चित्रपट बघणं हा कधीकधी त्या चित्रपटापेक्षा त्याच्या कथादुनियेत रमवणारा एक अनोखा अनुभव असू शकतो. म्हणजे ज्या इहलोकात तो घडतो, ज्या जगाचे परिमाण त्या चित्रपटाशी आणि त्याच्या पटकथेशी निगडीत असतात तेच कित्येकदा आपणास अत्यंत समाधानकारक अनुभव देऊन जाऊ शकतात.
सायन्स फिक्शनचे काल्पनिक जग हे एका कलाविष्कारापुरताही सीमित असू शकते जसे "वॉर ऑफ द वर्ल्ड"चे जग; म्हणजे आधी कॉमिक्स आणि नंतर स्टिवन स्पीलबर्गने टॉम क्रुसला घेऊन बनवलेल्या चित्रपटात दाखवले गेलेले. पण कल्पना आणि तिचा आविष्कार एकानेक लेखकांना भुरळ पाडू शकतो आणि त्यातून तयार होते एक संयुक्त कल्पनाविश्व, इंग्रजीत म्हणायचेच झाले तर "शेयर्ड फिक्शनल युनिव्हर्स". इंग्रजी साहित्यात अशी काल्पनिक विश्वे बरीच सापडतील आणि त्यांनी हॉलिवूडला भुरळ घातली नसतीलच तर नवल... उदाहरण द्यायचे झाले तर मार्वेल कॉमिक्सची सुपरहिरोंची दुनिया जिला अनेक लेखकांनी आपला हातभार लावला आणि अव्हेंजर्स सारखा महामनोरंजक चित्रपट बनला गेला. कॉमिक्सच्या दुनियेतून बाहेर पडायचच झालं तर जॉर्ज ल्युकासचे स्टार वॉर्सचे अनोखे विश्व हेही ह्या सामाईक कल्पनाविश्वाचं एक उदाहरण देता येईल. कित्येक लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी आपल्या रंजकतेने त्याला समृद्ध बनवले. अर्थातच हॅरी पॉटर किंवा टॉल्किनची मिडल-अर्थ ह्यात समाविष्ट नाही कारण त्यातले जग वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य आहे. अशा दुनिया फॅण्टसी ह्या प्रकारात मोडतात, सायन्सफिक्शन मध्ये नाही.
प्रॉमिथियस ह्या नव्या चित्रपटाने अशाच एका संयुक्तीत आणि काल्पनिक विश्वाचा कवाडा सिनेरसिकांसाठी उघडला आहे. ही आहे दिग्दर्शक रीडली स्कॉटची "एलियन" दुनिया. खरे तर एलियन ही लेखक डॅन-ओ-बॅनन ने लिहिलेली एक अंतराळविभिषीका म्हणजेच विज्ञान आणि अंतराळशास्त्रात गुंफलेली एक भयकथा होय. पण तिच्यात इतर लेखक, दिग्दर्शक, चिकित्सक हातभार लावत गेले आणि एलियन मालिका बनली. ह्यात तीन उत्तरपट (सिक्वेल) आणि दोन पूर्वपट (प्रीक्वेल) आहेत. प्रॉमिथीयस हा ह्याच एलियनपटांचा पूर्वपट म्हणता येईल... एलियन दुनियेचा श्रीगणेशा करणाऱ्या त्याच नावाच्या १९७९ साली प्रदर्शित झालेल्या "एलियन" ह्या चित्रपटा आधी घडणारा.
पूर्वदृश्य: प्रॉमिथीयस - २०१२ (युट्युबच्या सौजन्याने)
नारयण धारपांनी "अनोळखी दिशा" ह्या त्यांच्या भयकथासंग्रहात एक कथा इंग्रजीतून स्वैर अनुवादित केलेली आहे, तिचे शीर्षक आहे, "स्वप्नांचा राजा कुथुलु". कथुलु हा एका पाशवी, राक्षसी संस्कृतीचा राजा. आपल्या स्वप्नात येऊन आपले भय चाखणारा, त्यातल्या असहाय्यतेच्या तत्त्वावर पोसणारा व मग त्याच मनात घर करून बसणारा हा अमर्त्य, अमूर्त घटक. मनोविज्ञानाच्या पलिकडे आपल्या सावजाच्या मनात स्वत:चे नरकालय चालवणारा हा असुर सर्वप्रथम कल्पिला एच. पी. लवरक्राफ्ट ह्या भयकथा लेखकाने. कथुलुचे जग हे फॅण्टसी तर नाही म्हणून ते वैज्ञानिक दृष्ट्या फिक्शन मध्ये मोडले. इथेच कथुलुचे मनोवैज्ञानिक महत्त्व अधोरेखित झाले. मनुष्याच्या बौद्धिक शक्तीला फिकं ठरवणारा हा दानव वाचकांच्या मनात ठसतो तो त्याच्या नरकालयाच्या चित्रवत वर्णनाने. स्वप्नात बघूनच थरकाप उडवणारं हे नरकालय मानवी मनातील अमानवी शक्तींविषयीच्या आदिम भयाला अगदी मानवनिर्मीत शिल्पांसारखं समोर मांडतं. बीभत्स, अतार्किक, भय ढवळून काढणारं हे नरकालय कित्येक वर्षे लवरक्राफ्टच्या कथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात चित्रित होत होतं, पण त्याला चित्रपुस्तकाच्या रूपात प्रथम मांडले ते एका अतिवास्तववादी (सरियलिस्ट) शिल्पचित्रकाराने, त्याचे नाव एच. आर. गाईजर. ह्याने आपलं नेक्रोनॉमिकॉन (शब्दशः नरकालय) हे पुस्तक एलियनचा चित्रपटांचा दिग्दर्शक रीडली स्कॉट ह्याच वाचावयास दिले. एकीकडे डॅन-ओ-बॅननची कपोत्कल्पित परग्रही दुनिया आणि त्याच्याशी तंतोतंत जुळणारे हे अतिवास्तवादी कथुलुचे नरकालय. स्कॉट शहारलाच. त्याने लगेच गाईजर आणि बॅननना एकत्र आणले आणि एलियनची दुनिया वसवली.
तोंडओळ्खः एच. आर. गाईजर ह्यांचे नरकालय: नेक्रोनॉमिकॉन (पुस्तक प्रदर्शित १९७७) (विकीपीडियाच्या सौजन्याने)
एका अंतराळमोहिमेत निघालेल्या सातजणांना एका अनोळखी ग्रहावर जाऊन तिथे त्यांना हव्या असलेल्या खनिजाची पडताळणी करावी लागते पण त्यात त्यांना सापडते अंड्यांनी माजलेले एक नेक्रोमोनिकॉन. अगदी कथुलुच्या नरकालयासारखे. पण त्याहीपेक्षा भयानक आपत्ती त्यांच्यावर कोसळते जेव्हा त्यांच्यावर हल्ला होतो एका मानवसदृश एलियनचा. हा एलियन आधी एकाची छाती फोडून बाहेर पडतो आणि मग त्यांच्या महाअवकाशयानाच्या अंधाऱ्या गल्ल्यांत लपून छपून वावरतो आणि एकेकाचा घास घेऊन वाढतो. शेवटी चित्रपटातील मुख्य पात्र असलेल्या सिगर्नी विव्हर हिच्याशी भिडतो. पण ती त्याच एलियनचा नायनाट करून त्या यानातून पळ काढते.
पूर्वदृश्य: एलियन - १९७९ (युट्युबच्या सौजन्याने)
ही झाली एलियनचा कहाणी. त्यानंतर आलेले एलियनचे उत्तरपट ह्या एलियन्सचे संख्याबळ वाढवून मानवजातीच्या अस्तित्वासाठी हेच एलियन सर्वात मोठे संकट असल्याचे दाखवून देतात. हेही रिडली स्कॉटच्या मनाप्रमाणे योजले असल्याचे म्हटले जाते. पहिल्या चित्रपटानंतर स्कॉटला एक अतिहिंस्र आणि मनुष्यजातीचा कर्दनकाळ ठरणारी जमात बनवायची होती आणि ह्या एलियनने ती इच्छा पूर्ण केली असे स्कॉट म्हणतो. पण कुठेतरी मनुष्यजातीला नष्ट करणारा एलियन (छाती फोडून बाहेर पडणाऱ्या त्या पहिल्या) मनुष्यानेच निर्मिला होता. इथेच स्कॉटला एलियनच्या निर्मिकाचे कालचक्र पूर्ण करणारा प्रॉमिथीयस सुचला..
... ग्रीक पुराणात मानवाची उत्क्रांती घडवणारा एक देव सापडतो. त्याचेच नाव प्रॉमिथीयस. मातीपासून बनवलेला मानव स्वकष्टाने स्वत:चा उत्कर्ष कसा गाठू शकेल ह्या विवंचनेत असलेल्या प्रॉमिथीयसने दैवलोकातून पवित्र अग्नि चोरून आणून मानवाला बहाल केला. त्याचबरोबर चाकाचे महत्त्व मानवाला समजावले. अग्नि आणि चाक मानवाला मिळाले आणि जणू मानवला दैवत्त्वच बहाल झाले. त्याजोरावर मानवाने अशी भरारी घेतली की स्वर्गात खळबळच माजली. देवतांचे अध:पतन करण्यापर्यंत प्रॉमिथीयस येऊन ठेपला आहे आणि त्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी हे ग्रीकांची इंद्रदेवता असलेल्या झ्युसने ठरवले आणि प्रॉमिथीयसला अश्वत्थाम्यासारख्या युगोन्युगे वेदना सहन कराव्या लागतील अशा प्रकारचा त्याला श्राप देण्यात आला. झ्युसचे वाहन असलेला गरूडाने प्रॉमिथीयसच्या यकृताचे लचके तोडावेत आणि दुसऱ्या दिवशी ते यकृत पूर्ववत होऊन पुन्हा त्या गरूडाला खायला मिळावे अशी ही नरकयातना तीन तप झेलणारा तो प्रॉमिथीयस. शेवटी झ्युसशी वाकड्यात गेलेला आणि डेमीगॉड असलेला हर्क्युलीस (कर्ण आठवावा) प्रॉमिथीयसला वाचवतो. पण "ज्या मनुष्याला तुम्ही दोघे प्रेम करता तोच देवांचा नाश करणार आहे त्यामुळे त्याआधीच समस्त मनुष्यजातीला मी नष्ट करेन ..." असा गर्भित इशारा देऊन भूमिगत होणारा झ्युसच खरं तर ह्या प्रॉमिथीयस विज्ञानकथेचा गाभा आहे.
तोंडओळ्खः ग्रीक देवता प्रॉमिथीयस (विकीपीडियाच्या सौजन्याने)
स्कॉटच्या प्रॉमिथीयसची सुरूवात होते ती मनुष्याच्या निर्मिकाकडून. पण त्या निर्मिकाला पाहून आपल्याला धक्का बसतो. हा असतो तोच एलियनसदृश प्राणी. काहीतरी विषारी द्रव्य प्राशन करून तो पृथ्वीच्या पाण्यात अंतर्धान पावतो आणि त्याच्या रोमारोमात भरलेल्या डीएनएने पृथ्वीची कूस उजवली जाते. पृथ्वीवर उगवते ती जीवसृष्टीची पहाट जी थेट उत्क्रांतीच्या परमोच्च बिंदूपर्यंत म्हणजेच मानवापर्यंत येऊन पोहोचते.
पण मानवाला आपल्या त्याच निर्मिकाला शोधायचे असते. म्हणून तो शोधयात्रेवर अंतराळात निघतो आणि येऊन पोचतो एका ग्रहकावर. हा तोच ग्रह असतो ... एलियनचा ... पण इथे असते फक्त त्या निर्मिकाची समाधी... मानवाकाराने शिल्पीलेली. मानवाच्या निर्मितीस हातभार लावलेले ते विषारी द्रव्यही इथे नळ्यांमध्ये भरलेले असते. त्या द्रव्याबद्दल कुतुहल असलेला एक मानवरूपातला यंत्रमानव, डेव्हिड, हेच द्रव्य यानातील एका सह्काऱ्याला टोचतो. त्या सहकाऱ्याची प्रेयसी त्याच्यापासून गर्भवती राहते आणि त्यातून निर्माण होते एलियनची आदिम आवृत्ती. पण ह्या अनैसर्गिक प्रजननाने तो निर्मिक जागृत होतो आणि झालेल्या प्रयोगाबाबत नापसंती दाखवत डेविडची हत्या करतो. पण निर्मिकाचा रुद्रावतार पाहून त्याला शांत करण्यासाठी त्या सहकाऱ्याची प्रेयसी तिच्या उदरातून जन्मलेल्या ह्या आदिम प्राण्याला निर्मिकाकडे सोडते. पण तो प्राणी निर्मिकालाच बाधित करतो. त्या निर्मिकाच्याच छातीस फाडून निर्मिकापेक्षाही श्रेष्ठ ठरणारा पहिला पूर्णरूपातला एलियन जन्म पावतो.
कथा फारशी ग्रेट नसली तरी स्कॉटचे दिग्दर्शन नक्कीच ह्या आधीच्या एलियन पटांपेक्षा प्रॉमिथीयस मध्ये उजवे ठरले आहे. थ्रीडी मध्ये चित्रित झालेला हा तन्त्रज्ञानाचा आविष्कार यापूर्वी “अवतार” ह्या चित्रपटातही दिसला होता त्यामुळे दृकश्राव्य पातळीवर चित्रपटाचा अनुभव काही खूप नाविन्याचा असा नाही. तसा मी ह्या चित्रपटाला पाचापैकी दोन चांदण्या देईन. पण चित्रपटातली कथावस्तू आणि त्यातले संदर्भ नक्कीच स्वागतार्ह आहेत उदा. निर्मिकाची शक्यता (सायन्टॉलॉजी), मानव व परग्रहावरील जीवन हे डीएनए सारख्या अतिसूक्ष्म धाग्यांनी बांधले गेले आहे ही त्यांच्यातली समानता, मानवाचा नायनाट करायला उद्युक्त उत्क्रांतीशील एलियन्स निर्मिकातून, मानवाकडे आणि मानवातून निघून निर्मिकाकडे कसे पोचले ह्याचं वर्तुळ, चिकित्सक यंत्रमानव त्याच्या निर्मिकाकडे (मानवाकडे) प्रयोगवस्तू म्हणून कसा बघू शकतो हे दाखवणारा डेव्हिड, मानवाकार हा कसा संपूर्ण आहे ह्याचे नॅक्रीमॉनिकनमध्ये दिसणारं शिल्प आणि गूढ आणि अतार्किकता सोडवण्याचा मानवाचा वैज्ञानिक ध्यास ...
संदर्भ अनेक लागू शकतात, पैलू अनेक पडू शकतात. काहीजणांसाठी हा तद्दन एक पॉपकॉन हॉरर ठरू शकतो तर काहींसाठी एक सायन्स ऑपेरा. शेवटी धारपांना थेट रीडली स्कॉटशी जोडणाऱ्या ह्या एलियनच्या दुनियेचं सार साहित्याचं, विज्ञानाचं, भयाचं आणि दैवत्व लाभलेल्या मानवाच्या मानसिकतेचं आहे....
एका सरमिसळलेल्या वैश्विक भेळीसारखं...
मला वाटतं मिपाकरांनी खाऊनच पाहावी ही भेळ.
प्रतिक्रिया
13 Jun 2012 - 4:25 pm | मुक्त विहारि
खानावळीचे सिनेमे बघण्यापेक्षा , हे हॉलीवूडचे सिनेमे नेहमीच चांगले.
लेकिन आपून बघेका तो फोकटमेच.अपने पास टाईम बहुत है.टोरंट में आने दो.फिर बघेंगा.
13 Jun 2012 - 4:49 pm | जोयबोय
+१
13 Jun 2012 - 4:54 pm | मुक्त विहारि
अ) हॉलीवूड साठी
की
ब) फूकटे पणा साठी?
13 Jun 2012 - 5:39 pm | प्रचेतस
एलियनपटांचा अतिशय सुरेख परामर्श घेतलास विनीत.
प्रोमिथीयस पाहणार आहेच.
13 Jun 2012 - 6:01 pm | विनीत संखे
धन्यवाद वल्लीसाहेब.
13 Jun 2012 - 7:16 pm | इष्टुर फाकडा
नक्कीच बघितला जाईल आता :)
13 Jun 2012 - 7:58 pm | बिपिन कार्यकर्ते
सुरेख!
13 Jun 2012 - 10:13 pm | निनाद मुक्काम प...
सिनेमाचे अंतरंग अगदी संधर्भासाहित स्पष्टीकरण केले आहे.
हॉलीवूड ला बायबल किंवा त्यांच्या पुराणातील कथेचा संधर्भ द्यायची जुनी सवय आहे.
कथुलुचे ची कथा मस्त जमली होती.
त्याने शेवटी बोटीचा केलेला पाठलाग थरारक होता.
सामन्य माणूस कुठे विदेशी साहित्य अगदी शोधून वाचणार. धारपांनी मायमराठीत
मराठी वाचकांची सोय केली.
14 Jun 2012 - 11:46 am | विनीत संखे
लवरक्राफ्टच्या अनेक कथा धारपांनी अनुवादित केल्यात ... त्याचबरोबर पुण्यात जन्मलेले (सध्या अमेरीकेत राहणारे) एस. टी. जोशी पाश्चिमात्य साहित्यवर्तुळात लवक्राफ्टच्या फिक्शनचे खंदे जाणकार मानले जातात.
मराठी माणसाने ह्या ना त्या प्रकारे लवरक्राफ्टच्या कथा आपल्या साहित्यातून वाचल्यात.
14 Jun 2012 - 7:47 am | कौशी
नक्की बघणार,
अवांतर-खुप दिवसांनी मिपावर लिहीलय.
14 Jun 2012 - 11:25 am | विनीत संखे
खरं तर खूप दिवसांनीच (मिपावरच नाही पण प्रत्यक्षात) लिहिलंय.
14 Jun 2012 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार
ओळख आवडली संखे साहेब.
कुथुलुची बरीचशी कथा धारपांनी दैनंदिनीच्या माध्यमातून उलगडताना दाखवली आहे, त्यामुळे ती एक वेगळीच पकड घेते.
लवरक्राफ्ट व त्याच्या कथां विषयी तुमच्याकडून अजून वाचायला आवडेल. तसेच शक्य झाल्यास प्रेडिटर्सची देखील अशीच सुंदर ओळख करून द्याच.
Necronomicon: Book of Dead ची ह्या लेखाने आठवण ताजी झाली.
14 Jun 2012 - 1:44 pm | विनीत संखे
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की प्रिडेटर्स सुद्धा ह्याच सामाईक एलियनविश्वाचा एक भाग झालेत...
(सौजन्य विकीपिडिया http://en.wikipedia.org/wiki/Predator_%28alien%29 )
15 Jun 2012 - 1:50 am | आनंदी गोपाळ
ही असली फाटकी तोंडे 'ब्लेड' नामक व्हँपायर पटांतूनही दिसतात.