सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले... आईने प्रेमाने दिलेली मोतीजडित काननकुंडले अजून आपल्या जागी होती. त्याने हळूवारपणे ती काढली, दोन्ही हाताच्या ओंजळी काननकुंडले चमकत होती व त्याच्या डोळ्यासमोर भव्य राजप्रसादातील आईसोबत घालवलेल्या दिवसांच्या आठवणी दाटून येत होत्या, राजवैभव, सुस्वरूप पत्नी, एक गोंडस मुलगी.. सर्व काही मागे सोडून नव्याने एक आत्मशोध प्रवास. क्षणभरच.. त्याने ती काननकुंडले देखील बाजूला असलेल्या रत्नांवर अर्ध्य द्यावे या प्रकारे सोडून दिले..
तो पुन्हा निर्विकार झाला होता, स्व:च्या शोधासाठी सुखाचा त्याग हा करावा लागतोच. तसा ही राजभवनात होता तेव्हा तरी तो कोठे तेथे होता? तेथे होते ते फक्त त्याचे शरीर. ध्यान, चिंतन व मनन मध्ये सदा मग्न असलेला राजकुमार. आई वडिलांची इच्छा म्हणून लग्न केले, आईला वचन दिले होते म्हणून तो किमान ३० वर्ष तरी राहिला त्या राजप्रासादात. जर वचन दिले नसते तर खूप आधीच त्याने गृहत्याग केला असता, जेव्हा त्याच्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला तेव्हाच. त्याला स्पष्टपणे तो दिवस आठवत होता. एका यज्ञशाळेत यज्ञ चालू होता. यज्ञात आहुती दिली जात होती, तूप, दही, दुध.. आणि त्याच प्रमाणे पक्षी-प्राण्यांचे ही. त्या मूक पशूचे आक्रंदन आणि आकाश व्यापणारे त्यांचे दुख. कोण प्रसन्न होत असेल अश्या उष्णरक्ताच्या अभिषेकाने? कोण प्रसन्न होऊन आशिष प्रदान करणार होते क्रूर हिंसेने बरबटलेले यज्ञ आहुती घेऊन? प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते, साचेबद्ध उत्तरे आणि तीच तीच कारणे. पण त्याचे कोमलमन या हिंसेने थरारून गेले होते. स्वत:च्या क्षणिक सुखासाठी एका जीवाचा बळी? हा प्रश्न मनात वादळ बनून घोंगावत होता. दिवसामागून दिवस गेले. बालमनाला पडलेला प्रश्न तारुण्याच्या उबरठ्यावर अजून प्रकर्षाने जाणवू लागला होता. रोजच्या ध्यानातून व चिंतनातून आत्मशोधाची आस निर्माण होत होती. हिंसेपासून सुरु झालेला चिंतनाचा प्रवास आता आत्मशोध व मोक्ष प्राप्ती मार्गावर आला होता. अतीव सुखाच्या सागरातून बाहेर येऊन कष्टप्रद साधनेच्या कांटेरी रस्तावर अत्यंत कठीण असा प्रवास, सुरु कोठून व याचा शेवट कोठे या प्रश्नांची उत्तरे त्याला देखील माहिती होती का?
आज सर्वत्र एक प्रकारची खिन्नता पसरली होती पण फक्त याच्या मनात चैतन्य व शांतता होती. सर्व गोष्टींचा त्याग करून झाला होता, राहिले होते ते खांद्यावर शुभ्र देवदुष्याचा पट. सर्व पाश बाजूला करून तो चालू लागला. निर्वाकार, शांत पाउले टाकत त्यांने जंगलात प्रवेश केला, मागे त्याच्या नावाचा जयजयकार झाला, पण शरीरावरील अलंकारांप्रमाणे त्याने जणू नावाचा देखील त्याग केला होता... तो चालत राहिला, खांद्यावरी शुभ्र देवदुष्या वाऱ्याने फडफडत होती.
मनात चिंतन चालू होते. या जगातील सर्व धर्मांचे मूळ काय? ईश्वर म्हणजे कोण? ही सृष्टी, हे जग याचा नियंत्रक कोण? आत्मा म्हणजे काय? आपला मुळ हेतू काय? तत्त्वज्ञानाचा शोध घ्यावा की आधी स्वत्वाचा शोध? सर्वत्र पसरलेल्या हिंसेचे मूळ काय? प्रश्न अनेक होते, वाट आता बिकट होत होती. सूर्य मावळला होता. तो एका वृक्षाजवळ जाऊन थांबला. उंच असा तो वृक्ष आकाशाला आव्हान देत वर वर चालला आहे की काय असा भास होत होता. शक्यतो असंख्य पक्ष्यांचा आसरा असेल, त्या डेरेदार वृक्षावर अनेक पक्षी आपली घरटी बांधून राहत असतील. सुमधुर असा मंजुळ स्वर नभात पसरला होता, समोर निर्मळ तलाव होता, त्याचे गूढनिळे पाणी दूरवर पसरलेले होते. त्याने येथेच ध्यानधारणा करण्याचे निश्चित केले.
त्या वृक्षाच्या खाली त्याने पद्मासन धारण केले व डोळे मिटून ज्ञान शोधण्याचा प्रवास सुरु केला. दिवस, महिने वाऱ्याने पाचोळा उडावा असे निघून गेले. अखंड ध्यान मग्न राहून, असंख्य कष्टाला सामोरे जात साधना चालू होती. जंगलातील पशूंचा उपद्रव नित्य होता पण, छोट्या छोट्या गोष्टीतून, निसर्गाच्या वागण्यातून त्याला ज्ञान मिळत होते, तो सर्वाचे शांत मनाने रसग्रहण करत होता, त्याला माहिती होते ज्ञानाचा मार्ग कठीण जरी असला तरी अप्राप्य नक्कीच नाही आहे, त्याची वाटचाल चालूच होती.
एक दिवस अज्ञात व्यक्तीच्या प्रश्नाने त्याचे ध्यान भंग झाले, त्याने डोळे उघडले तर समोर, एक वृद्ध फांदीचा आधार घेऊन त्याच्या समोर उभा होता. पांढर्याशुभ्र जटानी त्याचे मस्तिष्क सुशोभित झाले होते व चेहऱ्यावरील तेज त्याच्या विद्वेतेची साक्ष देत होते. त्याने समोर असलेल्या खडकाच्या दिशेने हात केला, तो वयोवृद्ध स्मित करत त्या खडकावर बसला. काही क्षण डोळे मिटून तो वृद्ध पुन्हा प्रश्नकर्ता झाला “किती समजले?” त्याने उजव्या हाताची दुसरी तर्जनी वर करत उत्तर दिले “एक” वृद्ध हसला व म्हणाला “म्हणजे सुरवात आहे, अजून खूप दूरवरचा तुझा प्रवास बाकी आहे.” त्याने स्मित केले व आपले डोळे मिटून घेतले. वृद्ध परत बोलला “तू कोण? नर की मादा”. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचे तेज पसरले व तो म्हणाला “मादा.” वृद्ध ढगासारखा हसला, हसता हसता त्याला ठसका लागला, हसणे थांबवून तो वृद्ध म्हणाला “मग दान देताय ना? मी आता याचक आहे. तुम्ही द्याल ते घ्याला उत्सुक आहे.”
त्याने आपले डोळे उघडले, सूर्य अस्त होण्यास अजून कालावधी होता, सर्वत्र एक निरव व प्रसन्न अशी शांतता पसरली होती, आणि तो संथ आवाजात बोलू लागला “भय! या विश्वातील प्रत्येक जीवाला भय आहे. कारणवस्तू निश्चित वेगळी असू शकते. पण भाव एकच असतो, तो भयाचा. मृत्यूचे भय, आपल्या अस्तित्वहीन होण्याचे भय. आपल्या प्रजातीच्या अस्तित्वाचे भय. आपल्या जमवलेल्या संपतीच्या ऱ्हासाचे भय. आपल्या प्रियजन व्यक्तीशी होणारी संभाव्य ताटातूटीचे भय. आपल्या संचित पापाचे भय, आपल्या मर्यादेबाहेरील निसर्गाचे भय... भय हे सर्वत्र व्यापले आहे. सर्वांना क्षणिक मुक्ती हवी असते ती भयापासून. भयापासून मुक्ती कशी मिळेल? निर्भय होऊन. पण निर्भय होणे एवढे सोपे आहे का? क्षणभूंगूर अश्या जीवनाच्या अस्तित्वाचाच जेथे प्रश्न आहे तेथे निर्भय कसे व्हावे? निर्भय होता येते, जर अभय मिळाले तर. भयापेक्षा ही जास्त शक्ती अभय मध्ये आहे. शक्तिशाली जीवाने जर शक्तिहीन जीवाला अभय दिले तर तो भय मुक्त होऊ शकतो. पण शक्तिशाली कुठल्या कारणाने अभय देईल? जर शक्तिशाली जीव जर सर्वांना समभाव नजरेने पाहत असेल आणि त्याच्या मनात करुणाभाव असेल तर, हे सहज शक्य आहे.” तो थांबला, आणि त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहू लागला. वृद्धाने आपले थरथरत असलेले दोन्ही हात पुढे केले व म्हणाला “उदाहरणार्थ?” त्याने समोर पाहिले, व वृद्धाला देखील तिकडे पाहण्यासाठी हातानेच सांगितले. समोरच्या पाणवठ्यावर एक सुंदर हरीण पाणी पीत होते, त्याच सुमारास एक वाघ तेथे पाणी पिण्यास आला. पण त्याने हरीणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून पाणी पिण्यास सुरवात केली. ज्याच्या फक्त अस्तित्वामुळे चंचल हरीण अस्वस्थ होऊन ती जागा सोडून आपले चौखूर उधळत जंगलात नाहीशी होणे अपेक्षित होते तेथे ते हरीण त्या वाघाशेजारी पाणी पीत होते. भय-अभय चे जिवंत चित्र समोर उभे होते.
वृद्ध हसला याच्याकडे पाहत म्हणाला “या क्षणी शक्यतो त्या वाघाचे पोट एवढे भरलेले असू शकते की त्याला शिकारीची आवश्यकता नाही आहे आणि तसे ही निसर्गात मानव सोडून दुसरा कुठलाही जीव आपले पोट भरले असताना निरर्थक शिकार करत नाही. राहता राहींला तुझा भय-अभयचा मुद्दा! क्रूरतेने आणि ठायीठायी विषमतेने भरलेल्या या विश्वात अभय देणारे असे कोणी असणे हाच पहिला शंकेचा मुद्दा आहे.”
तो अजून ही ते पाणवठ्यावरचे दृश्य पाहत होता. तिकडे पाहत तो म्हणाला “असे अभय देणारे तत्त्वज्ञान निर्माण करणे आणि असा समाज निर्मिती हे उद्दिष्ट नजरे समोर आहे माझ्या.” वृद्ध उत्तराने संतुष्ट नव्हता झाला. पण पश्चिमेच्या डोंगरांनी सूर्याला आपल्यापाठी कधीच लपवले होते. रम्य संधीप्रकाश आता लुप्त होऊ पाहत होता व समोर निशा सर्व चराचराला आपल्या कवेत घेण्यास उत्सुक झाली होती. तिकडे पाहत वृद्ध म्हणाला “भय, सार्वत्रिक आहे. तू म्हणतो आहेस ते एका अर्थाने बरोबर देखील आहे. पूर्ण अंधार्याजागी पेटलेली एक पणती देखील आपल्याला अभय देते. आपले अस्तित्व अजून काही काळ राहणार आहे याची खात्री देते.” तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते. त्याचे ओठ हलकेसे स्मित करत आहेत असा भास एकाद्याला त्याच्याकडे पाहताना नक्कीच झाला असता.
क्रमशः
प्रतिक्रिया
26 Aug 2014 - 11:52 pm | दशानन
मिपावर यावे तर काही लेखन घेऊन यावे, या उद्देशाने ही लेखमाला प्रसिद्ध करत आहे, आधी हे दोन खण्ड मी थोडक्यात फेसबुकवर प्रकाशित केले होते, पण ही जवळपास ३०-४० भागाची मालिका येथे देखील प्रकाशित करेन.
27 Aug 2014 - 12:04 am | पैसा
सुरुवात आवडली. वर्धमान महावीराबद्दल एकूण फार थोडी माहिती आहे. ही चरित्रात्मक कादंबरी वाचायला नक्कीच आवडेल!
27 Aug 2014 - 12:15 am | श्रीरंग_जोशी
वर्णनशैली ओघवती आहे.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
27 Aug 2014 - 12:20 am | दशानन
या मध्ये असणारा वृद्ध हा काल्पनिक आहे, जो समाजात असलेल्या प्रश्न व शंका याचे प्रतिनिधित्व करणारे पात्र आहे, जो वेळोवेळी या प्रवासात सहभाग घेत राहील.
27 Aug 2014 - 12:59 am | अत्रुप्त आत्मा
वाचींग... :)
27 Aug 2014 - 2:46 am | आयुर्हित
अज्ञाताचा शोध कसा घेतला याची माहिती मिळणे म्हणजे एक ज्ञानवर्धक मेजवानीच ठरणार आहे.
धन्यवाद.
27 Aug 2014 - 7:16 am | सस्नेह
वाचते आहे
27 Aug 2014 - 7:56 am | vikramaditya
लिखाण वाचुन फार आनंद झाला. येवु द्यात.
27 Aug 2014 - 10:27 am | विलासराव
वाचतोय.
27 Aug 2014 - 10:36 am | स्पा
वेलकम राजे
सुंदर लेखमाला होणार यात वादच नाही.
27 Aug 2014 - 10:57 am | शेखर
वेलकम बॅक राज. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
27 Aug 2014 - 1:40 pm | कंजूस
णमन .येऊ द्या .प्रतिक्रियांचे काउंटर न लावता येणाऱ्या लेखांचे स्वागत आहे .
27 Aug 2014 - 3:33 pm | एस
उत्तम लेखमालिका होणार हे नक्की.
27 Aug 2014 - 7:01 pm | अर्धवटराव
मिपावर प्रकाशीत सर्वोत्तम आणि अत्यावष्यक लेखमालेपैकी एक अशा लेखमालेचा श्रीगणेशा झाला असं वाटतय.
पु.भा.प्र.
27 Aug 2014 - 8:01 pm | दशानन
सर्वांचे आभार, तुम्ही जेवढा विश्वास माझ्यावर टाकला आहे ते पाहून भारावून गेलो आहे, मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करेन ही लेखमाला वाचनिय व सुलभ असेल वाचण्यासाठी. शक्यतो माझ्याकडून होणार्या चुका टाळायचा मी परिपुर्ण प्रयत्न करेन पण जरी काही चूका राहिल्याच तर मोठ्यामनाने क्षमा देखील वाचकांनी करावे ही विनंती!
27 Aug 2014 - 8:17 pm | धन्या
छान सुरुवात. वाचतोय.
27 Aug 2014 - 9:21 pm | माहितगार
जैन समाज हा व्यापार उदीमातील समाज म्हणून आपल्याला अधीक परिचीत आहे. योगायोगाने मी आज मराठी विकिस्रोत प्रकल्पात बनारसीदास खरगसेन जैन या १७ व्या शतकातील जैन व्यापारी-कवीचे "अर्धकथानक" हे हिंदी (ब्रज) भाषेतील आत्मचरीत्र मराठी विकिस्रोत प्रकल्पात अनुवादासाठी आयात केले आहे. बनारसीदास खरगसेन जैन (इ.स.१५८६ ते १६४३) हे साधारणतः मुगल शहाजहानाचे (आपल्या कडील शहाजी महाराजांच्या) साधारण समकालीन असावेत. अर्धकथानक हा आत्मचीत्रात्मक साहित्यातले भारतीय भाषातील सर्वात जुन्या आत्मचरीत्रापैकी किंवा बहुधा पहिलेच आत्मचरीत्र असावे म्हणून साहित्यिक सामाजिक आणि भाषिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यांच्या आत्मचरीत्रात राजकीय उल्लेख फारसे नसले तरीही तत्कालीन सामाजिक संदर्भांच्या माहितीच्या दृष्टीने अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण आहे. भाषा १७व्या सहतकातील हिंदी-ब्रज असलीतरी अर्थाचा बर्या पैकी अंदाजा येतो आहे. थोडेसे प्रयत्न केले तर मराठी अनुवाद कठीण जाऊ नये असे वाटते.
हिंदी अथवा ब्रज भाषेची माहिती असलेल्यांनी या अनुवाद प्रयत्नात जमेल तसे साहाय्य करावे अशी विनंती आहे.
दशान यांच्या लेखनासाठी त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.
27 Aug 2014 - 9:23 pm | माहितगार
दशानन यांच्या लेखनासाठी त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा. असे वाचावे ही विनंती
27 Aug 2014 - 9:54 pm | दशानन
माझे हिंदी तसे चांगले आहे, जर माझी काही मदत लागली तर नक्कीच कळवा!
27 Aug 2014 - 9:58 pm | दशानन
"अर्धकथानक" ची लिंक आता पाहिली, वाचताना जरी हे हिंदी वाटत असेल तरी अनेक शब्द हे प्रचलित नाही आहेत सध्याच्या काळात. मी आज याची प्रिंट काढतो व थोडा अभ्यास चालू करतो. त्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे त्यांनी जे लिहिले आहे ते काव्यात्मक भाषेत आहे, त्याचा अर्थ लावणे जिकरीचे काम आहे.
28 Aug 2014 - 12:13 am | माहितगार
सध्याच्या समकालीन भाषाव्यवहारातील अनुवाद बर्याचदा कठीण ठरतात. हे तर काव्यात्मक आणि मध्ये गेलेला ३५० वर्षांचा काळ आणि तत्कालीन संदर्भांबद्दल अनभिज्ञता म्हटल्यावर जिकरीचे असणार हे नक्कीच. विकिस्रोत वर तशी घाई नाही, सावकाश एक एक शब्दाचा अर्थ नोंदवत नोंदवत गेले तरी चालण्या सारखे आहे. जुन्या हिंदीसाठी ऑनलाईन डिक्शनरींची उपलब्धता बरी असण्याची आशा आहे. तरीही जे शब्द उरतील त्या साठी हिंदी विकिपीडियन्सचेही साहाय्य मागता येईल. पण काव्यात्मकतेने आणि तकालीन संदर्भ माहित नसण्याने काही आव्हाने शिल्लक राहणार हे आपले म्हणणे खरे आहे. आपण देऊ करत असलेल्या साहाय्या बद्दल मःपुर्वक धन्यवाद.
30 Aug 2014 - 9:26 pm | दशानन
पहिल्या दोहरा + पहिल्या चौपाईचा अनुवाद (अपुर्ण) व्यनि करत आहे, पुढील सर्व अर्थ जेवढे जमतील ते तुम्हाला व्यनि मधून देत राहीन.
28 Aug 2014 - 10:59 am | बॅटमॅन
याच्या लिंकेसाठी अनेक धन्यवाद.
28 Aug 2014 - 5:46 am | इनिगोय
वा, आवर्जून वाचावी अशी छान लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद. आणि ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्या व्यस्त दिनक्रमातून वेळ मिळो, या शुभेच्छा.
28 Aug 2014 - 10:17 am | चौकटराजा
राजाभाउ, आपल्या लेखन शैली बद्द्ल मागेच लिहून झाले. व ते आता हा लेख वाचून सार्थ वाटले. महावीरांची त्रीटक कथा
बालपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलीय. पण आता जाणीवा जरा बर्या झाल्यात. वाचत जाईन. धन्यवाद !
मी तरी घेतलेला शोध असा आहे की आपण जन्मास येतो त्याचा निसर्गाचा उद्देश काय असेल तो असो आपला उद्देश आऩंद घेणे व देणे हा असावा.