सगळ्यात वर असलेली तळटीपः यातली अक्कलदाढ काढणे, सुरवातीला शिकाऊ आणि पकाऊ आणि मग योग्य डॉक्टरांकडे जाणे इत्यादी भाग वगळता लेख फुगवायला अनेक काल्पनिक गोष्टी घातल्या आहेत हे आधीच अतीचाणाक्ष वाचकांनी ध्यानात घ्यावे ही विनंती. तसेच महिला वर्ग, शेतकरी किंवा कामगार वर्ग, प्राणीपक्षीप्रेमी संघटना इत्यादींचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतू नाही हे ही लक्षात घ्यावे. डिड आय लीव्ह आउट एनिबडी? हा विनोदी लेख आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. तर आता वाचा...
अक्कलदाढ - एक काढणे
तर, झालं असं की वुडहाऊसचं 'लाफिंग गॅस' वाचणे सुरु आहे. त्यातल्या लॉर्ड हॅवरशॉटला हेच दुखणं जडलेलं असतं. वाचत असलेले पु. ल. देशपांडे यांचे किंवा वुडहाऊसचे पुस्तक आणि त्याच वेळी आयुष्यात घडत असलेल्या घटना या योगायोगाने सारख्या निघाव्यात अशा प्रकारचा एक हृदयद्रावक प्रसंग किंवा घटनांची मालिका नुकतीच घडली.
कसलं दुखणं हे कोण सांगणार? बघा...माझं अगदी वुडहाऊससारखंच झालं. गोष्ट सांगायला सुरवात करताना त्याचा जसा गोंधळ उडायचा, किंवा निदान गोंधळ उडतो आहे असं दाखवायचं, ही त्याची एक लकब. गोष्टीची सुरवात झकास झाली पाहीजे हा त्याचा गोष्टीची सुरवात करतानाचा गोष्टीचाच भाग असलेला मिश्कील आग्रह. तसाच गोंधळ अस्मादिकांचा उडालेला आहे पहा. मस्तपैकी पाल्हाळ लावावं, घटनेला थेट किंवा बादरायण संबंधाने कारणीभूत ठरणार्या घटना रंगवून रंगवून सांगाव्यात की नाही!
त्याच्याच शैलीचे अनुकरण करत तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. एकदा दुपारचे जेवण घेता घेता कँटिनमधे बसलेले कंपनीत नुकतेच दाखल झालेलेल विचित्र नावाचे निसर्गसौंदर्य न्याहळत बसलो होतो. नाव विचित्र अशासाठी की ते कुसुम गजेन्द्रगडकर, अपूर्वा हम्पीहळ्ळीकर, सुनेत्रा शेरावत, नाजुका ढमढेरे यांच्यासारखं नाव आणि आडनाव यांचा परस्परांशी ओ की ठो संबंध नसलेलं होतं. एकंदर प्रकार बघता ते सँपल आडनावापेक्षा नावाकडे अधिक ओढ घेणारं दिसत होतं. पण हे मला समजलं कसं? तर त्या बाईंच आडनाव, नाव व त्यांचा तोंडवळा यांच्या बॅलन्सशीट मधल्या हुकलेल्या बॅलन्स बद्दल शेजारी बसलेल्या समान"शीले" व्यसनेशु सख्यम् हे सार्थ करणार्या सहकर्मचार्यांशी खोलात जाऊन चर्चा केल्यानंतरच. जमतंय, जमतंय पाल्हाळ लावणं. आगे बढो.
तर, अशा या आडनावापेक्षा नावाकडे अधिक ओढ घेणार्या या नवीन रोपट्याबद्दल समग्र, खोलात जाऊन वगैरे चर्चा करत असतानाच अचानक मेंदूत स्फोट झाल्यासारखं काहीतरी झालं आणि घटकेत तो विषय बंद पडला. विषय काय सुरू होता, घडत काय होतं. काही टोटल लागेना. एका क्षणी 'ह्म्म्म' 'अहाहा' 'क्या बात है' असे उद्गार तर दुसर्याच क्षणी उजव्या गालावर हात ठेऊन आलेली जोरदार कळ दाबत नाच करायची पाळी आलेली. दैवयोग म्हणा किंवा दैवदुर्विलास, माझ्या जबड्याच्या उजव्या बाजूला अण्णा हजारेंसारखं शांत बसलेल्या माझ्या अक्कलदाढेने अचानक केजरीवाली पवित्रा धारण करत दाताचा राजीनामा मागितला. बॅनर्जींच्या ममतासारखं आपोआप काहीही कारण नसताना तिचं बिनसलं असावं किंवा कँटीनमधल्या भाजीतल्या अर्धवट शिजलेल्या बटाट्याडे बहुतेक मी अंमळ अधिकच लक्ष दिलं असावं. तसं सारखं नाही पण अधुनमधुन दुखतच होतं तिथे. तशातच नुकत्याच झालेल्या पदोन्नती अर्थात ज्याला मराठीत आपण प्रमोशन म्हणतो ते झाल्याने तिने तिचे अस्तित्व दाखवून दिले होतेच. त्यावेळी तिला प्रेमाने जीभ फिरवून मी कुरवाळल्याचंही आठवत होतं. पण आज मात्र अप्रेझलमधे उत्तम रेटिंग मिळूनही किरकोळ पगारवाढ झालेल्या कृद्ध कर्मचार्याप्रमाणे तिने आंदोलनच पुकारलं.
त्यामुळे आंदोलन शांत करायला अस्मादिकांनी ताबडतोब ऑफिसच्या शेजारच्याच इमारतीतल्या दंतवैद्यांकडे धाव घेतली. तिथे काम करणार्या पोरसवदा सहाय्यिकेने प्रथमच रेल्वेची उद्घोषणा करायला बसवल्यासारखं "प्लॅटफॉर्म नंबर दो पे आनेवाली ठाने जानेवाली स्लो लोकल आज प्लॅटफॉर्म नंबर चार पे आयेगी. यह गाडी दस से पंधरा मिनट देरीसे चल रही है" या चालीत "आपको दो ऑप्शन है एक तो रूट कॅनल करनेका अदरवाईज निकालना पडेगा" हे बोलून मला गार केलं. मी कितीही कट्टर मुंबईकर असलो तरी पुण्यात असलं हिंदी ऐकायला लागल्याने माझ्या आधीच दुखर्या असलेल्या अक्कलदाढेनं माझ्या तळपायाची आग आनंदाने मस्तकापर्यंत पोहोचवली. मग एक्स रे नामक प्रकार पार पडल्यावर (अरे वा! दातांचाही एक्स रे निघतो का? स्वातंत्र्यपूर्व कालात....) "छोटाही है निकालनाही पडेगा" अशी एक उप-घोषणा झाली. ही बया बोलताना इतकी आत्मविश्वासशून्य वाटत होती की मी तिने दिलेल्या पेनकिलर आणि अँटिबायोटिक्सचे प्रिस्क्रिप्शन घेऊन जो पळत सुटलो तो दोन दिवसांनी एका वेदनादायी सोमवारी थेट आमच्या नेहमीच्या दंतवैद्यांच्या तपासणी खुर्चीवर बसलो.
मात्र मला तपासणारा माणूस हा जेष्ठ नागरिक नव्हे तर तरुणतुर्क आहे हे बघितल्यावर मी धास्तावलो. पण हा सद्गृहस्थ सिनीयर दंतवैद्यांचे चिरंजीव असल्याचे समजल्यावर जीव तिथेच चूळ भारायला ठेवलेल्या पसरट भांड्यात पडला. हा माणुस मात्र मला जाम आवडला. कारण याने (पुन्हा) एक्स रे काढल्यावर "अक्कलदाढ काढावी लागेल. मग, कधी येतो आहेस काढायला?" हा प्रश्न सुद्धा "ह्या विकेंड्ला मी मोकळा आहे, चल कोकणात जाऊन येऊ" ह्या हव्याहव्याशा वाटणार्या प्रश्नाच्या चालीत विचारून माझी अर्धी भीती घालवली. मग ठरलेल्या रक्त तपासण्या आणि लिहून दिलेली औषधे घेऊन मी पुढच्या शनिवारी पुन्हा 'ऑपरेटिंग रुमात' स्थानापन्न झालो. डॉक्टरांनी पेन आणि प्रेशर यातला फरक छान समजावून सांगितला. भूल देताना ईजेक्शनमुळे जरासा त्रास झाला. पण "आता मी मार्किंग करतो आहे" असं म्हणत प्रत्यक्षात दाताभोवती हत्याराने कापून त्यांनी कधी दाढ काढली ते समजलंच नाही. कधी "चांगलं को-ओपरेट करतो आहेस हां" अशी स्तुती तर कधी ऑफिसबद्दल चौकशी असं बोलत बोलत पटकन काम करुन हा माणूस मोकळा.
आता दाढ काढून तीन दिवस उलटले आहेत. वेदनाशामक गोळी परवा रात्रीच घ्यायची बंद झाली आहे. पण पेन किलरचा प्रभाव एक दिवस ओसरूनही काही दुखत असल्याचे अजिबात जाणवत नाहीये. ऑफिसातल्या विघ्नसंतोषी लोकांनी "आताच खरी मजा येणार आहे" असे पिल्लू सोडून दिलेले आहे. पण मर्द को दर्द नहीं होता, हाँय्य! आणि तसंही, बघण्याकडून दुखण्याकडे गेलेल्या या प्रकरणाला प्रत्युत्तर द्यायला दुखण्याकडून बघण्याकडे न्यायलाच हवे. नाही का?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इतरत्र पूर्वप्रकाशित
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
31 Jul 2014 - 4:51 am | खटपट्या
मला आधी अक्कलदाढ आलीय का बघावी लागेल (जिभेने चाचपून बघावी लागेल)
(अक्कलदाढेचा आणि अकलेचा काही संबंध नसावा बहुतेक)
आणि हो - मी पयला
31 Jul 2014 - 8:07 am | नानासाहेब नेफळे
एक साधा अनुभव मांडतानाही शब्दांचे आणि उपमांचे कल्पनादारिद्र्य या लेखात जाणवले, पुलं देशपांडे वुडहाऊसचे कथन ,मग लगेच बघण्याचा कार्यक्रम ,दाढेचे शल्य कशातही कँट्युनीटी वाटली नाही
31 Jul 2014 - 10:08 am | आनन्दा
मी देतो एक उपमा -- वड्याचे तेल वांग्यावर.
31 Jul 2014 - 9:29 am | ब़जरबट्टू
जाम आवडला.. ते अन्ना, केजरीवाल उपमा तर भारीच... :)
31 Jul 2014 - 10:36 am | तिमा
यातले विनोद 'ओता केवि' प्रकारचे वाटले.
31 Jul 2014 - 11:05 am | मंदार दिलीप जोशी
ओता केवि म्हणजे?
हे खरं तर ब्लॉग छाप लिखाण आहे. चलता है.
31 Jul 2014 - 11:09 am | नानासाहेब नेफळे
ओढुन ताणुन केलेला विनोद, ओताकेवि
31 Jul 2014 - 11:14 am | मंदार दिलीप जोशी
अच्छा. जसे तुमचे ओढून ताणून आणलेले डूआयडी असतात :P
31 Jul 2014 - 11:36 am | नानासाहेब नेफळे
तुम्ही फार मोठे विनोदी लेखक आहात असा भ्रम झाला आहे काय?, कि पु लं देशपांडेंच्या विनोदाची नक्कल करु पहात आहात?
तुमच्या लेखनाला कसलेही साहित्यमुल्य नाही ,काहितरी फार मोठे लिहल्याचा आविर्भाव आणून जमत नाही,
तुम्ही ते मोदी भाजप वगैरेची प्रचारकी लेखनं करा ,तिकडे तुमची बुद्धी(?) जास्त चालते.
31 Jul 2014 - 11:48 am | मंदार दिलीप जोशी
किती ती चडफड :D
31 Jul 2014 - 11:52 am | मंदार दिलीप जोशी
नेम बरोब्बर लागला ;)
2 Aug 2014 - 9:08 pm | श्रीगुरुजी
नान्या,
आता माईसाहेबच्या आयडीने लॉगिन कर आणि लेखाचे कौतुक कर. पूर्वी तू नानासाहेबच्या आयडीने केजरीवालांना शिव्या घालायचास आणि थोड्या वेळाने माईच्या आयडीने येऊन केजरीवालांचे कौतुक करायचास. आताही तसेच कर.
31 Jul 2014 - 12:29 pm | प्रभाकर पेठकर
लेखनात त्रूटी, तसेच सहजतेचा अभाव नक्कीच जाणवला. पण ठिक आहे, अनुभवकथनाचा प्रयत्न चांगला आहे.
दाढदुखी/दातदुखी काय असते अनुभवलेले आहे. त्यामुळे आपली दाढ दुखते आहे, ठणकते आहे, दंतवैद्याकडे जायला हवे, कोण चांगला दंतवैद्य आहे वगैरेची चौकशी, प्रत्यक्ष दंतवैद्याच्या दवाखान्यातील स्वागतकक्षात भितीदायक वाट पाहणे, आपल्या आधीच्या रुग्णाचे आणि दंतवैद्याचे (दरवाजा उघडा असेल तर...) अस्पष्ट ऐकू येणारे बोलणे, प्रतिक्षा संपून आपली वेळ येणे, दंतवैद्याच्या खुर्चीत बसणे, दंतवैद्याने तपासणे, 'दाढ काढावी लागेल' हे अनुभवी बोल, घाबरतच आपण दिलेली संमती, बाजूच्या ट्रे मध्ये हत्यारांची निवड करताना वाढलेला मानसिक तणाव, 'नुसतं इंजेक्शन देतो आहे हं!' (हं उगीच लाथा झाडू नका) ही, त्यावेळी वाटलेली, अमृतवाणी, पुढे १०-१५ मिनिटे प्रतिक्षा, जबडा बधीर आणि वजनदार होणे आणि दाढ काढण्यासाठी दंतवैद्याची आपल्या जबड्याशी होणारी झटापट, कधी दुखणे, कधी कच्कन आवाज येऊन 'तुटली की काय?' असा आपल्या बंद डोळ्यांसमोर विचार, 'झालं...झालं' म्हणत दंतवैद्याचे पोकळ धीर देणं, आणि.... शेवटी एकदाची दाढ निघणं, ती व्यवस्थित (तिच्या ३ पायांसकट) निघाली आहे हे दंतवैद्याने आपल्याला दाखवणं, आपणही अगदी जीवावरच्या दुखण्यातून उठल्यासारखे समाधान मानणं आणि दाढेत गच्च बसवलेल्या आणि सतत 'काढून फेकून द्यायची' अनिवार ईच्छा निर्माण करणार्या कापसाच्या बोळ्याला सांभाळत दंतवैद्याचे आभार मानून त्याच्या गुहेतून बाहेर पडणं एवढ्या सर्व प्रवासाचे वर्णन अपेक्षित होते. असो.
एकदा एका दंतवैद्याने माझ्या दुखणार्या दाताऐवजी बाजूच्या दातालाच बधीर केले. इंजेक्शन नंतर त्याच्या स्वागतकक्षात बसून दुखणार्या दाताला, बधीर झाला आहे की नाही हे, चाचपताना तो नाही तर बाजूचा दात बधीर झाला आहे हे जाणवलं. तसे त्या दंतवैद्याला सांगताच त्याने मला 'अजून जरा थांबा' असे सांगितले. असे दोन वेळा सांगितल्यावर, होता तो परिणामही कमी व्हायला लागल्याचे जाणवले. तसे सांगताच त्या दंतवैद्याने मला 'हं! बघूssss!' असे म्हणत खुर्चीवर बसवले आणि आपली पकड घेऊन 'तो' (दुखणाराच) दांत धरला आणि मी 'ऊं..ऊं..' करतोय तोवर तो हलवायला आणि उपटायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. मला असह्य कळा येऊ लागल्या. मी प्रतिकार करीत राहिलो पण 'अहो, असे काय करता, असे काय करता' म्हणत त्या सद्गृहस्थाने, चांभाराने चपलेतला खिळा उपटून काढावा तसा, माझा दात काढला. शेवटच्या घटकेला मरणप्राय कळा अनुभवून मी डोळे इतके गच्च बंद केले की तेही दुखायला लागले. माझा श्वास पूर्ववत व्हायला ३ मिनिटे लागली. त्याची फी त्याच्या बोडक्यावर मारून जो बाहेर पडलो की पुन्हा त्याच्या दवाखान्यावरूनही कधी गेलो नाही.
दात काढणे ह्या विषयावरील अजून २-३ अनुभव आहेत. पण परत कधी तरी. आत्ता वरच्या प्रसंगाच्या आठवणीनेच सुन्न झालो आहे.
31 Jul 2014 - 1:05 pm | प्यारे१
खूप सोसलंय हो तुम्ही. तुम्ही म्हणूनच टिकलात. खरंच. मला वेदना जाणवली तुमची.
हिरडीत इन्जेक्शन घेताना डॉक्टरांच्या अक्ख्या कुळाचा उद्धार होतो.
-(अॅक्सिडेण्ट नंतर तोंडावर आपटून तीन + दोन दात नकली असलेला)
31 Jul 2014 - 1:26 pm | प्रभाकर पेठकर
सदस्य नांव आणि प्रतिसादाची सांगड घालता 'भावना पोहोचल्या' एव्हढेच म्हणतो. अर्थात, धन्यवाद.
31 Jul 2014 - 2:33 pm | प्यारे१
?
प्रत्यक्ष भेटीत 'असली नकली' दात दाखवेन. धन्यवाद.
31 Jul 2014 - 3:21 pm | प्रभाकर पेठकर
तुझ्या असली नकली दातांवर माझा 'दांत' नाही रे.
माझा प्रतिसाद तुझ्या प्रतिसादातील पहिल्या वाक्यावर आहे. (हे सांगायला लागून माझा निरागसपणा उघडा पडतोय, पण काय करणार मी तो जपलाय नं.)
31 Jul 2014 - 3:37 pm | प्यारे१
अहो त्या डेन्टीस्टची सुई (देव त्याचं भलं करो) हिरडीत टोचताना कशा शिट्ट्या वाजतात त्याचा दांडगा अनुभव घेतलाय मी पेठकर काका. खरंच सोसणं म्हणण्यासारखाच प्रकार असतोय तो.
अजूनही एक दात दोन वेळा रुट कॅनल करुन देखील मेलेला तसाच घेऊन फिरतोय. जास्त अडलं नाही अजून पण बदलून घ्यायचाय.
31 Jul 2014 - 2:09 pm | मंदार दिलीप जोशी
माझ्यासाठी आमच्या कंपनीतल्या एकाने दिलेला हा प्रतिसाद सगळ्या प्रतिसादांवर भारी आहे
5 min sathi ka hoina pn sarve tention dokyatla nighun gele
31 Jul 2014 - 2:55 pm | मुक्त विहारि
आवडला...
31 Jul 2014 - 4:10 pm | अनंत छंदी
पुण्यात दात काढायचा असेल तर शेंड्येशास्त्रींकडे जावे, भूल न देता, डोक्यावरील बिंदूवर दाब देत अलगद दात काढतात. कधी काढला ते समजतही नाही.
1 Aug 2014 - 9:46 am | मुक्त विहारि
हे शेंडे शास्त्री , पुण्यातील नक्की कुठल्या भागात राहतात?
आजकाल पुणे बरेच पसरले आहे, असे ऐकिवात आहे.
म्हणजे हडपसर तर पुण्यात आलेच पण पुर्वीचे औंध संस्थान पण पुण्यात विलीन झाले असे पण ऐकिवात आहे.
2 Aug 2014 - 9:10 pm | प्यारे१
ते औंध वेगळं, हे वेगळं.
1 Aug 2014 - 9:31 am | ऋषिकेश
क्या बात है!
तुफान जमलाय! खूपच आवड्ला.. खो खो आणि स्मित हास्य यांच्या मधले नेमके हसु चेहर्यावर आणणारा हा लेख दुखण्यावरच असावा असा एक विरोधाभास आहेच :)
2 Aug 2014 - 9:07 pm | श्रीगुरुजी
लेख आवडला. पण खूपच संक्षिप्त वाटला. जरा अजून खुलवायला हवा होता.
*lol*
4 Aug 2014 - 10:04 am | मंदार दिलीप जोशी
पटलं. पुढच्या वेळी (म्हणजे लेखाच्या हां, दाढेच्या नव्हे ;) ) नक्की विस्ताराने लिहेन
4 Aug 2014 - 3:43 pm | बॅटमॅन
याचा दुसरा अर्थ अभिप्रेत नाही हे माहिती असूनसुद्धा या शब्दाचा दुसरा अर्थ आठवला. ;) =))