युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-३
नागुमोच्या इच्छेविरुद्ध जपानची युद्धाकडे वाटचाल चालूच होती. जुलैच्या शेवटी जपानने फ्रेंच चायना आपल्या संरक्षणाखाली आणला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याला उत्तर म्हणून जपानची अमेरिकेतील मालमत्ता गोठविली व जपानच्या जहाजांना अमेरिकेच्या बंदरात माल उतरवण्यास बंदी घातली. तेही कमी म्हणून जपानला लोहखनिज व इंधन निर्यात करण्यावरही बंदी आणली. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन व नेदरल्ंडनेही अशीच कठोर पावले उचलली. या कारवाईने जपानच्या उद्योगाची घुसमट व्हायला लागली. जपानमधील वृत्तपत्रात बातम्या झळकू लागल्या ‘आर्थिक युद्ध चालू झाले आहे. पुढे काय होणार आहे याचा अंदाज बांधणे फारसे कठीण नाही’.
सप्टेंबर ६ तारखेला जपानच्या बादशहाने, शोवा घराण्याचा सम्राट हिरोहितोने या गंभीर परिस्थितीचा परामर्श घेण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक बोलविली. त्याच्या महालात पूर्वेच्या १ नंबरच्या खोलीत मोठ्या गंभीर वातावरणात ही बैठक चालली होती. बैठकीची सुरवात पंतप्रधान फुमिमारो कोनोयेने ‘या परिस्थितीतील राष्ट्रीय धोरण’ स्पष्ट करुन केली. त्यातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे -
१ जपानच्या आर्थिक धोरणांच्या संरक्षणासाठी देश अमेरिका, ब्रिटन व नेदरलंड या देशांबरोबर युद्धाची जोखीम उचलायला तयार आहे. अशा युद्धाची तयारी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
२ तोपर्यंत जपान वाटाघाटींचे दरवाजे बंद करु इच्छित नाही.
पण जपानने या वाटाघाटींसाठी ज्या मागण्या पुढे ठेवल्या होत्या त्या जर मान्य झाल्या असत्या तर जपान एक सर्वशक्तिमान राष्ट्र झाले असते व पूर्वेत अमेरिका, ब्रिटन व नेदरलंड यांच्या उरावर बसले असते हे निश्चित.
पंतप्रधानांनंतर इतर नेत्यांनीही आपापले म्हणणे मांडून परिस्थितीचा आढाव घेतला. सगळ्यांचे एका गोष्टींवर मात्र एकमत झाले. जपानकडे जोपर्यंत कच्च्यामालाचा साठा आहे तोपर्यंत घाई करायला लागणार आहे कारण ब्रिटन व अमेरिकेने लादलेल्या अधिरोधामुळे या आवश्यक कच्च्यामालाचे पुनर्भरण करणे अशक्य आहे. उदाहरणार्थ जनरल सुझुकीने आता फक्त एक वर्ष पुरेल एवढाच इंधनाचा साठा शिल्लक आहे हे स्पष्टच सांगितले.
सरदार योशिमिची हारा याने सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून समारोपाचे भाषण केले. ‘आपण आत्ताच ऐकलेल्या राष्ट्रीय धोरणावर विचार केला तर असे वाटते आहे की यात युद्धावर जास्त भर दिलेला आहे व वाटाघाटींना दुय्यम स्थान दिले आहे. वाटाघाटींनी प्रश्न सोडवायचे प्रयत्न चालू आहेत असे आम्ही समजायचे की नाही हे कळूदे !’ हा प्रश्न ऐकल्यावर तेथे क्षणभर शांतता पसरली. दुसऱ्याच क्षणी नौदलाचा मंत्री ॲडमिरल किशिरो ओईकावा घाईघाईने म्हणाला, ‘ते प्रयत्न चाललेच आहेत याची मी आपल्याला खात्री देतो.’ तो हे म्हणाला खरे पण त्याच्या बोलण्यात सारवासारवच जास्त होती. एवढ्यात एक अघटित घडले. स्वत: सम्राट हिरिहिटो त्या बैठकीला संबोधीत करायला उभा राहिला. असे आजवर कधीही झाले नव्हते. जपानच्या कुठल्याही सम्राटाने सभेला संबोधीत केले नव्हते. सर्वजण कानात जीव ओतून ऐकू लागले. त्याने त्याच्या खिशातून एक कविता काढली जिचे नाव होते ‘‘समुद्राचे चार किनारे’’. ही कविता त्याच्या आजोबांनी सम्राट मेईजी यांनी रचली होती. परंपरेच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या त्या उपस्थितांनी अत्यंत लक्षपूर्वक ऐकायला सुरवात केली.
‘‘सर्व मानव बांधव आहेत
तर आज लाटा का
उसळत आहेत?
वादळे का घोंगावत आहेत ?
हिरोहितोने उपस्थितांना सांगितले की ही कविता त्याने कालपासून अनेक वेळा वाचलेली आहे व त्याच्या आजोबांचे शांततेचे धोरण सध्याच्या परिस्थितीत का स्वीकारता येऊ नये हा खरा प्रश्न आहे. शांततेचा भंग करत चीफ ऑफ आर्मी जनरल स्टाफनेही ॲडमिरलचीच री ओढली पण त्याने हिरोहितोचे समाधान झालेले दिसले नाही. बैठक बरखास्त करण्यात आली. पंतप्रधान कोनोये नंतर म्हणाला ‘ही बैठक फारच तणावग्रस्त वातावरणात संपली. ( या सगळ्या मला वाटते सम्राटाला वाचविण्यासाठी पसरवलेल्या कहाण्या असाव्यात) जे मला वाटते आहे ते अनेकांना वाटते. अनेकांना वाटते की हिरोहितोला हे युद्ध थांबवणे सहज शक्य होते पण आपल्याला जपानमधील त्याच्या प्रतिमेची कल्पना येऊ शकत नाही. हिरोहितो जपानच्या सार्वभौमत्वाचे, शौर्यपरंपरेचे, एकतेचे प्रतिक होते. त्या प्रतिकाला धक्का लागणे याचा अर्थ जपानच्या समाजात दुफळी माजणे असाच होता. ते जर टाळायचे असेल तर वर उल्लेख झालेल्या बैठकीला जे हजर होते त्या सर्वांना जनतेसमोर त्यांच्यात कसलेही मतभेद नाहीत हे दाखविणे आवश्यक होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिरोहितोला पर्ल हार्बरवरील हल्ल्याची कल्पना या बैठकीच्यावेळी नव्हती. हे सर्वजण स्वत:च्या व देशाच्या भ्रामक प्रतिष्ठेच्या अतिरेकी कल्पनेने पछाडले होते असेच म्हणावे लागेल.
टोकियो येथील प्रसिद्ध नॅव्हल स्टाफ कॉलेजमधे दरवर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमधे बोटींच्या छोट्या प्रतिकृती घेऊन सागरीयुद्धाच्या सरावाचा खेळ चालत असे. यावेळी परिस्थिती लक्षात घेऊन त्या स्पर्धा/सराव सप्टेंबरमधेच घेण्यात आल्या. नॅव्हल जनरल स्टाफने मनाविरुद्ध, दबावाखाली या खेळात फर्स्ट फ्लीटला पर्ल हार्बरवरच्या हल्ल्याचे सैद्धांतिक प्रात्याक्षिक सादर करण्यास परवानगी दिली.
या योजनेवर अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या गेंडाने ओआहवरील आक्रमणासाठी तीन मार्गांचा विचार केला होता. एक दक्षिणेकडून, एक उत्तरेकडून व तिसरा त्या दोन्हीच्या मधून. ऊत्तरेचा मार्ग सगळ्यात कमी अंतराचा व तसा कमी वर्दळीचा होता. ॲडमिरल नागूमोने मात्र या मार्गावर त्या काळात हा समुद्र खवळलेला असतो म्हणून तो योग्य नाही अशी सूचना केली. त्यापेक्षा दक्षिणमार्ग ठीक राहील असे त्याचे मत पडले. ते ऐकल्यावर गेंडा म्हणाला, ‘ बरोबर ! मी हेच म्हणतो. तुला जर असे वाटत असेल तर अमेरिकेच्या आधिकाऱ्यांनाही तेच वाटण्याचा संभव आहे. ॲडमिरल नागूमोने त्या सरावात दक्षिणेचाच मार्ग वापरण्यास मान्यता दिली.
त्या फळ्यावरच्या सरावात पहिला हल्ला पारच फसला. रेड संघ जो अमेरिका म्हणून भाग घेत होता त्यांनी संरक्षणाचे ठरलेले डावपेच वापरुन हल्ल्याच्या दिवशी नागूमोचचे आरमार पहाटेच हेरले. नागूमोच्या विमानांना अमेरिकेच्या लढाऊ विमानांना तोंड द्यावे लागले. पंचांनी निकाल दिला की त्याचवेळी नागूमोची अर्धी विमाने खलास झाली आहेत. एवढेच नाही तर त्याच्या दोन विमानवाहू नौका बुडविण्यात आल्या आहेत व त्याच्या बऱ्याचशा आरमाराची मोडतोड झाली आहे असाही निर्णय देण्यात आला. अर्थात त्यांना दुसरी संधी देण्यात आली. दुसऱ्या फेरीत वर उल्लेख केलेल्याप्रमाणे उत्तर दिशेकडून हल्ला करण्यात आला. व यात जपानच्या संघाला बऱ्यापैकी यश मिळाले. पंचांनी मान्य केले की यात अमेरिकेचे प्रचंड नुकसान झालेले आहे व तुलनेने जपानच्या आरमाराचे काहीच नाही. पण आश्चर्य म्हणजे या योजनेला सगळ्यात जास्त विरोध झाला. याच्यात विनाकारण जास्त धोके पत्करायला लागणार असा एकंदरीत सूर होता. योजनेत लक्ष्यावर जास्त लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे असते. पराक्रम गाजवणे, शौर्य गाजवणे इ.इ. गोष्टी कमी महत्वाच्या असतात. सदर्न रिसोर्सेस एरियावाल्यांनी स्पष्टच सांगितले की या हल्ल्यात जपानचे नौदल अर्धमेले होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर सदर्न रिसोर्सेस एरिया प्रस्थापित करायला नौदलच उरणार नाही. बॅटलशिपच्या पाठिराख्यांचेही म्हणणे पडले की कमकुवत चिलखत असलेल्या विमानवाहू नौकांवर जास्त अवलंबून राहता येणार नाही.
मागे म्हटल्याप्रमाणे बॅटलशिपचे महत्व अजूनही तेच होते. सगळ्या देशांनी मोठमोठ्या बॅटलशिप बांधण्याचा नुसता सपाटाच लावला होता. यामामोटोची फ्लॅगशिप नागाटो ३३००० टनाची होती, दोस्तांची किंग जॉर्ज ३५००० टनाच्या आसपास होती अमेरिकेच्या व्हॅनगार्ड व निसोरी तर ४५,००० टनी होत्या. जपानच्या मुसाशी व यामाटो या नौका ६२,००० टनी होत्या व त्यांच्यावर नऊ १८.२ इंची तोफा बसविलेल्या होत्या. ही जहाजे १९४१/४२ सालात समुद्रात येणार असल्यामुळे बॅटलशिपची बाजू घेणाऱ्या नौदल अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता सागरी युद्धात त्यांच्या व्यूहनीतिविरुद्ध ते नौदलाच्या हवाईदलाचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. या सरावानंतर अशा ॲडमिरल्सच्या चार पाच तरी खाजगी बैठका झाल्या ज्यात त्यांनी पर्ल हार्बरच्या योजनेला सुरुंग लावायची कारस्थाने केली. दुर्दैवाने ते कोणासमोर उभे ठाकले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. यामामोटोचे सामर्थ्य जपानमधे कोणीही हेवा करावे असेच होते.
त्याचे व्यक्तिमत्व फारसे आकर्षक नसले तरी त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत करारी असा भाव असे. त्याची उंची फक्त पाच फूट तीन इंच होती पण त्याचे खांदे व स्नायू एखाद्या वृषासारखे होते. दृढनिश्चयी, आपले उद्दीष्ट गाठण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची तयारी हे त्याचे गुण होते. लहानपणी थंडीने झोप उडते व मन चांगले एकाग्र होते या कल्पनेमुळे तो अभ्यास करताना कपडे उतरवीत जात असे. कित्येक रात्री कडाक्याच्या थंडीत तो उघडा नागडा अलजिब्राचा अभ्यास करताना त्याच्या आईवडिलांना त्याच्या खोलीत आढळत असे. त्याचा आत्मविश्वास अमानवी होता.
त्याच्या योजनेविरुद्ध चाललेली कुरबुर त्याच्या कानावर पडल्यावर त्याने ११ ऑक्टोबरला त्याच्या ५० फ्लीट कमांडरांना नागाटोवर चर्चेसाठी पाचारण केले. दिवसभर पर्ल हार्बरच्या योजनेवर उलटसुलट चर्चा झाल्यावर संध्याकाळी डेकवर एक अनौपचारिक मेजवानी आयोजित केली गेली ज्यात सर्वांना आपली प्रामाणिक मते मांडण्याची सूचना करण्यात आली. या सूचनांची, टीकांची कुठेही नोंद होणार नाही अशी ग्वाही मिळाल्यावर एकामागे एक आधिकाऱ्याने या योजनेतील दोष सांगण्यास सुरवात केली. त्याची चिरफाडच केली म्हणाना ! तयारीसाठी पुरेसा वेळ नाही, खवळलेला समुद्र, इंधनाची व्यवस्था, रशियाकडे लक्ष द्यावे लागेल पासून अमेरिका आपल्याला जाळ्यात ओढत आहे असे सर्व मुद्दे मांडण्यात आले. ज्या ओनिशीने या योजनेत पहिल्यापासून भाग घेतला होता त्याने ही आपला विरोध दर्शविला. त्याच्या म्हणण्यानुसार विमानवाहू जहाजांची संख्या फारच कमी होती. सगळ्यात शेवटी नागूमोने सगळ्याचा गोषवारा सादर केला.
गेंडाने नंतर आठवणीत सांगितले, ‘सगळ्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना या योजनेला आता फार ऊशीर झाला होता असेच वाटत होते. अमेरिका आणि जपानमधील राजकिय संबंध इतके ताणले गेले होते की अमेरिकेलाही याची कल्पना आली असणार व त्यांनीही याची तयारी केली असणार त्यामुळे या योजनेत अनपेक्षित असे काही राहिले नव्हते असे सगळ्यांचे मत पडले.’
जहाजावरुन दिसणारा सूर्य समुद्रात बुडत असताना यामामोटो बोलायला उभा राहिला. तो शांतपणे पण ठामपणे बोलत होता. ज्या अडचणींचा पाढा वाचला गेला होता त्या सगळ्या अडचणी व धोक्यांचा अभ्यास करुन त्यावर उत्तरे शोधण्यात येतील असे आश्वासन त्याने तेथेचे दिले. जपानच्या दक्षिण विभागातील स्थैर्यासाठी हवाईवरचा हा हल्ला अत्यंत आवश्यक होता असे त्याने ठामपणे सांगितले. त्याने त्याच्या भाषणाचा स्मारोप ज्या वाक्याने केला ते फार महत्वाचे होते -
‘लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जपानचा कमांडर-इन-चीफ आहे तोपर्यंत पर्ल हार्बरवरचा हल्ला अटळ आहे’
हे वाक्य ऐकल्यावर त्या डेकवर शांतता पसरली. पाण्याचा व त्या जहाजाच्या इंजिनाचा आवाज सोडल्यास आता काहीही ऐकू येत नव्हते. त्या वाक्याने सगळ्यांच्या मनात ज्या काही शंका होत्या त्याची उत्तरे एकदमच मिळाली. तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक आधिकाऱ्याला पक्के माहीत होते की यापुढे कसलीही तक्रार चालणार नव्हती. जपानच्या युद्धात त्या सगळ्यांना एकजुटीने भाग घ्यावा लागणार आहे. काहींनी तर म्हटले आहे ‘त्या क्षणी आमच्या डोक्यात या हल्ल्यासंदर्भात काम सुरु झालेसुद्धा !‘
हे सगळे खरे असले तरीही नॅव्हल जनरल स्टाफ अजूनही या योजनेविरुद्ध होता. हाताखालच्या आधिकाऱ्यांना आदेश देणे ही वेगळी गोष्ट होती. येथे त्याची नौदलाच्या सर्वोच्च, प्रस्थापित कार्यालयाशी गाठ होती. अर्थात यामामोटोही काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. त्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याचा एक दूत नॅव्हल जनरल स्टाफच्या कार्यालयात पाठवला. त्याचे नाव होते कॅप्टन कामेटो कुरोशिमा.
कामेटा
त्याच्याबरोबर होता कमांडर यासुजी. कुरोशिमा सरळ सासातोशी तामोईकाकडे पोहोचला. हा माणूस चीफ ऑफ नॅव्हल स्टाफच्या कार्यालयात चीफ ऑफ ऑपरेशन म्हणून काम करत होता. कुरोशिमाने फालतू गप्पांमधे वेळ न घालवता मुद्द्यालाच हात घातला. ‘‘ॲडमिरल यामामोटोने मला पर्ल हार्बरबद्दल आपले मत जाणून घेण्यासाठी पाठविले आहे. या योजनेला मंजूरी मिळणार आहे का नाही ? आमच्या हातात फार थोडा वेळ आहे. कृपया वेळ न घालवता याचे उत्तर द्यावे’’.
अर्थात या धमकीवजा विनंतीला न जुमानता तोमिओकाने पर्ल हार्बरविरोधी मतांचा पाढा वाचला. कुरोशिमाने त्याच्या टीकेला उत्तरे देण्याचा बराच प्रयत्न केला पण नंतर त्याच्या लक्षात येऊ लागले की ही चर्चा काही पुढे जाणार नाही, कारण त्यांचा निर्णय अगोदरच ठरलेली दिसत होता. हे लक्षात आल्यावर कुरोशिमाने यामामोटोने दिलेले शेवटचे शस्त्र उगारले.
‘‘ॲडमिरल यामामोटोला पर्ल हार्बरवरील हल्ल्यासाठी परवानगी पाहिजे आहे. ती न दिल्यास तो जपानच्या साम्राज्याच्या संरक्षणासाठी जबाबदार राहणार नाही हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. अशा परिस्थितीत त्याला राजिनामा देण्यावाचून दुसरा पर्याय दिसत नाही. त्याने राजिनामा दिल्यास त्याच्या हाताखाली काम करणारे सर्व आधिकारी आपले राजिनामे सादर करतील’’
ही धमकी ऐकताच तोमिओकाला घाम फुटला. त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. तोमिओका डोळे फाडून कुरोशिमाकडे बघू लागला. घाम पुसत त्याने त्याच्यापूरती परवानगी देण्याचे कबूल केले. कुरोशिमाने पहिला अडथळा ओलांडून आता त्याच्या वरच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. तेथेही त्याने तेच अस्त्र वापरल्यावर त्या कार्यालयाने पर्ल हार्बरवरील हल्ल्यास अखेर परवानगी दिली. अखेर यामामोटोचा विजय झाला. अर्थात तो होणारच होता कारण यामामोटोचे जपानच्या लष्करात प्रचंड वजन होते आणि त्याच्याशिवाय त्या युद्धात उतरण्याचा कोणी विचारही करु शकत नव्हते.
या निर्णयानंतर जपानचे हवाई बेटांवरचे गुप्तहेरांची जाळे अधिक सक्रीय करण्यात आले. बंदरात असलेल्या अमेरिकन बोटींची नावे आता पुरेनाशी झाली. आता प्रत्येक बोट कुठे उभी राहते, हवाई टेहळणीच्या वेळा, त्यांच्या दिशा, बेटावरील इंधनाचे साठे इत्यादि बाबींबद्दल बारीकसारीक माहीती जमा केली जाऊ लागली. ही माहीती ऐकीव नसावी व प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेली असावी असाही आग्रह धरण्यात येत होता. हे जाळे उभारण्यात होनोलुलुमधील जपानच्या वकिलातातील आधिकाऱ्यांचा मोठा हात होता. त्यातील एका कर्मचाऱ्याने मोठी धमाल उडवून दिली. त्याचे नाव होते ताडाशी मोरिमुरा. याचे खरे नाव होते ताकिओ योशिकावा व तो पूर्वाश्रमीचा नौसैनिक होता.
योशिकावा
२८ मार्च १९४१ रोजी मोरिमुराने होनोलुलुमधील जपानच्या कौन्सेल जनरल नागाओ किटाकडे हजेरी दिली. किटाने या माणसाकडे पाहिले आणि तो २९ वर्षाचा आहे यावर त्याचा विश्वास बसेना. आकर्षक व्यक्तिमत्वाचा, मध्यम उंचीचा हा मुलासारखा दिसणारा माणूस हे काम कसे काय करु शकेल याची त्याला शंका वाटली. अर्थात ती पुढे फिटणार होती. त्याला असल्या कामाचा पुर्वानुभव नव्हता व त्याच्या डाव्या हाताच्या पहिल्याबोटाचे पेर तुटले होते. यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी ही एक चांगलीच खूण होती. कसे काय हा हे काम करणार......? असे किटाला वाटत होते खरे पण तेवढ्यात त्याने स्वत:ची समजूत घातली. टोकियो अशा बाबतीत चूक करणे शक्यच नाही. त्याने आत्तापर्यंत कुठल्याही कौन्सुलेटमधे काम केलेले नसल्यामुळे त्याचे नाव कुठल्याही यादीत नव्हते व अमेरिकेच्या यादीतही नव्हते. हा एक मोठा फायदाच झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या या माणसाने नॅव्हल ॲकॅडमीमधे प्रवेश घेतला होता पण त्याला प्रकृतीच्या कारणाने ते शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्याच्या दर्यावर्दी स्वभावाला जमिनीवर चैन पडेना. त्याच्या नशिबाने तो एका नौदल आधिकाऱ्याच्या संपर्कात आला ज्याने तो अजूनही नौदलात काम करु शकतो पण गुप्तहेर म्हणून अशी शक्यता बोलून दाखविली. अर्थात त्याला या कामात फारशा बढत्या मिळण्याची शक्यता नव्हती पण त्याच्या नौदलाच्या प्रेमापोटी त्याला त्याचे विशेष काही वाटले नाही. त्याने होकार दिला.
योशिकावाला अमेरिकेच्या पॅसिफिकमधील आरमाराचा व गुआम, मॅनिला व पर्ल हार्बर येथील आरमारी तळांचा अभ्यास करण्यास सांगण्यात आला. त्याला त्याचे इंग्रजी सुधारायचे होते व प्रत्येक युद्धनौका त्याला लांबून ओळखता यायला हवी असेही सांगण्यात आले. पुढची चार वर्षे त्याने त्याच्या कार्यालयात अमेरिकेसंदर्भात कामे लाऊन घेतली व उरलेला वेळ तो जेन्स फायटेंग शिप्स या मासिकांवर घालवू लागला. थोड्याच काळात तो या युद्धनौकांची सर्व तांत्रिक माहितीचा तज्ञ म्हणून ओळखू जाऊ लागला. १९४० मधे त्याला सरकारी इंग्रजीची परीक्षा देण्यास सांगण्यात आले. तो ती पास झाल्यावर त्याला जपानच्या राजदूतवासात कारकुनाची नोकरी देण्यात येणार होती. जपानमधे त्या काळात असा योग्य माणूस सापडल्यास त्याला नौदलाच्या नोकरीतून मुक्त करण्यात येऊन अशा कामगिरीवर पाठवण्यात येई. माणुस नौदलाच्या कुठे जास्त उपयोगी पडत असे त्यावरुन त्याचे नोकरीची जागा ठरत असे मग त्याला नौदलाची नोकरी सोडायला लागली तरी चालत असे. योशिकावाच्या बाबतीतही त्याला नौदल सोडण्यास भाग पाडून होनोलुलुला पाठवायचे अगोदरच ठरलेले होते असे म्हणतात. त्याला वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवून बाहेर काढायचे, त्याला योग्यवेळी या नोकरीची संधी द्यायची इ. हाही त्या योजनेचाच एक भाग असावा.
होनोलुलु येथे राजदूतवासात पहिल्यांदा त्याची नोंद अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात जपानचा एक राजदूतवासातील कर्मचारी म्हणून केल्यावर योशिकावाने कामाला सुरुवात केली. होनोलुलुची सर्व वर्तमानपत्रे तो पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत वाचून काढत असे. त्यात अमेरिकेच्या नौदलासंदर्भात छापून येणाऱ्या प्रत्येक शब्दावर त्याची बारीक नजर असे. दररोज शहरातून फेरफटका मारायचा हा त्याच्या कामाचाच एक भाग होता. त्याच फेरीत त्याला फोर्डआयलंड व त्याची धावपट्टी स्पष्ट दिसत असे. त्याचे एक आवडते उपहारगृह होते जेथून हे सर्व स्पष्टपणे त्याला दिसत असे. हे उपहारगृह पर्ल हार्बर पासून सगळ्यात जवळचे असून एक जपानी वंशाचा म्हातारा चालवत असे. या उपहारगृहात बसल्यावर त्याला पर्ल हार्बरवर असलेल्या बोटींच्या हालचालींबद्दल बरीच माहीती मिळत असे. विशेषत: जहाजांवर चढविल्या जाणाऱ्या सामानाचा तो अभ्यास करी. रात्री शहरातील दारुच्या गुत्यांवर तो नियमीत जाई व अमेरिकन खलाशांमधे मिसळत असे. अर्थात त्यावेळी तोंड बंद असे पण त्याचे कान व डोळे उघडे असत.
त्या काळात हवाई बेटांवर एफ् बी आयचे काटेकोर लक्ष असायचे कारण या बेटांवर जपानी वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षात घेण्यासारखी होती. योशिकावाला त्याचे खरे स्वरुप उघडकीस येईल याची सतत भीती वाटत असे. किटाने त्याला एफ् बी आय या संस्थेबद्दल सतत इशारे दिले होते व सावध राहायचा सल्लाही दिला होता. त्यांच्या कार्यालयात एफ् बी आय् ने सूक्ष्म ध्वनिमुद्रण करण्याची यंत्रणा पेरली असेल या शंकेने त्यांना घेरले होते. समोरासमोर बसल्यावरसुद्धा ते एकमेकांशी लिहून संवाद साधायचे (या विषयासंदर्भात) व त्या चिठ्ठ्या नंतर जाळून टाकण्यात येत.
बाकी काही असले तरी होनोलुलुचे टॅक्सीवाले मात्र या पाहुण्यावर अत्यंत खूष होते. रोज वेगवेगळ्या ठिकाणी टॅक्सी करुन फिरणारा, बक्षीस देणारा हा पर्यटक त्यांना न आवडला तर नवलच. किटाने त्याला त्याची गाडी घेऊन हिंडायला बंदी घातली होती कारण त्या गाडीच्या नंबरामुळे ती कोठेही ओळखू आली असती. हवाई बेटांच्या पर्यटन उद्योगाने योशिकावाला बऱ्याच संधी उपलब्ध करुन दिल्या. होनोलुलुला लागणाऱ्या सर्व जपानी जहाजांवरील उतारुंसाठी पर्यटन सहली आयोजित करण्याची व त्यांना मदत करण्याची एकही संधी तो सोडत नसे.
या मुखवट्याखाली तो या बेटांवर सर्रास संशय न येता हिंडू शकत असे. एकदा तो हवाई पर्यटक परिधान करतात तसे कपडे परिधान करुन त्याच्या गेशा मैत्रीणीला घेऊन ओआह बेटांवर हवाई सफरीवर गेला आणि त्याने व्हिलर आणि हिकॅम विमानतळाची पहाणी केली. या सर्व उद्योगात त्याचे एक विशेष होते ते म्हणजे हे करताना तो कसल्याही टिप्पण्या काढत नसे. त्याची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र असल्यामुळे तो ते परत आल्यावर ती गोपनीय माहीती लिहून काढायचा. पर्ल हार्बरजवळ अनेक उसाची शेते होती. तो कामगारांच्या वेषात तेथे जाऊन त्या हवाईपट्ट्यांची जवळून पहाणी करायचा. एका ठिकाणी तो ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबत नसे.
योशिकावाचे सगळ्यात आवडते हॉटेल होते शुंचो-रो (स्प्रिंग टाईड) हे एका टेकडीवर होते व तेथून पर्ल हार्बर व हिकॅमचचा विमानतळ अगदी स्पष्ट दिसायचा. तो तेथे गेल्यावर बऱ्याच वेळ दारुने झिंगल्याचे सोंग करायचा व त्याला उचलून त्या हॉटेलचे कर्मचारी त्याला ठरलेल्या खोलीत टाकायचे. ही खोली अर्थातच पर्ल हार्बरकडे खिडकी असलेली असायची. त्या बंदरात येणाऱ्या प्रत्येक युद्धनौकेला बाहेर पडायला किती वेळ लागतो, बाहेर येताना तिच्या कुठल्या हालचाली होतात याचा पूर्ण अभ्यास तो करत होता. ही माहिती टोकियोला फार महत्वाची होती.
७ ऑगस्टला व्हीलर फिल्ड सामान्य जनतेला बघण्यासाठी खुले केले होते त्यात योशिकावाही होता. कॅमेरा आत नेण्यास परवानगी नव्हती अर्थात त्याचे त्याने काही बिघडत नव्हते. तो प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक बघत होता व त्याच्या मेंदूत साठवत होता. या माणसाची आयुष्य फार कष्टाचे होते. त्याला आठवड्यात एकही सुट्टी मिळत नसे. त्या काळात हवाईमधे जपानी गुप्तहेरांचा सुळसुळाट होता पण योशिकावा त्या सगळ्यांना नवशिक्यांचा दर्जा देत असे. याचे नंतर फारच हाल झाले ते आपण त्याच्या अवांतर माहीतीत खाली वाचणार आहोत.
अवांतर माहिती :योशिकावा : म्हातारपणी
योशिकावाने तरुणपणी जपानच्या नॅव्हल ॲकॅडमीमधे प्रवेश घेतला होता व तो तेथे चांगल्या क्रमांकाने पास झाला. त्याने पाणबुडीचेही प्रशिक्षण घेतले होते. दुर्दैवाने असाध्य पोटदुखीमुळे त्याला नौदलाची नोकरी सोडावी लागली. (?) त्याच दुखण्यामुळे त्याने आत्महत्याही करायची ठरवले होते. नशिबाने त्याला नवीन नोकरी मिळाली ती आपल्याला माहितच आहे. एन्क्रिप्शन स्कूलमधे असताना त्याने ऑस्ट्रेलियाहून प्रसारित केलेला एक संदेश पकडला. हा संदेश जर्मनीला कळवल्यावर दोस्तांच्या १७ युद्धनौकांचा नाश करण्यात आला. या कामगिरीसाठी त्याला हिटलरकडून आभारप्रदर्शनाचे पत्रही मिळाले होते. बिचाऱ्याला त्याच्या देशाकडूनही साधे निवृत्तवेतन मिळाले नाही. जेव्हा तो ते मागायला गेला तेव्हा त्याला मोठे मासलेवाईक उत्तर मिळाले ‘जपानने कुठल्याच देशात कधीही हेरगिरी केलेली आम्हाला माहीत नाही’’. युद्धानंतर जपानमधे त्याने खाऊच्या गोळ्यांचा कारखाना काढला पण तोपर्यंत जपानची जनता त्याचा द्वेष करायला लागली होती. ते त्याचा माल घेईनात.... तो वैतागाने म्हणाला ‘ जणू काही मीच त्यांच्यावर अणूबांब टाकला अशी वागणूक ते मला देऊ लागले होते’’. त्याच्या नशिबाने त्याच्या पत्नीने मात्र त्याला शेवटपर्यंत साथ दिली. हा गुप्तहेर आर्थिक विवंचनेत, हालात एका नर्सिंगहोम मधे मरण पावला.
अमेरिकेला जपान पर्ल हार्बरवर हल्ला करु शकेल याची कल्पना होती का ................?
याचे उत्तर आहे...............होती.....................
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
6 May 2013 - 8:23 pm | सुहास झेले
व्वा ... काय जबरदस्त डिटेलिंग आहे. मज्जा आली.
पुढचा भाग वाचण्यास उत्सुक... :)
7 May 2013 - 8:30 am | लॉरी टांगटूंगकर
कमाल डिटेलिंग, लै लै मज्जा!!!
पुढच्या भागाची प्रचंड वाट बघतोय..
6 May 2013 - 8:57 pm | श्रीरंग_जोशी
पूर्वीच्या दोन्ही भागांपेक्षाही हा भाग खास वाटत आहे.
मात्र काही व्याकरणाच्या चुका रसभंग करत आहेत. उदा.
6 May 2013 - 9:29 pm | मुक्त विहारि
आवडला...
7 May 2013 - 10:20 am | मन१
शेवटच्या वाक्याने उत्कंठा वाढली.
7 May 2013 - 10:44 am | वसईचे किल्लेदार
माहितीपुर्ण आणि खिळऊन ठेवणारे!
7 May 2013 - 10:55 am | विसोबा खेचर
जयंतराव..
कृपया आमचा दंडवत स्विकारा..
सुरेख सुरू आहे...
तात्या.
7 May 2013 - 11:49 am | नन्दादीप
मस्त, रोचक माहिती....
शेवट....... भयानक...... वाट पहातोय पुढच्या भागाची...
7 May 2013 - 12:52 pm | मनराव
उत्तम लेख......
वाचतो आहे........
7 May 2013 - 5:06 pm | शिलेदार
खुप मस्त आम्ही पण वाट पाह्तोय
8 May 2013 - 1:39 pm | पैसा
एकदम खिळवून ठेवणारे!
8 May 2013 - 7:08 pm | अजो
तिन्ही भाग वाचले. खिळवुन ठेवणारे लिखाण. खुप्पच मस्त. पुढच्या भागाची वाट पाहते आहे.
9 May 2013 - 12:09 am | विनोद१८
जयन्तराव नेहमीप्रमाणेच अत्यन्त्य अप्रतिम लेख वाचनीय, मननीय..!!!!
विनोद१८
9 May 2013 - 12:21 am | अग्निकोल्हा
हे उसगावबाबत बाडिसच आहे.
योशिकावाची माहिती रंजक.