वारी हनुमान आणि रोडग्यांचा भंडारा.

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
12 Apr 2011 - 1:30 pm

नमस्कार,
या वर्षी पाडव्याला माझ्या गावाजवळील 'वारी हनुमान' या धार्मीक ठिकाणाला भेट द्यायचा योग आला. तसे या ठिकाणाची खूप ओढ लहानपणापासूनच आहे. शाळेला असताना सायकलने वारीला जाण्यात काही वेगळीच मौज होती. गावाच्या १५ किमी दूर गेलं की पहाडातून येणार्‍या ओढ्यांनी रस्त्याला चढ उतार दिलेले आहेत. ते सायकलने पैज लाऊन चढून जाणे आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊन तो खोलगट भाग न्याहाळणे अशी मजा करायचो. नंतर याच वारी हनुमान येथे वान नदीवर धरण बांधण्यात आले. यामुळे धरणाच्या कालव्याशेजारी एक कच्चा रस्ता तयार झाला. हा वारीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. धुळ उडवत या रस्त्याने जायचे आणि समोरच्या डोंगरावर नजर खिळवायची म्हणजे डोंगर आपल्या अंगावर येत असल्याचा भास होतो. :)
आसपासच्या तीन चार तालुक्याच्या श्रध्देचा हा ठेवा वारी हनुमान येथे आहे. येथे हनुमानाची मोठी मुर्ती आहे. तसेच एक छोटा मठ आहे. पुर्वी हा भाग खुप दुर्गम होता. आता मात्र धरणाच्या बांधकामामुळे सर्वत्र रस्ते झाले आहेत.

हे वारीच्या हनुमानाचे मंदिर


हे वारीच्या हनुमानाचे मंदिर

हे प्रवेशद्वार


मंदिरातील मुर्तीचा फोटो घेण्याची परवाणगी नाही मात्र नारळ फोडण्यासाठी असलेल्या जागेवर एक छोटी मुर्ती आहे तिचा फोटो घेतला आहे.

विदर्भात भंडारा नावाचा प्रकार खुप होतो. भंडारा म्हणजे सर्वांनी एकत्रीत येऊन जेवन बनवायचं आणि पंगतीने जेवायचं. भंडारा करायला कुठलेही कारण पुरेसे असते. नवीन वर्ष आहे, नवीन धान्य घरात आले, हनुमान जयंती, गणपती असे कुठलेही कारण चालते. :) तर अश्या प्रकारचा वारीचा भंडारा हा प्रकार सुध्दा प्रसिध्द आहे. वारीला भंडारा म्हटलं म्हणजे रोडगे किंवा बाट्या (दाल बाट्या) हा प्रकार येथील खास आहे. वारीला रोडगे हे रानगोवर्‍यांच्या विस्तवात आत शिरवून खरपूस भाजून घेतात. अश्या रोडग्यांसोबत वांग्याची भाजी आणि तुरीच्या डाळीचे घट्ट वरण... अहाहा काय बेत होतो... काय सांगू? :)

तर पाडव्याला वारीला गेलो असता काही भंडार्‍यांची तयारी सुरू होती. त्यामुळे या खास वर्‍हाडी रोडग्यांचे काही फोटो घेतले. ते खाली देत आहे.

ह्या आहेत रान गोवर्‍या, या पेटवून मग याचा विस्तव तयार करणार.


ह्या आहेत रान गोवर्‍या, या पेटवून मग याचा विस्तव तयार करणार.


कनिक चांगली तिंबून झाली की मग त्याच्या गोल जाड चपात्या व त्यात आणि छोट्या चपात्या असे छान तेलात बुडवून थर देणार. हे म्हणजे कणकेच्या आत कणकेचे सारण भरल्यासारखे वाटते. ( पा.कृ. तज्ञ अधीक माहिती देतील :) )

असे रोडगे टाकण्यासाठी गोवर्‍या पेटवल्यावर त्या धाडधाड पेटता कामा नये तर त्यांचा विस्तव व्हायला हवा. या कामात खूप धूर होतो.( वर्‍हाडीत याला धुपट असे म्हणतात.)

आता तयार झालेल्या विस्तवात हे रोडगे आत शिरवतात. नवीन मानसाने हे केलं की हात पोळलेच म्हणून समजा.

रानटी विस्तवात तयार होणारे रोडगे.


तयार रोडगे काढून असे पोत्यावर ठेवतात. त्यानंतर आवश्यकता असल्यास पोत्यावर रगडून त्यावरील राख काढल्या जाते.

रोडग्यांसोबत वांग्याची भाजी आणि तुरीचे वरण (डाळ) तयार होतेय.

विस्तवातील रोडग्यासारखाच येथील बाटी हा प्रकार सुध्दा प्रसिध्द आहे. यात सुध्दा रोडगा बनवल्या जातो मात्र हा विस्तवात भाजण्याऐवजी डाळीत उकळून घेतला जातो व मग तो खरपूस तळून लालसर झाल्यावर वाढल्या जातो. दाल बाटी हा अत्यंत चविष्ट प्रकार आहे.


बाटी बनवण्याची तयारी चालली आहे.


बाटी डाळीत उकळणे चालले आहे.

उकळलेली बाटी

शेवटी तयार झालेली बाटी.


रोडगे किंवा बाटी सोबत वांग्याची भाजीच हवी. :)

जेवण तयार होई पर्यंत फुटाणे आणि रेवड्या खा. वारीला एक अखंड पाण्याचा स्त्रोत असलेला झरा आहे. या गडबडीत त्या गोमुखाचा फोटो घ्यायचा राहूनच गेला.

मंदिराच्या बाजूलाच 'हनुमान सागर' नावाच्या धरणाची भींत दिसते. छोटं धरण आहे मात्र त्यामुळे शेजारच्या चार पाच तालुक्यांची शेती बहरली आहे आणि अकोल्यापर्यंत पिण्यासाठी पाणी नेता येते.

अधीक चौकस लोकांसाठी रोडगा बनवण्याची पध्दत व्हिडीयो तुनळीवर चढवला आहे.

अशी ही काही तासांची भेट तुम्हाला कशी वाटली ते कळवा. आणि हो, येत्या २३ तारखेला पुन्हा वारीला भंडारा आहे. येताय ना मग?

- नीलकांत

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

2 Aug 2016 - 9:29 pm | पद्मावति

सुंदर लेख.
वीडियो वरची रोडगा बनवण्याची कृती खूपच मस्तं आहे.

आसपासच्या तीन चार तालुक्याच्या श्रध्देचा हा ठेवा वारी हनुमान येथे आहे. येथे हनुमानाची मोठी मुर्ती आहे. तसेच एक छोटा मठ आहे.

हा पूर्ण जिल्ह्याच्या श्रद्धेचा ठेवा आहे भाऊ :) (किमान वाशिम अलग काढल्यावर तरी =)) )

हा मारुती स्वतः समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केल्याचे ऐकले आहे एकदा मी, खूपच जबरी जागा, फक्त ह्याच्या जवळच पाण्याचा डोह आहे त्याला लोक घाबरतात, तिथे वरतून पडणारे पाणी असे पडते की कातळाच्या बाजूच्या भिंती अन कपारीत खबदाडी तयार झाल्यात दर तीनचार महिन्यात एखादा जीव तिथे जातोच, पाट्या लावल्या आहेत आता उडी मारू नये म्हणून ,

रोडग्या विषयी गंमत म्हणजे रोडगे लागतात, लागतात म्हणजे बेवडा मारल्यावर नशा केल्यावर होते अवस्था तसे चढतात बऱ्याच लोकांना, तोंडाला कोरड पडते, घसा सुकतो, अश्यावेळी लोकांना लिंबू सरबत, लिंबूपाणी पाजून ताळ्यावर आणायला लागते, नाहीतर अनर्थ प्रसंगही ओढवतात, मूलतः आमच्याकडे ऊन मरणाचे, राजस्थान खालोखाल किंवा बरोबरीने वऱ्हाड अन तेलंगणाचा भाग तापतो, त्यामुळे इकडल्या जेवणात तिखट जास्त असते जेणेकरून घाम जास्त येतो अन शरीर गार राहते, जास्त पाणी प्यायला लागेल असं जेवण ही विकसित झाले आहे त्याचमुळे असे जुनी माणसे सांगतात आमच्याकडली, बैठकीत 4-4 रोडगे उडवून निवांत सुपारी कातरणारी बहाद्दर माणसे आहेत आमच्याकडे ती वेगळीच!

संदीप डांगे's picture

2 Aug 2016 - 9:54 pm | संदीप डांगे

माझं गाव हिवरखेड इथून जवळच आहे, आमचेही हे श्रद्धास्थान आहे, अगदी घरच्यासारखे,

मागे निलकांतशेठ भेटलेत तेव्हा यावर बरीच चर्चा आम्हा दोघा शेजाऱ्यांची घडलेली....!☺

संदीप डांगे's picture

2 Aug 2016 - 9:54 pm | संदीप डांगे

माझं गाव हिवरखेड इथून जवळच आहे, आमचेही हे श्रद्धास्थान आहे, अगदी घरच्यासारखे,

मागे निलकांतशेठ भेटलेत तेव्हा यावर बरीच चर्चा आम्हा दोघा शेजाऱ्यांची घडलेली....!☺

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Aug 2016 - 9:28 am | कैलासवासी सोन्याबापु

क्या बात है सरजी!!! आम्ही अलग बाजूकडले, गुडधी कडले आमचे गाव, अकोल्यातली एकेकाळीची बिलाटवस्ती, उर्फ आमची प्यारी मोठी उमरी!, हा धागा नॉस्टॅल्जिया मध्ये रुपांतरीत होते वाटते बावा

महासंग्राम's picture

3 Aug 2016 - 2:26 pm | महासंग्राम


धागा नॉस्टॅल्जिया मध्ये रुपांतरीत होते वाटते बावा

ऑलरेडी झालाय रोडगे म्हणजे जीव कि प्राण बाप्पू