http://www.misalpav.com/node/15232
http://www.misalpav.com/node/15257
नमस्कार मंडळी... आधीच्या भटकंत्यांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद !! पुर्वोत्तर भारताची सफर मी दोन टप्प्यांत केली. एकदा अरुणाचल प्रदेश आणि नंतर उरलेला भाग.. अरुणाचलची सफर मुख्यत्वे सैन्यासोबत होती.
अरुणाचल :
सूर्याची किरणे भारतभूच्या अंगावर पहील्यांदा पडतात ती अरुणाचल मध्ये. इथे ज्या भागात आम्ही फिरलो तो ह्याचा पुर्वभाग. इथल्या आणि मुंबईच्या सूर्योदयाच्या वेळेत जवळपास दिड-पावणेदोन तासांचं अंतर आहे. आमचा प्रवास कमलांग नगर- ह्यालियाँग-वलाँग-किबिथू आणि परत उलट असा झाला. (अवांतर : कमलांग चा अर्थ संत्रे.. खरेतर संत्रे हे नागपुरच्या भोसल्यांनी ह्याच भागातून नागपुरला आणले. अरुणाचल आणि मेघालयच्या काही भागांत संत्र्याची लागवड बर्यापैकी होते.
कमलांग नगरला आम्ही पोहचलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते आणि किर्र अंधार होता. अगदी तारे-बिरे दिसत होते. मस्त वाटलं. तिथल्या सैन्याच्या ट्रान्सिट-कँप वर मुख्य सुभेदार मराठी होते. मग काय, मस्त गप्पा रंगल्या. दुसर्या दिवशी आम्ही ह्यालियाँग साठी निघालो. रस्त्यात धुके पांघरलेले पर्वत निळसर दिसत होते. अरुणाचलला "लँड ऑफ ब्ल्यु हिल्स" असेही म्हणतात. पुर्ण रस्त्यात "लोहीत" नदी आमच्या सोबत वाहत होती.
ह्याच रस्त्यात "परशूराम कुंड" लागतं. असं म्हणतात की परशूरामानी त्यांच्या मातेचा, रेणूकेचा वध केल्यावर इथे परशू धुतला होता.
आम्ही ह्यालियाँगला पोहचलो. इथे दिवसच आणखीच लवकर मावळला. दुसर्या दिवशी वलाँगला निघालो. १९६२च्या भारत-चीन युद्धात वलाँगची लढाई फार महत्त्वाची मानली जाते. ह्या लढाईत शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारक आहे इथे..
इथे पोहचल्यावर आम्ही सगळे भावूक झालो होतो.. इथून आम्ही जवळच असलेल्या एका पहाडीवर गेलो. इथे "हेल्मेट टॉप" आहे. इथल्या जंगलांमधे अजूनही भारत-चीन युद्धात वापरलेल्या शस्त्रात्रांचे अवशेष सापडतात. हे सगळे ह्या हेल्मेट टॉपला आणून ठेवतात. इथेच लिहीलेली एक ओळ त्या युद्धाची परीस्थिती अतिशय समर्पकपणे मांडते..
AT WALONG, INDIAN SOLDIERS LACKED EVERYTHING BUT GUTS..
तो दिवस होता ३१ डिसेंबर... रात्री मस्तपैकी शेकोटीजवळ बसून गप्पा मारत मिलिटरी पाहुणचाराची मजा घेत आमची पार्टी झाली..
दुसर्या दिवशी आम्ही "किबिथू"साठी निघालो. किबिथू हे सैन्याचं मोठं ठाणं आहे. इथे लोहीत नदीवर एक मस्त झुलता पुल आहे. आम्ही नदीच्या दुसर्या बाजूला जाऊन "रॉक क्लाईम्बिन्ग" केलं. खरंतर आम्ही चढण्यापेक्षा, आर्मीचे लोक आम्हाला वर ओढून घेत होते, असं म्हटलं तरी चालेल ! दिसायला अतिशय सुंदर आणि खळाळती असलेली ही नदी अतिशय खतरनाक आहे. असं सांगतात की, एकदा सिमेंटच्या पोत्यांनी भरलेला एक ट्रक ह्या नदीत पडला. साधे नट-बोल्ट्सही हाताला लागले नाही म्हणे. त्या पुलावर चालतांना प्रत्येक हिंदकळ्यासोबत हा विचार मेंदूत नाचत होता...
तिथून पुढे आम्ही "हिल पोस्ट ९०" ह्या पहाडावरच्या सैन्य-पोस्टवर गेलो.. इथे जाण्यासाठी एका तासाचा ट्रेक करावा लागला. शेवटच्या भागात तर हा ट्रेक "ऑन ऑल फोर" म्हणजे हातापायांवर रांगत वर चढावा लागला. पण इथे गेल्यावर मात्र पुन्हा सैन्याच्या आदरतिथ्याचा सुखद अनुभव आला. इतक्या वरदेखील आम्हाला गरमागरम भजी आणि चहा देण्यात आला. समोर होता चीनचा तिबेटचा भाग..
इकडे बघत चहाचे घुटके घेण्यातला मजा काही औरच होता... ह्या भागाकडे पाहिले तर लक्षात येतं की भारतीय भुभागापेक्षा हा भाग जरा प्लेन आहे. पर्वतांच्या मधे बरीच सपाट जागा आहे. आणि चीन ह्या भागात लोकवस्ती वाढवण्याचे प्रयत्न करत आहे, कारण की आम्हाला इथे बरीच घरे दिसली ज्यांची छते एकाच रंगाची होती. तसेच जवळजवळ सिमेपर्यंत रस्ते बनवलेले आहेत. मात्र सैन्याच्या काही वरीष्ठ अधिकार्यांच्या मते हीच गोष्ट त्यांच्या विरोधातही जाऊ शकते.
इथून परतल्यावर आम्ही "बाचा" नावाच्या फॉरवर्ड पोस्ट वर रात्र घालवली. ह्यावेळी मी LoAC फक्त दिड-दोनशे मिटर्सवर होतो. खरंतर त्याला भारत-चीन आणि म्यानमारच्या सिमांचा त्रिवेणी संगम म्हणालात तरी चालेल.. नववर्षाची सुरुवात जबरा झाली होती, हे नक्की.
इथंच ही पाटी लावली होती.. वाचता येत असेल, तर परत चीनला जा..
परत येतांना ह्या भागाचं काठीण्य नव्याने जाणवलं.
माझ्या मनात तर एवढंच आलं, If you miss a step here, others will keep missing you later on.
नंतर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. एका ठिकाणी लोहीतचा हा विस्तार दिसला. कॅमेरात मावत नव्हता !
उर्वरीत पुर्वोत्तर भारत:
हा प्रवास आम्ही आसामपासून सुरु केला. "शिबसागर" ही अहोम राजांची राजधानी. इथे आशियातील सगळ्यात उंच शिवमंदीर आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. ह्याला "शिवडोल" असे म्हणतात..
इथेच अहोम राजांचा राजवाडा आहे. आपल्याकडील किल्ले, महाल बघितल्यावर हा महाल फारच वेगळा वाटतो. छोटे दरवाजे, अरुंद पॅसेजेस आणि भरपुर जाड भिंती असलेल्या ह्या महालात भुलभुलैय्या सारखेच वाटते..
इथून पुढे आम्ही "रंगघर" नावाच्या एका इमारतीत गेलो. हे रोमच्या "कोलॅझियम" सारखं वापरल्या जात असे. इथे मनोरंजनाचे, बैलांच्या लढाईचे, तसे शस्त्रांचे खेळ केल्या जात असत..
आता हे बघा...
ह्यांना "मैदाम" म्हणतात. ह्या अहोम राजांच्या समाध्या आहेत. राज्याच्या शवाला गाडून त्याभोवती हे पिरॅमिडसारखे कक्ष बांधले जात. त्यात राजासोबत त्याचे प्रिय सेवक, आणि बरेचसे धन आणि काही वस्तुही गाडल्या जात. नंतर त्यांच्यावर माती टाकून माउंट्स बनवल्या जात. मृत व्यक्ती जितकी प्रसिद्ध, कर्तबगार असेल तितके मोठे मैदाम. दुरुन बघितल्या तर ह्या समाध्या फक्त हिरव्यागार टेकाडांसारख्याच दिसतात.
शिबसागर मधल्या एका संग्रहालयात पाहीलेली ही कलाकृती
इथुन आम्ही नंतर आसाममधे गोलाघाट, नुमालीगड आणि बाकीच्या जागी गेलो. माझ्या सकाळी लवकर न उठण्याच्या नतद्रष्ट सवयीमुळे काझिरंगाला जावूनही मी फिरायला गेलो नाही. तसेही त्याआधी पोबीतोरा मध्ये गेंडे पाहीलेच होते.
आसामनंतर आम्ही नागभुमी नागालँड मधे प्रवेश केला. वेशीवरच आमचं स्वागत ह्या सुंदर दरवाज्याने केलं..
आणि ह्यापुढचा प्रवास म्हणजे अगदी "आहाहा" होता. वास्तविक पाहता नागालँड तुम्हा-आम्हाला माहीत आहे तो केवळ वाईट बातम्या आणि कारणांसाठी.. पण हा प्रदेश अतिशय सुंदर आहे. आम्हाला जातांना दिसलेली निसर्गाची करामात..
किर्र दाट जंगल, सरळसोट कडे आणि त्यातून वाहणारे ओढे, नदी-नाले...
आणि थोड्या वेळात आम्ही नागालँडची राजधानी कोहीमाला पोहचलो. हिचं प्रथम दर्शन तर जबराच..
कोहीमाचं ऐतिहासिक महत्त्वही आहे. दुसर्या महायुद्धात म्यानमारमार्गे भारतात आगेकुच करणार्या जपानी फौजांचा ब्रिटीश सैन्याने इथेच सामना व पाडाव केला होता. कोहीमामध्ये ह्या लढाईत धारातिर्थी पडलेल्या सैनिकांचे स्मारक आहे..
कोहीमा वार सिमेट्री...
कोहीमाला आणखी थोडं भटकुन आम्ही त्रिपुराकडे मोर्चा वळवला. त्रिपुरामध्ये पुर्णपणे बंगाली संस्कृती आढळते, अगदी सरकारसकट.. रबरच्या उत्पादनात हे राज्य बरेच अग्रेसर आहे.. आम्ही अगरतलापासुन जवळच असलेल्या "निरमहाल"ला बघायला गेलो..
ह्याला निरमहाल हे नाव गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी दिलंय..
त्रिपुराहून आम्ही गेलो मेघालयला.. आणि पदोपदी आम्हाला ह्या नावाची सार्थकता पटत चालली होती.. गुवाहाटीहून शिलाँगला जातांना "बरापानी" नावाचा एक लांबलचक तलाव लागतो. खुप सुंदर आहे ही जागा..
इथून पुढे निघालो. रस्त्यात अख्खे ढगांनी आच्छादिलेले पर्वत, मधेच पडद्यातून बाहेर डोकावावे, तसे हळूच आपल्या हिरव्या जादुची झलक आम्हाला देत होते..
आम्ही चेरापुंजीला पोहचलो. भारतात सगळ्यात जास्त पाऊस पडणारा हा भाग.. (मौसिनग्राम इथुन जवळच आहे.) इथेही अंदमानप्रमाणे चुनखडीच्या गुहा आहेत, फक्त इथे त्यांची व्याप्ती खुप जास्त आहे. काही विदेशी पर्यटकांनी केलेल्या ह्या गुहांच्या सफरीचे फोटोज पाहीले. ह्या गुहांच्या आत नदी पण वाहतेय काही ठिकाणी आणि काही जागांवर तर धबधबेपण आहेत भुगर्भात !! पण हे सगळं एक्सप्लोरेशन करायचं असेल तर बरीच आधुनिक सामुग्री आणि प्रशिक्षण लागतं.
इथे मस्तपैकी दरीतुन ढग वर येत होते..
ही जादु बघून मला पण उडायची इच्छा झाली की !
पुढचा स्टॉप सिक्कीममधे गंगटोक इथे होता.. भारतातल्या आणि खासकरुन पुर्वोत्तर भारतातल्या राज्यांनी ह्या राज्याकडून पर्यटन विकासाचे धडे घ्यायला पाहीजेत. उपलब्ध साधनांचा आणि नैसर्गिक सौदर्याचा पुरेपूर वापर करत सिक्कीम पर्यटकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतं. इथल्या "ऑर्किड पार्क" मधली ही काही सुंदर फुलं..
इथल्या एम.जी. रोडला ह्यांनी अगदी पाश्चात्य धर्तीवर सुरेखपणे आखलेले आहे. इथे वाहने चालत नाहीत. त्यामुळे तुम्ही रमत-गमत इथे फिरु शकता. अत्याधिक नैसर्गिक सौदर्याचा कंटाळा आला तर मन रमवायला सगळ्या करमणुकी आहेत...
सिक्कीममधे लेपचा, नेपाली आणि इतर संस्कृतीचे लोक राहतात. इथे बौद्ध धर्माच्या "महायान" पंथाचे अनुसरण केल्या जाते. गंगटोक पासून जवळच असलेली "रुमटेक मोनॅस्ट्री" प्रसिद्ध आहे..
इथे मी त्या खांबावर असलेल्या छोट्याश्या प्लॅटफॉर्मवर नाणं टाकण्याचा प्रयत्न करत होतो. (वहीच इच्छापुर्ती का पुराना फंडा).. इच्छापुर्तीचं माहीत नाही, पण त्या खेळात जाम मजा येत होती, हे मात्र खरं.. तीन-चार वेळा माझं नाणं दुसर्यांच्या इच्छा खाली घेऊन आलं. मग त्यांना वर पोचवलं, तर आणखी दोन-तीन खाली. शेवटी सगळ्या वर पोचवेपर्यंत मस्त टाईमपास झाला...
सिक्कीममधे मला एक सुंदर नैसर्गिक "मॉडर्न आर्ट" दिसलं.. त्याच्या फोटोसोबतच ही पुर्वोत्तर भारताची सफर संपवतो...
बोन वोयाज !!
प्रतिक्रिया
10 Nov 2010 - 12:38 am | प्रभो
एक से बढकर एक फोटो...... सुंदर!!!
निरमहाल आणी बारापानीचे विषेश आवडले...
10 Nov 2010 - 12:47 am | विकास
नि:शब्द!
10 Nov 2010 - 12:57 am | शुचि
तो झुलता पूल बांधला कसा पण?
10 Nov 2010 - 1:28 am | पुष्करिणी
अप्रतिम!
10 Nov 2010 - 1:39 am | रमणरमा
फोटो भारी!
10 Nov 2010 - 2:53 am | संदीप चित्रे
ट्रिपच्या धावत्या आढाव्याबद्दल आणि ह्या एक से एक फोटोंबद्दल धन्स
10 Nov 2010 - 3:26 am | प्राजु
जबरदस्त!!
10 Nov 2010 - 4:16 am | अर्धवटराव
किती भरभरून दिलं आहे निसर्गाने भारताला...
(निसर्गप्रेमी) अर्धवटराव
10 Nov 2010 - 6:09 am | अनामिक
जबरा रे चिगो! फोटू केवळ अशक्य!!
10 Nov 2010 - 7:17 am | सहज
छानच!
10 Nov 2010 - 9:34 am | विलासराव
फोटोज अन धावते प्रवासवर्णन.
10 Nov 2010 - 12:37 pm | चिगो
सर्व रसिकांचे आभार !!
(खुद के साथ बाता : च्यायला, हयावेळी भट्टी जमली नाही वाटतं. अजून अपेक्षित प्रतिसाद आले नाहीत की !)<
10 Nov 2010 - 12:42 pm | विसोबा खेचर
सु रे ख..!
10 Nov 2010 - 8:01 pm | धमाल मुलगा
अशक्य आहेत रे फोटो...
च्यायला, नुसते निर्जीव फोटो पाहून इतकं खुळावल्यागत होतंय तर तिथं खराखुरा अनुभव घेताना काय अवस्था झाली असेल? अशक्य रे...अशक्य वेड आहे हा एकुणच तसा दुर्लक्षित राज्यांचा स्वर्ग!
आता हे असं काहीतरी पाहिल्या, अनुभवल्यानंतर जी समाधी लागली असेल त्यानंतर, तुझ्याकडून ह्यावर काही लै मोठा पल्लेदार लेख वगैरे यावा अशी अपेक्षाच करणं मुर्खपणाचं ठरेल बाबा.
तू फिर रे...फिर तू... ज्या दिवशी जमेल ना, त्या दिवशी तुझ्या दारात दत्त म्हणून उभा राहीन हक्कानं.. आणि अशी सफर करवून घेईन :)
10 Nov 2010 - 11:51 pm | चिगो
फक्त आधी कळव. नाहीतर तू दत्त म्हणून हजर, नी मीच बाहेर. ;-) ये, पक्कं फिरुया..
10 Nov 2010 - 8:06 pm | पैसा
चिन्मय, फोटो अक्षरशः "खतरनाक" आहेत! आणि सोबत नेमकंच वर्णन. आणखी फीर. म्हणजे आमच्यासारख्या आळश्यांना आपोआप घरबसल्या भारतभ्रमण घडेल!
10 Nov 2010 - 8:25 pm | गणेशा
चिगो खरेच खुप छान आहे सगळे ..
विशेश करुन मेघालयाचा पहिला फोटो तर पेंटींग्च वाटतो आहे ...
सर्व आवडले ...
फिरत रहा .. ती वाट कधी तरी चालावी ही स्पुर्ती मिळत आहे ..
11 Nov 2010 - 12:08 am | सुनील
सुंदर फोटो आणि माहिती.
11 Nov 2010 - 2:20 am | मराठे
सगळे फोटो मस्त. मला विशेषकरून शिवमंदिराचा (आणि त्याच्या प्रतिबिंबाचा) फोटो खूप आवडला. हा इतका सुंदर प्रदेश इतका दुर्लक्षित आहे ह्याचं वाईट वाटतं.
11 Nov 2010 - 2:29 am | बेसनलाडू
फोटो आणि वर्णन दोन्ही मस्त!
(प्रवासी)बेसनलाडू
11 Nov 2010 - 12:04 pm | ramjya
मस्त यार...
11 Nov 2010 - 10:07 pm | सुनिल पाटकर
भन्नाट फोटो
12 Nov 2010 - 1:36 am | सुनील
लेख आणि फोटो आवडले हे पूर्वी दिलेल्या प्रतिसादात सांगितले आहेच!
पुर्वोत्तर हा शब्द North-East साठी योजला आहे काय? तसे असेल तर, त्याऐवजी ईशान्य हा शब्द वापरता आला असता.
12 Nov 2010 - 12:54 pm | चिगो
थँक्स... होय, पुर्वोत्तर हा शब्द नॉर्थ्-ईस्ट साठीच वापरलाय. "ईशान्य" त्या वेळी मनात/मेंदुत आला नाही, म्हणून..
12 Nov 2010 - 1:26 pm | नंदन
सगळेच फोटो अप्रतिम! मैदामबद्दल प्रथमच माहिती वाचली.
12 Nov 2010 - 1:29 pm | नगरीनिरंजन
वा! ईशान्य भारताची ही अप्रतिम सुंदर ओळख आवडली! अजून येऊ द्या!
13 Nov 2010 - 11:08 pm | चिगो
धाग्यावरुन आठवलं...
आम्ही अरूणाचलला गेलो होतो. तिथे एका आर्मी मेस मधे गेल्यावर तिथल्या एका अधिकार्याने आम्हाला एक सुंदर वाईन बॉटल कॅबीनेट दाखवली, आणि म्हणाला," ही कॅबीनेट ड्रीफ्टींग वुड (पाण्यात वाहत आलेलं लाकुड) पासुन बनवलीय." मी कौतुकाने माझ्या सोबतच्या मित्राला सांगितलं. (तो आर्मी पाहूणचाराच्या तारेत होता) त्याने ५-१० सेकंद तिला पाहीलं आणि म्हणाला "अरे वा !! ह्या बॉटल्स पण वाहत आल्या होत्या का सोबत?"
येडावलोच आम्ही...