अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे
खिशाला फुटतात शंभर फाटे
तेवीस किलोत फक्त कपडे चार
आवांतर सामानाची गर्दीच फार
महिनाभर आगोदर येते यादी
म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी
बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी
वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी
कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई
रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई
म्हातार्याची वडवड,चश्म्याची वाट
पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ
सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी
काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी
तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट
म्हातार्याच्या नावानं फाडतीया तिकीट
पिझ्झा, बर्गर... आठवणीने,काटा आला
म्हातार्याचा आधार चकणा न प्याला.
आपलेच दात अन् आपलेच ओठ
आपलाच खिसा अन् आपलेच पोट
काय सांगू मित्रांनो.....
अम्रीकेच्या वारी,भेटे दुधावरची साय
मन पाखरू पाखरू,वारी वारी जाय.
प्रतिक्रिया
24 Apr 2025 - 8:20 pm | अमरेंद्र बाहुबली
हाहहा! थोडे काटे आम्हीही पेरतो, आम्हलाही येताना खाऊ आणा!
24 Apr 2025 - 8:29 pm | मुक्त विहारि
भलते लाड करणे आता त्या देशाने बंद केले आहे...
अन्न-पाणी अमेरिकेचे आणि चिंता हमासची, हे लाड तो देश आता खपवून घेत नाही...
24 Apr 2025 - 8:36 pm | अमरेंद्र बाहुबली
आ????
24 Apr 2025 - 9:22 pm | मुक्त विहारि
असो...
आनंद आहे....
24 Apr 2025 - 9:46 pm | अमरेंद्र बाहुबली
पायाला लागले होते तुमच्या असे कळाले! आता बरे आहात ना?
24 Apr 2025 - 10:19 pm | मुक्त विहारि
तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती...
असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...
24 Apr 2025 - 10:25 pm | अमरेंद्र बाहुबली
तरीही काळजी घ्या! वेळच्या वेळी गोळ्या घेत चला!
24 Apr 2025 - 10:38 pm | मुक्त विहारि
विशेषतः, नथू गुग्गुळ वटी....
अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...
24 Apr 2025 - 10:50 pm | अमरेंद्र बाहुबली
नथू? नको मग! :)
24 Apr 2025 - 9:36 pm | श्रीरंग_जोशी
अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली
आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो.
सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.
25 Apr 2025 - 12:29 am | कर्नलतपस्वी
कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध.
मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग.
बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
25 Apr 2025 - 8:15 am | श्रीरंग_जोशी
आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो.
गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती.
आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.
25 Apr 2025 - 12:42 am | कर्नलतपस्वी
पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.
25 Apr 2025 - 1:45 am | सुक्या
रचना आवडली.
भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही.
जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही.
साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.
25 Apr 2025 - 5:28 am | कंजूस
झकास कविता तालात.
25 Apr 2025 - 6:16 am | जुइ
अन वारीसाठी शुभेच्छा! आले की अवश्य कळवा.
30 Apr 2025 - 2:13 am | चामुंडराय
छान रचना, आवडली !!
मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन.
बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर.
प्रत्येक भारत भेटीच्या वेळी -
माझ्या माहेराच्या वाटे
जरी लागल्या रे ठेचा
वाटवरच्या या दगडा
तुले फुटली रे वाचा!
“नीट जाय मायबाई
नको करु धडपड
तुझ्याच मी माहेराच्या
वाटवरला दगड!”
- बहिणाबाई