एनआरसीओतर्फे `पुण्याचे पक्षीवैभव’ फील्ड गाईडचे प्रकाशन २० मार्च रोजी
नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) या पुण्यातील संस्थेच्या वतीने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून दिनांक २० मार्च रोजी वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ श्री. प्रभाकर कुकडोलकर यांनी लिहिलेल्या `पुण्याचे पक्षीवैभव’ या पक्षीनिरीक्षकांसाठीच्या फील्ड गाईडचे प्रकाशन करण्यात येणार आहे. पृथ्वीदिनाचे औचित्य साधत दिनांक २२ ते २४ एप्रिल दरम्यान कुकडोलकर यांनी काढलेल्या जैववैविध्य या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन देखील एनआरसीओ आयोजित करणार आहे.
नव्या पेठेत गांजवे चौकाजवळील पत्रकार भवनात सायंकाळी चार वाजता होणा-या कार्यक्रमात प्रख्यात पक्षितज्ञ प्रकाश गोळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. घोले रस्त्यावरील पुणे महापालिकेच्या नविन कलादालनात छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.
या उपक्रमांबाबत अधिक माहिती देताना एनआरसीओचे अध्यक्ष श्री. किरण नाईक म्हणाले, “हे पुस्तक प्रकाशन व छायाचित्र प्रदर्शन एनआरसीओतर्फे निसर्ग व जैववैविध्याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा भाग आहेत. २०११ हे वर्ष जागतिक वन वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेले असून याच वर्षात एनआरसीओने हाती घेतलेले हे उपक्रम जागतिक वन वर्षाच्या लोकांसाठी वने या घोषणेशी सुसंगत असेच आहेत. पुणेकरांमध्ये व विशेषता युवकांमध्ये जागृती घडवुन आणुन त्यांना वनसंरक्षण व संवर्धनाचे कार्य करण्यास उत्तेजन देणे यावर एनआरसीओचा सतत भर राहिला असुन या उपक्रमांमुळे हा उद्देष साध्य होण्यास मदत होईल. पुस्तक सर्वांना परवडण्याजोग्या २५० रुपये एव्हढ्या नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देण्यासाठी एनआरसीओने विषेश प्रयत्न केले आहेत. ”
छायाचित्रे व निमंत्रणपत्रिका http://www.flickr.com/photos/33486587@N05/sets/72157626277910288/ येथे आहेत.
`पुण्याचे पक्षीवैभव’ हे मराठी व इंग्रजी द्वैभाषिक पुस्तक विविध पक्षांबाबत त्यांच्या छायाचित्रांसह संपूर्ण माहिती पुरविते. या पुस्तकात ४०० हून अधिक रंगीत छायाचित्रे आहेत. पुण्यात सुमारे ४०० जातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी १५० जातींच्या पक्ष्यांची कुकडोलकर यांनी काढलेली छायाचित्रे या पुस्तकात आहेत. या १५० जातींपैकी ४० हून अधिक जाती सहसा आढळून न येण्या-या आहेत. त्याखेरीज २५ हून अधिक जातीमधील नर व मादी दोन्हीच्या छायाचित्रांचा या पुस्तकात समावेश आहे. स्थलांतर करणा-या पक्षांच्या ३५ हुन अधिक प्रजातींच्या छायाचित्रांचा समावेश देखील या पुस्तकात आहे. पक्षांच्या विविध प्रजाती, त्यांची वसतीस्थाने, ती आढळणारी ठिकाणे तसेच अन्न याबाबत पुस्तकात संक्षिप्त परंतु महत्वपुर्ण माहिती आहे. एकाच व्यक्तीने निरीक्षणे करून व १५० प्रजातींच्या पक्ष्यांची छायाचित्रे काढून लिहिलेली बर्ड वॉचर्स गाईड अपवादानेच आढळतात.
कुकडोलकर यांनी काढलेल्या जैववैविध्य या विषयावरील छायाचित्रांच्या आनंद भरीन तिन्ही लोकी या प्रदर्शनातून प्रेक्षकांना छोट्या गोष्टीतून जीवनाचा आनंद कसा उपभोगता येतो याचा प्रत्यय येईल. या प्रदर्शनात निसर्गाची विविध रूपे, वेगवेगळ्या प्रजातींचे वनस्पती व प्राणी, फुलपाखरे व कीटक यांची छायाचित्रे असतील. प्रदर्शनाच्या माध्यमातुन लोकांची निसर्गाशी जवळीक साधण्याचा संदेश देण्याचा एनआरसीओचा प्रयत्न आहे.
एनआरसीओ विषयी
नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) ही स्वयंसेवी संस्था नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व योग्य वापर तसेच संतुलित विकासासाठी कार्य करते.
श्री.प्रभाकर कुकडोलकर यांच्याविषयी
श्री. कुकडोलकर सध्या महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात सहाय्यक वनसंरक्षक पदावर कार्यरत असून त्यांची वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ म्हणून २८ वर्षे सेवा झाली आहे. मनुष्य व वन्यजीवनातील संघर्ष हाताळण्याचा त्यांचा दांडगा अनुभव असुन त्यावर आधारित बिबट्या कुठे जाणार हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. त्यांनी वन्यजीवनावर लिहिलेले १२५ हून अधिक लेख राज्यभरातील विविध अग्रगण्य प्रकाशनांमधून प्रसिद्ध झालेले आहेत.
प्रतिक्रिया
16 Mar 2011 - 3:27 pm | सुहास..
जरूर उपस्थित राहु !
16 Mar 2011 - 4:42 pm | सूड
पुण्यातल्या बर्डवॉचिंगबद्दल बरंच ऐकून आहे. पुण्यात मुळात हिरवळच फार त्यामुळे पक्षी येणारच !!
16 Mar 2011 - 4:55 pm | विकास
येथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! भारतात आलो की हे पुस्तक नक्कीच विकत घेईन..
श्री. कुकडोलकर नुसतेच सएअकारी अधिकारी न रहाता असे काम (वास्तवीक संशोधन) करून ती माहिती जनतेपर्यंत पोचवतात हे स्पृहणीय आहे!
16 Mar 2011 - 6:31 pm | चित्रा
प्रदर्शनाला यायला आवडले असते. कुकडोलकर यांच्या परिचयाबद्दल धन्यवाद. ते ओळखीचे असले तर त्यांनाही बोलवा की इथे लिहायला कधीतरी अधूनमधून.
16 Mar 2011 - 7:14 pm | सहज
चांगली माहीती.
संग्रही असावे असे पुस्तक दिसतेय.
16 Mar 2011 - 7:26 pm | यशोधरा
पुस्तक नक्की घेणार आणि प्रदर्शन बघायचाही प्रयत्न करेन. माहितीबद्दल धन्यवाद.
17 Mar 2011 - 6:16 pm | नि३
+ १
17 Mar 2011 - 6:58 am | प्राजु
खूप छान माहिती दिलित. धन्यवाद. कुकडोलकर यांचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. :)
17 Mar 2011 - 12:25 pm | अवलिया
चांगली माहिती
17 Mar 2011 - 12:29 pm | sneharani
चांगली माहिती!
निमंत्रण पत्रिका मस्तच!
18 Mar 2011 - 7:52 pm | प्रकाश घाटपांडे
कुकडोलकर हे समाजाभिमुख असलेले अधिकारी आहेत. मध्यंतरी वनमंत्र्यांचे व त्यांचे काही तरी बिनसले होते.
18 Mar 2011 - 10:10 pm | पुष्करिणी
निमंत्रण पत्रिका मस्तच आहे,
पुस्तक खरेदी नक्की.
24 Mar 2011 - 10:47 am | llपुण्याचे पेशवेll
उत्तम माहीती. कार्यक्रमाला यायची इच्छा होती. पण पुण्याबाहेर असल्याने येऊ शकलो नाही.
प्रभाकर कुकडोलकर यांच्या अनेक पुस्तकांचे आकाशवाणीवरून होणारे क्रमशः वाचन मी रेडीओवर हौशीने ऐकत असे. त्यांना भेटण्याचा दुर्मिळ योग हुकला. :(
असो. पुढच्या वेळेला नक्की.
24 Mar 2011 - 12:44 pm | पुण्याचे वटवाघूळ
असा कार्यक्रम परत कधी होनार? मला नक्कीच यायला आवडेल.
पुण्याचे वटवाघूळ