आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन

अमित खोजे's picture
अमित खोजे in जनातलं, मनातलं
30 Dec 2014 - 12:24 am

आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन

मागील भाग
१) भाग १ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट
२) भाग २ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर
३) भाग ३ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी

पूर्वार्ध :

कार्नेगी स्टील आतून पोखरली गेली होती. आणि कार्नेगीला तिला परत पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार होते. लोकांच्या मनातील आपली प्रतिमा त्याला परत चांगली बनवायची होती. या सर्व समस्या डोक्यावर असतानाच कार्नेगीला मात्र आता नवीनच भीती सतावू लागली होती आणि तिचे नाव होते ..

जे पी मॉर्गन!
------------------------------------------------------------------------------------------------------

J P Morgan
(जे पी मॉर्गन)

आपल्या वडिलांबरोबर काम करत असलेला जे पी गाळात चाललेल्या कंपन्यांना आपले लक्ष्य बनवत होता. तोट्यामध्ये असलेल्या आणि छोट्या छोट्या प्रतिस्पर्ध्यांशी लढत असलेल्या एखाद्या उद्योग्सामुहातल्या सर्व कंपन्या पैशाच्या बळावर विकत घेऊन त्यांचा कारभार सुधारून, त्यांच्यातली स्पर्धा नष्ट करून जे पी त्या फायद्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला यामध्ये यशही येत होते.

जॉन पिअरपाँट मॉर्गन (जे पी मॉर्गन) याचा जन्म १७ एप्रिल १८३७ रोजी हार्टफर्ड, कनेटिकट येथे झाला. त्याच्या वडिलांची पतपेढी होती. थोडक्यात ते बँकर होते. त्यांनी त्या काळात अर्थपुरवठा (Financing) हाच मुळात एक उद्योगसमूह (Industry) होऊ शकतो याचा विचार केला होता आणि त्या दिशेने ते त्यांच्या मुलाला - जे पी ला घेऊन काम करत होते. जेव्हापासून जॉनला अंकगणित येऊ लागले तेव्हापासून त्याच्या वडिलांनी त्याला व्यवसायाचे धडे द्यायला सुरुवात केली आणि तेव्हा एक नियम पक्का त्याच्या डोक्यात बसवला - धंदा एकाच पद्धतीने करता येतो - मॉर्गन पद्धतीने. आणि ती पद्धत म्हणजे
'स्वतःचा पैसा न वापरता दुसर्यांच्या पैशाची यशस्वी गुंतवणूक करून त्यातून स्वतःसाठी मोठा नफा मिळवणे'. हि पद्धत आत्मसात करून लवकरच जॉनसुद्धा एक नामांकित पतपुरवठादार/ गुंतवणूकदार म्हणून प्रसिद्ध झाला. काही दिवस वडिलांबरोबर काम करून १८७१ मध्ये त्याने स्वतःची बँक काढली जी पुढे जे पी मॉर्गन बँक म्हणून आजही ओळखली जाते.

जे पी मॉर्गन कलेचा मोठा चाहता होता. त्याचा कलाकुसरीचा संग्रह बराच मोठा होता. त्याच्या वडिलांना मात्र त्यांच्या मुलाने हे असे पैसे उडवलेले आवडत नसत. ते सारखे त्याला या पैशाच्या उधळपट्टीवरुन बोलायचे. त्याने त्याचा संग्रह नंतर मेट्रोपोलीटन म्युझिअम ऑफ आर्ट, न्यूयॉर्क येथे दान केला.

जॉनच्या वडिलांचा जॉनवर फार मोठा पगडा होता. कधी कधी जॉनला त्यांच्या पद्धतीप्रमाणे काम करणे अवघड होऊन जात असे. वडिलांच्या छायेखाली सतत दाबून गेलेल्या जॉनला स्वतःची एक वेगळी छबी तयार करण्याची इच्छा होऊ लागली. जॉनला धंद्यातल्या खाचाखोचा आता चांगल्याच समजू लागल्या होत्या. त्याला त्याच्या वडिलांची काम करण्याची पद्धत अगदी तोंडपाठ झाली होती. परंतु त्याला वाटत होते कि त्याने त्याच्या पद्धतीने काम केले तर तो अधिक चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. त्याच्या वडिलांची शिकवण होती कि कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठे धोके कधीच पत्करायचे नाहीत. या एका नियमावर ते त्यांचा व्यवसाय चालवत असत. परंतु जॉनला त्याच त्याच पद्धतीने काम करून कंटाळा आला होता. त्याला इतर नवीन नवीन मार्ग खुणावत होते. नवीन संधी दिसत होत्या. त्याला फक्त चालू व्यवसाय विकत घ्यायचे नव्हते तर ते शून्यातून निर्माण करायचे होते. त्याने जॉन रॉकफेलर आणि अँड्र्यू कार्नेगी यांना त्यांचे साम्राज्य उभे करताना पहिले होते आणि आता त्यालाही त्यांच्या प्रमाणेच स्वतःचे साम्राज्य उभे करायचे होते. पण असे करण्यासाठी त्याला एका नवीन प्रयोगाची, नवीन उत्पादनाची गरज होती ज्याला तो स्वतःचे नाव देऊ शकणार होता. यासाठी मग त्याने जगातील सर्व प्रसिद्ध संशोधकांवर आपले लक्ष्य केंद्रित केले आणि लवकरच त्याला हवी ती संधी चालू आली.

थॉमस एडिसनने आतापर्यंत जगातील बरेच महत्वाचे शोध लावले होते. वयाच्या १९ व्या वर्षापासून एडिसनने आपल्या शोधांची सुरुवात केली होती. सर्वात पहिले त्याने टेलीग्राफ मशीन सुधारले. नंतर स्टॉक टिकर मशीन, फोनोग्राम यांची निर्मिती केली. त्याच्या आयुष्यात एडिसनने १००० पेक्षा जास्त पेटंट आपल्या नावावर करून घेतले होते. आज वयाच्या ३१ व्या वर्षी एडिसन आपल्या आयुष्यातील आणि मानवाच्या आयुष्यातील एका फार महत्वाच्या शोधास जबाबदार ठरणार होता - वीज!

Thomas Alva Edison
(थॉमस अल्वा एडिसन )

न्यू जर्सी मधल्या मेनलो पार्कच्या एडिसनच्या प्रयोगशाळेला मॉर्गनने भेट दिली. एडिसन आपल्या सहकार्यांसोबत विविध प्रयोगांमध्ये गढून गेला होता.
"तर बुद्धिमान लोक इथे रहातात तर!" आत येताच मोर्गनने प्रयोगात गढलेल्या एडिसनला या वाक्याने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
"बुद्धिमत्ता हि तर कधीही न संपणारी सहनशीलता!" एडिसनने आपल्या प्रयोगावरचे लक्ष जराही विचलित होऊ न देत उत्तर दिले.
"मायकेल अँजेलो" त्यावर मॉर्गन उद्गारला. जॉन मॉर्गनचा इतिहासाचा आणि कलेचा अभ्यास गाढा होता.
दोन अतिशय बुद्धिमान व्यक्तींच्या भेटीची सुरुवात हि अशी झाली होती.

Edison Lab
(एडिसनची मेनलो पार्क येथील प्रयोगशाळा)

तेथील प्रयोगांवरून नजर फिरवत असताना विजेने पेटलेल्या प्रकाश फेकणाऱ्या एका छोट्या बल्बने मॉर्गनचे लक्ष वेधून घेतले.
"एका अदृश्य उर्जेच्या स्त्रोतातून एक बारीकशी धातूची तार उच्च तापमानाला गरम होते आणि शेवटी प्रकाश उत्सर्जित करते." एडिसनने जेवढ्या सोप्या शब्दात स्पष्टीकरण देत येतील तेवढे देत म्हणाला.

मानवाच्या उत्क्रांतीस कारणीभूत ठरणाऱ्या, चाक आणि अग्नी यांच्या इतक्याच महत्वाच्या; विजेच्या शोधास जे पी मॉर्गन साक्षीदार होता. त्याला या तंत्रज्ञानातील व्यावसायिक महत्व दिसू लागले होते आणि या विजेला त्याने स्वतःचे साम्राज्य तयार करण्यातील पहिली पायरी बनवण्याचे ठरवले.
तेथेच त्याने ह्या विजेवर चालणाऱ्या बल्बची कंपनी काढण्याचा निर्णय घेतला आणी एडिसनला आपला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव पुढे केला. एडिसन स्वतः एक आन्त्रप्रुनर होता. त्यानेही या योजनेचा स्वीकार केला.

जॉन मॉर्गनने प्रायोगिक तत्वावर ५ अव्हेन्यू, न्यूयॉर्क मधील आपल्या घरामध्ये विजेचे बल्ब लावण्याचे कंत्राटही एडिसनला दिले.

Bulb
(एडिसनने बनवलेल्या पहिल्या बल्बपैकी एक )

एडिसनला विजेसाठी मदत करण्याचे मान्य करून मॉर्गनने मोठा धोका पत्करला होता. कोणीही वापरत नसलेले उत्पादन नविनच बाजारात आणून लोकांना ते विकून त्यातून फायदा कमावण्याचा हा मार्ग जॉनच्या वडिलांनी त्याला शिकवलेल्या मार्गापेक्षा अगदीच उलटा होता. वीज हि अतिशय नवीन गोष्ट होती. मुळात वीज या अगोदर कोणी बघितलीच नव्हती. कुणालाही तिचे भविष्य माहिती नव्हते. त्यामुळे लोकांना तिचा उपयोग पटवून देण्यासाठी स्वतःच्या घरात सर्वप्रथम तिचा वापर करणे मॉर्गनला महत्वाचे वाटले.

लवकरच मॉर्गनचे घर एडिसनच्या प्रयोगशाळेत बदलून गेले. एडिसनने घराच्या मागेच एक विद्युत जनित्र बसवले. घरातून ४००० फुटांपेक्षा जास्त लांबीच्या तारा घराच्या भिंतींमधून आणि छतामधून फिरवल्या. साधारण ४०० बल्ब घरात बसवले. जगातील सर्वात पहिले बनवल्या जाणार्या बल्बपैकी हे पहिले ४०० बल्ब जे पी मॉर्गनच्या घरात लागले असे म्हणता येईल. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर शेवटी मॉर्गनचे घर पहिल्या प्रयोगाच्या उद्घाटनासाठी सज्ज होते.
जॉनने शहरातील अनेक मानांकित व्यक्तींना आणि त्याच्या वडिलांनासुद्धा या उद्घाटनासाठी बोलावले होते. परंतु त्यांना आपण काय दाखवणार आहोत याची जॉनने सुतराम कल्पना दिलेली नव्हती. सर्वांसाठी ते एक रहस्यच होते. सर्वजण घराच्या दिवाणखान्यात जमा झाले होते. दिवे लागणीची वेळ झाल्यावर नेहमीप्रमाणे रॉकेलचे दिवे न लावता अंधार झालेला पाहून सर्व पाहुणे बुचकळ्यात पडले. त्यांना कळेना कि आता काय करावे? काही जण जॉनकडे जाउन विचारणा करून आले पण त्यांना हसत हसत आणखी थोडा वेळ थांबा असे त्याने उत्तर दिले.

थोड्याच वेळात बैठकीच्या खोलीतील सर्व उपस्थित पाहुण्यांना उद्देशून, 'देवीयो और सज्जनो' तत्सम काहीसे बोलत एडिसनने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. "आज तुम्ही विज्ञानातील एक अभूतपूर्व चमत्कार पाहण्यास उपस्थित आहात. रॉकेलचे दिवे आता विसरून जा. आता विजेचे युग सुरु झाले आहे" असे म्हणत एडिसनने हातातले विजेचे बटण दाबले आणि संपूर्ण घर विजेच्या प्रकाशाने उजळून निघाले. सर्वजण आश्चर्याने थक्क होऊन पाहतच राहिले. कोणाला काही बोलताच येईना. "प्रत्येक बल्ब विजेवर चालतो आहे. येथे कुठेही रॉकेलचा किंवा बाकी कोणत्याही पदार्थाचा जळण म्हणून उपयोग केलेला नाही अन त्यामुळे धूरही नाही. वीज हि एक अदृश्य शक्ती आहे असे समजा जी आपल्याला प्रकाश देते." तेथील लोकांना समजेल अशा भाषेत मग एडिसनने प्रत्येकाचे शंका निरसन करण्यास सुरुवात केली.

जे पी मॉर्गन चे ५ अव्हेन्यू न्यूयॉर्कमधील घर हे विजेवरच्या दिव्यांचा उपयोग करणारे जगातील पहिले खासगी घर होते!

"मग बाबा, तुम्हाला कसे वाटले?" जॉन कोपर्यात थांबलेल्या आपल्या वडिलांकडे जाउन ख़ुशी ख़ुशी त्यांच्या हाती मद्याचा ग्लास देत म्हणाला.
"तू मला निराश केलेस पिअरपाँट" उसासा टाकून त्याचे वडील म्हणाले. "मला वाटले तू यापेक्षा अधिक काहीतरी चांगले दाखवणार होतास कि काय."
"म्हणजे?" आश्चर्याने जॉनने विचारले. "हि वीज म्हणजेच भविष्य आहे बाबा. " त्याने समजावण्याचा प्रयत्न केला.
"हे सर्व जत्रेत आणि मेळाव्यामध्ये दाखवण्यासाठी ठीक आहे. परंतु वरती धंदा सुरु करणे मला नाही पटत. मला वाटते तुला फसवले गेले आहे." असे म्हणून निराश होऊन त्याचे वडील तेथून निघून गेले.

पण तरीही तेथे जमलेल्या पाहुण्यांना हि कल्पना अगदीच आवडली होती. जॉनकडे सर्वजण आपल्या मागण्या घेऊन येऊ लागले.
"लवकरच तू तुझ्या कामामध्ये व्यस्त होणार आहेस." एडिसनच्या पाठीवर थाप मारून जॉन म्हणाला. "डारिअस मीलचे घर तुला विजेच्या दिव्यांनी भरून टाकायचे आहे."
"त्यांना थोडी वाट पहावी लागेल." एडिसन उत्तरला. "व्हँडरबिल्ट कुटुंबाने त्यांच्या अगोदर नंबर लावला आहे." जॉनने थोडे चमकून त्याच्याकडे पहिले पण नंतर हसत तो तेथून पुढे निघून गेला.
अशा तर्हेने जगातील श्रीमंत लोकांसाठी विजेवरच्या दिव्यांचे घर म्हणजे एक प्रतिष्ठेची गोष्ट झाली.

Christmas
(एडिसनच्या ख्रिसमस दिव्यांची जाहिरात)

आपल्या घराच्या विजेच्या दिव्याच्या उद्घाटनानंतर जॉन मॉर्गनसमोर आता धंद्याची मोठी संधी होती. वीज हि रेलरोड आणि रॉकेल नंतर तिसरी गोष्ट होती जी जे पी मॉर्गनला व्हँडरबिल्ट आणि रॉकफेलरच्या पंक्तीत नेउन बसवणारी होती. फक्त या धंद्यामध्ये गुंतवणूक करण्यास एकच अडचण होती. ती म्हणजे त्याच्या वडिलांनी दिलेली शिकवण. "जेथे कुठे धोका असेल तेथे गुंतवणूक करायची नाही" हा नियम त्याच्या वडिलांनी लहानपणापासून त्याच्या मनावर बिंबवला होता. आणि या विजेमध्ये केलेली गुंतवणूक वडिलांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध जाणारी होती. जॉनला काय करावे कळत नव्हते.

Menlo Park - Edison's Lab
(एडिसनची मेनलो पार्क येथील प्रयोगशाळा - वरील चित्रातील एडिसनची खुर्ची, एडिसनने शेवटी बसलेल्या ज्या स्थितीत सोडली अजूनही तशा अवस्थेत ठेवली आहे. संपूर्ण प्रयोगशाळेचे नुतनीकरण झाले - खुर्चीच्या खालील भाग सोडून)

जॉनने परत एडिसनची भेट घेण्याची ठरवले. एडिसनच्या न्यूजर्सीच्या प्रयोगशाळेत त्याला टेबलवर ठेवलेली विजेवर चालणारी छोटी खेळण्यातली आगगाडी दिसली. ती चालवून बघत असताना त्याला आपल्या वडिलांचे शब्द सारखे आठवत होते. "हे सर्व जत्रेत आणि मेळाव्यामध्ये दाखवण्यासाठी ठीक आहे. मला वाटते तुला फसवले गेले आहे." जॉनला खरंच वाटू लागले कि आपण फसवले तर नाही ना गेलो?
"तुला या धंद्यात कोणी स्पर्धक आहे का?" जॉनने विचारले.
"दखल घेण्यासारखा कोणीही नाही." एडिसनने बेफिकीरपणे उत्तर दिले. या वाक्यावर बाजूच्याच टेबलावर काम करणाऱ्या एडिसनचा सहकारी निकोला टेस्लाने एडिसनकडे पहिले परंतु एडिसनचे त्याच्याकडे लक्षच नव्हते.

"हम्म.", एडिसनच्या उत्तरावर खूष होऊन जॉनने पुढे तक्रार केली,
"माझ्या बायकोने तक्रार केली आहे कि तळघरातून फार आवाज येतोय." जॉन किरकिरला.
"तो विद्युत जनित्राचा आवाज आहे. ठीक आहे. मी कोणालातरी पाठवून तुमचे तळघर आवाज येणार नाही असे करून देतो." एडिसन त्याचे बोलणे पुढे रेटत म्हणाला कि "दुसर्या एका विषयावर बोलायचे झाले तर तुम्ही जर मला अजून गुंतवणूकदार मिळवून दिलेत किंवा अजून पैसे उभे करून दिलेत तर मी न्यूयॉर्क शहरात एक मोठे विद्युत जनित्र उभे करू शकतो ज्याने अर्ध्या मैल त्रिज्येच्या आतील सर्व घरांना वीज मिळू शकेल. मग तुमच्या तळघरात जनित्र ठेवण्याची गरज भासणारच नाही."

जॉनचे डोळे चकाकले. त्याने विचारले "अस्स? मग असे जर असेल तर संपूर्ण न्यूयॉर्क शहर विजेने उजळवून टाकायला काय करावे लागेल?"
"उम्म, मला विद्युत जनित्रांचे जाळे तयार करावे लागेल आणि .." एडिसन अचानक आलेल्या प्रश्नाने दचकुन चाचपडत म्हणाला.
"ते तू बघ. किती खर्च येईल ते मला सांग" जॉन त्याचे बोलणे तोडत मध्येच म्हणाला.
"मला अंदाज नाही. थोडी आकडेमोड करावी लागेल." एडिसन उत्तरला.
"ठीक आहे. सोमवारी सकाळी माझ्या टेबलावर फाईल हजर ठेव" जॉन तेथून निघत म्हणाला. "आणि हो, ती छोटी खेळण्यातली आगगाडी विजेवर चालते न? मला ती माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी पुढच्या आठवड्यात हवी. अजून एक तशीच तयार कर."

जॉन पी मॉर्गनने लगेच आपली गुंतवणूक वाढवत आजचे साधारण ८३० लाख डॉलर एडिसनला दिले आणि त्याला काम सुरु करायला सांगितले. दोघांनी मिळून नवीन कंपनी स्थापन केली "एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी". आणि अशा तर्हेने जॉनने आपले सर्वस्व या विजेच्या धंद्यात गुंतवले - आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध! त्याला स्वतःचे साम्राज्य तयार करायच्या हेतूने झपाटले होते. आणि आता तो मागे वळून बघायला तयार नव्हता. त्यासाठी त्याला कोणाच्याही विरोधात जावे लागले तरीही! अगदी त्याच्या वडिलांनी इतकी वर्षे शिकवलेल्या नियमांच्यासुद्धा! जेथे त्याच्या वडिलांना धंद्यातील धोका दिसत होता तेथे त्याला मोठी संधी खुणावत होती.

जॉन आणि एडिसन कामाला लागले. मॅनहॅटनमधील एक जुनी इमारत ते आपल्या कामासाठी निवडली. जगातील पहिले मोठे व्यावसायिक डी सी (direct current) विद्युत जनित्राचे बांधकाम तेथे सुरु झाले. पण फक्त वीज तयार करून उपयोग नव्हता. तिला वाहून नेण्यासाठीही काही पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागणार होत्या. त्यासाठी त्याने १५ मैलाच्या वर लांब असे खड्डे खणायला घेतले. रात्रंदिवस त्याचे मजूर काम करत होते. १ लाख फुट लांबीच्या तांब्याच्या तारा त्यांनी त्या जाळ्यात पसरल्या. आणि हळू हळू एडिसनचे विद्युत जनित्र मॅनहॅटनमधील हजारो घरांना आणि कंपन्यांना जोडले जाऊ लागले.
एडिसनचे हे मॅनहॅटनमधील वीज वाहून नेणारे तांब्याच्या तारांचे जाळे पुढे वाहून घातलेल्या विजेच्या जाळासाठी एक नमुना म्हणून आजही वापरले जाते.

DC Generator
(वाफेच्या शक्तीवर चालणारे एडिसनने वापरलेले पहिले डी सी विद्युत जनित्र. या जनित्राने एडिसनने ८५ गिऱ्हाइकांचे ४०० बल्ब प्रकाशित केले. )

विजेला उपयोगी बनवण्यासाठी जेवढे कष्ट एडिसनने घेतले तेवढे त्याच्या कोणत्याही बाकीच्या शोधांवर त्यांना उपयोगी बनवण्यासाठी घेतले नव्हते. रात्रंदिवस तो त्याच्या जनित्रांच्या आराखड्यांमध्ये आणि वीज वाहून नेणाऱ्या जाळ्याच्या आखणीमध्ये व्यस्त होता. कित्येक महिने त्याने यासाठी आपल्या प्रयोगशाळेत कामामध्येच घालवले. लवकरच त्याच्या मेहनतीचे फळ दिसून येऊ लागले. अर्धे मॅनहॅटन एडिसनच्या विजेच्या दिव्यांनी झळाळून निघाले. घराघरातून विजेचे दिवे दिसू लागले. रस्त्यारस्त्यांवर रात्री विजेच्या दिव्यांची रोषणाई होऊ लागली.

यात मात्र एकाच माणसाला दुःख झाले. तो म्हणजे जॉन रॉकफेलर. आता त्याच्या रॉकेलच्या मागणीला उतरती कळा लागणार होती. एक एक विजेवर चालणारे घर म्हणजे एक एक गमावलेला ग्राहक असे रॉकफेलरसाठी चित्र होते. आजपर्यंत रॉकेलवरती रॉकफेलरने आपले साम्राज्य उभे केले होते आणि हे विजेचे तंत्रज्ञान नजीकच्या भविष्यात रॉकेलच्या दिव्यांना तडीपार करून लावेल याचीहि त्याला खात्री होती. रॉकफेलर अगोदरच फार निर्दयी माणूस म्हणून प्रसिद्ध होता. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणसाच्या साम्राज्याला बसलेला असला विरोध त्याला पहायची सवय नव्हती.
रॉकफेलरने विजेची कुप्रसिद्धी करायचा प्रयत्न म्हणून विजेचे धोके लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न सुरु केला. विजेमुळे घरांना आग लागू शकते, विजेचा झटका लोकांना बसू शकतो इत्यादी इत्यादी वार्ता तो वर्तमानपत्रातून पसरवू लागला. परंतु लवकरच त्याला या सर्वाची गरज पडणार नव्हती. एडिसनला एक नवा स्पर्धक उभा राहू लागला होता. एका नव्या तंत्रज्ञानासाहित - निकोला टेस्ला त्याच्या ए सी विजेसह.

Nicola Tesla
(निकोला टेस्ला)

निकोला टेस्ला हा एडिसनकडे एक शिकाऊ उमेदवार (apprentice) म्हणून काम करत होता. त्याला लहानपणापासूनच विज्ञानाचे आणि आत्ता आत्ता तर त्यातही विजेचे जास्त वेड लागले होते. कितीतरी तयार केलेले त्याचे आराखडे एडिसनने आपल्या बाकीच्या शोधांमध्ये वापरलेले होते. परंतु एडिसनने कधीही त्याचे कौतुक केले नाही. त्याला पुढे जाऊ दिले नाही. हि एडिसनच्या व्यक्तिमत्वाची काळी बाजू म्हणता येईल जी कधीच पुढे आली नाही. त्यामुळे जेव्हा निकोला आपल्या ए सी मोटरची छोटीसी प्रतिकृती घेऊन एडिसनला दाखवायला आला तेव्हा एडिसनने त्याला झिडकारून लागले.
"ए सी करंट हा धोकादायक आहे म्हणूनच आपण डी सी करंट वापरतोय हे माहिती नाहीये का?" थोडेसे चिडूनच एडिसनने विचारले.
"परंतु ए सी करंटचे फायदे .. " निकोला आपले स्पष्टीकरण मांडणार तेवढ्यात एडिसन तेथून निघूनच गेला.

हताशपणे दुसर्या दिवशी निकोलाने आपला राजीनामा एडिसनच्या पुढ्यात आणून ठेवला.
"काय आहे हे?" एडिसनने विचारले.
"माझा राजीनामा" शांतपणे निकोलाने उत्तर दिले.
"कोणीही तुला नोकरीवर ठेवणार नाही." त्याला धमकावण्याच्या उद्देशाने एडिसन म्हणाला.
"मी माझी स्वतःची कंपनी काढेन." निकोला उत्तरला.
"तुझ्या ए सी मोटरसाठी कोणीही मदत देणार नाही. जा जाऊन बघ कोणी गुंतवणूकदार मिळतोय का ते." असे म्हणून एडिसनने त्याला तेथून हाकलून लावले.

निकोला आता तसा मुक्त झाला होता. त्याला त्याचे ए सी मोटरचे स्वप्न पुरे करायची संधी आली होती. आणि त्याला पाठबळ देणारा गुंतवणूकदारहि त्याला लवकरच मिळाला. जॉर्ज वेस्टिंगहाउस. जॉर्ज वेस्टिंगहाउस हा एक नवीनच बनलेला उद्योजक होता. आणि त्याला स्वतःचा उद्योग वाढवण्याची संधी या निकोलामध्ये दिसत होती.

"हा ए सी करंट किती दूरवर आपण नेऊ शकतो?" जॉर्ज वेस्टिंगहाउस त्याच्या नव्या भागीदारासोबत पुढची बोलणी करत होता.
"फक्त एक विजेचे मोठे जनित्र संपूर्ण पूर्व अमेरिकेला सहज पुरून उरेल." आत्मविश्वासाने निकोला उत्तरला. जॉर्ज वेस्टिंगहाउस त्याच्याकडे आश्चर्याने बघतच राहिला. आणि त्याच्या म्हणण्यात तथ्यहि होते. एडिसन आणि मॉर्गनने भले मॅनहॅटनमध्ये वीज आणली असेल परंतु डी सी करंट काही फार दूरवर नाही नेता येत. त्यामध्ये खूप उर्जा वाया जाते. ए सी करंट पाहिजे तेवढ्या दूरवर नेता येतो. अर्थात त्यामध्ये योग्य ते बदल करूनच.

निकोला टेस्ला मग अमेरिकेचे दौरे करू लागला. ए सी करंटची उपयुक्तता तो आपल्या प्रयोगांमधून लोकांना करून देऊ लागला.

Experiments

त्यासाठी स्थिर विद्युत आपल्या शरीरातून वाहून नेण्याचे त्याने अनेक प्रयोगही करून दाखवले. ते सर्व प्रयोग यशस्वी होऊन वेस्टिंगहाउस पॉवर कंपनीला कामाचे कंत्राटहि मिळू लागले. आणि लवकरच एडिसनचा प्रतिस्पर्धी म्हणून त्याची गणना होऊ लागली.

Tesla Power

"मला वाटले कि तुला कोणी स्पर्धक नाही आहे." जे पी मॉर्गन चिडून समोर बसलेल्या एडिसनला उद्देशून म्हणाला.
"दखल घेण्यासारखा कोणीही नाही." पूर्वीचेच उत्तर त्याने मॉर्गनला दिले पण आता खरे चित्र एडिसनच्याही डोळ्यांसमोर होते.
"मग हा निकोला टेस्ला ए सी करंट वरील नवीन नवीन आराखडे आणि पेटंट कसे फाईल करतो आहे?" जे पी समोर अशी हार मानण्यासारखी परिस्थिती कधी आलीच नव्हती. त्याला आपल्या वडिलांचा सल्ला आठवू लागला.

"हे सर्व जत्रेत आणि मेळाव्यामध्ये दाखवण्यासाठी ठीक आहे. मला वाटते तुला फसवले गेले आहे."

"ए सी करंट खूप जास्त व्होल्टेज वापरतो आणि त्यामुळेच तो अतिशय धोकादायक आहे. परंतु तुमच्या घरामध्ये डी सी आहे. तुम्ही आणि तुमची मुले सुरक्षित आहात. त्याची काळजी फारशी करू नये." एडिसन त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाला.
"पण असे जरी असले तरीही सध्या बाजारात ए सी आणि डी सी असे दोन प्रतिस्पर्धी तंत्रज्ञाने उपलब्ध आहेत. आणि या जगात त्यांच्यापैकी फक्त एकालाच जागा मिळेल." चिडून त्याच्यावर हातातले वर्तमानपत्र फेकत जे पी तिथून निघून गेला. एडिसनने ते वर्तमानपत्र उलगडून पहिले. त्यात निकोलच्या नवीन ए सी मोटरची बातमी होती.

AC System
(टेस्ला आणि वेस्टिंगहाउस कंपनीच्या ए सी मोटरची जाहिरात.)

AC Motor
(टेस्ला ए सी मोटर - अमेरिकन हिस्टरी म्युझीअम)

चिडलेला जे पी मॉर्गन आता सर्व खापर एडिसनवर फोडत होता. टेस्लाचे ए सी करंट तंत्रज्ञान एडिसनच्या डी सीचे बाजारातील हिस्सा खाउन टाकत होते.

The Current War
(The Current War)

मॉर्गन तिकडे अधिकाधिक चिडू लागला होता. एडिसन आता निकोलाला शह देण्यासाठी ए सी तंत्रज्ञानाच्या कुप्रसिद्धीला लागला होता. त्याने ए सी करंट कसा धोकादायक आहे याची प्रात्याक्षिके करायला सुरुवात केली. वर्तमानपत्रात लेख लिहिले. सर्व लोकांसमोर बर्याच प्राण्यांना ए सी करंटचा झटका देऊन जिवंत जाळले. यात त्यांनी कुत्रा, मांजर, एक माकड, घोडा आणि एका हत्तीलाही जिवंत जाळले.

टॉप्सी नावाचा ३६ वर्षांचा सर्कशीतला हत्ती एडिसनने ६६०० व्होल्टसचा शॉक देऊन मारला.

परंतु त्याला हवे तसे यश येत नव्हते. एकदा त्याला हवी तशी संधी चालून आली. न्यूयॉर्क तुरुंगाच्या अधिकाऱ्यांकडून त्याला एकदा एक पत्र आले. त्या पत्रात लिहिले होते कि त्यांना कैद्यांना मारण्यासाठी नवीन पद्धतीची गरज होती. पारंपारिक फाशीची पद्धत त्यांना थोडी क्रूर आणि अमानवीय वाटत होती. कदाचित एडिसनच्या विजेमधून त्यांना काहीतरी नवीन तंत्रज्ञान मिळेल अशी आशा होती. एडिसनला अजून काय हवे होते? ए सी करंट वापरून लोकांना त्याचा धोका समजावून द्यायचा अजून दुसरा कोणता चांगला मार्ग त्याला मिळाला असता? तो लगेच कामाला लागला. त्याने तयार केलेले यंत्र अतिशय सोपे होते. काही नाही. फक्त एका खुर्चीला त्यात बसलेल्या माणसाला त्याने ए सी करंट देत येईल अशी सोय केली आणि जगातील पहिली विजेवरील खुर्ची बनवली.

Edison's Death Chair
(एडिसनची मृत्यूची खुर्ची )

न्यूयॉर्क तुरुंगाने पत्रकारांना साक्षी म्हणून आमंत्रित केले. जगात पाहिल्यांदा माणसाला विजेचा झटका देऊन मारलेले पाहण्यासाठी बरीच मंडळी जमली. विल्यम केम्लर नावाच्या एका श्रीमंत फळविक्रेत्याला त्या खुर्चीत कैदी म्हणून बसवण्यात आले होते. त्याने कुऱ्हाडीने आपल्या एका सहकार्याला मारून टाकले होते. तारीख होती ६ ऑगस्ट १८९०. त्याच्या तोंडावर काळे फडके बांधले होते. तो ओरडू नये म्हणून तोंडही बांधून टाकले होते.
"तयार?" तेथील जमादाराने विचारले.
"हो तयार". ए सी करंटच्या बटणपाशी उभा असलेला कर्मचारी म्हणाला.
"सुरु कर"

William Kemler
(विल्यम केम्लरला मृत्युच्या खुर्चीत बांधताना )

जशी ती कळ दाबली गेली तसा खुर्चीत बसलेल्या माणसाला विजेचा शतक बसू लागला. तोंडात बोळा असल्याने त्याला ओरडता येईना परंतु त्याचे सर्व अंग थरथरू लागले. एका क्षणी त्यांना वाटले कि मेला विल्यम. म्हणून तेथील कर्मचार्याने कळ बंद केली परंतु जेव्हा तेथील वैद्याने तपासणी केली तेव्हा कळले कि विल्यम अजून जिवंतच होता. त्यामुळे कर्मचार्याला परत कळ दाबवायास सांगून जमादार त्याच्या मरणाची वात बघत बसला. थोड्याच वेळात विल्यमच्या अंगातून धूर निघू लागला आणि मांस जळल्यावर जसा वास येतो तसा वास तेथे बसलेल्या सर्व पाहुण्यांना येऊ लागला. सर्वजण अस्वस्थ झाले आणि तेथून उठून गेले. ए सी करंट देऊन माणसाला जिवंत भाजण्याची हि पद्धत सर्वांना अतिशय किळसवाणी वाटली.
विल्यम तर शेवटी मेला परंतु एडिसनने माणसाला जिवंत जाळले याने एडिसनची फार मोठी निंदा नालस्ती झाली. वर्तमानपत्रामधून त्याच्यावर टीकेची झोड उठली. ("Far Worse Than Hanging.") एडिसनची हि चाल त्याच्यावरच उलटली. जॉर्ज वेस्टिंगहाउस म्हणाला कि "कुऱ्हाडीने काम सोपे झाले असते".

जे पी मॉर्गन आणि एडिसनच्या प्रतिष्ठेला फार मोठा धक्का बसला. मॉर्गनच्या वडीलानी जे पी पाशी येउन त्याची चांगलीच कान उघडणी केली आणि त्याला एडिसन आणि त्याच्या विजेशी असलेले सर्व संबंध तोडून टाकायला सांगितले. जे पी मॉर्गनलाही काही अंशी ते पटत होते परंतु आपल्या नशिबाने असे व्हायचे नव्हते. जर त्याने एडिसनच्या विजेच्या कंपनीचा पतपुरवठा बंद केला असता तर विजेला पुढे कोणी वाली उरला नसता आणि लोकांच्या घरात अजूनही रॉकफेलरच्या रॉकेलचेच दिवे पेटत राहिले असते - रॉकफेलरचे "अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस" हे स्थान अबाधित ठेऊन!

जे पी मॉर्गनचा विजेवर अजूनही विश्वास होता आणि त्याला माहित होते कि हे तंत्रज्ञानच पुढे त्याला श्रीमंत बनवणार. एके दिवशी त्याला एका नवीन प्रकल्पासाठी निविदा मागवणारे पत्र आले. ते पत्र वाचून त्याला हायेसे वाटले. हा प्रकल्प जर त्याला मिळाला तर त्यामुळे एडिसनच्या चुकीमुळे विजेवर लागलेला बट्टा कायमचा पुसून जाणार होता.

Niagara
(नायगारा धबधबा)

नायगारा धबधब्याजवळील एका कंपनीने एक भला मोठा प्रकल्प हातात घेतला होता. जगातील सर्वात मोठा वीजप्रकल्प नायगारा धबधब्यावर बांधण्याचा. त्यासाठी १३०० मजूर अगोदरच कामाला लागून एक २.५ मैल लांब असा मोठा बोगदा तयार करत होते. एकदा तयार झाल्यानंतर धबधब्याची उर्जा १,२०,००० अश्वशक्तीची उर्जा तयार करू शकणार होते. संपूर्ण अमेरिकेत मिळून तयार होणार नाही त्याच्या पेक्षाही जास्त अशी वीज या जगप्रसिद्ध धबधब्याजवळ निर्मित होणार होती.

Tunnel
(नायगारा वीजप्रकल्पातील १०० वर्षांपेक्षा अधिक जुना बोगदा)

हि वीज उत्तर पूर्व अमेरिकेला वीज पुरवण्यासाठी काफी होती. परंतु नायगारा कंपनीने कोणत्या प्रकारचे जनित्र वापारावे याबद्द्लचा निर्णय अजून घेतला नव्हता. आणि त्यासाठीच तिने जे पी मॉर्गन - एडिसन आणि टेस्ला - वेस्टिंगहाउस या द्वयींना निविदा सदर करण्यास सांगितले होते. जगप्रसिद्ध आणि सागातील सर्वात मोठ्या वीजप्रकल्पावर डी सी करंट कि ए सी करंट तयार होणार याचा निर्णय आता ठरणार होता. आणि या प्रकल्पामुळे निवडलेल्या तंत्रज्ञानाला जगन्मान्यता मिळणार हे स्पष्ट होते.

जे पी मॉर्गनला हि एक मोठी सुवर्णसंधीच वाटली. या प्रकल्पामुळे त्याचे इतक्या दिवसांचे स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. परंतु या प्रकल्पासाठी गुंतवणूकही तेवढीच भरमसाठ करावी लागणार होती आणि यासाठी त्याच्या वडिलांनी कधीच परवानगी दिली नसती. या प्रश्नावर विचार करत असतानाच त्याला एक तार आली - त्याच्या वडिलांच्या मृत्यूची खबर! प्रवास करीत असतांना घोडागाडीला झालेल्या अपघातामध्ये त्याचे वडील जबर जखमी झाले होते आणि त्यामध्येच त्यांचा अंत झाला होता.

मॉर्गन हाऊसचा एकमेव वारसदार म्हणून सर्व जबाबदारी आता जे पी मॉर्गनवर येउन पडली होती. कुठे कुठे म्हणून मॉर्गन हाउसची गुंतवणूक नव्हती? रेलरोड, जलवाहतूक कंपन्या, स्थावर मालमत्ता, उत्पादन आणि बरेच काही. आता त्याचे वडील गेल्यानंतर त्याला तसे पहिले तर रान मोकळेच झाले. त्याला अडवणारा कोणीच नव्हता. अचानक त्याची सर्व मालमत्ता चार पट झाली आणि त्याच्याकडील पैसेही वाढले. एडिसनला तातडीने त्याने नायगारा प्रकल्पासाठी निविदा तयार करण्यास सांगितले.

तिकडे टेस्ला आणि वेस्टिंगहाउसहि आपल्या कामाला लागले होते. परंतु वेस्टिंगहाउस कंपनीची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. बर्यापैकी कर्जात बुडालेली असल्याने एवढा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेणे तसे पहिले तर तिला शक्य होणार नव्हते. जे पी मॉर्गनने याचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याने नाव न घेतां वेस्टिंगहाउस कंपनीच्या विरोधात अशा रीतीने प्रचार करायला सुरुवात केली कि शेअर बाजारातील तिच्या समभागांच्या किमती कोसळायला सुरुवात झाली. मॉर्गनने चुपचाप ते सर्व समभाग खरेदी करून टाकले. लवकरच कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येउन थांबली. वेस्टिंगहाउसला पतपुरवठा करण्यास कोणीही तयार नव्हते. शेवटी जॉर्ज वेस्टिंगहाउसने हार मानायचे ठरवले.

"मी आपल्या नायगाराच्या प्रकल्पासाठी अजून जास्त पैसे उभे नाही करू शकत आहे." जॉर्ज वेस्टिंगहाउस हताशपणे म्हणाला.
"का? काय झाले? तुमच्याकडे तर माझ्या ए सी मोटरचे आराखडे आहेत. तुम्हाला कोणीही पैसे देईन". निकोला म्हणाला.
"खरं तर परिस्थिती याच्या उलट आहे. तुझ्या ए सी मोटरच्या आराखड्यांचे पेटंट आहेत. आणि त्याला बांधील असल्येल्या मानधनामुळे (royalty) कोणीही मला पैसे देण्यास तयार नाही."
"माझ्या या तंत्रज्ञानामुळे मानवजातीला मिळणारे फायदे जास्त असतील तर ते मला पैशापेक्षा अधिक मोलाचे वाटतात! मी माझे हे तंत्रज्ञान तुम्हाला मानधनविरहित उपलब्ध करून देतो. हे घ्या" असे म्हणून टेस्लाने क्षणाचाही विलंब न करता आपले जॉर्ज वेस्टिंगहाउस बरोबरच्या कराराचे कागदपत्र त्याच्या समोर फाडून टाकले. धन्य धन्य तो निकोला टेस्ला ज्याने मानवाच्या उत्क्रांतीसाठी वेस्टिंगहाउसला वीज मानधनविरहित उपलब्ध करून दिली.

(कुठे तो आपण अजूनही गोडवे गात असलेला आपल्या शोधांसाठी एक पैसाही न सोडणारा एडिसन अन कुठे हा जवळ कपर्दीकही न बाळगता आपले सर्व शोध सर्वांना फुकट उपलब्ध करून देणारा निकोला टेस्ला! एक इंजिनिअर म्हणून माझा त्याला सलाम! निकोला टेस्लाने wireless transmission, wireless power transmission, death rays , electrostatics इत्यादी अनेक शोध लावले परंतु आयुष्याच्या शेवटी अतिशय गरिबीत तो मेला. त्याची कहाणी पुन्हा कधीतरी. )

Tesla Paper
(निकोला टेस्लाचा वर्तमानपत्रातील उल्लेख )

एकदा ए सी मोटरचे तंत्रज्ञान मानधनविरहित उपलब्ध झाल्यावर वेस्टिंगहाउस कंपनीकडे पैशाचा ओघ वाहू लागला. लवकरच ती पूर्वस्थितीत आली. जे पी मॉर्गनला शह द्यायचा असेल तर काहीतरी मोठे करावे लागणार याची जॉर्ज वेस्टिंगहाउसला जाणीव होती. आणि त्यासाठी त्याने दुसर्या एका प्रकल्पाची निवड केली.

शिकागो शहरामध्ये एक मोठे जागतिक प्रदर्शन भरणार होते. त्याच्या आयोजकांना त्याच्या उद्घाटनासाठी डोळे दिपवून टाकणारे, भव्य दिव्य असे काहीतरी हवे होते. आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण प्रदर्शन विजेने उजळवून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी जगभरातून निविदा मागवल्या. जे पी मॉर्गनला वाटले कि त्याच्याशिवाय कोणीच हा प्रकल्प मिळवू शकणार नाही. परंतु तो त्याचा एक भ्रमच ठरला. जॉर्ज वेस्टिंगहाउसने मॉर्गनच्या फक्त एक चतुर्थांश किमत त्याच्या निविदेमध्ये सादर केली. हे एक फार धाडसी पाउल होते. अर्थात वेस्टिंगहाउस कंपनीची या कामासाठी निवड झाली आणि टेस्ला व त्याचे सहकारी कामास लागले. उद्घाटनाच्या रात्री कळ दाबली गेली आणि संपूर्ण प्रदर्शन २ लाख दिव्यांच्या प्रकाशात झगमगाटून उठले. २ कोटी ७० लाख लोक त्यादिवशी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जेव्हा त्यांनी हा विजेचा अनोखा खेळ पहिला तेव्हा त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. लोकांना खात्री पटली कि लवकरच एक नवीन विजेचे युग सुरु होणार आहे. असे विजेचे प्रदर्शन जगात कोणीही पहिले नव्हते आणि या सर्वासाठी कारणीभूत होते जॉर्ज वेस्टिंगहाउस आणि निकोला टेस्लाचा ए सी करंट. अशा रीतीने १८९३ चे हे शिकागोचे प्रदर्शन टेस्लासाठी आणि विजेच्या विपणनासाठी फार महत्वाचे ठरले.

Chicago II
(निकोला टेस्ला आणि जॉर्ज वेस्टिंगहाउस यांनी उजळवून टाकलेले शिकागो येथील प्रदर्शन - १८९३)

Chicago - I
(शिकागो प्रदर्शन - १८९३)

या प्रदर्शनामुळे ए सी करंटची उपयुक्तता आणि सुरक्षितता अधोरेखित झाली. परंतु एवढ्यावरच या द्वयीचे यश थांबले नाही. नायगारा वीज प्रकल्पामध्ये कोणाची वीज वापरली जाणार यावर निर्णय झाला आणि नायगारा कंपनीने त्यांच्या प्रकल्पाचे काम वेस्टिंगहाउस कंपनीला बहाल केले.

Work
१९५३ - निकोला टेस्ला नायगारा वीजप्रकल्पामध्ये काम करताना - वेस्टिंगहाउस कंपनीचे जनित्र

Tesla Niagara
(नायगारा धबधब्याजवळ टेस्लाचा मोठा पुतळा उभारण्यात आलेला आहे)

जे पी मॉर्गनची अशा रीतीने एक मोठी हार झाली होती. त्याने लाखो डॉलर आतापर्यंत या विजेच्या धंद्यात गुंतवले होते. जॉन डी रॉकफेलरला मागे सारून अमेरिकेला प्रकाश देणारा म्हणून कीर्ती संपादन करायची त्याची इच्छा होती. आणि हा नायगारा प्रकल्प त्याला विजेच्या धंद्यात अग्रेसर ठरवणारा होता. परंतु आता सर्वच धुळीस मिळाले होते. परंतु तशा पराभवातही तो हार मानणारा नव्हता.

तो परत त्याच्या वडिलांच्या शिकवणीकडे वळला. प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबूत करणे. त्याने वेस्टिंगहाउसच्या विरोधात कोर्टात जाण्याची धमकी दिली.
"का उगीच कोर्टात जाण्याची भाषा करतो आहेस?" वेस्टिंगहाउसने विचारले. "तुला माहिती आहे कि यामुळे तुझा काहीही फायदा होणार नाही आहे आणि हि केस तू जिंकूही शकणार नाही. मग का आपले पैसे व्यर्थ घालवतोस?"
"हम्म, मी जिंकणार नाही हे मला माहिती आहे परंतु यात माझ्या बरोबर तुझेही पैसे वाया जातील ना?" छद्मीपणे हसत जे पी मॉर्गन उत्तरला.
"माझ्याकडे वाया घालवायला भरपूर पैसा आहे परंतु तुझ्याकडे नाही. आणि फक्त त्याच्या जोरावर मी तुला धुळीस मिळविन."
जे पी मॉर्गन हे म्हणत होता त्यात तथ्य होते. नायगारा प्रकल्पासाठी पैशांची वानवा असताना या कोर्ट-कचेर्या वेस्टिंगहाउसला परवडणार्या नव्हत्या.
"तुला काय हवंय?" वेस्टिंगहाउसने विचारले.
"तुला माहिती आहे ते" असे म्हणून जे पी तिथून निघून गेला.

निमुटपणे जॉर्ज वेस्टिंगहाउसने ए सी मोटरचे पेटंट मॉर्गनकडे सुपूर्द केले. परंतु जे पी मॉर्गन फक्त एवढ्यावरच नाही थांबला. नायगारा प्रकल्प हातचा गेल्यामुळे एडिसनची विजेची कंपनी मोडकळीस आली होती. त्याचबरोबर एडिसनची डी सी वीज पराभूत झाल्यासारखी होती. यावर उपाय म्हणून जे पी मोर्गनने सर्वात पहिले एडिसनला बाजूला करायचा निर्णय घेतला. एडिसन इलेक्ट्रिक कंपनीचे सर्व समभाग विकत घेऊन त्याने एडिसनला बाजूला काढले आणि कंपनीचे नाव ठेवले 'जनरल इलेक्ट्रिक'

लवकरच 'जनरल इलेक्ट्रिक' जगातील एक नावाजलेली कंपनी म्हणून गणली जाऊ लागली. ५ कोटी (आजच्या ५०० कोटी) डॉलरच्या वर तिची किंमत गेली. एडिसनचा अडसर रस्त्यातून गेल्यानंतर आणि टेस्लाचे ए सी चे पेटंट हाती लागल्या नंतर जे पी मॉर्गनने ए सी वीज बनवायला सुरुवात केली जे आजही विजेसाठी एक प्रमाण झाले आहे. 'जनरल इलेक्ट्रिक' च्या निर्माणामुळे वीज हा उद्योग जे पी ने एका संघटीत स्वरूपात आणला; जसे त्याने रेलरोड कंपन्यांबरोबर केले होते. त्याच्या इतर धंद्यातील पसार्यामुळे आणि नवीनच उभारलेल्या या 'जनरल इलेक्ट्रिक' विजेच्या सामर्थ्यामुळे तो अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणसांमध्ये गणला जाऊ लागला.

जे पी मॉर्गनची पत अमेरिकेत वाढली होती. आणि याचे एक सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अमेरिकन सरकारचे बोलावणे. दोन वर्षांच्या मंदीनंतर अमेरिकेतील सरकारी तिजोर्यात खडखडात जणू लागला होता. तेव्हा फेडरल रिझर्व संकल्पना अस्तित्वात नव्हती. देशाची अशी कोणतीही स्वतःची बँक नव्हती. देश चालवायला पैसे कुठून आणायचे यासाठी अधिकाऱ्यांनी विचार विनिमय सुरु केला आणि सर्वानुमते जे पी मॉर्गनला अमेरिकन सरकारला कर्ज देण्यासाठी बोलावणे धाडायचा निर्णय झाला. जे पी मॉर्गनला वाशिंग्टनला बोलावणे आले आणि त्याच्या समोर सरकारला कर्ज देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. जे पी ने १० कोटी डॉलरचे कर्ज तेव्हा सरकारला दिले आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला डुबण्यापासून वाचवले. फक्त विचार करा, जे पी मॉर्गन हा देशाची बॅंक होता. जेव्हा देशाला पैशाची गरज पडली तेव्हा संपूर्ण देशाने या एका माणसाकडून कर्ज घेतले आणि अर्थव्यवस्था सांभाळली. आता पर्यंतच्या इतिहासात असे क्वचितच घडले असेल.

क्रमशः

---------------------------------------------------------------------------------------
संदर्भसूची

१) http://www.biography.com/people/jp-morgan-9414735
२) http://www.smithsonianmag.com/smithsonian-institution/tesla-at-the-smith...
३) http://www.rfcafe.com/miscellany/homepage-archive/2012/edison-tesla-batt...
४) the men who built america - History

इतिहाससाहित्यिकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

30 Dec 2014 - 12:59 am | राघवेंद्र

खुप नविन माहिती मिळाली. धन्यवाद.

अण्णु's picture

30 Dec 2014 - 1:51 am | अण्णु

सुंदर मांडणी. भरपुर माहिती. लेख खुप आवडला. पुलेशु

अर्धवटराव's picture

30 Dec 2014 - 2:21 am | अर्धवटराव

ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन म्हणतात ते खरच. साला कुठे १९व्या शतकात अमेरीकेत हे सर्व उद्योग होत होते आणि आज २१व्या शतकात भारतात अजुनही घर-वापसी, टोल वगैरे प्रकरणं चालतात.

बेट्वीन द लाइन्स बरेच प्रश्न पडतात... एडीसनला हत्तीवर विजेचे प्रयोग करण्याची परवानगी कशी काय मिळाली असेल ? कोर्ट कचेरीच्या धमकीत असे काय होते कि ज्यापुढे वेस्टींगहाउसने हार पत्करली ?

अमित खोजे's picture

30 Dec 2014 - 5:32 am | अमित खोजे

इथे लिहित असलेली माहिती तसं पहिलं तर त्रोटक आहे. म्हणजे "the men who built america" या व्हिडीओ सिरीजमध्ये जेवढी माहिती दाखवली आहे तेवढीच मी इथे उर्धृत करत आहे. त्या व्हिडीओ सिरीजमध्ये सुद्धा पूर्ण माहिती दिलेली नाही तर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी जेवढ्या माहितीची गरज आहे तेवढीच माहिती दिली आहे.

प्रत्येक घटनेमागे बरीच कारणे आहेत.

जे पी मॉर्गनने जॉर्ज वेस्टींगहाउसला फक्त कोर्ट कचेरीची धमकी नाही दिली. जेपी मॉर्गनकडे जॉर्ज वेस्टींगहाउसपेक्षा तुफान पैसा होता. जॉर्ज वेस्टींगहाउसची कंपनी तो कवडीमोलाच्या किमतीने खरेदी करण्याची ताकद त्याच्या कडे होती. तर स्टॉक मार्केटवर वेस्टींगहाउस कंपनीला धुळीस मिळवण्याची करामत त्याने करूनही दाखवले होते. खाली सांगितलेल्या परिच्छेदाप्रमाणे -

जे पी मॉर्गनने याचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याने नाव न घेतां वेस्टिंगहाउस कंपनीच्या विरोधात अशा रीतीने प्रचार करायला सुरुवात केली कि शेअर बाजारातील तिच्या समभागांच्या किमती कोसळायला सुरुवात झाली. मॉर्गनने चुपचाप ते सर्व समभाग खरेदी करून टाकले. लवकरच कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येउन थांबली. वेस्टिंगहाउसला पतपुरवठा करण्यास कोणीही तयार नव्हते. शेवटी जॉर्ज वेस्टिंगहाउसने हार मानायचे ठरवले.

आणि जर का एकदा कोर्टात केस सुरु झाली असती तर त्यामध्ये वेस्टींगहाउसचे दिवाळे निघाले असते - निकाल काहीही लागला असला तरीही. अमेरिकेत अजूनही वकिलाची फी एवढी जास्त आहे कि मोठमोठ्या कंपन्या आजही कोर्ट कचेरीला घाबरून कोर्टाच्या बाहेरच तंट्याचे निकाल लावणे प्रशस्त समजतात आणि जे कायदेशिरही आहे.

हत्ती मारायला तेव्हा परवानगी लागत असेल असे वाटत नाही. अमेरिकन सरकारची स्वतःची बँक नसण्याचा तो कालखंड. Animal Conservation गेल्या ५० एक वर्षात सुरु झाले. एडिसनने तो हत्ती सरळ खरेदी करून त्यावर प्रयोग केला असेल. हाय काय नाय काय.

अमित खोजे's picture

30 Dec 2014 - 5:46 am | अमित खोजे

आणि तसेही मॉर्गनायझेशन - प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धेतून तडीपार करणे - हि तर जे पी मॉर्गनची नेहमीची पद्धत. या न त्या मार्गाने विजेच्या इंडस्ट्रीमधील प्रतिस्पर्धी बाजूला सारत त्याने GE ची निर्मिती केलीच जी पुढे वीज पुरवठा करणारी एकमेव कंपनी म्हणून बराच काळ टिकली. नंतर जेव्हा anti trust act सारखे कायदे लागू झाले तेव्हा कुठे बाकीच्यांना या क्षेत्रात यायला जागा मिळाली.

अनन्त अवधुत's picture

30 Dec 2014 - 3:02 am | अनन्त अवधुत

वाचतोय
छान सुरु आहे लेखमाला.
प्रत्येक भाग वाचताना घेतलेली मेहनत जाणवते.
लगे रहो|

लॉरी टांगटूंगकर's picture

30 Dec 2014 - 6:36 am | लॉरी टांगटूंगकर

अत्यंत माहीतीपूर्ण लेख!

सुरेख आणि माहितीपूर्ण लेखन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09
The U.S. Debt Continues To Climb

एस's picture

30 Dec 2014 - 12:35 pm | एस

वाचनीय लेखमाला.

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 1:22 pm | प्यारे१

वाचनीय लेखमाला!

मुक्त विहारि's picture

30 Dec 2014 - 3:24 pm | मुक्त विहारि

वाचत आहे,

हा पण भाग आवडला.

प्रत्येक भाग वाचताना घेतलेली मेहनत जाणवते.

रंगासेठ's picture

30 Dec 2014 - 4:42 pm | रंगासेठ

चारही लेख वाचले, अतिशय उत्तम माहिती रंजकतेने दिली आहे.
असं भारताच्या बाबतीत काही असावं का?

जेपी's picture

30 Dec 2014 - 5:14 pm | जेपी

लेख आवडला.

(जेपी*** )

नन्दादीप's picture

30 Dec 2014 - 5:16 pm | नन्दादीप

भरपुर माहिती व सुंदर मांडणी. आता टेस्ला च्या प्रतिक्षेत...

क्लिंटन's picture

30 Dec 2014 - 8:42 pm | क्लिंटन

सुंदर लेख.आवडला. निकोलस टेसलावरील लेखाची वाट बघत आहे.

श्रीरंग_जोशी's picture

30 Dec 2014 - 9:28 pm | श्रीरंग_जोशी

या रंजक व माहितीपूर्ण लेखमालिकेतील हा लेख खूपच आवडला.

मेन हू बिल्ट अमेरिका या डॉक्युमेंटरीमध्ये एक दृश्य आहे. लहानगा जेपी मॉर्गन वडिलांच्या हापिसात आकडेमोड करत असतो. तेवढ्यात वडिल एक मोठ्ठा लिफाफा घेऊन येतात अन त्याच्या समोर टेबलावर उपडा करतात.

त्यातून डॉलर्सच्या गड्ड्या पडतात. तेव्हा वडील म्हणतात, "This is how a million dollars look like"

यावर लहानगा मॉर्गन आश्चर्यचकित होऊन काही म्हणणार तेव्हा पैसे उचलून वडील म्हणातात, "Now learn to earn them by yourself".

पुभाप्र.

विनोद१८'s picture

31 Dec 2014 - 3:03 pm | विनोद१८

....स्फुर्तिदायक अशीच ही व्यक्तिमत्वे त्यांचे विचार व त्याबरहूकूम त्यांची करणी, मला वाटते म्हणुनच हा देश जगात आज इतका पुढे आहे, बरेच काही शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडून....!!!! उद्योगधंदे कसे करावेत याचा हा उत्तम नमुना.

पण त्यांचा इथल्या बँकावर विश्र्वास नाही, असे ऐकून आहे.

खरे-खोटे, त्या बँकांना माहीत.

पिंपातला उंदीर's picture

31 Dec 2014 - 4:19 pm | पिंपातला उंदीर

अप्रतिम लेख. The Prestige या चित्रपटात निकोला टेस्ला चे एक उपकथानक आहे . त्याला एडिसन आणि टेस्ला मधल्या कटू स्पर्धेची झालर दिली आहे . चित्रपट पाहताना हा संदर्भ कळला नव्हता . हा लेख वाचल्यावर तो संदर्भ कळाला . लई भारी

अमित खोजे's picture

2 Jan 2015 - 11:03 pm | अमित खोजे

The Prestige हा पिक्चर माहिती नव्हता. त्यात टेस्ला आहे म्हटल्यावर तर आवर्जून पाहणार.
ट्रेलर पाहिल्यावर असे वाटते कि "Now You See Me (२०१३)" आणि आपला आमिर खानचा "धूम -३" ची आठवण झाली.

पिक्चरची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jan 2015 - 8:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अतिशय अप्रतिम लेख. एडीसनच्या व्यक्तीमत्त्वाची काळी बाजु माहित नव्हती. आणि जनरल इलेक्ट्रिक ह्या कंपनीच्या जन्मकहाणीमागे एवढा काळा इतिहास असेल हेही माहित नव्हतं. पुढील भागाच्या प्रतिक्षेत :)

सुधीर's picture

2 Jan 2015 - 11:33 am | सुधीर

"धन्य धन्य तो निकोला टेस्ला ज्याने मानवाच्या उत्क्रांतीसाठी वेस्टिंगहाउसला वीज मानधनविरहित उपलब्ध करून दिली."

खूप नवीन माहिती मिळाली या लेखातून...

पैसा's picture

2 Jan 2015 - 10:17 pm | पैसा

खूपच मनोरंजक पद्धतीने लिहिता आहात! अतिशय थंड डोक्याने आणि क्रूर वाटेल अशा पद्धतीने धंदा करणारा माणूस हा!

आतापर्यंत लिहिलेल्या सर्वंच व्यक्ती अशा क्रूर आणि थंड डोक्याने कारभार करणाऱ्या होत्या. यांना पाहून मग प्रश्न पडतो - सरळ मार्गाने धंदा करताच येत नाही का? आणि केला तर आपण या उंचीवर पोहोचू शकू का?

वाईट मार्गाने करून नेहमीच वाईट होते असे जे म्हटले जाते ते खरे नाही हे मात्र ही सगळी उदाहरणे बघून पटते.

सत्याचा जय... हा इस्पीकचा एक्का यांनी लिहीलेला धागा म्हणूनच मला भावला होता.

राघवेंद्र's picture

3 Jan 2015 - 3:19 am | राघवेंद्र

+१

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2015 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा

एकदम लख्ख झालं बघा वाचून. :)

भुमन्यु's picture

28 Apr 2015 - 1:49 pm | भुमन्यु

अवांतर - टेस्लाच्या शोधांची यादी देणारा लेखः दुवा