✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

श
श्वेता२४ यांनी
Sat, 08/23/2025 - 20:14  ·  लेख
लेख
फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?

आपल्या काही नातलगांशी निर्माण झालेल्या कटू संबंधांमुळे तुम्ही बराच काळ आपल्या नातलगां पासून जाणीवपूर्वक अंतर ठेवले आहे, पण तरीही दुसऱ्या कुणा घनिष्ठ संबंध असलेल्या नातलगांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अशा नको असलेल्या नातलगांना बऱ्याच वर्षांनी भेटण्याचा योग आला आहे का?

कामाच्या निमित्ताने आपल्या मूळ ठिकाणापासून बरीच वर्ष लांब राहिल्यानंतर काही कारणाने आपल्या मूळ गावी, काही काळासाठी का होईना तुम्ही परत आल्यानंतर सध्याच्या परिस्थितीमध्ये तेथे असलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःचे जुने दिवस कधी शोधले आहेत का?

फार पूर्वी लहानपणी कधीतरी भेटलेल्या, अत्यंत घनिष्ठ जिव्हाळ्याच्या व्यक्ती सोबत, नंतरच्या काळात कोणताही संबंध राहिलेला नसताना अचानक काही काळानंतर ती व्यक्ती तुम्हाला सापडली आणि तुम्ही तिच्यासोबत त्या जुन्या सुंदर आठवणींमध्ये रममाण होऊन स्वतःलाच पुन्हा नव्याने गवसण्याचा अनुभव घेतला आहे का?

यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!!

     चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला कळते की चित्रपटाचा नायक "अरुल " याच्या वडीलांनी वडीलोपार्जित हवेलीसारखे असलेले तंजावूर येथील मोठे घर हे भाऊबंदकीच्या वादात गमावले आहे. या घरात त्यांच्या तीन पिढ्या राहत आलेल्या आहेत. अरुल च्या वडिलांना नाही म्हणलं तरी ही अप्रतिष्ठा वाटते आणि रातोरात ते घर खाली करून मद्रासला स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयामुळे भावनिक व प्रेमळ असलेला पंधरा-सोळा वर्षाचा तरुण अरुल अतिशय दुःखी होतो. तंजावूरचे देऊळ, तेथील हत्ती, गावातील माणसे, एकत्र कुटुंबातील अन्य माणसे जसे की मामा,काका, त्याची लाडकी मामेबहीण "भुवना" ही सर्व माणसे त्यांच्या मूळ गावी निडामंगलम येथे जाण्याचा निर्णय घेतात. आणि अरुल आपल्या आई-वडिलांसह मद्रास येथे कायमचा निघून जातो...

     आता वीस वर्षानंतर अरुल (अरविंद स्वामी) एक अतिशय एकलकोंडा, घरात खूप सारे प्राणी/पक्षी पाळणारा, माणसांपासून अलिप्त, असा माणूस झाला आहे. त्याची बहीण भूवना हिचे लग्नाचे आमंत्रण आल्यामुळे व भूवनाने तिचा भाऊ आल्याशिवाय लग्न करणार नसल्याचे सांगितल्यामुळे अरुल आपल्या मूळ गावी तंजावूर व निडामंगलम येथे जावे की न जावे या द्विधा मनस्थितीत अडकला आहे. बहिणीवरील प्रेमापोटी शेवटी तो तिथे जाण्याचा निर्णय घेतो.

      खरंतर संध्याकाळी रिसेप्शन असल्यामुळे तो तिथे बहिणीला भेट देऊन कोणालाही न सांगता लगेचच परत येण्याचे नियोजन करून गेलेला असतो. मंगल कार्यालयात पोहोचून तिथे स्थिरावतो न स्थिरावतो तोच एक तरुण त्याचे डोळे झाकून त्याला मी कोण?? असे विचारतो. अर्थातच अरुल ला उत्तर देता येत नाही. त्यावर तो तरुण म्हणतो मी तुम्हाला एक हिंट देतो- मी निडामंगलम चा आहे. मी तुमच्या आईकडून तुमचा नातलग लागतो. तरी देखील अरुल ला तो कोण आहे? हे आठवत नाही. 94 साली ऊन्हाळ्याच्या सुट्टीत मी तुमच्याकडे महिनाभर राहायला आलो होतो, आता तरी तुम्हाला ओळखायलाच पाहिजे... असे म्हणून तो त्याच्यासमोर येतो......

फोटो

     तो इतका आनंदाने, प्रेमाने व आशेने अरुल कडे पाहत असतो की अरुल त्याला ओळखल्याचा आव आणतो...... हा आहे या सिनेमाचा दुसरा नायक.... हे पात्र “कार्थी” या दक्षिणात्य नटाने साकारले आहे… परंतु याचे सिनेमात असणारे नाव मात्र मी सांगणार नाही. कारण त्याच भोवती या चित्रपटाचे कथा पुढे पुढे सरकत राहते आणि शेवटी क्लायमॅक्स ला आपल्याला त्याचे नाव कळते. त्यामुळे यापुढे त्याचा उल्लेख मी "कार्थी" असाच करणार आहे. कार्थीला अरुल दादाला भेटून खूप आनंद झालेला असतो.. एखाद्या लहान मुलाच्या उत्साहात तो त्याच्याशी सतत बडबड करत राहतो. त्याला सगळ्या गोष्टींचा आग्रह करत राहतो. त्याला काय हवे नको ते पाहत राहतो व त्याला जरा देखील एकटे सोडत नाही. त्यामुळे पूर्ण कार्यक्रमात कुणालाही अरुलला त्याचे नाव काय हे विचारता येत नाही.

फोटो

अरुल ला आठवतच नाही ही व्यक्ती नेमकी कोण आहे. परंतु कार्थीला वाईट वाटेल म्हणून तो अजिबात असे दाखवत नाही की तो त्याला ओळखत नाही. कारण त्याला असेही लगेचच निघायचे असते.

     कार्थी मुद्दाम अरुलची मद्रासला जायची शेवटची गाडी चुकेल असे करतो. व अरुलला आग्रह करुन त्याला घरी घेऊन जातो. घरी गेल्यानंतर पाहूणचार म्हणून तो बियर पिण्याचा आग्रह करतो. बियर पिता पिता कार्थी आपल्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी त्याला सांगत राहतो. त्याला वेगवेगळ्या लहानपणीच्या आठवणी सांगतो.

फोटो

त्यानंतर कार्थी अरुलला त्याची सायकल दाखवतो, जी त्याने घर सोडताना कुणा गरजूला कामी येईल म्हणून सोडून दिलेली असते. आणि त्याच सायकलमुळे कार्थीच्या कुटुंबाची खूप भरभराट झालेली असते. कार्थी अरुल व त्याच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अरुल आणि कार्थी त्या सायकलवरून पूर्ण गावात फेरफटका मारून येतात. अरुल खूप खुश होतो.

फोटो

     कार्थी सांगतो की खूप वर्षानंतर त्याची पत्नी गर्भवती राहिलेली आहे आणि त्याच्या होणाऱ्या बाळाचे नाव हे अरुलच्या नावावरुन ठेवणार आहे. त्याच्या मनातली ही स्वतःबद्दलची कृतज्ञता पाहून अरुलला स्वतःची लाज वाटते. शेवटी कार्थी म्हणतो की उद्या जाताना तुम्ही आमच्या दोघांची नावे घेऊन आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहेत..... हे ऐकल्यावर मात्र अरुल खूप घाबरतो!! त्याचे नाव आठवण्याचा प्रयत्न करतो….. काहीतरी Clue मिळतोय का हे त्याच्या घरात शोधण्याचा प्रयत्न करतो.. परंतु त्याला काहीही सापडत नाही. तो कार्थीला पूर्णपणे विसरून गेलेला असतो. त्यामुळे पुढील नामुश्की टाळण्यासाठी तो हळूच घर सोडून निघून जातो व मद्रासला परत येतो.

     अरुल त्या व्यक्तीला ओळखू शकेल का? ती व्यक्ती नेमकी कोण होती ? अरुल ज्या गोष्टींना भूतकाळात मागे सोडून आलेला आहे त्याचे ओझे बाजूला टाकून पुन्हा स्वतःला स्वीकारू शकेल का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा नितांत सुंदर चित्रपट पाहून मिळतील......

     चित्रपटाची कथा अतिशय साधी सोपी आहे. हा चित्रपट पाहताना आपण आपल्याच आयुष्याचा पट पुन्हा पाहत आहोत का? असा भास होतो. चित्रपटाचे चित्रीकरण अत्यंत समर्पक आहे. तंजावर मधली देवळे, तेथील हत्ती, लग्नातील प्रथा, तिथल्या परंपरा अतिशय खुबीने टिपल्या आहेत. भुवनच्या लग्नातील तिच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू तिला देण्याचा प्रसंग अत्यंत भावपूर्ण झालेला आहे...

फोटो

     कार्थी आणि अरविंद स्वामी हे या चित्रपटाचा प्राण आहेत. दोघांच्याही अभिनयाला तोड नाही. विशेषत: अरविंद स्वामीने भूमिकेच्या वेगवेगळ्या छटा उत्तम साकारल्या आहेत. मूळचा प्रेमळ, भावनिक पण आता मात्र व्यवहारी,अलिप्त झालेला, जून्या आठवणीच्या ओझ्याखाली दबलेला, कार्थीचे नाव आठवत नसल्याची सल व अगतिकता,अपराधीपणा त्याने उत्कृष्ठपणे रंगवला आहे. यांच्या दोघांमधील प्रसंग हे आपल्याला देखील नॉस्टॅल्जिक बनवल्याशिवाय राहत नाहीत.

फोटो

कार्थीचा उल्लेख मी कार्थी असाच केलेला आहे. कारण त्याचे नाव हाच चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे आणि हा क्लायमॅक्स अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तिथपर्यंत पोहोचवला आहे. ज्या पद्धतीने कार्थी अरुलला स्वतःच्या नावापर्यंत पोहोचवतो त्याबद्दल दिग्दर्शकाला शंभर पैकी शंभर मार्क. परंतु खरे तर अरुल हे करत असतानाच स्वतःपर्यंत पोहोचतो....आपण खरेच कसे होतो याची त्याला नव्याने जाणीव होते....

हा चित्रपट पाहत असताना आपल्याला देखील आपल्या जुन्या दिवसांची नक्कीच आठवण होते आणि आपण आधी कसे होतो याचा आपण स्वतः देखील विचार केल्याशिवाय राहत नाही !!! कधीकधी दुसऱ्याचा शोध घेत असताना माणसाला स्वतःचाच शोध लागतो तो असा!! कुठे पाहता येईल? – Netflix (हिंदी)

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मौजमजा
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
6395 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

नक्की पाहिल... धन्यवाद...

गणेशा
Sat, 08/23/2025 - 22:28 नवीन
नक्की पाहिल... धन्यवाद... पाहिल्या नंतरच प्रतिक्रिया देण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

खरोखर अतिशय सुंदर असा हा

अमरेंद्र बाहुबली
Sat, 08/23/2025 - 23:06 नवीन
खरोखर अतिशय सुंदर असा हा सिनेमा आहे! मी पाहिला नी फॅन झालो ह्या सिनेमाचा! ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावा. भावनिक असा सिनेमा. ५ पैकी ५ स्टार देईन.
  • Log in or register to post comments

प्रतिसादासाठी धन्यवाद

श्वेता२४
Sun, 08/24/2025 - 09:17 नवीन
@ गणेशा - चित्रपट नक्की पहा आणि कसा वाटला ते इथे जरूर लिहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या कुठल्या आठवणी ताज्या झाल्या ते देखील आवर्जून लिहा. @ अबा - खरं आहे. मीही हा चित्रपट अगणित वेळा पाहिला आहे. आजही जेव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मनाला ताजतवाने करायचे असेल तर मी का चित्रपट आवर्जून पाहते. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही किमान मला तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

यातील कोणत्याही प्रश्नाचे

गणेशा
Sun, 08/24/2025 - 09:35 नवीन
यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!! श्वेता जी, नक्कीच... या lines पुढे मी वाचलेच नाही.. जो सिनेमा मला पाहायचा आहे त्या बद्दल मी आधी काहीही वाचत किंवा पाहत नाही.. त्यामुळे fresh angle ने सिनेमा बघता येतो.. आणि प्रत्येक गोष्ट नविन असते एकदम.. त्यामुळे नक्कीच त्या नंतर पूर्ण वाचेल आणि काय वाटेल ते सांगेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

सेम

स्वधर्म
Wed, 08/27/2025 - 19:05 नवीन
मी पण वाचले नाही, पण नक्की बघणार हा सिनेमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

पाहिला हा सिनेमा शेवटी.

स्वधर्म
Mon, 09/08/2025 - 20:53 नवीन
पाहिला हा सिनेमा शेवटी. श्वेता यांचे आभार, पाहण्यास उद्युक्त केल्याबद्दल. अशी त्या कार्थीसारखी आजिबात आत-बाहेर वेगळी नसलेली माणसं महानगरांमध्ये अजिबात आढळत नाहीत. ती आढळतात छोट्या शहरात असं का कुणास ठाऊक, मला वाटतं. मोठ्या शहरांमध्ये सगळी स्मार्ट जनता, पण भावनिक असले तरी मुळीच दाखवणार नाहीत. संबंध पण फार नको, अंतर ठेवून राहणंच बरं, हा खाक्या. भरपूर मोठ्या आवाजात बडबड करणारी, तुमची जबाबदारी मुद्दामहून घेणारी व महत्वाचे म्हणजे तुमच्या उपकारांची व हृद्य आठवणींची जाण ठेवणारी माणसं... अशी माणसं पहायला मिळाली ते आवडलं. सगळे आता कसे रिझर्व्ह्ड झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

@ स्वधर्म

श्वेता२४
Wed, 09/10/2025 - 14:10 नवीन
तुम्हाला चित्रपट आवडला हे वाचून आनंद झाला. प्रतिसादात नमुद केलेल्या विचारांशी सहमत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

नातलगांशी निर्माण झालेल्या कटू संबंधांमुळे तुम्ही बराच काळ आपल्य

कर्नलतपस्वी
Sun, 08/24/2025 - 06:45 नवीन
आजकाल ही तर घर घर की कहानी आहे. संपत्तीमुळे नात्याला घरघर लागलीय. रहिमन धागा प्रेम का,मत तोड चटकाय | टुटे फिर ना जुरे,जुरे तो गाठ पड जाय॥ कथा सशक्त आहेच व सध्य परिस्थितीत विद्यमान आहे. परिक्षण आवडले. सवडीने बघतो. धन्यवाद
  • Log in or register to post comments

जेव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मनाला ताजतवाने....

कर्नलतपस्वी
Sun, 08/24/2025 - 09:31 नवीन
मी संजीवकुमार, मौसमी चा अंगूर किंवा नुतन अमिताभ बच्चन यांचा सौदागर बघतो.
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/24/2025 - 12:50 नवीन
चित्रपटाची चांगळी ओळख करुन दिली. आता चित्रपट पाहणे आले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रतिसादासाठी धन्यवाद

श्वेता२४
Sun, 08/24/2025 - 14:15 नवीन
@ कर्नलतपस्वी व @ बिरुटे सर 1) खरं म्हणजे या चित्रपटातील नायक अरुल याच्या भावनांशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण नातलगांच्या काही अत्यंत कटू आठवणींमुळे आम्ही बरेच वर्ष काही नातलगांना आमच्या आयुष्यामधून पूर्णतः वजा केलेले आहे. त्यांच्यामुळे माझी आई व बहीण माहेरच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमांमध्ये आज देखील सहभागी होत नाहीत. परंतु माझा स्वभाव मात्र असा नाही. ज्या नातलगांनी आमच्याबरोबर कायमच चांगले संबंध ठेवले आहेत त्या नातलगांशी मी देखील जाणीवपूर्वक संबंध ठेवलेले आहेत. त्यामुळे केवळ अन्य नातेवाईकांना टाळायचे म्हणून आपल्याशी चांगले संबंध असलेल्या नातलगांना सुद्धा दुखवायचे हा विचार मला पटणारा नव्हता. परंतु दुःखद आठवणी देणाऱ्या नातलगांना टाळायचे कसे या द्विधा मनस्थितीत मी देखील सुरुवातीला असायचे. आता मात्र या गोष्टी मॅनेज करणे मला चांगले जमू लागले आहे. 2) मी देखील माझ्या लहानपण म्हणजे सात-आठ वर्षाची असताना माझ्या आईच्या आजोळी सुट्टी मध्ये आवर्जून जायचे. तिथे खूप नातेवाईकांचा गोतावळा असायचा व असेच अनेक चिल्लीपिल्ली ज्यांचे माझ्याशी असलेले नाते सांगणे मला आजही कठीण जाईल असे नातेवाईक असलेल्यांची मुले तिथे असायची. आम्ही एकत्र महिनाभर तरी राहत असू. परंतु 10 व्या वर्षानंतर तिकडे जाणे न झाल्यामुळे त्यापैकी कोणीही माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याही गोष्टींची आठवण मला या निमित्ताने झाली. 3) या चित्रपटात एक प्रसंग आहे तो म्हणजे अरुलचे वडील आणि मामा या जुन्या पिढीतील दोन प्रतिनिधींचे आपापसात अतिशय हृदयस्पर्शी भावनिक संभाषण होते. आज देखील मी असे जेव्हा कुठे जाते तेव्हा तेथील माणसे माझ्या आईला फोन लावून आपली भेट आता कधी होईल म्हणून भावनिक होऊन रडतात. या चित्रपटातील असे अनेक प्रसंग मी माझ्या खऱ्याखुरा आयुष्यात जगले आहे . त्यामुळे हा चित्रपट मला भावनिक दृष्ट्या खूप जवळचा वाटतो. या चित्रपटाच्या निमित्ताने माझे सर्व वाचकांना हे एक नम्र आवाहन आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील आणि त्याबाबत व्यक्त व्हावेसे वाटले तर इथे जरूर व्हा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही नातलगांना आमच्या आयुष्यामधून पूर्णतः वजा केलेले आहे.

कर्नलतपस्वी
Mon, 08/25/2025 - 06:29 नवीन
असे अनेक अनुभव सांगता येतील. प्रकर्षाने असे वाटते की"नाते कुठवर सांभाळायचे", या विषयावर लिहावे. मानवी स्वभाव अतिशय क्लिष्ट आणी अनाकलनीय असतो. परिस्थीतीनुसार तो वेगळे रंगरूप दाखवतो. जसे कवी सुधीर मोघे म्हणतात, मनं काळोखाची गुंफा, मनं तेजाचे राऊळ मनं सैतानाचा हातं मनं देवाचे पाऊल
  • Log in or register to post comments

वा ! उत्तम

हेमंतकुमार
Mon, 08/25/2025 - 08:03 नवीन
परिक्षण आवडले.
  • Log in or register to post comments

परीक्षण खूपच सुंदर!

आग्या१९९०
Mon, 08/25/2025 - 08:47 नवीन
परीक्षण खूपच सुंदर! चित्रपटाचा विषय दातात अडकलेल्या सुपारीसारखा अस्वस्थ करणारा वाटला. माझा सायकलच्या बाबतीत अनुभव अगदी उलटा आहे. गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे / घेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

@ कुमार सर @ आग्या १९९० प्रतिसादाकरीता धन्यवाद

श्वेता२४
Mon, 08/25/2025 - 15:06 नवीन
@ कुमार सर - आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. @ आग्या १९९० - गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात गावाकडील माणसे साधीभोळी असतात हा आता गैरसमज आहे. पण माझ्या सहवासात अशी आजही अनेक माणसे आहेत जी सिनेमातील कार्थीच्या पात्राप्रमाणे पैशापेक्षा प्रेमाला व व्यवहारापेक्षा नात्याला महत्व देतात. जी अत्यंत भवनिक असतात, अशी माणसे शहरात गावात कुठेही असू शकतात. पण अशी माणसे खूप थोडी असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जरुर. मला सरसकटीकरण अजिबात करायचे नाही. तुम्हीही आजुबाजुला शोघली तर अशी माणसे असतील तुमच्या आयुष्यात...आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

"नाते कुठवर सांभाळायचे"

युयुत्सु
Mon, 08/25/2025 - 09:08 नवीन
"नाते कुठवर सांभाळायचे" हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय - जिथे भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक या गरजा प्रामुख्याने भागवल्या जातात तिथे नाती निर्माण होतात. समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील मह्त्त्व ठरते. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते. टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही.
  • Log in or register to post comments

टॉक्सिक, नार्सिसीस्ट,

चावटमेला
गुरुवार, 08/28/2025 - 00:37 नवीन
टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. ह्या वाक्याशी १०००% सहमत. अशा व्यक्तिंना झटकल्या पासूनच मी अतिशय शांत आयुष्य जगतोय. बाकी, परीक्षण आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

चित्रपट पाहिला आहे.

धर्मराजमुटके
Mon, 08/25/2025 - 09:22 नवीन
चित्रपट पाहिला आहे. सुरुवातीला चांगला वाटला पण उत्तरार्धात खूपच अनावश्यक रेंगाळला आहे. एक दीड तासाचा बनवायला हवा होता. चित्रपटात नेहमीचा दाक्षिणात्य अतिभोळेपणा आणि टोकाची व्यक्तीपुजा आहे जी मनाला पटत नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर ...

सुधीर कांदळकर
Tue, 08/26/2025 - 16:37 नवीन
माझ्याही आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सिनेमा छान आहे.शेवट खरंच

Bhakti
Tue, 08/26/2025 - 16:39 नवीन
सिनेमा छान आहे.शेवट खरंच कल्पक केला आहे.धर्मराज म्हणतात त्याप्रमाणे उत्तरार्धात सिनेमा रेंगाळला आहे.बाकी रक्ताच्या नात्याबाबत बोलायचं तर, घरातलं एखादं वयोवृद्ध अनुभवी माणूसच नात्यांना बांधून ठेऊ शकतो.माझी आजी होती तोपर्यंत छान गोकूळ होते .ती गेल्यानंतर मनाने,कधी व्यवहाराच्या घटनांनी सारे विखुरले.असच अरूल सारखं उसणं अवसान घेऊन लग्नकार्यात भेटायचे.नात्यात उसण अवसान आणून नातं पुढे नेण्यात काय अर्थ??दुसऱ्या नायकाच्या ठिकाणी माहेरी मला मी दिसले तर सासरी माझी नणंद तशी आहे, बोलून भेटून मायेनं जोडत राहायचं. बाकी लेकीला खुपच आवडला सिनेमा :)
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय ! हा चित्रपट

पर्णिका
गुरुवार, 08/28/2025 - 02:04 नवीन
छान लिहिलंय ! हा चित्रपट पाहिला आहे... सलग नाही बघितला, मला थोडा संथ वाटला, पण पूर्ण बघावासा वाटला. अगदीच अवांतर : आमच्या एका युरोप ट्रीपमध्ये एका म्युझिअममध्ये अरविंद स्वामी भेटला होता. प्रत्यक्षांत फार छान दिसतो, छान मेंटेन केलंय स्वतःला. एकदम डाऊन टू अर्थ आहे, आम्ही थोडा वेळ बोललो त्यावरून बुद्धिमान, संगीताची जाण/आवड असलेला, आणि शांत वाटला. बॉंबे, रोजा मध्ये आवडला होताच, पण प्रत्यक्ष भेट झाल्यावर जास्तच आवडला. :)
  • Log in or register to post comments

चित्रपट पाहिला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/28/2025 - 11:28 नवीन
आपल्या चित्रपटाच्या सुंदर लेखनाने चित्रपट पाहिलाच पाहिजे ही उत्सुकता फार वाढली होती. एकदाचा चित्रपट पाहिला. चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. पण, नंतर नाव न सांगण्याच्या अटीवर चित्रपट इतका लांबवला आहे की विचारु नका. चित्रपटाचा आनंद लांबलेला उत्तरार्ध घालवून टाकतो, असे वाटले. कधी एकदा तो नाव सांगेल असं झालं होतं, पण नाव सांगत नाही तो पर्यंत असंख्य कामं करुन घ्यावीत इतकं ते उत्सुकतेचं रबर ताणलं गेलं आहे. आपण जवळ जवळ सगळेच गावखेड्यातून शहरात आलेलो आहोत. गावखेड्याच्या, नातेवाईकांच्या, नदीच्या, झाडांच्या, झोपडींच्या इतर अशा असंख्य अशा आठवणींचं मोहोळ आपल्या आयुष्याला टांगलेलं असतं. काही आठवणी चांगल्या असतात काही नकोशा. आपण कधी गावी गेलो की गाव सुंदर वाटतं. माणसं भली वाटतात. काहीच दिवसांसाठी आता तो माहोल चांगला वाटतो. आता खेडेगावंही शहरं झाली आहेत. आता आपल्यात त्यांच्यात काही अंतर उरलं नाही, उरत नाही. तरीही, अशा आठवणींच्या रुजलेली खोल ओल भारी वाटते. चित्रपट भावभावनांच्या आठवणीत घेऊन जातो इतकं नक्की. बाय द वे, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद

श्वेता२४
Sun, 08/31/2025 - 14:54 नवीन
@युयुत्सू व चावायला - टॉक्सिक लोकांना आयुष्यातून बाहेर काढावाच लागतं त्याशिवाय आयुष्य सुखा समाधानाचं व सुरळीत होत नाही हा माझा देखील अनुभव आहे. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते या वाक्याशी 100% सहमत आहे. @ स्वधर्म, धर्मराज मुटके, सुधीर कांदळकर, भक्ती,पर्णिका - प्रतिसादासाठी धन्यवाद. चित्रपट थोडा संथ आहे हे मान्य. कामाच्या निमित्ताने मी बराचदा माझे राहते घर बदलले आहे. सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पाहिला त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी होते व दोघेही इमोशनल होतो, कारण पुढच्या काही दिवसातच आम्हाला आमचे राहते घर सोडायचे होते. मुलाचे सगळे मित्र त्याच्यापासून दुरावणार असल्यामुळे तो खूप दुःखी झाला होता. केवळ आठ वर्षाच्या माझ्या मुलाने हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असे सांगितले की "मला वाटतंय ही माझीच स्टोरी आहे." तो आजही हा चित्रपट अधेमध्ये पाहत असतो. @ बिरूटे सर - परीक्षण वाचून तुम्हाला चित्रपट पाहायचे इच्छा झाली हे वाचून आनंद झाला अर्थात चित्रपट तुमच्या अपेक्षेस उतरलेला दिसत नाही. आपण नाते संबंधांबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, गाव खेड्यातील आता असलेली माणसे याबद्दल जे काही मत प्रतिसादात नोंदवले आहे त्याबाबत मी शंभर टक्के आपणाशी सहमत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांप्रती धन्यवाद व्यक्त करते.
  • Log in or register to post comments

अगदीच सहमत, श्वेता !

पर्णिका
Sat, 09/06/2025 - 04:02 नवीन
अगदीच सहमत, श्वेता ! आपली त्यावेळी असलेली मनःस्थिती, लाईफ फेजेस यांमुळे काही काही चित्रपट आवडतात, रिलेट होतात.
सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे.
Inside Out, The Karate Kid (१९८४) हे चित्रपट पाहिले आहेत का ? नसेल तर नक्की दाखव तुझ्या मुलाला,आवडतील त्याला... especially during this transitional phase.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

@ पर्णिका

श्वेता२४
Sat, 09/06/2025 - 18:18 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद . उपरोक्त दोन्ही चित्रपट मी पाहिलेले नाहीत. मुलासह नक्की पाहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्णिका

*@ युयुत्सू व चावटमेला

श्वेता२४
Sun, 08/31/2025 - 14:56 नवीन
वरती चुकून@ युयुत्सू व चावायला असे टाईप झाले आहे ते @ युयुत्सू व चावटमेला असे वाचावे.
  • Log in or register to post comments

परीक्षण आवडले, नक्की बघेन हा

श्वेता व्यास
Mon, 09/08/2025 - 16:10 नवीन
परीक्षण आवडले, नक्की बघेन हा चित्रपट. अरविंद स्वामीचा अभिनय आवडतो म्हणून तर नक्कीच पाहणार.
  • Log in or register to post comments

सुरेख चित्रपट आणि सुरेख

सिरुसेरि
Mon, 09/08/2025 - 17:30 नवीन
सुरेख चित्रपट आणि सुरेख परिक्षण . एरवी जास्ती करुन अ‍ॅक्शन चित्रपट करणारा कार्ती हा अभिनेता भावनीक कथेमधेही आपली छाप पाडतो . दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे आणी इतर सर्व सह कलाकारांनी त्यात योग्य साथ दिली आहे . चित्रीकरण , लोकेशन , संगीत या घटकांनीही मोलाची भर घातलेले आहे . मुळ तामिळ चित्रपटात अरविंद स्वामी पहाटेच्या वेळी अपराधी भावनेने घरातुन निघुन जात असतानाच्या प्रसंगातील गाणे हे कमल हसनच्या धीर गंभीर आवाजामधे गायले आहे . ते ऐकण्यासारखे आहे .
  • Log in or register to post comments

@श्वेता @ सिरूसेरी

श्वेता२४
Mon, 09/08/2025 - 19:32 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद... @ सिरुसेरी दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे हे मात्र अगदी खरं. ते शेवटचे गाणे कमल हसन नी म्हणले आहे हे काही मला माहीत नव्हते. तुमची प्रतिक्रिया वाचून मी मुद्दाम तमिळ व्हर्जन मध्ये ऐकले. छानच म्हणले आहे त्यानी.
  • Log in or register to post comments

सुंदर

अभ्या..
Wed, 09/10/2025 - 15:31 नवीन
मला आवडलेला हा चित्रपट. लय संथ आहे पण कदाचित हेच बलस्थान आहे. कार्ती आणि अरविंदस्वामी ही तर सुपर्ब कास्ट आहेच पण मला अरविंदस्वामी चे त्याच्या वडील, मुलगी आणि पत्नीसोबतचे रिलेशनचे चित्रण पण आवडले. काही काही सीन्स म्हणावे तर अगदी लहान आणि साधे पण इतके विचारपूर्वक केलेले आहेत की बस्स. सुरुवातीला गावातून निघताना मंदीरात हत्तीला भेटून निघताना पुजार्‍याने दिलेला प्रसाद घेऊन मनात काही खायची इच्छा नसतानादेखील हा प्रसाद पुन्हा मिळणार नाही ह्या भावनेने तो खातानाचा प्रसंग. गावाकडे निघताना वडिलांनी स्वतःच्या हातातले रिस्ट वॉच मुलाला घालायला लावणे, तो स्मार्टफोन असल्याने नको नको म्हणत असताना. कार्तीसोबत मडक्यातली बीअर पिउन शहरात आल्यावर क्ले बॉटल मध्ये बीअर घालून पिणे. राघूंना खायला घालताना लाकडी फळ्यावर भाताच्या मुदी ठेवून झाल्यावर त्यावर एकेक लिंबाची फोड ही ठेवणे. सोक्कूमामाचे आपल्या भाच्यासोबतचे अकृत्रिम स्नेहाचे बोलणे पण त्याच्या वडिलासोबत नात्याने भाऊजी असल्याने आदर अधिक स्नेहाचे बोलणे. जल्लीकट्टू मध्ये बैलाचे नाव धोनी आणि पिवळे टीशर्ट (कारण धोनी जरी उत्तरेतला असला तरी सीएसके मधली त्याची कारकीर्द तमिळी जनतेला प्रचंड आवडते) अप्रतिम डिटेलिंग. एक निरिक्षण सोबतचः तमिळी लोकात आपल्या इतिहासातली तमिळ नावे ठेवायचा ट्रेंड आला आहे. अरविंदस्वामीचे नाव अरुल मौळी वर्मन हे नुकत्याच आलेल्या पीएस सेरीजमधले ऐतिहासिक नायकाचे अर्थात पन्नियन सेल्वन चे नाव असते. असो.. मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.
  • Log in or register to post comments

मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही

चांदणे संदीप
Mon, 09/15/2025 - 11:30 नवीन
मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.
+१००,००० अगदी! सर्वात आधी ह्या चित्रपटाला एका शब्दात सांगायचं झाल्यास, "नितांतसुंदर" इतकंच म्हणता येईल आणि आता आमच्या दादांनी इतकं सांगितल्यावर आम्ही काय लिहायला नकोच तरी लहान तोंडी मोठा घास. काही चित्रपटांबद्द्ल म्हटल जातं की त्याची एक एक फ्रेम म्हणजे जणू पोस्टरच, उदाहरणादाखल शोले. अगदी तसेच या चित्रपटाची एकेक फ्रेम म्हणजे मनावर कोरले जाणारे चित्रच. छोटे छोटे प्रसंगही इतके परिणामकारक आहेत की ते लक्ष वेधून घेतात आणि लक्षातही राहतात. माझ्यासाठी हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक दीर्घ कविताच आहे. अजूनही खूप काही लिहिता येईल पण आवरतो स्वत:ला. नाहीतरी सगळंच मनातलं लिहून नाहीच सांगता येत. काही गोष्टी अनुभवायच्याच असतात. या चित्रपट परीक्षणाबद्दल धन्यवाद. ___/\___ सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

@चांदणे संदीप

श्वेता२४
Mon, 09/15/2025 - 13:19 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

@अभ्या....

श्वेता२४
Wed, 09/10/2025 - 21:45 नवीन
नेमका प्रतिसाद. या चित्रपटात मला जे जे काही जाणवले आहे ते तुम्ही तुमच्या प्रतिसादात नेमके लिहिले आहे!! मला देखील या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात अशाच बऱ्याच गोष्टी जाणवल्या. खरंतर तुम्ही प्रतिसादात जे लिहिले आहे ते सर्व मला परीक्षणामध्ये द्यायचे होते, परंतु विस्तार भयास्तव मी लिहिले नाही. या चित्रपटाचा माझ्यासारखाच कोणीतरी विचार करते हे वाचून खूप छान वाटले. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा