आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर

अमित खोजे's picture
अमित खोजे in जनातलं, मनातलं
9 Oct 2014 - 7:56 am

या पूर्वी . . .

आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट

कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला.

जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)!

पुढे चालू . . .
============================================================================================

"$१.६५ प्रती बॅरल", जॉन म्हणाला.
कोर्नेलिअस त्याच्याकडे बघतच राहिला. कोण कुठला हा लहानसा तेल विकणारा आणि मला '१.६५ प्रती बॅरल' असा भाव सांगतोय?
"हा भाव सध्याच्या भावापेक्षा १/३ आहे याची कल्पना आहे ना तुला? मला वाटते तुला अजून तेलाच्या धंद्यातले बरेच शिकायचे बाकी आहे!" कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट काहीश्या रागानेच म्हणाला.
"मला जेवढे माहिती असायला हवे तेवढे मला माहिती आहे" जॉनने बाणेदारपणे उत्तर दिले.
" आणि हा भाव मी तुला का देऊ?" कोर्नेलिअसने विचारले.
"कारण तुमची संपूर्ण आगगाडी मी माझ्या तेलाने भरवून टाकेन. आणि जर तुम्ही मला हा भाव नाही दिला तर मी दुसर्या कोणाची तरी भरवेन!" जॉन शांतपणे म्हणाला.

कोर्नेलिअस थंडपणे जॉनकडे बघत होता.

थोड्याच वेळात कोर्नेलिअसला ६० बॅरल प्रती दिन पुरवण्याचा करार करून सगळ्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सर्वात स्वस्त वाहतुकीचे दर यशस्वीपणे मिळवून जॉन कोर्नेलिअस व्हँडरबिल्टच्या आलिशान महालातून बाहेर पडला.

रेल्वेने घरी परत येताना त्याला आता एकच प्रश्न सतावत होता. आपली क्षमता २५ बॅरल प्रतीदिनपेक्षा कमी असताना कोर्नेलिअसला रोज तेलाच्या ६० बॅरल कुठून द्यायच्या?

============================================================================================

जॉन डी रॉकफेलर: (८ जुलै १८३९ - २३ मे १९३७)

John D Rockefellar

जॉन रॉकफेलरचा जन्म १८३९ मध्ये रिचफर्ड नावांच्या गावी न्यूयॉर्क राज्यात झाला. जॉनचे वडील बिल हा वैदू होता. गावोगाव भटकून जडीबुटी आणि कॅन्सरवरील खोटे औषधे विकणे हा त्याचा धंदा होता. त्याच्या सहा अपत्यांपैकी जॉन हे दुसरे अपत्य. बिलला कुटुंबाची काहीच काळजी नव्हती. लोकांना फसवत त्यांना काहीबाही विकत त्याचे आयुष्य खुशाल चालू होते. घरच्यांना टाकून मधूनच आठवण आल्यासारखा वर्षातून कधीतरी बिल घरी उगवायचा आणि एखाद दुसरा दिवस राहून परत अदृश्य व्हायचा. १८५३ मध्ये रॉकफेलर कुटुंब ओहायो राज्यातील क्लीव्हलँड गावात राहायला गेले. तेव्हापासून बिल - या सहा मुलांचा पिता - घरी आलाच नाहीत.

Cleaveland
(ओहायो राज्यातील क्लीव्हलँड गाव. येथेच जॉनने आपला पहिला तेल शुद्धीकरणाचा कारखाना टाकला. महत्वाची शहरे गोल केली आहेत.)

गरीब परिस्थितीत दिवस काढणाऱ्या जॉनला लहानपणीच कळून चुकले कि वडिलांवर विसंबून न राहता कुटुंबाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी त्याला स्वतःला उचलायला लागणार आहे. तिकडे बिल आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही न देता कॅनडाला निघून गेला आणि त्याने दुसरे लग्न करून नवीन आयुष्य सुरु केले.

जायच्या अगोदर बिल एक चांगले काम करून गेला. जॉनला खूप शिकायचे होते. त्याला कॉलेजमध्ये पण जायचे होते पण बिलने त्याला सांगितले कि तू व्यावसायिक शिक्षण घे ज्याने पुढे जाउन कुटुंबाचा चरितार्थ चालवता येईल. त्यानुसार जॉन लेखांकन - हिशोबानिसाचे काम (accounting) शिकला ज्याचा खरंच पुढे त्याला त्याच्या व्यवसायामध्ये खूप उपयोग होणार होता. याच शिक्षणाच्या जोरावर पुढे अमेरिकेतील सर्वात मोठी तेल कंपनी स्थापन होणार होती. स्टँडर्ड ऑईलच्या महाराज्याची पायाभरणी सुरु झाली होती.

लहानपणापासूनच जॉनमध्ये आन्त्रप्रुनरचे गुण दिसायला लागले. तो लहान मुलांसाठी कँडी बनवून ती आजूबाजूच्या मुलांना, शाळेजवळ, जाऊन विकत असे. कॅन्डीबरोबरच टर्की वगैरे काय वाटेल ते विकून तो पैसे उभे करून कुटुंबाचा खर्च चालवू लागला. त्यातून त्याचे थोडेसे पैसेही सुटू लागले.

नंतर १८५५ मध्ये त्याने वयाच्या १६व्या वर्षी पहिली नोकरी धरली. ह्युलेट आणि टटल नावाच्या कंपनीमध्ये त्याला सहाय्यक हिशोबानिसाची नोकरी मिळाली - दिवसाला ५० सेंट्स. हा पगार तेव्हासुद्धा खूप कमी होता. परंतु जॉनने उधळमाधळ न करता काटकसरीने पैसे वापरले. तसाच जॉन कट्टर ख्रिश्चनहि होता. देवावर त्याचा विश्वास होता. अगदी पहिल्या पगारापासून त्याने ताहित देण्यास सुरुवात केली होती. (ताहित - ख्रिस्चन लोक पगारातील १०% भाग हा धार्मिक कामासाठी आणि जनकल्याणासाठी दान करतात.) जेव्हा जॉनला पगारवाढ दिली गेली नाही तेव्हा ती नोकरी सोडून त्याने भागीदारीत स्वतःचा व्यवसाय सुरु केला. तो धान्य, मांस आणि इतर पदार्थांची दलाली करू लागला. पहिल्याच वर्षी त्याने त्याचा व्यवसाय एवढा भरभराटीस आणला कि त्याची वार्षिक उलाढाल $४,५०,००० च्या वर होऊ लागली. त्याच वेळेस त्याला त्याच्या पुढच्या उत्पादनाचा शोध लागला.

"तेल"

Oil

जॉनला तेलाचे भविष्य त्याच्या नजरेसमोर स्वच्छ दिसत होते. तेलामध्ये अमेरिकेचे भविष्य घडविण्याची ताकद होती आणि या ताकदीचा उपयोग करून घेऊन जॉन स्वतः श्रीमंत होणार होता. शुद्ध केलेले तेल म्हणजेच रॉकेल हे एक स्वच्छ जळणारे इंधन होते जे दिव्यांमध्ये वापरता येत होते. परंतु तेल जमिनीतून काढणे म्हणजे एक प्रकारचा जुगारच होता. तेलाची विहीर खोदायची परंतु तिला तेल सापडेल कि नाही याचा भरोसा नसायचा. जरी तेल सापडले तरीही ते किती दिवस विहिरीला राहील याची शाश्वती नसायची. आणि जॉन लहानपणापासून व्यवसायातील धोका (risk) शेकडो कोस दूर ठेऊन होता.

Oil_Refinary_House
(तेलाची विहीर)

तेल शुद्ध करणे हे तेल खोदून बाहेर काढण्यापेक्षा जास्त सोपे आणी स्वस्त होते. कोणीही आपल्या घराच्या मागे एक लोखंडाची टाकी आणि थोडेसे इतर सामान उभारून 'तेल शुद्ध' करू शकत असे. कित्येक लोकांनी घराच्या मागे तेल शुद्धीकरण सुरु केले.त्यामुळे तेलाच्या विहिरीत पैसे गुंतवण्यापेक्षा त्याने तेल शुद्ध करण्याचा कारखाना काढायचे ठरवले. वयाच्या २४व्या वर्षी आयुष्याची जमापुंजी $४००० खर्चून जॉनने त्याचा पहिला तेलशुद्धिकरणाचा कारखाना क्लीव्हलँडमध्ये काढला. मोरीस क्लार्क व सम्युअल आंड्र्यूज हे त्याचे भागीदार होते. बाकी उद्योजकांकडून कच्चे तेल विकत घेऊन तेल शुद्ध करून विकण्याचा व्यवसाय त्याने सुरु केला. तेव्हा सर्व उद्योजकांना तेल शुद्ध करण्यामध्ये साधारण सारखाच खर्च येत होता. परिणामी सर्वांच्या तेलाच्या किमतीही साधारण सारख्याच होत्या. त्यामुळे जॉनला कळत नव्हते कि या प्रतिस्पर्ध्यांवर कशी मात करावी. लवकरच तशी संधी त्याला चालून आली.

First_Refinary
(स्टँडर्ड ऑईलचा पहिला तेल शुद्धीकरण कारखाना)

शुद्ध तेल मोठ्या शहरांमध्ये वाहून नेण्यासाठी उद्योजक तर्हेतर्हेचे मार्ग वापरत. कोणी घोडागाडी वापरी तर कोणी मोठा उद्योजक रेल्वे. ज्याची जशी ऐपत तसे मार्ग. वाहतुकीला देखील साधारण सारखाच खर्च येई. त्यामुळे तेलाच्या किमती साधारण सारख्याच रहात. जॉनला छोटे मोठे व्यावसायिक बनायचे नव्हते. त्याला मोठी कंपनी स्थापन करायची होती. कंपनी मोठी असेल तर वाहतुकीचे दरही स्वस्त आणि परिणामी फायदाही जास्त हा सिद्धांत जॉनला माहिती होती.

Railway
(स्टँडर्ड ऑईल तेल शुद्धीकरण कारखाना - व्हीटिंग, इंडियाना)

आणि याच सुमारास व्हँडरबिल्टने जॉनला आपल्या भेटीस बोलावले.

"$१.६५ प्रती बॅरल", जॉन म्हणाला...

==================================================================
अमेरिकेत त्या काळापर्यंत रेल मार्ग बरेच झाले होते आणि रेल कंपन्या सतत वाहतूक करण्यासाठी नवनवीन मालाच्या शोधात होत्या. अमेरिकेतील सर्वात मोठ्या रेल कंपनीचा मालक कोर्नेलीअस व्हँडरबिल्टने जॉनला अफलातून एक असा सौदा दिला होता आणि जेव्हा उद्योगजगतातील सर्वात मोठ्या अशा माणसाशी असा सौदा होतो तेव्हा मागे परत फिरणे शक्य नसते.

जॉनला हवा तो भाव मिळाला होता आणि त्याला व्हँडरबिल्टला रोज ६० रेलकार्स भरून तेल पुरवठा करायचा होता. प्रत्यक्षात त्याची क्षमता अर्ध्याहूनही कमी होती पण त्याने हार नाही मानली. जॉनला त्यासाठी लवकरात लवकर त्याच्या कंपनीचा विस्तार करायचा होता. आणि म्हणून तो आपल्या धंद्यामध्ये गुंतवणूकदार शोधू लागला. दुर्दैवाने त्याच वेळेस रॉकेल लोकांच्या नजरेतून उतरू लागले होते. अत्यंत ज्वालाग्राही असल्याने आग लागून बर्याच घरांमध्ये अपघात घडले होते. त्यामुळे जे गुंतवणूकदार मदत करतील असे जॉनला वाटत होते त्यांनासुद्धा गुंतवणूक करण्यास मन वळवणे जॉनला अवघड वाटू लागले.

मग जॉनने स्टँडर्ड ऑईलची स्थापना केली आणि आपल्या ग्राहकांना एकसमान दर्जाचे तेल पुरवण्याचा मानस असल्याचे सर्व गुंतवणूकदारांना सांगितले. गुंतवणूकदारांनी त्यास मान्यता दिली. लवकरच स्टँडर्ड ऑईलचे नाव सर्व देशात झाले आणि त्याचा खप वाढू लागला. कंपनीची प्रसिद्धी बघता जॉनला अनेक गुंतवणुकदारसुद्धा मिळत गेले आणि त्याने नवीन कारखाने विकत घेण्याचा सपाटा लावला.

Standard Oil Logo
(स्टँडर्ड ऑईल कंपनीचे चिन्ह)

जॉनला मिळालेला वाहतुकीचा भाव जॉनच्या प्रतिस्पर्ध्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे ते स्पर्धेत मागे पडत गेले. कित्येक प्रतिस्पर्ध्यांच्या दुकानांना टाळे लागले. त्यांना सुरुवातीस कळेना कि रॉकफेलर त्याचे रॉकेल आपल्यापेक्षा एवढे स्वस्त कसे विकू शकतो? त्यांनी जेव्हा रेलरोड कंपन्यांकडे या बाबतची चौकशी केली तेव्हा त्यांना जॉनला मिळत असलेल्या सूट बाबत माहिती मिळाली. हे कळताच लोक रेलरोड कंपन्यांवर भडकले. त्यांनी त्यांनाही वाहतुकीत सूट देण्याची मागणी केली. परंतु रेलरोड कंपनीने तुमचे उत्पादन तेवढे नाही असे सांगत त्यांच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. लोकांनी मग पुढे मोर्चेहि काढले आणि रेल कंपन्यांना सर्वांना सारखा भाव द्यावयास उद्युक्त केले. (परंतु तरीही रेल कंपन्या लपून छापून मोठ्या तेल कंपन्यांना स्वस्त वाहतुकीचे भाव देतच राहिल्या.) इकडे रॉकफेलरचे तेलाचे उत्पादन भरमसाठ वाढतच होते. व्हँडरबिल्टच्या कार्स तर केव्हाच भरल्या आणि जॉनने बाकी रेलरोडच्या मालकांशीही बोलणी सुरु केली आणि त्यांच्याकडूनही त्याने त्याच्यासाठी विशेष भावासाठी घासाघीस करून ते पदरात पाडून घेतले. अमेरिकेमधील घराघरातून आता जॉनच्या रॉकेलचे दिवे घरातील अंधार दूर करू लागले. लवकरच स्टँडर्ड ऑईल देशातील सर्वात मोठ्या तेल उद्योगांपैकी एक रॉकेल बनवणारी कंपनी बनली. पण जॉनसाठी हे पुरेसे नव्हते. त्याची महत्त्वाकांक्षा अजून वाढीस लागली होती.

व्हँडरबिल्टच्या गाड्या भरूनही जॉनकडे बरेच रॉकेल उरायला लागले. आणि हि गोष्ट व्हँडरबिल्टच्या प्रतिस्पर्ध्यांच्या लक्षात आली. टॉम स्कॉट हा असाच एक प्रतिस्पर्धी व्हँडरबिल्टच्या खुर्चीची आस धरून असणारा. रेलरोडचा राजा बनायचे असेल तर जॉन रॉकफेलरशी सौदा करणे अपरिहार्य आहे हे त्यास माहित होते. स्कॉट त्याच्या एका सहकार्याला घेऊन क्लीव्हलंडला जॉन रॉकफेलरला भेटायला गेला. स्कॉटचा हा सहकारी एक उभारता व्यावसायिक होता आणि त्याचे नाव होते 'अँड्र्यू कार्नेगी'. भेटीचा सारा मसुदा अँड्र्यूने बनवला होता. जॉन बरोबरची त्यांची हि मिटिंग काही फार वेळ चालली नाही. त्यांची ऑफरच अशी होती.

"आम्ही स्टँडर्ड ऑईलला आमच्या नेहमीच्या भावामध्ये प्रतीबॅरल ४०% सवलत देऊ" अँड्र्यू म्हणाला.
जॉनने होकारार्थी मान हलवली.
"ह्या सौद्याची कागदपत्रे उद्या .. "
"त्याची गरज नाही." स्कॉटला त्याचे वाक्य पुरेही न करू देता जॉन म्हणाला, "तोंडी करार मला पुरेसा आहे."
रॉकफेलरला व्हँडरबिल्टपेक्षा अधिक चांगला सौदा स्कॉटकडून मिळाला होता. शिवाय तोंडी करार असल्याने याचा कुठेही कागदोपत्री पुरावा नव्हता. त्यामुळे रेलरोड कंपनीने कुणाला वाहतुकीत सूट दिली आहे हे देखील लोकांना समजणार नव्हते.

मात्र व्हँडरबिल्टला जेव्हा या कराराबाबत समजले तेव्हा त्याला बराच मोठा धक्का बसला. व्हँडरबिल्टचे रेलरोड क्षेत्रातील अबाधित सामर्थ्याला ठेच लागली होती. रॉकफेलरचे तेल अमेरिकेत वाहून नेणारा तो काही आता एकटाच मोठा रेलरोड मालक नव्हता. त्याला प्रतिस्पर्धी तयार झाला होता. रॉकफेलरचे रॉकेल अमेरिकेत घरोघरी पोहोचून त्याला तुफान पैसा मिळू लागला होता. आणि हाच पैसा वापरून रॉकफेलर रेलरोडमधील प्रतिस्पर्ध्यांना एकमेकांशी भांडवत खेळवत होता.

रॉकफेलरने सर्व तेल शुद्धीकरणाचे कारखाने विकत घेणे चालूच ठेवले होते.
"एक तर तुम्ही तुमची कंपनी मला विकून स्टँडर्ड ऑईलचे समभाग धारक व्हा नाहीतर तुमच्या दुकानाला टाळे ठोका" जॉन त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना सांगत फिरत असे. क्लीव्हलंडमधील २६ कारखान्यांपैकी जॉन रॉकफेलरने २० कारखाने विकत घेतले. उरलेल्या ६ जणांनी नकार दिला होता. परंतु त्यांनाही जॉनने सोडले नाही. बरे कारखाने विकत घेतले तर घेतले पण त्याचीही पूर्ण किंमत द्यावयास तो राजी नव्हता. बहुतेक सर्व कारखाने त्याने ५०% पेक्षा कमी दराने विकत घेतले. कारखानदार नाईलाजाने त्याला आपला कारखाना विकत होते कारण त्यांना आपले भविष्य समोर दिसत होते. बाजारात रॉकफेलरपेक्षा स्वस्त तेल विकणे त्यांना शक्य नव्हते कारण रेलरोड कंपन्या त्यांना त्यांचे रॉकेल वाहून शहरात न्यायला महाग भाव लावत होत्या. त्यामुळे जर याला आपला धंदा आत्ता विकला नाही तर आपल्या कुटुंबासमोर भिक मागायची पाळी येणार हे ते सर्व जाणून होते.

Share
स्टँडर्ड ऑईलचा समभाग (शेअर)

पुढे पुढे तर त्याने रेलरोड कंपन्यानकडून प्रतिस्पर्ध्यांच्या वाहून नेलेल्या तेलावरही स्वतःच सूट (रीबेट) मिळवायला सुरुबात केली. रीबेट म्हणजे एका बॅरल मागे रेलरोड कंपनी वाहतुकीच्या दरातील काही पैसे तेलाच्या मालकाला परत देई. हि पद्धत आजही अमेरिकेत चालू आहे. रेलरोड कंपनीला त्याने स्पष्ट सांगितले कि माझ्या तेलावर मला सुट मिळतीये ती ठीकच आहे पण माझ्या प्रतिस्पर्ध्यांचे जेवढे तेल तुम्ही वाहून न्याल त्या प्रमाणात मला माझ्या तेलावर अजून रीबेट पाहिजे. म्हणजे तेल दुसर्यांचे मात्र रिबेट घेतोय हा. तसे पाहिले तर हि शुद्ध लुट होती पण रेलरोड कंपन्यांनी त्यास आव्हान दिले नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी त्या रेलरोड कंपनी पासून दूर राहू लागले. मग जॉन त्या रेलरोड कंपनीचा एकमेव ग्राहक बनत असे. (Monopoly)

देशातील सर्व तेल शुद्धीकरणाचे कारखाने विकत घेऊन जॉन रॉकफेलर आपली मक्तेदारी (Monopoly) प्रस्थापित करू लागला होता.

"अजून एक कारखाना आपल्या ताब्यात आलाय" जॉन त्याच्या हिशोबानिसाला म्हणाला.
"ठीक आहे, मी बघतो त्या कारखान्याचा व्यवहार" हिशोबानिस म्हणाला.
"त्याची गरज नाही. तो कारखाना आपण बंद करीत आहोत." जॉन उत्तरला. हिशोबानिस आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला.

फक्त हे कारखाने विकत घेणे त्याचे ध्येय नव्हते. जॉनला आपला नफासुद्धा वाढवायचा होता. आणि म्हणूनच त्याने मग नवनवीन चाली खेळायला सुरुवात केली. एकट्याचे राज्य - मक्तेदारी - मोनोपोली - जर स्थापन करायची असेल तर खेळातील सर्व स्पर्धकांना मैदानाबाहेर घालवायचे असते आणि हे काम जॉन रॉकफेलरपेक्षा कोण अधिक चांगले करणार होते?

लवकरच उत्तर-पूर्व अमेरिकेतील ९०% तेल व्यवहार स्टँडर्ड ऑईल करू लागली आणि अशा प्रकारे देशातील पहिल्या मक्तेदारीचा जन्म झाला.

Standard_Oil_Refinery
(क्लीव्हलंड येथील स्टँडर्ड ऑईलचा तेल शुद्धीकरण कारखाना)

आपण एक मोठा राक्षस तयार केला आहे याची व्हँडरबिल्टला जाणीव झालीच होती. आणि लवकरच याला आळा घातला नाही तर तो आपल्यावरसुद्धा चाल करून येऊ शकतो याची त्याला चांगलीच कल्पना होती. त्याने मग आपल्या नंबर एकच्या प्रतिस्पर्ध्याला बोलावणे धाडले. व्हँडरबिल्ट आणि स्कॉट यांनी मिळून रॉकफेलरचे पूर्ण तेलाच्या वाहतुकीचे कंत्राट विकत घेण्यास ठरवले. हे सर्व कंत्राट विकत घेतल्यावर त्यांनी दोघांनी मिळून जॉन रॉकफेलरला पत्र पाठवले - "भाववाढ!"

रॉकफेलरला याचा अर्थ चांगलाच माहिती होता. व्यवसायातील त्याच्या मक्तेदारीला रेलरोड कंपन्यांनी समोरासमोर आव्हान दिले होते. आणि जॉन रॉकफेलर काही एवढ्या सहजा सहजी हार मानणारा नव्हता. या समस्येवर कसा तोडगा शोधायचा याचा तो रात्रंदिवस विचार करू लागला आणि त्याचे उत्तर त्याला त्याच्याच कारखान्यात मिळाले.

पाइप!

त्याने आपल्या कारखान्यात बघितले कि कच्चे तेल इकडून तिकडे नेण्यासाठी कारखान्यात मोठमोठे पाईप बांधले गेले होते. जर हे पाईप्स छोट्या अंतरासाठी बांधले जाऊ शकतात तर ते मोठ्या अंतरासाठीही बांधून वापरता येऊ शकतील. आणि असे जर झाले तर रेलरोडला ओईलच्या धंद्यातून कायमचा रामराम ठोकता येईल. परंतु यासाठी मोठ्या भांडवल गुंतवणुकीची गरज होती. मोठा धोकाहि होती पण जर हि योजना सफल झाली तर ती जॉनची जीत होणार होती.

Pipeline
(सुरुवातीला पाईपलाइन्सजवळ सुरक्षारक्षक ठेवत)

लवकरच दिवसाला १.५ मैल वेगाने पाइपलाईन टाकण्याचे काम सुरु झाले आणि जेव्हा संपले तेव्हा एकंदरीत ४००० मैलाचे पाईप्स क्लीव्हलंडमधील त्याच्या कारखान्यांना देशातील मोठ्या शहरांशी जोडत होते. पुढे आलेल्या रेलरोडच्या या समस्येला जॉन रॉकफेलरने असे उत्तर दिले होते आणि तेल वाहून नेण्याचा एक नवीनच मार्ग त्याने शोधून काढला होता जो आजतागायत चालू आहे.

गेली २५ वर्ष रेलरोड हा देशातील सर्वात मोठा उद्योग होता. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचा कणा होता. कोणीही त्यांना आव्हान देण्याची हिम्मत दाखवलेली नव्हती आणि जॉन रॉकफेलरने एकट्याने त्यांचा सामना केला होता. त्याला माहित होते कि त्याच्या तेलाविना रेलरोड फक्त जिवंत राहण्यासाठी धडपडतील आणि त्याच तेलाच्या जोरावर त्यांने या रेलरोड कंपन्यांना आपल्या ताब्यात ठेवले होते.

फक्त एका दशकात अमेरिकेने फार मोठी झेप घेतली होती. व्हँडरबिल्टसारख्यांचे लोहमार्ग देशाला एकसंध करत होते. रॉकफेलरचे रॉकेल अमेरिकेतील घर न घर उजळवून टाकत होते. सर्वांना खात्री होती कि आता सर्व उद्योगांनी मोठी उडी मारली आहे आणि तेव्हाच रोखे बाजार घसरू लागला.
१८७० मध्ये रेलरोड हा एक मोठा फायदेमंद उद्योग होता. ज्याच्याकडे भांडवल होते असा कोणीही उठून रेलरोड बांधू लागला होता. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. बरेच लोहमार्ग झाल्याने त्या कंपन्यांचे समभागांच्या किमती घसरू लागल्या. गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकी काढून घेऊ लागले. ३६३ रेलरोड कंपन्यांचे दिवाळे निघाले. रोखे बाजार (Stock Exchange) १० दिवसापर्यंत बंद होते. १८७३ ची हि मंदी अमेरिकन लोकांसाठी अगदीच नवीन होती. कोणालाच माहित नव्हते कि या मंदीमध्ये काय करायचे. आयुष्यात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर अमेरिकन लोकं बेकार होऊन फिरू लागले.

देश अशा मंदीमध्ये बुडालेला असताना जॉन रॉकफेलरला ती एक मोठी संधीच वाटली. सर्व बुडीत खात्यातले तेल कारखाने त्याने जवळ जवळ फुकट विकत घेतले. आणि जेव्हा मंदी संपली तेव्हा जॉन डी रॉकफेलर हा एक अजूनच श्रीमंत माणूस झाला होता. इकडे जॉन आपले साम्राज्य वाढवत असताना रेलरोड कंपन्या धडपडत होत्या. आणि त्याच वेळेस मंदीच्या सर्वोच्च क्षणी ..

कॉर्नेलीअस व्हँडरबिल्ट वयाच्या ८२ व्या वर्षी मृत्युमुखी पडला.

आपला मुलगा विल्यम व्हँडरबिल्टसाठी १०० मिलिअन डॉलर ची संपत्ती मागे ठेऊन कॉर्नेलीअसने कायमचे डोळे मिटले. जॉन रॉकफेलर याच्याशिवाय आपले साम्राज्य कधीच उभे करू शकला नसता.

परंतु टॉम स्कॉट आणि त्याचा अनुयायी अँड्र्यू कार्नेगी यांनी अजून हार मानली नव्हती. १८७३ च्या मंदिमधून ते सुखरूप बाहेर पडले होते. पिटस्बर्गच्या पुढे रॉकफेलरच्या पाइप लाईन्स जात नसल्याने त्या मार्गावरती अजूनही रॉकफेलरला रेलरोडची मदत घ्यावी लागत होती. स्कॉटने मग एक चाल खेळायचे ठरवले. त्याने तेलाच्या उद्योगात उतरायचे ठरवले. त्याने स्वतःची पाईप लाईन खोदायचे काम सुरु केले. जॉनला याची दखल घ्यावीच लागली.

"पेनसिल्व्हेनिया मध्ये मी तुम्हाला एवढा फायदा करून देत असताना माझ्या क्षेत्रात येण्याचे कारण?" जॉनने स्कॉटला विचारले.
"हे पाईप लाईन खोदायचे काम लगेच बंद नाही केले तर मी तुम्हाला देत असलेले सर्व तेल दुसर्या रेलरोड कंपनीला देईन." त्याने धमकी दिली.
"पिटस्बर्ग ते न्यूयॉर्क आमच्या शिवाय दुसरी कोणतीही रेलरोड चालते हे मला माहीतच नव्हते!" त्याला खिजवत स्कॉटने उत्तर दिले.

इथे टॉम स्कॉटने त्याला उघड उघड आव्हान दिले होते. स्कॉटच्या रेल्स वाहून नेत असलेल्या तेलापैकी २/३ तेल रॉकफेलरचे होते. पिट्सबर्ग मध्ये जे काही तेल शुद्धी करणाचे कारखाने होते त्यातील रॉकेल वाहून नेण्यासाठी जॉन ला स्कॉटच्या रेलरोडची मदत अपरिहार्य होती. तेथे अजून पाईपलाईन पोचली नव्हती. त्यामुळे पिट्सबर्गमधील रॉकेल न्यूयॉर्क पर्यंत वाहून नेण्यासाठी आपल्या मदतीशिवाय जॉनला पर्याय नाही अशी स्कॉटची खात्री होती आणि त्या जोरावरच त्याने रॉकफेलरला सामोरासमोर आव्हान दिले होते. परंतु जॉनने कुणाच्या डोक्यातही येणार नाही अशी खेळी करत त्याला उत्तर दिले.

रॉकफेलरने पिट्सबर्ग मधील आपले कारखानेच बंद करून टाकले.

याचा भरपूर तोटा स्टँडर्ड ऑईलला सहन करावा लागणार होता. परंतु जॉनसाठी जिंकणे महत्वाचे होते.

अर्ध्याहून अधिक मालवाहतुकीचा माल येणे बंद झाल्याने स्कॉट चिंतेत पडला. त्याला या खेळीची अपेक्षा नव्हती. हजारो नोकरदार त्याला कामावरून काढून टाकावे लागले. पगार कपात करावी लागली. पिट्सबर्गमध्ये अंदाधुंद माजली. लोक रस्त्यावर उतरले. स्कॉटच्या रेल यार्डमधील ३९ इमारती आणि १२०० रेल कार्स एका रात्रीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. टॉम स्कॉटच्या कंपनीची वाताहात लागली.

जॉन डी रॉकफेलर आता अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. त्याची एकूण संपत्ती १५० मिलिअन डॉलर्स (२२५ बिलिअन डॉलर्स आज) होती. स्टँडर्ड ऑईल ९८% रॉकेल ची एकटी मालक होती. परंतु जगातील सर्व मोठ्या भांडवलदारांना स्पर्धक हे असतातच. आणि भविष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धकाला रॉकफेलरने स्वतःच जन्माला घातले होते.

अँड्र्यू कार्नेगी!

ज्याचा हात धरून अँड्र्यूने धंद्यातील धडे गिरवले त्या टॉम स्कॉटची वाताहत केल्याबद्दल अँड्र्यू जॉनला बिलकुल क्षमा करणार नव्हता.

(क्रमशः)

==================================================================================

Octopus
स्टँडर्ड ऑईलचे वर्तमानपत्रातील (कु)प्रसिद्ध ऑक्टोपस चित्र

परंतु जेवढा जॉन डी रॉकफेलर कुप्रसिद्ध झाला होता तेवढा काही तो वाईट नव्हता. त्याने पहिल्यापासून अनेक चर्चना आणि समाजसेवी संस्थांना देणग्याही दिल्या. १८८९ मध्ये शिकागो विद्यापीठास त्याने $६००,००० ची देणगी दिली. तसेच न्यूयॉर्कमधील वैद्यकीय संस्थेसाही त्याने मोठी मदत केली. रॉकफेलर विद्यापीठ नावाने ती आज ओळखली जाते.
University
(रॉकफेलर विद्यापीठ)

२६ ब्रॉडवे न्यूयॉर्क येथे स्टँडर्ड ऑईल कंपनीचे मुख्य कार्यालय तयार झाले. (हीच ती प्रसिद्ध रॉकफेलर इमारत जिच्या समोर मोठा पाइन वृक्ष आहे. होम अलोन च्या दुसर्या भागाच्या शेवटी केविनला त्याची आई येथेच भेटताना दाखवली आहे.)

RCA
(रॉकफेलर इमारत)

Lunch at RCA
(आणि हाच तो प्रसिद्ध न्यूयॉर्कसिटी मध्ये गल्लोगल्ली दिसणारा RCA बिल्डींगवर काम करणाऱ्या कामगारांचा फोटो. - २० सप्टेंबर १९३२)

वयाच्या उत्तरार्धात त्याला एक विचित्र आजार झाला. त्याच्या अंगावरील सर्व केस निघून गेले. (जसे कॅन्सरवर उपाय करताना किमो थेरपी मध्ये जातात तसे. डोक्यावर टक्कल पडल्याने जॉन नंतर तर्हेतर्हेचे केसांचे टोप घालून मिरवत असे.)
Old John
(जॉन डी रॉकफेलर - केसाच्या टोपासाहित)

१९०४ मध्ये इडा टार्बेल नावाच्या एका स्त्री ने "history of standard oil" नावाचे पुस्तक लिहून जॉनने त्याच्या प्रतिस्पर्ध्यांची गळचेपी कशी केली याचे मोठे रोमांचक वर्णन केले. हे पुस्तक बरेच प्रसिद्ध हि झाले. १९११ मध्ये थिओडोर रूजवेल्टने आणलेल्या शर्मन कायद्यामध्ये स्टँडर्ड ऑईल कंपनीचे विभाजन झाले. त्यासंबंधी पुढील भागात.

सर्व चित्रे जालावरून साभार
संदर्भ:
१) जॉन रॉकफेलर बायोग्राफी - http://www.biography.com/people/john-d-rockefeller-20710159#synopsis
२) The Histroy of Standard Oil Book - Ida Tarbell - http://www.pagetutor.com/standard/
३) "Primary Source" Development of the Industrial U.S: Primary Sources Ed. Sonia G. Benson. Gale Cengage 2006 eNotes.com 9 Oct, 2014 - http://www.enotes.com/topics/random-reminiscences
४) John D Rockefeller Biography A&E Preview -
https://www.youtube.com/watch?v=IGqVrk6StRY&list=PLQZRhidpTiJqAF2_LvELN3...
५) The men who built America - History Channel

समाजजीवनमानअर्थव्यवहारमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2014 - 8:18 am | श्रीरंग_जोशी

माहितीपूर्ण सादरीकरण आवडले.

पहिल्या भागापेक्षा या वेळी भाषा कमी यांत्रिक वाटली परंतु अधिक सुधारणेला नक्कीच वाव आहे.

पुभाप्र.

एस's picture

9 Oct 2014 - 12:34 pm | एस

खूप आवडला हा भाग. पुभाप्र.

सोत्रि's picture

9 Oct 2014 - 10:41 am | सोत्रि

झक्कास लेखमाला!

- (आन्त्रप्रुनर व्हायचे स्वप्न असलेला) सोकाजी

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Oct 2014 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक भाग! चित्रांमुळे तो अधिकच आकर्षक झाला आहे.

काउबॉय's picture

10 Oct 2014 - 12:28 am | काउबॉय

हे नुसते वाचूनही रोमांच उठतो. प्रत्यक्ष घडवणारे काय ताकतीचे लोक असतील ?

_/\_

वाचतीये. अजस्त्र कंपन्या आणि त्यांचे कारभार अचंबित करतात.

वाचतिये.नविन माहिती कळतिये.इंटरेस्टींग!!
पुभाशु.

मुक्त विहारि's picture

10 Oct 2014 - 10:10 am | मुक्त विहारि

आवडला...

सौंदाळा's picture

10 Oct 2014 - 12:57 pm | सौंदाळा

मस्त पुभाप्र

मदनबाण's picture

10 Oct 2014 - 2:30 pm | मदनबाण

सुरेख लेखन... :)
पुढच्या भागाची वाट पाहतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, Japan to sign advance-pricing agreement to untie tax hassles