फसवणूक-प्रकरण १४: एक नवी स्पष्ट दिशा

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
10 Jun 2010 - 9:51 pm

फसवणूक-प्रकरण १४: एक नवी स्पष्ट दिशा

© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

[मूळ लेखातील इंग्रजी शब्द संख्या: ९००७ शब्द. रूपातर मराठी शब्दसंख्या: ४८७६. संक्षिप्तीकरण=५३%)]

जानेवारी १९९७ ला क्लिंटन यांचा दुसरा कालावधी सुरू झाल्यावर कांहींच आठवड्यात नवाज़ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. क्लिंटन यांना १९९६च्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळाला होता पण त्याचवेळी पाकीस्तानी लोकशाहीतील लष्कराच्या सततच्या लुडबुडीमुळे पाकिस्तानी जनता निवडणूक प्रक्रियेला कंटाळून गेलेली असल्यामुळे तिला मतदानात फारसा रस नव्हता व त्यामुळे नवाज़ शरीफ यांचे मताधिक्य घटले होते!

राष्ट्राध्यक्ष कार्टर यांच्या १९७८ सालच्या भारतभेटीनंतर दुसर्‍या कुठल्याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने या भागाला भेट दिली नव्हती. या भागातील वाढती राजकीय अस्थिरता, जगभर दहशतवाद पसरविणार्‍या अतिरेकी संघटनांशी ISI चे घनिष्ठ संबध असल्याचा वाढता पुरावा आणि अण्वस्त्रप्रसाराचा धोका असूनही पाकिस्तानची ओसामा बिन लादेनबरोबरची जवळीक अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनही क्लिंटन यांचे परराष्ट्रमंत्री वॉरन क्रिस्टोफर यांनीही या भागाला भेट दिली नव्हती.

पत्नी हिलरी व कन्या चेल्सी यांच्या भारतभेटीत या दोघींचे 'जगातील सर्वात मोठी लोकशाही' या दृष्टिकोनातून भारताबद्दलचे मत खूपच अनुकूल झाले होते. क्लिंटन यांचे दक्षिण आशियाबद्दलचे उपपरराष्ट्रमंत्री कार्ल रिक इंडरफुर्थ[१] यांच्या मते भारताने क्लिंटनना बौद्धिक व आध्यात्मिक ओढ लावली होती. दक्षिण आशियाबद्दल अमेरिकेला वाटणारे महत्व ठसविण्यासाठी व तेथील राष्ट्रांबरोबरच्या संबंधात सुधारणा आणण्यासाठी क्लिंटननी क्रिस्टोफर यांच्या जागी संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूता मॅडेलाईन ऑल्ब्राईट यांच्याकडे परराष्ट्रमंत्रीपद व अमेरिकेचे भारतातले भूतपूर्व राजदूत टॉम पिकरिंग यांच्याकडे उपपरराष्ट्रमंत्रीपद दिले होते. पण या परिस्थितीत पाकिस्तान म्हणजे एक क्लिष्ट समस्या होती. अण्वस्त्रप्रसार, सनातनी गट, दहशतवादी गट, भारताबरोबरचे वितुष्ट अशी ही न संपणारी यादी होती! पाकिस्तानबरोबरच्या संबंधात अडचण होती परस्पर अविश्वासाची! 'कामापुरता मामा' या अमेरिकेच्या धोरणाऐवजी 'एक भरवशाचा मित्र' अशी प्रतिमा पाकिस्तानबरोबर उभी करणे जरूरीचे होते.

क्लिंटन यांच्या पहिल्या कालावधीत पाकिस्तानबद्दलचे धोरण अयशस्वी ठरले होते कारण आधी एक विघातक राष्ट्र अशी निर्भत्सना केलेल्या राष्ट्राला त्याचवेळी अनेक वर्षांपूर्वीच्या करारानुसार अण्वस्त्रवहनक्षम F-16 विमाने पुन्हा दिली गेली होती. पण पाकिस्तानने ही विमाने नाकारून आपले पैसे परत मागितल्यामुळे हे धोरण सपशेल फसले होते.

पण पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारणे जास्त-जास्त कठिण होत चालले होते. याला कारणे होती खानसाहेबांच्या दुबईहून केल्या जाणार्‍या उलाढालीतील प्रचंड वाढ व खानसाहेबांचे कार्य सार्‍या जगभर पसरल्याबद्दलची हेरखात्याकडून येणारी माहिती. शिवाय त्यांनी फेब्रूवारी १९९८ मध्ये हेंक स्लेबोज, ताहीर व ब्रि. सजवालसारख्या आपल्या दुबईस्थित सहकार्‍यांना, युरोपीय दलालांना व कहूता येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञांना बरोबर घेऊन आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांना भेटी दिल्या.

त्यांच्या आफ्रिका दौर्‍याचा 'धुलाई' केलेला अहवाल एक सनदी लेखापाल व खानसाहेबांचे एका सर्वात जुने मित्र अब्दुल सिद्दीकी[२] यांच्याकडून एका परिच्छेदात सादर केला गेला. सिद्दीकींचा मुलगा अबू बट्ट हा ताहीरच्या SMB Computers या उद्योगात भागीदार होता. फेब्रूवारी १९९८ मध्ये सिद्दीकी लंडनला असतांना त्यांना दुबईहून ताहीर यांनी फोन करून सांगितले कीं खानसाहेब टिंबक्टूचा दौरा आखत असून त्यांना खानसाहेबांच्या बरोबर प्रवास करायचे निमंत्रण दिले. खानसाहेबांच्याबरोबर कांहीं वेळ व्यतित करायला मिळणार या कल्पनेने सिद्दीकींचा आनंद गगनात मावेना!

१९९८ साली ताहीर खानसाहेबांच्या दुबई येथील कारभाराचे अनभिषिक्त सम्राट बनले होते व त्यांनी त्यांचे काका फरूख यांनी १९८०साली स्थापलेल्या SMB Computers या कंपनीद्वारा सेंट्रीफ्यूजेसच्या तंत्रज्ञानाच्या पाकिस्तानसाठी केलेल्या आयाती-निर्यातीतून बरीच संपत्ती कमावली होती. ही कंपनी पूर्वी श्रीलंकेतून फळफळावळीचा व्यापार करण्यासाठी व नंतर दुबईत मोठमोठ्या काँप्यूटर कंपन्याच्या वितरणकार्यासाठी स्थापलेली होती. या कारभाराच्या व्यवस्थापकाचे विनावेतन काम करणारे पीटर ग्रिफिन म्हणाले होते कीं ते येईपर्यंत इंग्रजी भाषेचा गंधही नसलेल्या ताहीरना कुठल्याही कंपनीचे वितरणाचे काम मिळाले नव्हते. ताहीर ग्रिफिनना चर्चा करण्यास सांगत. त्याद्वारे ग्रिफिननी Epson, Hewlett-Packard and Intel सारख्या कंपन्यांशी वाटाघाटी करून ताहीरना करोडो डॉलर्स मिळवून दिले.

पण आता ताहीरना काँप्यूटर व्यवसायात फारसा रस उरला नव्हता. त्यांनी भूतपूर्व सोविएत संघराज्यातील कझाकस्तान, अझरबाईजान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तानसारख्य राज्यांत कार्यालये उघडून या कंपन्याद्वारे युरोप व अमेरिकेतून सेंट्रीफ्यूजेसच्या घटकभागांची आयात करून ते दुबईद्वारे पाकिस्तानला पाठविण्याचा नवा व्यवसाय सुरू केला होता व काँप्यूटरचा व्यवसाय त्यांच्या सईद या भावावर सोपविला होता.

सिद्दीकी लंडनहून दुबईला आल्यावर खानसाहेबांनी त्यांची ओळख त्यांचे कॉलेजमधले सहकारी व डच व्यावसायिक हँक स्लेबोजबरोबर करून दिली. सिद्दीकी खानसाहेबांचे वैयक्तिक डॉक्टर व पाकिस्तानी लष्कराचे भूतपूर्व सर्जन जनरल ले. ज. डॉ. रियाझ चौहाननाही[३] भेटले. खानसाहेबांबरोबर सावलीसारखे असणारे ब्रि. सजवालही होतेच. सिद्दीकी, ताहीर यांचा खानसाहेबांबरोबरचा १९९८ चा आफ्रिकेचा दौरा खूप धावपळीत गेला. कॅसाब्लँकाला उतरल्यापासूनच त्यांचा दौरा शाही थाटात सुरू झाला. तिथे पाकिस्तानी दूतावासातील First Secretary इनायतुल्ला ककर यांनी स्वागत केले. पाकिस्तानचे मानद कौन्सुल जनरल हुसेन बिन जिलून यांनी खानसाहेबांच्या सन्मानार्थ खाना दिला. त्यावेळी पाकिस्तानचे राजदूत अझमत हुसेनही हजर होते.

दुसर्‍या दिवशी सगळे टिंबक्टूला गेले. खानसाहेबांनी त्यांना माली हे गणराज्य पहायचे आहे असे सिद्दीकींना सांगितले. माली एके काळी मुस्लिम साहित्य प्रकाशनाचे केंद्र होते. खानसाहेब तर कधीच सुटी घेत नसत. मग मालीला ते कां गेले? खानसाहेबांच्या निकटवर्तियांनुसार ते आपल्या कारवायांसाठी एक नवे-नवे तळ शोधत होते कारण दुबई आता प्रकाशझोतात आली होती. तिथे पाठविलेल्या प्रत्येक मालावर दुबईच्या कस्टम्सच्या लोकांचे लक्ष असे. आफ्रिकेतील कांहींशा अपरिचित देशाकडे असला माल वळविला तर दुबईवरील लक्ष कमी होईल असा त्यांचा आडाखा होता. खानसाहेबांना प्रकाशझोतात असून चालण्यासारखे नव्हते कारण त्यावेळी ते अतीशय संवेदनशील अशा Project A/B च्या विस्तारीकरणात गुंतले होते. या हॉटेलमध्ये भांडवल गुंतवून मालीमध्ये खानसाहेबांनी स्वतःला दृष्टीआड करण्यासाठी 'आच्छादन' बनवले व त्या हॉटेलला त्यांनी आपल्या पत्नीचे नाव दिले "हेंद्रीना खान हॉटेल"! 'डमी' व्यवसाय असा उघडपणे काढून खरा व्यवसाय लपविण्याची ही फारच नामी युक्ती होती.

खानसाहेब आफ्रिकेच्या दौर्‍यावरून आल्यानंतर दोनच महिन्यात पाकिस्तान पुन्हा एकदा अण्वस्त्रवहनक्षम घौरी क्षेपणास्त्रांच्या चांचणी उड्डाणावरून विवादात अडकला व त्यात अमेरिका पुन्हा खोड्यात आली. 'घौरी' उत्तर कोरियाच्या "ना-डॉन्ग" या क्षेपणास्त्रावर आधारित होते व त्या देशाबरोबरच्या अनेक वर्षांच्या सहकार्याचा परिपाक होते. या क्षेपणास्त्राच्या चांचणीबरोबरच खानसाहेबांनी त्यांच्या PAEC मधील प्रतिस्पर्ध्यांवर जणू विजयच मिळविला होता आणि नम्रतेची अजीबात बाधा न झालेल्या खानसाहेबांनी बाराव्या शतकातील अफगाण योद्धा सुलतान मुहम्मद घौरीचे[४] नांव या क्षेपणास्त्राला दिले. पण त्यामागे एक अतिशयोक्तीपूर्ण श्रेष्ठत्वाचे प्रदर्शन करण्याचाही हेतू होता.भारताने आपल्या मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रवहनक्षम 'पृथ्वी' या क्षेपणास्त्राला पृथ्वीराज चौहान या बाराव्या शतकातल्या दिल्ली-अजमेरच्या राजाचे नाव दिले होते. पण या राजाचा घौरीने पराभव केला होता व म्हणून त्याचे नांव खानसाहेबांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राला दिले. या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर या दोन नांवांना या दोन देशात गर्भितार्थ होता जो पाश्चात्य लोकांना कळण्यासारखा नव्हता.

या घटनेची दखल अमेरिकेने घेतली. १३०० किलो वजनाचा अणूबाँब १००० मैल वाहू शकणार्‍या घौरीने दिल्ली अण्वस्त्रहल्ल्याच्या टप्प्यात आणली होती. या घटनेचा पाकिस्तानला इतका हर्ष झाला होता कीं खानसाहेबांना पाठविलेल्या आपल्या अभिनंदनपर संदेशात पंतप्रधान नवाज़ शरीफ यांनी या घटनेला "एक मोठे यश" असे संबोधून "घौरी हे भारताच्या प्रक्षेपणास्त्र क्षेत्रातील वाढत्या प्रगतीला प्रतिबंध करू शकणारे एक प्रभावी अस्त्र आहे" असेही नमूद केले. पण खरे तर कहूताच्या तंत्रज्ञांना 'नो-डाँग' प्रक्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान पूर्णपणे आत्मसात् करता आले नव्हते म्हणून उतावीळ झालेल्या खानसाहेबांनी घौरी ऐवजी नो-डाँगलाच पाकिस्तानी लष्कराचा रंग लावून व तो वाळायच्या आतच ते प्रक्षेपणास्त्र डागले होते.

दरम्यान पाकिस्तानच्या दहशतवादाला व लष्करी शक्तीच्या प्रदर्शनाला नेस्तनाबूत करण्याच्या प्रतिज्ञेवर भाजप सत्तेवर आलेला होता.

पंतप्रधानपदावर नव्याने आलेल्या वाजपेयींच्यावर आल्या दिवसापासून अणूबाँबची चांचणी करण्याबाबत दबाव येत होता. त्यानुसार ११ मे १९९८ रोजी राजस्थान राज्यातील पोखरण[५] येथील वाळवंटात तशी चांचणी करण्यात आली. क्लिंटन सरकारला धक्काच बसला कारण CIA संघटना अशी माहिती पुरविण्यात अयशस्वी ठरली होती. उपग्रहांच्या रोजच्या वेळापत्रकांचा अभ्यास करून भारताने उपग्रह इतरत्र असतांना आपले काम करून अमेरिकेला हूल दिली होती!

त्यानंतर वाजपेयींनी "भारत आता सक्रीय धोरणासह पहिले पाऊल टाकून[*] काश्मीरमधील पाकिस्तानच्या लुडबुडीचा नायनाट करेल" अशी घोषणा केली. ’भाजप’तील कांहीं घटकांनी भारताने आता पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत काबीज करून पाकिस्तानवर चढाई करावी अशीही मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार वाजपेयींनी "पाकिस्तानने दक्षिण आशियातील नवी राजकीय व भौगिलिक सत्यता समजून घ्यावी" अशी इस्लामाबादला ताकीद दिली. एका घटनेने भारताने पाकिस्तानच्या बेग व गुलप्रणीत परमाणू संरक्षक छत्रीतील हवाच काढून टाकली. या सत्यतेला उत्तर द्यायचा एकच मार्ग पाकिस्तानकडे होता.

या घडामोळींमुळे दक्षिण आशियाबद्दलच्या परराष्ट्रीय धोरणात हळूहळू बदल करण्याची क्लिंटन यांनी योजना बारगळली व या भागात शांती प्रस्थापित करण्याचे त्यांचे स्वप्न धुळीला मिळाले.

पाकिस्तानने पाठोपाठ त्यांच्या अणूबाँबची चांचणी करू नये म्हणून क्लिंटननी स्वतः शरीफना फोन केला व १९९३ सालापासून रेंगाळलेल्या F-16 विमानांच्या व्यवहाराला पुन्हा गती देण्याचा प्रयत्न केला व शरीफना हवे-हवेसे वाटणारे 'व्हाईट हाऊस'ला भेट देण्याचे निमंत्रणही दिले. पाठोपाठ उपपरराष्ट्रमंत्री स्ट्रोब टॅल्बट यांच्या नेतृत्वाखाली इंडरफुर्थव व अँथनी झिन[६] यांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही पाठविले. भडक डोक्याने न वागता सबूरीने वागायला सांगायच्याबरोबरच F-16 विमानेही देऊ करायची त्यांची योजना होती. पण ती योजना त्यांच्या तोंडावर फेकत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री गोहर याकूब[७] यांनी त्या सल्ल्याची "सडका व पूर्णपणे कालबाह्य" अशी टर उडवत F-16 विमानांच्या व्यवहाराची "एक भिजलेले घोंगडे" अशी संभावना केली. शरीफ यांनी हा सल्ला मान्य केला तर पाकिस्तानी लोक रस्त्यावर उतरतील असेही याकूब म्हणाले. पाकिस्तानकडे अणूबाँब आहे हे अमेरिकेला माहीत होते, त्याचा आधार घेऊन टॅल्बट म्हणाले कीं पाकिस्तानला अशी चांचणी न करताही शत्रूवर वचक ठेवता येईल. त्यावर गोहर उपहासाने म्हणाले कीं लष्करात कुठलाही पदार्थ-एकादी पाण्याची बाटलीसुद्धा-घ्यायचा असेल तर तो वापरून पहावा लागतो! ही परिस्थिती अगदी निराशाजनक होती पण अमेरिकेने आधीपासून पाकिस्तानला अणूबाँबच्या निर्मितीत व त्याच्या वहनासाठी F-16 विमाने देण्यात मदत केलेली असल्यामुळे आता रागावण्यात कांहींही अर्थ नव्हता.

अमेरिकेचे शिष्टमंडळ रावळपिंडीला गेले व तिथे त्यांची चर्चा पाकिस्तानचे अमेरिकेत शिकलेले लष्करप्रमुख जहांगीर करामत यांच्याबरोबर झाली. त्यावेळी जहांगीर म्हणाले कीं भारताच्या अण्वस्त्रचांचणीला कसे प्रत्युत्तर द्यावे याबद्दल त्यांचा खूप विचार चालू आहे. मग टॅल्बट व झिनी शरीफना भेटले. त्यांची छोटी व गुबगुबीत छबी पाहून ते पंतप्रधानपदापर्यंत पोचलेच कसे याचे टॅल्बटना आश्चर्य वाटले. पण शरीफना ISI ने सिंहासनावर बसवले होते व ते अमेरिकेला माहीत होते!

शरीफनी अमेरिकन शिष्टमंडळाला सांगितले कीं अणूबाँबबद्दल निकराचा निर्णय घेण्यासाठी ते पुरेसा वेळ पंतप्रधानपदावर रहातील का हीच त्यांना सगळ्यात जास्त भीती होती! पण अमेरिकेच्या शाही दौर्‍यात त्यांना खूपच रस असलेला दिसला. क्लिंटन यांचा दक्षिण आशियाला शरद ऋतूत भेट द्यायचा बेत ठरत होता. त्यानुसार टॅल्बट त्यांना म्हणाले कीं जर पाकिस्तानने अण्वस्त्रचांचणी केली नाहीं तर त्याबद्दल कृतज्ञता दर्शवण्यासाठी या दौर्‍यादरम्यान क्लिंटन पाकिस्तानला येतील व शरीफना अमेरिकाभेटीचे निमंत्रण देतील व त्यानुसार ते अमेरिकेला भेट देऊ शकतील. पण शरीफ यांची या निर्णयाबाबत चुळबुळ सुरू होती. क्लिंटननी दिल्लीची भेट रद्द करून फक्त पाकिस्तानला भेट द्यावी असा आग्रह शरीफ यांनी धरला. क्लिंटन यांचा भारताला येण्याचा निश्चय झाला असल्यामुळे हे शक्य नव्हते. त्यावर शरीफ वरवर फारच दुःखी झालेले दिसले, पण आतल्या आत या जागतिक घडामोडींच्या केंद्रभागी असल्याबद्दल व 'व्हाईट हाऊस'मधून वारंवार येणार्‍या फोनमुळे ते खूष झाले होते. अमेरिकन शिष्टमंडळाला व क्लिंटननाही वाटले कीं त्यांना पाकिस्तानला अण्वस्त्रचांचणीपासून दूर ठेवण्यात यश मिळाले होते, पण.....

बैठकीच्या शेवटी शरीफनी टॅल्बटना बाजूला नेले व म्हणाले कीं अमेरिकनांच्या इच्छेनुसार त्यांनी जर अण्वस्त्रचांचणी करायचे टाळले तर पुढच्यावेळी टॅल्बट इस्लामाबादला येतील तेंव्हां त्यांना एक तुळतुळीत दाढी केलेल्या पंतप्रधानाऐवजी एकाद्या लांब दाढी असलेल्या सनातनी पंतप्रधानाशी चर्चा करावी लागेल! याची प्रचीती लागलीच आली कारण त्याचवेळी ओसामा बिन लादेन यांनी कंदाहार या त्यांच्या मुख्यालयातून "सर्व मुस्लिम देशांनी, खास करून पाकिस्तानने, अण्वस्त्रसज्ज होऊन ज्यू-ख्रिश्चन युतीने केलेल्या शतृत्वाच्या योजनांना धुळीला मिळवावे" असे निवेदन जारी केले! नुकतेच खैबर खिंडीच्या तोंडात परमाणूद्रव्य सापडले होते व भारताच्या अण्वस्त्रचांचणीनंतर पाकिस्तानात झालेल्या सनातन्यांच्या निदर्शनांत पाकिस्तानी लष्कराला उद्देशून "आमच्या हाती अण्वस्त्रे द्या" अशा घोषणांचे फलक होते. त्यानुसार ओसामांचे म्हणणे गांभिर्याने घेणे जरूरीचे होते! त्यात १९९८ साली अमेरिकेविरुद्ध जागतिक पातळीवरचे जिहाद पुकारले गेले होते आणि ABC News वर प्रसारित केलेल्या मुलाखतीत बिन लादेन यांनी "अमेरिकेला काळा दिवस पहावा लागेल" अशी गर्भित धमकीही देत अमेरिकेविरुद्ध युद्धच पुकारले होते!

१५ मे रोजी अमेरिकन शिष्टमंडळ अद्याप तिथेच असतांना शरीफनी त्यांच्याशी लबाडी केली. गुप्तपणे त्यांनी पंतप्रधानाच्या कार्यालयात संरक्षणसमितीची बैठक बोलावली व त्यात वित्तमंत्री, परराष्ट्रमंत्री, परराष्ट्रसचीव, ज. करमतसह तीन्ही सेनादलांचे प्रमुख हे लोक सहभागी झाले. परदेशी गेलेल्या PAEC च्या प्रमुखांच्या (डॉ. इश्फाक अहमद) जागी भुत्तोंच्या वेळेपासून परमाणूकार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणारे मुबारकमंद आणि KRL कडून पाकिस्तानी अणूबाँबचे पिताश्री यांच्याकडून संरक्षणसामितीला खास माहिती मिळायची होती.

इकडे टॅल्बट य़ांचे शिष्टमंडळ त्यांच्या युक्तिवादाच्या परिणामकारतेबद्दल चर्चा करत असताना शरीफ यांचे युद्ध मंत्रीमंडळ (War cabinet) पाकिस्तानने अण्वस्त्रचांचणी करावी कीं नाहीं व करायची असे ठरल्यास त्याच्यावर PAEC व KRL यापैकी कुणाचे पर्यावेक्षण असावे या दोन-कलमी कार्यक्रमाबद्दल चर्चा करत होते. ही चर्चा अनेक तास चालली व त्यात वित्तमंत्री असलेल्या सरताज अजीज यांनी बजावले कीं अशी अण्वस्त्रचांचणी केल्यास पाकिस्तानवर आर्थिक नाकेबंदीला तोंड द्यायची वेळ येईल व त्यात पाकिस्तानची ससेहोलपट होईल. पण एकदा अण्वस्त्रचांचणी करायची असा निर्णय घेतल्यावर कुणी करायची याबद्दल खूप वादविवाद झाला.

डॉ. मुबारकमंद यांनी सांगितले कीं भारताच्या अण्वस्त्रचांचणीतील अण्वस्त्रांची शक्ती त्यांच्या १९७४ सालच्या अण्वस्त्रांइतकीच होती. मुबारकमंद म्हणाले त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्यास ते हिरोशिमावर टाकलेल्या अणूबाँबपेक्षा जास्त शक्तीच्या-३० ते ४० किलोटनच्या-अण्वस्त्रांची चांचणी करायला १० दिवसात तयार होतील.

खानसाहेबांनी सांगितले कीं भुत्तोंनी दिलेली जबाबदारी पाड पाडण्यात PAEC पूर्णपणे अयशस्वी ठरली होती व त्यांनी अनेक वर्षांचा व कोट्यावधी डॉलर्सचा विनाकारण चुराडा केला होता. शेवटी युरेनियमचे अतिशुद्धीकरण करण्यात KRL ला सर्वप्रथम यश आले होते व त्यांनी या युरेनियमचे धातूमध्ये रूपांतर करून त्याचे अर्धगोलाकृतीच्या आकारात machining करून १९८४ सालीच अशा अणूबाँबची Cold test सुद्धा पार पाडली होती. तसेच १९९८साली कहूतानेच दिल्लीच्या लोकसभेच्या खिडाक्यांच्या काचा फोडू शकणार्‍या पहिल्या प्रक्षेपणास्त्रांची यशस्वी चांचणी केली होती. तेही १० दिवसात अण्वस्त्रचांचणी करण्यास सज्ज होते. पण एका क्षेत्रात PAEC पुढे होती कारण त्यांच्याकडे बलुचिस्तानातील 'चगाई' गावात अशा चांचण्यांसाठी लागणारे बोगदे तयार होते. नवाज़ शरीफ याचा निर्णय घेऊ शकले नाहींत व त्यांनी कुठलाही निर्णय न देता बैठक थांबविली.

"आपण तिथे असताना तरी पाकिस्तानने अण्वस्त्रचांचणी केली नाहीं" अशा विचाराने निराश झालेल्या इंडरफुर्थसह अमेरिकन शिष्टमंडळाने पाकिस्तान सोडले. त्याच वेळी डॉ. इश्फाक अहमद परतले व त्यांनी अण्वस्त्रचांचणीची जबाबदारी PAEC लाच द्यावी असा आग्रह धरला. शरीफ तिकडे झुकू लागल्यावर खानसाहेबांनी करामत यांच्याकडे तक्रार केली. शेवटी उघड-उघड दोघांत वादविवाद होऊ नये म्हणून शेवटी दोघांना संयुक्तपणे जबाबदारी देण्यात आली. स्वतःकडूनच "पाकिस्तानच्या अणूबाँबचे पिताश्री" ही मिळविलेल्या खानसाहेबांना अण्वस्त्रचांचणीपासून दूर ठेवणे शरीफना बरोबर वाटले नाहीं.

१९ मे १९९८ रोजी PAEC चे शंभरहून जास्त तंत्रज्ञ विमानाने चगाईला नेण्यात आले. चांचण्यासाठी लागणारे बोगदे उघडण्यात आले. डॉ. अहमद व डॉ. मुबारकमंद यांनी असलेले पाच बोगदे व एक जवळच असलेला खरन वाळवंटातील एक जास्तीचा बोगदा असे सहा बोगदे वापरायचे ठरविले. पाकिस्तानी शास्त्रज्ञांनी आपले सर्व प्रयत्न चांगल्यापैकी लपविण्यात यश मिळविले होते. तो आसमंत एकाद्या 'वस्ती'सारखा (Hamlet) दिसेल अशी व्यवस्था केली होती. चांचणी अगदी तोंडावर आलेली असतांना शरीफ यांनी मुकारकमंद यांना सांगितले, "डॉक्टरसाहेब, कांहींही झाले तरी ही चांचणी यशस्वी झालीच पाहिजे. आपल्याला अयशस्वी होणे परवडाणारच नाहीं. आपण जर अयशस्वी झालो तर आपण जिवंत रहाणार नाहीं. हा पाकिस्तानच्या दृष्टीने कसोटीचा क्षण आहे कारण जर आपण अयशस्वी झालो तर इस्रायल आपल्या परमाणूकेंद्रावर हल्ला करणार आहे." खरे तर ही 'थाप' शरीफ यांनी आपल्या चांचणीचे पाश्चात्य राष्ट्रांत समर्थन करण्यासाठी पसरविली होती!

शरीफ यांनी नंतर सांगितले कीं बरेच देश पाकिस्तानच्या परमाणूसंबंधींच्या सुविधांवर हल्ला करणार आहेत अशी गुप्तहेरसंघटनेमार्फत मिळालेली माहिती म्हणून एक आवई पाकिस्ताननेच पसरविली होती. पाकिस्तानला इस्रायलच्या थेट हल्ल्याची खरेच भीती होती. त्यामुळे परमाणूसंबंधीच्या पाकिस्तानच्या ध्येयाआड कुणीही येणार नाहीं अशी व्यवस्था केलेली होती व म्हणूनच ही गोंधळात टाकणारी थाप पसरविलेली होती. पण अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण समितीचे सभासद ब्रूस रीडेल यांनी इस्रायलच्या लष्करप्रमुखाकडून ही थाप असल्याची खात्री करून ती माहिती पाकिस्तानच्या राजदूताला दिली होती व 'तुमच्या थापा आम्ही स्वीकारणार नाहीं' असे पाकिस्तानला सांगितले. थोडक्यात ही चांचणी केल्यावर जी शिक्षा दिली जाईल ती पाकिस्तानला भोगावी लागेल असा इशाराच अमेरिकेने दिला होता.

PAEC ने कुठलाही धोक घेतला नव्हता. पाकिस्तानने आपली सर्व अण्वस्त्रें सुटी करून (knocked-down condition) रावळपिंडीच्या चक्लाला हवाईतळावरून दोन C-130 सामानवाहू विमानात चढवून हलविली होती. बाँबची यंत्रणा, HMX ज्वालाग्राही भिंगे आणि त्याच्या संरक्षक पेट्या (casings) हे सर्व घटकभाग आणि युरेनियमचे घटकभाग व बेरिलियम/युरेनियम२३८ची संरक्षक वेष्टणे, युरेनियम २३५ चा गाभा हे सर्व साहित्य वेगवेगळ्या विमानांतून हलविले गेले होते. पाकिस्तानी हवाईदलाची चार F-16 विमाने एका विमानातून दुसर्‍या विमानावर मारा करू शकणार्‍या[९] प्रक्षेपणास्त्रांसह या मालवाहू विमानांना संरक्षण देण्यासाठी सोबत पाठविली होती व कुणी हवाई चांचेगिरीची हालचाल केल्यास अथवा वाहतूक करणारी विमाने पाकिस्तानी हद्दीच्या बाहेर गेल्यास ती गोळ्या घालून खाली पाडण्याच्या आज्ञाही दिल्या होत्या.

डॉ. मुबारकमंद यांच्या देखरेखीखाली हे सर्व घटकभाग बोगद्यांच्या एका टोकाला असलेल्या खोलीत जुळविण्यात आले. हे सर्व तंत्रज्ञ मानसिक तणावाखाली असूनही चिडचिड न करता अतीशय सौहार्द्रपूर्ण वातावरणात काम करत होते. सर्व भागांना आपापसात जोडणार्‍या सर्व तारा अकरा किलोमीटर्सवर असलेल्या Command Centre ला आणण्यात आल्या. आणि २६ मे रोजी सर्व बोगदे ६००० पोती ओले सिमेंट ओतून व १२००० पोती वाळू घालून बंद करण्यात आले.

२७ मे रोजी शरीफ यांनी क्लिंटन यांना फोन करून त्यांची निराशा केल्याबद्दल माफी मागितली व त्यांच्यावर असलेल्या दबावामुळे ते असे करत आहेत असेही शहाजोगपणे सांगितले. २८ मे रोजी भूकंपांच्या नोंदी स्वयंचलितपणे करणारे पाकिस्तानातील दुवे जगाच्या इतर दुव्यापासून तोडण्यात आले व दुपारी अडीच वाजता पाकिस्तानी वायुदलाच्या Mi-17 जातीच्या हेलीकॉप्टरमधून इश्फाक अहमद, मुबारकमंद, खानसाहेब व त्यांचे निकटचे सहकारी फरूक हशमी व जाविद मिर्झा निरीक्षणकक्षात आले. खानसाहेब व PAEC यांच्यातील संबंध लक्षात घेऊन अणूबाँब डागण्याची कळ दाबण्याचा सन्मान ज्याने या विद्युतमंडलाची संरचना केली होती त्या महंमद अर्शद नावाच्या तरुण शास्त्रज्ञाला दिला गेला.

दुपारी ३:१६ वाजता "अल्हम्दुलिल्ला" (All praise be to Allah) असे म्हणून त्याने काळ दाबण्याच्या सहा पावलांतील पहिले पाऊल टाकले. 'रास को' पर्वतराजीत खोलवर असलेल्या अणूबाँबना वीजपुरवठा झाला व त्यानंतर ३० सेकंदांनी HMX पेटले व परमाणूंचे विघटन होऊ लागले. थोड्याच वेळात साखळी प्रक्रियांना (chain reaction) सुरुवात झाली आणि रास को पर्वत आणि निरीक्षणकक्ष असे दोन्ही हादरले. इति उष्णतेमुळे ग्रनाईटच्या पर्वताची बाजू गडद करडी होती ती पांढरी झाली व सर्व शास्त्रज्ञांच्या तोंडातून 'अल्ला-हू-अकबर'चा घोष सुरू झाला. आणि पाकिस्तान जगातले सातवे अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले! जरा धूळ खाली बसल्यावर सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते आणि सैनिक एका ऐतिहासिक छायाचित्रासाठी कॅमेर्‍यापुढे उभे राहिले. त्यात मध्यभागी खानसाहेबांची सर्वांपेक्षा फूटभर उंच अशी हंसरी मूर्ती होती व कुणाच्याही चेहेर्‍यावर आपापसातील छुप्या दुष्मनीचा लवलेशही नव्हता.

वॉशिंग्टनमध्ये 'व्हाईट हाऊस'च्या गुलाबपुष्पवटीत (Rose Garden) एका तातडीने बोलावलेल्या पत्रकारपरिषदेला संबोधित करताना क्लिंटननी या चांचण्यांचे स्वतःचाच पराजय करणार्‍या, उधळपट्टीच्या व धोकादायक असे वर्णन करून या चांचण्यामुळे पाकिस्तान व भारत या दोन्ही देशांतील सामान्य जनता जास्त गरीब व जास्त असुरक्षित होईल असे सांगितले.पण पाकिस्तानी लोकांना या चांचण्या अमोल अशी घटना होती. शरीफ यांनी चित्रवाणीवरून "आज पाकिस्तानने (भारताबरोबरचा) हिशेब पूर्ण केला आहे आणि पाकिस्तानला आपल्या भविष्यावर पूर्ण विश्वास आहे" असे जाहीर केले! पाकिस्तानी जनता रस्त्यावर आली आणि त्यानी खानसाहेबांचे खर्‍या आकाराचे पुठ्ठ्यात कापलेले फोटो दिव्यांच्या खांबा-खांबावर आणि सरकारी कचेर्‍यांवर लावले होते. त्यांच्या 'हिलसाईड रोड'वरच्या घराजवळच्या फैसल मशीदीत अणूबाँबच्या पिताश्रींच्या सन्मानार्थ नमाजही पढण्यात आला.

खानसाहेब त्यांच्या कळसाला पोचले असले ते बर्‍यापैकी मोजक्या शब्दात वार्ताहारांशी बोलले व त्यांनी सांगितले कीं पाकिस्तानने भारताला अगदी उचित उत्तर दिलेले आहे. पाकिस्तानचा एक अणूबाँब ३५-४० किलोटनाचा होता व इतर छोटे प्रक्षेपणास्त्रांवरून वापरायचे अणूबाँब होते. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी खानसाहेबांना आणखी एकदा निशान-ए-इम्तियाज़ हा सर्वोच्च किताब बहाल केला. खानसाहेबांचे समर्थक व भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष इशाक खान यांनीही त्यांचे अभिनंदन करत पाकिस्तान ऑब्झर्वर या वृत्तपत्रात लिहिले कीं पाकिस्तान त्याच्या सार्‍या शास्त्रज्ञांचा ऋणी आहे[१०]. KRL मध्ये बनविलेले अतिशुद्धीकृत अण्वस्त्रक्षम युरेनियम वापरून त्यांनी थोड्या वेळात जुळविता येईल असा अणूबाँब बनविला आहे.

एरवी कांहींच अभिमानास्पद न अनुभवलेल्या पाकिस्तानच्या चौदा कोटी लोकांचा आनंदोत्सव संपायची चिन्हे दिसत नव्हती. चांचण्यांची स्तुती करण्याची जणू स्पर्धाच चालली होती. 'कास रो' पर्वताच्या प्रतिकृती इस्लामाबाद, कराची व लाहोरच्या रस्त्यांवर कोपर्‍या-कोपर्‍यावर उभ्या केल्या गेल्या. वृत्तपत्रांनी खास अंक काढले. युद्धाच्या वातावरणाचे रूपांतर हळू-हळू जत्रेसारख्या आनंद-मेळाव्यांत होऊ लागले. एका पुरवणीचा मथळा होता "नवी स्पष्ट दिशा: पाकिस्तानची एका जास्त चांगल्या भविष्यकाळाकडे वाटचाल"[११] व त्यातली "नवी स्पष्ट" या अक्षरांमागे आकाशात डागलेल्य़ा 'घौरी' प्रक्षेपणास्त्राची पार्श्वभूमी होती!

पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज झाल्याच्या बेहोषीत होता आणि फारच उदार मनःस्थितीत होता.

अमेरिकेला खात्री होती कीं पाकिस्तानने आपले तंत्रज्ञान विकायला काढले होते. इस्रायल, भारत व जर्मनीने यांनी वारंवार "पाकिस्तानने अण्वस्त्रविक्रीचा काळा बाजार मांडला आहे" दिलेल्या ताकीदींवर आता अमेरिकेचा विश्वास बसू लागला होता. पाकिस्तानच्या अण्वस्त्रचांचणीनंतर एकच आठवड्यात हिलसाईड रोडवरच्या KRL च्या अतिथीगृहाबाहेर आणि खानसाहेबांच्या घरापासून कांहीं मीटर्सच्याच अंतरावर उत्तर कोरियाच्या एका महिलेचा अगदी जवळून गोळी मारून खून केला गेला. ती उत्तर कोरियाच्या दूतावासातील आर्थिक बाबींचे काउन्सेलर व अण्वस्त्रप्रसारसंबंधात ज्यांच्यावर CIA कडून पाळत ठेवली गेली होती अशा 'कांग थाए-युन' यांची पत्नी होती व ती कांहीं संवेदनशील माहिती पाश्चात्य राष्ट्रांना देणार असल्याच्या संशयावारून तिला ISI च्या लोकांनीच ठार मारले होते. जसजसे अमेरिकन व ब्रिटिश हेरखात्याचे अधिकारी याबाबतीत खोलात जाऊ लागले तसतशी त्यांना कांग यांच्याबद्दल नवीन माहिती हाती पडू लागली. कांग हे त्यांच्या राजनैतिक जबाबदार्‍याखेरीज Changgwang Sinyong Corporation (CSC), उर्फ the North Korean Mining Development Trading Corporation या कंपनीचेही प्रतिनिधी होते व या कंपनीनेच १९९४ साली 'नो-डाँग' प्रक्षेपणास्त्रें पाकिस्तानला पुरविलेली होती. त्या काळात उत्तर कोरियाच्या दूतावासात काम करणार्‍या सर्वांचे महत्वाचे काम होते मिळेल तिथून अण्वस्त्रनिर्मितीबद्दलचे तंत्रज्ञान गोळा करणे आणि इस्लामाबादला कांग यांचे हेच महत्वाचे काम होते. पाश्चात्य हेरखात्यांच्या माहितीनुसार कांग खूपदा खानसाहेबांना त्यांच्या घरी भेटत असत आणि पीटर ग्रिफिन यांच्या सांगण्यानुसार उत्तर कोरियाचे बरेच लोक कायम KRL च्या अतिथीगृहात वस्तीला असत.

ग्रिफिन त्यांच्या कामासाठी KRL च्या अतिथीगृहात रहात तेंव्हां त्यांना हे लोक नेहमी दिसायचे. पण उत्तर कोरियाच्या लोकांना फारसे इंग्लिश येत नसल्याने त्यांच्यात संभाषण फारसे होत असे. ग्रिफिन यांच्याकडून मिळालेली माहिती CIA ने जमा केलेल्या माहितीशी तंतोतंत जुळत होती. १९९८ मध्ये अमेरिकेच्या उपग्रहांनी उत्तर कोरियाचे तंत्रज्ञ आणि मापनतज्ञ सरगोढ्याच्या F-16 च्या हवाईतळावर व सीमेवरील शस्त्रागारावर उतरलेले पाहिले होते. सरगोढ्याहून पकिस्तानी हवाईदलाने F-16 च्या वैमानिकांची कमी उंचीवरून 'डमी' अणूबाँब टाकण्याची क्षमता तपासून पहाण्यासाठी एक सराव सुरू केला होता. हीच ती विमाने कीं जी (रिचर्ड बार्लोंविरुद्ध कट करून) अण्वस्त्रवहनक्षम नाहींत असे सांगून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाची दिशाभूल करण्यात आली होती. नंतर मार्च १९९८ मध्ये उत्तर कोरियाचे लष्करप्रमुख आणि सैनिकी डावपेच दलाचे प्रमुख सरगोढ्याला आले. या घडामोडींवरून CIA ने अनुमान काढले कीं उत्तर कोरियाने पाकिस्तानच्या Firing range च्या सुविधांपर्यंत प्रवेश मिळविलेला असून या दोन देशांमधील करार अधिक निःसंदिग्ध होत होते.

अमेरिकेच्या संरक्षण गुप्तहेरसंघटनेने (DIA) याहूनही निकटतम सहकाराच्या घटना पाहिल्या होत्या. उत्तर कोरियाने 'ताएपोडाँग-१' या नावाच्या घनरूपातील इंधन वापरणार्‍या प्रक्षेपणास्त्राची चांचणी केली होती. हे तंत्रज्ञान पाकिस्तानच्या 'हत्फ' जातीच्या चिनी M-11 च्या तंत्रज्ञानावर आधारित प्रक्षेपणास्त्रात वापरले होते. यावरून या दोन देशांत तंत्रज्ञानाची देव-घेव दोन्ही दिशांनी चालली होती हे उघड झाले. पाकिस्तान मालाची ने-आण करण्यासाठी Shaheen Air International[१२] ही पाकिस्तानचे Air Chief Marshal कलीम सादत यांच्या मालकीची विमान कंपनी किंवा हवाईदलाची C-130 जातीची वहातूक करणारी विमाने वापरत असे.

पण या दोन देशांतले सहकार्य फक्त प्रक्षेपणास्त्रांपुरते नव्हते. CIA च्या माहितीनुसार पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील अण्वस्त्रचांचणीच्या प्रसंगी उत्तर कोरियाहून त्यांचे काउन्सेलर कांग व एक तंत्रज्ञांचा संघ हजर होता. हा संघ 'प्रेक्षक' म्हणून आलेला नव्हता हे उघड होते. अण्वस्त्रचांचणीच्यावेळी खास 'वासू' (sniffer) विमानांच्या सहाय्याने जमविलेल्या हवेचे लॉस अलामॉस येथील परमाणू-प्रयोगशाळेत पृथःकरण केले गेले त्यावरून उघड होते कीं शेवटच्या खरन वाळवंटात केलेल्या अणूबाँबमध्ये प्लुटोनियम वापरण्यात आले होते. या जातीच्या अणूबाँबवर उत्तर कोरियात काम चालले होते, पाकिस्तानमध्ये नव्हे. त्यावरून अनुमान काढण्यात आले कीं हा शेवटचा स्फोट उत्तर कोरियाच्या वतीने पाकिस्तानने केला होता व त्यावरून CIA च्या अंदाजापेक्षा उत्तर कोरिया अण्वस्त्रांच्या निर्मितीक्षेत्रात बराच पुढे गेला होता.

पाकिस्तानी लष्कराच्या व खानसाहेबांच्या निकटवर्ती असलेल्या ज्येष्ठ सूत्रांनुसार कांग यांच्या पत्नीचे शव ज्या विमानातून नेण्यात आले त्याच विमानातून खानसाहेबही पाच ट्रंका (त्यातल्या तीन तर पेटारे होते) घेऊन उत्तर कोरियाला गेले होते. हे सामान कुणालाही तपासू दिले गेले नव्हते. या पेटार्‍यांत P-1, P-2 सेंट्रीफ्यूजेस, ड्रॉइंग्ज, तांत्रिकी डेटा व अतिशुद्धीकरणासाठी कच्चा माल या नात्याने लागणारे uranium hexafluoride होते. पाकिस्तानसारखाच उत्तर कोरियाही आता एक प्रचंड डोकेदुखी होऊ लागला होता आणि हेरखात्यांच्या माहितीनुसार उत्तर कोरिया आता प्लुटोनियमच्या पुनःप्रक्रियेबरोबरच युरेनियम अतिशुद्धीकरणाची योजनाही राबवू लागला होता!

क्लिंटननी उत्तर कोरियाच्या प्रगतीबद्दल माहिती मिळविण्यासाठी व दरमहा अनेक वेळा उत्तर कोरियाची वारी करणार्‍या खानसाहेबांवर नजर ठेवण्यासाठी 'व्हाईट हाऊस'मध्ये एक छोटी समिती बनविली. त्यात रॉबर्ट गालुच्ची, रॉबर्ट आईनहॉर्न, कार्ल इंडरफुर्थ, गेरी सामोरे[१३]सारखे कुशल लोक होते. पाकिस्तानच्या आणि खानसाहेबांच्या भानगडीत खीळ घालण्याचे हे पहिले पाऊल होते. पण या समितीतील सभासद कामाच्या ओझ्याखाली आधीच इतके दबले होते कीं त्यांना या कामाला वेळ देणे फारच अवघड होते!

पाकिस्तानच्या बेकायदेशीर व्यापाराबद्दल माहितीची रेलचेल असूनही कित्येक वर्षांत कधी संघटितपणे अभ्यास केलाच गेलेला नसल्यामुळे ही माहिती सैरभैर पसरली होती. कारण खानसाहेबांच्या 'लीलां'वर अमेरिकन सरकारचे गुप्तहेरखाते, संरक्षण खाते, परराष्ट्रमंत्रालय अशा अनेक संघटना वेगळ्या-वेगळ्या लक्ष ठेवून असल्यामुळे कुणालाच पूर्ण माहिती नव्हती.

या नव्या समितीचे लक्ष होते ब्रिटिश MI6 च्या माहितीवर. MI6 ची खात्री झाली होती कीं खानसाहेब त्यांच्या उत्तर कोरियाबरोबरच्या संबंधांचा दुरुपयोग करून कहूतासाठी लागणार्‍या साहित्याबरोबरच पाकिस्तानच्या बेकायदा निर्यातीसाठी लागणार्‍या 'Rare' metals, लोहचुंबक आणि तसल्याच सहजपणे विकत न मिळणार्‍या इतर साहित्याचा प्रचंड साठा करत होते. १९९७ मध्ये लंडनच्या गॅटविक विमानतळावरील कस्टम्सच्या अधिकार्‍यांनी मॉस्कोहून कान यांच्याकडे इस्लामाबादच्या राजदूतावासाच्या पत्त्यावर जाणारी 'maraging' प्रतीच्या पोलादाची एक शिपमेंट पकडली होती. जरा खोलवर चौकशी केल्यावर असे आढळून आले कीं त्या शिपमेंटचा व्यवहार कान यांनी पाकिस्तानच्या वतीने All-Russian Institute of Light Alloys बरोबर केला होता. कान यांनी आणखी एका रशियन कंपनीशी स्पेक्ट्रोमीटर्स, लेझर्स व कार्बन फायबर्स वगैरेसाठीही एका पाकिस्तानी कंपनीच्यावतीने वाटाघाटी केल्या होत्या. कान यांनी उत्तर कोरियासाठीही 'maraging' प्रतीच्या पोलादाची खरेदीचा व्यवहार एका रशियन कारखान्याशी केला होता त्यावरून उत्तर कोरिया सेंट्रीफ्यूजेस बसवू पहात होता असे अनुमान काढले गेले. MI6 आणि CIA नी उत्तर कोरिया P-l किंवा P-2 सारखी सेंट्रीफ्यूजेस वापरून अण्वस्त्रक्षम युरेनियमच्या शुद्धीकरणात गुंतला आहे का हे समजण्यासाठी आपले प्रयत्न जारी ठेवले.

आईनहॉर्न यांच्या आठवणीप्रमाणे १९९८ साली उत्तर कोरिया-पाकिस्तान संबंधांबाबत माहिती गोळा करताना त्यांच्या असे लक्षात आले कीं हे संबंध प्रक्षेपणास्त्रांच्याही पलीकडे पोचले होते व यात अण्वस्त्रनिर्मिती तंत्रज्ञानही गुंतले होते. थोडक्यात पाकिस्तान (आणि KRL) व उत्तर कोरिया हे दोन अण्वस्त्रें व प्रक्षेपणास्त्रें बनविणारे देश एकमेकांच्या जवळ आले होते. अमेरिकेचे निषेधखलिते जातच होते पण आईनहॉर्नना स्पष्ट आदेश होते कीं कुठेही खानसाहेबांचा उल्लेख असता कामा नये कारण यामुळे CIA ला जास्त माहिती मिळण्याची आशा होती.

दरम्यान इस्लामाबाद-प्योंग्यांगमध्ये दरमहा नऊ उड्डाणे होत होती.

उत्तर कोरियाचे संबंध पाकिस्तानबरोबर जुडल्याचे गालुच्चींना आश्चर्य वाटले नाहीं. कारण Agreed Framework वर सही केल्याने त्यांनी प्लुटोनियमद्वारा अण्वस्त्र बनवायचा मार्ग थांबविला होता. १९९४ साली Agreed Framework चा करार झाला तेंव्हां पाकिस्तानमध्ये कुणाला फारसा रस नव्हता, पण आता १९९७ साली उत्तर कोरिया सेंट्रीफ्यूज तंत्रज्ञान मिळवू पहाणार इकडे ते लक्ष ठेवून होते. या सर्व घडामोडींमुळे खानसाहेब कामात फारच बुडून गेले होते. पाकिस्तान सेंट्रीफ्यूजेस विकत होता व उत्तर कोरिया घेत होता आणि CIA चे म्हणणे होते, "चालू द्या!"

आईनहॉर्न यांनी पाकिस्तानवरील दबाव वाढविला. उपमंत्र्यांच्या पातळीवर अमेरिका-पाकिस्तान यांच्यात एक तज्ञसमिती बनविली गेली. या समितीच्या बैठकी वॉशिंग्टन, न्यू यॉर्क, इस्लामाबाद अशा ठिकठिकाणी होत असत. पाकिस्तानच्या बाजूने परराष्ट्रमंत्रालयाचे अधिकारी स्वागत वगैरे करत असे, पण खरा अधिकार लष्करी अधिकार्‍यांच्याकडेच असे. पहिल्यांदा जेंव्हां आईनहॉर्ननी पाकिस्तान्यांना उत्तर कोरियाला तंत्रज्ञान दिले जाण्याबद्दल विचारले असता ज. फिरोज खान हे Combat Development Directorateचे प्रमुख खूप संतापून लालीलाल झाले! ते ज. परवेज मुशर्रफचे नातलग होते. KRL मधील त्यांच्या 'खबर्‍या'बद्दल पाकिस्तान्यांना अंदाज येऊ नये म्हणून आईनहॉर्न थेट कुठल्याही गोष्टीवर बोट ठेवू शकत नव्हते! त्यामुळे पाकिस्तानी उडवा-उडवीची उत्तरे देऊन निसटत असत!

उत्तर कोरिया दर वर्षी २ किंवा ३ अणूबाँब बनविता येतील इतके अण्वस्त्रक्षम अतिशुद्धीकृत युरेनियम बनविण्यासाठी नक्कीच एक कारखाना उभारत होता. उत्तर कोरियाकडे 'यलो-केक'च्या १९६० पासून विकसित केलेल्या सहा-एक खाणी होत्या. रोज ३०० किलो खनिजावर प्रक्रिया करू शकेल अशी सुविधा त्यांच्याकडे होतीच. CIA ला त्यांच्या शुद्धीकरणाच्या सुविधेबद्दलही माहिती होती. पण दोन अणूबाँबसाठी ५० किलो अण्वस्त्रक्षम युरेनियम बनविण्यासाठी कमीतकमी १००० सेंट्रीफ्यूजेसची मालिका लागते!

किम इल-सुंग यांचे भूतपूर्व मदतनीस हवांग जांग-योप हे १९९७ साली जेंव्हां पाश्चात्य देशांना येऊन मिळाले तेंव्हां ते असे करणारे सर्वात ज्येष्ठ हुद्द्यावरचे गृहस्थ होते. त्यांनी त्यांच्या debriefing session मध्ये त्यांच्या अन्वेषकांना सांगितले कीं १९९६ साली KRL च्या शिष्टमडळाच्या प्योंग्यांगभेटीनंतर दोन्ही देशांत प्रक्षेपणास्त्रें व युरेनियमचे अतिशुद्धीकरण यांच्या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण सुरू झाली. शुद्धीकरणाची यंत्रणा प्योंग्यांगपासून उत्तरेला १०० मैल उत्तरेला व परमाणूभट्टी असलेल्या योंगब्यॉन-कुन् या गावात ’कुमचांग-नी’जवळच्या एका दरीच्या तोंडाशी असलेल्या गुप्त गुहांमध्ये बसवली होती. पण मार्च १९९९ मध्ये अमेरिकन सरकारच्या उत्तर कोरियाबरोबर झालेल्या करारानुसार जेंव्हां तिथे ’कुमचांग-नी’ येथे अन्वेषक गेले तेंव्हां त्यांना फक्त रिकाम्या गुहाच दिसल्या! हवांग जांग-योपसारख्या defector-गुप्तहेरांनी प्योंग्यांगच्या आसपास असलेल्या आणखी कांहीं जागांची तपासणी करण्याचा सल्ला दिला. पण अमेरिकेला त्या ठिकाणावर बोट ठेवता येईना म्हणून त्यांनी पाकिस्तानची मदत मागितली पण पाकिस्तानने गप्प बसणे पसंत केले. पण आईनहॉर्न उत्तर कोरियाच्या मागावर होते. नवाज शरीफ यांच्या घरी झालेल्या बैठकीत उत्तर कोरिया बसवत असलेल्या सेंट्रीफ्यूजेसचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. नंतर हे मुद्दे टॅल्बट व क्लिंटन यांच्या पातळीवरही उपस्थित करण्यात आले. शेवटी नेटाने या विषयावरून दबाव आणल्यामुळे पाकिस्तान्यांनी या बाबतीत लक्ष घालण्याचे मान्य केले.

इस्लामाबादची सर्वात जास्त किमती गोष्ट (खानसाहेब) त्यांच्या सगळीकडे लुडबूड करण्याच्या स्वभावामुळे व अति गर्विष्ठ स्वभावामुळे हळूहळू एक अडचण बनत चालले होते. पाकिस्तानी लोकांनाही वाटू लागले होते कीं त्यांचे अवतारकर्य संपलेले असून त्यांनी बाजूला हटावे व तरुण रक्ताला वाव द्यावा कारण असे नवीन लोक फारसे कुणाला माहीत नसल्यामुळे पाश्चात्त्यांच्या नजरेत भरणार नाहींत.

पण खानसाहेबांचा 'जगन्नाथाचा रथ' चालूच होता. त्यांना त्यांच्या फाजील प्रसिद्धीची कल्पनाहीं नव्हती. ते जणू एका 'खानयुगा'ची वाट पहात होते जिथे सगळे त्यांना व त्यांच्या (थोर) कामगिरीला ओळखतील! आयुष्यातल्या आधीच्या वर्षांतल्या उपेक्षांची व सक्तीच्या मौनाची जणू ते व्याजासकट वसूली करत होते. शेवटी अमेरिकेच्या सतत दबावामुळे खानसाहेबांना त्यांचे जाळे अदृश्य ठेवायची आज्ञा मिळाली होती. दुबईची उपयुक्ततासुद्धा तिथल्या सतत वावर असलेल्या पाश्चात्य व इस्रायली गुप्तहेरांमुळे संपली होती. पाकिस्तानी लष्कराला कुठल्याही परिस्थितीत उत्तर कोरियाशी चाललेल्या अण्वस्त्रप्रसारात पाकिस्तानी हात असल्याचा आरोप नको होता. आता आग्नेय आशियात व आफ्रिकेत खानसाहेबांच्या असलेल्या चांगल्या संबंधांचा उपयोग करून घ्यायची व तिथे प्रकल्प A/B हलविण्याची वेळ आली होती.

खानसाहेबांना आपले सगळीकडे विखुरलेले हस्तक एकत्र आणायची जरूरी होती. २७ जूनला झालेल्या एका लग्नामध्ये ही संधी त्यांना मिळाली. नवरदेव होते खानसाहेबांचे दुबईतील 'डॉन' ताहीर व वधू होती मलेशियाच्या भूतपूर्व मुत्सद्द्यांची मुलगी नझीमा! तिने परंपरागत हलका पिवळसर-सोनेरी पोषाख घातला होता व लज्जित होऊन ती जमीनीकडे पहात उभी होती. ताहीरच्या काकूंनी त्यांना एकत्र आणले होते.

या लग्नाला ताहीर यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्‍यांना बोलावले होते. यायचा-जायचा, तिथल्या रहाण्याचा, गाड्या, हॉटेल वगैरेंचा संपूर्ण खर्च ताहीर करत होते. प्रत्येक पाहुण्याला लग्नाची भेट म्हाणून एक चिरूटांची बॉक्स व काशाची (pewter) दागिन्यांची डबी दिलेली होती.

ग्रिफिन यांनी मात्र जरा घोळ घातला. त्यांना खानसाहेबांच्या टेबलवर बसायला जागा होती पण तिथे स्लेबोज असल्यामुळे ते तिथे न बसता इतरत्र जाऊन बसले.

खानसाहेबही एरवीच्या मानाने गप्प होते. त्यांनी नुकत्याच झालेल्या अण्वस्त्रचांचणींचा उल्लेखसुद्धा केला नाहीं व जास्त करून ते पार्श्वभूमीतच हजर राहिले. लग्नाला अमेरिकेचे व ब्रिटिश हेरही "अनाहूत" पाहुणे म्हणून आलेले होते. या हेरांनी लग्नसमारंभातले पाहुणे, त्यांचे धंदे, नव्या जागेला कसे हलवायचे व नवी गिर्‍हाइके कोण यांची चर्चा करणातच लक्ष केंद्रित केले होते व माहिती गोळा केली होती. पण लग्नाच्या गडबडीतही ताहीरने हळूच ग्रिफिनना धंदा कसा बसत चाललाय व तो कसा कुठला तरी नवा व्यवसाय शोधत होता याचाच विचार करत होता हे सांगून टाकले.

शेवटी "हेन्द्रीता खान हॉटेल"ची पहाणी करण्याच्या मिषाने टिंबक्टूला पुन्हा जाऊन तिथे व्यवसाय स्थापायचे ठरले. या भेटीला सिद्दीकींनी खानसाहेब, ब्रि. सजवाल, ले.ज. रियाज़ चौधरी, डॉ. फरूक हशमी, ब्रि. ताजवार (KRL च्या संरक्षणविषयाचे प्रमुख) आणि KRL Science and Technology चे निर्देशक डॉ. नझीर अहमद अशी ती यादी होती. ते टिंबक्टूला सुदान व नायजेरिया अशा वेगळ्या मार्गाने गेले. त्यावेळी घेतलेल्या छायाचित्रात पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पातले सर्व मोहरे व लष्करी उच्चाधिकारी एकत्र आलेले दिसत होते! सगळा खर्च पाकिस्तान सरकारचा होता.

खानसाहेबांचा चमू २१ फेब्रूवारी १९९९ ला खार्टूमला आला. सुदानच्या शिक्षणमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले व सरकारी अतिथीगृहात त्यांची रहाण्याची सोय करण्यात आले. सगळे २४ तारखेला टिंबक्टूला पोचले. त्यावेळी बाकीचे लोक जरा हाश्शहुश्श करेपर्यंत खानसाहेबांनी होटेलच्या बांधकामाची 'देखरेख' केली. तिथून ते 'छाड'ची राजधानी 'अंजामेना' व 'नायजर'ची (Niger) राजधानी 'नियामी'कडे जायला निघाले. 'नायगर'मध्ये युरेनियम भरपूर प्रमाणात काढले जाते व १९७०च्या दशकात हा देश पाकिस्तानला 'यलोकेक' देणारा एक मोठा देश होता. खानसाहेब तिथे पोचल्याचे व्हॅलरी प्लामकडून कळताच CIA ला काळजी लागली व त्यांनी तपासाला सुरुवात केली. जोसेफ विल्सन या व्हॅलरी प्लामच्या पतीचे तिथे चांगले संबंध होते व त्यानुसार ते तिथे गेले व त्यांनी 'आलबेल'चा अहवाल देतांना सांगितल्ले कीं चोरून युरेनियम विकण्याची वा घेण्याची क्रिया जवळजवळ शून्य होती कारण या खाणीवर फ्रेंच अधिकार्‍यांचे पूर्ण नियंत्रण होते.

त्यानंतर खानसाहेबांची तुकडी खार्टूमला गेली व तिथे खानसाहेबांनी कांहीं व्यवसायाबद्दल काम केले असावे कारण त्या बैठकीला सुदानचे राष्ट्राध्यक्ष हजर होते. इथल्या वास्तव्यात खानसाहेबांच्या तुकडीने अल-शिफा येथील ओसामा बिन लादेन यांच्या मालकीचा व ज्यात खानसाहेबही भागीदार होते असा एक औषध बनविणारा कारखानाही पाहिला. पुढे हा कारखाना अमेरिकेने नेस्तनाबूत केला होता कारण अमेरिकेच्या दोन दूतावासांवर हल्ला करताना इथला पैसा लागला होता अशी अमेरिकेची समजूत झाली होती.

अमेरिकेला या कारखान्याकडे पाठविणारा खबर्‍या होता एकेकाळचा बिन लादेनचा साथीदार जमाल अल-फद्ल. अल-फद्लने (चुकीचे) सांगितले होते कीं अल-शिफामध्ये बिन लादेन रासायनिक बाँब बनवण्याचा प्रयत्न करत होता. खानसाहेबांची अल-शिफाचा दौरा व त्यांच्या बिन लादेन यांच्या इतर व्यवसायांशी असलेल्या संबंधांची माहिती यामुळे CIA ला असे वाटू लागले कीं खानसाहेबांचे अतिरेक्यांशीही संबंध आहेत! त्यात हेन्रीता खान हॉटेलही बिन लादेनची कंपनीच बांधत होती या चुकीच्या माहितीची भर पडली. KRL-Al-Qaeda यांच्यातील परमाणूबाबतची जवळीक हे एक पाश्चात्य देशांसाठी भयंकर कटकटीची गोष्टच होती त्यात अल-फद्लच्या माहितीमुळे भर पडली! अल-फद्लची अल-शिफाखेरीजची माहिती बरोबर होती व त्याने सांगितले कीं त्याने बिन लादेनना अल-कायदातर्फे अण्वस्त्रे मिळविण्याच्या वाटाघाटी करतांना ऐकले/पाहिले होते.
-----------------------------------------
टिपा:
[१] हे कार्टर यांच्या कारकीर्दीत राष्ट्रीय सुरक्षा समितीत एक अधिकारी होते व फेब्रूवारी १९८९ साली ABC News तर्फे बातम्या देणार्‍या प्रमुखाचे (anchor) काम करत असतांना सोविएत सैन्याच्या अफगाणिस्तानमधील माघारीचे वृत्त देण्यात ते अग्रभागी होते.
[२] सिद्दीकी उत्तर लंडनमधील कॉलिंडेल येथील एका मशीदीत प्रर्थनेल जात असे व त्याच्यामार्फतच खानसाहेबांनी आपले बरेच जुने सहकारी निवडले होते.
[३] खानसाहेबांना जेंव्हां आपला वध केला जाईल अशी निराधार भीती वाटू लागली होती तेंव्हांपासून त्यांची नेमणूक झाली होती.
[४] घौरी हा त्यांचा पूर्वज होता असा दावा खानसाहेब करीत असत!
[५] येथेच इंदिरा गांधींनीही अशी चांचणी १९७४ मध्ये केली होती.
[*] "India will take Initiative"
[६] अँथनी झिन मरीन या लष्करी दलातील जनरल व अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख होते.
[७] गोहर याकूब हे फील्डमार्शल अयूब खान यांचे सुपुत्र होत.
[८] त्यावेळी एडन व सौदीमध्ये अमेरिकन फौजेवर बाँबहल्ले केल्याबद्दल व त्यांच्या World Trade Center वर हल्ला केलेल्या रामझी यूसेफ याच्याशी जवळचे संबंध असल्यावरून ओसामांचा शोध सुरू होता!
[९] Air-to-air missiles
[१०] हे 'ऋण' नंतर पकिस्तान सरकारने (मुशर्रफ यांनी) खानसाहेबांना वैयक्तिकरीत्या अण्वस्त्रप्रसार केल्याबद्दल अनेक वर्षें कैदेत ठेवून फेडले!
[११]यावरूनच या प्रकरणाचे नांव 'A New Clear Vision’ असे दिलेले आहे.
[१२] कांग यांच्या पत्नीचे कलेवर याच हवाई कंपनीच्या विमानातून प्योंग्यांगला नेण्यात आले होते!
[१३] गालुच्चींचे नांव यापूर्वीच्या प्रकरणांतही आलेले आहे. ते क्लिंटन यांचे प्रक्षेपणास्त्रे व नरसंहारक शस्त्रांचे खास दूत होते व त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पावर २० वर्षांपासून नजर ठेवली होती. रेगन व बुश-४१ यांच्या कारकीर्दीतील अण्वस्त्रप्रसारणविरोधी धोरणाची परीकथा झालेली पाहून ते उद्विग्न झाले होते. त्यांना उत्तर कोरियाबरोबर थेट वाटाघाटी केल्याचा अनुभव होता व १९९४ साली त्यांनी उत्तर कोरियाबरोबरच्या North Korean Agreed Framework या कराराच्या वाटाघाटीत भाग घेतला होता. त्यानुसार उत्तर कोरियाने अमेरिकेच्या परमाणू वीज उत्पादनातील मदतीच्या बदल्यात इंधनाच्या सळ्यांचे पुनःप्रक्रियाकरण थांबवायचे कबूल केले होते. रॉबर्ट आईनहॉर्न हे अण्वस्त्रप्रसारणविरोधी विभागाचे उपपरराष्ट्रमंत्री होते, तर सामोरे हे परराष्ट्रमंत्रालयातील जुने अधिकारी होते.

राजकारणमाहितीभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 Jun 2010 - 10:16 am | मदनबाण

पाकड्यांच्या काळ्या कारवायांवर अमेरिका लगाम लावु शकली नाही हे त्यांचे(अमेरिकेचे) सर्वात मोठे अपयश आहे...

भारताने आपल्या मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रवहनक्षम 'पृथ्वी' या क्षेपणास्त्राला पृथ्वीराज चौहान या बाराव्या शतकातल्या दिल्ली-अजमेरच्या राजाचे नाव दिले होते. पण या राजाचा घौरीने पराभव केला होता व म्हणून त्याचे नांव खानसाहेबांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राला दिले.
मला तर पॄथ्वी हे नाव Earth या अर्थाने वापरली आहे असे वाटले होते...जर इतर क्षेपणास्त्रांची नावे पाहिली तरी तसाच आभास होतो..उदा. आकाश्,अग्नी.

हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्रां बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :---

http://en.wikipedia.org/wiki/Integrated_Guided_Missile_Development_Program

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

सुधीर काळे's picture

11 Jun 2010 - 11:03 am | सुधीर काळे

मला तर अमेरिकेचे सर्व वागणे म्हणजे "माहिती गोळा करायची, 'अरे बापरे' म्हणायचं आणि डोक्यावर पांघरूण घेऊन ताणून द्यायची" या प्रकारचं वाटतं!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/36uoebc
(प्रकरण सातवे)

सहज's picture

11 Jun 2010 - 12:40 pm | सहज

>वागणे म्हणजे "माहिती गोळा करायची, 'अरे बापरे' म्हणायचं आणि डोक्यावर पांघरूण घेऊन ताणून द्यायची"

जर आकाशात तो परमेश्वर असेल तर तो असेच काहीसे करत असेल असा एक मतप्रवाह ऐकला आहे.

त्या न्यायाने अमेरीका अगदी देवासारखी आहे :-)

बाकी काळेकाकांच्या चिकाटीचे अतिशय कौतुक आहे. फार मोठी लेखमाला अतिशय नेटाने मराठीत आणली आहे तुम्ही. लवकरच मराठी अनुवाद पुस्तक निघावे ही सदिच्छा!

अर्धवटराव's picture

13 Jun 2010 - 10:11 am | अर्धवटराव

काळे काका,
या लेखमालिकेत तुम्ही पाकिस्तानचा अणुशक्ती प्रवास बराच सविस्तर दाखवलात. तसं पाहिलं तर भारत देखिल अणुशक्ती धारक देश आहे, पण आपल्यातर्फे युद्धाचि शक्यता फार कमि दिसते. पण पाकिस्तान (आणि आता उ.कोरिया)ची तयारी बघुन एका नविन महायुद्धाचि पायभरणी सुरु आहे असं वाटतं का तुम्हाला ?? कि हे केवळ अमेरिकेची मक्तेदारी मोडुन काढायला उर्वरीत जगाचा एक प्रयत्न म्हणुन सुरु आहे ?

(सचिंत) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

माझ्या मतें पाकिस्तान त्यांच्या दहशतवाद्यांकडून स्वत:च संपेल. उत्तर कोरियाचा खुन्नस फक्त दक्षिण कोरियापुरता मर्यादित असावा. त्यामुळे कांहीं दुर्दैवी, अघटित घटना न घडल्यास भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल असे वाटत नाहीं.
कदाचित् हे केवळ wishful thinking असण्याची शक्यताच जास्त आहे.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/36uoebc
(प्रकरण सातवे)

सामंत काका,प्रो.देसाई व त्याच्या नातवाची आठवण येते.सामंत काका अमेरिकेला गेल्यापासुन त्याचे लिखाण थांबले. पण काळे काका अमेरिकेला गेल्यापासुन त्याचे लिखाण वाढत चालले आहे. असिफ झरदारीना जेवढी पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाची माहिती झाली नसेल तेवढी माहिती मला काळेकाकांच्या मुळे मिळाली. त्याबद्दल त्याचे मी आभार मानतो.
वेताळ

वेताळ-जी,
अमेरिकेत मुलगा, सून व नात दिवसभर कामावर/बालवाडीत असत त्यामुळे लिखाण करायला वेळच वेळ होता. त्याखेरीज 'सकाळ'वर ही मालिका प्रसिद्ध होऊ लागल्यामुळे पुढची प्रकरणे वेळेवर पाठविण्याची नैतिक जबाबदारी माझ्यावर आली त्यामुळे सारखे लि़खाण चालूच होते. पण १० दिवसांपूर्वी मी जाकार्ताला परत आलोय व 'पोटापाण्या'च्या कामाला लागलोय त्यामुळे आता वेळ फक्त रात्रीच मिळतो.
एकूण प्रस्तावना+२१ प्रकरणातली प्रस्तावना+८ प्रकाशित झाली असून १४ प्रकरणे मिपावर प्रकाशित झाली आहेत. (सहाचा 'लीड' आहे) 'सकाळ'मध्येही प्रतिसाद चांगला आहे. सध्या १५ व्या प्रकरणाचा अनुवाद सुरू आहे. २१ वे प्रकरण आधीच केले होते. त्यामुळे आणखी सहा प्रकरणे झाली कीं हुश्श!
आपल्या आस्थेबद्दल आभार!
रहाता राहिले जरदारीसाहेब! त्यांना सध्या कांहींही जबाबदारी नाहीं कारण नुकतीच पाकिस्तानच्या लोकसभेत घटनादुरुस्ती झाली व त्याद्वारे जरदारींचे अधिकार खूप कमी करण्यात आले आहेत. अनेक वर्षें अनेक आरोपांखाली तुरुंगवास भोगलेले जरदारी सध्या मजा करत आहेत. त्यांना पंतप्रधान गिलानी व लष्करशहा कयानी कांहीं सांगत असतील असे वाटत नाहीं!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2dhamdn (प्रकरण आठवे)

आजच्या टाइम्समधली ही बातमी वाचा. शीर्षक आहे "China on verge of signing nuke deal with Pakistan: Expert" दुवा आहे: http://tinyurl.com/2apeyuz
हे वाचल्यावर Nuclear Deception ची ही लेखमाला वेळेवरच प्रसिद्ध होत आहे असे वाटले.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2dhamdn (प्रकरण आठवे)

आजच्या डॉन या कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रात एक बातमी वाचली कीं (पाकिस्तानी) पंजाब सरकारने जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेला ८ कोटी रुपये दिले आहेत असे पंजाब सरकारने कबूल केले. (जमात-उद-दावा हे लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित संस्थेचे नवे नाव आहे व मुंबई नरसंहारात या संघटनेचा थेट स्वरूपात हात होता असे मानले जाते.)
http://tinyurl.com/29c48tk
वर पंजाब सरकारने अशीही मखलाशी केली आहे कीं हे पैसे त्या संघटनेने सुरू केलेली शाळा, दवाखाने व इस्पितळे यांसारखी सेवाभावी कामे (त्या संघटनेवर मुंबई नरसंहारानंतर बंदी आणल्यामुळे) बंद पडू नयेत म्हणून दिले आहेत. हे पैसे सरकारने नेमलेल्या administrator ला देण्यात आले आहेत.
व्वा भाई व्वा!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2dhamdn (प्रकरण आठवे)