आज न्यूयॉर्कमधे बुद्धीबळाचा एक डाव सुरु होतोय. अजून बरोब्बर साडेतीन तासांनी अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२ वाजता. वयाच्या तेराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेला आणि आता बिल्बाओ इंटरनॅशनल मधे विश्वनाथन आनंदचा आव्हानवीर ठरवण्याच्या स्पर्धेतला खेळाडू नॉर्वेचा मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग!
मॅग्नुस फक्त १९ वर्षांचा आहे आणि आज जगातला अव्वल दर्जाचा खेळाडू समजला जातो. फिडेच्या यादीत तो आत्ता पहिल्या क्रमांकावर आहे!
न्यूयॉर्कमधल्या कूपर स्क्वेअर हॉटेलमधल्या पेंटहाऊस मधे हा सामना रंगेल. फ्रेंच ग्रँडमास्टर मॅक्झिम लाग्रा, अमेरिकन ग्रँडमास्टर नाकामुरा आणि हंगेरियन ग्रँडमास्टर ज्युडिथ पोल्गर हे तीघे खेळ्या सुचवतील, त्यांनी सुचवलेल्या खेळीवर जगभरातून लोक ऑनलाईन मतदान करतील आणि त्यातून बहुमताने विश्लेषण करुन नक्की खेळी ठरवली जाईल.
http://rwcc.g-star.com/
ह्या दुव्यावरती तुम्हाला हा सामना प्रत्यक्ष खेळलेला दिसेल.
ग्रँमा मॉरिस अॅशले आणि विख्यात गॅरी कास्पारोव हे दोघे ह्या खेळाचे विश्लेषण करतील!
तर ह्या मेजवानीचा आस्वाद जरुर घ्या! :)
(६४ घरातला)चतुरंग
प्रतिक्रिया
10 Sep 2010 - 5:58 pm | अवलिया
सामना झाला की त्याचे विश्लेषण रंगाशेटच्या समर्थ लेखणीतुन वाचण्यास आवडेल.
10 Sep 2010 - 6:06 pm | परिकथेतील राजकुमार
हेच बोल्तो.
बाकी मुव्ह सुचवणार्या लोंकांना काही खास क्वालिफिकेशन गरजेचे आहे का ? म्हणजे 'रेटिंग' वगैरे ?
10 Sep 2010 - 6:53 pm | चतुरंग
मूव सुचवता येणार नाहीये तर ३ ग्रँमा नी सुचवलेल्या खेळ्यांवरती तुम्ही मतदान करु शकाल. सर्वाधिक मतानुसार खेळी ठरवून ती केल्या जाईल! :)
खास रेटिंग किंवा क्वालिफिकेशन गरजेचे नाही तुम्ही ऑनलाईन जाऊन मत देऊ शकता!
11 Sep 2010 - 12:49 am | भडकमकर मास्तर
प्रिय ग्यारी कास्पारोव,
सप्रेम नमस्कार
तुला चेस तमाशात सहभागी झालेलं पाहून आश्चर्य वाटलं...
मान्य करतो, हा जो मलगा खेळायला येतो तो आपापल्या परिने गुणी आहे. बुद्धिबळात काही एक प्रयत्न करणारा आहे धडपडणारा आहे. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती तर असेलच नक्की) की तो केवळ एक खेळाचा बाजार आहे? तिथे तुझ्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे आंतरजालावरच्य मूर्खांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने जालीय आर्थिक राजकारणाचं असतं..
या मूववर मतदान करणार्या लोकांची अक्कल ती किती आणि असे मतदान वगैरे करून बुद्धिबळ खेळ होत नसतो हे कोणीतरी सांगा रे बाबा यांना ...... पोल्गर कास्पारोव वगैरे मंडळींनी या असल्या दिखाऊ तमाशात भाग घ्यावा हे पाहून वाईट वाटलं...
का ही अशी अधोगती आणि तीही अचानक?
अरे हा खेळ म्हणजे गाणंबजावणं नाही की जिथे फक्त एक एसेमेस पाठवून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या बुद्धिबळ खेळाची स्पर्धा आहे ना ती?
तू कसा काय असा जालीय बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास?
अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चा खेळ कर की.. खूप चांगला खेळतोस, अजूनही चांगला खेळशील.ब्बॉट्विनिक, फिशर्,कापाब्लान्का यांची नावं घेतली की चेस म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.या असल्या शोबाजीच्या वाममार्गाला कसाकाय लागलास रे तू?
मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांच्या खेळ्या ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत ज्ञानी जनजनांचा...जालीय मतदान पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..!
असो, जे मनात आलं ते सांगितलं...
तुझ्या खेळाचा नेहमीच चाहता
भडकमकर मास्तर
11 Sep 2010 - 4:30 am | शहराजाद
मास्तर, तुमच्याइतक्या कळकळीने नाही तरी ही स्पर्धा म्हणजे काहीशी ओढून ताणून नावीन्य आणण्याची युक्ती वाटली. काळ्याने जो मार खाल्ला तो जर असल्या बहुमताने ठरणाऱ्या खेळ्यांऐवजी एकच ग्रॅंडमास्टर खेळला असता तर खाल्ला असता का, असा प्रश्न पडला. टॅक्टिकल प्ले होणं ठीक आहे, पण स्ट्रॅटेजिक प्ले अशा सिस्टीममधून कसा येणार? चतुरंग त्याचं समर्पक उत्तर देतील अशी आशा आहे.
मात्र मास्तर, तुमच्या सहीतली चेष्टा इथे विसंगत वाटली... :)
11 Sep 2010 - 6:50 pm | llपुण्याचे पेशवेll
खल्लास. :)
12 Sep 2010 - 1:43 am | श्रावण मोडक
खल्लास झालो.
10 Sep 2010 - 7:05 pm | प्रभो
मी पण असेच म्हणतो.. :)
10 Sep 2010 - 10:39 pm | संजय अभ्यंकर
+१
10 Sep 2010 - 7:05 pm | विलासराव
चतुरंगजी.
10 Sep 2010 - 7:10 pm | यशोधरा
बुद्धीबळाच्या देवनागरीमध्ये भाषांतरीत केलेल्या नियमांचे प्रकाशन कधी? :)
10 Sep 2010 - 7:21 pm | चतुरंग
संपादित करुन निखिलकडे सोपवले आहे. प्रसिद्ध करण्यापूर्वी पीडीएफ करता येते का ते तपासून जरा नीटनेटके करुन देतो आहे तो. लवकरच प्रकाशित होईल.
10 Sep 2010 - 7:31 pm | यशोधरा
वा, मस्त!
10 Sep 2010 - 7:24 pm | चतुरंग
पानावरती सगळ्यात उजवीकडे वरच्याबाजूला Join the game म्हणून टॅब आहे तिथे क्लिकवून तुम्ही खेळात भाग घेऊ शकता. तुम्हाला chess.com वरती अकाऊंट काढण्याची विनंती होईल किंवा तुम्ही फेसबुक अकाऊंट वरुनही जॉइन करु शकता.
10 Sep 2010 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रंगासेठ, माहिती आणि दुव्याबद्दल आभारी....!
-दिलीप बिरुटे
11 Sep 2010 - 6:03 am | चतुरंग
ते दुर्दैवाने खरे ठरले असे म्हणायची वेळ यावी इतका वाईट झाला आजचा सामना.
----------------------------
ह्या सगळ्या प्रकाराबद्दल सविस्तरच लिहायला हवे.
प्रथमतः मला ज्यावेळी हे समजले की असा सामना होणार आहे त्यावेळी सहाजिकच माझ्या मनात त्याची तुलना १९९९ मधे कास्पारोव विरुद्ध जग ह्या सामन्याशी झाली. तो सामना आणि हा सामना ह्यात फारच फरक आहेत हे मला सगळे नियम वाचल्यावर समजले परंतु तोपर्यंत मी हा लेख लिहिलेला होता.
नियमातला सगळ्यात मोठा विनोद म्हणजे प्रत्येकाला खेळी करण्यासाठी १ मिनिट एवढाच वेळ देण्यात आला होता. आणि मॅग्नुस बरोबर खेळणार होते ते तीन ग्रँडमास्टर्स - ते खेळीचा पर्याय देणार आणि त्यापैकी एक खेळी इंटरनेटवरुन लोकांनी निवडायची असा सारा मामला होता - म्हणजे मुळात मॅग्नुस विरुद्ध ग्रँमा असाच सामना होता हे जग बीग ही सगळी सेल्समन पिच होती! ;) हे सगळे करायला १ मिनिटच देणे हे त्याहून हास्यास्पद होते!!
कास्पारोव विरुद्धचा सामना हा एका खेळीला २४ तास अशा प्रकारे खेळवला गेला आणि त्यात अक्षरशः हजारो लोकांनी भाग घेऊन खेळ्यांवर विचारविनिमय करुन मग खेळ केला होता. हा डाव तब्बल ४ महिने सुरु होता!
त्यामुळे सहाजिकच मॅग्नुसचे पारडे जड होते. तो एकटाच खेळणार आणि तीन ग्रँमा पैकी एकाची खेळी कितीही उत्कृष्ठ असली तरी बहुमताच्या जोरावर दुसरीच कुठलीतरी खेळी नक्की होऊन खेळली जाऊ शकेल (आणि ती शक्यता जास्त कारण नेटावरुन खेळणारे काही झाले तरी ग्रँमा दर्जाचे खेळायची संभावना ती किती?) अशा प्रकारे डाव सुरु झाला आणि साधारण १० खेळीपासूनच लोकांनी दिवे लावायला सुरुवात केली तेव्हाच कास्पारोव म्हणाला की एकूण सगळा प्रकार बघता हा डाव गेल्यातच जमा आहे!
अवघ्या दोन अडीच तासात आणि ४४ खेळ्यात डाव संपला. हा डाव बघितला तर अजिबात विश्लेषण वगैरे करायच्या पातळीचा डावच नाहीये!
------------------------------------
मग ह्या सगळ्या फियास्कोचे कारण काय असावे?
ह्या सगळ्या प्रकारामागे मला वेगळेच राजकारण दिसते आहे. ग्रँडस्लॅम मास्टर्सची पहिली फेरी ३ ते ८ सप्टेंबर अशी शांघायला झाली. त्यातून अॅलेक्सी शिरोव आणि व्लादिमीर क्रामनिक हे दोघे पुढच्या फेरीत गेले. ९ ते १५ ऑक्टोबर अशी बिलबाओ (स्पेन) मधे दुसरी फेरी होणार आहे. तिथे आनंद, मॅग्नुस कार्लसन, क्रामनिक आणि शिरोव खेळतील.
पुढे जानेवरीत कोरेस स्पर्धा आहे (म्हणजे ह्यावेळेपासून टाटा स्टील नावाने ती ओळखली जाईल कारण कोरेस त्यांनी विकत घेतलीये.)
ही सगळी तयारी २०१२ च्या विश्वविजेतेपदाच्या पायर्या आहेत! आता ह्यामागचे राजकारण समजू शकते. कार्लसनचा सल्लागार म्हणून कास्पारोव काम करतोय. तसेच कास्पारोवचे फिडेशी संबंध आता ताणलेले नसले तरी फारसे मित्रत्वाचेही नाहीत. फिडेच्या कार्यकारिणीवर कोणीही ग्रँडमास्टर्स नसून खेळातले फारसे न समजणारे इतरच लोक आहेत अशी त्याची कित्येक वर्षांपासूनची तक्रार आहे (त्यात तथ्यही आहे म्हणा). कास्पारोवचा डोळा फिडे अध्यक्षपदावर आहे. आजची जी इवेंट न्यूयॉर्कमधे झाली त्यातून दोन गोष्टी कास्पारोवला साधायच्या आहेत असे दिसते - एकतर त्याचा चेला कार्लसनला प्रोजेक्ट करणे आणि त्याल जिंकवून त्याचा दबदबा वाढवणे जेणेकरुन आनंदवर त्याचा अप्रत्यक्ष दबाव येईल आणि दुसरे म्हणजे आपली प्रसिद्धी वाढवून फिडेच्या अध्यक्षपदाकडे आपला घोडा दामटवणे!
अन्यथा आजच्या इवेंट (होय मी ह्याला इवेंटच म्हणेन) मधे इतका सहभाग घेण्याचे कास्पारोवला कारण दिसत नाही. ही स्पर्धा नव्हतीच हे मार्केटिंग होते. गाण्याच्या स्पर्धांचे किंवा नाचाच्या स्पर्धांचे जे पेव फुटले आहे तसे ह्या बुद्धीबळाचेही होऊ लागले आहे की काय ह्या चिंतेने मला मात्र बेचैनी आली आहे!
--------------------------------
एकूणच झटपट पब्लिसिटी आणि ताबडतोब किर्ती ह्याची लागलेली खोड जर वाढत गेली तर खरे तारे न चमकता क्षणभर तळपून लगेच विझणार्या उल्कांचे प्रमाण वाढत जाणार की काय असे वाटू लागते.
(विचारात पडलेला)चतुरंग
11 Sep 2010 - 3:02 pm | सुनील
सहमत.
जमाना मार्केटिंगचाच आहे.
11 Sep 2010 - 8:01 pm | संजय अभ्यंकर
"खरे तारे न चमकता क्षणभर तळपून लगेच विझणार्या उल्कांचे प्रमाण वाढत जाणार की काय असे वाटू लागते."
+१
भीती रास्त आहे/
12 Sep 2010 - 12:25 am | भडकमकर मास्तर
आमची भविष्यवाणी अशी खरी ठरली हे पाहून मज्जा आली...