पूर्वरंग
आपण "टाकी"त जाउन बसतो. टाईम पास म्हणून काही गाणी पडद्याआडच्या स्पीकरमधून ऐकू येत असतात."ज्यायला ह्या जन्याच्या ...( जन्या म्हणजे सिनेमा प्रोजेकटर ऒपरेटर ) अशी शिवी बाजूने ऐकू येते.पिटातल्या सगळ्या जागा भरल्याने नाईलाजाने वरच्या लायनीचे तिकोट काढून एक पिटकर आपल्या शेजारी येउन बसलेला असतो. प्रोजेक्टर लवकर चालू करीत नाही म्हणून वैतागातून ही खास प्रतिक्रिया आलेली असते. मग तो साईडच्या भिंतीवर तोंडची एक पिचकारी मारून " पिच्चर" चा मूड जमवतो.
आपण मनातून या सीनमुळे अस्वस्थ असतो. पण एकाच आशेवर हे सारे सहन करत असतो. कारण ..कारण सिनेमा ओपींचा असतो.हिरो कोण होरॊईन कोण ? आपल्याला तसे फ़ारसे देणेघेणे नसते. ओपीचा सिनेमा म्हणजे एकतर प्रणयकथा किंवा गुन्हेगारी कथा हे ही आपल्याला माहीत असते. मग " टाकी" चे दिवे मालवले जातात. आता फ़क्त साईडच्या दरवाज्यावर असणारे एक्झीट व नो एक्झीट चे लालभडक बोर्ड आपल्याला दिसत असतात. पडद्यावर " इंडेलन्युज" चालू असते. बिहार मधला पूर, प्रधानमंत्र्याची इशान्यपूर्वेस भेट हे सारे आपण सहन करीत असतो.कारण जराशाने एक मस्त मैफल सुरू होणार असते. मग तो क्षण येतो. पडद्यावर पाट्या पडू लागतात (यालाच साहेब टायटल्स असे म्हणतो) .म्युझिक ओ पी नय्यर अशी पाटी आली की आपण व तो मघाचा पिचकारी वाला या दोघांच्याही मुखातून " आह ! " असा उदगार बाहेर पडतो.आता तीन तास मस्त मस्त गाणी ,धुंद्फ़ुंद करणारे संगीत. खुर्चीतल्या खुर्चीत पायाचा ठेका आपोआप धरायला लावणारी मैफ़ल याची खात्री देणारा हा हुंकार असतो. जादूगाराचा अंमल टायटल्सच्या म्युझिक पासूनच चालू झालेला असतो.
ओपी -व्यक्ती व वृत्ती
१६ जानेवारी १९२६ रोजी लाहोर प.पंजाब येथे हा जादूगार मदनगोपाळ नय्यर यांच्या पोटी जन्माला आला. मुलाचे नांव ओंकार प्रसाद ठेवले. घरात बाकीचे भाउ वगैरे हुशार. कुणालाही संगीताचा गंध नाही. पण नियतीने ओपी ना काहीतरी विशेष करण्यासाठीच निर्मिलेले. अकराव्या वर्षीच ओपींचा कार्यक्रम लाहोरच्या रेडिओ केंद्रावर झाला. ओपी एका मुलाखतीत म्हणतात " मी अभ्यासात हुशार नसल्याने कुटंबाकडून माझ्या बद्दल फ़ारशा अपेक्षाच नव्हत्या. पुढे सर्वात महागडा संगीतकार म्हणून नावाजला गेलो त्यावेळी मी घरातून पळून गेलेला एक मुलगा होतो. व सिनेजगतात " कॆडीलॊक " ही गाडी फ़क्त मी व व्ही शांताराम यांचेकडेच होती. मोठया अभिमानाने मी त्या गाडीसह घरी गेलो पण त्यापूर्वी मी मुंबईत स्थिर होण्यासाठी फ़ार हाल भोगले." १९४९ मधे " कनीज" या चित्रा पासून " पार्श्व संगीतकार" अशी कारकीर्द ओपीनी सुरवात केली पण त्यांचे पहिले गीत गाजले ते चंद्रू आत्मा यांचे प्रीतम आन मिलो. ओपीना या गीतसाठी २५ रू इतके प्रचंड मानधन मिळाले." ज्युक बॊक्स मधे ते गीत उपहार ग्रुहात वाजत असताना माझ्याकडे त्याच जागी चहा प्यायलाही पैसे नसत" अशी आठवण ओपी सांगत. दलसुख पांचोली यांच्या " आसमान" या चित्रा द्वारा ओपींचे आगमन हिंदी फ़िल्म संगीताच्या मंचावर झाले खरे पण या चित्रपटासकट " बाज" व "छम छमा छम" हे त्यांचे चित्रपट तिकिट बारीवर आडवे झाले. मग निराश हौउन पुन्हा पंजाबला परत जावे व शाळेत मिळाली तर एकाद्या संगीत मास्तराची नोकरी करावी या निर्णयाप्रत ओपी आले. उरलेली पंधराशे रुपये गुरूद्त्त कडे मागण्यासाठी ते गेले तेंव्हा "आपल्या मोठ्या मुलाला दूध पाजायला ही पैसे नाहीत" असे त्यानी गुरूदताला सुनावले. तर त्याने काय करावे त्याने आपला आगामी चित्रपट " आरपार" ओपीना बहाल केला. ओपींकडे काही " सांगितिक मागण्या" गुरूनी केल्या. नय्यर " आरपार" मधून एक नवाच बाज फ़िल्म संगीतात घेउन आले. ओपी नय्यर हे चित्रसंगीतातील आद्य " फ़्युजनिस्ट " म्हणून उदयास आले.फ़्युजन करतानाही तालांची बेमालूम सरमिसळ करायची व पुन्हा साडेतीन मिनिटाचे गाणे अ पासून ज्ञ पर्यंत एकसंध करायचे ही त्यांची खास स्पेश्यालिटी ठरून गेली.
ओपींच्या कारकीर्दीचे माझ्या मते तीन कालखंड आहेत.पहिल्यात ते आपली " शैली" काय असावी याच्या शोधात असलेले दिसतात. यात कैदी, तुमसा नही देखा, ढाके की मल्मल, मिस्टर मिसेस ५५, आरपार, बसंत ,१२ ओ क्लॊक असे चित्रपट आहेत. त्यात क्लरीनेट , मेंडेलीन, अकोर्डियन यांचा वापर दिसतो. दुसर्या कालखंडात संतुर, मेंडोलिन, डबलबेस , बेस गिटार. अकॊस्ट्क गिटार,चेलो, वायलिन,सतार , सारंगी, हारमोनियम व हारमोनिका यांचा सढळ वापर दिसतो. यात खरी ओपी नय्यर खासीयत आलेली दिसते. या मधे काश्मिरकी कली, मेरे सनम, एक मुसाफ़िर एक हसीना, फ़िरवहीदिल लाया हु, हमसाया, कही दिन कही रात ,द किलर्स ,हम सब चोर है, सी आयडी ९०९, सावनकी घटा व प्राण जाय पर वचन न जाय ई चित्रपट येतात. तिसरा टप्पा, = त्यात ओर्केस्ट्रेशन पूर्वी इतके खास नाही. नय्यर बरोबर रफ़ी आशा महेंद्र नाहीत मिळतील त्या गायकांवर नय्यरना "भागवून" घ्यावे लागत आहे अशी परिस्थिती.जुन्याच चालींची सरमिसळ असा प्रकार. नय्यर कोठेतरी हरवले आहेत असे वाटणारा गा चित्रपटांचा गट. बिन माके बच्चे, खून के बदले खून , हीरा मोती, निश्चय , जिद ई. चित्रपट यात येतात.
नय्यर नी १९५२ ते २००७ य काळात एकूण सुमारे ८० चे वर चित्रपटाना संगीत दिले.काही इतर भाषेतील चित्राना संगीत दिले. तेलगू भाषेतील " निराजनम " या चित्राच्या संगीताने रेकॉर्ड विक्रीचा उच्चांक केला ( तो पुढे ए आर रेहमानने मोडला ). त्यांची सर्वच चित्रपटांची गीते ही सारख्याच प्रमाणात गाजली नाहीत. असे असले तरी एकाच चित्रपटात सात आठ गाणी उत्तम दर्जाची ही बाब शंकर जय ,सी रामचंद्र . नौशाद या खेरीज नय्यर यांचेकडेच होती. निदान
५० च्या दशकात तरी.नय्यर नावाची एक वावटळ आली.जुन्याना हादरा देणारी.याबाबत नय्यर गंमतीने म्हणत" त्याकाळात त अनेक नामांकित घोडे फ़िल्म संगीतात दौडले पण त्यात एक गाढवही धावले व पार पुढे गेले म्हणतात ना खुदा मेहरबान तो गधा पहिलवान ! "
पनासच्या दशकात ओपीनी जम बसविण्यास सुरूवात केली. तरी त्यांया वाटयाला अ दर्जाचे चित्रपट आलेले नव्हतेच. साठच्या दशकात चित्रपट रंगीत झाला गेव्हाकलर , इस्टमनकलर असे शब्द हटकून चित्रपटाच्या नावाखाली दिसू लागले व ओपींच्या प्रतिभेला धुमारे फ़ुट लागले .
ओपींच्या ऐंशी एक चित्रपटांच्या वाटचालीत सातत्य नव्हते. काही वेळेस खूप काम तर की काळात काहीच नाही अशी त्यांची कारकीर्द घडली कारण ते पडले शैलीदार टाईपचे संगीतकार. अशा संगीतकारांच्या शैलीत न बसणारे विषय हाताळणारे चित्रपट असले की अशाना कोण घेणार. गुन्हेगारी चित्रपट संपल्यावर "प्यासा" साठी गुरूदत्तने एस डीना तर मुस्लीम सोशल फिल्म " चौदहवी का चांद" साठी रवीना संगीतकार म्हणून पाचारण केलेच ना ?
ओपी हे गृहस्थ हे सार्थ पणे स्वता" ला वेगळाच व श्रेष्ठ संगीतकार मानत. संगीतकार घडवून होत नाही तो निसर्गाने जन्मालाच घालावा लागतो.असे ते वारंवार म्हणत. ( याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठीतील आजची प्रतिभावान जोडी अजय अतुल हे उदाहरण आपण पहातोच आहोत) . नय्यर साहेबांच्या वाटचालीत तरीही अनेक घटक त्यांच्या प्रतिभेबरोबर नांदले. नय्यर हे उत्तम कप्तान असले तरी या पटूंचे महत्व कमी होत नाही .
अनेक गायक, गीतकार , वादक, वाद्ये, निर्माते यांचाही ओपीना " स्पेशल" बनविण्यात हात होताच. ते असे-
गायक- रफी, गीतादत्त, आशा भोसले,शम्शाद बेगम, किशोर कुमार ,महेंद्रकपूर, व काही प्रमाणात मुकेश, मन्ना डे .तलत.
या शिवाय सुरैया, रंजना जोगळेकर , पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले , महमद अझीज, अमितकुमार, उत्तर केळकर, वाणी जयराम , बलवीर सिंग, पिनाज मसानी, उषा मंगेशकर ,अशीक खोसला, रूना लैला हे ही त्यांच्या कडे गायले.
गीतकार.- एस एच बिहारी, शेवन रिझवी, जान निसार अखतर,कमर जलालाबादी, राजा मेहंदी साहेब, मजरूह.अझीज कशमिरी, नूर देवासी,.
वादक,- हजारा सिंग , दिलीप नाईक , गुडी सिरवई, धीरजकुमार, जीएस कोहली. गंगाराम, बर्वे,हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा, झरीन दारूवाला, लक्ष्मीकांत, अब्दुल करीम, उ. जाकिर हुसेन, पं रामनारायण, शामराव कांबळे, केरसी लॉर्ड,,कावस लॉर्ड, सनी कॅस्टेलिनो, परशुराम.
वाद्ये- क्लारिनेट, सॅक्सोफोन, बास, डबल बेस ,मेंडोलिन , चेलो, व्हायलिन, सारंगी, सरोद, सितार, बासरी, बेस गिटार, अॅकॉस्टीक गिटार,संतुर,ढोलक, तबला बोंगो ई.
विशेष वापर - टाळ्या, शीळ, नारळाच्या करवंट्या, घुंगरू, कॅस्टानेट, डफ
निर्माते- शक्ती सामंता, गुरुदत्त, सुलतान अहमद, नासीर हुसेन एस मुकर्जी .
वापरलेले राग - पिलू, पहाडी, केदार, बसंत, भूप, भिमपलासी, अहीर भैरव,सारंग, यमन
वापरलेले ताल- मार्च, स्विंग, कहरवा , दादरा, झपताल, अर्धा दीपचंदी व भांगडा हा कहरव्याचाच एक प्रकार, ट्वीस्ट, रॉक एन रोल ), तीन ताल .
ओपी.च्या संगीत शैलीची काही खास वैशिष्ट्ये-
१) ओपी ना " रिदम किंग " या नावाने ओळखले जाते तसे मायस्त्रो ऑफ मेलडी असे ही म्हटले जाते कारण ताल व चाल या दोन्ही बाजू समतोलाने ते सादर करताना दिसतात.
२) ओपी च्या गाण्यात पाश्चात्य तसेच भारतीय वाद्यांची अचूक निवड केलेली असून कित्येक वेळा त्यांचे बेमिसाल मिश्रण केलेले असते.
३) जी गोष्ट वाद्यांची तीच गोष्ट तालांची. काही वेळा मुखड्याला पाश्चात्य ताल तर अंतर्याला कहरवा हा भारतीय ताल. अशी ताल योजना आढळते.
४) ओपीच्या ऑर्केस्ट्रेशन मधे गायक व वादक यांच्या कुवतीचा सखोल अनुभव देणारी आडव्या उभ्या धाग्यांची जणू नक्षीच असते. कधी रफी- सेक्सोफोन अशी जुगलबंदी ( है दुनिया उसीकी ) कधी आशा भोसले माउथ ऑर्गन ( वो हंसके मिले हमसे ) अशी जुगलबंदी.
५) काही गीतांच्या अगोदर मूळ गीत सुरू होण्यापूर्वी अतिशय गोड चाल असलेल्या ओळी म्हटल्या जातात ( याना " कता "असे म्हणतात . त्यावेळी तालवाद्य चालू नसते. ही खास बात या जादूगराची आहे. यातील ताना हरकती ऐकल्या की ओपीनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नाही यावर विश्वास ठेवणे अशक्य प्राय होते.
६) ओ पी ची गीते नशीलेपणाने भारलेली असतात त्यामूळे हाय ... हा रे हाय. हुई उई असे शब्द बर्याच वेळा गीतात असतात .
७) ओपीचे एकट्याचेच असे खास बलस्थान म्हणजे त्यांच्या गीतातील अग्रसंगीत ( intro) मूळ गीताची सुरूवात होण्यापूर्वी त्या मेलडीची एक हाक तुमच्या कानाला घालण्यासाठी तयार केलेला हा तुकडा असतो.
उदा पुकारता चला हो मै , किंवा तारीफ करू क्या उसकी याच्या अग्रसंगीतात अनुक्रमे किरवानी व पहाडी रागाचे सूर अवतरलेले आढळतील .त्याच रागात पपुढी ही गीते बांधली आहेत.
८)आणखी एक खासीयत म्हणजे दोन अंतर्यांच्या मधील संगीत interlude)| यात वापरलेल्या नोटस या मेन मेलडीशी अगदी इमान राखणार्या असतात व बरोबर समेवर येऊन गायकाने अंतरा सुरू करावा म्हणून एक ठिया तयार असतो
( a prompt) .व ९० टक्के या ठीयाची नोट व कडव्याची सुरवात या एकच असतात. काही बाबतीत कडव्याची सुरवातीची नोट वरच्या सप्लकातील तोच स्वर असतो.
९) कित्येक गीतात ठळकप्णे अवनद्ध वाद्य तालासाठी वापरलेलेच नसते. ( पर्कशन) तर डबल बेस ( प्लकर पद्धतीने) , बेस गिटार, अॅकॉस्टिक गिटार यांचे संकर करून ताल वाद्याचा परिंणाम साधलेला असतो.
१०) मींड, तान, आंदोलन हे हरकतीचे प्रकार सढळपणे वापरणारे संगीतकार म्हणजे ओपी नय्यरच दुसरे कुणी नाही. मुख्या म्हणजे असे गीत नृत्यगीत असायला पाहिजे असे नाही. कवाली, युगलगीत अशा प्रकारच्या गीतातही हरकतींची भरपूर वापर आढळतो.अगदी रातोंको चोरी चोरी, किंवा चैनसे हमको कभी या दर्दभर्या गीतामधेही हरकती येतात.
ओपी व महमद रफी-
ओपींच्या सगीतमय वाटचालीत रफी नाव अग्रस्थानी आहे. भावुक, मस्तीभरी, विनोदी. आर्त गंभीर, अशा सर्व प्रकारात रफी ओपींकडे गायले. एका ठिकाणी रफी यानीच उल्लेख केला आहे की १९५२ नंतर त्यांची मेलड्रामॅटिक गायकी घडण्यात ओपींच्या मार्गदर्शनाचा लाभ जरूर झाला होता. ( ही गोष्ट श्री शम्मीकपूर यानी आकाशवाणी वर कथन केली).ओपींच्या रफी यांच्यावरील विश्वासाचे उदाहरण असे की गायक किशोरकुमार यांचे साठी " मन मोरा बावरा" या गीतात रफी यानी उसना आवाज दिलाय !आपकी हसीन रुख पे असे शांत गीत असो वा दो उस्ताद मधील " वरलीका नाका .. ककम कदम पे छोडे एक पटाखा " हे हैदोस गीत् असो. रफी नय्यर युती लाजबाव आहेच.
ओपी व गीता दत्त-
गीतादत्त यांची बलस्थाने म्हणजे त्यांची आवाजाची फेक व त्यांच्या आवाजातील दर्द . या दोन्हीचा वापर ओपी गीतादत्त या संगमात दिसून येतो.काही वेळा जास्त अनुनासिक आवाज व सामर्थ्यवान ताने अभाव या मुळे आशाबाई च्या तुलनेत गीता ना कमी गाणी मिळाली असावीत असा कयास करायला जागा आहे.
ओपी व आशा भोसले.
एकदा लताबाईबरोबर काम करायचे नाही असे ठरल्यावर तितकीच दर्जेदार स्त्री गायिका ओपीना मिळाली. हे रसिकांचे परमभाग्य. या भाग्याला या दोघांचीच नजर लागली १९७३ चे सुमारास लागली. मग त्यानंतर दर्जेदार स्त्री गायिका नय्यर यांच्या संगीतातूअ हरवली ती कायमचीच. आशा बाईंचा बेस आवाज , हरकतीचा गळा व दिलोदिमाग चा मस्त वापर यांचा सुरेख संगम या जोडीने घडवून आणला. प्रेमज्वर झालेली नायिका , भलवणारी गणिका, विरहिणी . क्लब डान्सर सारी रूपे आशा बाईनी बुलंद आवाजाने समोर आणली. कित्येक गीतात आशाची आलापी हा ओपींची ठसा होऊन बसलेला दिसतो.फागोन या चित्रपटातील सर्वच्या सर्व गीतात आशाबाईंचा आवाज आहे. जवळ जवळ सवा तीनशे गीते त्यानी नय्यर बरोबर केली आहेत.या युतीला आव्हान देऊ शकते ही लता- मदनमोहन ही युती.
ओपी व शमशाद बेगम
लाहोर आकशावाणीवर वयाच्या १५ व्या वर्षी ओपी मुलांसाठी संगीत कार्यक्रम सादर करत होते त्यावेळी शमशाद या नाव मिळविलेल्या आकाशवाणी गायिका होत्या. ओपी हा स्वता: ची सायकल असलेला व ऑर्डर देताना पटकन सायकलवर जावून आईसक्रीम आणणारा उत्साही मुलगा अशी ओपीची ओळख शमशाद यानी एका मुलाखतीत दिली आहे. त्याच नय्यरनी मुंबईस ५० च्या दशकात यशस्वी दौड करीत असताना शमशाद यांच्या ठसकेबाज व गोड आवाजाला वापरले. पण त्यांच्या आवाजापेक्षा नायिकेच्या आवाजाशी जास्त जवळ असणारा आशा भोसले यांची आवाज मिळताच शमशाद मागे पडल्या. पुढे " किस्मत " या चित्रात " कजरा मोहब्बत वाला" या ठस्केबाज गीतात त्या आवतरल्या. ती गीत त्या वर्षातील सर्वात लोकप्रिय गीत आहे. नय्यर यांचे सर्वात आवडते युगलगीत मेरे नींदोमे तुम ही किशोर बरोबर गायलेली गीत हे शम्शाद यांचे आहे हे विशेष.
ओपी व महेद्र कपूर
रफी साहेबाना पर्याय म्हणून बहारे फिरभी आयेगी सावनकी घटा या जमान्यापासून ओपीनी रवी यांचे प्रमाणेच महेंद्र कपूर या रफी याना गुरुस्थानी मानणार्या महेंद्रकपूर यां गायकाचा वापर करण्यास सुरुवात केली. रफी यांच्या आवाजाची फेक व दर्जा महेंद्र यांचेकडे नव्हता पण त्याने मोठ्या इमानदारीने ओपी कडे गायनाची जबाबदारी पार पाडल्याचे दिसते.
ओपी व किशोर कुमार
ओपी यांच्या सिनेमात ज्यावेळी किशोर हा नायक होता त्यावेळी काही भन्नाट गीते या जोडीने निर्मिली. त्यानंतर मग मधे किशोर मोशाय ओपीच्या संगीतातून गायब झाले व एकदम एक बार मुस्कुरादो अशी नादमय आरोळी देत अवतरले.
आजही ऑर्केस्ट्रा मधे सुरमा मेरा निराला हे गीत हमखास वन्स्मोर घेते.
ओपी व तलत महमूद व मुकेश
ओपींच्या संगीताचा एकूण बाज पहाता या दोन आवाजाना तिथे फारसे काही करंण्यासारखे नव्हते.... तरीही ओपीनी
मुकेशला 'चल अकेला चल अकेला '( संबंध) हे त्यांच्या मुकेशच्या कारकीर्दीतील एक टॉप टेन गीत दिले तर तलतच्या
नाजुक मखमली आवाजात 'प्यार पर बस तो नही 'हे गीत कितीही वेळा ऐका असेच आहे.
वरील गायकांखेरीज , दिलराज कौर, पुष्पा पागधरे, उत्तर केळकर, कृष्णा कल्ले, वाणी जयराम. महंमद अझीज, बलवीर सिंग मन्नाडे , अमित कुमार व कृश्णमुर्ति यानी गायन केले .
ओपी नय्यर व निरनिराळे गीतकार.
ओपीनी नेहमीच ज्याना दुसरे संगीतकार पाचारण करीत नाहीत अशा गीतकारांसाठी निर्मात्यांकडे गळ घातली. मुख्य य प्रवाहातील मजरूह ) साहीर लुधीयानवी हे शायर वगळता एस एच बिहारी यानी प्रामुख्याने ओपी, साठी काम केलेले दिसते. या खेरीज इतरानी गीतकार म्हणून काम केले त्याच उल्ल्लेख वर आलेलाच आहे. ओपी या सर्व गीतकारांचे ऋण मानतात.आपले गीतकारांचे काम हेच आपल्याला उत्तम चाली सुचण्यास कारणीभूत झाले असे त्यानी नोंदविले आहे.
ओपींनी वापरलेले गायक व त्यांची कॉम्बीनेशन हा निकष धरून काही युगल गीते नमुना या स्वरूपात देत आहे
१) मेरी नींदोमे तुम _ शमशाद -किशोर कुमार - (- नया अंदाज)
२) मै बांगाली छोकरा - आशा भोसले किशोर कुमार ( रागिणी)
३) उधर तुम हंसी हो - गीता दत्त - मोहमद रफी - (मि मिसेस ५५)
४) ठंडी हवा आयी घटा - गीता दत्त आशा भोसले- (मि मिसेस ५५)
५) कजरा मुहाबत वाला - आशा भोसले शमशाद -( किस्मत)
६) हमने जब दिल तो दिया- रफी शमशाद -( छू मंतर)
७) सच ब्ता तो मुझपे फिदा - तलत महमूद आशा भोसले - (सोनेकी चिडिया)
८) हमको हसके देख जमाना - रफी किशोरकुमार - (अकलमंद)
९) तू है मेरा प्रेम देवता - रफी मन्ना डे -( कल्पना)
१०) कोरी गागरिया मीठा पानी - कविता कृष्णमूर्ती -महमम्द अझिज -( जिद)
११) तुझे प्यार कर लू - माधुरी जोगळेकर - महमद अझिज - (जिद)
१२) प्यार भारा कजरा - पुष्पा पागधरे- उत्तरा के़ळकर -( खून का बदला खून)
१३) खुदा हुजूर को मेरी ही जिंद्गी दे दे - उषा मंगेशकर आशा भोसले-( सावनकी घटा)
१४)होटोंओए हंसी आखोमे नशा - रफी आशा भोसले.-(सावनकी घटा)
१५) चेहरेसे जरा आँचल - मुकेश आशा भोसले -( एक बार मुस्कुरादो)
१६) जो दिया था तुमने एक दिन - महेंद्रकपूर हेमंतकुमार ०( संबंध)
१७) तेरा निखरा निखरा चेहरा - आशा भोसले कमल बारोट - (सी आय डी ९०९)
१८) बाहोंको जरा लहरा दे - आशा भोसले० मन्ना डे (कभी अंधेरा कभी उजाला)
१९) देखो देखो तुम - अमितकुमार कविता कृष्णमूर्ती -(निश्चय)
२०) तुसे प्यार कर लूं - महमद अझीझ - रंजना जोगळेकर - ( झिद )
२२) तू जरा जरा सी बात पे - मोहमद रफी- सुरैय्या -( मि लंबू )
ओ पी नय्यर यानी वापरलेली वाद्ये, राग ,ताल, हाताळलेले गीत प्रकार ई माहिती भाग२ २७ जाने ला .
प्रतिक्रिया
15 Jan 2013 - 10:40 pm | आनन्दिता
बापरे!! आम्हाला ओपींच्या गाण्यांवर फक्त डूलणं माहिती आहे... सलाम तुमच्या अभ्यासाला. खुप छान!!
15 Jan 2013 - 11:02 pm | शुचि
मै बांगाली छोकरा - हे गाणं फार आवडतं. ओ पी ची सर्वच गाणी भूल घालतात.
15 Jan 2013 - 11:54 pm | संजय क्षीरसागर
ओपींचे आणखी काही खास पैलू :
ओपींच शब्दांवर बेहद्द प्रेम होतं. हवा तो भाव व्यक्त करायला गीतकाराला ते शब्द बदलायला लावत. त्यामुळे त्यांची गाणी लक्ष वेधून घेतात.
आप यूं ही अगर हमसे मिलते रहे
इशारो इशारोंमे दिल लेने वाले
दिवाना हुआ बादल
बलमा खुली हवामे, महेकी हुई फिजामे..
हमदम मेरे मानभी जाओ
ये मेरे हाथमे तेरा हाथ, नये जज्बात..
बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी
जरा होल्ले होल्ले चल्लो मोरे साजना
मांगके साथ तुम्हारा
मैं प्यारका राही हूं
तुम्ही दिलेलं : खुदा हुजूरको मेरी भी जिंदगी देदे
किंवा संबंध मधलं : आशा आणि मुकेशच : ये दिल लेकर नजराना
ओपींच्या यमनवर असलेल्या हुकूमतीच कौतुक करावं तितकं थोडं आहे (सध्या आठवतायत ती गाणी):
जरा होल्ले होल्ले चल्लो मोरे साजना (यातला `साजना' हा शब्द ऐका)
दिवाना हुआ बादल
हमदम मेरे मान भी जाओ
मैं प्यारका राही हूं
16 Jan 2013 - 12:30 am | लाल टोपी
रफी च्या आवाजातील कश्मिर की कली मधल्या दिवाना हुवा बादल मधल्या 'हाथोंमें तेरा आचल आया के बहार आयी' 'बहार' शब्द इतक्या नजाकतीने म्हंट्ला आहे की व्वा! क्या बात है.
लेख आवड्ला सुरेख मांडणी
16 Jan 2013 - 11:35 am | चित्रगुप्त
दीर्घ प्रतिक्षेनंतर हा लेख ओपींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रकाशित होत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. मी गेली चाळीसाहून जास्त वर्षे ओपींच्या संगीताचा दिवाणा आहे... अगदी रोज ऐकूनही त्यातील गोडी ओसरलेली नाही.
या लेखाचा आणखी एकच नव्हे, तर आणखी भाग लिहावेत ही विनंती. तुम्ही स्वतः ओपींना भेटायचा, तेंव्हा काय बोलणे व्हायचे वगैरे सर्व जाणण्यास उत्सुक आहे.
तसेच ओपींच्या संगीतात कसकसे बदल घडत जाऊन त्यातून त्यांचे सुप्रसिद्ध नशीले संगीत निर्माण झाले, याचा आढावा त्या त्या गाण्यांची उदाहरणे देऊन करावा, ही विनंती.
पुन्हा एकदा आभार.
16 Jan 2013 - 12:26 pm | आनंद भातखंडे
+१
16 Jan 2013 - 5:35 pm | मूकवाचक
+१
16 Jan 2013 - 12:29 pm | आनंद भातखंडे
त्यांची बरीच गाणी आवडतात. घोड्याच्या टापांच्या नाद, ताल, हर्मोनियमचे तुकडे .... निव्वळ लाजवाब.
16 Jan 2013 - 5:16 pm | दिपक.कुवेत
धन्यवाद बरिच नविन माहिति कळली आपल्यामुळे...पुढिल लेखाच्या प्रती़क्षेत.
16 Jan 2013 - 5:33 pm | प्रचेतस
तपशीलवार लेख आवडला.
पुढच्या भागाची वाट पाहातो आहेच.
16 Jan 2013 - 10:14 pm | मराठी_माणूस
दिलखुश बहारदार लेख
वाद्यांचे उल्लेख विशेषकरुन आवडले
16 Jan 2013 - 10:44 pm | पैसा
ओपी त्यांच्या संगीताप्रमाणेच त्यांच्या कुर्रेबाज वक्तव्यासाठी आणि वागण्यासाठी प्रसिद्ध होते ना! लताला टाळण्यामागे काय कारण होतं? नौशाद बद्दल त्यांची मतं या दंतकथा बनून राहिल्या आहेत.
16 Jan 2013 - 11:14 pm | ५० फक्त
मस्त लिहिलं आहेत, धन्यवाद. तो काळ सोनेरी रंगात रंगण्यासाठी जीवापाड मेहनत करणारे हे कलाकार, त्यांची अशी माहिती मिळणं हे देखील आमच्यासाठी खुप महत्वाचं आहे.
17 Jan 2013 - 2:31 am | शुचि
हाय!!!! काय गाणं आहे.....काय आवाज आहे. हृदयात कळ आली आठवून. आता ऐकते हेडफोन लावून.
17 Jan 2013 - 4:24 pm | अत्रुप्त आत्मा
मेलडी के बादशाह के हम तो दिवाने है........! सलाम,सलाम,सलाम.
17 Jan 2013 - 5:10 pm | चाणक्य
मस्त अभ्यासपूर्ण लेख. लताशी त्यांचं का बिनसलं पण?
17 Jan 2013 - 5:46 pm | तिमा
लेख वाचताना तुमच्या अभ्यासाला दाद द्यावीशी वाटते. त्या जमान्यात, लता शिवाय यशस्वी होणं, हाच एक मोठा चमत्कार आहे.
17 Jan 2013 - 9:23 pm | अन्या दातार
मस्त मूड आला बघा हा लेख वाचताना. तुमच्या अभ्यासाला सलाम! :)
17 Jan 2013 - 10:14 pm | पिंपातला उंदीर
लेख आवडला. झक्कास. एक शंका. ओपी सारख्या जीनियस ला पण संगीटचौर्य का कराव लागल? तुमच्यासारखे माहितगार प्रकाश टाक्टीलच.
18 Jan 2013 - 8:57 am | चौकटराजा
आर डी बाबत एकदा ओपी म्हणाले होते... कलेत थोडी चोराचोरी होतेच... पण आर डी ने ती किती उत्तम केली आहे पहा..
कारण त्यालाही प्रतिभा लागतेच् ! ओपींची चोराचोरी विषयी मीच त्याना हजार एक फॅन्स समोर प्रश्न विचारला होता की
आपल्याला मौसिकीत चोरी करायचा मोह कधी झाला की नाही. त्याला त्यांचे उत्तर होते.' सुन सुन सुन सुन जालिमा॑ चा मुखडा ही मी केलेली एकमेव थेट चोरी. बाकी माझ्याच शैलीची चोरी इतरानी कधी ना कधी केलीय !
21 Jan 2013 - 9:20 pm | मराठी_माणूस
सुन सुन सुन सुन जालिमा॑ चा मुखडा ही मी केलेली एकमेव थेट चोरी.
ही चोरी सुध्दा गुरुदत्तच्या सांगण्यावरुन केली होती
17 Jan 2013 - 11:08 pm | सुनील
सुरेख माहितीपूर्ण लेख.
आयुष्यभर सुमधुर चाली रचणार्या ओपीच्या वैयक्तिक आयुष्याची अखेर काही सुखकारक झाली नाही. कुटुंबापासून फारकत घेत, ठाण्यातील एका कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून त्यांना अखेरची वर्षे काढावी लागली, याचे वाईट वाटते.
18 Jan 2013 - 9:02 am | चौकटराजा
ओपी हे एक हट्टी व्यक्तिमत्व होते. आज संगीतात थोड्या काळात भरपूर पैसा मिळतो व तो योग्य ठिकाणी ( बाई वाटलीच्या नादाला न लागता) गुंतविण्याचा सूज्ञपणा आजची कलाकारांची पिढी दाखवते. त्या काळात तो अवेरनेसच नव्हता.
17 Jan 2013 - 11:15 pm | क्रान्ति
कितीतरी दुर्मिळ गाणी या निमित्ताने पुन्हा आठवली.
18 Jan 2013 - 12:42 pm | लक
Very good article interesting and informative
I read in on of the above notes that you got opportunity to meet O P in person Pl share and continue those good memories
Thanks
18 Jan 2013 - 2:19 pm | चाणक्य
गुड टु सी दॅट यु कॅन रीड मराठी. आय अॅम शुअर यु विल बी एबल टु राईट / टाईप ईट टू. ईट्स व्हेरी ईझी. जस्ट ट्राय ईट.
21 Jan 2013 - 9:37 pm | दत्ता काळे
लेख आवडला.
"बाप रे बाप" मधलं - "पिया, पिया, पिया..मोरा जिया पुकारे, तुम तो बसी हो गोरी मनमें हमारे..." आठवून गेलं.