==================================================================
चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...
====================================================================
...पुढचा अख्खा दिवस हा लाँग उपसागर (Ha Long Bay) मधल्या बेटांवरची बोटीने सफर (Island Hopping Tour) करायची होती. तेव्हा बाहेर न जाता थोडा आराम करून रात्रीचे जेवण हॉटेलमध्येच घ्यायचे ठरवले.
आजचा तिसरा दिवस मोठा उत्सुकतेने उजाडला. कारण आज हा लाँग उपसागराची पूर्ण दिवसाची (सहा तासांची) सफर करायची होती. सर्व आटपून जरा लवकरच न्याहरीला गेलो, आणि ते बरेच झाले. कारण जेवणाची जागा हॉटेलच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर होती. पोटपूजा करताना तिथली उघडी गच्ची दिसली. थोडा वेळ तिथे काढावा म्हणून गेलो तर हे हा लाँगचे मनोहर दर्शन झाले...
.
दूरवरच्या बंदरात अजूनही पूर्ण न विरघळलेल्या धुक्यात एक क्रुझ शिप आलेले दिसत होते...
लॉबीत आलो तर मार्गदर्शक वाट पाहतच होता. ताबडतोप बंदराच्या दिशेने निघालो.
====================================================================
हा लाँग उपसागराची सफर (Hạ Long Bay)
व्हिएतनामच्या उत्तरपूर्वेकडील समुद्रात वेगवेगळ्या आकाराची आणि घडणीची अनेक हजार बेटे आहेत. त्यातला हा लाँग उपसागर नावाचा १५५३ चौ किमी चा भाग युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केला आहे. या परिसरात जवळ जवळ २,००० बेटे आहेत. त्याच्या मुख्य भागात तर ३३४ चौ किमी मध्ये दाटीवाटीने पसरलेली ७७५ बेटे आहेत.
(नकाशा जालावरून साभार)
काही बेटे म्हणजे नुसते समुद्रातून वर डोकावणारे प्रचंड प्रस्तर तर कायम काही कायमस्वरूपी मानववस्ती आणि प्राणिजीवन असलेली मोठी बेटे आहेत. ही सगळी बेटे मुख्यतः चुनखडीच्या प्रस्तरापासून बनलेली आहेत. गेल्या २० लाख वर्षांतील नैसर्गिक घडामोडींमुळे आणि झिजेमुळे काही बेटांचे आकार चित्रविचित्र बनलेले आहेत आणि काहिंची त्या आकारांवरून नावेही पडलेली आहेत. काही बेटांच्या पोटातल्या चुनखडीच्या खडकांची झीज होऊन लहानमोठ्या गुहा बनल्या आहेत.
पूर्वापार रूढीप्रमाणे या बेटांबाबत व्हिएतनामी दंतकथा नसती तरच आश्चर्य नाही काय? तर ती अशी. देश म्हणून व्हिएतनामची ओळख सुरू झाली त्या काळात त्याच्यावर चिनी सम्राटाने आक्रमण करायला एक भले मोठे आरमार या उपसागरात पाठवून दिले. तेव्हा देवाने व्हिएतनामचे संरक्षण करायला एका ड्रॅगन कुटुंबाला पाठवून दिले. ड्रॅगन कुटुंबाने थुंकलेले हरीताश्म (जेड) आणि इतर माणके पाण्यात पडताच त्यांची बेटे बनू लागली आणि एक संरक्षक साखळी तयार झाली. या बेटांच्या अडथळ्यांवर आदळून शत्रूची बरीचशी जहाजे नष्ट झाली आणि त्याला माघारी परतणे भाग पडले. युद्धानंतर या सुंदर प्रदेशाच्या प्रेमात पडून ड्रॅगन्सनी तेथेच काही बेटांवर राहणे पसंत केले. त्यावरूनही काही बेटांची नावे पडली आहेत.
दहा मिनिटांच्या प्रवासाने बंदरावर पोहोचलो. तेथे प्रवासी बोटी शिस्तीत रांगेने उभ्या होत्या...
.
बंदरावरचा व्यवस्थापक आमच्यावर कसा काय कोण जाणे पण बराच खूश दिसला. त्याने आम्हा फक्त दोघांसाठी एक स्वतंत्र बोट दिली. तीच ही आमची जलराणी फोंग हाय ...
नेहमी ३०-४० प्रवाशांना नेणारी बोट तिचा कप्तान, शेफ आणि गाईड आमच्या दोघांच्या दिमतीला घेऊन राजेशाही थाटाने हा लाँग उपसागराच्या सफरीला निघाली...
बेटांच्या मुख्य भागात बोट पोहोचली आणि पावसाच्या आणि समुद्राच्या पाण्याने बेटांची झीज होऊन बनलेले चित्रविचित्र नजारे दिसू लागले...
बसलेल्या कुत्र्याचा आकार असलेला प्रस्तर असणारे डॉग आयलँड...
धूपदानाच्या आकाराचे बेट...
झुंजणारे कोंबडे...
अजून काही बेटांचे आकार...
.
.
.
बोटींसाठी वाहतूक चिन्हांच्या पाट्या...
तरंगत्या घरांची गावे
हा लाँग उपसागरामध्ये गेल्या वीस हजार वर्षांत तीन वेगवेगळ्या संस्कृती नांदल्याचे पुरातन पुरावे सापडले आहेत. आजही तेथे तीन तरंगत्या घरांच्या गावांत सुमारे १६०० लोक राहत आहेत. या भागात असलेले २०० प्रकारचे मासे आणि ४५० प्रकारचे शंखशिंपल्यातील जीव यांचा अन्न म्हणून व मस्त्यव्यापारासाठी उपयोग करून ही जमात उपजीविका करते. मध्येच एखादी तरंगणार्या घरात राहणार्या जमातीची वसाहत लागत होती...
त्यातल्या एका वसाहतीत थांबा घेतला...
तेथे अनेक प्रकाचे मासे आणि शंखशिंपले विकायला ठेवले होते...
...
.
...
.
...
त्या तरंगत्या घरांच्या आवारातही मासे ठेवलेले तलाव केले होते. त्यातला पसंत असलेला मासा निवडा व बोटीची फेरी होईपर्यंत तो शिजवून तरंगत्या गावातल्या रेस्तराँमध्ये शिजवून वाढण्याचीही सोय होती. आमच्या शेफने तुम्ही मासा घेतला तर मी सुद्धा हवा तसा शिजवून देईन असे सांगितले. पण आमच्या सफरीत जेवण समाविष्ट असल्याने त्याला नकार दिला. नंतर त्याने आमच्याकरिता केवढे जेवण बनविले होते ते पाहिल्यावर हे योग्यच केले असे वाटले. नाहीतर बरेच जेवण वाया गेले असते.
आश्चर्यकारक गुहा (Hang Sung Sot or Cave of Surprises)
फिरत फिरत आमची बोट एका मोठ्या बेटाजवळ आली. त्यावरच्या बर्यापैकी उंच डोंगरावर दिसणार्या गुहेकडे बोट दाखवून मार्गदर्शक म्हणाला, "गुहेपर्यंत पोचायला जरा चढ आहे. काय विचार आहे?" त्याला बिचार्याला माहीत नव्हते की हे दोन शिवबांच्या देशाचे मावळे होते, म्हणून माफ करून टाकले आणि गिर्यारोहणाला सुरुवात केली !...
हा लाँग उपसागरामध्ये लवणस्तंभांच्या अनेक गुहा आहेत. त्यातल्या सुंदर आकृत्या असलेल्या तीन गुहा प्रसिद्ध आहेत. त्यांत Hang Sung Sot ही सर्वात सुंदर समजली जाते. ही गुहा साधारण ३० मीटर उंचीची आणि ५०० मीटर लांब आहे. असंख्य आकर्षक आकाराच्या लवणस्तंभांमुळे (stalagmites and stalactites) ही गुहा येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण झालेली आहे. त्या आकृतींचे सौंदर्य अजूनच खुलवण्यासाठी रंगीत प्रकाशझोत टाकले जातात. ही गुहा पाहणे हा एक अविस्मरणिय अनुभव होता.
टेकडी चढताना घेतलेली परिसराची काही चित्रे...
.
गुहेच्या छतावरची आणि लवणस्तंभांची कलाकारी...
.
.
.
.
.
.
.
तासभर तरी गुहेत फिरत होतो. ही मी पाहिलेली पहिली लवणस्तंभ गुहा होती. त्यामुळे हे अप्रूप अजून विशेष होतं. नंतर अजून काही गुहा पाहिल्या पण हीच माझ्यामते त्यांत सर्वात सुंदर आहे. गुहेच्या दुसर्या टोकातून बाहेर पडलो आणि आम्ही आत गेलो तेव्हा मोकळा असलेला परिसर प्रवाशांनी भरलेल्या बोटींनी गजबजून गेला होता...
एका बाजूला आतले खडक विरघळल्यामुळे जमीन धसून बनलेले गोड्या पाण्याचे तळे दिसत होते तर दुसर्या बाजूला डोंगरावरच्या झाडीने पाचूसारखा हिरवागार समुद्र दिसत होता...
परतीचा धक्क्याकडे जायला नागमोडी समुद्रकिनार्याला लागून एक आकर्षक लाकडी पूल बनवला आहे...
ति तॉप बेट (Dao Ti Top)
पुढचा थांबा 'ति तॉप' हे 'कॉन दाओ' बेटसमुहांमधले एक बेट आहे. ही बेटे त्यांच्या पोहोण्याच्या उत्तम समुद्रकिनार्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ति तॉप चा समुद्रकिनारा छोटासाच आहे पण याचे वैशिष्ट्य असे की याच्यावरच्या टेकडीच्या माथ्यावरून चारी बाजूच्या हा लाँग परिसराचे सर्वात जास्त सुंदर दर्शन होते... काहींच्या मते अगदी हेलिकॉप्टर सफरीच्यापेक्षा जास्त सुंदर आणि अर्थातच अत्यंत स्वस्त !
टेकडी चढताना अर्ध्या उंचीवरून घेतलेली चित्रे...
.
टेकडीच्या माथ्यावरून घेतलेली चित्रे...
.
.
गुहेतली भटकंती आणि टेकड्यांची चढउतार करून आता भूक खवळली होती. पण बोटीत शिरल्यावर काही म्हणण्याच्या आतच जेवण तयार असल्याची घोषणा झाली. ही जलसफर असल्याने स्थानिक समुद्रातला मेव्याचे प्रकार शेफने पेश केले. आतापर्यंत आम्ही सौम्य मसाल्याच्या वापराने बनवलेल्या चवदार व्हिएतनामी खाण्याच्या प्रकारांच्या प्रेमात पडलो होतोच. आताच्या शेफनेही ते प्रेम वृद्धींगत केले!
माश्यांचे सूप आणि स्प्रिंग रोल्स, कालवे (शिंपले), कोलंब्या, तळलेला मासा, बटाटा चिप्स आणि भात असा बेत होता...
.
समुद्रभटकंती करून हा लाँग शहरात परतेपर्यंत चारएक वाजले असतील. आज रात्रीला हो नोईला वस्ती करायची होती म्हणून सकाळीच हॉटेलमधून चेकआऊट करून सामान आमच्या गाडीतच ठेवले होते. गाडी बंदरावरून सरळ हा नोईच्या दिशेने निघाली.
(क्रमशः )
==================================================================
चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...
====================================================================
प्रतिक्रिया
26 Nov 2013 - 10:03 pm | तिरकीट
निव्वळ अप्रतिम....
गुहेमधली प्रकाशयोजना सुरेख आहे.........
26 Nov 2013 - 10:28 pm | रेवती
अप्रतीम फोटू आणि माहिती. या माहितीचे एक पुस्तक निघायलाच हवे. पाण्याचा रंग अगदी सुरेख. वरील पदार्थांपैकी भात व फ्रेंच फ्राईज एवढेच मला खाता आले असते. हाच प्रश्न येतो सगळीकडे.
26 Nov 2013 - 11:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
संपूर्ण व्हिएतनाममध्ये शाकाहारी खाण्याबद्दल काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. समुद्रसफरीला गेल्यावर समुद्रातली फळे चाखायलाच पाहिजेत ना? म्हणुन इथे फक्त त्यांचा उल्लेख आला आहे. शाकाहारी खाण्याबद्दलही पुढे येईलच.
26 Nov 2013 - 10:32 pm | सानिकास्वप्निल
हा भाग जास्तं आवडला, सगळे फोटो किती सुंदर आहेत आणी झकास प्रवासवर्णन....भन्नाट :)
मजा येतेय वाचायला.
26 Nov 2013 - 10:49 pm | पैसा
अप्रतिम! घरबसल्या आम्हाला एवढे हिंडवून आणल्याबद्दल धन्यवाद!
26 Nov 2013 - 11:08 pm | राघवेंद्र
हि सफर सुध्दा मस्त चालु आहे. लवणस्तंभातील प्रकाश योजना खुप सुरेख आहे.
27 Nov 2013 - 3:26 am | मोदक
+१
26 Nov 2013 - 11:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
उगीच काहीतरी, सानिकास्वप्निल आणि पैसा: अनेक धन्यवाद !
27 Nov 2013 - 5:54 am | अर्धवटराव
मला खरच प्रत्यक्ष सफारीचा आनंद मिळायला लागलाय...
पु.भा.प्र.
27 Nov 2013 - 8:40 am | प्रचेतस
सुरेख.
अद्भूत आहेत इथली बेटं, गुहा, लवणस्तंभ...सगळंच.
27 Nov 2013 - 8:57 am | सुनील
सफर छानच चालली आहे. फोटोही उत्तम.
अवांतर - इंग्रजी Bay ला सामुद्रधुनी हा शब्द योग्य वाटत नाही. उपसागर हा शब्द योग्य ठरावा. सामुद्रधुनी (Strait) म्हणजे दोन समुद्रांना जोडणारा एक चिंचोळा प्रवाह. नकाशावरूनतरी हालाँग हा strait वाटत नाही.
27 Nov 2013 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
चपखल शब्द सुचविल्याबद्दल आभार ! बदल केला आहे.
27 Nov 2013 - 9:03 am | जेपी
लगे रहो :-)
27 Nov 2013 - 9:05 am | नानबा
प्रत्येक व्वाह मागील वाढलेले उद्गारचिन्ह वाचता वाचता आणि फोटो पाहता पाहता मिळालेल्या आनंदासाठी...
अ.प्र.ति.म.
पु.भा.प्र. :)
27 Nov 2013 - 10:13 am | झकासराव
सुंदर :)
27 Nov 2013 - 10:25 am | सुधीर कांदळकर
सहल उत्तरोत्तर रंगते आहे. धन्यवाद. जेवणघराच्या खिडकीतून काढलेले चित्र, अर्ध्या उंचीवरून काढलेले चित्र, नागमोडी पुलाचे चित्र, लाजबाब.
जलराणी आणि लवणस्तंभ हे शब्द आवडले. माझ्या माहितीप्रमाणे ‘bay’ ला उपसागर म्हणतात. शाळेत आम्ही बे ऑफ बेंगॉल ला बंगालचा उपसागर असे म्हणत होतो.
मांसाहारींचा हेवा वाटला. शाकाहारींची काय सोय आहे की नाही? लोणीपावपावबिव मिळतो का? की ते उपाशीच?
धन्यवाद.
पुभाप्र
27 Nov 2013 - 2:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
चपखल शब्द सुचविल्याबद्दल आभार ! बदल केला आहे.
शाकाहारींना काळजीचे अजिबात कारण नाही. पुढे त्याबाबत येइलच.
27 Nov 2013 - 10:28 am | संजय क्षीरसागर
निसर्ग आणि लोकांच्या जगण्याचं विलोभनीय दर्शन!
27 Nov 2013 - 10:50 am | सौंदाळा
अप्रतिम भाग, फोटो आणि जेवणसुध्दा.
मजा आली.
27 Nov 2013 - 11:06 am | देवांग
शेवटचा फोटो बघून तोंडाला पाणी सुटले …. लई म्हणजे लई आहे
27 Nov 2013 - 12:10 pm | अनिरुद्ध प
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
एक्का साहेब सहल उत्तम सुरु आहे.
27 Nov 2013 - 12:16 pm | दिपक.कुवेत
फोटो तर काय अप्रतीम......पुर्ण वेळ हवामान ढगाळ होतं का? पाउस पडुन विरस नाहि ना झाला?
27 Nov 2013 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
जानेवारी महिना असल्याने हवा थंड, थोडे धुके आणि मधून मधून उन असे होते. पाउस वगैरे सहलित अडथळा होईल असे काही नव्हते.
27 Nov 2013 - 1:08 pm | प्यारे१
मस्तच!
बाकी 'बताता'(इकडे हेच म्हणतात) आणि भात बद्दल रेवतीआज्जीशी सहमत!
27 Nov 2013 - 1:50 pm | दिनेश चिले
एक्का काका, अप्रतिम प्रवासवर्णन. खूप मज्जा येते तुमचे लिखाण वाचायला. आणि फोटो पाहायला.
मी तुमची एप्रिल महिन्यातली ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड चे प्रवास वर्णन कालच वाचले. निव्वळ अप्रतिम.
व्हिएतनामची सफर हि मस्त चालली आहे. शुभेच्छा.
धन्यवाद.
27 Nov 2013 - 2:05 pm | त्रिवेणी
गुहेतील सर्वच प्रचि अशक्य सुंदर.
बाकी 17 नंबर आहे शेवटचा पण जास्त आवडले.
27 Nov 2013 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
मोदक, अर्धवटराव, वल्ली, तथास्तु, नानबा, झकासराव, संजय क्षीरसागर, सौंदाळा, देवांग, अनिरुद्ध प, प्यारे१, दिनेश चिले आणि त्रिवेनि : आपणा सर्वांमुळे सहलिची मजा अजूनच वाढते आहे.
27 Nov 2013 - 3:31 pm | युगन्धरा@मिसलपाव
तुम्हि कित्ति देश फिरुन आला आहात?
खरच हेवा वाट्तो तुमचा. खुप चान लिहिता तुम्हि.
माफ करा मराथि लिहिन्याच पहिलाच प्रयत्न आहे.
पण तुमच लेखन वाचुन रहावल नाहि . म्ह्णून हा प्रयत्न.
27 Nov 2013 - 3:34 pm | युगन्धरा@मिसलपाव
असेच फिरत रहा आणि आम्हाला माहिति पुरवा.
27 Nov 2013 - 3:46 pm | अत्रुप्त आत्मा
ग्रेट!
27 Nov 2013 - 6:27 pm | कवितानागेश
सगळे भाग अत्ताच वाचले. मस्स्त. :)
27 Nov 2013 - 7:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
युगन्धरा@मिसलपाव, अत्रुप्त आत्मा आणि लीमाउजेट : अनेक धन्यवाद !
28 Nov 2013 - 7:36 pm | जेनी...
अप्रतिम इस्पु काका ... सगळे भाग वाचुन काढले ...
फोटो कसले जिवंत आहेत , बेटे आवडली .... लिहित रहा पूढला भाग येण्याच्या प्रतिक्षेत
आपकि लाडली पूजा ....
29 Nov 2013 - 12:24 am | डॉ सुहास म्हात्रे
लाडल्या पूजेस आशिर्वाद ! :)
29 Nov 2013 - 5:24 am | स्पंदना
जरा तिकिटे काढण्यात व्यस्त होते. ;)
स्वप्न नगरी भासते ही सफर. समुद्राचे फोटोज, तरंगत्या घरांचे फोटोज अतिशय सुरेख.
29 Nov 2013 - 10:18 am | सुमीत भातखंडे
.
29 Nov 2013 - 11:16 am | मृत्युन्जय
मस्तच हो इए :)
29 Nov 2013 - 12:34 pm | हरिप्रिया_
मस्तच.. छान सुरु आहे प्रवास.
मला ही छोटी छोटी बेट पायरेट्स ऑफ कॅरेबियनची आठवण करुन देत आहेत.
29 Nov 2013 - 7:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
aparna akshay, सुमीत भातखंडे, मृत्युन्जय आणि हरिप्रिया_ : सहलितल्या सहभागासाठी धन्यवाद !
2 Dec 2013 - 7:11 am | जॅक डनियल्स
खूप सुंदर वर्णन आहे.
तरंगत्या घरात राहणाऱ्या लोकाबद्दल बीबीसी च्या ह्युमन प्लानेत याच्या "ओशन" भागात खूप सुंदर माहिती दिली आहे.
त्या वस्ती मधील एक मासेमारी एवढा समुद्राशी एकरूप असतो की तो प्राणवायू न लावता, २० मी खोल जाऊन मासे पकडत असतो. फक्त ही जमात मलेशिया मधली दाखवली आहे, पण या सारखीच असावी.
2 Dec 2013 - 7:12 am | जॅक डनियल्स
विलक्षण मासेमार !
2 Dec 2013 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
पारंपारिक रितीने समुद्रतळाचे मोती काढून आणणारे लोक श्वास रोखून १२ ते ४० मीटर खोलवरचे शिंपले वर घेउन येत असत. मात्र यामुळे भराभर गोळा करून आणलेल्या एक टन शिंपल्यात चारपाचच चांगल्या प्रतिचे मोती मिळत असत. शिवाय शिंपल्यांच्या अती मासेमारीमुळे इतक्या खोलात मोती मिळणे दुष्कर झाले आहे आणि सर्व व्यापार मोठ्या कंपन्यांच्या हातात गेला आहे. त्यामुळे हल्ली प्राणवायूशिवाय मोती काढण्याचे प्रात्यक्षिक वगैर फक्त प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठीच होते.
2 Dec 2013 - 8:10 pm | चिगो
जबरदस्त एक्कासाहेब.. मोती घेतलेत की नाही हलाँगला? :-) त्या लाकडी पुलाजवळच्याच एका दुकानातच माझा कॅमेरा हरवला. (मीच विसरलो. ):-( त्यामुळे हलाँगची तीच आठवण मनात आहे..
अवांतर : मेघालयात अश्याच, किंबहुना ह्याहीपेक्षा सुंदर चुनखडीच्या गुफा आहेत. अगदी आत नदी, धबधबे असलेल्या.. पण.. पण तिथे पण आहे!:-(
2 Dec 2013 - 9:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
अवांतर : मेघालयात अश्याच, किंबहुना ह्याहीपेक्षा सुंदर चुनखडीच्या गुफा आहेत. अगदी आत नदी, धबधबे असलेल्या.. पण.. पण तिथे पण आहे!:-(
जरा जास्त माहिती टाका ना तिथली. सिक्कीम पर्यंत जावून आलो आहे. महिन्याभरात पोस्ट ग्रॅजुएट परिक्षा असल्याने पुढे गेलो नाही. पण उत्तरपूर्वेची एक दीर्घ सफर नक्कीच करणार !
मोती घेतलेत की नाही हलाँगला?
तिथेपण गडबड (प्लस्टिकचे मोती, वगैरे) असते असे आमच्याच गाईडने सांगितले शिवाय खरेदी करण्यामध्ये मला फार उत्साह नसतो.