‘टांग टांग टांग धडांग टांग टिक टिक..’ असा ढोलकी-हलगीचा आवाज कानावर पडला की सजग होऊन कान टवकारणार नाही तो मराठी माणूसच नव्हे ! तमाशा आणि खास करून लावणी ही खास ‘मऱ्हाटी’पणाची ओळख.
मराठी भाषा लोकप्रिय आणि समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे, तमाशा आणि त्यातही लावणी या नृत्य-प्रकाराचा. तमाशा ही गेल्या दोन शतकांपासून ग्रामीण मराठी माणसाची सर्वात लोकप्रिय लोक-कला आहे. सुरुवातीला मनोरंजनार्थ सुरु झालेल्या या कलेचा पाहता पाहता विकास होऊन ती सामान्य जन-मानसाच्या मुखात, बोलात सहज रुळून गेली. इतर कोणत्याही काव्य किंवा साहित्यप्रकारापेक्षा लावणी ही आपली अंगभूत सोपेपणा, गेयता, ठसकेबाजपणा, चटकदार बाज आणि चटपटीत शब्दरचना यामुळे सामान्य लोकात लोकप्रिय झाली.
लावणी या शब्दाचा मूळ शब्द ‘लावण्य-गीत’. रूढार्थाने लावणी हा शृंगारिक काव्य-नृत्य प्रकार. लावणी जास्तीत जास्त शृंगार-रस-प्रधान असली, तरी त्यातून डोकावणारी धार्मिकता आणि समर्पण-भावना लपत नाही. भक्ती व शृंगार या दोहोंच्या संयोगातून तमाशाचा जन्म झाला आहे. गण-गौळणीच्या माध्यमातून, सामान्य जन-मानसाला सहज समजू शकेल अशा रीतीने, रूढी-परंपरेने चालत आलेले अध्यात्मिक तत्वज्ञान मांडले आहे. लोकगीतांच्या माध्यमातून अध्यात्माची कडू मात्रा लोकांना सुघडपणे देणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा. एकनाथांचे भारुड, बहिणाबाईच्या ओव्या, समर्थांचे श्लोक ही त्याचीच उदाहरणे. आणि इथे लावणी.
लावणी व पोवाडा याच्या रचनकारांना विशेष करून ‘शाहीर’ हे संबोधन आहे. पेशवाईत प्रभाकर, परशराम, अनंत फंदी, सगनभाऊ, होनाजी बाळा, राम जोशी असे अनेक शाहीर झाले. त्यांनी अनेक रसदार रंगतदार लावण्यांची रचना करून माय-मराठीचे हे शिखर समृद्धीच्या कळसास नेऊन ठेवले.
तमाशा या अत्यंत लोकप्रिय लोक-कलेची, गण, गौळण, कलगी-तुरा, वग आणि लावणी ही अंगे. तमाशामध्ये शाहीराव्यतिरिक्त सरदार किंवा नायक, सोंगाड्या, ढोलकिया, एक नाच्या पोऱ्या आणि दहा–बारा तमासगीर असतात. अगदी सुरुवातीच्या काळात खेड्यातील जत्रेच्या वेळी गावकरी त्यांच्याकडून रात्रभर तमाशा करून घेत व त्याबद्दल त्यांना पायली–दोन पायली दाणे देत असत. हेच त्यांचे मानधन. ही प्रथा साधारणपणे १९२० पर्यंत होती. पुढे १९२५ पासून तमाशामध्ये नाच्या पोऱ्याऐवजी कोल्हाटणी आणि इतर स्त्रिया आल्या. सण, स्थानिक दैवतांच्या यात्रा, उरूस अशा प्रसंगी तमाशा हे एक मुख्य आकर्षण असे. ढोलकी, झांज, डफ, तुणतुणे, हलगी या मोजक्याच वाद्यांच्या साथीने लावणीनाट्याचे अद्भुत दृक-नादब्रह्म निर्माण केले जाई.
प्रथम गण, म्हणजे गणपतिस्तवन. नंतर गौळण. गौळणी मध्ये गोपीकृष्णाच्या प्रेमलीलांचे खुमासदार वर्णन केलेले असते. यातही अध्यात्मिक स्पर्श देण्यास शाहीर विसरले नाहीत. यानंतर एखादा रंगबाजीचा फार्स किंवा कलगी-तुरा आणि मग मध्यरात्रभर वगाचे लोकनाट्य असा मराठी तमाशाचा एकंदर थाट असे.
कलगी-तुरा म्हणजे झगडा, जुगलबंदी. स्त्री आणि पुरुष यांचे भांडण. हे सवाल जबाब या स्वरुपात असते. कलगी आणि तुरा म्हणजे अध्यात्मातील अनुक्रमे माया आणि ब्रह्म होय. या मायाब्रह्मवादालाच गुरुमार्गी विचारसरणीत शिव आणि शक्ती असे म्हणतात. शिव थोर की शक्ती ? माया आधी की ब्रह्म? असा हा पुरुषप्रकृतीचा झगडा परंपरेने चालत आला आहे. अशा रीतीने अध्यात्माच्या बाळगुटीचा वळसा तमाशा अन लावणीच्या मात्रेतून दिला जाण्याची परंपरा प्राचीन काळापासून चलत आली आहे आणि तिने मराठी भाषा विश्व बहारदार बनवले आहे.
लावणीचे सर्व-साधारणपणे फडाची लावणी आणि बैठकीची लावणी असे दोन प्रकार आहेत.
फडाची लावणी ही नाच्या,सोंगाड्या इत्यादी कलाकारांच्या साथीने नृत्य आणि अभिनयाच्या जोडीने ढोलकीवर गायली जाते आणि समुदायासमोर सादर केली जाते. बैठकीची लावणी तबला, पेटी, तंबुरी, सारंगी यांच्या साथीने गायिका किंवा गणिका अगर कलावंतिणी बैठकीत एकाच अथवा मर्यादित रसिकांच्या समोर सादर करतात.
१९५० पर्यंत तमाशा आणि लावणी हे कला-प्रकार उपेक्षित, काहीसे हीन दर्जाचे समजले जात. परंतु १९५० नंतर या प्रकारांना बरीचशी प्रतिष्ठा प्राप्त झाली. यामध्ये मराठी चित्रपटांचा मोठा वाटा आहे, हे नाकारता येत नाही. चित्रपटीय लावण्यांमुळे लावणी ही महाराष्ट्राच्या मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय समाजाच्या दिवाणखान्यात मिरवू लागली. आबाल-वृद्धांच्या मुखी घोळू लागली. पाहत पाहता लावण्यांनी इतकी लोकप्रियता मिळवली की डझनावारी तमाशापट निघू लागले अन मराठी चित्रपटसृष्टी लावणी-तमाशा या द्वयीने पादाक्रांत केली.
आज लावणी या कला-प्रकाराला राजाश्रय मिळाला आहे तथापि त्याची लोकप्रियता काहीशी उणावली आहे.
तमाशापटांची सुरुवात ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने झाली असली तरी तमाशा आणि लावणी यांना खरी चित्रपटीय लोकप्रियता मिळाली ती शांताराम वणकुद्रे यांच्या ‘पिंजरा’पासून. चित्रपटसंगीत आणि तमाशा-लावणी संगीत यांचा सुश्राव्य समन्वय करण्यात ‘पिंजरा’ चित्रपट प्रचंड यशस्वी झाला.
याच ‘पिंजरा’ मधली ही लोकप्रिय लावणी मला अतिशय भावून जाते ; अजूनही ऐकल्यावर रोमांच उभे करून जाते !
( चित्रपट पिंजरा , दिग्दर्शक व्ही. शांताराम, गीतकार जगदीश खेबूडकर, संगीतकार राम कदम )
‘पिंजरा’ चित्रपटातली ही लावणी आजोबा माझ्या बालपणी ग्रामोफोनवर लावत, तेव्हापासूनच त्या सुरांनी जबरदस्त मोहिनी घातली. पण वरकरणी शृंगारिक असणाऱ्या त्या शब्दांमागचा आर्त-गूढ अध्यात्मिक अर्थ समजायला कित्येक वर्षे लागली. पुढे चित्रपट पाहिला. मग प्रत्येक वेळी गाणे ऐकल्यावर त्या अर्थाचे अनेकानेक पदर मनात उलगडू लागले आणि हे लावणीगीत अधिकाधिक आवडत गेले.
असं म्हणतात की व्ही शांताराम यांनी लतादीदींना या गाण्यासाठी खास वेळ काढायला राजी केले. लतादीदी तेव्हा हिंदी चित्रपटगीतांमध्ये व्यस्त होत्या. चित्रपटातील इतर सर्व गाणी उषा मंगेशकरांनी गायली आहेत पण या गाण्याला फक्त दीदींचा दिव्य स्वरच न्याय देऊ शकेल अशी शांताराम वणकुद्रे यांची धारणा होती. आणि लता मंगेशकरनी या गाण्याचं खरोखरच अमृत केलं आहे !
गाण्याची पार्श्वभूमीच भलती रोचक आहे. गुरुजी, शुद्धतेचे मूर्तिमंत प्रतिक. तमाशा, लावणी हे हीन अभिरुचीचे छचोर प्रकार अशी त्यांची धारणा. तमासगीर चंद्रकला हिने गुरुजींना तमाशाच्या बोर्डावर उभे करण्याची प्रतिज्ञा केलेली. लावणीला तुच्छ लेखणाऱ्या गुरुजींना लावणीची महती सांगताना ती म्हणते , ‘गुरुजी, लावणी म्हंजे नुसता शिणगाराचा खेळ नाही बरं ! त्यातसुद्धा अध्यात्म असते ! ऐका !’
अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी
किस्नााने भुलविल्या यमुनेवर गौळणी
ऐकणाऱ्याला इथे ‘चतुरा’ म्हटले आहे, ‘शब्दांचा भावार्थ चातुर्याने समजून घ्या.’
वर वर दिसणारा शृंगारिक अर्थ सामान्यांसाठी. अध्यात्मिक अर्थ खरोखर ‘चतुर’च समजू शकेल ! सामान्य संसारिक मनुष्याला कृष्णाच्या रासक्रीडेमागचा अध्यात्मिक संदर्भ समजणे जसे कठीण आहे तसेच लावणीच्या मागे लपलेला अध्यात्माचा संदर्भ समजणे. गोपींच्या जलक्रीडेतून कृष्णाने गौळणींना भुलवून वर वर साध्या दिसणाऱ्या गोष्टी सांगून हा अध्यात्माचा धडा दिला आहे.
ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
जलशुद्धीचा संकेत असा की निर्वस्त्र होऊन पाण्यात स्नान करू नये. हा संकेत मोडून गौळणी यमुनेत स्नान करू लागल्या. लज्जेची वसने काठावर सोडली. जन-शिष्टाचाराच्या, नीतीमूल्यांच्या बंधनांच्या नक्षीदार घागरी पाण्यात भिरकावल्या आणि गोपी पाण्यात शिरल्या. त्यांचे यौवनांकित लावण्यपूर्ण देह सामावून घेताना जणू यमुनेच्या पाण्यावरच शिरशिरी उठली, रोमांच उभे राहिले. मस्तीत दंग होऊन, रिवाजांची बंधने झुगारून उन्मुक्तपणे , स्वच्छंदीपणे राधा आणि गोपी यमुनाजळात क्रीडा करू लागल्या. जणू स्वत:चे आणि जनाचे भान, विधात्याची शिकवण विसरून जीव संसाराच्या जंजाळात गुरफटून रमून गेला.
गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग
गोळा करुन वस्त्रं सारी
बसला चढून कळंबावरी
कृष्णाने पाहिले की सर्वमान्य संकेत मोडून गोपी यमुना नदीमध्ये निर्वसन होऊन उतरल्या आहेत आणि भान विसरून जलक्रीडेत मग्न झाल्या आहेत. आणि त्याने त्यांना अद्दल घडवण्यासाठी सगळ्यांची वस्त्रे गोळा करून यमुनाकाठच्या कदंब वृक्षावर नेऊन ठेवली.
कदंब हे कैवल्याचे प्रतिक. याच वृक्षाखाली बुद्धांना आत्मतत्त्वाचा बोध झाला. तोच बोध गोपींना करून देण्यासाठी कृष्ण या कदंबावर चढून बसला.
वस्त्रे नाहीत हे गोपींच्या जेव्हा लक्षात आले, तेव्हा त्या बावरल्या, घाबरून गेल्या आणि पाण्यातूनच कृष्णाची याचना करू लागल्या.
अरे कान्हा, नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन् लुगडी
‘नको रे निरखू आमची अनावृत्त ओलेती काया ! लज्जा आणि संकोचाने आमचा जीव अर्धमेला झाला आहे. दे ना आमची वस्त्रे परत !’ राधा विनवू लागली.
बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकांती
अजून का तुज त्या खेळाच्या, छंदाची आवडी ?
‘...बालपणी तू शृंगाराचा खेळ खेळत होतास पण आता आपण मोठे झालोत. बालपणी या देहाकर्षणाच्या क्रीडा गोड वाटत होत्या. पण आता तर तू ज्ञानी आणि परिपक्व झाला आहेस. आता तुला या देहाच्या अनावृत्त दर्शनाची कसली ओढ ? बालपणीच्या त्या वासनेच्या खेळाची आवड तुला या ज्ञातेपणीही वाटावी हे कसे ?’
इथे ‘बालपणी’ याचा अर्थ शब्दश: बालपणी असा घेतला तर शृंगारिक होतो. पण गूढार्थ हा की, देहाचे आकर्षण आणि त्यातून केलेल्या वासनेच्या क्रीडा यांमध्ये रस वाटणे हे ‘बाल’पण ! अध्यात्मिक प्रगल्भता, परिपक्वता आल्यावर देहाचे वासनेचे सोहळे हे ‘बाल’पणच वाटावे. देह आणि त्याच्या संवेदना यांच्या पलीकडे एकदा मन गेले की या वासना मनावर काहीच परिणाम करू शकत नाहीत. हीच खरीखुरी परिपक्वता. हाच यथार्थ ’मोठेपणा’.
ऐन वयाची किमया सारी
लाजवंति मी भोळि बावरी
कशि येऊ मी काठावरती मदनाची लालडी ?
पाण्यातून बाहेर पडताना राधेला लज्जेची जाणीव झाली, निर्वस्त्रतेचे भान आले. आणि व्याकुळ होऊन ती वस्त्रे देण्यासाठी कृष्णाचा अनुनय करू लागली.
‘अरे अंतर्ज्ञानी मोहना, हे सारे देहसौंदर्य, ज्याच्या दर्शनासाठी तू हा वस्त्रे लपवण्याचा खट्याळपण करतो आहेस, ते तर ऐन भरातल्या वयाचे आणि काळाचे देणे, हे तुला कसे कळू नये ? तू तर सर्वदर्शी, अंतर्यामी. तुझी झेप त्रिकालात जाते. तुझ्या दृष्टीला ही वस्त्रे असली काय अन नसली, काय , सारखेच !. पण मी भोळीभाबडी लाजाळू नवयौवना. वस्त्रांशिवाय कशी बरं काठावर येऊ ?’
विनावस्त्र उघड्या काठावर येण्याच्या कल्पनेनेच, काही क्षणांपूर्वी पाण्यामध्ये मुक्त क्रीडा करणाऱ्या गोपी भय, संकोच आणि लज्जेने मिटून गेल्या. सगळा उच्छृंखलपणा लयास गेला. कोणत्याही भावनेची परमावधी माणसाला अंतर्मुख बनवते, परमेश्वराभिमुख बनवते. आजवर देहाच्या ज्या आवृत्त सौंदर्यावर प्रत्यक्ष सूर्याचीही नजर पडू शकली नाही असा देह दश-दिशांना दर्शनासाठी खुला करण्याच्या कल्पनेने त्या कुलशीलवान लज्जावतींच्या लज्जेची परमावधी झाली आणि मग त्या पूर्णपुरुषाचे अपौरुषेय रूप त्यांच्या आत्मचक्षूंना दृग्गोचर झाले.
तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती
देहाहुनही मुक्तह भावना शरणागत बापुडी !
सर्व काही ‘त्या’चा खेळ आहे, ‘त्या’चेच अविष्कार, देणी आहेत, हा साक्षात्कार झाला. हा देह जर ‘त्या’चीच निर्मिती आहे, तर त्याला देहदर्शनाची आस, तहान कसली ?
‘जिच्या दर्शनासाठी आतुर होऊन तू निर्वस्त्र अशा आम्हाला काठावर यायला सांगतो आहेस, ती यौवनाच्या तेजाने रसरसलेली कांती तूच तर दिली आहेस ! या देहाच्या अणुरेणूचा तूच निर्माता आहेस ! तुला काय तो नवीन आहे ? मग त्याला अनावृत्त पाहण्यासाठी तुझे डोळे का आतुर आहेत ?’
आणि अशा रीतीने अति-संकोच आणि तीव्र लज्जा यांनी गोपींचे अंत:करण मंथल्यावर शरण्याचे शुद्ध नवनीत वरती आले. गोपींच्या मनीच्या अष्टसात्विक भावना उचंबळून मधुसूदनाला शरण आल्या .
‘ ..या मृण्मय देहाला हात जोडून शरण यायला सांगतो आहेस, पण देहापेक्षाही ‘पर’ पलीकडे असणारी भावना, आत्ममुक्त भाव, तोही देवा तुला शरण आहे !’
...पण इतके विनवूनही कृष्णाची अट कायम आहे, हात जोडून शरण या !
अखेर काहीच इलाज चालेना तेव्हा बिचाऱ्या गोपींनी खरोखरच हात जोडले, कबूल केले पुन्हा या मोहात पडणार नाही. या संसाराच्या मायाजालात भान विसरून ईश्वराज्ञा मोडणार नाही.
शरण ही अशी गोष्ट आहे, की तिथे सगळं संपतं ! विचार खुंटतात, मति कुंठीत होते, अहंपणा संपतो, तिथे शरण्य सुरु होते. शरण जाणारा आणि शरण देणारा एकच होतात.
हात जोडिता बंधन तुटले
अता जीवाला मीपण कुठले ?
आत्म्याने जणु परमात्म्याला अर्पण केली कुडी !
दोन्ही हात जोडताच लज्जा, अहंकार मोह, दंभ सगळे विकार गळून पडले ! अस्तित्वाचे बंधन तुटले. नदी सागराला मिळाल्यावर तिला स्वत:चे अस्तित्व कुठले ? तद्वत जीव शिवाला मिळाल्यावर त्याला ‘मी’पण कुठले ? जो देह या भोगाला कारणीभूत झाला, तो देह, ती कुडी विकारांची वस्त्रे उतरवून परमात्म्याला सामोरी जाताच त्यालाच समर्पित झाली ! आत्म आणि पर असे काही वेगळे राहिले नाही. कुडीचा अडथळा दूर सारून आत्मा आणि परमात्मा एकरूप झाले ! द्वैताचा लय होऊन अद्वैत कैवल्यात एकरूप झाले.
...आणि राधा, सर्व गोपी केवळ कृष्णस्वरूप होऊन गेल्या ! !
---***---
संदर्भ साभार : मराठीविश्व
http://www.marathivishva.com/
प्रतिक्रिया
2 Mar 2015 - 4:40 am | रेवती
लेखन आवडले. शरण्याचा अर्थ छान सांगितलायस.
2 Mar 2015 - 2:21 pm | अन्या दातार
या गाण्याचा हा अर्थ आजवर लक्षात आला नव्हता. छान लेखन :)
2 Mar 2015 - 2:42 pm | गवि
लेख चांगला आहे. बाकी श्रीकृष्ण आणि गोपींशी संबंधित सर्व कथा या अत्यंत सोयीस्कर अर्थ काढण्याच्या बेतानेच बनल्या आहेत असं वाटतं. जाऊ दे..
आणि लावणी हा "गाणे" म्हणून कितीही सुंदर प्रकार असला तरी त्यावर "नाचणे" आणि त्याचा दृष्य अविष्कार (की ज्याला "सांस्कृतिक कार्यक्रम" असं गोड नाव दिलं जातं) हा एक डबल स्टँडर्डचा प्रकार आहे. त्याठिकाणी "लोककला" म्हणून तेच केलं जातं जे तमाशा थेटरात शिट्या मारणार्या पुरुषांसमोर केलं जातं. नोटांचा पाऊस किंवा नाणं कपाळाने उचलणं आणि लंपसम मानधन घेणे असा फरक.. आणि नाचाच्या स्टेप्स कदाचित अधिक सफाईदार हे मान्य.
त्यामुळे सरळसरळ बाईचा नाच बघायला जातो असं म्हणणारे गावाकडचे पुरुष परवडले पण कल्चरल कल्चरल करत तोच प्रकार जास्त सभ्य ठिकाणी आणण्याचा प्रयत्न पटत नाही.
बायकांनी नाचून आपलं मनोरंजन करणे या प्रकाराला अॅज सच कोणताच विरोध नाही. उलट पुरुषांसाठी ती मजाच आहे. फक्त त्याला वलय देण्याचा प्रयत्न हास्यास्पद असतो. लावणीची आवड आहे ना? मग फक्त बसून गाण्याच्या लावणीचा मैफिलप्रकार असतो की.. पण तो फारसा चालत नाही. नाचच हवा..
हेही असोच.
2 Mar 2015 - 3:18 pm | अत्रन्गि पाउस
हेच म्हणतो ...
फार वर्षांपूर्वी बैठकीची लावणी एन सी पी ए ला बघितली होती ... अर्थात नामांकित गायक गायिका आणि निवेदन साक्षात अशोक रानडे आणि नन अदर दॅन पु ल ...
अतिशय सुरेख कार्यक्रम झाला होता
2 Mar 2015 - 4:44 pm | सस्नेह
रोख समजला नाही !
कुणाची सोय ?
2 Mar 2015 - 5:39 pm | गवि
रोख कोणाकडेही अजिबात नाही.
कृष्ण आणि गोपी या कॅरेक्टर्सना घेऊन बनलेल्या पूर्वापार गोष्टींविषयीच ते मत आहे.
हम करें सो चमत्कार असा या गोष्टीतला सूर असतो. पण ते बर्याच जणांना पटणार नाही म्हणून असो म्हटलं होतं.
2 Mar 2015 - 5:51 pm | बॅटमॅन
लावणी म्हणजे रावडी पब्लिकसाठीचीच कला असून तिचे अंमळ हायफाय + सोज्ज्वळ रूप बनवणे चूक आहे असा काहीसा सूर दिसतोय इथे. तसे का करू नये ह सांगण्याची तसदी घ्याल?
अन वलय कसलं? देशी ही दारूच अन स्कॉचही दारूच, मग कशाला वलय देता म्हटलं तर चालेल का ;)
2 Mar 2015 - 6:31 pm | गवि
..नन्तर प्रयत्न करतो परत.अधिक तपशिलाने मांडण्याचा.
..तू म्हणतोस तसा मुद्दा नाहीये.
..एरवी न चालणारे एका नावाने चालणे असा मुद्दा.
2 Mar 2015 - 2:55 pm | प्रचेतस
लेखन आवडले.
2 Mar 2015 - 7:02 pm | मितान
जुन्या मराठी चित्रपटात रंगणारा कलगी तुरा आजोबांच्या सोबत बसून बघितल्याचं आठवतंय.
लावण्यांमध्ये आलेली आधुनिकता (?) हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. काही काव्यप्रकार त्या त्या काळानुरूप साजेसे वाटतात. त्यात फार जास्त बदल झाले की लय बिघडते. असेच काहीसे लावणीचे झाले आहे.
चांगलं लेखन स्नेहाताई !
2 Mar 2015 - 7:28 pm | गणेशा
लेखन छानच
तसेच
लावणी हा विषय माझा आवडता आहे. तुम्ही दिलेली लावणी आवडत्या लावणीतील एक
त्यात आपल्या जुन्या पिक्चर मधल्या लावण्या दे धमाल .. त्यात ही सुलोचना चव्हान यांचा आवज क्या बात.
फक्त सुलोचना बाईंचा आवाज ऐकला तरी संपुर्ण लावणी समोर दिसते असे होते.
लावणी दिसते सोपी पण उत्कृष्ट लावणी लिहिण्याला अजिबात सोपी नसते. आणि त्या लावणी प्रमाणे नाच करणे ही अवघड असते.