कलादालन मध्ये फोटो डकल्यावर काही मिपाकरांनी (पैसा, स्वानन्द इ.) केलेल्या प्रवासाबद्दल लिहावे, असे सुचवले. आणि आग्रहाला (कितीही अल्प असला तरी ) बळी पडणे ही आमची खासियत असल्याने मी लगेच तयार झालो...
तर सुरुवात करतो देवभूमी उत्तराखंड पासून...
बर्याच जणांना उत्तराखंडची ओळख आहे, ती ऋषीकेष हरीद्वार आणि मसुरीमुळे.. पण ट्रेकिंगची वगैरे आवड असेल तर इथे भटकायला अफाट जागा आहेत.. मी पण उत्तरखंड मध्ये पहील्यांदा मसुरीचं पावसाळी रुप पाहीलं आणि प्रेमातच पडलो ह्या "पहाडों की राणीच्या"...
मसुरीवरुन आम्ही "रुपकुंड" चा ट्रेक करण्यासाठी निघालो. आमचा रूट मसुरी - कर्णप्रयाग- वान- बेदनी बुगियाल- कनौल- सिथेल - बॅक टू कर्णप्रयाग नी मसुरी असा होता.. निघालो.
वानपासुन १३ किलोमीटर आधी उतरुन आमची तंगडतोड सुरु झाली. सुरुवातीचे ४-५ किलोमीटर जोशात चालुन झाल्यावर पाठीवरचं ते १६-१७ किलोचं ओझं अगदी मणामणाचं वाटू लागलं.
शेवटी वानला पोहोचलो कसेबसे.. शेवटच्या दिड किलोमीटरने तेल काढलं अक्षरशः.. जवळजवळ ७० डिग्रीचा चढ होताब तो, गावापासुन फॉरेस्ट बंगल्यापर्यंतचा.. नंतर मात्र रात्र मस्त रंगली. साधी आलूची भाजी आणि गरमागरम भात एवढा मस्त कधीच लागला नव्हता हो. आणि तोंडी लावायला त्या किर्र वातावरणात होत्या, भुताखेतांच्या भयाण गोष्टी...
इथून पुढे सुरु आमचा आधुनिकतेपासुन उलटा प्रवास सुरु झाला.. इथून पुढे चार दिवस आम्हाला ना वीज मिळणार होती, ना मोबाईल/ फोन कनेक्टिविटी.. नेक्स्ट स्टॉप "बेदनी बुगियाल". वानपासुन १४ किलोमीटर दुर, समुद्रसपाटीपासुन ३५०० मीटर (जवळजवळ १२००० फुट). बुगियाल म्हणजे कुरण (Meadows). वान ते बेदनी च्या प्रवासात आमच्या पुढे पुढे हे महाशय चालत होते..
नंतर ह्या दिसायला लागल्यावर कळलं की मुक्कामाचं ठीकाण जवळ आलंय.
येवढं चालून झालं तरी आमची खुमखुमी काही सरली नव्हती, म्हणुन जवळचा डोंगर चढून वर गेलो.. तिथे गेल्यावर समोर हे दृष्य दिसले आणि सगळ्या दगदगीचं सोनं झाल्यासारखं वाटलं.
दुसर्या दिवशी सुरु झाला आमचा प्रवास आमच्या मुख्य उद्दिष्टाकडे.. मिशन रुपकुंड.. उंची ५०५० मीटर (जवळजवळ १६००० फुट) एका दिवसात आम्हाला ३५-४० किलोमीटर चालत १५०० मीटर एवढी उंची चढून परत खाली उतरायचं होतं. सक्काळी ६ ला आम्ही निघालो.. जवळजवळ ७-८ किलोमीटर नंतर मला आणि माझ्या एका मित्राला थोडा त्रास व्हायला लागला. आमच्यातल्या एका शायन्याने आपलं वैद्यकीय ग्यान पाजळायला सुरुवात केली. माझ्या मित्राला म्हणे, "तुला माईल्ड कार्डिएक अरेस्ट होतोय." आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. म्हटलं, जो होगा देखा जायेगा. आता माघार नाही..
आणखी ७-८ किलोमीटर चालल्यावर "स्नो-लाईन" लागली.
आम्ही खरंतर ढेपाळायला लागलो होतो. आणि इथुन पुढचा २ किलोमीटर (४०० मी. ची चढाई) पुर्णपणे बर्फातुन होती. हे हाल कमी होते म्हणुन का काय, वातावरण बिघडायला लागलं. म्हटलं, मेलो आता. बर्फ पडला तर इथंच गाडले जाऊ मस्तपैकी.. त्यात बर्फावरुन पाय घसरायची भिती (साधे ट्रेकिंग शुज होते पायात). सुदैवाने वातावरण निवळलं. वर गेल्यावर तिथे एक मंदिर होतं..
तिथं पुजा केली.. तिथुन पुढे एक छोटं विवर होतं आणि त्याच्या मध्यभागी होतं "रुपकुंड ग्लेशियर"..
एकदा मोहीम फत्ते झाल्यावर सुरु झाल्या आमच्या काड्या करणे आणि मस्त्या...
विजयोन्मादात परत बेदनी बुगियाल ला आलो. संध्याकाळी परत आल्यावर गरमागरम भजी आणि चहा बनवून घेतला. अहाहा !! ते सुख अनुभवायला तेच वातावरण पाहीजे राव! दुसर्या दिवशी कनौल ला जातांना पावसाने झोडपलं. पाठीवरचं ओझं दुप्पट करुन वाट लावली त्याने.. रस्त्यात डोंगराचा मेवा दिसला, म्हणून कनौल ला मटण ओरपण्याशिवाय पर्यायच नव्हता..
पुढे कनौल वरुन सिथेल, नंतर डांग, कर्णप्रयाग करत मसुरीला परतलो...
उत्तराखंडातली ही आणखी काही क्षणचित्रे...
हिला "गिरड" म्हणतात. पाण्यावर चालणारी पिठाची चक्की...
टिहरी जलाशय (फोटो घेतला तेव्हा पाण्याची पातळी ८२० मीटर होती).
आयुष्याचा पसारा पिसत बसलेली ही...
मस्त गढवाली...
शेवटी मसुरीतल्या सुर्यास्तासोबत ह्या लेखाचा शेवट करतो...
पुन्हा भेटुया...
प्रतिक्रिया
1 Nov 2010 - 8:12 pm | मितान
खूप खूप खूप सुंदर !!!!!!!
हेवा वाटला तुमचा :)
1 Nov 2010 - 8:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चिगो, सफर काय जबरा झाली असेल राव. मितान म्हणतात तसेच म्हणतो.
'हेवा वाटला'
>>>आयुष्याचा पसारा पिसत बसलेली ही...
स्सही. :)
-दिलीप बिरुटे
1 Nov 2010 - 8:15 pm | प्रभो
क ड आणी क!!!
1 Nov 2010 - 8:17 pm | pramanik
एवढे धोके पत्करुन जाण्यचे काही खास कारण?
1 Nov 2010 - 8:25 pm | धमाल मुलगा
देवाऽऽ...
त्याला आंतरिक खाज असं म्हणतात...हे वेड ज्याला असतं त्यालाच ह्यातली मजा कळणार हो.. दर पावलाला 'आत्ता जातो का राह्तो' अशी पाकपुक अवस्था होऊन ते पार केल्यावरची मजाच निराळी :)
1 Nov 2010 - 10:24 pm | चिगो
अगदी मनातला शब्द बोललास भाऊ... "खाज", इलाज नाय.
1 Nov 2010 - 8:23 pm | धमाल मुलगा
अरे भल्या माणसा.... तो पहिलाच फोटो काय चीज आहे यार!!! संपलो रे संपलो :)
मस्त सफर. साला रुपकुंडचा ट्रेक मारताना लैच्च मजा आली असणार देवा! :)
बेष्ट बेष्ट बेष्ट!
2 Nov 2010 - 12:33 pm | मराठमोळा
सहमत आहे!!
पहिला फोटु खल्लास आहे एकदम.
1 Nov 2010 - 8:27 pm | अनामिक
जबरा! आणि खरंच हेवा वाटतोय तुमचा!!
1 Nov 2010 - 9:10 pm | शुचि
सुंदरच हो सगळे फोटो!!! नशीबात असावं लागतं. मेरा भारत महान.
1 Nov 2010 - 9:18 pm | पैसा
चिन्मय, आग्र्ह केल्याचं सार्थक झालं. पहिलाच फोटो बघून डोळ्याचं पारणं फिटलं. हळूहळू फोटोंसहित त्या इतर सफरींबद्दल लिहा. (ते तिबेट अंदमान, मेघालय वगैरे).
1 Nov 2010 - 9:45 pm | गणेशा
अप्रतिम भाउ
मस्त वाटले ..
फिरत रहा .. कधीतरी ती वाट चालण्याचा प्रयत्न करु ...
1 Nov 2010 - 10:20 pm | चिगो
@ मितान तै, तुम्ही कौतिक केलं.. देव पावला..
@धमु, पैसातै, डॉ.साहेब, शुचितै, गणेशा आणि इतर मित्रहो... धन्यु..
1 Nov 2010 - 10:27 pm | मराठे
स...ही...
सुपर्ब फोटो आणि मस्त वर्णन.
>> ३५-४० किलोमीटर चालत १५०० मीटर एवढी उंची
हे वाचूनच पाय दुखायला लागले.
1 Nov 2010 - 10:28 pm | सुहास..
फक्त एकच शब्द , !! ऑसम !!
2 Nov 2010 - 12:44 am | सुप्परमॅन
जबराट
2 Nov 2010 - 11:22 am | विसोबा खेचर
लै भारी..
2 Nov 2010 - 11:33 am | यशोधरा
क्या बात है! जरा जास्त लिहिलं असतं तर काही बिघडलं असतं का? :)
पहिला, इंद्रधनूचा, टिहरी, गढवाली हे फोटो खूप आवडले.
इंद्रधनुष्याचा तर मस्तच आहे! ग्रेट!
2 Nov 2010 - 5:45 pm | चिगो
यशोतै, लिहीलं असतं हो, पण आडातच नाही तर पोहर्यात कुठून आणणार? ;-)
पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करतो..
2 Nov 2010 - 5:48 pm | यशोधरा
बिंधास लिवायचं बघा! मनापासून लिवलं की आडातलं आपसूक पोहर्यात येतय! :)
2 Nov 2010 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार
पॉशच !
2 Nov 2010 - 12:29 pm | मृत्युन्जय
एक नंबर ट्रेक झाल तुमचा. झक्कासच.
2 Nov 2010 - 4:48 pm | फ्रॅक्चर बंड्या
अप्रतिम ...
2 Nov 2010 - 5:09 pm | अब् क
खरंच हेवा वाटतोय तुमचा!!
2 Nov 2010 - 5:23 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम!!! जबरा!!!
2 Nov 2010 - 7:23 pm | स्वानन्द
लाजवाब सौंदर्य. नशीबवान आहेस मित्रा.
साला माझा हा पाय कधी बरा होतोय आणि कधी एकदा एक मस्त ट्रेक करतोय असं झालंय :(
>>रस्त्यात डोंगराचा मेवा दिसला, म्हणून कनौल ला मटण ओरपण्याशिवाय पर्यायच नव्हता..
अरेरे...:( :(
जिथे जलाशय किंवा पर्वताचं चित्र असेल तिथे ते मोठ्या आकारात चिकटवलं तर जास्त छान वाटेल असं वाटतं. असो.
येऊ दे असंच आणखी.
2 Nov 2010 - 8:08 pm | मदनबाण
वा...सुंदर. :)
रुपकुंडला खूप जुने मानवी अवषेश सापडतात...मध्यंतरी यावर एक मालिका एका न्यूज चॅनलवर लागली होती...
इथेही एक नजर टाका :---
सध्या म्हणे या अवशेषांची तस्करी सुद्धा होत आहे...(साला,तस्करी कशा कशाची होत नसेल ते सांगा...;))
2 Nov 2010 - 10:18 pm | चिगो
हे बघा...

आम्ही गेलो तेव्हा बरेचसे अवशेष बर्फात गाडल्या गेले होते. ह्या अवशेषांबद्दल बर्याच कथा आहेत. ते जे मंदिर आहे, तिथे दर १२ वर्षांनी यात्रा होते, असं तिकडचे लोक सांगत होते. त्यांच्या मते चारशे-पाचशे वर्षांआधी ह्या मंदिरात दर्शनाला आलेली एक वरात बर्फात गाडली गेली होती. काय आहे ते माहीत नाही, पण ह्या मानवी अवशेषांचा आकार सामान्यपेक्षा बराच मोठा आहे, हे नक्की..