काही चुका, काही विसंगती..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
13 Jan 2025 - 12:52 pm

आपणां सर्वांनाच सुसंगत आयुष्य जगायला आवडतं. पण अनेक वेळा आपल्याला विसंगतीला सामोरं जावंच लागतं. विसंगत म्हणजे चुकीचं, योग्य नसणारं असं,खटकणारं! काही वेळा दस्तुरखुद्द आपणच विसंगत वागत असतो.

विसंगतीचं किंवा चुकांचं सर्वांत मोठं आगार म्हणजे सिनेमा आणि टी व्ही सृष्टी. यात कथेतील कंटीनुईटीच्या चुका, लेखकापासून, संवाद लेखकापासून, गीतकारापासून ते अगदी एडिटरपर्यंतच्या अनेकांच्या डुलक्या हे सर्व येतं.

प्रचंड गाजलेल्या, जुन्या लोकप्रिय "रामायण" टीव्ही सिरियल मध्ये अनेक पात्रांच्या उघड्या दंडावर देवीची लस टोचल्याच्या गोल खुणा दिसत होत्या. अरण्यातील वृक्षांवर वनीकरण विभागाने रंगवलेले तपकिरी , पांढऱ्या रंगांचे पट्टे होते.(अर्थात् याला बिचारा दिग्दर्शक तरी काय करणार?) संत ज्ञानेश्वर चित्रपटात चारही भावंडे रस्त्यावरुन चालत असताना, त्यांच्या बाजूच्या भिंतीवर लिहिलं होतं,"काॅंग्रेसला मते द्या." किंवा "गाय वासरावर शिक्का मारा" किंवा तत्सम. हे इतकं ढोबळ तरी टाळता आलं असतं.

"जिंदगी"नावाच्या सिनेमात नायक नायिकेकडे बघून गाताना , पहिल्या कडव्यात म्हणतो,"ओ सावली हसीना"आणि तिसऱ्या कडव्यात म्हणतो "गोरे बदनपर काला आंचल" म्हणजे हसीनाचा रंग नक्की कोणता? काला की गोरा? हे गीतकाराच्या लक्षात नाही आलं? एकच ऑरेंज रंगाचा पट्ट्या, पट्ट्याचा शर्ट तीन वेगवेगळे नायक तीन वेगवेगळ्या सिनेमात घालतात. "जिस देश में गंगा बहेती हैं" सिनेमात "ओ बसंती" गाण्यात नायक आणि नायिका अवघड, दुर्गम अशा पाषाणांच्या कडेकपारींमधून पडत, धडपडत चालत असतात. पण "आ अब लौट चले"गाण्यात शरण येण्याऱ्या डाकूंचा तांडा सपाट प्रदेशातून आरामात आपला कुटुंबकबिला घेऊन चालत जात असतात. तुम्ही म्हणाल की किती जुनी उदाहरणं देता आजीबाई! काय करणार?मी जुनी म्हणून माझी उदाहरणं जुनी! चला तर मग आता तुम्हांला चालू उदाहरणं देते. "ठरलं तर मग" मालिकेत सुरुवातीलाच पहिल्याच एपिसोडमध्ये प्रतिमा, रविराज, तन्वी यांच्या कारला जेव्हा घातपात घडवला जातो आणि नंतर प्रतिमाची स्मरणशक्ती परत यावी म्हणून तोच अपघाताचा प्रसंग रिक्रिएट केला जातो तेव्हा सुभेदारांचं घर ते किल्लेदारांचं घर यामधला रस्ता बिकट,भयाण, अवघड, वळणावळणांनी भरलेला, लांबलचक असा दाखवला आहे. मात्र एरवी प्रिया किल्लेदारांकडून सुभेदारांकडे कारने अर्थात् त्याच रस्त्याने फटाफट, पटापट, लीलया आणि वरचेवर जात येत असते. तोच रस्ता इतका सोपा कसा काय झाला बाई?

त्याच सिरियल मध्ये कुसुमताईच्या घराला भली मोठी, बिनगजांची खिडकी दाखवली आहे. तिच्यातून सायली उडी टाकून सहज बाहेर येऊ शकेल इतकी ती मोठी आहे. मधुभाऊ दाराला कुलूप लावतात ,मग हातासरशी ती खिडकीही कडेकोट बंद करून का जात नाहीत?

तिथी कोणतीही असो, मालिकांमधून चंद्र नेहमी पौर्णिमेचाच दाखवतात.अगदी नायिकेच्या घरी तिचा भाऊ दिवाळीच्या दिवसांत आला तरी.नरकचतुर्दशीच्या, पाडव्याच्या अंधाऱ्या रात्री सुद्धा चंद्र पौर्णिमेचाच.

म्हातारे सासरे असोत किंवा लहान मूल. त्यांना जेवायला देतानाही तीन पोळ्या,खूप सारा भात , आमटी असं प्रचंड प्रमाणात सगळंच जेवण एकवाढ करून ताटात त्याच्यासमोर ठेवतात. हॉटेलच्या टेबलावर देखील तसली भांडी आणि तितकी व्हरायटी नसते.

आणि त्या लहान मुलाला दूध देतानाही पंजाबी लोट्यापेक्षा आकाराने थोड्याशाच कमी असलेल्या ग्लासात भरून देतात.

आता आपल्या व्यवहारात आपल्यातलेच अनेक लोक करत असलेल्या बारीक बारीक चुका.. अहल्या हा योग्य उच्चार असताना आपण सर्रास अहिल्या म्हणतो. अनसूया हा योग्य उच्चार पण आपण अनुसया म्हणतो. सीमान्तपूजनाचं आपण श्रीमंतपूजन करतो. प्रश्न असं लिहितो पण बोलताना प्रश्ण असं म्हणतो. पुराणातली वानगी पुराणात न म्हणता पुराणातली वांगी पुराणात म्हणतो.

राजकारण्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात विसंगती असते. आश्वासनात आणि अंमलबजावणीत विसंगती असते. पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देतो. आपल्या दशावरातल्या ज्या दोन अवतारांनी मूर्तीपूजेचा निषेध केला,ज्या एका महापुरुषाने मूर्तीपूजेचा निषेध केला त्यांच्याच मूर्ती तयार करून आपण त्यांची पूजा करतो. त्यांना हार घालतो.

आपण नाटक, सिनेमाचं महागडं तिकीट काढतो पण बाहेर रस्त्यावर बसलेल्या गजरेवाल्याशी, भेळपुरीवाल्याशी , भाजीवालीशी, किंमतीवरुन हुज्जत घालतो. घासाघीस करतो.

बायका "मला अहेवपणी मरण येऊ दे", अशी देवाकडे प्रार्थना करतात. आणि तिच्याशी विसंगत अशी दुसरी प्रार्थना लगेचच देवापुढे करतात,"हाच पती पुढच्या जन्मी लाभू दे."

ह्या बायका अर्थातच् पुनर्जन्म मानतात. यातली विसंगती बघा हं, या बायका जर अहेवपणी म्हणजे नवऱ्याच्या आधीच मेल्या तर त्यांच्यानंतर त्यांचे नवरे मरणार. त्यांच्यांत आणि त्यांच्या नवऱ्यात पुनर्जन्मातही चार, पाच वर्षांचं अंतर हवंच. म्हणजे तो नवरा मरुन पाच वर्षे पूर्ण झाली की ह्या बायका जन्माला येणार. तोपर्यंत ह्या मृत बायकांचा आत्मा काय भटकत बसणार?वेटिंग करत बसणार? आणि एक बायको मेल्यावर तिच्या पति परमेश्वराने दुसरे लग्न केले तर? तिनेही तेच मागणे देवापाशी मागितले तर?ह्या दोन्ही पतिव्रतांपुढे केवढा बांका प्रसंग उद्भवेल!
कुटुंब नियोजनाच्या आजच्या काळात असे कितीतरी आत्मे जन्माला येऊ न शकल्याने भटकत राहतील!

जुने लोक म्हणतात, हे कलियुग आहे. त्यामुळे जगात सर्वत्र आपत्ती, अधर्म,दु:खं, दुराचार, अनैतिकता, हिंसाचार यांचा कळस झाला आहे. आधीच्या युगांमध्ये जर सर्वत्र नीतीमत्ता होती,सुख होते, शांतता होती तर मग भगवान् श्रीकृष्णाला"संभवामि युगे युगे" या त्यांच्याच गीतेतील वचनानुसार पुन्हापुन्हा जन्म का घ्यावे लागले? आणि आता इतक्या वाईट परिस्थितीतही भगवान श्रीकृष्ण जन्म का घेत नाहीयेत? याचा अर्थ अजून कलियुगात पापकर्म करायला स्कोप आहे की काय? की याआधीच्या अश्म,सत्य,त्रेता, द्वापार इत्यादी युगांत आत्ताच्या कलियुगापेक्षाही वाईट परिस्थिती होती. गृहमंत्र्यांचा राजीनामा वगैरे न मागता डायरेक्ट श्रीकृष्णांनीच जन्म घेतला.

अशा खूप साऱ्या विसंगती सांगता येतील. तुमच्या त्या लक्षातही आल्या असतील. मग सांगून टाका !

मांडणीमुक्तकप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

धमाल धागा. शंभरी साजरी करणार.

कलीयुग संपून विसंगती युग सुरू झालं आहे.

कर्नलतपस्वी's picture

15 Jan 2025 - 7:01 am | कर्नलतपस्वी

लेख वाचून 'Owl's Critics' , James Thomas Fields यांची कविता आठवली.

विजुभाऊ's picture

15 Jan 2025 - 10:16 am | विजुभाऊ

लै भारी आज्जे
एकीकडे ठेविले अनंते तैसेची रहावे असे म्हणायचे
आणि दुसरीकडे
विद्येवाचून मती गेली. मतीवाचून गती गेली असेही म्हणायचे.

सौंदाळा's picture

15 Jan 2025 - 10:27 am | सौंदाळा

जबरदस्त धागा आणि उदाहरणे.
प्रतिसादांवर पण लक्ष ठेवून आहे.

अथांग आकाश's picture

15 Jan 2025 - 10:36 am | अथांग आकाश

भारीच! लेख आवडला!!

भागो's picture

15 Jan 2025 - 11:04 am | भागो

आभार आज्जी.
पुराणातली वानगी !
हे माझ्यासाठी नवीन होये. धक्का.

भागो's picture

15 Jan 2025 - 11:20 am | भागो

आजी आता इकडे पहा.
पुराण n A Pura'n or sacred and poetical work. पु?B सोडणें-लावणें To begin a long and tiresome story. पुराणांतली वांगी पुराणांत राहिलीं Said of one mighty in talk, slack in act.
वझे शब्दकोश
किंवा
......पुराणांतलीं वांगीं पुराणांत राहिलीं Said when a person does not observe his own prescriptions,--of one mighty in talk, slack and lagging in act.
मोल्सवर्थ शब्दकोश
अर्थात मला तुम्ही जे म्हणत आहात ते पटतेय. पण मला प्लीज reference हवाय.
वानगी = उदाहरण.

विजुभाऊ's picture

15 Jan 2025 - 11:40 am | विजुभाऊ

वानगी दाखल = उद्दाहरणार्थ

विजुभाऊ's picture

15 Jan 2025 - 11:41 am | विजुभाऊ

"वानगी" याचा एक अर्थ पदार्थ ( खाद्य पदार्थ / पक्वान्न ) असाही होतो.

आंबट गोड's picture

15 Jan 2025 - 4:51 pm | आंबट गोड

लिहीले आहे आजी. फार बारीक निरीक्षण आहे .
:-)
टीव्ही सिरीयल मधील जेवणा बद्दल तर अगदी पटले. खूप भात , पोळ्या आणि वाटीत थोडी आमटी. पुन्हा त्या ताटाचा क्लोज अप घेतात!