चला व्हिएतनामला ०९ : मेकाँगचा त्रिभूज प्रदेश आणि विन् त्रांग पॅगोडा

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
19 Dec 2013 - 11:18 pm

==================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

...हा अचानक समोर असलेला उद्याचा टेट समारंभ कसा असेल बरे असा विचार करत आनंदाने बिछान्याला पाठ टेकवली.

आजचा दिवस जरा कुतूहलानेच उजाडला कारण भौगोलिक आणि ऐतिहासिक कारणांसाठी प्रसिद्ध असलेल्या मेकाँग नदीच्या त्रिभुज प्रदेशाची सफर करायची होती. न्याहारी करताना खिडकीतून खाली चाललेल्या टेट पुष्पप्रदर्शनाच्या तयारीकडे नजर गेलीच...

व्हिएतनामचा अतीदक्षिण भाग मेकाँग नदीच्या त्रिभुज प्रदेशाने बनलेला आहे. ३९,००० चौ किमी क्षेत्रफळाचा इसवी सनापूर्वीपासून वसलेला हा भाग प्राचीन काळातील व्यापाराचे एक मध्यवर्ती ठिकाण आणि अनेक समृद्ध राज्यांची परंपरा असलेली भूमी आहे.


(नकाशा जालावरून साभार)

सुरुवातीला शहरराज्ये असलेल्या या प्रदेशात तिसर्‍या शतकात फुनान साम्राज्य स्थापन झाले. फुनान साम्राज्याची स्थापना कौडिण्य नावाच्या एका दक्षिणेकडून आलेल्या राजपुत्राने स्थानिक नाग वंशाच्या राजकन्येशी विवाह करून केली अशी एक दंतकथा आहे. तेथली संस्कृती मुख्यतः स्थानिक आणि भारतीय कल्पनांवर आधारीत होती. फुनान साम्राज्यातले लोक अनेक वंशांचे असावेत आणि चंपा साम्राज्याप्रमाणेच फुनान राज्यांच्या राजधान्यांची नावे भावपूर, आनंदितापूर, श्रेष्ठपूर, व्याधपूर अशी होती. राजदरबारात संस्कृत भाषा वापरली जात असे. एका राजघराण्याचे नाव पल्लव असे होते आणि त्याच्यावर संस्कृतमध्ये लिहिलेला पल्लवग्रंथ आजही उपलब्ध आहे. सुरुवातीची राजघराणी हिंदू होती आणि पाचव्या शतकानंतर बौद्ध धर्माचा प्रभाव सुरू झाला. प्रसिद्ध राजे/राजपुत्रांची कौडिण्य जयवर्मन, भरतवर्मन, श्रीइंद्रवर्मन, रुद्रवर्मन, गुणवर्मन अशी नावेही भारतीय संस्कृतीशी जवळीक दाखवतात.

सहाव्या शतकात या साम्राज्याचा ताबा चेन्ला सरदार घराण्यातील चित्रसेन नावाच्या सरदाराने घेतला आणि त्याने महेंद्रवर्मन या नावाने आपल्या राजघराण्याचा राज्यकारभार सुरू केला. त्यानंतरचा काळ बराच विस्कळित राजसत्तेत गेला असे दिसते आणि शेवटी नवव्या शतकाच्या सुरुवातीला हे साम्राज्य प्रबळ ख्मेर साम्राज्यात विलीन झाले.

चांदी, सोने, मोती आणि सुगंधी लाकडाच्या रूपात भरलेल्या कराच्या वर्णनावरून इथली राज्ये समृद्ध व्यापारी केंद्रे होती हे दिसते. प्राचीन चिनी लेखनातही फुनानी लोकांचा उल्लेख लाकडाच्या खांबांवर उंचावर बांधलेल्या घरात राहणारे, भातशेती करणारे आणि सोने, चांदी, हस्तिदंत आणि परदेशी आकर्षक (exotic) प्राण्यांच्या भेटी देणारे असा केलेला आहे. मलाक्का सामुद्रधुनीपासून दक्षिण चीनपर्यंत प्रभाव राखून या साम्राज्याने भारत-चीन व्यापार पूर्णपणे ताब्यात ठेवला होता. त्याची स्वतःची स्थानिक पक्षांची (क्रेस्टेड अर्गस, हंस) चित्रे असलेली नाणी होती.

ह्या लोकांच्या संगीत परंपरेचा उल्लेख चिनी दस्तावेजात सापडतो. इ स २६३ मध्ये भेट देणार्‍या फुनानी कलाकारांचे संगीत चिनी सम्राटाला इतके आवडले की त्याने चीनमधील नानकिंगमध्ये फुनानी संगीताची प्रशिक्षण संस्था स्थापन केली. फुनानी लोक साहित्याचे चाहते होते आणि त्यांच्या सर्व साम्राज्यभर अनेक पुस्तक भांडारे (book collections and archives) विखुरलेली होती. मद्रसेन आणि संघबर या नावाच्या दोन फुनानी बौद्ध भिख्खूंनी पाचव्या-सहाव्या शतकात चीनमध्ये कायम वास्तव्य करून अनेक संस्कृत आणि प्राकृत बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले. यात महाप्रज्ञपरमिता मंजुश्रीपरिवर्ता सूत्र हा बोधिसत्व मंजुश्री यांच्या जीवनावरचा ग्रंथ महत्त्वाचा समजला जातो.

याशिवाय प्राचीन काळापासून सुपीक शेतीचा हा प्रदेश आजही व्हिएतनामच्या २५% शेतमालाचे उत्पादन करतो. तर मासेमारीत तो व्हिएतनाममध्ये सर्वप्रथम आहे.

अश्या समृद्ध इतिहासामुळे आणि त्याच्या सौंदर्याबद्दलच्या ख्यातीमुळे हा प्रदेश बघण्याची खूप इच्छा होती.

हो ची मिन् शहराच्या बाहेर पडल्यावर प्रथम दर्शन झाले ते मेकाँगच्या सुपीक, सपाट आणि भाताच्या खाचरांनी हिरवेगार झालेल्या खोर्‍याचे...

कोंकणाची आठवण यावी असाच हा प्रदेश आहे...

.

आश्चर्य म्हणजे नवीन लावणी केलेली आणि कापणी केलेली भाताची शेते बाजूबाजूला असलेली पहायला मिळाली. मार्गदर्शकाला विचारले तर "त्यात काय नवीन?' असा भाव त्याच्या चेहर्‍यावर होता. मात्र या पलीकडे जास्त काही तो सांगू शकला नाही...

प्रदेश बर्‍यापैकी समृद्ध दिसत होता...

साधारण तासाभराच्या प्रवासाने आम्ही त्रिभुज प्रदेशाच्या बेटांच्या सफरीसाठी बोटींचा धक्का असलेल्या माय थो नावाच्या बंदरावर पोहोचलो...

मेकाँगच्या नदिच्या समुद्राला मिळण्याअगोदर विभागलेल्या उपप्रवाहांमुळे तयार झालेली ही बेटे एकमेकाच्या बरीच जवळ आहेत. पण तरीसुद्धा बेटाबेटावरील लोकांनी अजूनही त्यांचे सांस्कृतिक वेगळेपण राखून ठेवले आहे. व्हिएतनाम सरकारनेही या कामी त्यांना सहकार्य देऊन त्या वैशिष्ट्यांचा पर्यटनासाठी उपयोग करून स्थानिक रोजगार निर्माण केला आहे...

तर चला जाऊया त्या बेटांच्या सफरीला. बंदर सोडून आमची बोट मेकाँगमध्ये मार्गक्रमण करू लागली तेव्हा झालेले हे बंदराचे दर्शन...

.

बेटे जोडून दळणवळणाची सुविधा वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बांधलेला पूल...

आम्ही त्या बेटांपैकी सर्वात मोठ्या युनिकॉर्न बेटाला भेट द्यायला गेलो. बेटावरचा माहोल (माणसांची चेहेरपट्टी सोडून) साधारण कोंकणात शोभावा असाच होता...

तेथे प्रथम आमचे एका दुकान-कम-रेस्तराँमध्ये चहा, स्थानिक फळे आणि त्यापासून बनवलेली पेये व खाद्यपदार्थ देऊन स्वागत केले गेले...

नंतर एका स्थानिक अजगराशी ओळख करून दिली. अजगरराव अगदी मनमोकळे आणि खेळकर होते...

.

बेटावरच्या फेरफटक्याची काही चित्रे...

.

स्थानिक चॉकलेट कुटिरोद्योगात काम करणार्‍या महिला...

स्थानिक फळे...

.

.

बेटावर असलेल्या अनेक ओहोळांना पार करण्यासाठी असे लाकडी-बांबूचे पूल जागोजाग होते...

बेटाची बरीच भटकंती झाल्यावर अर्थातच थोडीफार भूक लागली होतीच. त्याच सुमारास एका खास मंडपात पोहोचलो. तेथे आमचे परत स्थानिक चहा व फळे देऊन स्वागत केले गेले...

प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एका छोटासा स्थानिक कलाकारांच्या गायन-वादनाचा कार्यक्रमही झाला ...

मग आम्ही निघालो युनिकॉर्न बेटावरच्या जलप्रवाहातून छोट्या होड्यांतून सफर करायला...

.

.

पंधरा वीस मिनिटे आम्हाला बेटावरच्या जलप्रवाहांत फिरवून होडी आम्हाला खुल्या समुद्रात आमच्या मोठ्या बोटीपर्यंत घेऊन आली...

युनिकॉर्न बेटाचा निरोप घेऊन नारळाच्या पाण्याचा आस्वाद घेत आम्ही परत माय थो च्या दिशेने प्रवास सुरू केला...

==================================================================

विन् त्रांग मंदिर (Vĩnh Tràng Temple)

परतताना वाटेत या भागातल्या प्रसिद्ध विन् त्रांग मंदिराचा थांबा घेतला. दोन हेक्टरवर बांधलेले हे बुद्धमंदिर या भागातले एक मुख्य पर्यटन आकर्षण आहे. या १९ व्या शतकात बांधलेल्या मंदिराचे लढाई व इतर कारणांनी अनेकदा नुकसान झाले आहे. पण दर वेळेस त्याचा जीर्णोद्धार करून त्याला अधिक सुंदर बनवले गेले आहे.

मंदिराचे सुंदर कोरीवकामाने सजलेले भव्य प्रवेशद्वार...

देवळाचे दर्शनी प्रांगण अनेक फुलझाडांच्या रचनांनी सजवलेले आहे...

.

सर्व मंदिर वेगवेगळ्या कलाकुसरीने मढलेले आहे...

मंदिराच्या चारी बाजूस जल, पाषाण आणि वनस्पतींच्या आकर्षक रचना आहेत...

.

मंदिराच्या मुख्य भागात बुद्धाच्या अनेक अवतारांचे, अरिहंतांचे आणि बोधिसत्वांचे पुतळे आहेत...

 ...

 ...

या मंदिराच्या आवारात बुद्धाच्या दोन प्रचंड आकाराच्या मूर्ती आहेत. त्यातली एक बसलेल्या अवस्थेतल्या हसणार्‍या बुद्धाची (लाफिंग बुद्ध) आहे...

तर दुसरी मूर्ती उभ्या अवस्थेतील बुद्धाची आहे...

एक फार सुंदर बुद्धमंदिर पाहून मन प्रसन्न झाले. मात्र मंदिर बघण्यात गुंग झाल्याने विसरलेल्या पोटात आता कावळे ओरडू लागले होते. मार्गदर्शकाला याची कल्पना होतीच. त्याने स्वतःहून आपण या विभागातल्या एका सुंदर रेस्तराँमध्ये चाललो आहोत हे जाहीर करून आम्हाला दिलासा दिला. यावेळचे जेवण स्थानिक कंपनीतर्फे होते आणि व्हिएतनाम सहलीतले त्यांच्यातर्फे असलेले शेवटचे जेवण होते. रेस्तराँ खरंच एकदम निसर्गसुंदर भागात होतेच पण खुद्द रेस्तराँ म्हणजे एक बागच होती...

रेस्तराँचा आमच्यासाठी निवडलेला मेन्यु...

एक जेवण शाकाहारी आणि दुसरे मांसाहारी मागवले, त्यामुळे सगळे पदार्थ चाखता आले. परत एकदा व्हिएतनामी पाककलेने खूश केले. सांगण्यासारखे पदार्थ म्हणजे तळलेला हस्तीकर्णी मासा (एलेफंट इयर फिश) आणि चिकट भाताचा तळलेला चेंडू (फ्राईड स्टिकी राईस बॉल) ह्या खास व्हिएतनामी खासियती होत्या...

जेवण झाल्यावर अश्या नयनरम्य रेस्तराँमध्ये एक फेरी मारण्याचा मोह होणारच की नाही?...

.

.

.

रेस्तराँच्या बागेची निगा राखणार्‍या एका कर्मचार्‍याबरोबर...

हॉटेलवर परतेपर्यंत दिवस मावळला होता...

आज बर्‍यापैकी धावपळ झाली होती. पण आराम करायला वेळ नव्हता. ताबडतोप गरमागरम शॉवर घेऊन तरतरीत झालो आणि बाहेर पडलो. आज हो ची मिन् चे जगप्रसिद्ध टेट पुष्पप्रदर्शन पहायचे होते ना !

(क्रमशः )

==================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

19 Dec 2013 - 11:25 pm | यसवायजी

अत्युत्तम..

सर्व जगभर संचार करून मराठी वाचकांना मोलाची माहिती सुरस वर्णनांतून आणि नयनमनोहर प्रकाशचित्रांतून पावती करत आहात, ही तर मोठीच भाग्याची गोष्ट आहे! ही सर्वच माहिती मराठी माणसाला मोठे करणारी, प्रगल्भ करणारी ठरेल ह्यात मुळीच संशय नाही.

असेच संचार करत राहा. अशीच सुरस प्रवासवर्णनेही लिहा! त्याकरता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 10:39 am | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद ! या लेखांच्या निमित्ताने काही मराठी माणसांना जगाची थोडीबहुत ओळख झाली आणि त्यांचे मनोरंजन झाले तर माझे हे खरडणे कामी आले असेच समजेन.

स्थानीक फळांमध्ये फणसासारखे दिसते आहे ते डुरीयन आहे का..?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 10:21 am | डॉ सुहास म्हात्रे

होय. ते डुरीयन किंवा ब्रेडफ्रूट नावाचे फणसासारखे दिसणारे फळ आहे. उत्तरपूर्वेत आणि पॉलिनेशियात याच्या अनेक जाती सापडतात. तिकडे ते फार आवडते फळ समजले जाते. मात्र चविला बरे असले तरी त्याचा गंध मात्र फार भयंकर असतो ! सिंगापूर मास रॅपिड ट्रन्झिटवरचा हा फलक बोलका आहे !...

मोदक's picture

20 Dec 2013 - 3:29 pm | मोदक

धन्यवाद.

अनेक हॉटेलमध्ये पण हे न्यायला बंदी असते.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2013 - 12:35 am | अत्रुप्त आत्मा

लै लै भारी...

ती लालकाजूफळं बघून लै लै भूक लागली!

आनन्दिता's picture

20 Dec 2013 - 1:02 am | आनन्दिता

ती लाल फळं मी जमैका मधे असताना खाल्लीयेत.. तिथे त्यांना जमैकन अ‍ॅपल म्हणतात... व्हियेतनाम मधे काय म्हणतात ....?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 10:30 am | डॉ सुहास म्हात्रे

अत्रूप्त आत्मा आणि आनंदिता : ती लालभडक रंगांची फळे म्हणजे कोकणातल्या हिरव्या रंगांच्या जांभ फळांचीच एक जात वाटली. तिकडे त्यांना इंग्लिशमध्ये Waterapple आणि व्हिएतनामीजमध्ये Roi किंवा Mận म्हणतात.

प्यारे१'s picture

20 Dec 2013 - 12:41 am | प्यारे१

हजर!
आम्ही पण फिरतोय तुमच्याबरोबर!

रेवती's picture

20 Dec 2013 - 1:02 am | रेवती

अगदी कोकणच वाटतेय. मोदक म्हणतोय तोच प्रश्न मला पडलाय. व्हिएतनामी फणस असावेत. ;)
मागे एकदा व आताही व्हेजीटेरियन लोकांची सोय कशी आहे ते दाखवल्याबद्दल आभार. मी तिथे जाईनच असे नाही पण माहिती हवी. सगळे फोटू अगदी हिरवे आलेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 10:47 am | डॉ सुहास म्हात्रे

फिराहो तुम्ही. असं जगाला घाबरून कसं चालेल. उलट आपण जगाला घाबरवून सोडायला पाहिजे ;) मी आतापर्यंत सगळीकडे गुरुवार आणि शनिवार मांसाहार करत नाही आणि बीफ तर अजिबात खात नाही असे सुरुवातीलाच जाहीर करून तशी सगळी सोय करण्याची अट कबूल करून घेतो... आणि लोक कुरकुर न करता करतात. "आखीर ये बिझनेस है" आणि "कस्ट्मर इज किंग" :)

अभ्या..'s picture

20 Dec 2013 - 1:22 am | अभ्या..

एकच णंबर. मस्त फोटोग्राफ.
धन्यवाद एक्कासाहेब

जेपी's picture

20 Dec 2013 - 5:43 am | जेपी

नेहमीप्रमाणे अप्रतिम .

सुधीर कांदळकर's picture

20 Dec 2013 - 8:42 am | सुधीर कांदळकर

मेकाँग डेल्टा नक्कीच करता येईल.

मस्त सफर.
पुभाप्र,

धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 10:32 am | डॉ सुहास म्हात्रे

जरूर करा. हो ची मिन् शहर आणि आजूबाजूच्या प्रदेशात बघण्यासारखे बरेच काही आहे. तुमच्या सुखद प्रवासासाठी शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 10:36 am | डॉ सुहास म्हात्रे

अरेच्या तुमच्या प्रतिसादाचे शिर्षक न वाचताच मुख्य भाग वाचला आणि प्रतिसाद दिला :). कोकणचा मेकाँग डेल्टा काय कॅलिफोर्नियाही करता येईल. फक्त लोकांमध्ये जागृती आणि नेत्यांमध्ये राजकीय इच्छाशक्ती पाहिजे... आणि घोडं तिथेच पेंड खातयं :(

सौंदाळा's picture

20 Dec 2013 - 10:30 am | सौंदाळा

व्हिएतनाम सफरीचा आतापर्यंत सगळ्यात आवडलेला भाग आणि फोटो.
दिल बाग बाग हो गया. :)
लाल फळ म्हणजे काजुच्या बोंडांसारखे असावे का जामसारखे? कोकणातले जाम पांढरे असतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे

यसवायजी, प्यारे१, अभ्या.., तथास्तु आणि सौंदाळा : धन्यवाद !

मृत्युन्जय's picture

20 Dec 2013 - 12:01 pm | मृत्युन्जय

मस्त होती आजची सफर. व्हिएतनाम सारखा छोटा देशही पर्यटनाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे आहे हे जाणवले.

भाते's picture

20 Dec 2013 - 12:13 pm | भाते

फोटो आणि वर्णन दोन्हीही सुरेख आहे. मनापासुन आवडले.

फळांच्या दुसर्‍या चित्रात एक लाल फळ दिसतेय ते रातांब्यासारखे दिसतेय आणि तिसर्‍या चित्रात तर पपनसासारखे काहीतरी दिसतेय.

खरंय कोकणचा कॅलिफोर्निया नाही झाला तरी चालेल पण निदान मेकाँगचा डेल्टा झाला तरीही खुपच! :)

एक्का साहेब,

तुमची प्रवासवर्णने जाम भारी असतात, एकतर वेगवेगळे देश, त्यांच्या संस्कृति, चालीरिती आणि खाद्यपदार्थ सगळे काही बघायला मिळते. वाचत असताना तर असे वाटते की आपणच खुद्द ती ट्रिप करत आहोत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते लाल फळ म्हणजे लाल रंगाचे जांभ आहेत. कोकणात ते हिरव्या-पोपटी रंगाचे असतात. पपनस बरोबर ओळखलात !

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

मृत्युन्जय आणि भाते: धन्यवाद !

अनिरुद्ध प's picture

20 Dec 2013 - 12:45 pm | अनिरुद्ध प

अप्रतिम सफर चालु आहे,बाकी दुरिआन ची माहिती आधीच पु ल च्या पुस्तकावरुन होतीच्,मात्र ती लाल फळे काजुच्या बोन्डासारखी दिसत आहेत.पु भा प्र.

प्रचेतस's picture

20 Dec 2013 - 1:00 pm | प्रचेतस

अतिशय देखणा धागा.
इकडून गेलेल्या हिंदू संस्कृतीबद्दल आपली चर्चा प्रत्यक्ष भेटीत झालीच होती त्याला परत उजाळा मिळाला.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Dec 2013 - 1:04 pm | llपुण्याचे पेशवेll

वाहवा वाहवा वाह्वा.

मालोजीराव's picture

20 Dec 2013 - 3:23 pm | मालोजीराव

मस्त फोटोज…एक्काकाका त्यांचा गोवा आहे काय हा ? बाकी एकंदर सगळ्या फोटोजवरून तिथली लोकसंख्या जास्त असावी असं वाटतंय

नित्य नुतन's picture

20 Dec 2013 - 3:36 pm | नित्य नुतन

एक लंबर .... भारी आवडेश ...*clapping*

नित्य नुतन's picture

20 Dec 2013 - 4:11 pm | नित्य नुतन

असं जगाला घाबरून कसं चालेल. उलट आपण जगाला घाबरवून सोडायला पाहिजे Wink

क्या बात ... क्या बात ... क्या बात
आमच्यासारख्या भिडस्त स्वभावाच्या पामरांसाठी हे वाक्य म्हणजे tonic आहे...

युगन्धरा@मिसलपाव's picture

20 Dec 2013 - 4:25 pm | युगन्धरा@मिसलपाव

खुप छान वर्णन केल आहे तुम्ही खरचं असेच फिरत रहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 4:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनिरुद्ध प, वल्ली, मालोजीराव आणि नित्य नुतन : धन्यवाद !

@ मालोजीरावः व्हिएतनामची प्रति किमी लोकसंख्या २६०; भारतः ३७०; जर्मनी : २२५; ब्रिटन : २५५.

चित्रगुप्त's picture

20 Dec 2013 - 6:54 pm | चित्रगुप्त

विन् त्रांग मंदिर फारच भावले.
घरबसल्या 'दुनियाकी सैर करलो' चा अनुभव तुमच्या सर्व लेखातून घेता येत आहे, ही फार आनंदाची गोष्ट. अनेक धन्यवाद.

इथलेच फोटो वाटले! विन त्रांग मंदिर अप्रतिम!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2013 - 1:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्त आणि अनन्न्या : धन्यवाद !

पैसा's picture

24 Dec 2013 - 4:14 pm | पैसा

लाल जांब गोव्यातही मिळतात. पण एका ठिकाणी रातांबे (कोकम) आणि मोठे आवळे दिसत होते. ब्रेडफ्रुट म्हणजे नीरफणस. पण ते आम्ही पिकलेले कधीच खाल्ले नाहीत. कच्चेच नेहमी भाजी, काप वगैरेसाठी वापरतो.

तिथले पल्लव घराणे आणि चेन्ला (चोला?) घराणे दक्षिण भारतातल्या घराण्याशी संबंधित असावीत का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Dec 2013 - 5:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

तिथले पल्लव घराणे आणि चेन्ला (चोला?) घराणे दक्षिण भारतातल्या घराण्याशी संबंधित असावीत का? नक्की माहित नाही पण असल्यास आश्चर्य वाटणार नाही कारण त्यांचा भारतापासून चीनपर्यंतच्या व्यापारावर ताबा होता आणि त्यांचा धर्म हिंदू होता. भारतिय पल्लवांशी (२ रे ते ९ वे शतक) आणि चोलांशी (इ स पूर्व ३ रे शतक ते इ स १३ वे शतक) मेकाँग पल्लवाचा काळ जुळतो पण त्यांचा नक्की काय संबंध ते मात्र माहित नाही. एखादे अंगिकृत राज्य असण्यापेक्षा एखादा शूर राजपुत्र / सेनापतीपुत्र / व्यापारी तेथे जावून नंतर राजसत्ता स्थापन केल्याची जास्त शक्यता वाटते. सततचा व्यापारी संबंध असल्याने भाषा (संस्कृत) व धर्म ( प्रथम हिंदू आणि नंतर बौद्ध) प्रचारात आले आणि राहिले असणार.

ब्रेड फ्रूटला भयंकर वास असतो. ते दक्षिणपूर्वेत बर्‍याच ठिकाणी दिसते पण इतर ठिकाणी तसे वास असलेले फळ दिसले नाही. मात्र पॉलिनेशियन सफरीत महत्वाचे टिकावू अन्न म्हणून त्याचा बराच वापर व प्रसार झाला आहे. त्यामुळे ते फळ अतिदक्षीणेस (आणि म्हणून थंड हवामान) असणार्‍या न्युझिलंड आणि इस्टर आयलँड सोडून सगळीकडे सापडते.