणून प्रसिद्ध होता. शिवाय तो ALAM समितीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारा समितीचा सदस्यहि होता. अलेक्झांडर विन्टनला जर स्वतः बनवलेल्या गाडीमधून शर्यतीत हरवले तर फोर्डला त्याच्या फायदा कदाचित आपली गाडी त्याच्या मनात भरवून आपला अर्ज ALAM कडून मंजूर करून घेण्यातही होणार होता. यामध्ये फक्त एकच अडचण होती.
हेन्री फोर्डने अगोदर कधीही कोणतीही गाडी शर्यतीत चालवली नव्हती.. आणि समोर होता अमेरीकेतील सर्वात वेगवान गाडी चालवणारा चालक!
थोडक्यात लगान पिक्चर सारखी परिस्थिती होती म्हणाना! येत नसलेला खेळ शिकून त्यात माहीर असलेल्या प्रतिस्पर्ध्याला हरवायचे होते. विन्टनकडे एक छानशी शर्यतीसाठी बनवलेली जोरात धावणारी गाडी आणि हेन्री फोर्डकडे आपल्या घराच्या गॅरेजमध्ये बनवलेली गाडी होती. शर्यत अतिशय चुरशीची झाली आणि फोर्डने विन्टनला शर्यतीत हरवले. या एकाच घटनेने फोर्डला अगदी प्रसिद्ध करून टाकले. सर्व वर्तमानपत्रांनी याची खबर घेतली. याचा पुरेपूर उपयोग फोर्डने करून घेतला. फोर्ड मोटार कंपनीसाठी त्याला भरपूर गुंतवणुकदार मिळून त्याने $२८,००० (आजचे $७००,०००) उभे केले. लवकरच हायलंड पार्क मिशिगनमध्ये त्याने स्वतःची पहिली गाडी बनवणारी कंपनी काढली.
(हायलँडपार्क-मिशिगन येथील फोर्ड कंपनी)
(जाहीरात)
त्याने गाड्या बनवण्याची एक नवीनच पद्धत शोधून काढली होती. एकावेळेस एक अशी प्रत्येक गाडी हातानी बनवण्याच्या ऐवजी त्याच्या गाड्या बनवताना त्याचे कामगार एका रांगेत थांबत आणि पुढे आल्येल्या गाडीच्या भागावर काम करून तो भाग पुढे पाठवत. (Assembly Line = जुळवणी सारणी) याच जुळवणी सारणीने आख्या कारखाना-जगताची वस्तू बनवण्याची पद्धत बदलून टाकली. लवकरच लोकांना या पध्दतीचे फायदे दिसू लागले आणि सर्वांनी ती पद्धत आजतागायत अवलंबली आहे.
फोर्डने काही मोठ्या प्रमाणावरील उत्पादन (Mass Production) शोधून नाही काढले. ते त्याच्या अगोदरपासून अस्तित्वात होते परंतु त्याने त्यामध्ये अधिक सुसूत्रता आणली.
(फोर्डची जुळवणी सारणी)
"जर एखादे उत्पादन परत परत सारखे सारखे बनवत राहिले तर एखादे गाडीसारखे किचकट उत्पादनहि अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी स्वस्तात बनवता येणे शक्य आहे" याची फोर्डला कल्पना आली होती. जुळवणी सारणीचे तंत्रज्ञान वापरून फोर्डचे कामगार इतर गाड्या बनवणार्या कारखान्यांपेक्षा ८ पट अधिक गतीने गाड्या बनवू लागले. पूर्वीं ज्या गाडीला बनवायला १२ तास लागत ती गाडी आता दीड तासामध्ये बनू लागली होती. दिवसाला १५ गाड्या त्याच्या त्या कंपनीमधून बाहेर पडू लागल्या. या नवीन पद्धतीमुळे फोर्डने सर्व कामगारांसाठी दिवसाला ८ तास काम असे सरसकट प्रमाणीकरण करून टाकले. आणि तेसुद्धा एका आठवड्यात फक्त ५ दिवस !
(फोर्डची जुळवणी सारणी - १९२४)
परंतु त्याला आता एका नवीनच प्रश्नाला तोंड द्यावे लागले. जुळवणी सारणीने त्याचे काम तर लवकर होत होते परंतु कामगारांना तेच तेच काम करून खूप कंटाळा येऊ लागला होता. कल्पना करा रोज कंपनीत कामाला जाउन तुम्हाला फक्त खिळे चाकाला लावण्यासारखे एकच काम तासन तास न कंटाळता न थांबता दिवसेंदिवस करायचे आहे तर किती दिवस करू शकाल? साहजिकच कामगारांनी दांड्या मारायला सुरुवात केली. काहींनी तर कंटाळून नोकरीच सोडून दिली अन ते हि २ आठवड्याची नोटीस वगैरे काही प्रकार नाही. तेव्हा नव्हताच म्हणा! तर सरळ कामावर यायचीच नाहीत. यामुळे असे व्हायचे कि एखादा कामगार कामावर आला नाही तर काम खोळंबून राहायचे. मग बदली कामगाराची व्यवस्था करून त्याने ते काम व्यवस्थित करेपर्यंत बराच वेळ जायचा. कारखान्यातून दिवसाला कमी गाड्या बाहेर पडू लागल्याने गाडीची किंमत वाढू लागली होती आणि हे फोर्डला मान्य नव्हते. त्यामुळे फोर्डने जास्तीचे कामगार ठेवायला सुरुवात केली. परंतु पुढे पुढे ते प्रमाण कंपनीत लागणाऱ्या १४,००० कामगारांसाठी पटावर ५२,००० कामगार एवढे वाढले. हे नक्कीच परवडणारे नव्हते.
त्यामुळे त्याने एक नवीनच शक्कल लढवली. फोर्डने आपल्या कामगारांना $५ प्रती दिवस एवढे वेतन द्यावयास सुरुवात केली. तेव्हा सर्वसाधारणपणे सर्व कारखाने $२ ते $२.२५ प्रती दिवस एवढेच वेतन द्यायच्या. दुपटीहून जास्त वेतन असलेल्या फोर्डच्या कंपनीमध्ये लोकांची रांग लागू लागली. त्याचा अपेक्षित तोच परिणाम झाला . कामगार रोज वेळच्या वेळी कामावर येऊ लागले आणि गाड्यांचे उत्पादनही वाढले. बाकीच्या कंपन्यांनी थोडी तक्रार केली परंतु फोर्डने आपला वेतन वाढीचा निर्णय कायम ठेवला. असेही म्हणतात कि फोर्डने आपल्या कामगारांना आपल्या गाडीचे ग्राहक बनवण्यासाठी वेतन वाढ केली. परंतु हे खरे नव्हते. कामगारांनी गाडी घेणे हे फक्त वेतनवाढीमुळे कामगारांना शक्य झाले.
($५ प्रति दिवस वेतनाची घोषणा केल्यावर फोर्ड्च्या कंपनीमध्ये नोकरी मागायला जमलेले कामगार)
परंतु एवढे सगळे होऊनही अजून काही ALAM ने त्यास परवानगी दिली नव्हती. त्यांच्या मक्तेदारीला झुगारूनच त्याने कंपनी तयार करून उत्पादन सुरूही केले होते. त्यामुळे ALAM ने त्याला कोर्टात खेचले. फोर्ड मोटार कंपनीमधून बाहेर पडणार्या प्रत्येक गाडीवर त्यांनी आपल्याला रॉयल्टी द्यावी आशी ALAM ची मागणी होती. त्याच सुमारास रॉकफेलरच्या स्टँडर्ड ऑईलवर खटला चालू होता. अमेरिका मक्तेदारीच्या विळख्यातून आता बाहेर पडू लागली होती. कोर्टाने स्टँडर्ड ऑईलच्या विरुद्ध निकाल देऊन ६ महिन्याच्या आत कंपनीचे विभाजन करण्यास सांगितले. स्टँडर्ड ऑईलचे ३४ वेगवेगळ्या छोट्या कंपनीमध्ये तुकडे पडले. मक्तेदारी संपुष्टात आली होती.
या निर्णयाचा फायदा फोर्डला झाला आणि फेडरल कोर्टाने हेन्री फोर्डच्या बाजूने निकाल दिला. हेन्री फोर्डच्या मोटारीच्या डिझाईनवर ALAM चा काही एक हक्क नव्हता. ते संपूर्णपणे फोर्डचे डिझाईन होते त्यामुळे ALAM ची केस रद्द करण्यात आली.
पुन्हा एकदा हेन्री फोर्ड आपल्या मोटारी नव्या उत्साहाने बनवण्यास सज्ज झाला. रॉकफेलर किंवा मॉर्गन सारखा तो मक्तेदारी तयार करणार नव्हता तर त्याविरुद्ध लढून त्याचे उत्पादन त्याने सर्वांसाठी परवडेल अशा किमतीमध्ये उपलब्ध करून दिले. त्याचे मॉडेल टी हे आता $८४० ला विकले जाऊ लागले. मध्यम वर्गीय कुटुंबांना हि किंमत सहज मानवणार होती.
फोर्डने खरंच संपूर्ण अमेरिकेला बदलले. त्याला कल्पना नव्हती कि या सर्वांचा अमेरिकेतील सगळ्याच भागांवर एवढा प्रभाव पडेल. त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक नवीन आन्त्रप्रुनर अमेरिकेत तयार झाले ज्यांनी अमेरिकेतील व्यवसायाला एका वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवले.
लहानपणीचे मित्र असलेले विल्यम हर्ले आणि आर्थर डेव्हिडसन यांनी सायकलच्या सांगाड्याला गाडीचे इंजिन लावून हर्ले डेव्हिडसन मोटारसायकली विकण्याची नवीन कंपनी काढली. मिल्टन हर्शेने फोर्डची जुळवणी सारणीची कल्पना वापरून आपले चॉकलेटचे उत्पादन वाढवले. शिकागोमधील व्यापारी विल्यम रीगलीने आपले छोटेसे च्यूइंगम अगदी पूर्ण देशात प्रसिद्ध केले. हॉलीवूडमध्ये पोलीश नागरिक मॅक्स फॅक्टरने पूर्वी फक्त सिनेमाताराकांसाठी विकली जाणारी सौंदर्यप्रसाधने अगदी छोट्या छोट्या औषधांच्या दुकानात ठेऊन सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आणि सर्वसामान्यांसाठी सौंदर्यप्रसाधने हे एक नवीनच उत्पादन बाजारात आणले. हि सर्व व्यावसायिकांची नवीन पिढी एका नवीन पद्धतीने सर्व गोष्टी करू लागली होती. आपल्या कामगारांना त्यांनी कामाचे ८ तास, कामाचा योग्य मोबदला आणि कारखान्यामध्ये सुरक्षित वातावरण या सर्वांची हमी दिली होती. रॉकफेलर, कार्नेगी आणि मॉर्गन यांचे युग आता संपायला आले होते. कामगारांना न्याय मिळाला होता. त्यांचे शोषण थांबले होते. परंतु याचा अर्थ असा नाही कि त्यांचे काही महत्त्वच उरले नव्हते. रॉकफेलरच्या पेट्रोलने फोर्डच्या गाड्या चालू लागल्या होत्या. कार्नेगीच्या स्टीलने फोर्डच्या गाड्या बनत होत्या आणि या फोर्डच्या कारखान्यांना उर्जा पुरवत होते मोर्गनचे विद्युत जनित्र!
नवीन जगासाठी या महामानवांनी प्रगतीचा पदपथ असा तयार करून ठेवला होता. याचा परिणाम अमेरिकेची डोळे दिपवून टाकणारी प्रगती, श्रीमंतीकडे झुकू लागलेला संपन्न असा मध्यम वर्ग आणि सर्वांसाठी संधीचे दारे उघडून देणारा देश अशी अमेरिकेची ओळख होण्यात झाली.
- समाप्त
प्रतिक्रिया
28 Apr 2015 - 3:15 am | श्रीरंग_जोशी
विस्तारभय अन वेळेत पूर्ण करण्यासाठी दर्जाशी तडजोड होणे ही दोन्ही आव्हाने यासारख्या विषयांवरील लेखमालिकेला असतात. या दोन्ही आव्हानांचा कौशल्याने सामना केलेला जाणवत आहे.
प्रत्येक भागागणिक होणारी वाक्यरचना व भाषेचा दर्जा यातली सुधारणा स्पृहणीय आहे.
या भागातील फोर्ड कंपनीच्या उदयाची कथा आवडली. शेवटचा सारांश तर छानच जमलाय.
याच प्रकारच्या भारतावरील लेखमालिकेच्या प्रतिक्षेत आहे.
28 Apr 2015 - 10:33 am | जेपी
+१
28 Apr 2015 - 1:40 pm | एस
+२
28 Apr 2015 - 8:31 am | सुनील
मालिका आवडली. हा भागदेखिल छानच.
28 Apr 2015 - 10:35 am | सौंदाळा
उत्कृष्ट मालिका
28 Apr 2015 - 12:14 pm | रायनची आई
छान माहितीपूर्ण मालिका झाली..सगळे लेख परत एकदा सवडीने वाचेन..
28 Apr 2015 - 12:34 pm | मदनबाण
सर्व भाग आवडले... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt
28 Apr 2015 - 1:56 pm | क्लिंटन
सगळेच लेख प्रचंड आवडले. खूपच छान.
28 Apr 2015 - 2:53 pm | चित्रगुप्त
फोर्ड वरील हा भाग खूपच आवडला.
'फोर्डची जुळवणी सारणी' वरून चाप्लिन चा 'मॉडर्न टाईम्स' आठवला.
.
या सिनेमाची कल्पना चाप्लिन ला फोर्ड वरून सुचली होती की काय? कालील फोटोतील मालक हा फोर्ड सारखाच दिसतो आहे:
गेल्या वर्षी डेट्रॉइटजवळचे फोर्डने वसवलेले गाव बघितले. केवळ अप्रतिम. बरेचसे फोटो काढले होते, त्याचा खरेतर एक धागा काढण्यासारखा आहे.
29 Apr 2015 - 2:16 pm | अजो
सगळे लेख आवडले
29 Apr 2015 - 6:30 pm | इशा१२३
सगळे लेख माहितीपुर्ण.आवडला हा भागहि.
29 Apr 2015 - 6:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
भाग नेहेमीप्रमाणेचं आवडला. एकचं गोष्ट खटकली ती म्हणजे "अंतिम" हा शब्द. अजुन लिहा ना.
29 Apr 2015 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर आणि माहितीपूर्ण लेखमालिका !
अजून काही वाचायला जरूर आवडेल !
29 Apr 2015 - 9:18 pm | मधुरा देशपांडे
उत्तम माहितीपुर्ण लेखन आणि सुयोग्य छायाचित्रांची जोड. लेखमालिका आवडली.
29 Apr 2015 - 9:46 pm | रेवती
मालिका अगदी वाचनीय झाली आहे. त्याला मिळालेली फोटूंची जोड त्याकाळातील जीवन सहजपणे नजरेसमोर आणते. ही मालिका संपली, आता दुसरी लिहा.
29 Apr 2015 - 10:46 pm | मराठे
हेन्री फोर्डच्या यशाप्रमाणेच त्याच्या आयुष्याची काळी बाजूची कहाणीही तितकीच रोमांचक आहे. त्याचा कामगार युनियन वरील अविश्वास, ज्युद्वेष, कंपनीत काम करणार्या कामगारांवर केलेलं मोरल-पोलिसिंग वगैरे गोष्टींही आहेत. त्याचा मॉडेल-टी वरचा विश्वास इतका प्रचंड होता की बाकीच्या कंपन्यांनी फोर्डसारख्या गाड्या कमी किंमतीत द्यायला सुरूवात केली तरी साहेब नविन बदल करण्यास अनुत्सूक! बर्याच कथा आहेत त्याच्या विक्षिप्तपणाच्या. मुळात फोर्ड उत्तम इन्वेटर होता (त्यामुळेच त्याची आणि एडिसनची चांगलीच दोस्ती होती).
अर्थात त्यामुळे त्याने मॅन्युफॅक्चरींग मधे आणलेले आमुलाग्र बदल नजरेआड करता येणार नाहीतच. अशा करड्या रंगछटा सगळ्यांच्यातच आढळतात.
(फोर्ड कुंपनीतला हमाल)
29 Apr 2015 - 10:49 pm | पैसा
खूपच छान लिहिले आहे!
29 Apr 2015 - 11:15 pm | मास्टरमाईन्ड
छान आणी मस्त लेख मालिका.
30 Apr 2015 - 11:59 am | बबन ताम्बे
सर्व भाग अतिशय आवडले. मालिका लवकर संपवलीत. अजुन माहीती मिळाली असती तर अजून उत्तम झाले असते.
उदा. राईट बंधू, वॉल मार्ट, मॅक डी वगैरे....
30 Apr 2015 - 2:01 pm | मुक्त विहारि
लेखमाला संपल्याची हूरहूर जाणवणार.