चला व्हिएतनामला ०३ : हा नोईचा फेरफटका - २ आणि हा लाँग कडे प्रयाण

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
23 Nov 2013 - 10:13 pm

====================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

...कार्यक्रम रंगतदार होता म्हणून भान विसरून पाहत होतो. पण तो संपल्यावर ३६ तासांच्या घावपळीचा थकवा जाणवायला लागला होता. हॉटेल गाठून चेक इन केले, एक जोरदार गरम शॉवर घेतला आणि केव्हा बिछान्यात गुडुप झालो ते कळले सुद्धा नाही.

रात्रभराच्या गाढ झोपेमुळे दुसरा दिवस प्रसन्न उजाडला. नेहमीच्या प्रथेप्रमाणे सज्जड न्याहारी करून लवकरच बाहेर पडलो. आजची पहिली भेट हो ची मिन् संकुलाला होती.

हो ची मिन् (Ho Chi Minh)

व्हिएतनामचे पहिले राष्ट्राध्यक्ष हो ची मिन् (१८९०-१९६९) किंवा अंकल हो आधुनिक व्हिएतनामचा सर्वात मोठा राष्ट्रनायक आणि सद्याच्या व्हिएतनामी सैन्यदलाचा संस्थापक समजले जातात. सर्वसामान्य व्हिएतनामी माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल एक जवळीक आणि आदरभाव असलेला सतत जाणवत राहते. त्यांची जीवनकहाणी मोठी उलथापालथीने भरलेली आणि रोचक आहे.

इ स १९०७ मध्ये गरीब व्हिएतनामी शेतकर्‍यांवर फ्रेंच सत्तेने लादलेल्या जबर करांच्या विरुद्ध झालेल्या मध्य व्हिएतनाममधील हुए येथील आंदोलनात भाग घेतला म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकले गेले. त्याच सुमारास त्यांच्या वडिलांची नोकरीही गेली. त्यामुळे तो दक्षिणेकडील सायगावला (आताची हो ची मिन् सिटी) स्थलांतरित झाले. तेथे १९११ मध्ये एका फ्रेंच बोटीवर नोकरी पकडून ते फ्रान्सला पोहोचले. फ्रान्समध्ये शाळेत भरती होऊन शिक्षण घेण्याचा त्यांचा प्रयत्न विफल झाला म्हणून परत बोटीवरची नोकरी पकडून ते १९१२ मध्ये अमेरिकेत पोहोचले. तेथे हॉटेलातला आचारी, घरातला मदतनीस असे करत करत १९१७-१८ मध्ये जनरल मोटर्स मध्ये लाईन मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचले. या काळात त्यांच्या ब्रिटनच्या फेर्‍याही होत होत्या आणि लंडनमध्ये कार्लटन हॉटेलमध्ये पेस्ट्री शेफ, न्यूझीलंडच्या हायकमिशनमध्ये वेटर अशा अनेक नोकर्‍या त्यांनी केल्या. १९१९ मध्ये फ्रान्समध्ये परतल्यावर ते कम्युनिस्टांच्या सहवासात आले आणि व्हिएतनाम स्वातंत्र्य चळवळीत "देशभक्त एंगुयेन" (Nguyễn Ái Quốc) या नावाने सामील झाले.

१९२३ मध्ये ते रशियात आणि तेथून १९२४ मध्ये चीनला गेले. या वेळे पर्यंत त्यांची कम्युनिस्ट म्हणून ओळख झाली होती पण कुठेच नीट बस्तान बसलेले नव्हते. १९२७ मध्ये चिआंग कै शेकने चिनी कम्युनिस्टांच्या विरोधी केलेल्या उठावामुळे त्यांना चीन मधून बाहेर पडून फ्रान्सला परतावे लागले. मात्र तेथे फार काळ न राहता ते बेल्जियम, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली असे करत थायलंडला गेले. १९२९-३० च्या सुमाराला काही काळ त्यांचे भारतातही वास्तव्य होते. १९३० मध्ये त्यांनी हाँगकाँग मध्ये व्हिएतनाम कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली. हाँगकाँगमध्ये असताना फ्रेंचांच्या दबावाखाली त्यांना ब्रिटिशांनी अटक केली पण फ्रेंचांच्या ताब्यात द्यायची इच्छा नसल्याने ते तुरुंगात मेल्याचे जाहीर केले गेले व नंतर १९३३ मध्ये गुप्तपणे सुटका केली गेली. त्यानंतर हो यांनी इटलीला जाऊन मिलान येथे काही काळ रेस्तराँ मध्ये नोकरी केली व परत रशियाचा रस्ता पकडला. १९३८ मध्ये त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट सैन्याचा सल्लागार या नात्याने चिआंग कै शेकच्या सैन्याला हरवण्यास मदत केली.

१९४१ मध्ये व्हिएतनाममध्ये परतून त्यांनी गनिमी युद्ध करणार्‍या "व्हिएत मिन्" नावाच्या १०,००० सैनिकांच्या दलाचे नेतृत्व स्वीकारले आणि फ्रेंच सत्तेविरुद्ध स्वातंत्र्यलढा सुरू केला. १९४१ ते १९४५ च्या काळात हो, अमेरिकन व चिनी फौजांनी अनेकदा एकमेकाला सहकार्य केले. १९४५ मध्ये हो यांनी व्हिएतनामच्या सम्राटाला गादीवरून पायउतार व्हायला भाग पाडले आणि कम्युनिस्ट व्हिएतनामची (Democratic Republic of Vietnam) स्थापना केली. त्यानंतर फ्रेंच सत्तेबरोबर केलेल्या संघर्षातून १९५४ मध्ये उत्तर व दक्षिण व्हिएतनाम अशी विभागणी झाली आणि त्यानंतर प्रथम फ्रान्स व नंतर अमेरिकेला व्हिएतनाममधून बाहेर पडायला लावून १९७५ मध्ये दोन्ही व्हिएतनाम संयुक्त होऊन आताचा व्हिएतनाम अस्तित्वात आला ही गोष्ट सर्वांना माहीत आहेच. मात्र अंकल हो चे संयुक्त व्हिएतनामचे स्वप्न साकार होण्याअगोदर १९६९ मध्ये त्यांचा मृत्यु झाला होता.

असो. अनेक चित्रविचित्र घटनाक्रमांनी भरलेल्या हो ची मिन् यांच्या आयुष्यावर धावती नजर टाकल्यावर आता आपण आपली हा नोई मधल्या प्रेक्षणीय स्थळांची सहल सुरू करूया.

====================================================================

हो ची मिन् संकुल (Ho Chi Minh complex)

हो ची मिन् यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या या संकुलाचे उद्घाटन १९९० साली करण्यात आले. प्रशस्त आवारात पसरलेल्या या संकुलात बा दिन् चौक, हो ची मिन् समाधी, राष्ट्राध्यक्ष भवन, अंकल हो ची घरे, एकखांबी पॅगोडा आणि हो ची मिन् संग्रहालय अश्या अनेक प्रेक्षणीय गोष्टी आहेत. तर चला त्या सगळ्या स्थळांना एक एक करत पाहूया...

बा दिन् चौक (Ba Dinh square)

हॉटेलपासून साधारण १५-२० मिनिटांच्या प्रवासाने आमची चारचाकी बा दिन् चौकाशेजारी पोहोचली. हा चौक आणि त्यातले रस्ते खूपच प्रशस्त आहेत. त्याचा मधला भाग आणि एक खास रस्ता फक्त राष्ट्रीय स्तराच्या समारंभाला अथवा लष्करी संचलनांकरिता वापरले जातात. त्यामुळे आम्ही चौकाच्या एका टोकाला गाडीतून पायउतार होऊन संचलनासाठी राखीव असलेल्या रस्त्यावरून चालू लागलो...

२ सप्टेंबर १९४५ साली याच चौकात व्हिएतनाम स्वतंत्र झाल्याचा घोष केला गेला होता आणि या जागेचे नाव तो स्वातंत्र्यलढा ज्या ठिकाणी सुरू झाला त्या (बा दिन्) जागेच्या नावावरुन वरून दिले गेले आहे.

या चौकाच्या एका बाजूला आपण पुढे बघणार आहोत ती प्रेक्षणीय स्थळे आहेत आणि इतर तीन बाजूला जुन्या फ्रेंच शैलीत बांधलेल्या सरकारी कार्यालयांच्या इमारती आहेत...

हो ची मिन् समाधी (Ho Chi Minh’s Mausoleum)

रस्त्यावरून चालत साधारण २००-३०० मीटर पुढे गेल्यावर एका बाजूला अंकल हो ची समाधी लागते.

हो यांची स्वतःची इच्छा "मरणोत्तर शरीराचे दहन करून झालेली रक्षा उत्तर, मध्य आणि दक्षिण व्हिएतनामच्या टेकड्यांवर पुरावी" अशी होती. परंतू त्यांच्या मृत्यूच्या वेळेस सत्तेत असलेल्या सरकारने त्यांच्या पार्थिवाची ममी बनवून ती या समाधीत ठेवली आहे. सरकारी मताप्रमाणे अशा तर्‍हेने हो यांचा केवळ सत्कारच झाला असे नव्हे तर त्यांची प्रेरणा नवीन पिढ्यांमध्ये सतत जागी राहिली आहे. या संगमरवर आणि ग्रॅनाइटने बांधलेल्या समाधीचे निर्माणकाम १९७५ मध्ये पुरे झाले. समाधीवर "स्वावलंबन आणि स्वातंत्र्यापेक्षा मूल्यवान असे काहीच नाही" (Khong co gi quy hon doc lap tu do) हे हो यांचे वचन आहे.

आमच्या सहल कंपनीच्या गलथान आयोजनामुळे आमची या स्थानाची भेट सोमवारी, ज्या दिवशी तेथे प्रवेश बंद असतो त्या दिवशी, ठेवलेली होती. त्यामुळे समाधीत आत जाऊन ममी बघता आली नाही. :( बाहेरूनच ती भव्य इमारत, तिच्या समोरची सजावट आणि कडक पांढर्‍या गणवेशातले संरक्षक पाहून समाधान मानावे लागले...

राष्ट्राध्यक्ष भवन (Presidential Palace)

समाधी मागे टाकून थोडे पुढे गेलो की त्याच बाजूला राष्ट्राध्यक्ष भवन लागते...

फ्रेंचांनी बांधलेली ही इमारत १९०१ ते १९०६ पर्यंत त्यांच्या फ्रेंच इंडोचायना वसाहतीच्या गव्हर्नर जनरलचे वसतिस्थान होते. १९५४ मध्ये कम्युनिस्ट सरकारने तिचा ताबा घेऊन तिचे राष्ट्राध्यक्ष भवन (Presidential Palace) असे नामकरण केले. मात्र स्वतःच्या विचारसरणीला जागून हो ची मिन् ने तेथे राहण्यास नकार दिला आणि आतापर्यंत ती इमारत फक्त उच्चस्तरीय राजनैतिक सभा व भेटीगाठींसाठीच वापरली गेली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे या इमारतीत आत जाण्यास मनाई आहे.

हो ची मिन् संकुलाच्या आवारात आणि सर्वच व्हिएतनामभर फिरताना स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि जाणीवपूर्वक केलेली सौंदर्य निर्मिती या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात....

.

.

मुख्य म्हणजे उदार अर्थव्यवस्थेचे परिणाम नुकतेच सुरू झाले असले आणि सर्वसामान्य जनता जरी अजूनही गरीब असली तरी त्यांच्या पेहरावात मळके अथवा फाटके कपडे सहा दिवसात एकदाही दिसले नाहीत हे विशेष !

अंकल हो ची घरे (Uncle Ho’s Houses)

राष्ट्राध्यक्ष भवनाला फेरी घालून थोडे पुढे गेलो की अंकल हो ने वास्तव्य केलेली दोन घरे लागतात. ही घरे एका राष्ट्राध्यक्षाची असतील यावर विश्वास बसणार नाही इतकी छोटी आहेत. पुण्यामुंबईतले काही खाजगी बंगले यांच्यापेक्षा बरेच मोठे आहेत. हो यांच्या कारकिर्दीत आणि निवृत्त झाल्यावरही मृत्युपर्यंत याच जागेत त्यांची राहण्याची आणि कार्यालयाची एकत्र व्यवस्था होती.

त्यातले एक घर पूर्वी एका इलेक्ट्रिशियनचे राहण्याचे ठिकाण होते...

घरातली आतली व्यवस्था मध्य-मध्यम वर्गीय म्हणायला पण कठीण पडेल अशीच होती...

जेवणाची खोली...

अभ्यास कक्ष...

आवार मात्र झाडाझुडुपांनी बहरलेले होते. सर्वात मौल्यवान गोष्टी म्हणजे हो ना भेट मिळालेल्या देशोदेशींच्या जुन्या काळच्या (व्हिंटेज) चारचाकी. त्या बघायला मजा आली...

अंकल हो यांचे दुसरे घर मात्र बघण्यासारखे आहे कारण ते डोंगराळ भागात राहणार्‍या एका जमातीच्या लाकडी खांबांवर असलेल्या सर्वसामान्य घरावरून बेतलेले आहे. अर्थात तेथेपण काहीच बडेजाव नाही...

तळमजल्यावरची मीटिंग रूम...

अभ्यासिका...

झोपायची खोली...

स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नसते तर एखाद्या देशाचा सर्वेसर्वा राष्ट्राध्यक्ष अशा साध्या घरांत आणि साध्या राहणीने राहिला यावर विश्वास बसणे कठीण होते ! मन प्रभावित करायला नेहमीच काहीतरी उत्तुंग दिसणारे असायलाच पाहिजे असे नाही तर उत्तुंग विचार आणि त्याप्रमाणे झालेले आचारही पुरे असतात याची प्रचिती अशी ठिकाणे पाहिली की येते. आजकाल तर "बोले तैसा चाले" हे इतके विरळ झाले आहे की असे काही बघितले की आश्चर्यच वाटते !

एकखांबी बुद्धमंदीर (One pillar pagoda)

तेथून पुढे गेले की एक जरा वेगळ्या प्रकारचे छोट्याश्या तळ्यात एका लाकडी खांबावर उभारलेले छोटेखानी बुद्धमंदीर लागते. व्हिएतनाचा एक राजा ली तान् तोंग याने इ स १०४९ मध्ये त्याच्या स्वप्नात झालेल्या दृष्टांताप्रमाणे पाण्यातून उमललेल्या कमळासारखी रचना असलेल्या या पॅगोडाची निर्मिती केली आणि त्यामुळे त्याला पुत्रप्राप्ती झाली अशी दंतकथा आहे...

मदिरांचे गर्भागार...

या मंदिराजवळ काही फळविक्रेत्यांची दुकाने दिसली. दोन तीन प्रकारची अनवट व्हिएतनामी फळे घेतली. एक दोन मस्त चवदार होती. नावे लिहून ठेवायचे विसरलो त्यामुळे आता आठवत नाहीत. :(

हो ची मिन् संग्रहालय (Ho Chi Minh Museum)

पोटात भर पडल्याने आता तरतरी आली होती. हो ची मिन् संग्रहालयाच्या दिशेने पुढे निघालो...

येथे मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्या केल्या अंकल हो आपले स्वागत करतो...

पांढर्‍या रंगाच्या आणि कमळाच्या आकारात बांधलेल्या या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर ४०० लोक बसू शकतील इतके मोठे सभागृह आहे. त्याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सभा-समारंभांसाठी उपयोग केला जातो. दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर हो ची मिन् शी संबद्धीत असलेल्या २,००० च्या वर वस्तू, चित्रे आणि कागदपत्रांचे प्रदर्शन आहे. या सगळ्या गोष्टींतून अंकल हो च्या जीवनकथेबरोबरच त्या काळच्या सामान्य व्हिएतनामींचे जीवन, त्यांचा वसाहतवादाशी संघर्ष, स्वातंत्र्ययुद्धातले क्षण आणि व्हिएतनामी विजयगाथा उलगडून दाखविली आहे.

ही आहेत त्या संग्रहालयात काढलेली काही चित्रे...

.

====================================================================

हा लाँग कडे प्रयाण

दुपारी तडक हा लाँगला जायचे असल्याने सकाळी निघतानाच हॉटेलमधून चेक आऊट करून सामान गाडीतच ठेवले होते. साधारण दुपारचे दीड-दोन वाजेपर्यंत प्रदर्शन पाहून गाडीकडे परतलो आणि हा लाँगच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले.

वाटेत व्हिएतनामच्या भातशेती आणि हिरवाईने भरलेल्या ग्रामीण भागाचे दर्शन होत होते...

मधूनच एखादा नवीन दिसणारा कारखाना उदार अर्थनीतिची झलक दाखवत होता...

आणि मग जवळचीच एखादी सुबत्तेचं प्रदर्शन करणारी नवी कोरी वसाहतही नजरेस पडत होती...

वाटेत एका ठिकाणी जेवायला थांबलो. येथे रस्त्यांवरची बरीच रेस्तराँ ही मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पोटात खूप आतवर असतात. म्हणजे जेवणापर्यंत पोहोचेपर्यंत खरेदीच्या मोहाची बरीच जाळी टाळत टाळत जायला लागतं !

येथेही नेहमीचे रेशमी कपडे, शोभेच्या वस्तू होत्याच...

पण संगमरवरातून कोरलेल्या वस्तूंचा इमारतीत आणि आवारात नुसता खच पडला होता. तुम्ही फक्त खरेदी करा आम्ही वस्तू
तुमच्या देशात घरपोच करू असा प्रस्ताव असतो...

.

.

जेवण मात्र मस्त चवदार होते. दोन प्रकारचे चिकन, एक भाजी, नुडल्स आणि भात. तिळाच्या तेलात शिजवलेले आणि सौम्य मसालेदार व्हिएतनामी पदार्थ मला तर एकदम आवडले. या ठिकाणी चित्रे काढायला विसरलो. पण पुढे जेवणाची बरीच चित्रे येतील. (स्वगतः विचारणा येण्या अगोदर स्पष्ट करण्याची खबरदारी घेतलेली बरी ;) )

परत तश्याच हिरव्यागार परिसरात प्रवास चालू झाला आणि दीड एक तासाने समुद्र दिसू लागला... चला हा लाँग जवळ आले ! बर्‍यापैकी थंडी होती आणि धुके दाटू लागले होते. प्रथम हॉटेलमध्ये चेक इन आणि गरम शॉवर असा कार्यक्रम झाल्यावर ताजातवाना झालो. संघ्याकाळचे साडेपाच सहा होत आले होते.

खोलीच्या बाल्कनीतून हा लाँग शहर आणि सामुद्रधुनीचे झालेले दर्शन...

.

.

.

पुढचा अख्खा दिवस हा लाँग उपसागरातील (Ha Long Bay) मधल्या बेटांवरची बोटीने सफर (Island Hopping Tour) करायची होती. तेव्हा बाहेर न जाता थोडा आराम करून रात्रीचे जेवण हॉटेलमध्येच घ्यायचे ठरवले.

(क्रमश : )

====================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

पैसा's picture

23 Nov 2013 - 10:43 pm | पैसा

एका नव्या देशाची अद्भुत सफर! व्हिएतनाम खूपच छान आणि टुमदार दिसते आहे. एवढ्या साध्या पद्धतीने रहाणारा राष्ट्राध्यक्ष पाहून थक्क व्हायला झाले. आपल्याकडे काय चालते याबद्दल न बोललेले बरे!

संजय क्षीरसागर's picture

23 Nov 2013 - 11:46 pm | संजय क्षीरसागर

मस्त!

प्यारे१'s picture

24 Nov 2013 - 2:02 am | प्यारे१

खूपच मस्त. मजा येतेय!

रुस्तम's picture

24 Nov 2013 - 2:15 am | रुस्तम

मस्त!

चांगली चाललीये सफर. अंकल हो ची घरे अगदी साधी असल्याचे आश्चर्य वाटले. तसा गरीब देश असूनही स्वच्छता मात्र आहे.
जेवणाबद्दल विचारणारच होते पण तुम्ही स्वगतात लिहिल्याने गप्प बसते. ;)

निनाद's picture

24 Nov 2013 - 7:04 am | निनाद

वाचतो आहे... मस्त.
गलथान कारभाराबद्दल तुम्ही तुमच्या टुर कंपनी ला झाडले की नाही? सुटीच्या दिवशी कसे काय असे ठरवले? हल्ली सगळी माहिती नेटावर असते. या गोष्टी सहजतेने शोधता यायला हव्यात टूर कंपनीला.

(एंगुयेन चा उच्चार न्युएन असा असावा असे वाटते.)
हे अगदी कॉमन व्हियेतनामी नाव आहे असा माझा समज आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2013 - 10:21 am | डॉ सुहास म्हात्रे

तो उच्चार मराठीत अथवा इंग्लिशमध्ये लिहायला जरा कठीणच आहे. त्यांतला शब्दातला न अनुनासिक आणि सुरुवातीला अगदी अस्पष्ट उच्चारला जातो... स्पष्ट न्युएन असा नाही.

अर्थात माझी व्हिएतनामी भाषेबद्दलची माहिती काही दिवसांच्या प्रवासात झालेली ओळख एवढीच आहे.

निनाद's picture

25 Nov 2013 - 8:40 am | निनाद

शब्दातला न अनुनासिक आणि सुरुवातीला अगदी अस्पष्ट उच्चारला जातो

अगदी अगदी न्युएन पेक्षा एंयुएन असा जास्त जवळ जाणारा आहे... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2013 - 10:52 am | डॉ सुहास म्हात्रे

गलथान कारभाराबद्दल तुम्ही तुमच्या टुर कंपनी ला झाडले की नाही? सुटीच्या दिवशी कसे काय असे ठरवले? हल्ली सगळी माहिती नेटावर असते. या गोष्टी सहजतेने शोधता यायला हव्यात टूर कंपनीला.

टूर कंपनीच्या व्यवहाराबद्दल अजून थोडी माहिती नंतर येईलच. भारतातल्या कंपन्यांना कस्टमाईझ्ड टूरचा फारसा अनुभव नाही आणि हे जास्त फायदेशीर पण जास्त संयोजन करावे लागणारे क्षेत्र टाळण्याकडेच त्यांचा भर दिसला आहे. जास्त फायदा असला तरी सरळ धोपटमार्ग सोडून काही वेगळे करण्याची वृत्ती दिसली नाही.

जेपी's picture

24 Nov 2013 - 8:52 am | जेपी

लगे रहो ,

मदनबाण's picture

24 Nov 2013 - 9:52 am | मदनबाण

अद्भुत ! सुंदर आणि स्वच्छ रस्ते पाहुन फार असुया वाटली !

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2013 - 10:26 am | डॉ सुहास म्हात्रे

पैसा, संजय क्षीरसागर, प्यारे१, निलापी, रेवती, तथास्तु आणि मदनबाण: सहलितील सहभागासाठी धन्यवाद !

प्रचेतस's picture

24 Nov 2013 - 10:38 am | प्रचेतस

अनोख्या देशाची अनोखी सफर.
मजा येतीय प्रवासात.

तिमा's picture

24 Nov 2013 - 11:29 am | तिमा

भाग एकदम वाचून काढले. फारच मजा आली. व्हिएतनामची सफरच झाली.

भाते's picture

24 Nov 2013 - 11:57 am | भाते

दुसरा आणि तिसरा भाग एकदमच बघितला (खरंतर अनुभवला). तुमच्या ओघवत्या लिखाणशैलीमुळे मला तुमच्या सहली नेहेमीच अनुभवायला मिळतात. खादाडीच्या फोटोंची आतुरतेने वाट पहात आहे.

सानिकास्वप्निल's picture

24 Nov 2013 - 2:15 pm | सानिकास्वप्निल

सफर मस्तं चाललीये
वाचायला मजा येत आहे :)
पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2013 - 5:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

वल्ली, तिमा, भाते आणि सानिकास्वप्निल : अनेक धन्यवाद !

स्पंदना's picture

25 Nov 2013 - 5:38 am | स्पंदना

फार छान फोटो अन वर्णन.
त्या तुमच्या कंपनीला कोर्टात खेचायला हवं, इअतक महत्वाच ठिकाण चुकवल म्हणजे काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2013 - 10:37 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रवासात फोन करून आणि नंतरही त्यांची बरीच कानउघाडणी केली. पण एकंदरीत त्या "अग्रगण्य" समजल्या जाण्यार्‍या कंपनीचा व्यवहार बघता त्यांना भविष्यात टाळणेच जास्त फायद्याचे वाटले.

नानबा's picture

25 Nov 2013 - 9:56 am | नानबा

सुंदरच.
पु.भा.प्र.

सुधीर कांदळकर's picture

26 Nov 2013 - 6:31 am | सुधीर कांदळकर

आपल्या चोखंदळपणाला आणि कलासक्तीला दाद देतो. निसर्गसौंदर्य नुसते असून उपयोग नाही. ते टिपण्यासाठी तुमच्यासारखी दृष्टी असावी लागते. झकास.

वयाच्या विशीत कॅबट लॉजचे पुस्तक वाचले होते. फेस ऑफ वॉर अशासारखे काहीसे नाव होते. त्यात उद्ध्वस्त व्हिएतनामचे, तिथल्या उद्ध्वस्त समाजाचे, तेव्हा अस्तित्त्वात असलेल्या दहशतवादाचे आणि व्हिएतनामींच्या दुर्दम्य आणि प्रखर राष्ट्रप्रेमाचे दर्शन झाले होते. हा सुंदर व्हिएतनाम निदान प्रकाशचित्रात पाहून बरे वाटले.

मागील लेखांकातील लाँग हाऊस पाहून शाळेतल्या पाठ्यपुस्तकातला `अ लाँग हाऊस इन बोर्निओ' हा धडा आठवला.

मागील लेखांकातील प्रतिक्रियेला आपण दिलेल्या तपशीलवार उत्तराबद्दल धन्यवाद. पर्यटन संस्थेची मदत न घेता रस्त्याने पर्यटन करतांना ड्रग माफियांच्या लुटारू टोळ्या फार उपद्रव देतात अशी माहिती मिळाली. तेव्हा आपला पर्यटनसंस्थेमार्फतचा मार्गच रास्त आणि सुरक्षित आहे असे समजते.

धन्यवाद.

पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2013 - 10:43 am | डॉ सुहास म्हात्रे

रस्त्याने पर्यटन करतांना ड्रग माफियांच्या लुटारू टोळ्या फार उपद्रव देतात अशी माहिती मिळाली.
हा मुद्दा नक्कीच फार महत्वाचा. तुम्ही ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत आहात त्यातला काही भाग बराच दुर्गम आणि कायद्याचे राज्य नसलेल्या (स्थानिक माफियांच्या ताब्यातील) आहे. जंगले जरी आकर्षक वाटत असली तरी "जंगल राज" पासून दूर राहणे हितकारक असते !

सुधीर कांदळकर's picture

26 Nov 2013 - 6:33 am | सुधीर कांदळकर

स्वप्नवत, एकमेवाद्वितीय वाटले. खालून सहा आणि सात पण उत्कृष्ट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2013 - 10:44 am | डॉ सुहास म्हात्रे

नानबा आणि सुधीर कांदळकर : धन्यवाद !

झकासराव's picture

26 Nov 2013 - 11:04 am | झकासराव

अप्रतिम लेखमाला सुरु आहे. :)

अनिरुद्ध प's picture

26 Nov 2013 - 12:31 pm | अनिरुद्ध प

अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
पु भा प्र

दिपक.कुवेत's picture

26 Nov 2013 - 3:14 pm | दिपक.कुवेत

भाग वाचतोय. सफर मस्त चाललीये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2013 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

झकासराव, अनिरुद्ध प आणि दिपक्.कुवेत : धन्यवाद !

पण एकंदरीत त्या "अग्रगण्य" समजल्या जाण्यार्‍या कंपनीचा व्यवहार बघता त्यांना भविष्यात टाळणेच जास्त फायद्याचे वाटले.

म्हणजे आम्ही ही टाळु त्याना....

आनन्दिता's picture

26 Nov 2013 - 11:52 pm | आनन्दिता

हो चि मिन्ह हे अमेरिकेला नमवण्याच्या कर्तबगारीचे श्रेय आपल्या शिवाजी महाराजांना देतो. गनिमी काव्या च्या जोरावरच हे शक्य झाले असे तो सांगतो. असं काहीसं ऐकण्यात आलं होतं. खरे आहे काय?.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2013 - 3:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्हिएत काँग (दक्षिण व्हिएतनाममध्ये लढाणारे व्हिएतनामी) नी अमेरिकेशी केलेले युद्ध हे सर्वस्वी गनिमी काव्याचे होते. त्याचे सचित्र वर्णन पुढे येईलच.

हो चि मिन्ह हे अमेरिकेला नमवण्याच्या कर्तबगारीचे श्रेय आपल्या शिवाजी महाराजांना देतो. हे माझ्या माहितीत आलेले नाही. पण खरे असल्याच नक्कीच रोचक आहे !

शशिकांत ओक's picture

27 Nov 2013 - 12:20 am | शशिकांत ओक

आदर्श सचित्र प्रवासवर्णन वाचून अनुभवायला मिळते आहे. सायगांव चा उल्लेख पु. ना. ओकांच्या 'नेताजींच्या सहवासात' पुस्तकातून कळला होता. त्याला आता होचिं मिन नामकरण झाल्याचे वाचून कळले. धन्यवाद.

शशिकांत ओक's picture

27 Nov 2013 - 12:21 am | शशिकांत ओक

आदर्श सचित्र प्रवासवर्णन वाचून अनुभवायला मिळते आहे. सायगांव चा उल्लेख पु. ना. ओकांच्या 'नेताजींच्या सहवासात' पुस्तकातून कळला होता. त्याला आता होचिंन मिंग नामकरण झाल्याचे वाचून कळले. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2013 - 3:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

निलापी आणि शशिकांत ओक : धन्यवाद !

प्रभाकर पेठकर's picture

2 Dec 2013 - 2:57 am | प्रभाकर पेठकर

तिन्ही भाग आत्ताच वाचून काढले. फार फार मस्त लिहीले आहे आणि आवडले हे वेगळे सांगायला नकोच.

'व्हिएटनामी राष्ट्राध्यक्षांना शिवाजी महाराजांबद्दल आदर होता. गनिमी काव्याच्या युद्ध नितीने त्यांनी विजय मिळविला. 'शिवाजी महाराजांसारखा राजा व्हिएट्नाम मध्ये जन्मला असता तर आम्ही सर्व जगावर राज्य केले असते.' असे उद्गार त्यांनी काढले होते.
हल्ली त्यांचे पंतप्रधान भारतिय दौर्‍यावर आले असता त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी पाहण्यची इच्छा व्यक्त केली आणि रायगडावर गेले असता तिथली मुठभर माती त्यांनी आपल्या सोबत नेली. पत्रकारांनी ह्याचे कारण विचारल्यावर, 'ही पवित्र माती आमच्या देशातील मातीत मिसळणार आहोत, म्हणजे आमच्या देशातही अशी शूर माणसे जन्माला येतील.' असे त्यांनी उत्तर दिले.'

हा वॉट्स्अप वर फिरणारा मजकूर आहे. सत्यतेबद्दल खात्री नाही. कुठलाही पुरावा नाही. (हल्ली लोकं पुरावे फार मागतात बुवा!)

स्पंदना's picture

2 Dec 2013 - 4:09 am | स्पंदना

हल्ली लोकं पुरावे फार मागतात बुवा! :))

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2013 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरंय ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2013 - 12:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

'शिवाजी महाराजांसारखा राजा व्हिएट्नाम मध्ये जन्मला असता तर आम्ही सर्व जगावर राज्य केले असते.'

युद्धात बेचिराख होऊन फिनिक्स पक्षाच्या दंतकथेप्रमाणे परत भरारी घेऊन ताठ मानेने जगाचे लक्ष वेधून घेणारे अर्वाचिन काळातले तीनच देश... जपान, जर्मनी आणि व्हिएतनाम.

यातल्या जपान आणि जर्मनी दोन देशांना युद्धानंतर राष्ट्रउभारणीसाठी पाश्चिमात्य देशांची बरीच मदत झाली आणि ते देश पुढच्या दोन शतकातच जागतिक आर्थिक महासत्तात गणले जाऊ लागले होते. अर्थात यामुळे त्या देशांच्या पुनरुत्थानातील त्यांच्या नागरिकांच्या शिस्तीचे आणि देशभक्तीचे योगदान कणभरही कमी होत नाही. कारण तितकीच किंवा काकणभर जास्तच मदत इटली आणि ग्रीसला मिळाली होती... शिवाय त्यांना युद्धाची भरपाई (रेपेरेशन) म्हणून प्रचंड रक्कम भरावी लागली नाही हे वेगळेच.

त्याविरुद्ध अमेरिकेशी पंगा घेतला म्हणून अनेक दशके फक्त सोविएट रशिया सोडला तर व्हिएतनामला जगात कोणीच दोस्त नव्हता. तरीसुद्धा चीनच्या आक्रमणाचा प्रतिकार करून त्याला आपल्या मायभूमीवरून हाकलून लावणे आणि शेजारी कंबोडियातल्या सतत कुरापत काढणार्‍या चीनधार्जिण्या सत्तेचा नायनाट करून तेथे लोकसत्ताक राजेशाही आणणे हे फक्त व्हिएतनामच करु जाणे ! याच त्याच्या कडव्या देशप्रेमामुळे शेवटी पाश्चिमात्य देशांना व्हिएतनामला त्याचे जगातिल योग्य स्थान द्यावे लागले. भीक मागून अथवा सतत मोठी तत्वे उगाळून जग मैत्री अथवा मान देत नाही, त्यासाठी "मला तुमची गरज आहे तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त तुम्हाला माझी गरज आहे हे सिद्ध करावे लागते", हे सर्वकालिक सत्य व्हिएतनामने सिद्ध केले आहे.

हा सगळा इतिहास पाहता शिवाजी महाराजांबद्दलचे वरचे वाक्य म्हणजे केवळ यजमान राष्ट्राचा मान राखण्यासाठी केलेला शिष्टाचार नसून त्यांचे खरोखरचे मनोगत आहे याची खात्री पटते.

चीनने आपलिही भूमी ताब्यात घेतली आहे आणि कंबोडियासारखाच आपल्या शेजारी देशाचा उपयोग करून सतत कुरापत काढत आहे... याला आपण अनेक दशके दिलेल्या (किंवा न दिलेल्या) उत्तरांचा इतिहास व्हिएतनामच्या इतिहासाशी पडताळून पाहिला तर भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे.