तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?
आपल्या काही नातलगांशी निर्माण झालेल्या कटू संबंधांमुळे तुम्ही बराच काळ आपल्या नातलगां पासून जाणीवपूर्वक अंतर ठेवले आहे, पण तरीही दुसऱ्या कुणा घनिष्ठ संबंध असलेल्या नातलगांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अशा नको असलेल्या नातलगांना बऱ्याच वर्षांनी भेटण्याचा योग आला आहे का?
कामाच्या निमित्ताने आपल्या मूळ ठिकाणापासून बरीच वर्ष लांब राहिल्यानंतर काही कारणाने आपल्या मूळ गावी, काही काळासाठी का होईना तुम्ही परत आल्यानंतर सध्याच्या परिस्थितीमध्ये तेथे असलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःचे जुने दिवस कधी शोधले आहेत का?
फार पूर्वी लहानपणी कधीतरी भेटलेल्या, अत्यंत घनिष्ठ जिव्हाळ्याच्या व्यक्ती सोबत, नंतरच्या काळात कोणताही संबंध राहिलेला नसताना अचानक काही काळानंतर ती व्यक्ती तुम्हाला सापडली आणि तुम्ही तिच्यासोबत त्या जुन्या सुंदर आठवणींमध्ये रममाण होऊन स्वतःलाच पुन्हा नव्याने गवसण्याचा अनुभव घेतला आहे का?
यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!!
चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला कळते की चित्रपटाचा नायक "अरुल " याच्या वडीलांनी वडीलोपार्जित हवेलीसारखे असलेले तंजावूर येथील मोठे घर हे भाऊबंदकीच्या वादात गमावले आहे. या घरात त्यांच्या तीन पिढ्या राहत आलेल्या आहेत. अरुल च्या वडिलांना नाही म्हणलं तरी ही अप्रतिष्ठा वाटते आणि रातोरात ते घर खाली करून मद्रासला स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयामुळे भावनिक व प्रेमळ असलेला पंधरा-सोळा वर्षाचा तरुण अरुल अतिशय दुःखी होतो. तंजावूरचे देऊळ, तेथील हत्ती, गावातील माणसे, एकत्र कुटुंबातील अन्य माणसे जसे की मामा,काका, त्याची लाडकी मामेबहीण "भुवना" ही सर्व माणसे त्यांच्या मूळ गावी निडामंगलम येथे जाण्याचा निर्णय घेतात. आणि अरुल आपल्या आई-वडिलांसह मद्रास येथे कायमचा निघून जातो...
आता वीस वर्षानंतर अरुल (अरविंद स्वामी) एक अतिशय एकलकोंडा, घरात खूप सारे प्राणी/पक्षी पाळणारा, माणसांपासून अलिप्त,
असा माणूस झाला आहे. त्याची बहीण भूवना हिचे लग्नाचे आमंत्रण आल्यामुळे व भूवनाने तिचा भाऊ आल्याशिवाय लग्न करणार नसल्याचे सांगितल्यामुळे अरुल आपल्या मूळ गावी तंजावूर व निडामंगलम येथे जावे की न जावे या द्विधा मनस्थितीत अडकला आहे. बहिणीवरील प्रेमापोटी शेवटी तो तिथे जाण्याचा निर्णय घेतो.
खरंतर संध्याकाळी रिसेप्शन असल्यामुळे तो तिथे बहिणीला भेट देऊन कोणालाही न सांगता लगेचच परत येण्याचे नियोजन करून गेलेला असतो. मंगल कार्यालयात पोहोचून तिथे स्थिरावतो न स्थिरावतो तोच एक तरुण त्याचे डोळे झाकून त्याला मी कोण?? असे विचारतो. अर्थातच अरुल ला उत्तर देता येत नाही. त्यावर तो तरुण म्हणतो मी तुम्हाला एक हिंट देतो- मी निडामंगलम चा आहे. मी तुमच्या आईकडून तुमचा नातलग लागतो. तरी देखील अरुल ला तो कोण आहे? हे आठवत नाही. 94 साली ऊन्हाळ्याच्या सुट्टीत मी तुमच्याकडे महिनाभर राहायला आलो होतो, आता तरी तुम्हाला ओळखायलाच पाहिजे... असे म्हणून तो त्याच्यासमोर येतो......
तो इतका आनंदाने, प्रेमाने व आशेने अरुल कडे पाहत असतो की अरुल त्याला ओळखल्याचा आव आणतो...... हा आहे या सिनेमाचा दुसरा नायक.... हे पात्र “कार्थी” या दक्षिणात्य नटाने साकारले आहे… परंतु याचे सिनेमात असणारे नाव मात्र मी सांगणार नाही. कारण त्याच भोवती या चित्रपटाचे कथा पुढे पुढे सरकत राहते आणि शेवटी क्लायमॅक्स ला आपल्याला त्याचे नाव कळते. त्यामुळे यापुढे त्याचा उल्लेख मी "कार्थी" असाच करणार आहे. कार्थीला अरुल दादाला भेटून खूप आनंद झालेला असतो.. एखाद्या लहान मुलाच्या उत्साहात तो त्याच्याशी सतत बडबड करत राहतो. त्याला सगळ्या गोष्टींचा आग्रह करत राहतो. त्याला काय हवे नको ते पाहत राहतो व त्याला जरा देखील एकटे सोडत नाही. त्यामुळे पूर्ण कार्यक्रमात कुणालाही अरुलला त्याचे नाव काय हे विचारता येत नाही.
अरुल ला आठवतच नाही ही व्यक्ती नेमकी कोण आहे. परंतु कार्थीला वाईट वाटेल म्हणून तो अजिबात असे दाखवत नाही की तो त्याला ओळखत नाही. कारण त्याला असेही लगेचच निघायचे असते.
कार्थी मुद्दाम अरुलची मद्रासला जायची शेवटची गाडी चुकेल असे करतो. व अरुलला आग्रह करुन त्याला घरी घेऊन जातो. घरी गेल्यानंतर पाहूणचार म्हणून तो बियर पिण्याचा आग्रह करतो. बियर पिता पिता कार्थी आपल्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी त्याला सांगत राहतो. त्याला वेगवेगळ्या लहानपणीच्या आठवणी सांगतो.
त्यानंतर कार्थी अरुलला त्याची सायकल दाखवतो, जी त्याने घर सोडताना कुणा गरजूला कामी येईल म्हणून सोडून दिलेली असते. आणि त्याच सायकलमुळे कार्थीच्या कुटुंबाची खूप भरभराट झालेली असते. कार्थी अरुल व त्याच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अरुल आणि कार्थी त्या सायकलवरून पूर्ण गावात फेरफटका मारून येतात. अरुल खूप खुश होतो.
कार्थी सांगतो की खूप वर्षानंतर त्याची पत्नी गर्भवती राहिलेली आहे आणि त्याच्या होणाऱ्या बाळाचे नाव हे अरुलच्या नावावरुन ठेवणार आहे. त्याच्या मनातली ही स्वतःबद्दलची कृतज्ञता पाहून अरुलला स्वतःची लाज वाटते. शेवटी कार्थी म्हणतो की उद्या जाताना तुम्ही आमच्या दोघांची नावे घेऊन आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहेत..... हे ऐकल्यावर मात्र अरुल खूप घाबरतो!! त्याचे नाव आठवण्याचा प्रयत्न करतो….. काहीतरी Clue मिळतोय का हे त्याच्या घरात शोधण्याचा प्रयत्न करतो.. परंतु त्याला काहीही सापडत नाही. तो कार्थीला पूर्णपणे विसरून गेलेला असतो. त्यामुळे पुढील नामुश्की टाळण्यासाठी तो हळूच घर सोडून निघून जातो व मद्रासला परत येतो.
अरुल त्या व्यक्तीला ओळखू शकेल का? ती व्यक्ती नेमकी कोण होती ? अरुल ज्या गोष्टींना भूतकाळात मागे सोडून आलेला आहे त्याचे ओझे बाजूला टाकून पुन्हा स्वतःला स्वीकारू शकेल का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा नितांत सुंदर चित्रपट पाहून मिळतील......
चित्रपटाची कथा अतिशय साधी सोपी आहे. हा चित्रपट पाहताना आपण आपल्याच आयुष्याचा पट पुन्हा पाहत आहोत का? असा भास होतो. चित्रपटाचे चित्रीकरण अत्यंत समर्पक आहे. तंजावर मधली देवळे, तेथील हत्ती, लग्नातील प्रथा, तिथल्या परंपरा अतिशय खुबीने टिपल्या आहेत. भुवनच्या लग्नातील तिच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू तिला देण्याचा प्रसंग अत्यंत भावपूर्ण झालेला आहे...
कार्थी आणि अरविंद स्वामी हे या चित्रपटाचा प्राण आहेत. दोघांच्याही अभिनयाला तोड नाही. विशेषत: अरविंद स्वामीने भूमिकेच्या वेगवेगळ्या छटा उत्तम साकारल्या आहेत. मूळचा प्रेमळ, भावनिक पण आता मात्र व्यवहारी,अलिप्त झालेला, जून्या आठवणीच्या ओझ्याखाली दबलेला, कार्थीचे नाव आठवत नसल्याची सल व अगतिकता,अपराधीपणा त्याने उत्कृष्ठपणे रंगवला आहे. यांच्या दोघांमधील प्रसंग हे आपल्याला देखील नॉस्टॅल्जिक बनवल्याशिवाय राहत नाहीत.
कार्थीचा उल्लेख मी कार्थी असाच केलेला आहे. कारण त्याचे नाव हाच चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे आणि हा क्लायमॅक्स अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तिथपर्यंत पोहोचवला आहे. ज्या पद्धतीने कार्थी अरुलला स्वतःच्या नावापर्यंत पोहोचवतो त्याबद्दल दिग्दर्शकाला शंभर पैकी शंभर मार्क. परंतु खरे तर अरुल हे करत असतानाच स्वतःपर्यंत पोहोचतो....आपण खरेच कसे होतो याची त्याला नव्याने जाणीव होते....
हा चित्रपट पाहत असताना आपल्याला देखील आपल्या जुन्या दिवसांची नक्कीच आठवण होते आणि आपण आधी कसे होतो याचा आपण स्वतः देखील विचार केल्याशिवाय राहत नाही !!! कधीकधी दुसऱ्याचा शोध घेत असताना माणसाला स्वतःचाच शोध लागतो तो असा!!
कुठे पाहता येईल? – Netflix (हिंदी)
प्रतिक्रिया
23 Aug 2025 - 10:28 pm | गणेशा
नक्की पाहिल... धन्यवाद...
पाहिल्या नंतरच प्रतिक्रिया देण्यात मजा आहे.
23 Aug 2025 - 11:06 pm | अमरेंद्र बाहुबली
खरोखर अतिशय सुंदर असा हा सिनेमा आहे! मी पाहिला नी फॅन झालो ह्या सिनेमाचा! ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावा. भावनिक असा सिनेमा. ५ पैकी ५ स्टार देईन.
24 Aug 2025 - 9:17 am | श्वेता२४
@ गणेशा - चित्रपट नक्की पहा आणि कसा वाटला ते इथे जरूर लिहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या कुठल्या आठवणी ताज्या झाल्या ते देखील आवर्जून लिहा.
@ अबा - खरं आहे. मीही हा चित्रपट अगणित वेळा पाहिला आहे. आजही जेव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मनाला ताजतवाने करायचे असेल तर मी का चित्रपट आवर्जून पाहते. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही किमान मला तरी.
24 Aug 2025 - 9:35 am | गणेशा
यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!!
श्वेता जी, नक्कीच...
या lines पुढे मी वाचलेच नाही..
जो सिनेमा मला पाहायचा आहे त्या बद्दल मी आधी काहीही वाचत किंवा पाहत नाही.. त्यामुळे fresh angle ने सिनेमा बघता येतो.. आणि प्रत्येक गोष्ट नविन असते एकदम..
त्यामुळे नक्कीच त्या नंतर पूर्ण वाचेल आणि काय वाटेल ते सांगेल...
24 Aug 2025 - 6:45 am | कर्नलतपस्वी
आजकाल ही तर घर घर की कहानी आहे. संपत्तीमुळे नात्याला घरघर लागलीय.
रहिमन धागा प्रेम का,मत तोड चटकाय |
टुटे फिर ना जुरे,जुरे तो गाठ पड जाय॥
कथा सशक्त आहेच व सध्य परिस्थितीत विद्यमान आहे.
परिक्षण आवडले. सवडीने बघतो. धन्यवाद
24 Aug 2025 - 9:31 am | कर्नलतपस्वी
मी संजीवकुमार, मौसमी चा अंगूर किंवा नुतन अमिताभ बच्चन यांचा सौदागर बघतो.
24 Aug 2025 - 12:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रपटाची चांगळी ओळख करुन दिली. आता चित्रपट पाहणे आले.
-दिलीप बिरुटे
24 Aug 2025 - 2:15 pm | श्वेता२४
@ कर्नलतपस्वी व @ बिरुटे सर
1) खरं म्हणजे या चित्रपटातील नायक अरुल याच्या भावनांशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण नातलगांच्या काही अत्यंत कटू आठवणींमुळे आम्ही बरेच वर्ष काही नातलगांना आमच्या आयुष्यामधून पूर्णतः वजा केलेले आहे. त्यांच्यामुळे माझी आई व बहीण माहेरच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमांमध्ये आज देखील सहभागी होत नाहीत. परंतु माझा स्वभाव मात्र असा नाही. ज्या नातलगांनी आमच्याबरोबर कायमच चांगले संबंध ठेवले आहेत त्या नातलगांशी मी देखील जाणीवपूर्वक संबंध ठेवलेले आहेत. त्यामुळे केवळ अन्य नातेवाईकांना टाळायचे म्हणून आपल्याशी चांगले संबंध असलेल्या नातलगांना सुद्धा दुखवायचे हा विचार मला पटणारा नव्हता. परंतु दुःखद आठवणी देणाऱ्या नातलगांना टाळायचे कसे या द्विधा मनस्थितीत मी देखील सुरुवातीला असायचे. आता मात्र या गोष्टी मॅनेज करणे मला चांगले जमू लागले आहे.
2) मी देखील माझ्या लहानपण म्हणजे सात-आठ वर्षाची असताना माझ्या आईच्या आजोळी सुट्टी मध्ये आवर्जून जायचे. तिथे खूप नातेवाईकांचा गोतावळा असायचा व असेच अनेक चिल्लीपिल्ली ज्यांचे माझ्याशी असलेले नाते सांगणे मला आजही कठीण जाईल असे नातेवाईक असलेल्यांची मुले तिथे असायची. आम्ही एकत्र महिनाभर तरी राहत असू. परंतु 10 व्या वर्षानंतर तिकडे जाणे न झाल्यामुळे त्यापैकी कोणीही माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याही गोष्टींची आठवण मला या निमित्ताने झाली.
3) या चित्रपटात एक प्रसंग आहे तो म्हणजे अरुलचे वडील आणि मामा या जुन्या पिढीतील दोन प्रतिनिधींचे आपापसात अतिशय हृदयस्पर्शी भावनिक संभाषण होते. आज देखील मी असे जेव्हा कुठे जाते तेव्हा तेथील माणसे माझ्या आईला फोन लावून आपली भेट आता कधी होईल म्हणून भावनिक होऊन रडतात. या चित्रपटातील असे अनेक प्रसंग मी माझ्या खऱ्याखुरा आयुष्यात जगले आहे . त्यामुळे हा चित्रपट मला भावनिक दृष्ट्या खूप जवळचा वाटतो.
या चित्रपटाच्या निमित्ताने माझे सर्व वाचकांना हे एक नम्र आवाहन आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील आणि त्याबाबत व्यक्त व्हावेसे वाटले तर इथे जरूर व्हा.....
25 Aug 2025 - 6:29 am | कर्नलतपस्वी
असे अनेक अनुभव सांगता येतील. प्रकर्षाने असे वाटते की"नाते कुठवर सांभाळायचे", या विषयावर लिहावे.
मानवी स्वभाव अतिशय क्लिष्ट आणी अनाकलनीय असतो. परिस्थीतीनुसार तो वेगळे रंगरूप दाखवतो. जसे कवी सुधीर मोघे म्हणतात,
मनं काळोखाची गुंफा, मनं तेजाचे राऊळ
मनं सैतानाचा हातं मनं देवाचे पाऊल
25 Aug 2025 - 8:03 am | कुमार१
परिक्षण आवडले.
25 Aug 2025 - 8:47 am | आग्या१९९०
परीक्षण खूपच सुंदर! चित्रपटाचा विषय दातात अडकलेल्या सुपारीसारखा अस्वस्थ करणारा वाटला. माझा सायकलच्या बाबतीत अनुभव अगदी उलटा आहे. गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे / घेत आहे.
25 Aug 2025 - 3:06 pm | श्वेता२४
@ कुमार सर - आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला.
@ आग्या १९९० -
गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात
गावाकडील माणसे साधीभोळी असतात हा आता गैरसमज आहे. पण माझ्या सहवासात अशी आजही अनेक माणसे आहेत जी सिनेमातील कार्थीच्या पात्राप्रमाणे पैशापेक्षा प्रेमाला व व्यवहारापेक्षा नात्याला महत्व देतात. जी अत्यंत भवनिक असतात, अशी माणसे शहरात गावात कुठेही असू शकतात. पण अशी माणसे खूप थोडी असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जरुर. मला सरसकटीकरण अजिबात करायचे नाही. तुम्हीही आजुबाजुला शोघली तर अशी माणसे असतील तुमच्या आयुष्यात...आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद25 Aug 2025 - 9:08 am | युयुत्सु
"नाते कुठवर सांभाळायचे"
हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय -
जिथे भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक या गरजा प्रामुख्याने भागवल्या जातात तिथे नाती निर्माण होतात. समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील मह्त्त्व ठरते. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते. टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही.
25 Aug 2025 - 9:22 am | धर्मराजमुटके
चित्रपट पाहिला आहे. सुरुवातीला चांगला वाटला पण उत्तरार्धात खूपच अनावश्यक रेंगाळला आहे. एक दीड तासाचा बनवायला हवा होता. चित्रपटात नेहमीचा दाक्षिणात्य अतिभोळेपणा आणि टोकाची व्यक्तीपुजा आहे जी मनाला पटत नाही.
26 Aug 2025 - 4:37 pm | सुधीर कांदळकर
माझ्याही आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
26 Aug 2025 - 4:39 pm | Bhakti
सिनेमा छान आहे.शेवट खरंच कल्पक केला आहे.धर्मराज म्हणतात त्याप्रमाणे उत्तरार्धात सिनेमा रेंगाळला आहे.बाकी रक्ताच्या नात्याबाबत बोलायचं तर, घरातलं एखादं वयोवृद्ध अनुभवी माणूसच नात्यांना बांधून ठेऊ शकतो.माझी आजी होती तोपर्यंत छान गोकूळ होते .ती गेल्यानंतर मनाने,कधी व्यवहाराच्या घटनांनी सारे विखुरले.असच अरूल सारखं उसणं अवसान घेऊन लग्नकार्यात भेटायचे.नात्यात उसण अवसान आणून नातं पुढे नेण्यात काय अर्थ??दुसऱ्या नायकाच्या ठिकाणी माहेरी मला मी दिसले तर सासरी माझी नणंद तशी आहे, बोलून भेटून मायेनं जोडत राहायचं.
बाकी लेकीला खुपच आवडला सिनेमा :)