==================================================================
चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...
====================================================================
...हॉटेलवर पोहोचून थोडा आराम करून शॉवर घेतल्यावर बरे वाटले. संग्रहालयातल्या भूतकाळातून वर्तमानात यायला जरा मदत झाली. संध्याकाळचे जेवण आमच्यावरच होते. एका व्हिएतनामी रेस्तराँचा पत्ता मार्गदर्शकाकडून घेतला होता, तिकडे निघालो. चिनी नववर्षोत्सव "टेट" सुरू झाला होता. रस्ते रोषणाईने खुलून गेले होते...
कालच्या प्रवासवर्णनात आमच्या सहल कंपनीचा (अजून एक) विनोद सांगायचा राहिलाच. हॉटेलवर चेकईन केल्यावर बेलबॉय खोलीवर घेऊन गेला. पाहतो तर काय, बेसमेंटमधली खोली होती. तिला खिडकीचा असावा तसा एक पडदा होता. तो बाजूला केला तर समोर भिंत ! सहल कंपनीने तर "काळजी करू नका. सगळीकडे उत्तम खोल्या बुक केल्या आहेत असे ठासून सांगितले होते." बहुतेक हॉटेलची चूक झाली असेल म्हणून रिसेप्शनला तक्रार केली तर सांगितले की हीच खोली बुक केली आहे. मग भांडून आणलेला स्थानिक फोन क्रमांक फिरवला. तेथून कळले की आमच्या भारतातील कंपनीला खोल्यांच्या सर्व माहितीसकट तीन पर्याय दिले होते. त्यातल्या ह्याच खोलीची त्यांनी निवड केली होती ! मग भारतात फोन लावला तर आश्चर्य दाखवून सगळा दोष स्थानिक कंपनीवर ढकलला जाऊ लागला तेव्हा मात्र खोली कशी निवडली गेली त्याची सगळी माहिती असल्याचे सुनावावे लागले. मग मात्र "दुसरी खोली घ्या. भारतात परतल्यावर किमतीतला फरक देते." अशी सारवासारव झाली. अर्थात त्या कोंडवाड्यात तीन रात्री राहणे शक्य नसल्याने आम्ही त्याअगोदरच फरक भरून खोली बदलून घेतली होती. अश्या तऱ्हेने आमच्या सहल कंपनीने धक्के देणे चालूच ठेवले होते... फरक इतकाच की त्यांच्या जाहिरातीत वचन दिल्याप्रमाणे ते सुखद आश्चर्याचे नव्हते ! असो.
==================================================================
कु ची भुयारे (Củ Chi tunnels)
पाचवी सकाळ जरा उत्सुकतेनेच उजाडली. कारण आज व्हिएतकाँग सैनिकांनी (स्वातंत्र्यसैनिक) दक्षिण व्हिएतनाम आणि अमेरिकन फौजांशी गनिमी काव्याने लढण्यासाठी जे भूमीगत भुयारांचे जाळे बनवले होते ते पहायला जायचे होते. ही भुयारे हो ची मिन् शहराच्या कु ची विभागात असल्याने त्यांना हे नाव पडले आहे.
२०० किलोमीटर लांबीचे हे भुयारांचे जाळे म्हणजे व्हिएतकाँग सेनेच्या गनिमी काव्याचा आधारस्तंभ होते. त्यात सगळे काही होते... सैनिकी मुख्यालय, हॉस्पिटल, राहण्याचा जागा, कामचलाऊ शस्त्रे आणि दारुगोळा बनवायचे कारखाने, इ. इ. लॅटेराइट प्रकारच्या खडकातली ही भुयारे केवळ हाताने वापरलेल्या हत्यारांनी बनवलेली होती.
सर्वप्रथम एका मांडवात एक मार्गदर्शक आपल्याला या भुयारांचा इतिहास, त्यांची रचना आणि उपयोग याबाबत माहिती सांगतो व एक छोटा माहितीपटही दाखवतो.
खालच्या नकाश्यात कु ची विभाग लाल रंगाने आणि त्यातली भुयारे काळ्या रंगाच्या रेषांनी दाखवलेली आहेत...
भुयारांची अंतर्गत रचना... काही ठिकाणी एकमेकावर तीन मजले आहेत...
नंतर आम्ही कु ची भुयारे प्रत्यक्ष पहायला निघालो.
भुयाराचा छुपा दरवाजा (बंद आणि उघडलेला)...
...
अमेरिकन सैनिकांना ही भुयारे अजिबात माहिती नव्हती असेही नाही पण त्यांचा आकार एका मध्यम आकाराच्या माणसाला कमरेत वाकून अथवा काही ठिकाणी सरपट जावे लागेल इतकाच आहे. त्यामुळे त्यांना "काळा प्रतिध्वनी (Black Echo)" या नावाने संबोधणारे अमेरिकन सैनिक एखादा दरवाजा सापडला तरी भुयाराच्या आत घुसायचे धाडस करू शकले नाहीत.
मात्र या भुयारांतली व्हिएतकाँग सैनिकांची परिस्थितीही हालाखिचीच होती. त्यांना दिवसभर किंवा काही वेळेस अनेक दिवस अमेरिकन सैनिकांच्या नजरेपासून वाचण्यासाठी तेथेच लपून बसणे भाग होते. रात्री बाहेर पडून रसद गोळा करणे, शेतीकाम करणे आणि शत्रूवर गनिमी हल्ले करणे हे चालू होते.
ती भुयारे सतत मुंग्या, विंचू, कोळी आणि इतर कीटकांनी भरलेली असत. त्यामुळे आजारपण व्हिएतकाँगच्या पाचवीलाच पुजलेले होते. लढाईतील जखमांखालोखाल मृत्यू मलेरियाने होत असत. अमेरिकन सैन्याच्या अहवालांमध्ये पकडल्या गेलेल्या व्हिएतकाँगपैकी ५०% मध्ये मलेरिया आणि १००% मध्ये पोटातील कृमी मिळाल्याच्या नोंदी आहेत.
अमेरिकन सैनिक भुयारात घुसण्याचे धाडस न करण्याचे अजून एक कारण म्हणजे त्यांच्या दरवाज्यांना काहीना काही सापळे लावलेले असायचे. दरवाजा उघडताना गफलत म्हणजे मृत्यूला आमंत्रण होते. हा एक सापळा, थोडीशी चूक आणि टोकदार सळया शरीरात घुसून बार-ब-क्यू साठी तयार !...
असे सापळे फक्त दरवाज्यातच नसून भुयारांमध्येही असायचे. ही भुयारे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन क्रिंप आणि ऑपरेशन सिडार फॉल्स या नावांच्या दोन लष्करी मोहिमा राबवल्या गेल्या.
त्यातल्या ऑपरेशन क्रिंप्मध्ये बी-५२ विमाने वापरून बाँबवर्षावाने कु ची चा हिरवागार प्रदेश बेचिराख केला गेला. त्यानंतर ८००० सैनिकांनी तो छोटा प्रदेश पिंजून काढला. भुयारांत विषारी वायू व वितळलेले डांबर टाकले गेले, ती पाण्याने भरण्याचे प्रयत्न केले गेले. ऑपरेशन सिडार फॉल्समध्ये तर एकूण ३०,००० सैनिक कामी लावले होते. पण या मोहिमांना म्हणावे तसे यश आले नाही आणि व्हिएतकाँग अमेरिकन सैनिकांना छळत आणि त्यांची हानी करत राहिले. युद्धाच्या शेवट येईपर्यंत इतके बाँब (कार्पेट बाँबिंग) या भागात टाकले गेले होते की काही ठिकाणी जमीन खोलवर उघडी पडून भुयारे धसू लागली होती. पण त्या वेळेपर्यंत व्हिएतकाँगनी त्यांच्या उत्तरेतल्या दोस्तांना लढाईत वरचष्मा मिळवून द्यायला पूरेपूर मदत केली होती.
व्हिएतकाँगच्या या भुयारी युद्धामुळे युद्धशास्त्रातला गनिमी काव्याच्या एक महत्त्वाचा धडा लिहिला गेला. गनिमी काव्याने शत्रूला कसे गुंतवून ठेवावे, कसे फक्त आपल्याला हवे तेव्हा आणि हवे तसे युद्ध छेडावे आणि शत्रूच्या बलशाली सैन्याला दुभंगून आपल्या दुसऱ्या फळीवरचा (उत्तर व्हिएतनामी सैन्याचा) भार कसा कमी करायचा हे या युद्धातले महत्त्वाचे बोध होते.
अर्थात अश्या युद्धशास्त्राच्या तीर्थस्थळी आल्यावर भुयारांचे पूर्ण दर्शन घेतल्या शिवाय कसे राहवेल?
भुयारांची दारे...
...
भुयारात शिरताना...
.
आवारात फिरताना वातावरण निर्मितीसाठी ठेवलेले अनेक व्हिएतकाँगचे पुतळे दिसतात. अर्थातच तेथे फोटो काढणे होतेच !...
हे वारूळ नही तर भुयारातल्या भटारखान्यातील धूर बाहेर जाण्यासाठी केलेली रचना आहे...
अश्या ठिकाणचा धूर हेरून अमेरिकनांनी बॉब टाकायला सुरुवात केली. मग व्हिएतकाँगनी धूर सहज दिसू नये म्हणून अश्या जागा झाडांच्या पानांनी झाकायला सुरुवात केली. त्यावर उपाय म्हणून अमेरिकन कुत्रे घेऊन जेवणाच्या धुराच्या वासावरून या ठिकाणांचा शोध लावू लागले तर व्हिएतकाँगनी धुरांड्याच्या आतल्या भागात अश्या वनस्पतीची पाने आणि रसायने वापरायला सुरुवात केली की त्यामुळे कुत्र्याचे वासाचे ज्ञान कमी होऊन तो गोंधळून जाईल ! असा हा गनिमी काव्याचा खेळ युद्ध संपेपर्यंत चालला होता.
सापळे
या गनिमी युद्धात वापरलेले गेलेले अजून एक प्रभावी शस्त्र म्हणजे व्हिएतकाँगनी आजूबाजूला मिळेल ती सामग्री वापरून बनवलेले सापळे. यांचा अमेरिकन सैनिकांनी फार धसका घेतला होता. अचानक अणकुचीदार सळया अंगात घुसवून शत्रूच्या सैनिकांना गारद करून किंवा जायबंदी करून बराच काळ युद्धातून बाहेर बसवून आपल्यावरचे आक्रमण बोथट करण्यासाठी व्हिएतकाँगनी सापळ्यांचा उपयोग मोठ्या परिमाणकारक पद्धतीने केला होता.
पाय जायबंदी करणारा सापळा (अगोदर आणि पाय पडल्यावर)...
...
आणखी काही सापळे...
...
.
...
एकदा पाय आत अडकला की जेवढी जास्त धडपड होईल तितकी जास्त जास्त सळयांची माश्याच्या गळासारखी असलेली टोके अजून खोलवर रुतून पाय छिन्नभिछिन्न करतात...
हा खास दरवाज्यावर अडकवलेला सापळा सैनिकाने दरवाजा जोरात उघडला की त्याच्यावर जोराने आदळून सर्वांगाची चाळणी करतो...
पुनर्वापर (recycling), व्हिएतकाँग स्टाइल
बाँबवर्षावात न फुटलेले बाँब आणि अमेरिकन सैनिकांनी टाकून दिलेला कचर्यातिल (पेयांचे आणि खाद्यपदार्थांचे डबे, इ) धातू आणि स्फोटक पदार्थांचा व्हिएतकाँग परिणामकारकरित्या पुनर्वापर करून हत्यारे आणि स्फोटके (improvised explosive device किंवा IED) बनवत असत. हे सर्व तेथे एका छोट्याश्या प्रदर्शनात पुतळ्यांच्या सहाय्याने प्रात्यक्षिक करून दाखवलेले होते...
.
.
.
न फुटलेल्या बाँब्जमधली स्फोटक द्रव्ये आणि थंड पेयांचे डबे वापरून बनवलेले गावठी बाँब...
व्हिएतनाम युद्धात किती प्रचंड प्रमाणात सामरिक आणि इतर सामग्री वापरली असावी याचा थोडासा अंदाज पुढच्या प्रात्यक्षिकात येतो. १९७५ मध्ये संपलेल्या या युद्धात वापरलेल्या वस्तूंचा हिएतकाँग कसा पुनर्वापर करत असत हे ३५ वर्षांनंतरही त्याच युद्धात वापरलेल्या अथवा टाकून दिलेल्या वस्तू वापरून दाखवले जात होते.
महाकाय अमेरिकन ट्रक्सच्या टायरच्या सॅडल्स आठवणीच्या वस्तू म्हणून लोक विकत घेत होते !...
इतर वस्तू...
...
...
कु ची विभागातच एक भूदलाच्या नेमबाजीच्या सरावाची जागा (शूटिंग रेंज) आहे. तेथे प्रवाशांना फी भरून AK47 आणि M16 या व्हिएतनाम युद्धात काबीज केलेल्या रायफलींनी नेमबाजीचा सराव करता येतो. आम्ही अशी संधी थोडीच सोडणार ???...
.
नेमबाजीचा सराव झाल्यावर कु ची चा फेरफटका परत सुरू केला.
बी ५२ बॉम्बर मधून टाकलेल्या शक्तिशाली बाँबने झालेल्या खड्ड्यात उतरून त्याची तपासणी करताना सागर...
कु ची भुयारातली निरिक्षणफेरी
इतके दूर भुयारे बघायला आलो आणि ती जमिनीवरूनच बघून परत जाणे कसे शक्य होते? कु ची च्या एका विभागातल्या भुयारांत वेगळी फी भरून फिरता येते. फिरता म्हणण्यापेक्षा ओणव्याने चालता येते किंवा रांगता येते हे म्हणणेच जास्त खरे होईल...
(चित्र जालावरून साभार)
साधारण २० ते ३० मीटर जमिनीखाली आणि १०० ते १५० मीटर लांब जमिनीतल्या बिळातून फिरताना उंदीर आणि घुशींना काय वाटत असेल याचा अनुभव घेतला. काही ठिकाणी तर भुयार इतके अरुंद होते की, "जर इथे अडकून पडलो तर काय?" असा प्रश्न छातीवर दडपण आणत होता ! बाहेर पडून मोकळा श्वास घेतल्यावर नाही म्हटले तरी जरासे हायसे वाटलेच ;)...
व्हिएतनामी राईस पेपर
एका भागात एक महिला खास व्हिएतनामी "राईस पेपर" बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवत होती. हा तांदळाच्या पिठाचा अत्यंत पातळ, अगदी पारदर्शक असलेला साधारणपणे फेणीसारखा पदार्थ आहे. याचा उपयोग अनेक प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी व्हिएतनामी स्प्रिंगरोल्स बनवायला (गुंडाळायला) करतात...
.
जवळच असलेल्या उपाहारगृहात चहा आणि कंदमुळांचा व्हिएतकाँगी अल्पोपाहार केला...
(सागर आणि मार्गदर्शक डाँग)
बरेच चालणे, भुयारातले रांगणे, नेमबाजी, इ ने आलेला थकवा थोडासा दूर झाला आणि व्हिएतनामी लोकांच्या कल्पकतेला आणि लढाऊपणाला सलाम करत परतीच्या मार्गाला लागलो.
(क्रमशः )
==================================================================
चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...
====================================================================
प्रतिक्रिया
6 Dec 2013 - 12:55 am | आनन्दिता
अफलातुन आहे सगळं....
6 Dec 2013 - 1:00 am | रेवती
बापरे! सगळेच अजब आहे. अगदी पहिल्यांदा बंद असलेले भुयाराचे दार ओळखूही आले नाही. गनिमी कावा म्हटले की शिवाजीमहाराजांच्या लढायांची आठवण होते. या लोकांनी केलेल्या युक्त्याही त्यावेळेसाठी नाविन्यपूर्ण होत्या असे म्हणावे लागेल. अशा भुयारांमध्ये दिवसेंन दिवस लपून राहणे सोपे नाही. मला सबवे ट्रेन स्टेशनलाही 'कधी एकदा बाहेर येईन' असे होते. फोटू व माहिती भरपूर आहे. छान.
6 Dec 2013 - 5:45 am | खटपट्या
व्हिएत्नाम ने शिवाजी महाराजान पासूनच स्फूर्ती घेवून युद्ध लढले. त्या देशाचे पंतप्रधान जेव्हा भारत भेटीवर आले होते तेव्हा त्यांनि रायगडावरील महाराजांच्या समाधीला भेट दिली होती. आणि तेथील माती ते व्हिएतनाम ला घेवून गेले होते. त्यांचे शब्द होते "असा राजा आमच्याकडे असता तर आम्ही जगावर राज्य केले असते"
7 Dec 2013 - 11:04 am | मृत्युन्जय
ही कुणाच्यातरी सुपीक डोक्यातुन निघालेली दंतकथा आहे. निखालस खोटी.
20 Dec 2013 - 2:28 am | मोदक
निनाद बेडेकर / अविनाश धर्माधिकारी यांच्या "ऑपरेशन एंटबे" च्या व्याख्यानात अवांतर होवून "शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेवून व्हिएतनाम वॉर लढल्याचे त्यांच्या राष्ट्राध्यक्षाने एके ठिकाणी मत नोंदवल्याचा" उल्लेख आला आहे.
रायगडावरील माती तिकडे गेली की नाही याचा उल्लेख आठवत नाहीये.
6 Dec 2013 - 4:30 am | स्पंदना
तुम्ही दोघी तिकिट काढल का?
टण टण!!
6 Dec 2013 - 5:02 am | रुस्तम
टण टण!!
6 Dec 2013 - 6:20 am | जेपी
भन्नाट .
चला चला .
6 Dec 2013 - 9:05 am | सुधीर कांदळकर
युद्धस्य कथा रम्या हे इथे तंतोतंत खरे ठरले.
एका पुस्तकाच्या लेखकाने जमिनीतून उगवल्यासारखे व्हिएतकाँग गनिम अचानक प्रकट होतात असे आश्चर्य व्यक्त केले होते. त्यामागील रहस्य आता तुमच्या लेखातून कळते आहे. जाता जाता व्हिएतकाँगच्या कल्पकतेची आणखी एक गंमत.
व्हिएतकाँगनी पाडलेल्या अमेरिकन हेलिकॉप्टरचा अभ्यास केला. झाडावर लपून भिरभिरणार्या अमेरिकन हॅलिकॉप्टर्सची फक्त क्लच व्यवस्था कशी निकामी करायचे याचे तंत्र विकसित केले. मग दुरुस्त करून तीच हेलिकॉप्टर्स इंधन संपेपर्यंत लढाईतल्या अतिमहत्त्वाच्या कामांना वापरली. हे तंत्रज्ञान त्यांना चीनने दिले आणि ती हेलिकॉप्टर्स मादक पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरून ते मादक पदार्थ अमेरिकन सैनिकांनाच विकले अशी अमेरिकन टिप्पणी त्याच पुस्तकात बर्याच वर्षापूर्वी वाचल्याचे आठवते.
असो. मनोरंजक आणि अमूल्य माहिती आणि वाचनस्मृतींना उजाळा दिलात. अनेक अनेक धन्यवाद.
6 Dec 2013 - 9:10 am | अत्रुप्त आत्मा
6 Dec 2013 - 11:13 am | अविनाश पांढरकर
अफलातुन आहे सगळं....
6 Dec 2013 - 12:24 pm | अनिरुद्ध प
सुन्दर सफर चालली आहे,बाकी भुयारातुन जातानाचा जम्मु कटरा येथिल शिवखोरि गुहेची आठवण झाली,पु भा प्र.
6 Dec 2013 - 12:39 pm | दिनेश चिले
फारच छान सफर. पुलेशु.
6 Dec 2013 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
आनन्दिता, रेवती, खटपट्या, aparna akshay, तथास्तु, सुधीर कांदळकर, अत्रुप्त आत्मा, अविनाश पान्धरकर, अनिरुद्ध प आणि दिनेश चिले : कु ची भुयारांत तुमचे स्वागत आहे ! धन्यवाद !
6 Dec 2013 - 2:43 pm | प्रचेतस
सुरेख.
अशाच प्रकारचे भुयार नुकत्याच आलेल्या वूल्वरीन मध्ये पाहिले होते त्याची आठवण झाली.
6 Dec 2013 - 2:47 pm | लव उ
व्हिएतकाँगचे सापळे तर एकदम भन्नाट... मजा आलि तुमच्या बरोबर सफरिला....
6 Dec 2013 - 2:53 pm | परिंदा
सहीच्च!!
एक्का साहेब तुमच्यामुळे आम्हाला असा घर(ऑफिस)बसल्या वेगवेगळ्या स्थळांची सैर होतेय. खुप खुप आभार!
माझ्यामते हा भाग तर विएतनाम सहलीचा यु.एस. पी. च आहे.
त्या राईसपेपर सारखाच "पुतारेकू" नावाचा पदार्थ आंध्रामध्ये बनवतात. त्यात साखरेचे सारण भरुन गुंडाळी करतात.
6 Dec 2013 - 2:54 pm | परिंदा
त्या सहल कंपनीचे नाव दिले तर बरे होईल. जर कोणाला अशी सहल करायची असेल, तर त्या कंपनीला वगळता येईल.
6 Dec 2013 - 4:21 pm | प्यारे१
नेहमीप्रमाणेच छान.
ह्या सगळ्या लढाईमध्ये सर्वसामान्य माणसाचं जीवन 'बोंबललं' असणार ना?
ना शिक्षण, ना स्थैर्य, ना विकास.
तथाकथित विकसित देश इतर देशांना अविकसित म्हणताना ते अविकसित का राहतात ? की मुद्दाम ठेवले जातात?
लढाईग्रस्त जीवन हा विकासाच्या अडथळ्यातला एक महत्त्वाचा घटक असू शकतो हे सप्रमाण सिद्ध होतंय.
लढाई जिंकले तरी अनेक वर्षं लढाईत गेल्यानं किमान तेवढ्या कालावधीचा बॅकलॉग राहणारच की.
6 Dec 2013 - 6:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत. पण तरीसुद्धा व्हिएतनामने बेचिराख झालेला देश परत उभारून आता ज्या स्थितिला आणला आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नसते तर विश्वास बसला नसता. याबाबत जरा सविस्तर मी अगोदरच्या भागातील प्रतिसादात येथे लिहिले आहे.
6 Dec 2013 - 4:53 pm | अनन्न्या
युद्धभूमीचे वर्णनही मस्त!
6 Dec 2013 - 6:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
वल्ली, लव उ, परिंदा, अनन्न्या : अनेक धन्यवाद !
6 Dec 2013 - 7:55 pm | मी पुणेरी
व्हिएतनामि लोक ग्रेट म्ह्टली पहिजेत.
7 Dec 2013 - 10:44 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
8 Dec 2013 - 12:41 pm | पैसा
या भुयारांबद्दल (डिस्कव्हरी चॅनेलवर बहुधा) एक फिल्म बघितली होती तिची आठवण झाली. जबरदस्तच! काश्मिरातले अतिरेकी वगैरे असली युद्धतंत्र वापरत नाहीत हे नशीबच म्हणायचं!
8 Dec 2013 - 1:09 pm | दिपक.कुवेत
माहिती अत्यंत रोचकपुर्ण.......त्या टोकदार सळ्यांवर पडल्यावर काय होत असेल ह्याची कल्पना करुनच अंगावर शहारे येत आहेत.
8 Dec 2013 - 4:10 pm | भाते
सफर सुरेख चालली आहे. आधीच्या भागातले ते युद्धाचे वर्णन वाचुन अंगावर काटा आला होता.
9 Dec 2013 - 12:25 am | डॉ सुहास म्हात्रे
पैसा, दीपक दांडेकर आणि भाते : व्हिएतनाम युद्धाबद्दल त्याच्या वेगळेपणामुळे फार कुतूहल होते. त्यामुळे त्याच्या खाणाखूणा प्रत्यक्ष पाहणे हा एक अविस्मरणिय अनुभव होता.
9 Dec 2013 - 10:14 pm | ज्ञानव
जशी शिरीष कणेकर ह्यांच्या लेखांची मी वाट पाहत असे तशीच तुमच्याही लेखांची मी आवर्जून वाट पाहत असतो. इतके सुंदर कसे लिहिता थोडे मलाही शिकवाच.खूपच छान लिखाण
10 Dec 2013 - 12:24 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या सुंदर प्रतिसादाबद्दल काय म्हणावे ! तुमच्यासारखे रसिक वाचक वाचतात म्हणूनच चार शब्द खरडायला मजा येते !
10 Dec 2013 - 4:01 am | अर्धवटराव
काय चिकाटी आहे राव त्या सैनीकांची... मानलं पाहिजे.
प्रवासवर्णन त्या स्थळाच्या वैशिष्ट्याबरहुकुम कसं करावं याचा उत्तम नमुना म्हणजे हा भाग.
भारी हो एक्काशेठ.
10 Dec 2013 - 9:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
14 Dec 2013 - 11:41 pm | बॅटमॅन
आज वाचू उद्या वाचू करत लै वेळ गेला मग एकदाचे वाचून काढले सर्व भाग, अन नेहमीप्रमाणेच प्रचंड आवडले. युद्धस्य कथा रम्या म्हणतात ते खरेच. एकीकडे व्हिएतकाँगी सैनिकांच्या शौर्याला अन कल्पकतेला सलाम करावासा वाटतो तर दुसरीकडे आम्रिकेच्या क्रौर्यापुढे मान खाली जाते. पण लै चिवट लोकं बॉ! मानलं आपण.
प्रचंड मोठ्या शक्तिशाली सत्तेला तोंड देऊन आपले वेगळे अस्तित्व यशस्वीपणे कायम राखल्याची जगात आजवर तीनच उदाहरणे आहेत : इसपू ४९०-४७० सालांत पर्शियन साम्राज्याविरुद्ध लढलेला ग्रीस, सतराव्या शतकात मुघलांविरुद्ध लढलेला महाराष्ट्र अन विसाव्या शतकात अमेरिकेविरुद्ध लढलेला व्हिएतनाम.
हा देश नक्की म्हणजे नक्कीच पाहणार!!! आता इथे जाण्याची इच्छा प्रचंड बळावलीये!
15 Dec 2013 - 12:39 pm | विजुभाऊ
व्हीएतनाम युद्धाने अमेरीका पार जेरीस का आली असावी हे पटण्यासारखे आहे.
व्हिएतनामी जनतेची कमाल म्हणायची. पण तुमचीही कमाल आहे. खूप मस्त माहिती मिळाली
15 Dec 2013 - 1:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
बॅटमॅन आणि विजूभाऊ : अनेक धन्यवाद !
केवळ एका जर्मन सहकार्याने केलेल्या स्तुतिवरून हा देश सहलिच्या यादित आला होता. पण आता नक्कीच असं वाटतय की जर तिथे गेलो नसतो तर माझ्या सहलित एक मोठी उणिव राहिली असती. शिवाय जनता अशी की काही काळापूर्वी सर्वस्व बेचिराख झाले होते त्याची आठवण किंवा खंत कोणाच्याही बोलण्यात (अगदी गाईडच्याही) नव्हती... सतत हसतमुख आणि मैत्रीपूर्ण व्यवहार ! फारशी अपेक्षा न घेता जावून भरपूर काही बघून-शिकून आलेल्यापैकी प्रथम क्रमांकाचा अनुभव ! परत जायची संधी आली तर सोडणार नाही असा देश.