नमस्कार,
या वर्षी पाडव्याला माझ्या गावाजवळील 'वारी हनुमान' या धार्मीक ठिकाणाला भेट द्यायचा योग आला. तसे या ठिकाणाची खूप ओढ लहानपणापासूनच आहे. शाळेला असताना सायकलने वारीला जाण्यात काही वेगळीच मौज होती. गावाच्या १५ किमी दूर गेलं की पहाडातून येणार्या ओढ्यांनी रस्त्याला चढ उतार दिलेले आहेत. ते सायकलने पैज लाऊन चढून जाणे आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊन तो खोलगट भाग न्याहाळणे अशी मजा करायचो. नंतर याच वारी हनुमान येथे वान नदीवर धरण बांधण्यात आले. यामुळे धरणाच्या कालव्याशेजारी एक कच्चा रस्ता तयार झाला. हा वारीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. धुळ उडवत या रस्त्याने जायचे आणि समोरच्या डोंगरावर नजर खिळवायची म्हणजे डोंगर आपल्या अंगावर येत असल्याचा भास होतो. :)
आसपासच्या तीन चार तालुक्याच्या श्रध्देचा हा ठेवा वारी हनुमान येथे आहे. येथे हनुमानाची मोठी मुर्ती आहे. तसेच एक छोटा मठ आहे. पुर्वी हा भाग खुप दुर्गम होता. आता मात्र धरणाच्या बांधकामामुळे सर्वत्र रस्ते झाले आहेत.
हे वारीच्या हनुमानाचे मंदिर
हे वारीच्या हनुमानाचे मंदिर
हे प्रवेशद्वार
मंदिरातील मुर्तीचा फोटो घेण्याची परवाणगी नाही मात्र नारळ फोडण्यासाठी असलेल्या जागेवर एक छोटी मुर्ती आहे तिचा फोटो घेतला आहे.
विदर्भात भंडारा नावाचा प्रकार खुप होतो. भंडारा म्हणजे सर्वांनी एकत्रीत येऊन जेवन बनवायचं आणि पंगतीने जेवायचं. भंडारा करायला कुठलेही कारण पुरेसे असते. नवीन वर्ष आहे, नवीन धान्य घरात आले, हनुमान जयंती, गणपती असे कुठलेही कारण चालते. :) तर अश्या प्रकारचा वारीचा भंडारा हा प्रकार सुध्दा प्रसिध्द आहे. वारीला भंडारा म्हटलं म्हणजे रोडगे किंवा बाट्या (दाल बाट्या) हा प्रकार येथील खास आहे. वारीला रोडगे हे रानगोवर्यांच्या विस्तवात आत शिरवून खरपूस भाजून घेतात. अश्या रोडग्यांसोबत वांग्याची भाजी आणि तुरीच्या डाळीचे घट्ट वरण... अहाहा काय बेत होतो... काय सांगू? :)
तर पाडव्याला वारीला गेलो असता काही भंडार्यांची तयारी सुरू होती. त्यामुळे या खास वर्हाडी रोडग्यांचे काही फोटो घेतले. ते खाली देत आहे.
ह्या आहेत रान गोवर्या, या पेटवून मग याचा विस्तव तयार करणार.
ह्या आहेत रान गोवर्या, या पेटवून मग याचा विस्तव तयार करणार.
कनिक चांगली तिंबून झाली की मग त्याच्या गोल जाड चपात्या व त्यात आणि छोट्या चपात्या असे छान तेलात बुडवून थर देणार. हे म्हणजे कणकेच्या आत कणकेचे सारण भरल्यासारखे वाटते. ( पा.कृ. तज्ञ अधीक माहिती देतील :) )
असे रोडगे टाकण्यासाठी गोवर्या पेटवल्यावर त्या धाडधाड पेटता कामा नये तर त्यांचा विस्तव व्हायला हवा. या कामात खूप धूर होतो.( वर्हाडीत याला धुपट असे म्हणतात.)
आता तयार झालेल्या विस्तवात हे रोडगे आत शिरवतात. नवीन मानसाने हे केलं की हात पोळलेच म्हणून समजा.
रानटी विस्तवात तयार होणारे रोडगे.
तयार रोडगे काढून असे पोत्यावर ठेवतात. त्यानंतर आवश्यकता असल्यास पोत्यावर रगडून त्यावरील राख काढल्या जाते.
रोडग्यांसोबत वांग्याची भाजी आणि तुरीचे वरण (डाळ) तयार होतेय.
विस्तवातील रोडग्यासारखाच येथील बाटी हा प्रकार सुध्दा प्रसिध्द आहे. यात सुध्दा रोडगा बनवल्या जातो मात्र हा विस्तवात भाजण्याऐवजी डाळीत उकळून घेतला जातो व मग तो खरपूस तळून लालसर झाल्यावर वाढल्या जातो. दाल बाटी हा अत्यंत चविष्ट प्रकार आहे.
बाटी बनवण्याची तयारी चालली आहे.
उकळलेली बाटी
शेवटी तयार झालेली बाटी.
रोडगे किंवा बाटी सोबत वांग्याची भाजीच हवी. :)
जेवण तयार होई पर्यंत फुटाणे आणि रेवड्या खा. वारीला एक अखंड पाण्याचा स्त्रोत असलेला झरा आहे. या गडबडीत त्या गोमुखाचा फोटो घ्यायचा राहूनच गेला.
मंदिराच्या बाजूलाच 'हनुमान सागर' नावाच्या धरणाची भींत दिसते. छोटं धरण आहे मात्र त्यामुळे शेजारच्या चार पाच तालुक्यांची शेती बहरली आहे आणि अकोल्यापर्यंत पिण्यासाठी पाणी नेता येते.
अधीक चौकस लोकांसाठी रोडगा बनवण्याची पध्दत व्हिडीयो तुनळीवर चढवला आहे.
अशी ही काही तासांची भेट तुम्हाला कशी वाटली ते कळवा. आणि हो, येत्या २३ तारखेला पुन्हा वारीला भंडारा आहे. येताय ना मग?
- नीलकांत
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 1:33 pm | पियुशा
मस्त हो :)
12 Apr 2011 - 1:34 pm | मृत्युन्जय
मस्त लिहिले आहे रे नीलकांता. मिपावर सगळे जुणेजाणते एकाएकी लिहिते झाले हे बघुन बरे वाटले.
माहिती आणि रोडगे दोन्ही उत्तम. वारीला जायची इच्छा झाली एकदम
12 Apr 2011 - 10:21 pm | प्रीत-मोहर
सहमत!!!
12 Apr 2011 - 1:35 pm | यशोधरा
लईच भारी! मस्त! :)
12 Apr 2011 - 1:36 pm | sneharani
वारीची माहिती मस्त!
रोडगे हा एक नवीनच प्रकार कळाला!!
12 Apr 2011 - 1:39 pm | रामदास
अभिनंदन .वेळात वेळ काढून हा सुंदर वृतांत लिहीण्यासाठी.डॉक्युमेंटरीच्या जवळ जाणारा लेख.
भंडारा म्हणजे सर्वांनी एकत्रीत येऊन जेवन बनवायचं आणि पंगतीने जेवायचं. भंडारा करायला कुठलेही कारण पुरेसे असते. नवीन वर्ष आहे, नवीन धान्य घरात आले, हनुमान जयंती, गणपती असे कुठलेही कारण चालते.
वारीला जाऊन आलेल्यांनी मुक्कामी पोचल्यावर भंडारा केलाच पाहीजे असेही आहे .कधी करू या भंडारा ?
(खरपूस भाजलेला रोडगा ) रामदास
12 Apr 2011 - 1:40 pm | प्रचेतस
'भवानी आई रोडगा वाहीन तुला' हे गीत कैकवेळा ऐकले होते पण रोडगा म्हणजे काय तेच नेमके माहित नव्हते. ते आज समजले.
अजूनही गावाकडच्या गोष्टी येउ द्यात.
12 Apr 2011 - 1:57 pm | चावटमेला
अगदी, अगदी, हे गाणं बर्याचदा ऐकलं, पण त्यातला रोडगा आज समजला.
12 Apr 2011 - 1:42 pm | मराठमोळा
वा मस्तच..
खान्देशातही काही देवींच्या यात्रेला बट्टी (बाटी) आणि वांग्याची भाजी बनवतात.. काय छान चव लागते वाह..
बट्टी ही तळून, शिजवून किंवा भाजुन बनवतात.. भाजलेली बट्टी चवीला छान असते.
कोणत्या गावतले आहे हे मंदीर कळाले तर छानच!!
12 Apr 2011 - 4:36 pm | सुहास..
आणि वांग्याची भाजी बनवतात.. काय छान चव लागते वाह.. >>>
शाक म्हणतात त्याला !
असो ...छान लेखन (पेन सापडल वाटत ;) )
12 Apr 2011 - 1:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वृत्तांत आणि रोडगे लै भारी.
-दिलीप बिरुटे
12 Apr 2011 - 1:50 pm | गणपा
मालकही लिहिते झाले. :)
धन्स रे कांता. वारीला जाण्याचं पुण्य जेव्हा लाभेल तेव्हा पण सध्या तुझ्या या धाग्यातुनच दर्शन घेतलं रे बाबा.
बाकी इतर फोटु पाहुन आयुष्यात काय काय मिसतोय यात भरच पडली. :(
12 Apr 2011 - 2:23 pm | कुंदन
असेच म्हणतो.
(वांगे प्रेमी) कुंदन
12 Apr 2011 - 2:00 pm | मुलूखावेगळी
मस्तच सगळे फोतु अनि माहिती
हो ऐकले होते ह्याबद्दल, तुमच्यामुळे आज माहिती पण कळाली .
ही विदर्भातली दाल-बाटी खाल्लीये वान्ग्याच्या भाजीसोबत छान लागते.
मी पुन्यातल्या १ विदर्भीय मेस मधे खाल्लीये. :०
तुमचे मी वाचलेले घोषना,कारवाइ वगेरे सोडुन १लेच लेखन.
असेच लिहित रहा
12 Apr 2011 - 10:39 pm | प्रशांत
भंडार्यातील वांग्याची भाजी आणि पुण्यातिल मेस वरिल भाजीची तुलना करू नका प्लिज..
12 Apr 2011 - 11:30 pm | धमाल मुलगा
तुमचं रोडगे+वांग्याची भाजीचं आमंत्रण आणखी किती दिवस पेंडींग ठेवणार आहात सायेब? ;)
मिष्टर नीलकांत,
बढिया! बजरंगबलीचं दर्शन आणि भंडारा....दोन्ही पावलं द्येवा. :)
13 Apr 2011 - 10:51 am | मुलूखावेगळी
ती तुलन नव्हती.
मी फक्त सांगितले
12 Apr 2011 - 2:05 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त रे !
अतिशय सुंदर आणि समयोचीत लेख.
12 Apr 2011 - 2:05 pm | दीविरा
छान माहिती :)
मला रोडगा माहित नव्हता आता प्रथमच कळला
12 Apr 2011 - 2:10 pm | स्मिता.
वरण-बट्टी आणि वांग्याची भाजी हा मेनु जळगावकडेही फार लोकप्रिय आहे. बर्याच पंगतींच्या वेळी हेच जेवण असते. पूर्वी लग्नात सुद्धा उकळून तळलेली बट्टी, वरण, वांग्याची भाजी, कढी असा बेत असायचा. कित्तीतरी वर्षं झालीत असे जेवण जेऊन... हे घरी केले तरी पंगतीतली मजा औरच!
13 Apr 2011 - 2:40 am | निनाद मुक्काम प...
स्मिता जी
आम्ही मुळचे खानदेशातले (आज्जी जळगाव )
तर आईचे आई, वडील दोघेही विदर्भ अकोला
तेव्हा आजही ह्या दोन्ही ठिकाणी गेलो तरी आपण उल्लेख केलेले पदार्थ नेहमीच खायला मिळतात .
दोन्ही आज्या अनुक्रमे मुंबई ,डोंबिवली मध्ये असल्याने बालपणी मला नेहमीच हे पदार्थ खायला मिळाले आहेत .( खानदेशी पद्धतीत तिखटा जास्त असते तर पांढरी वांगी जबरा लागतात .)
12 Apr 2011 - 2:15 pm | सुधीर१३७
मस्तच रे भाऊ........................ :)
12 Apr 2011 - 2:18 pm | गवि
तातडीने खाऊन पहायची इच्छा झाली. पण असे रोडगे मुंबईत मिळण्याची सुतराम शक्यता नाही आणि तशी भाजी / डाळही इथे बनेलसे वाटत नाही. त्या त्या वातावरणाचाही फ्लेवर पदार्थात असतो. नुसते हे सर्व साहित्य घेऊन किचनमधे / हॉटेलात बनवले तरी तो वास, स्वाद, चव येणार नाही.
धागा फार छान. खूपच आवडला..
12 Apr 2011 - 2:57 pm | चिंतामणी
+ १
फक्त मुंबईचे जागी पुणे एव्हढाच बदल.
12 Apr 2011 - 4:36 pm | अन्या दातार
मुंबई, पुणे याजागी कोल्हापूर (शहर), खडगपूर, हैद्राबाद इतकेच बदल!
12 Apr 2011 - 6:38 pm | सखी
महाराष्ट्रात असते तर नक्कीच प्रयत्न केला असता. लेख आणि फोटो छान.
12 Apr 2011 - 2:27 pm | प्यारे१
छान माहिती, वर्णन आणि फोटो....!!!
12 Apr 2011 - 3:00 pm | स्पा
अहाहा
खमंग
12 Apr 2011 - 3:29 pm | llपुण्याचे पेशवेll
आहाहा. रोडगा किती वर्षात खाल्ला नाही. रोडगे जर अगदी आतपर्यंत खरपूस भाजले गेले असतील तर लई लई लई भारी लागतात खायला. आमच्या गावाला पोळ्याला बैलांना तुपात भिजवलेले रोडगे खासकरून खायला घालतात. मस्तं लागतात ते फार. डालबाटी हा पदार्थ स्पेषल मारवाडी खासियत. अर्थात मराठवाड्यातली डालबाटी देखील नक्कीच छान लागत असणार मी खाल्ली नाही कधी. आणि डाळही तिखट बनवत असणार. मारवाडी डाळ तशी फार तिखट नसते. :(
धन्यवाद नीलकांत भौ कधीतरी आम्हालापण घेऊन चला भंडार्याला.
12 Apr 2011 - 4:04 pm | स्वाती दिनेश
नील, बर्याच काळानी लिहिलेस, खूप छान वर्णन!
स्वाती
12 Apr 2011 - 4:17 pm | सहज
सुंदर वृत्तांत.
डालबाटी, फुटाणे, रेवड्या पाहून अंमळ जळजळ झाली.
12 Apr 2011 - 6:54 pm | प्रभो
हेच म्हणतो.
12 Apr 2011 - 4:22 pm | प्रास
राम राम मालक,
तुमचे सदर लेखन बघून खासच आनंद झाला. देवदर्शनाबरोबरच जनदेवाच्या तृप्तीचा स्थानिक मार्ग बघून तर अधिक आनंद झाला. रोडगे हा प्रकार मुंबईमध्ये खायला मिळणे कठीण पण काही ठिकाणी अवचित दाल-बाटी खाण्याचा आनंद जरूर घेतलेला आहे. ही ठिकाणं तशी संख्येने कमीच असल्याने लक्षात ठेवायला कठीण नाहीत. (गवि, इस पॉईंट्को नोट किया जाय। ;-)) रोडग्याची पाकृ यथोचित प्रकारे दिल्यामुळे आभारी आहे.
फोटो आणि वृत्तांत एकदम मस्त....
हनुमान जयंतीला वारीला भंडार्याचा प्रोग्राम असल्यास त्या वज्रांगाला आमचा दण्डवत सांगावा.....
पवनसुत हनुमानकी जय! जय श्रीराम!
12 Apr 2011 - 4:29 pm | गवि
दाल-बाटी खाण्याचा आनंद जरूर घेतलेला आहे. ही ठिकाणं तशी संख्येने कमीच असल्याने लक्षात ठेवायला कठीण नाहीत. (गवि, इस पॉईंट्को नोट किया जाय। )
नोंद घेतली आहे. पण ठिकाणे तर सांगा..
12 Apr 2011 - 6:05 pm | मृत्युन्जय
सम्राट - फोर्ट
चेतना - कालाघोडा
12 Apr 2011 - 11:03 pm | प्रास
दादर पश्चिमेला एक गुजराती-राजस्थानी खानावळ आहे..... तिथे महिन्यातून ४-५ वेळेला दाल-बाटी असतेच....
12 Apr 2011 - 4:26 pm | मनराव
लै म्हन्जे लै भारी...........
12 Apr 2011 - 4:26 pm | श्रावण मोडक
थोडं खान्देशातलं वास्तव्य आठवून गेलं. :)
12 Apr 2011 - 5:57 pm | ५० फक्त
छान लेखन अन माहिति , रोडगा म्हणजे काय ते पहिल्यांदाच कळाले. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं या बद्दल.
कधी त्या बाजुला गेलो तर जरुर जाउन येईन.
12 Apr 2011 - 6:02 pm | चित्रा
खूप आवडला, हा वृत्तांत. रोडगे भाजत असतानाचा फोटो लहानपणच्या अशाच उद्योगी सकाळींची आठवण देऊन गेला. (ते ऊन काय मस्त पडलंय).
रोडगा या उन्हाळ्यात नक्की करून बघणार.
हे रोडगे लहानपणी कुठेतरी बघितल्यासारखे वाटतात.
डाळबाटीही मस्त.
(आख्ख्या कांद्यांनाही असेच भाजतात. असा भाजलेला कांदा मसूराच्या आमटीला फार छान चव आणतो).
12 Apr 2011 - 7:29 pm | चिगो
अश्या रोडग्यांसोबत वांग्याची भाजी आणि तुरीच्या डाळीचे घट्ट वरण... अहाहा काय बेत होतो... काय सांगू?
कुठं फेडाल ही पापं? अहो, किती शारीरीक (लाळीचा पुर) आणि मानसिक (घरची आठवण) त्रास द्याल राव? रोडगे/पानगे, तुरीचे घट्ट वरण आणि सोबत वांग्याची भाजी हा आमचा जीव का प्राण आहे. आमच्याकडे हनुमान-जयंतीच्या आदल्या संध्याकाळी हा बेत असतो, त्याची आठवण झाली आणि मनाने गावाकडे धाव घेतली... आता आसामात बसुन लाळेचे आवंधे गिळण्याशिवाय हातात काहीच नाही...
मी संमं ना नाव सांगीन हां तुमचं , मालक !
मस्त लेख.. खुप आवड्या...
12 Apr 2011 - 11:34 pm | धमाल मुलगा
वैनी हैत न्हवं?
करा की च्यायला आसामात भंडारा. :)
2 Aug 2016 - 9:23 pm | कैलासवासी सोन्याबापु
चिगो, नीलकांतभाऊ, भंडाऱ्यात बुंदी किंवा बेसनवडी एकवार नसेन तर चालून जाईन! पर हनुमान जयंतीच्या भंडाऱ्यात मेथी दाणे घातलेली, कैरीची लुंजी पायजेच पायजे!! पोट फुटेलग तट जेवण झाल्या नंतर शेवटी लुंजी चाटून पत्तरवाळीचा चोळामोळा करायची मजाच भारी!
2 Aug 2016 - 9:38 pm | संदीप डांगे
च्यामायची कटकट, काहाले लुंजीची आटोन देता बे! लुंजीच्या पंगतीले बसलो का बाकी पात्तरावळीत काय हाये मालूम ना राये,
2 Aug 2016 - 9:42 pm | कैलासवासी सोन्याबापु
खिक =)) =)) , मला माहिती होते एखाद बिलाट पोट्टे कयवयतेच म्हणून!
2 Aug 2016 - 9:58 pm | संदीप डांगे
एवढा त्रास देताय तर आता लुंजीची पाकृ धुंडा अन टाका ... जमाना झाला राजेहो लुंजीची चव घेऊन
3 Aug 2016 - 2:09 pm | अभ्या..
ये लुंजी लुंजी क्या है, ये लुंजी लुंजी?
मुंजीत करायचे पक्वान्न आहे का? मुंजीतली लुंजी.....हीहीहीही
3 Aug 2016 - 1:35 pm | स्मिता चौगुले
http://www.tarladalal.com/Aam-ki-Launji-3901r
http://anjali-cooklog.blogspot.de/2011/06/aam-ki-chutney-lunji-galka-raw...
असेल तर आमच्या इकडे याला कैरीचे झटपट लोणचे म्हणतो आम्ही
3 Aug 2016 - 1:52 pm | पद्मावति
वाह, मस्तं स्मिता.
आम्ही यालाच मेथाम्बा म्हणतो. फोडणी करतांना मेथी दाणे टाकतात.
3 Aug 2016 - 2:14 pm | महासंग्राम
बाप्पू गावची याद आली मले, गावाकडं हनुमान जयंतीच्या भंडारा असे तेव्हा मंदिरावर म्हणून रोडगे, वांग्याची रस्सा भाजी, वरण आणि गावरान तूप असायचं. त्या टायमाले बम्म खायचो रोडगे. आता हनुमान जयंती ले जाण होत नाही राजेहो गावाले. या सायच्या कामानं सगळी जिनगानी बर्बाद करून टाकली.
आता तेवढे उत्साहानं करायला पोट्टे बी नाही रायले गावाकडे गेले ते भंडारे गेली हनुमान जैंती
12 Apr 2011 - 7:33 pm | पैसा
फोटो, वृत्तांत, रोडगे सगळंच लै भारी! कोणीतरी हे रोडगे घरी गॅसवर कसे करायचे सांगा रे!
3 Aug 2016 - 2:15 pm | महासंग्राम
हे सूरज गॅस करता येत त्याला फक्त चूलच पाहिजे.
12 Apr 2011 - 7:40 pm | पक्का इडियट
मस्त ! मस्त !! मस्त !!!
12 Apr 2011 - 7:58 pm | रेवती
छान वृत्तांत आणि रोडग्याची चित्रफितही!
दालबाटी हा पदार्थ फक्त इंदोरी आहे असे आधी वाटत होते पण थोड्याफार फरकाने हा प्रकार अनेकजणांकडे केला जातो असे दिसते.
12 Apr 2011 - 10:02 pm | विकास
वृत्तांत आवडला!
बाकी अशा ठिकाणी असलो की बाहेरच्या जगाला चांगल्या अर्थाने विसरायला होतं. तसच तुमचे देखील झाले असेल अशी आशा करतो! :-)
12 Apr 2011 - 10:15 pm | इरसाल
छान नीलकांत.
तुमचा लेख आणि दिलेले फोटो पाहून जळगाव/भुसावळ कडच्या लग्नांची आठवण झाली.तसेच कॉलेज चे दिवस आठवले.
(जळगाव/भुसावळात दाबून डाळ बाटी आणि घोटलेल्या वांग्यांची भाजी खालेल्ला.) इरसाल
12 Apr 2011 - 10:35 pm | आळश्यांचा राजा
दाल बाटी हा राजस्थानी/ मारवाडी पदार्थ खान्देश-विदर्भातही केला जातो हे माहीत नव्हते. रोडग्याची रेसीपी पहिल्यांदाच पाहिली. इंटरेस्टिंग आहे.
13 Apr 2011 - 12:25 am | रेवती
खूप वर्षांपूर्वी एक गाणं ऐकलं होतं त्यात "भवानीआई रोडगा वाहीन तुला" असे काहीसे शब्द होते.
13 Apr 2011 - 4:08 am | धनंजय
"भवानीआई रोडगा वाहीन तुला" हे एका भारुडाचे पालुपद आहे. भारूड बहुधा एकनाथाचे आहे. सासरच्या वेगवेगळ्या नातलगांचे वाईट चिंतणारी सर्व कडवी आहेत. मला आठवणारे कडवे :
नणदेचे कारटे
किरकिर करते
खरूज होउदे त्याला!
भवानीआई रोडगा वाहीन तुला
13 Apr 2011 - 6:20 am | रेवती
अरे देवा! हे असं होतं ते आठवत नव्हतं.
12 Apr 2011 - 10:35 pm | धनंजय
पाकसिद्धीचे सचित्र वर्णन मस्तच आहे.
12 Apr 2011 - 10:57 pm | पुष्करिणी
अरे वा, मस्तच! खंडोबाचा प्रसाद म्हणून रोडग्याबद्द्ल ऐकलं होतं पण कृती आत्ताच कळतेय.
हे मंदीर कोणत्या गावात आहे?
12 Apr 2011 - 11:01 pm | प्राजु
वा वा वा!! भाग खुल गये! मिपा मालक लिहिते झाले.. वारी फळाली आहे. देव पावला. :)
माहिती मस्त. व्हिडीओ सुद्धा सुरेख.
रोडगा.. पहिल्यांदाच ऐकला त्याबद्दल.
12 Apr 2011 - 11:06 pm | प्राजक्ता पवार
विदर्भातील चांगापुर या ठिकाणीही असा भंडारा होतो. तिथे रोडगे , दाल - बाटी , वांग्याची भाजी यांचा आस्वाद एकदा घेतला आहे. या लेखाच्या निमित्ताने आठवण झाली.
फोटो व वृत्तांत दोन्ही छान .
12 Apr 2011 - 11:49 pm | प्रशांत
मस्त लिहिलं रे...
>>कालव्याशेजारी एक कच्चा रस्ता तयार झाला. हा वारीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. धुळ उडवत या रस्त्याने जायचे आणि समोरच्या डोंगरावर नजर खिळवायची म्हणजे डोंगर आपल्या अंगावर येत असल्याचा भास होतो
वारीचा सगळा परिसर डोळ्यासमोर उभा राहिला...
१२ वी मधे असतांना आपण एकदा वर्गमित्रांसोबत वारीला भंडारा केला होता तो दिवस आठवला...
सात-आठ दिवसांपासुन भंडार्यासाठी तयारी चालु होती.. भडार्यासाठि लागण्यार्या सगळ्यावस्तुची यादि... कोण काय आणनार...
भंडार्याच्या दिवशी सकाळि लवकर जाऊन दिवसभरात जास्तवेळ सावली असेल ती जागा शोधणे हे .....
रानटी विस्तावातुन रोडगे काढ्णे हे काम माझ्या आवडिचे होते (बनविणे किंवा भाजी करणे हे जमत नाहि).
सर्वात महत्वाचे म्हणजे जो कोणी काम करत नसेल त्याला कामाला लावणे हा आपला सर्वात आवडता छंद. आणि नदीच्या पाण्यात पोहणे...
पुण्यामधे असल्यामुळे २३ ला भंडार्याल येणे तसेच रोडगे करणे शक्य नाहि पण बाट्या आणि वांग्याची भाजी खायला मिळणार हे मात्र खरं
14 Apr 2011 - 2:12 am | रेवती
पाकृ येऊ द्या!
आम्हालाही कळेल घरी दालबाटी कशी करायचे ते!
3 Aug 2016 - 2:10 pm | अभ्या..
माहीते चांगलाच हा छंद.
13 Apr 2011 - 12:07 am | चतुरंग
नीलकांता, झकास सफर घडवलीस रे.
वारी हनुमान हा भन्नाट प्रकार दिसतोय.
दालबाटी- अम्म्म्म्म्म क्या बात है! माझ्या मारवाडी मित्राच्या घरी मी हा प्रकार प्रथम खाल्ला. तुरीच्या घट्ट वरणात बाटी कुस्करुन, त्यात भरपूर तूप आणि पिठीसाखर घालून हाणायचे अरे काय चव लागते महाराजा!! खाणं झालं की हात धुवायला रांगतच जायला पायजे!!
निखार्याच्या धगीत भाजले जाणारे रोडगे बघून मला मावशीच्या घरच्या समाधान चुलीची आठवण झाली. तिथे स्वयंपाक झाला की चूल शांत झाल्यावर त्या राखेच्या धगीत कृष्णाकाठची छोटी ताजी हिरवी वांगी, छोटे बटाटे, छोटे पांढरे कांदे, रताळी असं खुपसून ठेवायचं. एकीकडे जेवणं होईस्तोवर हे मस्त खरपूस भाजून निघे. मग आंचवून चुलीसमोर बसायचं. पोतं पुढे ओढून हा मेवा राखेतून बाहेर काढायचा राख झटकून सालं काढायची आणि नुस्तं मीठ भुरभुरवून खायचा! अहाहा! आत्ताही आठवणीने तोंडाचा पाझर तलाव झाला राव!!
-जलरंगा
13 Apr 2011 - 2:23 am | शिल्पा ब
फोटो अन माहीती दोन्ही छान. मी दाल बाटी अजुन खाल्लेली नाही. चवदार दिसतेय. शक्य होईल तेंव्हा जरुर खाउन बघेन.
13 Apr 2011 - 2:41 am | नंदन
लेख. फोटो आणि वर्णन - दोन्ही आवडले.
13 Apr 2011 - 2:47 am | निनाद मुक्काम प...
मस्त लेख झाला आहे .
तुमच्या यात्रेला शुभेच्छा
जय हनुमान
13 Apr 2011 - 4:45 am | सुनील
छान लेख आणि माहिती (लेख पाकृ ह्या सदरात टाकला असता तरी चालून गेला असता!)
13 Apr 2011 - 6:35 am | निनाद
अरे वा! अनवट ठिकाणाची मस्त माहिती.
वाचायला मजा आली. रोडगे! मावशी व आईने लहानपणी केले होते, ते आठवले. पुढे ते कधी झालेच नाहीत :( आता पाऊस कमी झाला की हा कार्यक्रम मागच्या आंगणात करतोच!
मस्त लेखन, चित्रे आवडली. नेहमी प्रमाणे "विकीसाठी देणार का ?;) "
13 Apr 2011 - 7:54 am | मदनबाण
छान वॄतांत... :)
13 Apr 2011 - 8:00 am | पप्पुपेजर
अकोट पासून जवळ आहे तसे हे इथे जाताना मध्ये गजानन महाराजांची विहीर पण लागते तिथे पण असे भंडारे होतात
आई वडिलान सोबत लहान असताना जायचो , खूप मजा यायची कधी वेळ मिळाला तर नरनाळा आणि विहिरी बद्दल पण जरूर लिहा खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या आज... आणि रोडगे एकदम भारी आमच्या शेतावर सुद्धा असेच करतात हुरडा पार्टी ला :)
13 Apr 2011 - 10:22 am | प्रशांत
>>अकोट पासून जवळ आहे तसे हे इथे जाताना मध्ये गजानन महाराजांची विहीर पण लागते तिथे पण असे भंडारे होतात
भास्कर महाराज संस्थानबद्दल (अडगाव बु.)बोलत आहात काय आपण?
विहिर आणि कावळ्याची गोष्ट... ?
13 Apr 2011 - 9:03 am | नगरीनिरंजन
मस्त वर्णन आणि फोटो. तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं. रोडगे आणि दालबाटी खायची उत्सुकता मात्र प्रचंड वाढली आहे.
13 Apr 2011 - 10:04 am | विनायक बेलापुरे
खुप लहानपणी रोडगे खाल्ले होते त्याची चव ताजी झाली.
वारी हनुमानाल दंडवत
13 Apr 2011 - 10:43 pm | आनंदयात्री
जळव साल्या .. जळव आम्हाला.
मराठवाड्यात याच पदार्थाला सहसा रोडगे नाही म्हणत, मारवाडी गुजराती दाळ बाटी म्हणतात म्हणुन दाळ बाटीच म्हटले जाते. चव काय असती महाराजा ...
लेटेस्ट दाळ बाटी खाल्ली पश्याच्या घरी, वर "प्रशांत" आयडीने जो काड्या करतोय तो !! इतकी खुसखुशीत बाटी मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली. "खुसखुशीत" शब्द त्याचा अर्थ विसरला तर त्याने पश्या घरी जावे, आणि ही बाटी खावी .. बरं नुसती खुसखुशीत नाही, तर अशी सुरेख घडी घालुन तळलेली की गोलाकार बाटीचे कैक पदर उलगडत जातात खातांना .. स्वर्ग दोस्तांनो स्वर्ग. तिच्या बरोबर हिरवा मसाला करुन बनवलेली वांग्याची भाजी आणि साधसं थोडं घट्ट माफक फोडणी दिलेले वरण !! आपण तर स्वयंपाकाची प्लॅनिंग बिघडवली त्याच्या घरची त्या दिवशी .. कच्चकावुन हाणल्या बट्ट्या !!
-
(वांग्याची मजा एगप्लांटात शोधणारा)
आंद्या
14 Apr 2011 - 4:12 pm | धमाल मुलगा
आर्रंतिच्या...
ए पश्या अंयऽऽ......
कंदी यायचं बोल बे!
14 Apr 2011 - 12:14 pm | राजेश घासकडवी
या रोडग्यांवरून एक गोष्ट आठवली...
'माझं काय मेलीचं, माझं जेवण चुलीत!'
एक जहांबाज बाई असते. ती नवऱ्याला व मुलांना साध्या भाकरी भाजून देत असते. स्वतःसाठी काही भाकरी उरत नसत. तिला नवरा विचारत असे,
'काय गं, तू काही खात नाहीस का? ' त्यावर ती म्हणे
'माझं काय मेलीचं, माझं जेवण चुलीत!'
चुलीत तिने भरपूर तूप वगैरे घातलेले जाडजूड रोडगे स्वतःसाठी खमंग भाजत ठेवलेले असत. नवरा कामावर गेल्यावर ती ते चापत असे. :)
इतके दिवस फक्त गोष्ट माहीत होती. हा लेख वाचून ते प्रत्यक्ष पहायला मिळाले.
14 Apr 2011 - 12:20 pm | बिपिन कार्यकर्ते
निळूभाऊ, फारा वर्षांपूर्वी तुमच्याच भागात एका शेतात खाल्ले होते यातले बरेच काही. साधारण मोठ्या आकाराच्या पातेल्यात १/३ वांग्याची भाजी आणि २/३ लालभडक तर्री, त्याच्या बरोबर शेतातच खरपूस भाजलेल्या बाट्या आणि साधं वरण, त्यावर साजुक तुपाची धार. कालवून खाल्लं.
तेव्हाही त्रास झालाच होता पण आत्तापण झाला. :)
बाकी परत गेलात तर मारुतरायांना आमचाही दंडवत पोचता करावा!
14 Apr 2011 - 9:25 pm | आनंदयात्री
>>तेव्हाही त्रास झालाच होता पण आत्तापण झाला.
तेव्हा त्रास झाला ठिक आहे, ते तर्री वैगेरे वाचून आम्हाला कळ्ळे ;)
पण आता न खाताच त्रास होणे हे वाढत्या वयाचे लक्षण असावे !!
-
(ढँग करुन अंतर्धान पावलेला)
आंद्या गायब
14 Apr 2011 - 12:24 pm | केशवसुमार
स्वतः मालकही लिहिते झाले.. उत्तम..
निलकांतशेठ, वृत्तांत एकदम झकास..
(वाचक)केशवसुमार
14 Apr 2011 - 3:18 pm | हरिप्रिया_
मस्त...एकदम कडकडून भूक लागली वाचून...
डाळ-बाटी, वांग्याचा रस्सा अस सगळ मनसोक्त हादडून, दुपारभर निवांत झोपायचे दिवस आठवले...
आम्ही घरी पण बनवली आहे डाळ-बाटी, पण त्याला चुलीची चव नाही हेच खरे...
14 Apr 2011 - 5:03 pm | विसोबा खेचर
लेख व चित्रे, दोन्हीही जबरा..!
तात्या.
14 Apr 2011 - 6:35 pm | प्रदीप
आवडला.
2 Aug 2016 - 5:51 pm | सूड
रोडग्याबद्दल मिळालेली माहिती नवीन आहे.
2 Aug 2016 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चक्क, मिपामालक मिपावर लिहित होते. डोळे भरुन आले. ;)
(च्यायला, ब्यान तर नै ना होणार आम्ही )
-दिलीप बिरुटे
2 Aug 2016 - 6:11 pm | नीलमोहर
मिपा मालक छान लिहीतात की :)